"शोध": खूपसं कौतुक आणि मोजक्या तक्रारी

इंग्रजीमध्ये "थ्रिलर" प्रकारच्या पुस्तकांचं बरंच समृद्ध कपाट आहे. डॅन ब्राऊन, मायकेल कॉनेली, जेम्स पॅटरसन वगैरे मंडळींच्या कृपेने. त्यात डॅन ब्राऊन कंठमणी शोभावा असा. कोणतातरी रहस्यभेद करायच्या ध्येयाने प्रेरित झालेला नायक, त्याला साथ देणारी नायिका, खलनायक किंवा खलनायकांची संघटना, नायकाला साथ देणारी चांगली माणसं / त्यांची संघटना, चोवीस ते छत्तीस तासांत घडणारं वेगवान कथानक असा थ्रिलर्सचा एकंदर ढाचा असतो. डॅन ब्राऊनने त्यात पुराणं, इतिहास, दंतकथा, गुप्त संघटना, कॉन्स्पिरसी थियरीजची जोड दिली, आणि द रेस्ट इज हिस्टरी.

मराठी थ्रिलर्सचा प्रांत तसा दुष्काळीच आहे[१]. पटकन आठवलेली थ्रिलर्स म्हणजे सुशिंच्या "दारा बुलंद" कथा. थोडं मागे जायचं तर डोक्याला पुष्कळ ताण देऊन आठवलेली नाथमाधवांची "रायक्लब उर्फ सोनेरी टोळी". नव्यापैकी नाहीच.

फेसबुकवर "शोध" या मुरलीधर खैरनार लिखित "डॅन ब्राऊन स्टाईल शिवकालीन मराठी थ्रिलर" विषयी वाचलं आणि उत्सुकता चाळवली.

a
(छायाचित्र सौजन्यः अ‍ॅमेझॉन)

"जगात गाजलेल्या कशाच्यातरी स्टाईल काहीतरी आता मराठीतसुद्धा!" वगैरे झैरात वाचली की उगाचच न्यूनगंडाची भावना येते. "च्यायला आम्ही काही नवीन बनवूच शकत नाही की काय!" वगैरे अडगे विचार डोक्यात येतात, आणि असं रुपांतरित/धर्मांतरित काहीतरी वाचायची इच्छा कमी होते.

अपवाद असतात. सरळसरळ रुपांतरित आहे हे दिसत असूनही गो० ना० दातारांचं "चतुर माधवराव" सुखद धक्का देऊन गेलं होतं. असंच होवो म्हणून सावधपणे कानोसा घेत होतो. फेसबुकवर "शोध"विषयी चांगलं वाचलं. वृत्तपत्रांतही. मग मागवलीच.

काही परीक्षणं इथे: मटा, दिव्य मराठी, सकाळ

शिवाजीराजांनी दोनदा सुरत लुटली. एकदा इ. स. १६६४ साली (शाहिस्तेखानाच्या स्वारीनंतर), आणि एकदा इ. स. १६७० साली (आग्र्याहून सुटकेनंतर). मोगली परचक्रांमुळे स्वराज्याची झालेली आर्थिक हानी भरून काढणे हा तात्कालिक हेतू दोन्ही स्वार्‍यांच्या मागे होता. पण महाराजांच्या मनातला दूरगामी आडाखा निराळाच होता. सुरत ही मुघल साम्राज्याची आर्थिक राजधानी खिळखिळी करण्याची महाराजांची योजना होती.

सुरतेची दुसरी लूट जास्त योजनाबद्ध होती. महाराजांच्या गुप्तहेर खात्याने पैशाचे स्रोत आणि सावकारांच्या/व्यापार्‍यांच्या धन दडवायच्या जागा हेरून ठेवल्या होत्या. अवघ्या तीन दिवसांत महाराजांनी सुरत साफसूफ केली, आणि हजारो बैलांवर लूट लादून स्वराज्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. पण वाटेत मोगली सैन्य पाठी लागलं, म्हणून महाराजांनी सैन्याचे तीन भाग केले. दोन भागांबरोबर लुटलेला खजिना स्वराज्याच्या दिशेने रवाना केला, आणि तिसरा भाग घेऊन मोगल सैन्याला तीन दिवस झुलवत ठेवलं. खजिन्याचे दोन भाग आता स्वराज्याकडे वेगवेगळ्या मार्गांनी वाटचाल करत होते. त्यातला एक स्वराज्यात पोचला, पण निम्म्याहून अधिक भाग नाशिक जिल्ह्यात कुठेतरी गडप झाला! तो घेऊन येणारं सैन्य कधी पोचलंच नाही. त्या खजिन्याचं काय झालं हे एक न उलगडलेलं रहस्य आहे[२].

