गेले ते दिन (भाग १)

बारा नव्हे, पण सहा गावांचे पाणी चाखून (आणि व्यवस्थित पचवून) मी अखेर पुण्याला महाविद्यालयीन शिक्षणासाठी दाखल झालो.
तसा मी आधी पुण्याला राहून गेलो होतो. पण जेमतेम सहा महिन्यांसाठी. आणि एखाद्या ठिकाणी किमान साडेसात महिने राहिल्याखेरीज ते ठिकाण पाणी चाखण्या/पचविण्याच्या यादीत न घालण्याचा पोर्तुगीज रिवाज मी तरी निष्ठेने पाळतो.
पुण्यात आलो नि थेट फर्ग्युसनच्या प्रवेशरांगेत उभा ठाकलो. रांग मजबूत होती. तासदोनतासांनी तिला काहीच खिंडार पडले नाही. माझा धीर खचायला लागला. तिसऱ्या तासाला मी मुख्य इमारतीच्या चौथऱ्यापाशी पोहोचलो. जादूची कांडी फिरल्यागत माझ्यासमोरची रांग निम्मी झाली. मग कळले की मुख्य इमारतीपर्यंत कला आणि विज्ञान शाखेची रांग एकच असते. तिथे पोहोचल्यावर त्या विभक्त होतात.
त्या काळी 'फर्स्ट क्लास' या शब्दाला वजन होते. आणि 'डिस्टिंक्शन' या शब्दासाठी पायघड्या असत. त्यामुळे मला प्रवेश मिळेल की नाही ही चिंता नव्हती. असलीच तर पायघड्या कुठल्या रंगाच्या आहेत ही होती.
त्या रांगेत मी गो नी दांडेकरांची 'दुर्गभ्रमणगाथा' वाचत उभा होतो. माझ्यापुढे उभा असलेला मुलगा Robert Ludlumचे कुठलेतरी पुस्तक वाचत होता. त्याच्यापुढच्या मुलाने मागे वळून पहात "Oh, Ludlum..." असे म्हणत संवादाची वात पेटवली. मी लगेच विझलो. कारण तोवर तरी इंग्रजी साहित्याशी माझा काहीही संबंध आलेला नव्हता. मराठी माध्यमातून (आणि तेही महाराष्ट्राच्या तीन कोपर्‍यांत) शिक्षण झालेले असल्याने माझे इंग्रजी अर्थातच कृत्रिमरीत्या पिकवलेले होते. मी जमिनीसमांतर धरलेली 'दुर्गभ्रमणगाथा' वर सरकवून त्या दोघांचे चेहरे झाकले. त्यांच्याशी बोलायची वेळ येऊ नये (इंग्रजीत बोलायचे कसे??) यासाठी केलेल्या त्या बचावात्मक व्यूहरचनेला यश मात्र आले नाही. फोटोला पोज दिल्यागत मी पुस्तक वाचतोय म्हणताना त्या दोघांचे लक्ष उलट माझ्याकडे वेधले गेले. पुढच्याचा पुढचा एकदम "अरे, अप्पा दांडेकर... क्या बात है!" असे उत्स्फूर्तपणे वदला. मी तेव्हा तळेगांवला राहत होतो, आणि गोनीदांना 'अप्पा' म्हणण्याइतकी माझी त्यांच्याशी ओळख झाली होती. 'दुर्गभ्रमणगाथा' मी त्यांच्याकडूनच आणली होती. त्यांना 'अप्पा' म्हणणारा हा अजून कुणीतरी त्यांचा परिचित असेल (आणि त्याच्याशी मराठीत बोलता येईल) या विचाराने मी आश्वस्त झालो. नंतर कळले की गोनीदांना 'अप्पा', पुलंना 'भाई', व्यंकटेश माडगूळकरांना 'तात्या' अशा नावांनी संबोधून सलगी प्रस्थापित करणे ही नारायण-सदाशिव पेठेतली 'ष्टाईल' आहे.
तो 'अप्पा'वाला नारायणपेठी नमुना आमच्या दोघांच्याही सुदैवाने लवकरच गहाळ झाला. पण तो Ludlumवाचक गेली साडेतीन दशके माझी मैत्री सहन करतो आहे.
तळेगांवहून जाये करण्याचा माझा मुळीच विचार नव्हता. एक म्हणजे बाकीचे कुटुंब भोपाळला होते. तळेगांवातले घर बांधायला नुकती कुठे सुरुवात झाली होती. आणि दुसरे म्हणजे तेव्हा पुणे-लोणावळा लोकल हा एक फारच मजेशीर आणि संथ प्रकार होता. मजेशीर यासाठी, की त्या लोकल दिसायला एकदम वेगळ्या होत्या. आता लोकल म्हटल्यावर पेंटोग्राफ, लाल-पिवळ्या रंगांचे पट्टे, मोठे कॉरिडॉर, झेब्रा क्रॉसने रंगवलेले फर्स्ट क्लास आणि लेडिज कंपार्टमेंट हे नजरेसमोर येते. पण ती लोकल तेव्हा चक्क पॅसेंजर गाडीसारखी होती. लाकडी फळकुटांची बाके, आणि वरती बर्थ. तेव्हा 'कासारवाडी', 'आकुर्डी' आणि 'कान्हेफाटा' ही स्थानके अस्तित्वात आलेली नव्हती. शिवाजीनगर - खडकी - दापोडी - पिंपरी - चिंचवड - देहूरोड - बेगडेवाडी - घोरावाडी - तळेगाव - वडगाव - कामशेत - मळवली - लोणावळा असा क्रम होता. पुणे-लोणावळा प्रवासाला निवांत दोन तास लागत. तशी मुंबईछाप एक लोकल होती. तिला 'युनिट लोकल' असे आदराने संबोधण्याचा रिवाज होता.
