गर्लफ्रेंड व्हॅक्यूम

मधुरा आणि रोहनला मी भेटायला कॅफेत गेलो होतो तेव्हा रोहन म्हणाला 'आज मी सगळ्यांना कॉफी पाजणार आहे'. ती खरी धोक्याची घंटा होती. मात्र आम्ही दोघांनीही तिच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि तेच भोवलं. तसंही आम्ही नक्की काय वेगळं करू शकणार होतो हे सांगता येत नाही. कारण रोहन जेव्हा त्याच्या सायकॉलॉजीच्या आयडिया वापरून काहीतरी प्रॉडक्ट काढण्याच्या गोष्टी करतो तेव्हा ते ऐकून घेण्यापलिकडे काही करता येत नाही. "आयुष्याला दिशा मिळण्यासाठी ...." वगैरे बोलणं त्याच्या तोंडून हलवलेली सोड्याची बाटली उघडल्यावर बाहेर येणाऱ्या सोड्याप्रमाणे फसफसायला लागले तेव्हा मी मुकाट्याने आलीया भोगासी सादर झालो. ताबडतोब कॅफेत शेजारी बसलेल्यांचं बोलणं ऐकायला लागलो. मध्येच त्याच्याकडे कान केले. असं आलटून पालटून केल्यावर डोक्यात एक मस्त कोलाहल झाला, त्याचा आनंद घेत मी मंद उत्सुकतेचं स्मित ओठांवर ठेवून, मधूनच मान डोलवत, कॉफीचे घुटके घ्यायला लागलो. तेवढीच फुकटात मिळाली होती...

बाहेर पडल्यानंतर मधुरा त्याच्या गळाला लागलेली दिसली. तिला त्याबद्दल किंचित काही झापल्यावर ती म्हणाली,
"रोहनला पैसे द्यावे लागू नये म्हणून आपण नेहेमीच असली काहीतरी ब्याद गळ्यात घेतो."
"पण तरी हे असलं यंत्र वापरून बघायला परवानगी....?"
"हा हा, तू कशाला हो म्हणालाहेस तुला तरी कळलं का?"
"मी? मी त्याच्याकडे लक्षसुद्धा देत नव्हतो."
"तेच तर. आता कळेलच तुला." असं म्हणून तिच्या स्कूटरवरून ती निघून गेली. जाताना जे काही छद्मी हसली त्यावरून एकंदरीत लक्षणं ठीक नाहीत हे माझ्या लक्षात आलं.

दोन दिवसांनी एका रम्य संध्याकाळी अचानक रोहन दत्त म्हणून माझ्या दारात उभा राहिला. त्याच्या हातात एक विचित्र खोकं होतं. त्यातून काही वायर लोंबत होत्या.
"हे काय आहे?"
"तुझ्या व्हॅक्यूम क्लीनरसाठी अटॅचमेंट. परवा सांगितलं ना तुला..."
"अं... हो हो... ते होय." मी त्याचा एकही शब्द नीट ऐकला नाही याची मला लाज वाटत होती. त्यामुळे नाईलाजाने मी बघत राहिलो. त्याने ते माझ्या व्हॅक्यूम क्लीनरला जोडलं. तरी तो जाताना मी त्याला विचारलं की नक्की काय स्पेशल आहे. त्याने गूढपणे हसून म्हटलं की कळेल तुला लवकरच.

