बदलती भाषा - कुठून आणि कुठे?

संकल्पनाविषयक भाषा

बदलती भाषा - कुठून आणि कुठे?

लेखक - हेमंत कर्णिक

भाषा हा जरी गहन अभ्यासाचा असला आणि भाषाशास्त्र या विषयात जरी जटिल यमनियमांची गुंतागुंत असली; तरी विचार करण्याचं, संवाद साधण्याचं आणि अनुभव नोंदण्याचं माध्यम म्हणून प्रत्येक मनुष्य भाषा वापरत असतो. त्यामुळे समाजात रहाणार्‍या प्रत्येकासाठी भाषा हा विषय जिव्हाळ्याचा ठरतो. याच भूमिकेतून मी भाषेबद्दलचं माझं आकलन थोडक्यात सांगून अनुभव आणि निरीक्षण, यांमधून मांडणी करणार आहे.

तर माझं पहिलं आकलन असं आहे की भाषा ही समाजाच्या मालकीची असते. कालची भाषा कालच्या समाजाची होती, आजची आजच्या समाजाची आहे. इथली भाषा इथल्या समाजाची आहे, तिथली तिथल्या समाजाची आहे. अशा स्थितीत, एका बाजूने शुद्ध - अशुद्ध असं काही उरत नाही आणि दुसरीकडून भाषेतील बदलाला र्‍हास म्हणता येत नाही. लोक ज्या पद्धतीने भाषा वापरतात, त्यात नियम शोधून व्याकरण वगैरे निश्चित करता येतं; पण उलट करता येत नाही. मात्र या तर्कानुसार जरी 'व्याकरण असं आहे आणि अशा प्रकारे न लिहिणे / बोलणे चुकीचं आहे,' असं म्हणणं मुळातच चुकीचं ठरत असलं, तरी प्रत्येक जण त्याच्या वा तिच्या इच्छेनुसार भाषा हवी तशी वाकवू, वळवू शकत नाही. तसं होऊ लागल्यास अनागोंदी माजेल आणि अर्थपूर्ण संवाद अशक्य होऊन बसेल. म्हणजेच, अंतरावरून निरखताना भाषेतील वळणांची, बदलांची परंपरा दिसते आणि एक क्षण, एक स्थिती अवलोकताना तेव्हाच्या रूढ नियमांच्या चौकटीत भाषेचा लवचीक वापर होताना दिसतो.

मी काही वर्षं नोकरीनिमित्त उत्तर प्रदेशात रहात होतो. माझी भाषा तिथल्या भाषेपेक्षा वेगळी असल्यामुळे त्या भाषेचं बाहेरून निरीक्षण मी करत होतो. तिथे माझ्या एका सहकार्‍याचं नाव होतं, राम आसरे. 'म्हणजे हे राम आश्रय असावं,' असं माझ्या मनात आलं. 'आश्रय हा संस्कृत शब्द सहजी जिभेवर वावरत नसल्याने त्याचं आसरे, असं भ्रष्ट रूप तयार झालं आहे.' पण लक्षात आलं, हे बरोबर नव्हे. एकेका भाषेची वळणं वेगळी असतात. शब्द जेव्हा इथून तिथे मायग्रेट होतो, तेव्हा त्याचं रूप बदलणं साहजिक आहे. तिथेच एका चौकात जवळच्या गावांची अंतरं दाखवणारा फलक होता. इंग्रजांच्या काळापासूनचा. कानपूरच्या दिशेने लिहिलं होतं, Cawnpore 110 Miles. आज कानपूरचं स्पेलिंग Kanpur, असं आहे; पण (खुद्द?) इंग्रजी मनाला तो उच्चार Cawnpore इथून निघणे जास्त सयुक्तिक वाटलं. त्यांनी केलेल्या स्पेलिंगला 'भ्रष्ट' हे विशेषण लावता येत नाही. गोव्यात पोर्तुगीजांनी हेच केलं. तरी इंग्रजी ही भारतीय उपखंडात जन्मलेली भाषा नव्हे. इंग्रजी भाषेतल्या आपल्या जवळच्या, ओळखीच्या कितीतरी शब्दांचं मूळ लॅटिन आणि/अथवा ग्रीक या भाषांमध्ये असतं. म्हणून इंग्रजीतील शब्दाला लॅटिन/ग्रीकचं भ्रष्ट रूप म्हणता येत नाही. पुन्हा 'घरी' यायचं, तर मराठीत उदाहरणार्थ 'उंच' हा शब्द मूळ संस्कृतातल्या 'उच्च'वरून तयार झाला आहे, असं म्हणता येतं. पण याच्या उलट म्हटलं, की कधी काळी मराठी प्रदेशात रूढ असलेल्या 'उंच' या उच्चारावरून संस्कृतात 'उच्च' हा उच्चार घडला, तर ते तर्काला सोडून होणार नाही. तेव्हा अशा बदलांची नोंद तेवढी घ्यावी, त्यांना नाक मुरडू नये.

मराठी भाषेच्या संदर्भात अलीकडच्या काळात झालेल्या बदलांपैकी, इथे सर्वात प्रथम भाषेत रूढ असलेल्या शब्दप्रयोगाच्या विपरीत 'आता दहा कोसांवर भाषा बदलत नाही', असं विधान एक बदल म्हणून नोंदवावंसं वाटतं. जेव्हा लोकांची भ्रमणक्षमता कमी होती, तेव्हा एकेकाच्या उच्चारांवर, दाखले म्हणून वर्णिल्या जाणार्‍या प्रतिमांवर, वाक्यरचनेवर आणि व्याकरणावर संस्कार करणारे घटक स्थानिक होते, छोट्या वर्तुळातले होते. भाषेतला रूढ शब्द वापरायचा तर 'पंचक्रोशी'तले होते. नंतर प्रवास सोपा झाला आणि लोक दूर दूर फिरू लागले. कुठून कुठून संस्कार आणू लागले आणि त्यांच्या संकरातून घडणारी भाषा जास्त विशाल प्रदेशावर नांदू लागली. थोडक्या अंतरावर बदलत रहाण्याऐवजी मोठ्या क्षेत्रामध्ये विविध संस्कारांना सामावून घेऊन राहू लागली.

तरीही प्रत्येक संपर्कातून टिकाऊ संस्कार होतातच, असं नाही. आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य असताना इंग्रजी ही 'साहेबा'ची, शासकाची भाषा होती. सगळे इंग्रज जरी एकसारखं बोलत नसले तरी त्यांच्यातले अभिजन बोलत, ती 'क्वीन्स इंग्लिश' इथे प्रतिष्ठित ठरली. स्वातंत्र्यानंतर देशी साहेबांनी इंग्रजीची सद्दी चालू ठेवली. पुढे काँप्युटर आले आणि इंग्रजीला प्रतिष्ठेसोबत एक नवीन मूल्य प्राप्‍त झालं. पण एक झालं; भाषा तीच राहिली, तरी तिचा 'भूगोल' बदलला. ती काँप्युटरच्या प्रदेशात गेली, अमेरिकन झाली. आणि अगदी आत्ता, म्हणजे गेल्या पाचेक वर्षांमध्ये उच्चभ्रू भारतीयांच्या तोंडच्या इंग्रजीचं वळण अमेरिकन होऊ लागलं आहे. क्वीन्स इंग्लिशला मागे सारून अमेरिकन उच्चार प्रतिष्ठित व्हायला एवढा काळ जावा लागला! अमेरिकन इंग्रजी भारतीयांच्या संपर्कात होतीच; तिला उचलून आपलंसं करण्यासाठी काँप्युटर, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी यांचं आगमन व्हावं लागलं.