तर मला वसतीगृहात राहणे गरजेचे होते. तेव्हा 'कोसला' नुकतीच वाचलेली असल्याने तर ते फारच गरजेचे झाले होते. त्याप्रमाणे तिथेही प्रवेश घेतला. तोवर वसतीगृहात रहायचे अंगवळणी पडले होते. त्यामुळे लगेच बादली, झाडू, आरसा, तेलाची बाटली, साबण, हँगर, सुतळी, खिळे, कुलूप, माठ, कासवछाप आणि इतर उदबत्त्या इ खरेदी उरकली. पावसाळा नुकताच सुरू होत होता. एक डकबॅकचा रेनकोटही घेऊन टाकला.
वसतीगृहातली खोली नितांतसुंदर होती. अकरावी-बारावीच्या मुलांना एका खोलीत दोघांनी राहावे लागे. पण पदवीशिक्षणाला आलेल्यांना प्रत्येक खोलीत एक. खोली अगदी जुनी होती. मी पहिल्या मजल्यावर होतो त्यामुळे छताला लाकडी बहाले, वर कौले. तीन लंबगोल कड्यांची मिळून बनलेली, उभ्याने लावायची कडी. खिडकीला लावायची कडीही तशीच. खोलीत एक टेबल-खुर्ची आणि एक लोखंडी पट्ट्यांची खाट. खाटेत ढेकूण.
संडास-बाथरूम्स ज्या कोपर्‍यात होत्या त्याच्या विरुद्ध कोपर्‍यात माझी खोली होती. तशा बाथरूम्स चांगल्या होत्या, गिझर-बिझर होता वगैरे. पण हॉस्टेलच्या मागच्या बाजूस जुन्या खानदानी बाथरूम्स होत्या. काळ्या दगडांत बांधलेल्या. तिथे मोठा बॉयलर होता. आणि मध्ये धोंड बसवलेल्या बाथरूम्स. हाप्पँट नि बनियन घालून, टॉवेल खांद्यावर टाकून, स्टाफ क्वार्टर्सकडे बघत बघत तिकडे आंघोळीला जाणे हा काहीजणांचा छंद होता.
हॉस्टेलमधून बाहेर पडल्यापडल्या समोर बास्केटबॉल कोर्ट, त्याच्या उजव्या हाताला मोठे मैदान आणि त्यामागे टेकडी. मैदान आणि टेकडीच्या मध्ये एका कोपर्‍यात व्यायामशाळा. बास्केटबॉल कोर्टनंतर उजव्या हाताला कॉलेजच्या वाटेवरच कँटीन. कँटीनमध्ये 'बनवडा' नामक पदार्थ. एक बटाटवडा एका बनपावामध्ये घालून मधे कापून अर्धा-अर्धा केलेला. सोबत एका अगम्य चवीची पांढरी चटणी. खडू पाण्यात कुटून ती चटणी करतात असा एक प्रवाद होता. तो खोटा नसावा.
हा 'बनवडा' केवळ कँटीनमधला खाद्यपदार्थ नव्हता. तो 'चलन' म्हणूनही वापरण्यात येई. 'दोन बनवड्यांची पैज', 'चार बनवड्यांची पैज' अशा पैजा लागत. तो मानसिक निग्रहाचे द्योतक म्हणूनही वापरण्यात येई. उदा: "अरे हरलो तर एक महिना बनवडा खाणार नाही". प्रलोभन म्हणूनही त्याचा वापर होत असे. उदा: "अरे, तिचा intro करून दे नुसता, महिनाभर रोज बनवडा खाऊ घालतो तुला".
त्या दरम्यान चार्ल्स-डायना विवाह झाला. त्याचे छटाकभर प्रक्षेपण कृष्ण-धवल दूरदर्शनवर बघून अवधूत तत्परतेने घायाळ झाला. तसा तो एरवीही घायाळ व्हायला टपलेलाच असे. गुडलक चौकातून मेनगेटला सायकलवर येईस्तोवर तो तीनदा तरी प्रेमात पडे (चालत आल्यास चार वेळा). त्या सुंदर्‍यांना (सुदैवाने) याचा पत्ता नसे. लगेच अवधूत घायाळ. "खर्‍या प्रेमाची कहाणी कुणी वाचलीच नाहीये अजून.... मी गेल्यावर माझी कहाणी वाचली म्हणजे जगाला कळेल खरे प्रेम काय असते ते" इ इ.