हा झाला इतिहास. लेखक मुरलीधर खैरनारांनी त्यावर आपल्या कल्पनाशक्तीचा साज चढवला आहे. तो खजिना शोधणारे तीन वेगवेगळे गट, त्यांच्या गुप्त संघटना, वेगवेगळी ध्येयं, आणि त्यासाठी वाट्टेल त्या थराला जायला न कचरणारी पात्रं, असं खास डॅन ब्राऊनी पान जमवलं आहे.

या प्रकारच्या कादंबर्‍यांची भट्टी जमणं खरोखर कठीण गोष्ट आहे. फक्त उत्तम कल्पनाशक्ती असून भागत नाही. पहिलं म्हणजे इतिहासावर मजबूत पकड लागते. इथे बाहुबली किंवा हॅरी पॉटरसारखं स्वतंत्र विश्व उभारायचं नसून ज्ञात इतिहासाच्या कंगोर्‍यांत आपली कथा फिट्ट बसवायची असते. त्यामुळे इतिहास आणि कथानकाचा अचूक सांधा जुळवावा लागतो. कथानकात कच्चे दुवे राहणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते, आणि काही अपरिहार्य कारणाने ते ठेवावे लागले तर कौशल्याने झाकता यावे लागतात. इतिहासाच्या मार्‍याखाली कथानक गुदमरू न द्यायची काळजी घ्यावी लागते. किचकट इतिहास वाचकाला सहज पटेल अशा पद्धतीने मांडावा लागतो.

इतक्या डगरींवर एकत्र पाय ठेवून मग वाचकाला कथानक "शक्यतेच्या कोटीतलं" (plausible) वाटायला पाहिजे. वाचकाचा "सस्पेंशन ऑफ डिसबिलीफ" जास्त ताणता कामा नये. (आयुष्यभर रेशनिंग ऑफिसात खर्डेघाशी करणारा कारकून थ्रिलरचा नायक झाल्यावर अचानक सिंघमसारखी मारामारी करतो हे वाचकाला कसं पटेल?) त्यातून थ्रिलर्सची कथानकं वेगवान असतात. त्या चोवीस/छत्तीस/बहात्तर तासांच्या काळात पात्रं खोलवर रंगवता येत नाहीत. बर्‍याच प्रमाणावर सरसकटीकरण / क्लीशेकरण करावं लागतं. त्याप्रकारात कोणाच्यातरी शेपटीवर पाय पडण्याची शक्यता असते.

आणि सगळ्यांत शेवटी "आपलं" - म्हणजे भारतीय / मराठी समाजवास्तव. या ना त्या कारणाने शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं राजकीय भांडवल केलं गेलेलं आहे. या द्रष्ट्या महापुरुषाचा काल्पनिक (अ)झेंडा खांद्यावर घेऊन परस्परद्वेषाचा बाजार मांडला जात आहे. या खातेर्‍यात पाय न घालता शिवकालावर कादंबरी लिहिणे हे मध्यरात्री लालमहालात घुसून शाहिस्तेखानाची बोटं तोडण्याइतकं अवघड असावं. Wink

खैरनारांना यातल्या बहुतांश गोष्टी झक्क जमल्या आहेत. इतिहास संशोधनाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. त्यासाठी त्यांना अनेकांचं सहाय्य झालं, आणि त्यांनी खुल्या दिलाने ते ऋण मान्य केलं आहे. ऋणनिर्देशामध्ये बॅटमॅन आणि बिपिन कार्यकर्ते यांचे आभार मानलेले सापडले, आणि भारी वाटलं!