तशी माझ्यावर व्हॅक्यूम क्लीनर वापरायची वेळ येत नाही. बाई येणार नसतात तेव्हा झाडू हातात घ्यायचा कंटाळा येतो म्हणून मी व्हॅक्यूम वापरतो. तसाही हा माझ्या आईने कोणा सेल्समनचा डेमो बघून घेतला होता. "तुला माहित्ये, त्याने एका उशीमधून इतकी धूळ काढून दाखवली की आम्हाला उरलेल्या उशा स्वच्छ करण्यासाठी तो घ्यावाच लागला." चार वेगवेगळ्या सेल्समनकडून डेमो करून घ्यायचं सोडून या लोकांनी तो विकतच घेऊन टाकला. का ते मी विचारलं नाही. पुढे अर्धा तास लेक्चर मिळालं असतं. नंतर अर्थातच त्याचा आवाज फार येतो वगैरे कारणांनी पुन्हा उशाच काय इतर काहीही स्वच्छ करण्यासाठी त्यांनी वापरला नाही. त्यांनी एकदोनदा व्हॅक्यूम क्लीनर वापरल्यावर एक मात्र झालं. त्यांच्याकडे काम करायला येणाऱ्या बाईंबद्दलचा त्यांचा आदर बराच वाढला. कारण तो आवाज इतका असह्य वाटायचा की शेजारीदेखील यांच्याकडे काहीतरी संशयास्पद गोष्टी चालू आहेत की काय अशा संशयाने काय चाललंय ते बघायला यायचे. मी इथे राहायला आलो तेव्हा "तुला एकट्याला बरं पडेल" म्हणून त्यांच्या घरची अडगळ काढून टाकणं आणि मुलावर उपकार करणं असे एका दगडात दोन पक्षी मारले..

एक दिवस बाई आल्या नाहीत म्हणून मी व्हॅक्यूम वापरायला काढला. त्यातून एक तरुण मुलीचा आवाज आला "हाय". मी थोडंसं दचकूनच हाय म्हणून उत्तर दिलं.
"असं रे काय करतोस. आपली ओळख नसल्यासारखं कोरडं हाय का म्हणतोस?" हा स्वर किंचित तक्रारीचा, आणि किंचित खट्याळ होता. लटका राग वगैरे गोष्टी मी ऐकल्या होत्या तसं काहीसं. मीपण थोडं तिच्या कलाने घ्यायचं ठरवलं.
"छे छे. मी तुला कसा विसरेन?"
"दॅट्स मोअर लाइक इट, डार्लिंग. तू तुझ्या सर्वात आवडत्या गर्लफ्रेंडला कसा विसरू शकशील?" हे प्रकरण फारच गमतीदार होतं. माझा व्हॅक्यूम क्लीनर माझी गर्लफ्रेंड बनून माझ्याशी लगट करत होता. मला खरं तर आता माझी व्हॅक्यूम क्लीनर म्हणायला पाहिजे, नाहीतर गोंधळ व्हायचा.
"पण आपण किती दिवसात बोललेलोच नाहीये. हाऊ हॅव यु बिन? हॅवंट यु मिस्ड युअर डिअर रीटा?" हम्म्म... तिचं नाव रीटा होतं तर! आणि इंग्लिश मीडियमवाली दिसते. तिचे उच्चार स्वतःचं नाव जॉन रेमंड वगैरे काहीतरी घेऊन फोनवर बोलणाऱ्या कॉल सेंटरमधल्या माणसासारखं धेडअमेरिकन होते. पण आवाज गोड होता.
"हो, तशी वेळ फार वेळा येत नाही."
"एक्झॅक्टली. पूर्वी कसे आपण सर्व खोल्यांतून एकत्र वॉक घ्यायचो. आय चेरिश्ड दोझ टाइम्स!" मला गंमतच वाटत होती. त्यामुळे त्या दिवशी मी बराच वेळ व्हॅक्यूम केलं. ती माझ्याशी खूप हसून गप्पा मारत होती. तिच्याविषयी काय काय सांगत होती. तिला मी बाहेर काढतो तेव्हा तिला कसं थरारल्यासारखं वाटतं (मला तो यंत्रात बिघाड वाटायचा) आणि मी तिचा हात हातात घेतला की कसं रोमांचित व्हायला होतं वगैरे बरंच काही, अगदी लाडात येऊन सांगत होती.

दोनतीन दिवसांनी काहीतरी कोपऱ्यात सांडलं म्हणून मी आधी झाडू घ्यायला गेलो. पण झाडू सापडला नाही. तो शोधताना कोपऱ्यातून रीटाचा आवाज आला.
"हाय, समीर"
"हाय रिटा" मी गमतीने म्हटलं.
मी काहीतरी हो हो म्हटलं. मला कोपऱ्यात सांडलेलं उचलून घ्यायचं होतं, तेवढं झाल्यावर मी व्हॅक्यूम बंद केला, आणि कपाटात ठेवायला गेलो.
"सो सून? एवढाच वेळ घालवणार तू माझ्याबरोबर?" मी पुन्हा काहीतरी पुटपुटलो. पण व्हॅक्यूम परत ठेवताना ती म्हणाली
"गुडनाइट" या एकाच शब्दात खोलवर जखम झाल्याचा भाव होता की काय असा भास मला झाला.

