न गळलेलं शेपूट

"काय गं, डेंटिस्टचा जीव घेऊन झाला का? पैसे तरी दिलेस का त्याचे?" मला सहन करू शकणारे ठराविक दोन चार लोक सोडले तर इतरांचा त्यांना भेटल्यावर जीव घेते अशी समीरची थिअरी आहे.

“आता कॉफी स्ट्रॉने पी. नाहीतर दात पिवळट होतील पुन्हा.” चारुता सुंदर दिसण्यापलिकडे काही जग आहे गं.
"पण तू डेंटिस्टकडे का गेली होतीस? तुला दातांचा काही त्रास होतोय का?" प्रसाद अशी आपुलकीयुक्त चौकशी करायला लागला की मला किळस येते. पण यावेळेस मलाच मनातलं बोलायची गरज होती.
"आमच्या ऑफिसात एक नवा इसम आलाय..." वाक्य अर्धवट तुटलं. "आणि तुला तो आवडला म्हणून तू डेंटिस्टकडे जाऊन दात पांढरे करून घेत्येस? तुझा डेंटिस्ट कसा आहे गं, मलाही दात पांढरे करून घ्यायचेत." पुरुषांचा विषय निघाला की चारुताला धीर धरवत नाही. "मी बोलू? नाही. एकतर माझी... माझी डेंटिस्ट आहे. आणि ऑफिसातला नवा इसम माझ्या मागे लागलाय. मागे लागलाय असंही म्हणता येत नाही. शेपूट उगवलंय मला. या शेपटीचा पुस्तकांशी कधीही संबंध आलेला नाही. बुद्धीशी संबंधित कोणत्याच गोष्टीशी त्याचा संबंध आलेला नाही. शेपटी मेंदूच्या विरुद्ध बाजूला असते. वजनं उचलणं आणि कंप्यूटरचे मॉनिटर उचलण्यातला फरक त्याला समजत नाही. एका हातात मॉनिटर आणि दुसऱ्या हातात सीपीयू घेऊन तो त्याचे दंडातली रताळी दाखवत फिरतो... तुझ्या टाईपचा आहे तो चारुता."

आता सगळे हातातली कॉफी आणि केक टाकून माझ्याकडे बघायला लागले होते. मधुरा लोकांना नावं ठेवत्ये याचं त्यांना नवल नाही, म्हणजे नसावं, पण सगळं जग संपत आल्याच्या थाटात माझी तक्रारखोरी म्हणजे काहीतरी मेजर बोंबललेलं आहे... हे तो रताळ्या सोडून सगळ्यांना समजण्यासारखं आहे. "चारुताच्या टाईपचा म्हणजे काय?" समीर आणि रोहनला एकसुरी प्रश्न पडला. आम्ही तेलुगुमध्ये बोलत असल्याचे भाव या पोरांच्या चेहेऱ्यावर होते. "मुलांनो आणि पुरुषांनो, साधारणतः मुलींचे निरनिराळे प्रकार असतात, काही हुशार असतात, काही सुंदर असतात, काही खेळाडू असतात ... पण ते तुम्हाला समजणार नाही. तसे पुरुषांचेही प्रकार असतात. काही नेत्रसुख असतात, काही बुद्धीसुख असतात आणि काही ..." मी कॉफीचा घोट घ्यायला थांबले. "आणि काही कसे असतात मधुरा? माझ्यासारखे ष्टड का?" प्रसाद असा सहज हाफव्हॉली देईल याची मला कल्पना नव्हती. चारुताने डोळे फिरवले. समीरच्या चेहेऱ्यावर 'दया कर गं' असे भाव आधीच दिसायला लागले होते. "... होय प्रसाद. काही तुझ्यासारखे असतात, दुर्दैवी जीव."

प्रसाद लाळ गाळायला लागला की त्याला लहान मुलांसारखं लाळेरं द्यायला मला फार मजा येते. तो हिरमुसला होतो आणि मग समीर, रोहनला त्याची कीव येते. "सोड ना मधुरा त्याला. किती त्रास देशील बिचाऱ्याला. तुझी गोष्ट सांग पुढे. तुमचे कोणते टाईप्स आहेत?" समीर 'दयाघन' होण्यासाठी दबा धरून बसलाच होता. "मधुरा, तुझा एकमेव टाईप असणार. तोफेच्या तोंडी जाऊ शकेल तो." आयला! रोहन बोलला आणि त्यात प्सायकॉलॉजीचा संदर्भ नाही! च्यायला मी माझ्या मनातसुद्धा प्सायकॉलॉजी म्हणायला लागल्ये.