इतिहास संशोधनाबरोबर एकविसाव्या शतकातल्या टेक्नॉलॉजीचाही (उदा० ग्राऊंड पेनिट्रेटिंग रडार) त्यांनी कथेच्या दृष्टीने व्यवस्थित अभ्यास केला आहे. त्यामागचं विज्ञानही ठिकठिकाणी लिहिलेलं आहे. कथानक हे तांत्रिकदृष्ट्याही निर्दोष व्हावं हा खैरनारांचा कटाक्ष खरोखर आवडला. "इतने पैसे में इतनाहिच मिलेगा" किंवा "मराठीत चालतंय थोडंफार उन्नीसबीस" अशी पडेल वृत्ती नाही याचं कौतुक!

कादंबरीत आवडलेली दुसरी गोष्ट म्हणजे परिसराचं तपशीलवार वर्णन. नाशिकच्या गल्लीबोळांचं वर्णन तर फार उत्तम जमलं आहे. (काही वर्षांपूर्वी कामानिमित्त नाशिकला जाणं होत असे, तेव्हा "नाशिक पाहून झालेलं आहे" असा माझा एक समज होता. "शोध" वाचून तो समज पोकळ होता हे लक्षात आलं!) नाशिक जिल्ह्यांतले आदिवासी पाडे, तिथलं समाजजीवनही कादंबरीत फार समर्पक रीतीने येतं. त्यात कुठेही "कसं दाखवलं आदिवासी समाजजीवन, यू पुणेमुंबै लोक्स!" असा अभिनिवेश नाही. कथेच्या ओघात ते येतं, किंबहुना कथानकाचा महत्त्वाचा भाग तिथे घडतो, त्यामुळे ते नैसर्गिकरीत्या आलं आहे.

कथानक वेगवान आहे. बहात्तर तासांत पाचशे पानांची संपूर्ण कादंबरी घडते. वेगावरची मांड कुठेही ढिली पडलेली नाही. "हिरोहिर्वीन जिंकनारैत" हा आडाखा अगोदरच बांधता आला, तरी "कसे जिंकणार" या उत्सुकतेने आपण पुढे वाचत राहतो. थरार कादंबरीभर टिकून राहिला आहे.

नाही म्हणायला【स्पॉयलर अलर्ट सुरु】रहस्य थोडं विसविशीत आहे - डॅन ब्राऊन स्टाईल उलटेपालटे धक्के नाहीत. हिरोचा व्हिलन आणि व्हिलनचा हिरो होत नाही. (आठवा: दा विंची कोड) (एक फार गुणाचं पात्र पुढे व्हिलन निघेल अशी मला शेवटपर्यंत आशा होती. पण असं काही झालं नाही.)【स्पॉयलर अलर्ट बंद】पण हा काही मोठा दोष नव्हे.

आणखी एक बारीकशी तक्रार संवादांच्या भाषेबद्दल. जवळपास सगळे संवाद प्रमाणभाषेत आहेत. आदिवासी पाड्यातल्या मनुष्याने प्रमाणभाषेत बोलणं पटत नाही. इतिहासाचा प्राध्यापक, पोलिस इन्स्पेक्टर, उद्योजक, सचिवालयातला अधिकारी हे सगळे एकाच, सपाट भाषेत बोलतील हे शक्य नाही. भाषेच्या, बोलण्याच्या बारकाव्यातून पात्र जास्त प्रभावीपणे रंगवता येतं. ते "थ्रीडी" होतं, प्रत्यक्ष हाडामासाच्या माणसाच्या जवळपास पोचतं. संवादांना प्रमाणभाषेत ठेवल्यामुळे लेखकाच्या भात्यातलं हे एक हत्यार निकामी पडलं आहे.

तसंच भाषाबाह्य संवादांचं (non-verbal communication). पुस्तक वाचताना वाचक आपल्या मनात ते पात्र रेखाटत असतो, तो प्रसंग पाहत असतो. पात्रांचं दिसणं, लकबी, सवयी वगैरेही त्या पात्राच्या "उभं राहण्यात" भर घालतात. मग कथानकाच्या दृष्टीने ते तपशील बिनकामाचे का असेनात. उदा० रॉबर्ट लँग्डन मिकी माऊसचं घड्याळ वापरतो, रॉन वीझलीला कोळ्यांचं भय वाटतं वगैरे. या बाबतीत "शोध" थोडं कमी पडतं.