अमेरिकन संस्कृतीने हॉलिवुडच्या चित्रपटांच्या माध्यमातून जगभर जोरदार आक्रमण केल्याचा इतिहास आहे. इंग्रजी भाषेतले ते चित्रपट मोठ्या शहरांमध्ये प्रदर्शित होत आणि शौकीन लोक पहात. त्यामुळे त्यांतल्या भाषेचा आणि संस्कृतीचा प्रभाव तेवढ्यापुरता मर्यादित राहिला. सार्‍या समाजात पसरला नाही. आता घराघरात येऊन बसलेल्या टीव्हीमुळे दृकश्राव्य माध्यमाच्या प्रभावाच्या बाबतीत परिस्थिती बदलून गेली आहे. टीव्हीवरच्या मालिकांच्या प्रेक्षकांच्यात, बहुतांश पुरुषांच्या तुलनेत घरात जास्त वेळ घालवणार्‍या स्त्रियांचा भरणा असतो; हे लक्षात घेऊन त्या मालिका स्त्रियांसाठीच बनवल्या जातात आणि वर्गभेद ओलांडून स्त्रियांच्यात लोकप्रिय झालेल्या दिसतात. मालिकांमधील व्यक्‍तिरेखांच्या लोकप्रियतेच्या बरोबर त्यांची नावं, त्यांचे कपडे, त्यांच्या फॅशनी, त्यांच्या तोंडची भाषा आणि त्यांचे उच्चारसुद्धा अनुकरणीय ठरतात. हे मराठी मुलुखभर घडतं. तसंच हिंदी मालिका द्रविड राज्यं सोडून उरलेल्या भारतभर बघितल्या जातात. (पाकिस्तानातही त्यांना मोठी लोकप्रियता आहे!) म्हणजे एका मोठ्या भूभागावर एकाच प्रकारच्या भाषेचे संस्कार होतात आणि ते संस्कार हौसेने, कौतुकाने स्वीकारले जातात. मग दहा कोसांवर भाषा बदलणार कशी? उलट एकेका ठिकाणच्या भाषावापरातले प्रादेशिक कंगोरे निघून जाऊन भाषा गुळगुळीत होण्याची ही प्रक्रिया आहे. एके काळी बाह्य संस्कारांपासून जास्तीत जास्त मुक्‍त, एका अर्थी 'शुद्ध' असं भाषेचं रूप मिळवण्यासाठी अंतर्भागातल्या स्त्रियांच्या भाषेचं निरीक्षण केलं जायचं. त्याच स्त्रिया आता भाषेचं सपाटीकरण घडवून आणत आहेत.

'सपाटीकरण' हा भाषाप्रयोग मराठी नाही. 'सपाट' या विशेषणावरून 'सपाटीकरण' हे नाम बनवण्याची रीत इंग्रजीमधून आली आहे. मराठी बोलताना 'सपाट' या विशेषणाला धरून विवेचन करणं जितकं सुलभ असतं; तितकंच इंग्रजी वळणाचं लेखी विवेचन करताना, 'सपाटीकरण' ही संज्ञा सोयीस्कर ठरते. दस्तावेजीकरण, निबंधलेखन, यांचे नियम आणि त्यांची शिस्त आपण पश्चिमेतून आयात करत आहोत. त्यातून 'सुलभीकरण' असे शब्द मराठीत घडत आहेत, आणि यातून 'वनीकरण करताना' असे चमत्कारिक प्रयोग अपरिहार्य होत आहेत. पण एका वाक्यात 'करण' आणि 'करणे' हे समान अर्थाचे दोन प्रयोग लागोपाठ येणे चमत्कारिक आहे, हे कुणाला खटकताना दिसत नाही. भाषेतले हे बदल इथल्या स्थितीतील बदलांमधून उगवत नाही आहेत; तर बाहेरच्या रीतीला अनुसरताना अटळपणे तयार केले जात आहेत. याचं एक उदाहरण मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवर होणार्‍या हिंदी उद्‍घोषणां(!)मध्ये सापडतं. "प्लॅटफॉर्म नंबर एक पर आनेवाली आगामी गाडी...' असं ऐकताना 'आनेवाली' आणि 'आगामी' हे एका अर्थाचे दोन शब्द एकामागोमाग येतात.

संवादाऐवजी उपचार हे भाषावापराचं प्रयोजन झालं, की काय होतं याचं एक उदाहरण या उद्‌घोषणांमध्ये सापडतं. प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्यांच्या येण्याजाण्याच्या घोषणा करणे आवश्यक आहे, हे खरं असलं तरी रेल्वे स्थानकावरील उद्‍घोषणांमागची प्रेरणा प्रवाशांची सोय बघणे, ही नाही. 'रेल्वेव्यवस्थेशी संबंधित एक आवश्यक समजला जाणारा उपचार पार पाडणे', ही आहे. म्हणून त्या घोषणा प्लॅटफॉर्मवरच्या प्रवाशांपर्यंत पोचतात की नाही, त्यांना नीट ऐकू जातात की नाही, याविषयी रेल्वेप्रशासन बर्‍यापैकी उदासीन असतं; आणि म्हणूनच या घोषणा इंग्रजीत तयार करून मग त्यांचं इतर भारतीय भाषांमध्ये रूपांतर केलं जातं. मग इंग्रजीत "Next train expected on platform number ..." मध्ये next आणि expected या दोन इंग्रजी शब्दांच्या जागी हिंदीतही दोन शब्द घालण्याची दक्षता भाषांतरकार आपोआप घेतात आणि हे असं 'आनेवाली आगामी' लिहून जातात. 'कोणत्याही प्रकारच्या विवादामध्ये इंग्रजी पाठ प्रमाण मानला जाईल,' हे जे (मुळातल्या इंग्रजी पाठात अर्थातच नसलेलं विधान) शासकीय, निमशासकीय आस्थापनांमधल्या पत्रकांच्या शेवटी लिहिलेलं असतं; ते याचसाठी आवश्यक असतं. ती भारतातील शासकीय, प्रशासकीय व्यवहारातील इंग्रजीच्या सर्वोच्च स्थानाला दिलेली मान्यता असते. त्या मान्यतेला आधार केवळ सरकारी धोरणाचा आहे, असं मानण्याची चूक करू नये; ते भारतातील एक सर्वमान्य मूल्य आहे. हे मूल्य मनात नांदत ठेवलं की भारतीय भाषांमधल्या छोट्या मोठ्या गफलतींकडे दुर्लक्ष करता येतं. नव्हे, दुर्लक्ष करणे हाच शिष्टाचार ठरतो.