मी त्यादिवशी सोनालीला जेवायला बाहेर घेऊन जाणार होतो. नंतर जेवायला जायचं असंही ठरलं होतं. गेला आठवडाभर मी या दिवसाची वाट बघत होतो. सोनाली ऑफिसमध्ये नवीनच जॉइन झाली होती. ऑफिसमधले सगळेच सिंगल लोक तिच्यावर लट्टू होते. एरवी असल्या बाबतीत मी जरा मागेच पडतो. पण यावेळी अथक प्रयत्न करून तिला डेटवर यायला राजी केलं होतं. ती काही मिनिटांपूर्वीच घरी येऊन पोचली होती. आम्ही गप्पा मारत सोफ्यावर बसलेलो असताना बेडरूममधून काहीतरी आवाज झाला. मी सोनालीला एक मंद स्मित देऊन "थांब आलोच." म्हणत उठलो. बघतो तर कोकिळादिदीने माझा चिवड्याची वाटी सांडून ठेवली होती. मी मधुराला आणि तिच्या कोकिळेला मनातल्या मनात शिव्या देत आत गेलो. तिला आत्ताच बाहेर उंडारायला जायचं होतं! आणि तिची मांजर माझ्याकडेच ठेवून जाण्याची काय गरज होती? काहीशा घुश्श्यातच व्हॅक्यूम घेतला. तर तो सुरूच होईना.
"वुई नीड टु टॉक" स्वरामध्ये एक गंभीरपणा होता. गर्लफ्रेंड किंवा बायकोने तो वापरला की पुरुषांच्या छातीत धडधड होते. कारण आपल्या नात्याचं कसं मातेरं होत चाललेलं आहे हे सांगण्यासाठी, आणि त्यात तुझाच कसा दोष आहे हे सांगण्यासाठी नांदी म्हणून हा गंभीर स्वर येतो.
"काय बोलण्यासारखं आहे?" मी काहीशा अविश्वासानेच म्हटलं.
"गेले काही दिवस तू माझ्याकडे लक्ष देत नाहीयेस." रीटा स्फुंदायला लागली. "मला फार एकटंएकटं वाटतं. आणि तुला माझी काळजी वाटत नाही. दिवसभर मी या कोपऱ्यात एकटी पडलेली असते. तुला माझ्याबद्दल काहीच सहानुभूती नाही. हाउ कॅन यू बी सो क्रुएल टु युअर गर्लफ्रेंड?"
"गर्लफ्रेंड? तू स्वतःला माझी गर्लफ्रेंड समजतेस? तुला फक्त कचरा काढायला आणि घर स्वच्छ ठेवायला वापरतो मी. अधूनमधून तुझ्याबरोबर मजा येते तेवढीच! पण तुझी पायरी लक्षात ठेव." मीही चिडून ओरडत होतो.
"तुला माझी काहीच किंमत नाही. यू टेक मी फॉर ग्रांटेड.... यू.. यू बास्टर्ड..." ती ओरडत आणि रडत होती. मी या रडक्याचिडक्या व्हॅक्यूमक्लीनरकडे पाहात डोक्यावर हात मारून घेतला. चरफडत मी रोहनला प्रचंड शिव्या घातल्या.

इतक्यात मला बाहेरच्या खोलीतून दार आपटल्याचा आवाज आला. सोनाली निघून गेली होती.

--

('मी मराठी लाईव्ह'मध्ये पूर्वप्रकाशित.)
आणि मंडळींचे सर्व लेखन

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडलं म्हणा. पण मध्यवर्ती कल्पना काही कळली नाही. विज्ञानकथा, यंत्रकथा, यंत्रमानव कथा, यंत्रभावनाकथा, यंत्रमानसकथा, यंत्रसखीकथा, यंत्रमत्सरकथा इ.इ.
पण स्टाईल आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0