याचं थोडं आश्चर्य वाटलं. पुस्तकापाठी दिलेल्या परिचयातून मुरलीधर खैरनार नाशिकमधल्या प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत आहेत, त्यांनी पन्नासहून अधिक एकांकिकांचं दिग्दर्शन केलं आहे वगैरे माहिती मिळाली. नाट्यक्षेत्रात मुरलेल्या लेखकाकडून जास्त अपेक्षा होत्या. असो.

आणि काही बारक्या शंका "थ्रिलर" हा वाङ्मयप्रकाराबद्दल मला नेहेमी असतात. माझा संशयी, चिकित्सक स्वभाव काही ठिकाणी "सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ"वर मात करतो, आणि नाही ते प्रश्न पडतात. उदा० चाकोरीबद्ध काम करणार्‍या नायकाला बहात्तर तासाची अचानक धावपळ कशी झेपते? रोमहर्षक पाठलागाच्या मध्ये अचानक शू लागली तर ती सिचुएशन कशी ह्यांडल करणार? वगैरे. पण ते जाऊदे.

काही असो, पूर्णांशाने बघता "शोध"ची जमेची बाजू नक्कीच जास्त जड आहे. अगदी नक्की, आवर्जून वाचण्यासारखी, संग्रही ठेवण्यासारखी ही कादंबरी आहे.

कादंबरीच्या शेवटी, रहस्य उकलताना दोन ठिकाणी लेखकाने मुद्दाम मोकळे धागे सोडले आहेत. ती बहुदा दोन सीक्वल्सची तयारी असावी. खैरनारांचा पूर्णवेळ व्यवसाय काय आहे माहीत नाही, पण मराठी कादंबर्‍या लिहिणे नक्की नसावा. पण त्यांना पुढच्या दोन कादंबर्‍या लिहिण्यासाठी सवड मिळो, आणि तीही लवकर, ही सदिच्छा!

----------------
[१]इंग्रजीमधली "भारतीय" थ्रिलर्स हा एक वेगळा उप-प्रांत आहे. अश्विन सांघीचं "द कृष्णा की" किंवा विकास स्वरूपचं "सिक्स सस्पेक्ट्स" वगैरे.

[२]लेखकाने शिवकालातल्या तीन रहस्यांचा उल्लेख केला आहे. सुरतेची लूट हे त्यातलं एक. इतर दोन रहस्यं म्हणजे
(१) आग्र्याहून सुटका करवून घेऊन महाराज कोणत्या मार्गाने स्वराज्यात परतले?
(२) शिवाजी महाराजांचा मृत्यू हा घातपाताचा प्रकार होता का?

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

परिचय वाचून कादंबरी (असूनही*) वाचावीशी वाटली.

*हा माझा प्रांत नाही म्हणून. बाकी काही आक्षेप असं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थँक्यू व्हेरी मच! अजून राहिलीच आहे वाचायची. थोडी धाकधूक होती... पण आता वाचीन. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धन्यवाद..! खुप च आवडीचा विषय आहे. नक्की वाचणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्नेहल

ह्म्म डॅन ब्राउन सारखी म्हणून 'आवरण'चीही झैरात केलेली. त्यामुळे जी एक्स्पेटेशन सेट झालेली तशी ती नव्हतीच त्यामुळे अधिकच डोक्यात गेलेली.
जरा भितीच वाटते असलं कोणी काही म्हटलं की

पण आता हे वाचुन पुस्तक समोर आलं तर नक्की वाचेन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