यातून भाषेतील बदलाची एक दिशा आपल्याला कळते. ती अशी की आता, हळूहळू भारतीय समाजामध्ये लिखित स्वरूपाला बोलीच्या वरचं स्थान मिळू लागलं आहे, आणि आपल्या बहुतांश मौखिक परंपरेतून लिखाणाला पुरेसं मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे लेखी व्यवहारांमध्ये आपण इंग्रजीला अनुसरत मार्गक्रमण करत आहोत. आपल्या लेखी भाषेचं वळण इंग्रजी रचनेच्या जवळ जातं आहे, पण सरळ-सरळ ऐकण्यातून होणार्‍या संस्कारांमधून घडत असलेल्या बोलीत अजूनही पारंपरिक वळणं सापडतात. मात्र प्रतिष्ठेच्या बाबतीत लेखीचं पारडं जास्त जड असल्यामुळे लेखीची बोलीवर कुरघोडी होते आहे. 'गंभीरपणे घेणे' हा वाक्प्रचार जुन्या मराठीत सापडत नाही, कारण ते 'Take seriously' या इंग्रजी प्रयोगाचं शब्दशः भाषांतर आहे. आणि आताच्या मराठीत तो सर्रास वाचायला मिळतो कारण ते इंग्रजी वळण आता परिचयाचं झालं आहे.

इंग्रजीत लिखाण करण्यासाठी इंग्रजी केवळ बोलता येऊन भागत नाही; स्पेलिंग यावं लागतं. मराठी उच्चारानुसारी भाषा असल्यामुळे मुळाक्षरं माहीत झाली; की बोलणे आणि लिहिता येणे, यात अंतर उरत नाही. पण बहुसंख्य लोक लिहिण्यास सहसा तयार नसतात. एक गंभीर अडचण लिहिण्याच्या आड येते, ती म्हणजे शुद्धलेखन. एक लेखक मित्र एकदा म्हणाले होते, 'उशा आणि उषा, ही जोडी सोडली; तर श/ष ऐवजी ष/श लिहिल्याने अर्थामध्ये फरक पडण्याचं दुसरं मराठी उदाहरण नाही.' असं जर असेल, तर दोन दोन श आणि ष असण्याची काहीच गरज नाही. त्यातला एक भाषेतून काढून टाकला, तर या दोघांच्यात गोंधळ होत असल्याने जे लेखणी उचलण्यासच बिचकतात, त्यांचा फायदा होईल; आणि भाषेच्या अर्थवाही क्षमतेचा, सौष्ठवाचा काही तोटा होईल असं वाटत नाही. असाच विचार र्‍हस्व-दीर्घाबद्दलही करायला काय हरकत आहे? गुरु आणि गुरू, यांच्या अर्थामध्ये असलेला फरक (दुसर्‍या गुरूवर वास्तविक अनुस्वार आहे, पण ते असो) संदर्भातून स्पष्ट होणार नाही का?

खरं तर काही प्रमाणात हा प्रश्न निकालात निघाला आहे. रु आणि रू, यांच्यातला फरक कधीच धूसर झाला आहे. फार कमी मुद्रितशोधक रु आणि रू मध्ये दुरुस्ती करतात. एकूणच इकार आणि उकार, यातील र्‍हस्व-दीर्घाचा सोक्षमोक्ष लवकर लावणं गरजेचं आहे. ते काढून टाकल्याने लिहिणं सुलभ होईल, कीबोर्डातील दोन कीज कमी होतील. प्रतिवादाची बाजू पहायची, तर र्‍हस्व-दीर्घाचं भान जाणिवेत मुरलेल्यांच्या डोळ्यांना एकच एक वेलांटी वा उकार खटकेल. आणखि नुकसान किति होइल, (वा आणखी नूकसान कीती होईल) याचा अभ्यास करून लवकरात लवकर या बाबतीत निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण सामाजिक व्यवहारात नागरव्यवस्था जशी पसरत जाईल, तशी लिखित भाषा वापरण्याची आवश्यकता वाढत जाईल आणि समाजाच्याच मालकीचं असलेलं भाषा हे माध्यम, समाज समाजाच्या लहरीनुसार हवं तसं वळवून घेईल. अडचणीच्या रचनांचा आपसूक 'निकाल' लागेल. उदाहरणार्थ, दर्‍या आणि दर्या हा रफारातला फरक मराठीत आहे, हिंदीत नाही. हिंदीत 'र्‍या' नाही. आजच फेसबुकसारख्या 'सोशल मीडिया'वर "पर्‍यांचे पर्यावरण" हे "पर्यांचे पर्यावरण" असं लिहिलं जात आहे. कारण हिंदी-मराठीची सामायिक लिपी असलेल्या देवनागरीचे कीबोर्ड्स बर्‍याच अंशी या दोन भाषांसाठी एकच आहेत.

मुळात मराठी माणूस सहनशील, सहिष्णू. भाषेतल्या चुका तो चालवून घेतो. फेसबुकावर 'खर्‍याची दुनिया'च्या जागी 'खर्याची दुनिया', 'जबाबदार्‍या' ऐवजी 'जबाबदार्या' असं मुबलक आढळून येतं; आणि त्या संबंधात कोणीही गहजब करताना आढळत नाही. म्हणजे, हे रूढ होण्यासाठी केवळ थोडा काळ जाण्याची गरज आहे; आणखी कशाची नाही. कीबोर्डावरची आणखी एक की कमी झाली! ऋ आणि लृ यांची दीर्घ रूपं झाली आहेतच ना इतिहासजमा. लृ तर क्लृप्‍तीपुरताच उरला आहे.

घ आणि ध सारखे दिसतात, याचा परिणाम म्हणून 'उद्‍घाटन' हा शब्द 'उद्धाटन' असा लिहिला जाऊ लागला आहे. पायमोडका द्‍ सुटा न ठेवता त्याला जोडाक्षरात पाठवलं की 'उद्‍घाटन'चं उद्घाटन'च होऊन जातं काही टाइपिंग फाँट्समध्ये.