पण डायनाचा घाव चांगलाच खोलवर गेला. अवधूतने आधी दाढी वाढवली. पण ती फारच विनोदी दिसायला लागल्याने (त्याची दाढी पुंजक्या-पुंजक्याने येत असे) त्याने दाढी-मिशी भादरून टाकली. शिवाय डोक्याचा चमनगोटाही केला. "त्या डुकरात (चार्ल्सचा चेहरा तेव्हाही डुकरासारखाच दिसत असे, फक्त जरा सडपातळ डुकरासारखा) काय पाहिले तिने? तो फसवणार बघ तिला (हा अवधूतचा शाप नंतर चार्ल्सने प्रत्यक्षात उतरवला ते सोडा). अरे, पुण्याला आली असती चांगली, आपल्या बंगल्यात राहिली असती सहकारनगरला (अवधूतच्या गिलावा नसलेल्या तीन खोल्यांच्या घराला बंगला म्हणणे हे IPLला क्रिकेट म्हणण्यासारखे होते), बन-वडा पार्सल नेला असता दोन टाईम रोज" असे दर्दभरे संवाद म्हणत तो दीडेक महिना कँटीनला मुक्काम टाकून होता. ताशी पंधरा मुली समोरून जाऱ्ये करीत असतानाही अवधूत त्यांच्याकडे मुळीसुद्धा लक्ष देत नाही हे दुर्मिळ दृष्य बघण्यासाठी तो दीड महिना कँटीनला जाम गर्दी होती. असो.
तर वसतीगृहातली खोली ताब्यात घेतली आणि परत तळेगांव गाठले. कारण कपडे-पुस्तके आदि गोष्टी तिकडेच होत्या. ते सगळे घेऊन दुसर्‍या दिवशी सकाळी परत पुणे गाठले. खोलीत स्थिरस्थावर होतो न होतो तोच कडी वाजली. दार उघडले तर रखवालदार खरोसेमामा उभे. वसतीगृहात काय करायला परवानगी नाही (पंखा, इस्त्री, इलेक्ट्रिक कॉईल वापरणे) हे त्यांनी सावकाश बजावले. त्यांच्या मराठीच्या हेलावरून मला शंका आली म्हणून त्यांना विचारले, तर ते महाडचे निघाले. मी माणगांवला दोन वर्षे काढली आहेत हे त्यांना सांगितल्यावर प्रश्नच मिटला. नंतर माझ्याकडे एकदम एकावेळेला तिन्ही बेकायदेशीर वस्तू असूनही मला कधीच त्रास झाला नाही.
बाहेर छान भरून आलेले होते. वस्तू लावण्यात दुपार झाली. मग मेनगेटसमोरच्या 'दीवार'मध्ये जाऊन उत्तप्पा हाणला आणि तसाच चालत चालत जंगलीमहाराज रस्ता गाठला. संभाजी पार्कबाहेर जुन्या पुस्तकांची दुकाने थाटलेली होती. त्यातल्या पुस्तकांची उसकापासक करताना वेळ बरा गेला. पण परत भूक जाणवू लागली. मग चालत डेक्कन कॉर्नरवरच्या 'सनराईज'मध्ये जाऊन ऑम्लेट, ब्रेड-बटर आणि किटलीतला चहा (तीन कप भरला) असे यथास्थित खाणेपिणे करून परत खोलीवर आलो. आता जरा पावसाचा ताशा वाजायला लागला. खोलीच्या खिडकीतून मागे मोकळ्या पटांगणावर पडणार्‍या सरी पाहत बसलो. मग खाटेवर आडवारून 'दुर्गभ्रमणगाथा' पुरतावली. तोवर पार संध्याकाळ झाली, आणि मला जाणीव झाली की सामानाच्या यादीत मी 'विजेचा बल्ब' घातलेला नव्हता. संधिप्रकाशात खोलीला कुलूप घालून बाहेर पडलो आणि 'गुडलक'समोरच्या कोपर्‍यावरच्या 'शाह इलेक्ट्रिकल्स्'मधून एक बल्ब घेतला. तिथेच एक सुटसुटीत टेबललँप दिसला. त्याच्या प्रकाशात मी अभ्यास करतो आहे हे चित्र फारच मोहक वाटले, म्हणून तोही घेतला. हे सगळे खोलीत आणून लावेस्तोवर अंधार पारच दाटला होता. आणि परत भूक जाणवू लागली होती. शेवटी पोळी-भाकरी-भात याला चटावलेले पोट उत्तप्पा नि ब्रेडला कसे धार्जिणे होणार? परत बाहेर पडताना खरोसेमामा दिंडीदरवाजाजवळ स्टूल टाकून बसलेले दिसले.
त्यांच्याकडे चौकशी केल्यावर कळले की फर्ग्युसनची मेस अत्यंत बेभरंवशाची आहे. कधी चालू असेल सांगता येत नाही. आणि चालू असलीच तरी जेवणाचा दर्जा पाहता कधी बंद पडेल सांगता येत नाही. बीएमसीसीची मेस आणि गोखले इन्स्टिट्यूटची मेस या दोन चांगल्या मेस आहेत. त्यातली बीएमसीसीची मेस जरा जवळ. कारण गोखले इन्स्टिट्यूट जरी फर्ग्युसनच्या दक्षिण दरवाजाला लागून असली तरी त्यांची हॉस्टेल्स बीएमसीसी ओलांडून, जैन समितीचा प्लॉट ओलांडून मग होती.