परिचय आवडला. पुस्तक मिळाल्यास वाचायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठीत असलं काही आहे ह्याची कल्पना नव्हती!
नाही म्हणायला Shiva Triology ला हात घातला होता, पण दोन पुस्तकांनंतर प्रचंड कंटाळलो होतो.
हे पुस्तक नक्कीच वाचेन.
..
अवांतर - ह्या प्रकारच्या साहित्याला काय म्हणतात? म्हणजे "इतिहासकालीन थ्रिलर" असं काही आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचली. मस्त आहे. कादंबरीचा शेवट इतका खास जमला नाहीये. बाकीची कादंबरी इतकी रोमांचक असतांना शेवट तितकासा प्रभावी लिहिता आला नाहीये (की पुढच्या कादंबरीसाठीची तरतूद करण्याच्या नादात असं लिहिलंय ?) एकूणच वाचण्याजोगी कादंबरी आहे हे निश्चित. नाशिकचं इतकं तपशीलवार वर्णन पहिल्यांदाच येत असावं एखाद्या कादंबरीत. लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रांत नाशिकचं वर्णन वाचलेलं. कुसुमाग्रजांच्या जान्हवी या कादंबरीत सुरवातीला थोडंसं वर्णन येतं. शोध मध्ये मात्र खूप ठिकाणं आली आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठीतला वेगळा प्रयोग म्हणून कादंबरी ठीक आहे.लांबलेला रटाळ शेवट वगळता शेवटच्या पानापर्यंत वाचायला भाग पाडते. तांत्रिक आणि स्थळकाळाचे तपशील पण छान जमले आहेत. फक्त सॅमसँग चा मोबाईल, अमुक एक कंपनीचा लॅपटॉप असं निरर्थक डिटेलिंग टाळता आलं असतं तर बरं झालं असतं.कादंबरीचा टाईम्स्पॅन पण किमान आठव्ड्याभराचा असायला हवा होता.वाचक वाचताना दमून जातात तर पात्रे किती दमून गेली असतील. त्यांना अक्षरशा घाम पुसायला ही वेळ मिळाला नसणार. Smile इतकी दगदग काय कामाची !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बादवे, कुणाला 'मन्वंतर' नावाची दीनानाथ मनोहरांची कादंबरी आठवते का? नव्वदीच्या दशकातला नक्षलवादी नायक आणि त्याला आठवणारे १८५७ च्या बंडाच्या काळातल्या त्याच्या पूर्वजन्माचे फ्लॅशबॅक्स असं सूत्र होतं. मग वातावरणांमधल्या अराजकांमधलं साम्य, नैतिक पेच, मानवी भावना असा सगळा पट. या कादंबरीबद्दल वाचताना तो प्रयोग आठवला. पण त्यातल्या वेगळेपणाच्या मानानं त्याबद्दल कुठे काही लिहिलं-बोललं गेलेलं मात्र आठवत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माझी निराशा झाली 'शोध' वाचून. कल्पना लई म्हणजे लईच भारी सुचली आहे लेखकाला. इतिहास आणि भूगोल - दोन्हीचे तपशील व्य-व-स्थि-त. पण शैलीत मेजर मार खाल्ला गेल्या आहे, असे खेदाने नमूद करणे भाग आहे.

नव्याने गोष्ट (फिक्शन) लिहायला लागलेल्या लोकांच्या लेखनात एक विशिष्ट वाक्यरचना पुन्हापुन्हा येते. "आता मेघना घरी निघाली होती. पण तिच्या डोक्यात सतत ऑफीसचेच विचार घोळत होते. तिचा बॉस तिला म्हणाला होता की, तुझे कामात लक्ष नाही. या बॉसचे करावे तरी काय, हाच विचार तिला राहून राहून सतावत होता. पण घरी गेल्यावर वेगळेच प्रश्न तिची वाट पाहत होते, याची तिला अजिबात कल्पना नव्हती. जाताना नेहमीप्रमाणे देवळात जाऊन प्रसाद घेण्याचेही तिला सुचले नव्हते, इतकी ती विचारात बुडून गेली होती...." या परिच्छेदातली होता-होती-होते-नव्हता-नव्हती-नव्हते ही रूपं अनाठायी आहेत. ती दाताखाली येतात आणि रसभंग करतात. ती टाळली तर पुनरावृत्ती टळते आणि परिच्छेद निराळाच वाटायला लागतो. हे साधंसोपं सूत्र आहे. ते लेखकानं पाळलेलं नाही. त्यामुळे वाचताना कंटाळा येतो.

दुसरा महत्त्वाचा आक्षेप म्हणजे इंग्रजी शब्द. मान्य आहे, उगाच नात्झीपणा करू नये. कॅलेंडरला दिनदर्शिका म्हणावं, असा आग्रह नाही. पण कॅलेंडर चेक केले? अरे गृहस्था, कॅलेंडर पाहिले, तपासले... असं म्हणायला काही हरकत? हे फक्त वानगीदाखल होतं. पण या जातीच्या इंग्रजी शब्दांचे प्र-ह-च-हं-ड-ह भरताड या कादंबरीत आहे आणि ते अनावश्यक आहे.