क्लासिफाईड्स क्लासिफाईडस्

उच्चार अपूर्ण असेल तिथे अक्षराचा पाय मोडला जातो. उच्चाराकडे दुर्लक्ष करत सरसकट शेवटच्या अक्षराचा पाय मोडण्याकडे कल असलेला सध्या दिसून येतो. उदाहरणार्थ, शेड्स ऐवजी 'शेडस्‍'. 'शेड्स' बोलताना 'ड' हा उच्चार पूर्ण होत नाही. 'शेडस्‍' उच्चारताना ड पूर्ण ठेवायला हवा, 'लोटस' किंवा 'फोकस' यांच्या धर्तीवर; पण ज्या गावाला प्रमाण मराठीचं माहेरघर म्हणता येईल, त्या पुण्यातल्या बहुसंख्य दुकानांच्या पाट्यांवर शेवटच्याच अक्षराचा पाय मोडलेला दिसून येतो: स्पोर्टस्, फ्रेंडस्‍ असं. दुकानात शिरणार्‍या गिर्‍हाइकांनी जर याला आक्षेप घेतला असता, तर दुकानदाराने सुधारणा केली असती. पण (पुण्यातलेही) लोक चालवून घेतात, किंवा लोकांच्या हे लक्षातही येत नाही! याचं मोठ्ठं उदाहरण म्हणजे 'मॅक्डोनल्डस्‌'! जगभर पसरलेल्या या अमेरिकन कंपनीने आपल्या नावाचं कुणा व्यावसायिकाकडूनच बनवून घेतलेलं देवनागरी रूप, हे असं अशास्त्रीय आहे. परंतु मॅक्डोनल्ड्सची प्रतिष्ठा, लोकप्रियता पहाता 'ड'ऐवजी 'स'चा पाय मोडणंच बरोबर आहे, असं सिद्ध करण्यासाठी पुरावा म्हणून अगणित बाबतीत अनुसरणीय असलेल्या अमेरिकेतल्या या विश्वव्यापी ब्रँडचं उदाहरण दिलं जाईल.

क्लासिफाईड्स क्लासिफाईडस्

रफाराच्या बाबतीतही गोंधळ आहे. रफाराची जागा बदलल्यानेसुद्धा उच्चारात फरक पडतोच. पण आपल्या तथाकथित फोनेटिक मराठीत रफाराची शिस्त मुळातच बरोबर नाही, हे दाखवून देता येईल. आपण वाचताना अक्षरं वाचतो. सगळा शब्द झाकून एक एक अक्षर उघड करत त्याचा उच्चार करत गेलं की (आपल्याकडे 'लेटर/अल्फाबेट आणि सिलॅबल यांच्यात फरक नसल्यामुळे) थांबत थांबत का होईना, शब्दाचा पूर्ण उच्चार मिळायला हवा. आता 'मर्यादा' हा उच्चार म-र्या-दा असा थांबत थांबत करून बघा. उच्चार 'मर्‍यादा'च्या जवळ जातो. आणखी एक उदाहरण म्हणून, 'सूर्य' उच्चारताना 'सू' हा एक पूर्ण उच्चार झाल्यावर 'र्य' असा पुढचा पूर्णाक्षरी उच्चार येतो, असं म्हणावं लागेल. आणि डोक्यावर रफार असलेलं अक्षर जर असं एकटं उभं राहू शकत असेल, तर तसल्या अक्षराने सुरू होणारा शब्द भाषेत नाहीच, असं का? हा प्रश्न 'सीरीयसली घेतला जात' नाही कारण 'र्य' हा उच्चार मुळातच लंगडा आहे, रफार उच्चारताना अर्धा र हा अगोदरच्या अक्षराच्या जवळ जाणारा आहे. 'सूर्य' उच्चारताना आपण सू आणि मग र्य असं म्हणत नाही; 'सूर्‌' आणि मग 'य' असं म्हणतो. म्हणूनच हा रफार घोषणा रंगवणार्‍यांना, त्यांहीपेक्षा दुकानांचे फलक रंगवणार्‍यांना गोंधळात टाकतो आणि ते 'पुर्नरचना' (वा तत्सम) लिहून जातात.

ञ हे अक्षर असलेला मराठी शब्द मला माहीत नाही. 'चंचल' मध्ये 'ञ' आहे; पण तो अनुस्वारात मावतो. न, म, ण यांच्यासारखं 'ञ'ला स्वायत्त अस्तित्व असल्याचा पुरावा माझ्याकडे नाही. कोणाचकडे नसावा. म्हणून की काय फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियावर 'त्र' या जोडाक्षरासाठी 'ञ' चा वापर राजरोस सुरू झालेला दिसतो. मी तर असंही ऐकतो की काही ग्रामीण शाळांमध्ये 'त्र' या जोडाक्षराचं लिखित रूप 'ञ' असंच शिकवलं जातं! 'मित्र' नाही, 'मिञ'.

भाषावापरातील या पडझडीला वा तोडमोडीला स्थायी बदल म्हणता येईल का? की हे प्रकार भाषावापराच्या परिघापाशी आहेत आणि त्यांना उपयोगात आणणारे जसजसे भाषाव्यवहाराच्या केंद्राच्या दिशेने सरकतील, तसतसं ते स्वतःची भाषा सुधारत जातील आणि असल्या धूसर प्रकारांचं प्रमाण कमी होत जाईल?

या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही. भाषेचं तथाकथित 'शुद्ध', 'प्रमाण' स्वरूप अंगी मुरलेले अभिजन संख्येने अल्पच असतात; पण बहुसंख्यांची त्या प्रमाण, 'शुद्ध' स्वरूपाला मान्यता असते आणि ते स्वरूप लीलया वापरणार्‍या अभिजनपदी पोचण्याची आकांक्षा बहुसंख्यांना असते. मराठीत मात्र हे इतकं सरळ नाही. मराठीत गोष्टी काहीशा गुंतागुंतीच्या आहेत. मराठी समाजात मराठी भाषेचा वापर 'शुद्ध', प्रमाण' स्वरूपात सहजगत्या करणे, हे अभिजनवर्गाचं प्रमुख लक्षण नाही; ज्याच्या/जिच्या बोलण्यात इंग्रजी शब्द, इंग्रजी रचना मोठ्या प्रमाणात येतात, त्याला/तिला अभिजन मानलं जातं. याचा एक चमत्कारिक परिणाम असा झाला आहे की 'शुद्ध', प्रमाणभाषेचे संस्कार नसलेल्या घरची मुलं आईवडिलांना निरपवादपणे मम्मी-पप्पा म्हणतात! ती मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. त्यांना 'सोमवार', 'निळा रंग' हे माहीत नसतं; 'मण्डे', 'ब्ल्यू' (हा खास मराठी उच्चार) हे त्यांच्या जिभेवर रुळलेलं असतं.

इंग्रजी भाषेतच प्रतिष्ठा आहे, हा विश्वास बाळगण्याच्या बाबतीत शहरी-ग्रामीण असा भेद नाही. या मुद्द्यावरच्या गोंधळात आणखी भर टाकणारी गोष्ट म्हणजे आजचा मराठी तरुण वर्ग आपले आदर्श साहित्यिक, चित्रकार, शास्त्रीय गायक असले कलावंत वा विज्ञानाशी झटापट करणारे वैज्ञानिक यांच्यात शोधत नाही. यांना आदर दाखवण्याचा उपचार अवश्य होताना दिसतो; पण उपचारांपलीकडे जाऊन पाहिलं तर आज सिनेमा आणि टीव्ही, यांच्या पडद्यावर चमकणार्‍या चेहर्‍यांना मोठी स्टार व्हॅल्यू आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्याचं अनुकरण केलं जातं. मग जान्हवीच्या मंगळसूत्राची फॅशन कमालीची लोकप्रिय होते आणि 'काहीतरीच हं श्री' हा परवलीचा अर्थ यच्चयावत सर्वांना माहीत असल्यामुळे त्यावर अगणित जोक्स बोकाळू शकतात.

हे सितारे लोक एकही वाक्य पूर्ण मराठी न बोलण्याविषयी कमालीचे जागरूक असतात. फाडफाड इंग्रजी बोलण्यापर्यंत मजल जाण्यासाठी अभ्यास आणि सराव यांची गरज असते, पण इंग्रजी अंतरंगाचा आभास निर्माण करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे शब्दोच्चार - accent - हा शॉर्टकट उपलब्ध असतो; जो हे सितारे लोक अवलंबताना आढळतात. आणि त्यांचं अनुकरण करून किंवा त्यांच्याशी सहमत होऊन स्वयंप्रेरणेने विचित्र जागी जोर देण्याची, महाराष्ट्राच्या प्रादेशिक बोलींशी परिचित असणार्‍या कुणाच्याही कानाला खटकेल, असे कुठल्याच भूमीशी, समाजघटकाशी, काळाशी आणि संस्कारांशी जोडता न येणारे हेल काढण्याची रीत आता इतकी रूढ झाली आहे, की तिला 'वृत्ती' म्हणावं. आणि वर म्हटल्याप्रमाणे ही वृत्ती शहरी-ग्रामीण भेदापलीकडची आहे. अगदी पुण्याच्या मराठी शाळेत पुणेरी मराठी उच्चारांचे संस्कार झालेली तरुण मुलगीसुद्धा भलत्या ठिकाणी आशयशून्य जोर देणारे उच्चार करत मराठी बोलते, आणि त्याचा तिला सूक्ष्म अभिमान असतो. कारण त्या उच्चारांमधून जरी अर्थछटेत भर पडत नसली; तरी सगळाच मराठी भूगोल नाकारत असल्याचा आशय त्यांमधून स्वच्छपणे प्रसारित होत असतो. त्या वृत्तीच्या लोकांना ती खूण एका उच्चपदी विराजणार्‍या जमातीशी जवळीक जाणवून देत असते.

या प्रकाराला 'बदल' म्हणण्यावाचून इलाज नाही.

याला समांतर आणखी एका बदलाची दखल घ्यायला हवी. मराठी मुलुखात ब्राह्मण व इतर उच्चवर्णीय यांच्या समाजाच्या वरचा थरातल्या जागेला अजून धक्का लागलेला नाही. ते तिथेच आहेत आणि ते तिथून ढळण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. मात्र ब्राह्मण व इतर उच्चवर्णीय = अधिकार, मान हे जरी बर्‍याच प्रमाणात खरं असलं तरी उलटं; अधिकार, मान = ब्राह्मण व इतर उच्चवर्णीय, हे समीकरण उरलेलं नाही. अधिकाराच्या, मानाच्या आणि 'फ्रंट ऑफिस'च्या जागा सर्व जातीचे ब्राह्मणेतर व्यापताना आढळतात. कारण या सर्व बाबतीत इंग्रजी बोलता येणे, ही प्राथमिक गरज आहे. मराठी मुलुखात इंग्रजीवर प्रभुत्व असेल, तर प्रगतीची संधी जास्त आहे आणि इंग्रजी माध्यमात शिकलेली सर्व जाती=वर्गांतली पिढी केव्हाच तरुण झाली आहे. परिणामी विविध क्षेत्रातल्या मानाच्या, अधिकाराच्या, 'फ्रंट ऑफिस'च्या जागा इंग्रजीत सफाई असणार्‍यांनी व्यापल्या आहेत. त्यामुळे अधिकार आणि मान सहज पेलणार्‍या (विशेषतः तरुण) व्यक्‍तीची जात, परंपरेनुसार ठरणारं तिचं सामाजिक स्थान, यांचा थांगपत्ता बहुधा इंग्रजीत घडणार्‍या औपचारिक संभाषणातून लागत नाही.

याचीच पुढची पायरी अशी ठरते की अधिकार, मान वागवल्याच्या परिणामी अंगी येणार्‍या आत्मविश्वासामुळे प्रमाण, 'शुद्ध' भाषेचे संस्कार न मिळालेल्यांच्या तोंडातून सहजपणे बाहेर पडणार्‍या 'अशुद्ध' मराठी उच्चारांच्या बाबतीत त्यांना बिलकुल कमीपणा वाटत नाही! आयटीसारख्या तंत्रज्ञानात तर कौशल्यावरूनच अधिकार आणि मान ठरत असतात. तिथे तर हे पुष्कळ जास्त प्रमाणात आढळतं.

थोडक्यात, 'शुद्ध', 'प्रमाण' उच्चारांचं स्तोम मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. मराठी उच्चार 'मोकळे' झाले आहेत.

हा बदल जरी स्वागतार्ह असला, तरी याची दुसरी बाजूसुद्धा लक्षात घ्यायला हवी. प्रतिष्ठा आणि हुशारी यांचं मोजमाप करताना मराठी भाषकांमध्ये इंग्रजीला अवास्तव महत्त्व दिलं जातं, याचे परिणाम प्रचलित भाषेवर होण्याला इलाज नाही. त्यांना दुष्परिणाम म्हणावं का? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आज एक स्थिती झपाट्याने वाढत आहे की कितीही प्रगल्भ मराठी बोला; म्हणी, वाक्प्रचार आणि अलंकार यांनी स्वतःच्या वाणीला, लेखणीला सजवा; आजची मराठी तरुण पिढी त्याने फार इम्प्रेस होत नाही. दुसरं असं, की इंटरनेट आणि मोबाइल फोन यांचा प्रचंड प्रभाव तरुणाईवर पडत असताना उपकरणं, प्रक्रिया, कृती, संकल्पना वगैरे बाबतीतल्या नावीन्याच्या अवाढव्य धबधब्यात आजचे 'टीन एजर्स' अंतर्बाह्य भिजत आहेत. त्यांच्या तोंडी आपसूक नवनव्या संज्ञा रुळत आहेत, आणि नावीन्याच्या या प्रपाताला तोंड देण्यात मराठी सरळ सरळ कमी पडते आहे.