मी बीएमसीसीच्या मेसला जाऊन चिकटलो. पै नावाचे गृहस्थ ही मेस चालवीत. ज्ञानेश्वर पादुका चौकातले 'निरंजन', फर्ग्युसन रस्त्यावर 'रूपाली' आणि 'वैशाली'च्या मध्ये पण रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असलेला 'कर्नाटक क्लब' आणि नंतर कोथरूडच्या शिवाजीपुतळ्याजवळ झालेला 'आशीर्वाद डायनिंग हॉल' ही सगळी ठिकाणे हे पै कुटुंब चालवीत असे. Economy of scale मुळे त्यांना सर्व वस्तू घाउकीच्या दरात मिळत, आणि तो फायदा ते ग्राहकांपर्यंतही पोचवीत. थोडक्यात, त्यांचे दर अगदीच वाजवी होते.
नंतर जेव्हा कळले की गोखले इन्स्टिट्यूटची मेस चालवणार्‍या कृष्णा नामक कानडी गृहस्थाचे दरही साधारण तेवढेच होते, पण त्याच्याकडे आठवड्यातून एकदा अंडे नि एकदा चिकन/मटन मिळे, तेव्हा माफक हळहळ वाटली. पण 'मेस'च्या बळावर विद्यार्थीदशेतील वाढती भूक ज्यांनी भागवली आहे त्यांना हे मान्य व्हावे की 'मेस' हा वर्तमानपत्रासारखा (वा सिगरेटसारखा) सवयीचा भाग होऊन जातो. मग 'महाराष्ट्र टाईम्स'चा दर्जा कसा घसरला आहे यावर 'मटा'चे वाचकच हिरीरीने बोलतात (आणि 'मटा'च वाचत रहातात). तसेच "पैच्या भातात तांदूळ कमी नि खायचा सोडाच जास्त असतो" अशी ज्वलंत चर्चा बीएमसीसीच्या मेसमधून जेवून परततानाच रंगत असे.
[थोडे विषयांतरः बीएमसीसीच्या मेसमध्ये परत जाण्याचा योग पंधरा वर्षांपूर्वी आला. अजूनही रामभाऊच तिथले व्यवस्थापक होते, आणि अजूनही उभ्याने भिंतीला टेकून, तंगडी मागे वळवून भिंतीला लावून "त्यां भाजींलां खोंबरां जांस्त लांगतां" (म्हणून ती भाजी उद्या नको) या मुद्यावर मालकाशी वाद घालण्याची त्यांची सवय गेली नव्हती. रामभाऊ अस्सल कारवारी कोंकणी. त्यांच्या मुलीची सासुरवाड गोव्यातल्या वास्कोची. आमच्या वेळेला वाढपीकाम करणारी मुलेच आता संसारी बाप्ये होऊनही वाढपीकाम करत होती. त्यातला चपाती वाढणारा पटू माझ्या अजूनही लक्षात आहे. '....पाती' '....पाती', '....पाती' असे "च" सायलेंटवर टाकून (वाटेल ते सायलेंटवर टाकायला फ्रेंच शिकला होता की काय लेकाचा कोण जाणे) कबड्डीपटूच्या आविर्भावात म्हणत तो पालखीच्या घोड्यासारखे रिंगण घेत असे. ज्यांना पोळी हवी असे ते आधीपासून टपून बसलेले असत. नाहीतर पाच मिनिटांनी परत '....पाती' '....पाती', '....पाती' चा घोष कानावर येई तेव्हा हात मारत. तोच चपातीवाढपी कानशिलावरचे पांढरे केस बाळगत रिंगण घेताना पाहिल्यावर मलाही वाढत्या वयाची जाणीव झाली]
बीएमसीसीला संध्याकाळी जेवायला जाताना एक प्रश्न उभा राही. टेकडी चढून उतरून जवळच्या मार्गाने जायचे की सरळ फर्ग्युसन रस्ता, बीएमसीसी रस्ता असे करत बीएमसीसी ग्राऊंडला लगटून जायचे. प्रश्न एवढा सोपा नव्हता. टेकडीची वाट अगदी दहाव्या मिनिटाला मेसमध्ये पोहोचवी हे खरे. पण दिवस पावसाचे होते. झिमझिम चालू असेल, वा नुकतीच होऊन गेली असेल, तर ती वाट जाम निसरडी व्हायची. मग "तू जपुन टाक पाऊल जरा" आळवत तिथून जायचा कंटाळा यायचा. आणि फर्ग्युसन रस्त्याने जायला पंधरा मिनिटे लागत एवढाच प्रश्न नव्हता. तर 'रूपाली'समोर तेव्हा 'रोज बेकरी' नामक दुकान होते. तिथे स्पंज केक, मावा केक, वाटी केक असले अर्धा डझन तरी केकचे नामांकित प्रकार मिळत. आणि मेसचे जेवण जरी पोटभरीचे असले तरी जिभेला मात्र 'रोज बेकरी' टाळून पुढे जाणे फार अवघड जात असे. कॉलेजच्या कँटीन गेटने आत जायचे नि आयएमडीआर गेटने बाहेर पडायचे हा एक मध्यममार्ग होता खरा, पण का कुणास ठाऊक, तो फारसा कधी आचरणात आणला गेला नाही. आणि एकदोनदा तसे जाऊनही आयएमडीआर गेटमधून बाहेर पडल्यावर दत्ताच्या हट्टाखातर परत डावीकडे वळून 'रोज बेकरी' मार्गे हॉस्टेलला पोहोचलो. मग हर्‍या वैतागला. 'रोज बेकरी'तच जायचे असेल तर फर्ग्युसन रस्त्यावरूनच मुली बघत बघत जायचे असे त्याचे ठाम मत होते. शेवटपर्यंत या प्रश्नाची उकल करता आली नाही. शेवटी मी पाऊस असो वा नसो, टेकडीवरूनच जायचे अशी माझ्यापुरती शिस्त घालून घेतली.