तिसरा आक्षेप म्हणजे तपशील. वर कुणीसं म्हटलं आहे तसे निरर्थक तपशील. 'तिने फेसबुकावरच्या मेसेजशेजारच्या बाणावर कर्सर नेला आणि क्लिक केले. तो मेसेज पलीकडे जाऊन पडला. मग त्याचे ढमके झाले व पलीकडे तो फलाण्याला मिळाला...' अरे, कशासाठी? मान्य आहे, मराठी पुस्तकांत या सगळ्या तंत्रज्ञानाबद्दल कमी लिहिलं जातं. पण तरी, इतकं स्पून फिडिंग? गरज असेल तेव्हा सांग गड्या तपशील. पण उग्गाच? सॅमसंगचा फोन, ढमक्या कंपनीची गाडी, तमक्या ब्रॅण्डची ऑक्सिजन सिलिंडरे... 'वर्णनात जिवंतपणा आणणे आणि मिळाले आहेत शब्द, वापरा...' यांत काही फरक कराल की नाही? फारच चिडचिड झाली.

चौथा आक्षेप शेवटाबद्दल. चारशे वर्षांपूर्वीं गुहेत टाकलेल्या १४००० पिशव्यांपैकी बरोब्बर हवी तीच्च वस्तू असलेली एकच्च पिशवी आपल्या हिरोहिरविणीला तासाभरात लग्गेच मिळावी? कमॉन राव! इतकं नाही गंडवायचं! काहीतरी अजून तार्किक स्पष्टीकरण द्या की. इतके सगळे तपशील रचलेत, आता तीच्च पिशवी नेमकी समोर का यावी, याचंही रचायचं ना. कंटाळा आल्यासारखं उरकता काय? असो.

कौतुक कमी, आक्षेप फार - असं या प्रतिसादात झालं आहे खरं. पण आबांनी केलेल्या कौतुकामुळे अपेक्षा वाढल्या होत्या हे एक. आणि दुसरं म्हणजे - खरोखरच कल्पना, इतिहासभूगोलावर केलेलं काम, कथानकाची रचना - हे सगळं खल्लास भारी आहे. त्याच्यातून अजून किती मस्त-अभूतपूर्व-सफाईदार गोष्ट निघायला हवी होती, त्याचं हे असं अर्धकच्चं रूप का बरं मांडावं... असा जेन्विन वैताग झाला. पुढच्या दोन पुस्तकांत हे होऊ नये, जमल्यास याही पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीत हे सुधारलं जावं - अशी फारच मनापासून इच्छा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बर्‍याच अंशी सहमत!

अतितपशीलांमुळे एखाद्या सिनेमाची शूटींग स्क्रिप्ट वाचत असल्यासारखं वाटलं. हेलिकॉप्टरचं आणि मायनिंग-मेटालर्जिकल उपकरणांच वर्णन जरा जास्तच झालं.

राजहंसकडे चांगलं संपादन होतं असं ऐकवण्यात येतं पण शोध वाचून त्याचा प्रत्यय आला नाही. उलट मला कादंबरी घाईघाईत काढल्यासारखी वाटली.

तरीही नवीन विषय म्हणून पुस्तक वाचनीय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

पुस्तक अजून वाचले गेले नाहीय. पण उत्सुकता वाढलीय. आणि अपेक्षाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या पुस्तकाचे लेखक मुरलीधर खैरनार यांचं निधन झाल्याची बातमी नुकतीच वाचली. श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आदरांजली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मृण्मयी रानडे यांनी लिहिलं आहे -

शोध वाचून लगेच फेसबुकवर लिहिलं होतं. मुरली खैरनारांनी त्याची नोंद ठेवली होती, हे या मेसेजवरून लक्षात येईल. आॅक्टोबरमधला हा त्यांचा मेसेज. एका लेखकाने, पुस्तक प्रचंड लोकप्रिय झाल्यानंतरही सुधारणांच्या सूचनांचा विचार करावा, याचं मला अतिशय कौतुक वाटलं होतं. तिसरी आवृत्ती येणारच याचा त्यांना वाटणारा विश्वासही सुखावणारा होता.
भाऊबिजेला भावाला देण्यासाठी मी पुस्तक शोधलं, पण मिळालं नाही. म्हटलं, आता तिसरीच आवृत्ती घेऊन टाकू.
पण तो योग नव्हता.
खूप रुखरुख आहे अशा अकाली मृत्यूची.