"हा कीटक कंप्यूटर अॅडमिनचा असिस्टंट म्हणून लागलाय. आत्तापर्यंत ऑफिसातले कंप्यूटर्स ट्रॉलीवरून इकडून तिकडे व्हायचे. आता हा घटोत्कच ते सगळं हातात घेऊन फिरतो. गेल्याच आठवड्यात तो जॉईन झाला. माझ्या कंप्यूटरला नेमकं तेव्हाच मोडायचं होतं! त्यावर नवीन सॉफ्टवेअर टाकलंय, त्याची माहिती मला इमेल करूनही पाठवता आली असती. हा दंडाधिकारी हातात कागद फडफडवत घेऊन आला. जितेंदरच्या सिनेमात हिरवीणीची ओढणी उडून त्याच्या हातात यावी तसं काहीतरी वाटलं मला." "तुमचं रोल रिव्हर्सल झालंय फक्त." समीरच्या बोलण्यात तेवढं तथ्य होतं. "पण डेंटिस्टचा काय संबंध या सगळ्यांत?"

मी डेंटिस्टकडे गेले होते ते ब्रेसेस लावून घ्यायला. माझ्या तोंडात कुंपण बघितलं की बोलायची गरजही पडणार नाही. मी दात विचकले की माझं स्टीलदंतम्‌ रूप बघून तो पळून जाईल असा माझा हिशोब होता. म्हणूनच मी गेल्या आठवड्यात डेंटिस्टला भेटून आले. हे प्रकरण कापड आणलं, शिवायला टाकलं, दोनदा शिंप्याला फोन करून पिडलं की ड्रेस तयार एवढं सोपं नव्हतं. डेंटिस्टने एक्स-रे काढले. आधी म्हणे, "दात साफ करायला झाल्येत मधुरा. एक वर्ष उलटून गेलं ना? डीप क्लीनींग करावं लागेल." डेंटिस्टला एवढा मस्का पुरेल असं मला वाटलं. मी हो म्हटलं. ती दात साफ करत होती. तिच्या एप्रनला पावभाजीचा वास येत होता, त्यामुळे माझ्या तोंडात आणखी लाळ जमा होत होती. मध्येच तिच्या पोटातून गुडगुड आवाज यायला लागले. माझा चेहेरा साफ उतरला. तिला वाटलं मला लागलं. काहीतरी थाप मारणं भाग होतं. "तेवढं इकडेतिकडे व्हायचंच, पण माझ्या ब्रेसेसचं काय?" तर नवीनच माहिती समजली. आता म्हणे दाताचं इंप्रेशन घेणार. मग त्यावर काहीतरी प्रक्रिया वगैरे करणार. तोवर चार उपदाढा काढून घ्यायच्या. आणि काहीतरी काहीतरी आणि मग ब्रेसेस लावायला दोनेक महिने जाणार होते. तोपर्यंत त्या रताळ्याचं काय करू? "काही इंस्टंट फिक्स नाही का? माझे दात हलले नाहीत तरी चालणारे मला." डेंटिस्टने मला बाहेर काढलं. त्या प्लॅनचे दात घशात गेले.

या जिंतेदरला झटकून टाकायला काहीतरी केलं पाहिजे. येताजाता तो माझ्या ऑफिसात डोकावून जातो. त्याचं माझ्याकडे किंवा माझं त्याच्याकडे काहीही काम नसतं. सकाळी कॉफीचे घोट घेत मी काहीतरी वाचत बसलेली असते, हा हीरो तिथे पार्लेजी घेऊन येतो. मी कॉफी पिते म्हणून हा पण कॉफी घेऊन ऑफिसात येतो. एस्प्रेसो कॉफीत पार्लेजी बुडवून खाणाऱ्यांना पार्लेजीच्या फॅक्टरीतच बांधून ठेवलं पाहिले. बरं तो काही बोलला तर त्याला हाकलून देणं सोपं होईल. पण बोलण्यासारखं काही त्याच्याकडे असेल तर बोलेल ना. परवा मी त्याला न राहवून विचारलं. "तुझे छंद काय आहेत?" तर म्हणे "छंद? मला वेळच नसतो. ऑफिस संपलं की मी सरळ जिममध्ये जातो. तिथून घरी जाईस्तोवर जेवून झोपायची वेळ झालेली असते." माझ्या डोळ्यासमोर फुगेवाल्याचं चित्र आलं. जिम म्हणजे फुग्यात हवा भरायचं यंत्र. हा कीटक तिकडे जातो आणि बेडकाचा बैल बनत राहतो. ... एक दिवस छोट्या कपात एस्प्रेसो घेऊन बसायला पाहिजे. बघतेच त्या कपात पार्लेजी कसं बुडवतोय ते!