पोटाचा कंपल्सरी प्रश्न सोडवल्यावर मग अभ्यासाच्या ऑप्शनल प्रश्नाकडे वळलो. बायॉलजी, जिऑलजी आदि प्रकरणे मला झेपणार नव्हती. त्यामुळे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, स्टॅट्स असा ग्रुप घेतला. कुठल्या लेक्चर्सना दांड्या मारायच्या ते तरी कळले.
मग एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. पहिल्या वर्षी एनएसएस वा एनसीसी घेणे कंपल्सरी होते. आणि एनएसएस घेणे म्हणजे पुचाटपणाचे लक्षण मानले जात होते. तेव्हा एनसीसी घेणे आले. त्याची मला फारशी काळजी नव्हती; 'भोसला मिलिटरी स्कूल'च्या तुलनेत एनसीसी म्हणजे फारच पांचट प्रकार होता. प्रश्न असा होता की आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स यातील कुठली एनसीसी घ्यायची. एअर फोर्सला पॅराग्लायडिंग वगैरे करायला मिळण्याची शक्यता होती. पण त्यांचा युनिफॉर्म फारच विनोदी होता. विशेषतः त्यांची गांधी टोपी. नेव्हीचा युनिफॉर्म मस्त होता. टोपी तर एकदम खास. पण खाली अर्धी चड्डी. मुकाट आर्मीच्या '२, महाराष्ट्र बटालियन'मध्ये भरती झालो. परेड बीएमसीसीच्या मैदानातच व्हायची. आणि हेडक्वार्टरसुद्धा 'बालभारती'जवळच होते. ज्युनियर कॉलेजला गणित शिकवणारे परांजपेसर आमचे कॅप्टन होते. त्यांच्या मिशा बघण्यासारखा होत्या. ओठावर उगम पावल्यावर त्या तीन-चार मिमी झाडासारख्या ताठ झाल्या होत्या. मग नव्वद अंशांमध्ये वळून त्या गालांसमांतर वाढल्या होत्या. त्यामुळे त्या नाटकातल्या चापाच्या मिशांसारख्या चेहर्‍यापासून काही अंतर राखून होत्या.
परांजपेसर खडूस नसले तरी खवचट अगदी पुरेपूर होते. शेलक्या शब्दांत कुणाचीही हजेरी घेणे त्यांना जमत आणि आवडत असे. पण कुणी काही चांगले केले तर त्याचे कौतुक करायलाही त्यांची वाणी तत्पर असे. एकंदर प्रगती बघून केमिस्ट्रीच्या अरोराला त्यांनीच 'आयएमए'ला जाण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. गेलाही तो. आता ब्रिगेडियर झाला आहे असे ऐकतो.
एनसीसीच्या परेड्स दर रविवारी चार तास होत. माझ्या भोंसला मिलिटरी स्कूलच्या कहाणीवर विश्वास ठेवून सरांनी मला कॉर्पोरल (नाईक) करून टाकले. प्रशांतने अकरावी-बारावीतही एनसीसी केली होती. तो आमचा ज्युनियर अंडर ऑफिसर झाला. रविवारी चार तास घाम गाळून झाला की बीएमसीसीलाच संडे फीस्ट झोडून डुलतडुलत परत यायचे नि ताणून द्यायची हा नित्यक्रम ठरून गेला.