हे जगात सगळीकडे घडत आहे. परंतु अभिनव जीवनातील सगळे तपशील बाहेरूनच घेणं आपल्या फारच अंगवळणी पडलं आहे. तंत्रसाधनं, अर्थव्यवहार यांच्याद्वारे इंग्रजीची सलगी वाढते आहे. या रस्त्याने मनात घुसलेली इंग्रजी अटळपणे तिचं भाषिक कल्चर आणते आहे. अमेरिकन टीव्हीवरच्या मालिका, युरोप-अमेरिकेतील संगीत यांचा वावर तरुणाईत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आपल्या संस्कृतीच्या तुलनेत युरोप-अमेरिकेत संगीत, नृत्य अशा सांस्कृतिक क्षेत्रांत तरुणाईचा प्रभाव खूपच मोठा आहे. तिथे तरुण संवेदनेला शब्द आणि आवाज देण्याचं काम तिथले 'बँड्स' करतात. मराठीत बँड्स कुठे आहेत? टीव्ही मालिकांमुळे एकभाषक प्रदेशात होत असलेल्या सपाटीकरणाला समांतर स्थिती इंटरनेट-यूट्यूबमुळे आजच्या तरुण पिढीत निर्माण झाली आहे. त्यांच्या भावविश्वाला हवा तो प्रतिसाद त्यांना पश्चिमेतले बँड्स, तिथलं संगीत, तिथल्या सीरियल्स यांच्यात सापडतो. आजच्या तरुणांच्यातल्या नातेसंबंधात जास्त मोकळेपणा आहे, स्पर्शाविषयी संकोच खूप कमी आहे. त्यांच्या मैत्रीच्या कल्पना बदललेल्या आहेत. या सगळ्याची 'मराठी' अभिव्यक्‍ती कुठे आहे? जी काही अर्धीमुर्धी सापडते, ती म्हणजे इंग्रजी-हिंदीची नक्कल आहे. म्हणूनच आजच्या मराठी नाटकांच्या, चित्रपटांच्या नावांमध्ये इंग्रजी शब्द आढळतात. हिंदीसुद्धा आढळतात, आणि त्यांच्या तुलनेत मराठी खूप कमी सापडतात. जणू काही हिंदी-इंग्रजीचा आधार घेतल्याखेरीज अभिव्यक्‍ती आधुनिक होतच नाही! मग कॉलेजातल्या तरुणांच्या मराठी वापरात 'करोफाय' 'सडोफाय' असले हायब्रिड शब्द ऐकू येतात, कारण त्यांची जीभ मराठीचा त्याग करण्याइतकी इंग्रजीला सरावलेली नसते आणि इंग्रजीच्या स्पर्शाविना त्यांना आधुनिक युगाचे सदस्य असल्यासारखं वाटत नाही. अ-मराठी ऍक्सेंट अंगीकारून, इंग्रजी शब्दांशी सलगी करून आजचे युवक-युवती "मी लोकल नाही, मी ग्लोबल आहे" अशीच घोषणा करत असतात.

याची चिंता करावी का? ज्यांना आजपर्यंतच्या मराठी भाषासौष्ठवाचा अभिमान आहे, त्यांनी अवश्य करावी. लोक बोलत/लिहीत रहाणारच आहेत आणि सद्यकाळाला अनुरूप अशा रचना आपोआप घडवत रहाणार आहेत. उद्याही मराठी असेलच; पण आजच्या मराठी अभिमान्यांना तिला 'मराठी' म्हणावंसं वाटेल की नाही, हे सांगणं कठीण आहे!

संवेदनशील, संस्कारशील वयात बालकांवर कोणते भाषिक संस्कार होतात, यात या परिस्थितीची मुळं आहेत. भाषेचं काम स्वतःच्या भावनांना, स्वतःला सुचणार्‍या संकल्पनांना शब्दरूप देणे हे आहे; असं मराठी मुलांना शिकवलं जात नाही. नित्यनूतन निर्मिती करत, कल्पकतेने भाषा वापरत प्रभावी संवाद कसा साधावा; हे आपल्या शाळांमध्ये शिकवलं जात नाही. भाषा हे विज्ञान आणि इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र वगैरे शिकण्याचं; फार तर सभोवतालाची माहिती देण्याचं माध्यम आहे, बस्स. असंच वातावरण सतत असेल, तर भाषावापरात समृद्धी येणार नाही. भाषा वाढणार नाही. साचलेल्या डबक्यात जीवसृष्टी तगत नाही; तसाच मराठी इडियम टिकणार नाही. या प्रदेशातील रहिवासी जरी त्यांच्या स्थानिक व्यवहारांत भाषा वापरत राहिले तरी आज जिला आपण मराठी भाषा म्हणतो, ती हळूहळू मरून गेलेली असेल!

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

खूपच आवडला लेख.शुद्धलेखनाचे प्रमाण ठरवल्यानंतर ते तसेच लिहिले जातात याबद्दल फक्त पुस्तके मासिके वर्तमानपत्रांतून केलेल्या लेखनातच काटेकोरपणा पाळला जातो.,जाहिरांतील लेखन,संस्थळांवर लिहिणाय्रांना आवरणार कोण?मालिकातील बोलणारे नट भाषा बोलतात त्यावर काहीच अंकुश नसतो.
ब्रम्ह, ब्रम्हं जानाति इति ब्राम्हण: असलं तरी ब्राह्मणच लिहिले जाते.
वनीकरण/प्रमाणिकरण करणे ;दिनांक xxरोजी होणार इत्यादी चुका कधी भाषेत शिरतात ते कळतच नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम लेख. कोणत्याही काळात भाषा शुद्ध लिहिली व बोलली जावी असा आग्रह धरणारे अल्पसंख्यच असतात. हे मराठीच नव्हे तर बहुतेक सार्‍याच भाषांना लागू आहे. लेखात म्हटल्याप्रमाणे जोवर ते अल्पसंख्य समाजातील अभिजन मानले जातात तोवर स्वतःस त्या अभिजन गटात सामिल करण्याच्या इच्छेपोटी तरी इतर लोक 'प्रमाण' भाषेला व शुद्धलेखनाला मानतात. सामाजिक उतरंडीत वर जाण्यासाठी स्वतःच्या भाषेत हळूहळू त्या प्रकारे बदल करू पाहतात. परंतु जर ती भाषा जेत्यांची, सत्ताधार्‍यांची भाषा नसेल तर तीस तो मान मिळत नाही. त्या भाषेवर प्रभुत्व मिळवण्याने सामाजिक व आर्थिक फायदे नसले तर तिच्याकडे बेफिकिरीनेच पाहिले जाते. मराठेशाही बुडाल्यापासून मराठीची तीच गत झाली आहे. इंग्रजी ही स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही जेत्यांची, सत्तेची, समाजातील उच्च वर्गाची, व आर्थिक उत्कर्षाची भाषा राहिली आहे. जागतिकीकरण, आंतरजाल, आयटी, असंख्य टिव्ही वाहिन्यांवरील अगणित मालिका ह्या अलीकडील बदलांनी मूळ प्रवृत्तीस अधिक बळकट व वेगवान केले इतकेच. कुसुमाग्रजांच्या, सचिवालयाबाहेर लक्तरे लेऊन भीक मागणार्‍या मराठीला तेव्हा निदान समाजातील मराठीचा अभिमान बाळगणारा वर्ग तरी वाली होता. ती पिढी कालौघात वाहून गेली. त्यांच्या वंशजांची मातृभाषा शासकीय फॉर्ममध्ये भरण्यापुरती 'मराठी' असली तरी प्रत्यक्षात मिंग्लिश आहे. ज्या भाषेचा वापर करण्यात फायदा तर नाहीच, किंबहुना जिचा वापर केल्याने 'व्हर्नी' असा अवहेलनात्मक शिक्का कपाळी बसण्याची शक्यताच अधिक ती त्याज्य ठरली नाही तर नवल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

फारच सुरेख लेख.