परवा ऑफिसात जेवण झाल्यावर विषय निघाला. ड्रायव्हिंग लायसन्सवरचे फोटो. त्यात माझा चेहेरा 'काल जरा जास्तच झाली होती' असा दिसतो. त्यात माझा लायसन्स पुराणकालीन आहे. माझ्या फोटोकडे बघून 'लिटल ग्रीन वुमन' असं सगळे न चुकता म्हणतात. सगळ्यांनीच आपापले लायसन्स काढले आणि फोटो बघून खिदळणं सुरू होतं. पुन्हा कोणीतरी माझ्या फोटोची अपेक्षित प्रशंसा केली. तर त्या घटोत्कचाने लायसन्स हातात घेतला. आणि पहिल्यांदा तो आपण होऊन काहीतरी बोलला, "तू किती क्यूट दिसतेस यात!" टेबलवरचे सगळे सात मजली खिदळले. "अरे तेव्हा मी बाळ होते, आठ वर्षं जुना फोटो आहे तो. लहान पोरं सगळ्यांनाच क्यूट वाटतात." तो स्वतःशीच हसला. च्यायला, हा इमेजचा प्रश्न झाला आहे.

इमेज ... हं. केसांचा काहीतरी अवतार करून घेता येईल. तसेही सध्या बरेच वाढले आहेत. वेडेवाकडे कापले तर कितीसं नुकसान होणार, नाहीच आवडले तर चार महिन्यात वाढतील पुन्हा तेव्हा ठीक करून घेता येतील. या विचाराने मला जरा बरं वाटलं. त्या आनंदात मी ऑफिसचं जादाचं कामही अंगावर ओढवून घेतलं. दोघा कलीग्जचं लेखन ठीकठाक करून द्यायला मदत करून द्यायची होती. बुद्धीचं काहीही काम चालेल. त्या सबगोलंकारी दंडाधिकाऱ्याकडे बघून मला अध्यात्मिक शक्ती मिळावी, फक्त लक्ष केंद्रित करून मनात विचार करून सगळ्या वस्तू, स्वतःसकट हलवता आल्या असत्या तर स्नायूंची गरजच पडली नसती. मी थोडी अंधश्रद्ध असते तर बरं झालं असतं, या असल्या गोष्टींवर मला सहज विश्वास ठेवता आला असता. रोहनला असं काही करता येईल का हे विचारलं पाहिजे. असला कुठूनही-काहीही-कसलाही विचार करत मी पार्लरमध्ये पोहोचले.