अभ्यासाचे तेवढे काही अजून जुळत नव्हते. दिवसा अभ्यास होत नाही याबद्दल दुमत नव्हते. पण पहाटे उठून अभ्यास करावा की रात्री जागून यावर मी नि हर्‍याने खूप खल केला. रात्री अभ्यास करावा अशा निर्णयाप्रत आलो. पण झोपेला हा निर्णय कोण सांगणार? दहा वाजून गेले की डोळे गपागप मिटू लागत. बाहेर पावसाची झिमझिम अथवा संपूर्ण शांतता असे. त्यात जागे रहाणे कठीण होते. मग हर्‍याने थिअरी मांडली की झोप जी काही येते ती बारा वाजेपर्यंतच. तोवर जागे राहिले की मग ती पार उडून जाते. आता बारापर्यंत जागे रहायचे म्हटल्यावर आम्ही तत्परतेने 'अलका'ला लास्ट शो बघायला गेलो. तिथून चालत येताना 'गुडलक'ला चहा प्यायला म्हणून गेलो आणि बन-मस्का, ऑम्लेट यावरही ताव मारून आलो. खोलीवर परतल्यावर दोन ढेकरा देऊन झोपी गेलो. दुसर्‍या दिवशी (रात्री) याची पुनरावृत्ती नको म्हणून 'राहुल'चा लास्ट शो गाठला. तिथून परतताना वाट वाकडी करून शिवाजीनगर एस्टी स्टँडला मिसळपाव हाणून आलो. परत तेच.
आता मात्र हर्‍या भयंकर चिडला. थेट डायमंड वॉच कंपनीत जाऊन एक गजराचे नवेकोरे घड्याळ घेऊन आला. एका रात्री "तू जाऊन झोप आता, पहाटे बरोबर चार वाजता येतो बघ" अशी धमकी देऊन त्याने मला साडेनऊलाच त्याच्या खोलीबाहेर काढले. परतून मी झोपायचा प्रयत्न केला. फारसा जमला नाही. चार वाजता दार वाजले. खवीसासारखे केस पिंजारलेला हर्‍याच होता. माझ्या अंगात झोप मावत नव्हती. "पाचच मिनिटे पडतो, मग लगेच बसूच" असे म्हणून मी आडवा झालो. "चालेल" असे म्हणून हर्‍या खाली चटईवर आडवा झाला. परत सकाळी सातलाच उठलो.
शेवटी आम्ही हार मान्य केली. पाऊस पडल्यावरच जसे पीक येते तशी परीक्षा आल्यावरच अभ्यास होतो या वाडवडिलांपासून चालत आलेल्या नियमावर विश्वास ठेवून आम्ही उंडारायला सुरुवात केली. पहिलीच संधी आली ती म्हणजे पुरुषोत्तम करंडक. त्यात हिरीरीने भाग घेतला. पण पुढेमागे माझ्या 'नाटकी'पणाबद्दल सविस्तर आणि एकसंध लिहायचा विचार असल्याने आत्ता थांबतो. एवढेच नमूद करतो की जगाला गुणीजनांची कदर नसल्याने मला व नाटकाला बक्षीस मिळाले नाही.
'कोसला' मी वाचलेली होती, पण हर्‍याने नव्हती. त्याला दिल्यावर त्याने महाद्याला दिली. तिथून मग काही काळ 'उदा, वगैरे'ची साथ सुरू झाली. मग 'रात्र थोडी सोंगे फार' सापडली. त्या कादंबरीने तर हलकल्लोळ माजवला. त्यातली पाने मोठ्याने वाचत गॅलरीत खिंकाळत बसणे हे नित्याचे होऊन बसले. मग एकदा हर्‍या 'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' घेऊन आला. ती वाचल्यावर सगळे कमीअधिक डिप्रेशनमध्ये गेले नि हे खिंकाळणे थांबले.
मधूनअधून सगळी लेक्चर्स अटेंड करण्याचा मला झटका येई. त्या दोनचार दिवसांत आपल्या वर्गात कोणकोण आहेत आणि आपल्याला कोणकोण शिकवतात याची थोडीफार माहिती होई. तेवढ्यात याकूब पालकर आडवा येई. हे अस्सल सातारी वाण होते. "नेताजीबरोबर त्याचा भाऊ हिरोजी पालकरही मुसलमान झाला होता. शिवाजीराजांनी नेताजीला हिंदू करून घेतले तेव्हा हिरोजीचे चौथे लग्न होते म्हणून तो गेला नाही. पण आडनावाचा अभिमान त्याने काही सोडला नाही. म्हणून आम्ही पालकर, पण मुसलमान" अशी आपली कुळकथा तो निर्विकार चेहर्‍याने सांगत असे. तर असा हा याकूब, मी सगळी लेक्चर्स अटेंड करतो आहे हे कळल्यावर कँटीनमध्ये तळ ठोके, आणि मी समोरून जाताना दिसलो की "अरे लेका, रोजच्यारोज लेक्चर्स अटेंड केली तर पाप लागतं माहीत नाही? मी तुझा मित्र असताना तुला कसं पाप करून देईन?" असे म्हणून मला 'राहुल'ला हाकलत नेत असे (याकूब अंगापिंडाने माझ्या किमान तिप्पट होता. त्यामुळे 'हाकलत' म्हणण्यापेक्षा 'नजरेच्या धाकात' म्हटलेले जास्त योग्य होईल). तिथला शो संपल्यावर मग 'मॉडर्न कॅफे'तला रवा मसाला दोसा. मला लेक्चर्स अटेंडा करण्यापासून अडवण्याखेरीज त्याचे आयुष्याचे ध्येय काय होते कुणास ठाऊक?