एक लेखक मित्र एकदा म्हणाले होते, 'उशा आणि उषा, ही जोडी सोडली; तर श/ष ऐवजी ष/श लिहिल्याने अर्थामध्ये फरक पडण्याचं दुसरं मराठी उदाहरण नाही.' असं जर असेल, तर दोन दोन श आणि ष असण्याची काहीच गरज नाही. त्यातला एक भाषेतून काढून टाकला, तर या दोघांच्यात गोंधळ होत असल्याने जे लेखणी उचलण्यासच बिचकतात, त्यांचा फायदा होईल; आणि भाषेच्या अर्थवाही क्षमतेचा, सौष्ठवाचा काही तोटा होईल असं वाटत नाही. असाच विचार र्‍हस्व-दीर्घाबद्दलही करायला काय हरकत आहे? गुरु आणि गुरू, यांच्या अर्थामध्ये असलेला फरक (दुसर्‍या गुरूवर वास्तविक अनुस्वार आहे, पण ते असो) संदर्भातून स्पष्ट होणार नाही का?

हा भाग विशेष भावला. मला ९९% शब्दांमध्ये र्‍हस्व-दीर्घ कळत नाही, सवयीने जमेल तसं लिहितो.

मराठी व्याकरणाच्या या नियमांचा एक मोठा दुष्परिणाम मराठी आंतरजालावर होतो आहे आणि तो म्हणजे गूगल सर्च. उदा. 'पहिल्या' हा शब्द शोधला तर 'पहील्या' हा शब्द असलेली सर्व पाने आपोआप गाळली जातात आणि 'पहील्या' शोधला तर 'पहिल्या' असलेली सगळी पाने जातात. मराठीतील एकूण र्‍हस्व-दीर्घ असलेले शब्द लक्षात घेतले तर गूगल मराठी शोधाची अस्वस्था किती भीषण आहे हे लक्षात यावे. आता मराठीची आर्थिक पत चिनी भाषेइतकी असती तर त्यांनी यात जातीने लक्ष घातलं असतं, सध्या तरी ते होण्याची शक्यता नाही. गूगलमध्ये मराठी शोध केल्यावर लोकांना हवं ते मिळत नाही, परिणामी मराठी पानांवरची वर्दळ कमी, आणि मराठीची आंतरजालाची आर्थिक पत कमी असं हे दुष्टचक्र चालूच राहतं.

मराठी आणि हिंदी यात समान असलेला एखादा शब्द शोधला तर सगळी पाने हिंदीतील दिसतात यावरुन हिंदी किती पुढे गेली आहे याची कल्पना यावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श आणि ष - दुसरं उदाहरण कोश आणि कोष.

बाकी प्रतिक्रियांमधली चर्चाही वाचत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तसंच,
शोक आणि षोक!!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

षोक सातशे वर्षेतरी इथे राहिला म्हणजे मराठीच म्हटला पाहिजे.ज्ञानेश्वरी तेराव्या शतकात आणि त्याअगोदरचे महमद घोरी,गझनीचा महम्मद वगैरे .अगदी महाराष्ट्रात नसले तरी उंबय्रात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडलाच!

मुख्य म्हणजे

लोक बोलत/लिहीत रहाणारच आहेत आणि सद्यकाळाला अनुरूप अशा रचना आपोआप घडवत रहाणार आहेत. उद्याही मराठी असेलच; पण आजच्या मराठी अभिमान्यांना तिला 'मराठी' म्हणावंसं वाटेल की नाही, हे सांगणं कठीण आहे!

हे आवडलं.

आणखी एक आवडलेलं म्हणजे "मराठी मालिका आणि भाषाप्रसार" हा भाग. भाषाप्रसार हा संस्कृतीप्रसाराचा एक भाग आहे. मालिकांमधून अभिजनांच्या संस्कृतीचा प्रादुर्भाव होतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

साधारण सहमती आहेच.
पण भातात थोडे खडे लागले :

'सपाटीकरण' हा भाषाप्रयोग मराठी नाही. 'सपाट' या विशेषणावरून 'सपाटीकरण' हे नाम बनवण्याची रीत इंग्रजीमधून आली आहे.

इंग्रजीतून नव्हे, संस्कृतातून. या प्रकारच्या रूपांना "च्वि-प्रयोग" म्हणतात. "वश" पासून "वशीकरण", वगैरे, प्रयोग ठाऊक असतीलच.

यातून 'वनीकरण करताना' असे चमत्कारिक प्रयोग अपरिहार्य होत आहेत. पण एका वाक्यात 'करण' आणि 'करणे' हे समान अर्थाचे दोन प्रयोग लागोपाठ येणे चमत्कारिक आहे, हे कुणाला खटकताना दिसत नाही.

खटकत नाही, ते ठीकच आहे. "-ईकरण" मधील करण आणि "करणे" क्रियापद यांचे व्याकरणातले कार्य वेगवेगळे आहे. नाहीतर तुम्ही "गाणे गायले" मध्ये द्विरुक्ती मानू लागात - ती द्विरुक्ती नव्हे.

दुर्लक्ष करणे हाच शिष्टाचार ठरतो.

वरील बाबतीत काहीतरी चूक आहे, असे कोणी म्हटले, तर क्वचित त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हा शिष्टाचार ठरावा!

लृ तर क्लृप्‍तीपुरताच उरला आहे.

मोठा मुद्दा मान्य, की या चिन्हाची मराठीत गरज नाही. परंतु हा मुद्दा सांगताना मात्र चिन्ह बरोबर लिहिले पाहिजे.
"ऌ" असे हवे - U+090C हे युनिकोड चिन्ह
"लृ" असे नको - U+0932 , U+0943 या दोन चिन्हांचे जोडून बनलेले चिन्ह नको.

---
गैरसमज नसावा. साधारण मुद्दे मान्यच आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ठीक लेख.
लेखातील भाषा अधिक प्रवाही असती तर वाचायला मजा आली असती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश हे नेहमीच संतुलित प्रतिसादा करीता आंजा त फेमस आहेत.
काट्याच्या मधोमध त्यांचा प्रतिसाद असतो.
पण मी बघतोय यंदा दिवाळीत काहीतरी गडबड आहे भाउ कुछ उखडे उखडे से नाराज चल रहे है.
अर्थात त्यातही वुइथ नाराजी भी संयतच है वो
एक सहज आपलं जाणवल म्हणुन नोंदवल जाता जाता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख अभ्यासपूर्ण आहे. आवडला. भाषेतून माणूस मनात उतरतो किंवा परका होतो. भाषा हे फार प्रभावी माध्यम आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छानच असतो, भाषेचा अस्ताव्यस्त प्रवास. कायकाय चिकटवून घेते भाषा. पण प्रवास न करताही केवळ भाषकांच्या आळसामुळे होत जाणारे उथळ बदल हे तापदायकच वाटतात. माणूस भेटतो, वस्तू मिळते... हे विसरलेल्यांच्या भाषेतला बदल नकोसा वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माणूस भेटतो, वस्तू मिळते... हे विसरलेल्यांच्या भाषेतला बदल नकोसा वाटतो.

अगदी अगदी. मी आली , मी गेली असले प्रयोग तर डोक्यातच जातात. ढगं आली आहेत हा आणखी एक कुरुप वाक्य प्रयोग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या डोक्यात जात असल्यामुळे काही हे शब्दप्रयोग चुकीचे ठरत नाहीत करंजीराव! पुण्याबाहेरही लोकंही मराठी भाषा बोलतात. आनि ते विविध जातींचेही आहेत. तुमाला माहिती नसेल कदाचित, पन पुन्यातपन वेगवेगळ्या जातींचे लोक राहातात. आनि ते वेगवेगल्या भाषेत बोलत असले, तर त्यात काही शुद्ध-अशुद्ध असत नाही राव. प्रमाण भाषा ही एक सोय असते, ती शाळा-कॉलेजांमधील पुस्तकांपुरती असते. तेवढ्यापुरतं तुम्ही काही बोलायचं तर बोला. पण बोलताना 'मी आली' हे उत्तर महाराष्ट्रातल्या बहुतांश मुली म्हणाल्या तर ते चूक नाही. ते चूक असेल तर बोलताना 'मी आले' हेही चूकच होईल. पुणे हे अख्खं मराठी जग नव्हे. दुसरीकडेही अनेक माणसे भेटतील जी तुमच्यापेक्षा वेगळी मराठी बोलतात. ती चुकीची नसते. तुमची बोली हीच या पुस्तकांची प्रमाणभाषा आहे, म्हणून बाकीच्यांच्या बोलींना तुच्छ लेखणं हे ब्राह्मण्याचं लक्षण आहे. असं प्लीज नका करू.
धनंजयरावांनी योग्य प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल त्यांना वैदर्भीय नमश्कार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्म्म! भंपक मॅडम तुमचे मुद्दे बिनतोडच आहेत.
.
पुण्यात किती जाती आहेत हे मला माहीतच नाही तर शिंपी, कासार, गुजराथी, सिंधी, सोनार, बौद्ध, सारस्वत अशा सर्व जाती-धर्माचे मित्र-मैत्रिणी मला लाभले आहेत. तेव्हा भाषेला अवास्तव महत्त्व देऊन त्यांना परके लेखण्याचा प्रमाद जरी लहानपणी क्वचित घडला असला तरी आता ही अढी अजिबात नाही.
.
फक्त दुसर्‍याशी संवाद साधताना, चट्टकन भाषेचाच पापुद्रा(लेयर) समोर येतो. आणि जर त्यात तफावत जाणवली तर अनसेटल व्हायला होते. परदेशातही भाषेची मर्यादा वेळोवेळी जाणवतेच इतकेच नव्हे तर काही(बरेच) गोरे-शेतकरी-रेडनेक लोकं भाषा, रंग, एकंदर रुप बेसिसवर भारतियांकडे किंचित परक्या भावनेने बघतात, तर काहींना एक जेन्युइन कुतूहल वाटतं. म्हणजे काय छिद्रान्वेषीपणा हा मानवी स्वभावच आहे. प्रस्थापितांना नेहमीच तेच व त्यांचेच बरोबर आहे असे वाटते. तेव्हा जर काही बदल घडवुन आणायचा असेल तर प्रस्थापित सोडून अन्य लोकांना थोडे कष्ट घावे लागतात. (go an extra mile).... परत अमके मराठी लोकं प्रस्थापित आणि अन्य विस्थापित असा बेह्दभाव करण्याचा माझा हेतू नसून, परदेशात अनेक पीढ्या घालविलेल्या, परदेशी लोकांना प्रस्थापित म्हणणे एवढाच आहे.
.
तुमच्या प्रतिसादातील केवळ एका शब्दाने माझी भूमिका "समजावुन घेण्याची" ठरली आणि तो शब्द आहे - "प्लीज." समोरच्याचे कान त्वरीत बंद करण्याचा राजमार्ग म्हणजे कर्कश्यपणा, अरेरेवी, माजुर्डेपणा. या घटकांचा अभाव असल्याने निदान आपल्यात संवाद तरी घडू शकला. पण परत - पुणे व ब्राह्मण हे उल्लेख विनाकारणच आले आहेत.
.
यापुढे आपला हा सुयोग्य मुद्दा नेहमी आणि जरुर मांडा फक्त वरील २ उल्लेख टाळून ही विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक- ब्राह्मण्य आणि ब्राह्मण यात फरक आहे. कृपया गेल्या वर्षीच्या ऐसी अक्षरेच्या दिवाळी अंकातील प्रतिमा परदेशी यांची मुलाखत पाहावी. दोन- पुणे हा उल्लेखही टाळणे शक्य नाही, कारण तिथली बोली ही मराठीची प्रमाण भाषा म्हणून प्रस्थापित झालेली आहे. असो. शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या डोक्यात जात असल्यामुळे काही हे शब्दप्रयोग चुकीचे ठरत नाहीत करंजीराव!

करंजी ही राव कशी असु शकते अगदी महाराष्ट्राच्या भारतातल्या जगातल्या कुठल्याही ठीकाणी असेल इचलकरंजी त असेल
भाषेत असेल
करंजी राव कशी असु शकते ?
करंजी ग ताई बाई अक्का माई इश्य्य असु शकते
पण राव कशी असु शकते भंपक राव
हे टंकतांना तुमची बोटे थरथरली नाही का राव ?
करंजीराव इलायचीराव चकलीराव काय भयंकर भंपक आहे राव हे नाव

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मारवा, तुम्हाला फक्त खायची करंजी माहीत असल्यामुळे करंजी ताई बाई अक्का माई इश्य्य एवढेच माहीत असावे. पण करंजी हे आडनावसुद्धा आहे. आता ते महाराष्ट्राच्या भारतातल्या जगातल्या कुठल्याही ठिकाणी असलं तरी तुम्हाला कळण्याची शक्यता नाहीच. त्यामुळे तुम्ही तुमचे तेच तेच राग आळवत बसा. आता तो राग ऐकायला इथे परत यायची इच्छा नाही. शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

करंजी हे आडनाव आहे हे मला खरचं माहीत नव्हतं या नवीन माहीतीसाठी सर्वप्रथम धन्यवाद.
माझा राग ऐकायला नाही पण कुणाशी न कुणाशी तर तुमचे सुर जुळले असतीलच ना अशी अपेक्षा करतो.
त्यांच्यासाठी तरी या.
एक लाइट मोड मध्ये बोललो होतो. करंजी तसं फारच क्लीअरली स्त्रीलींगी शब्द आहे म्हणुन ते राव लावलेलं अतिशय विचीत्र वाटलं होत, म्हणुन बोललो. त्यात तुमच्यावर व्यक्तिगत कुठलाही रोख नव्हता.
तरीही आय अ‍ॅम रीअली सॉरी.
पण या एका माझ्या प्रतिसादाच्या क्षुल्लक कारणासाठी तुम्ही इथे न येण्याचा निर्णय प्लीज घेऊ नका.
ही नम्र विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पगार मिळतो, वस्तू भेटते, असा फरक काही बोलींत होतो. हा आळस नव्हे, तर वेगळ्या अर्थछटेचे पृथक्करण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0