निरोप
सगळ सामान भरून झालं तरी त्याचा रूममधुन पाय निघत नव्हता . समोरच्या झाडावरच गरुडाच घरट त्याने अजून एकदा डोळे भरून बघुन घेतलं . समोरचा एरवी राग आणणारा 'मनुस्मृती ' नावाचा बंगलापण आज राग आणत नव्हता . शेवटचा दिवस माणसाला काय काय करायला लावतो . एरंडवण्यातल्या गच्च झाडीमधल्या आउटहाऊसमध्येच आपण कायम राहणार आहोत अशी समजूत त्यानं करून घेतली होती . तीन वर्ष चार महिने आणि सत्तेचाळीस दिवस . त्याला तिथ राहायला जाम आवडायचं . त्या बाकी जगापासून तुटलेल्या आणि हिरव्यागार झाडांमध्ये लपलेल्या आउटहाऊसने त्याला जी स्पेस दिली होती तशी त्याला कुठेच मिळाली नव्हती . तो तिथे एकटाच राहायला . बराच वेळा . घरमालकाने काही अजून भाडेकरू ठेवण्याचा प्रयत्न केला होता . पण बाकीच्या लोकांना ती जागा आवडायची नाही . इथे खुप एकट एकट वाटत अशी त्यांची तक्रार होती . येडे कुठले . जिथे तो रोज नाश्त्याला जायचा त्या जवळच्याच 'हॉटेल स्वीकार ' वाल्याने टोस्ट बटर आणि चहाचे पैसे तेवढे घेतले नाहीत . 'आज रहने दो . बडा साहब बनके आयेगा तब देणा ' दाक्षिणात्य ढंगात गल्ल्यावर बसणारा एरवी निर्विकार वाटणारा म्हातारा हसून म्हणाला . रूम सोडताना कुणाचा निरोप घ्यावा असा काही प्रश्न नव्हता . एवढ्या वर्षात आपल्या ओळखीचं पण म्हणाव अस कुणीही इथ नाही हे एक बर आहे अस त्याला वाटलं . काही लोक रोज दिसायचे . आपल्या वेड्या पोराला रोज फिरायला नेणारा आणि खांदे पाडून चालणारा बाप . रोज टिफिन आणून देणारे आजोबा . समोरच्या बांधकाम चालु असलेल्या बिल्डींगचा नेहमी फोनवर हिंदीत जोरजोरात बोलणारा रखवालदार . वर्षानुवर्ष जवळ राहून त्याला त्यांच्याशी संवाद साधावा वाटला नाही .बाहेर ऑटो येउन उभा होता . आपण नेमकं काय मिस करू इथल , त्याने स्वतःला प्रश्न विचारला . शांत निवांत गल्ल्या ज्या साडेसात नंतर निर्मनुष्य व्ह्याच्या ? समझोता एक्स्प्रेस खटल्यातला आरोपी असणाऱ्या कर्नल पुरोहितच बाजूच्या लेनमधल घर ? रोज दिसत असून जिथे आपण कधीच गेलो ते दशभुजा मंदिर ? समोरच्या झाडावरच गरुडाच घरट? की जगातला सगळ्यात भारी पाऊस . ? यस ! पाऊस . एरवी पुण्यातला वैताग आणणारा पाऊस इथे कसला जबरी सुंदर वाटायचा ? झाडाझाडातून पाणी निथळत यायचं आणि त्याच्या रूमसमोर एक मस्त छोटस तळ तयार व्हायचं . मग तिथेच रमची चपटी घेऊन निवांत कानात हेडफोन लावुन बसायचं . खुप भारी वाटायचं . नंतर हॉटप्लेट वर ओमलेट , जे नेहमी बिघडायच . बाजुच्या बिल्डींगच्या बाल्कनीमधुन त्या वेड्या पोराचा बाप शुन्यात बघत उभा असे .त्याच्यासाठी तो सुंदर पाउस जणु अस्तित्वातच नव्हता . त्याची नजर माझ्यावर पडली की मी त्याला हातातला ग्लास उंचावून दाखवत असे . मग तोंडदेखल हसून तो निघून जायचा . ऑटोवाल्याच्या हॉर्नने त्याची तंद्री तुटली . खरतर आता पण मस्त पावसाळी वातावरण आहे आणि नेमकी आपण ही रूम सोडून निघालो आहोत . रूमवर जमलेल्या बाटल्यांचा ढिग त्याने पोत्यात नीट भरून ठेवला आणि पोत तसच रूममध्ये सोडुन निघाला . आता कसली भीती ?'येत जा अधे मध्ये . " तीन वर्षात पहिल्यांदाच हसून घरमालकीण बाई म्हणाल्या . त्यातली निरर्थकता त्यांना दोघानाही कळली . रीप रीप पाऊस सुरु झाला . चांगलंच अंधारून आला . शेवटचं रूम ला त्याने डोळे भरून बघून घेतल. समोरचा फोनवर जोरजोरात बोलणारा रखवालदार त्याच्याकडे बघुन चक्क मस्तपैकी हसला . ऑटो स्टार्ट झाला . आपल्या हातातून अस काहीतरी सुटून जात आहे जे पुन्हा कधीच मिळणार नाहीये अशी भावना दाटून आली . समोरून बाप त्याच्या वेड्या पोराला घेऊन जात होता . ऑटोच्या थोड बाहेर येउन तो त्याला म्हणाला ,"मी चाललो ." तो मस्त हसला . मग गजानन महाराज आशीर्वाद देताना हात दाखवायचे तसा हात वर केला आणि पावसापासुन पोराला वाचवत झपाझप निघून गेला . ऑटो निघाला . तेवढ्यात जोरात पाऊस सुरु झालाच . समोरून उजवीकडे वळण घेताच मेन रस्ता लागला . 'वैताग आहे नाही पुण्याचा पाऊस ? "ऑटोवाला मागे वळून बोलला . 'बरोबर आहे .' त्याने मान डोलावली .
आवडलं!
आवडलं!