MK
स. न.
आपण फेसबुकवर २ सप्टेंबर रोजी लिहीलेल्या "शोध" वरील टिपणाबद्दल मन:पूर्वक आभार.
पुढील आठवड्यात 'शोध'ची दुसरी आवृत्ती छपाईसाठी जाते आहे. पहिल्या आवृत्तीत राहून गेलेल्या काही तपशिलाच्या चुका मी दुसऱ्या आवृत्तीत दुरुस्त करून घेतो आहे. आपल्या टिपणावरील चर्चेत आपण "There are a couple of small hitches, but can be ignored." असा उल्लेख केला आहे.
आपण त्याबद्दल मला काही लिहिले तर मला आनंद होईल. त्यातल्या ज्या चुका सहज दुरुस्त करता येतील त्यांची दुरुस्ती मला या दुसऱ्या आवृत्तीत करता येईल.
आज दिवसभर मी बाहेर असल्याने मला आपले उत्तर रात्रीच वाचायला मिळेल. धन्यवाद.
मुरलीधर खैरनार

Me
Will send for sure
Happy for the second edition

MK
Thanks in advance.
Now leaving for the day.
Good day

Me
एक गडबड झालीय. मी जे पुस्तक वाचलं ते आॅफिसातलं होतं, जे आता गायब झालंय.
विकत घेणार आहेच, वेळ होत नाहीये
काय करता येईल?
पुस्तकाशिवाय नाही सांगता येणार सुधारणा
अगदी पटकन आठवली ती swivel chair. तुम्ही बहुधा ते स्वायवेल किंवा असं काहीतरी केलय. ते माझ्या अंदाजाने स्विवेल हवं
आणि काही असेच मूळ इंग्रजी शब्द जे देवनागरीत लिहिले आहेत.

MK
Thanks. I will check immidiately. Meanwhile we can always do some more corrections in the third edition.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हातातलं पुस्तक मी खाली ठेवतो.
मी माझा मॅकबूक उघडला. मॅकबुक्ला पॉवर इश्युज नाहीत म्हणून मला प्रत्येकवेळेस चार्जिंग करायची तशी गरज नाही. माझं लक्ष तरीही सवयीने गोरिला स्क्रीनवरील उजव्या कोपर्‍यातल्या बॅटरीच्या आयकॉनकडे गेले. ५६%! चला म्हणजे लगेच पॉवर केबल जोडायला नको. मी सर्व विंडोज मिनिमाईज केले. खालच्या सफारी ह्या वेब ब्राउझरचा आयकॉननं मला खुणावलं. मी तो क्लिक केलादेखील. सफारीची विंडो सर्व स्क्रीनभर पसरली. मी सवयीने अ‍ॅड्रेसबार मध्ये http://aisiakshare.com असे टाईप केले. ब्रॉडबॅंड असल्याने लगेच वेबसाईट उघडलीय. मी वेबपेजवरील उजव्या वरच्या कोपर्‍यातल्या सर्च बार मध्ये "शोध" असं देवनागरीत टाईप केलं. हा सर्च बार कधीच काम करत नाही. स्क्रीनवर तुमच्या शोधातून काहीही निष्पन्न झाले नाही. अशी अक्षरे आली. मग मी दुसरा ब्राउजर टॅब उघडला. अ‍ॅड्रेसबार मध्ये google.com असे टाईप केले. आलेल्या वेबपेजवर "शोध : aisiakshare.com" असे सर्च बार मध्ये टाईप केले. पहिला सर्च रिजल्ट आला तो ह्या धाग्याचा. मी त्यावर क्लिक केलं. धागा पुन्हा वाचला. माझा कीबोर्ड बडवायला सज्ज झालो.