तिथे नेहेमीप्रमाणे रेडीओवर स्पेशल पार्लर चॅनल लावला होता. कोणीही ऐकत नाहीत असली 'मुझे हक है' छाप गोडगुलाबी गाणी लागली होती. तिथल्या मुली कोणाच्या भुवया कोरत, कुणाच्या चेहेऱ्याला मलम चोपडत अतिशय मन लावून श्रेया घोषालचा आवाज आपल्या तोंडांतून काढायचा प्रयत्न आहे. 'बायांनो, तिला गळा आहे, तुमचा घसा आहे' हे वाक्य तिथे गेले की मला हमखास आठवतं. "काय करायचंय?" तोंडातल्या दोऱ्याला हिसडा देऊन एकीच्या भुवईची छाटणी करत एका श्रेया घोषालने विचारलं. तिचे डोळे भुवईकडेच होते याची खात्री मी करून घेतली. "केस कापायच्येत." "कसे कापायच्येत?" आता आली ना पंचाईत. माझ्या मनातल्या निर्गुण, निराकार हेअरकटचं नाव काय आहे मला कुठे माहीत होतं. "थांबा हं एक मिनीट, सांगते." त्या मुली माझ्यामागे, माझ्याबद्दल काहीबाही बोलत असणार असा संशय चारुताला नेहेमी येतो. आज त्यांचे चेहेरे बघून मलाही खात्री पटली. खिशातून फोन काढला आणि चारुताला कॉल केला, तिने उचलला नाही. तिच्याकडून अशी माहिती सटासट सुटते. मोबाईल इंटरनेट वापरणं आलं. थोडं गूगलल्यावर "वेडावाकडा पिक्सी कट" हे उत्तर मिळालं. "बसा हं थोडा वेळ. मॅडम येतील त्याच कापतील केस." मॅडम येईस्तोवर मी तिथे बसले. रेडीओवर श्रेया घोषालच्या जागी आणखी पातळ आवाजाची बाई आणखी जास्त इमोसनल अत्याचार गायला लागल्यावर मी शेजारची मॅगझिन्स वाचायला उचलली. "तुमच्या पतीला बेडरूममध्ये कसं खूष कराल?" उलटी येण्याआतच मी ते मॅगझिन दूर टाकलं. एक हिंदी मॅगझिन उचललं. "क्या आप की सांस आप को परेशान करती है?" ... ए चल पळ! काय ड्रामा लावलाय. हे असलं सहन करण्यापेक्षा आपणच स्वतःचे केस का कापू नयेत? पैसेही वाचतील.

बारक्या कपात एस्प्रेसोचा शॉट घेऊन मी ऑफिसात येऊन बसले. शेपूट मागोमाग आलंच. आता बघतेच हा बारका कप आणतो का, त्यात बिस्कीट कसं बुडवतोय ते! "इथे बरीच पुस्तकं वाचणारे बरेच लोक आहेत. तू काय वाचतोस?" त्याची गंमत बघायची तर त्याला थोडी संधी दिली पाहिजे. तोंडातून फक्त च्यॅक आवाज काढला. "मग सिनेमे कोणते बघतोस?" ते पण तो बघत नाही म्हणे. आज श्री. घटोत्कच एका ट्रेमध्ये बाटली आणि बारका एस्प्रेसोचा कप घेऊन आले होते. बाटली पारदर्शक होती आणि आतलं द्रव काहीतरी निराळंच दिसत होतं. "तू काय पितोयस?" या प्रश्नाचं उत्तर तुला आलंच पाहिजे. "नेहेमीचंच, प्रोटीन शेक. यामुळे मसल मांस वाढायला मदत होते. तू पण घेत जा, कॉफी चांगली नाही तब्येतीला."

हा एवढी वाक्य सलग बोलू शकतो! मला भानावर यायला जरा वेळच लागला. त्याला मांस नाही, मास म्हणायचं होतं हे सांगावं का? माझ्यासमोर कंप्यूटरवर अंगावर ओढवून घेतलेलं काम - लेखन दिसत होतं. लेख खगोलशास्त्रातल्या एका हॉट टॉपिकबद्दल होता. लेखाचं शीर्षक होतं, "विश्वातलं हरवलेलं वस्तुमान सापडेल का?" मी आळीपाळीने त्याचं पेय आणि स्क्रीनकडे बघत राहिले. माझ्या शेपटीचं मास मला तसंच चिकटून राहिलं.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

निर्गुण-निराकार हेअरकट हे आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केवळ एका शेपटासाठी एवढं???
फक्त एकदा रागावून बघायचे, किंवा टाकून बोलायचे, किंवा सरळसोट एकदा जाबच विचारयचा. कधीच तुटून गेलं असतं ते.
तम्ही बसलात ब्रेसेस लावत, केसं कापत, कैच्याकै.
ही मधुरा खरंच विक्षिप्त आहे हो. तरीही एक विक्षिप्त कानमंत्र देतो तिला, शेपूट समोर आलं कि नाकात वगैरे बोटं घालत जा म्हणावं तिला. शेपूट सुतासारखं सरळ होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तरीही एक विक्षिप्त कानमंत्र देतो तिला, शेपूट समोर आलं कि नाकात वगैरे बोटं घालत जा म्हणावं तिला. शेपूट सुतासारखं सरळ होईल.

मीटींग चालू असताना हसवत जाऊ नका हो ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा परत वाचला आणि तितकीच मजा आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0