मग एनसीसीतर्फे पुण्यातल्या गणेश-विसर्जन मिरवणुकीच्यावेळी वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी कॅडेट्सची निवड चालू झाली. परांजपेसरांनी माझे नि प्रशांतचे नाव त्यात लिहून टाकले. "नुसते बोंबलत गावभर हिंडत असता त्यापेक्षा समाजाला खरोखर मदत होईल असे काहीतरी कधीतरी करा रे @#@#नो" अशा रीतीने ते आम्हांला कळवण्यात आले. आमची तक्रार नव्हती. प्रशांतही श्रीरामपूरहून पुण्यात याच वर्षी आला होता. त्यामुळे पुण्याची प्रसिद्ध मिरवणूक एवढ्या जवळून पाहायला मिळणार म्हटल्यावर आम्ही कशाला मागे सरू?
आमचा 'चांगला ड्रेस' आम्ही लगेच धुऊन, इस्त्री करून तयार ठेवला. 'चांगला ड्रेस' म्हणजे असे, की एनसीसीमध्ये जरी आम्हांला प्रत्येकी दोनदोन ड्रेस मिळत, तरी त्यातला एक(तरी) आपल्या मापाचा असणे हे परमभाग्य असे. मी नि प्रशांत दोघेही 'ऑफिसर्स' असल्याने आम्हांला एक ड्रेस तर अगदी यथास्थित मिळाला होता. दुसरा ड्रेस कधी घालायचाच नव्हता, त्यामुळे तो कसा होता हे बघितले नाही. नुसते 'कॅडेट' असलेल्यांना तर एवढेही सुख नसे. शर्ट बनियनसारखा, पँट धोतरासारखी, बूट दोन नंबर मागे वा पुढे, अशा थाटात त्यांना परेडचे चार तास रेटावे लागत.
मग 'सिलेक्शन'साठी "२, महाराष्ट्र"मध्ये बोलावले आहे असा निरोप मिळाला. सरांनी नाव परस्पर दिलेले असताना आता हे कसले 'सिलेक्शन'? तिथे गेल्यावर तीन गोष्टी कळल्या. एक म्हणजे ती मिरवणूक एवढ्या जवळून बघायचे अप्रूप आमच्यासारखेच बाकी बर्‍याच जणांना होते. दुसरी म्हणजे सरांनी आमचे सिलेक्शन खरोखरच आधी करून ठेवले होते. आमची नावे 'सिलेक्टेड'च्या यादीतच होती. तिसरे म्हणजे 'सिलेक्शन'सोबतच तिथे 'रक्तदान शिबीर'ही आयोजण्यात आलेले होते. नुसते 'रक्तदान शिबीर' म्हटल्यावर कोणी फिरकत नसे म्हणून हे 'सिलेक्शन'चे गाजर. तिथे मी आयुष्यातले पहिले रक्तदान केले. पुन्हा न करण्यासारखे असे काही त्यात मला तरी आढळले नाही.
गणपती बसले. हॉस्टेलच्या मागच्याच बाजूला वडारवाडी. तिथल्या लाऊडस्पीकर्सनी आमच्या कानठळ्या बसू लागल्या. तेव्हा रात्री दहानंतर ध्वनीक्षेपणाला बंदी वगैरे पुळचट प्रकार नव्हते. त्यामुळे पहाटे दोन वाजतादेखील "रंबा हो हो हो" दणक्यात वाजत असे.
विसर्जनाचा दिवस आला. आदल्या रात्री उशीरापर्यंत आम्ही हर्‍याच्या खोलीत चकाट्या पिटत बसलो होतो. तरीही भल्या पहाटे पाचलाच उठलो. ग्राऊंडवर एक चक्कर मारून आलो. मग नित्यकर्मे उरकून कडक कांजीचा ड्रेस, छातीवर नेमप्लेट, दुसर्‍या बाजूला मेडल्स, असा सजलो. आता मेडल्स मिळवण्याइतके आम्ही काही केलेले नव्हते हे खरे. पण 'एसपी'समोरच्या 'भावकर टेलर्स'मध्ये मेडल्स विकत मिळतात हे प्रशांतला कळले. मग आम्ही 'ब्लड डोनेशन', 'एनसीसी डे', 'आर्मी डे' असली तीनचार निरुपद्रवी मेडल्स खरेदी करून छातीवर लटकवून दिली. बेल्ट ब्रासोने चकचकीत केलेला. बूट काळ्या आरशासारखे तकाकणारे. बॅरेटला पॉमपॉम. खाडखाड बूट वाजवत गॅलरीतून फरशांच्या कपच्या पाडीत हिंडलो. अखेर हर्‍या जागा झाला नि बाहेर येऊन म्हणाला "वा, आता मिरवणुकीत गणपतीपेक्षा तुझ्याकडेच जास्त बघतील पोरीबाळी". मग बाहेर पडलो.

गेले ते दिन (भाग २)
गेले ते दिन (भाग ३)
गेले ते दिन (भाग ४)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणे मस्तच. पण चार चार भाग एकदम टाकलेत. चवीचवीने वाचण्यात येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

क्या बात है! आता फर्ग्युसनमध्ये लागलेला रिपरिप किंवा मधेच रिमझिम पाऊस आठवुन गेला. आणि तो तारुण्याचा सुगंध. किती सुंदर दिवस होते.

पण तो Ludlumवाचक गेली साडेतीन दशके माझी मैत्री सहन करतो आहे.

ज्जे बात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झक्कास! वाचतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मस्त! बाकीचे भाग पण वाचतो आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी फर्गसन कॉलेजात १९५८-६२ ह्या काळात विद्यार्थी होतो. माझ्याहि अगदी अशाच आठवणी आहेत. तुमचा लेख वाचून मला माझ्या दिवसांची आठवण झाली.

मीहि ४ पैकी २ वर्षे होस्टेलात राहत असे. (खोली १४४, दुसरा? ब्लॉक). मेस, बाथरूममध्ये उकळत्या पाण्याने आंघोळ अशा अनेक आठवणी आहेत, सगळ्या सांगत बसलो तर नवीन लेखच होईल म्हणून थांबतो.

एनसीसीबद्दल मात्र लिहिलेच पाहिजे. मी कॉलेजात आलो तेव्हा सैनिकी पेशा इत्यादींनी भारावून गेलेलो होतो म्हणून लगेचच ए कॉय ('कंपनी'चा शॉर्ट फोर्म) २री महाराष्ट्र बटालियन एनसीसी येथे प्रथम वर्षी कॅडेट म्हणून दाखल झालो. आठवड्यात दोन परेड्स बुधवारी आणि रविवारी होत असत. मी पहिल्या दिवसापासून एकदम 'सिन्सिअर कॅडेट' म्हणून ओळखला जाई. त्यामुळे माझी दुसर्‍या वर्षी कॉर्पोरल, तिसर्‍या वर्षी सार्जंट, आणि अखेरच्या वर्षी अंडर ऑफिसर अशी प्रगति झाली. अंडर ऑफिसरचा कातडयाचा सॅम ब्राऊन बेल्ट, हातातील केन आणि खांद्यावरच्या तांबडया टॅब्स ह्यांचा मला अतिशय अभिमान वाटत असे. आमच्या बटालियनचे प्रमुख आर्टिलरीमधील मेजर पाटणकर - ह्यांचा एक पाय युद्धामध्ये अधू झाला होता, त्यांना काठी घेऊन चालावे लागे आणि म्हणून त्यांना सेवानिवृत्तीपूर्वी एनसीसीकडे वर्ग केले होते - ह्यांची माझ्यावर फार मर्जी होती म्हणून शेवटल्या वर्षामध्ये उन्हाळ्यात काश्मीरमध्ये पहलगाम येथे भरलेल्या एक महिन्याच्या Advanced Leadership Course साठी मला त्यांनी पाठवले. त्यामध्ये प्रत्येक राज्यातून ५-५ कॅडेट्स निवडण्यात आले होते. त्याच्या पुढील वर्षी डी सर्टिफिकेटसाठी देहरादूनजवळील कालसी गावच्या ४५ दिवसांच्या शिबिरालाहि मी गेलो होतो पण माझा युद्धज्वर एव्हांना उतरल्याने त्या मार्गाने सैन्यात अधिकारी होण्याचा राजमार्ग बदलून मी अन्य करीअरकडे वळलो.

भापकर टेलरची आठवण विशेष लक्षात आली. मलाहि दोन मेडल्स मिळाली होती - कसली ते आता आठवत नाही. ती छातीवर लावून माझा घेतलेला फोटो अजूनहि माझ्याजवळ आहे. मेडल्सहि आहेत. त्यांना भापकरकडूनच मी खोटया फिती देखाव्यासाठी लावून घेतल्या होत्या. वर्षाच्या प्ररंभी मिळालेले कपडे आपल्या अंगाला बरोबर बसावेत म्हणून मी ते भापकरकडेच देत असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याच सगळ्या परिसराशी २००१ च्या सुमारास माझा संबंध आला होता. (बीएमसीसीचा विद्यार्थी.) ते "शून्य वर्ष" धरलं त्याचं २० वर्षांपूर्वीचं वर्णन त्या वयाच्याच तरूणाच्या चष्म्यातून वाचायला भारी वाटलं.

तुम्हीही तुमच्या आठवणी लिहिल्यात तर आवडेल - ४० वर्षांपूर्वी हाच परिसर कसा होता हे समजेल. (बहुतेक लिहिल्याही आहेत तुम्ही - टाईपरायटिंग इन्स्टि०च्या दुसर्‍या मजल्यावरचं घर वगैरे वाचल्यासारखं वाटतंय. जरा खोदकाम करतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मस्त. वाचतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खत्तरनाक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

काय रे बाबा! __/\__ दंडवतच
इतकं सरळ शब्दांत इतकं खुसखुशीत लिहूच कसं शकत कुणी!

मला वसतीगृहात राहणे गरजेचे होते. तेव्हा 'कोसला' नुकतीच वाचलेली असल्याने तर ते फारच गरजेचे झाले होते.

ही आणि असली अनेक वाक्ये तर निव्वळ शिसान घालण्यासारखी!

पुढील भाग चवीचवीनं वाचेन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!