प्रतिसाद सुरु :
खूप आढेवेढे घेत (किरण)नगरकरी हँगोव्हर उतरावा म्हणून मी शोध आणली.
स्पष्टपणे सांगायचे तर प्रचंड गंडॅक्स कादंबरी. वैताग आला अक्षरशः. कल्पनादारिद्र्य, शून्य संपादन, महाराष्ट्राचा डॅन ब्राऊन व्ह्यायच्या नादात झालेलं हसू.

वरील मेघना यांचा प्रतिसाद :

"तिसरा आक्षेप म्हणजे तपशील. वर कुणीसं म्हटलं आहे तसे निरर्थक तपशील. 'तिने फेसबुकावरच्या मेसेजशेजारच्या बाणावर कर्सर नेला आणि क्लिक केले. तो मेसेज पलीकडे जाऊन पडला. मग त्याचे ढमके झाले व पलीकडे तो फलाण्याला मिळाला...' अरे, कशासाठी? मान्य आहे, मराठी पुस्तकांत या सगळ्या तंत्रज्ञानाबद्दल कमी लिहिलं जातं. पण तरी, इतकं स्पून फिडिंग? गरज असेल तेव्हा सांग गड्या तपशील. पण उग्गाच? सॅमसंगचा फोन, ढमक्या कंपनीची गाडी, तमक्या ब्रॅण्डची ऑक्सिजन सिलिंडरे... 'वर्णनात जिवंतपणा आणणे आणि मिळाले आहेत शब्द, वापरा...' यांत काही फरक कराल की नाही? फारच चिडचिड झाली. "

हे तर तंतोतंत खरं आहे. हे भरताड गाळलं तर दोनशे पानसुद्धा कादंबरी भरणार नाही. >>बहात्तर तासांत पाचशे पानांची संपूर्ण कादंबरी घडते.

>> त्यात कुठेही "कसं दाखवलं आदिवासी समाजजीवन, यू पुणेमुंबै लोक्स!"

हे स्थळांच्या वर्णनाबाबत नसेल पण घटनांच्या? असं वाटतं, "हे मराठी वाचक पाहा माझ्या कादंबरीत फेस्बुक आहे, लिंक्डेन आहे, आणि ब्ला ब्ला आहे. कधी वाचली होती का ही सांप्रतकाळ सुसंगत कादंबरी" असला अभिनिवेश तर पानापानात ओसंडत आहे!

दुरुस्ती :
शिवकाळ ते मराठ्यांची नेशनवाइड पडझड हा कालावधी मूलतःच इतका रोचक आहे की त्यावर काय काय भन्नाट लिहिता येईल. खैरनार गेले हे नंतर लक्षात आलं. ही कादंबरी पहिली पायरी ठरो ही प्रार्थना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

ठार अवांतरः

(किरण)नगरकरी हँगोव्हर

रावण-एडी ट्रिलॉजीतलं शेवटचं "रेस्ट इन पीस" कसं आहे? मनात असूनही विकत घेता आलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मी ही अजून हात घातला नाही. त्यामुळं सांगू शकत नाही Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

सहमत..अति तपशील हा दोष तर आहेच.त्यामुळे 'शोध' वाचताना सिनेमाचा सिनारिओ वा शूटींग स्क्रिप्ट वाचल्यासारखं वाटलं.

शून्य संपादन- याशीही सहमत. माझ्या आठवणीप्रमाणे संपादक वा संपादन साहाय्यक म्हणून संजय भास्कर जोशींचं नाव आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

मी ही ती आणून ठेवली आहे, केव्हातरी घेईन हातात...अलीकडेच खैरनार यांचे निधन झाले, त्यावेळेस, संजय भास्कर जोशी यांनी त्यांच्यावर एक लेख लिहिला होता,त्यात ह्या कादंबरी बद्दल चांगला अभिप्राय त्यांनी दिला होता(त्याचा लेख कुठे वाचला आठवत नाही आता)...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

त्याचा लेख कुठे वाचला आठवत नाही आता

बहुधा 'ललित'मधल्या लेखाविषयी आपण बोलत आहात. त्यात ते हेही म्हणाले की'शोध' वर 'गेम ऑफ थ्रोन्स'सारखी मालिका कोणीतरी काढली पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक