Skip to main content

इच्छा नसतानाही तुमच्यापर्यंत पोहोचणारी जात

इच्छा नसतानाही तुमच्यापर्यंत पोहोचणारी जात
.

जात नाही ती जात हे तर एव्हाना आपण सर्वांनी ऐकले असेल. हा किस्सा मात्र तुमची इच्छा नसतानाही एखाद्याची जात तुमच्यापर्यंत जबरदस्तीने कशी पोहोचते याचा.

परभणी जिल्ह्यातल्या पण नांदेडला जवळ असलेल्या गावात असतानाची गोष्ट. गावातील एका सरपंचाकडे जेवण्यासाठी आमंत्रण होते. पुरूषांचे जेवण झाल्यावर बायकांची पंगत बसली. जेवण झाल्यावर सरपंचांच्या पत्नीने माझ्या आईला तिचे ताट धुवून ठेवायला सांगितले. दुसर्‍या दिवशी माझ्या वडलांनी हा विषय सरपंचांकडे काढला. की फक्त माझ्याच आईला तसे का करायला सांगितले? काय झाले ते विचारून घेतो असे सरपंच म्हणाले.

त्या गावात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने दूर अंतरावरून पाणी आणून ते भरण्यासाठी आमच्याकडे एक गडी होता. आता हा गडी खालच्या जातीचा होता. म्हणजे निघाला. हा गडी आमच्याकडे पाणी भरायचे काम करत असल्यामुळे आम्ही सारेच त्याच्या बरोबरचे समजले गेलेलो होतो. पण सरपंचांचे पाहुणे म्हटल्यावर आणि तेही त्यांच्या पंक्तीला म्हटल्यावर आम्हाला वेगळी वागणूक दिली गेली नाही. पण बायकांच्या पंगतीत बसणार्‍या माझ्या आईला मात्र त्याचा व्यवस्थित प्रसाद मिळाला. सरपंचाच्या बायकोने आईला स्वत:च्या पंगतीला बसू दिले हेच नशिब, नंतर फक्त आपले ताट व वाट्या धुवून ठेवायला सांगितले एवढेच ते काय.

सरपंचांना मात्र काय झाले ते कळले. त्यांनी वडलांकडे झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरीपण व्यक्त केली.

मात्र हा प्रकार होईपर्यंत आम्हाला ज्याची जातही माहित नव्हती व ती माहित असण्याची गरजही नव्हती, त्या पाणी भरणार्‍या गड्याच्या कानावर कसे कोणास ठाऊक हा प्रकार गेला. त्याने कामाला येण्याचेच बंद केले. त्याचे म्हणणे माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. त्याला परत बोलावण्यासाठी आम्हालाच त्याची मिनतवारी करावी लागली. की बाबा, तुझ्या जातीमुळे आमच्याकडे तू भरलेल्या पाण्याचा आम्हाला विटाळ वगैरे होत नाही. तेव्हा बाकीचे आमच्याशी कसे वागतात ते आम्ही पाहून घेऊ. पण तू काम बंद करू नकोस.

सरपंचांकडे जे इतर सवर्ण त्या दिवशी जेवणासाठी आमंत्रित होते, त्यातले काही जण तर आमच्या परिचयाचे होते. आणखी एक धक्का त्या दिवशी बसला तो म्हणजे त्यांच्याकडेही आमचे येणेजाणे त्यानंतर बंद झाले. पर्याय नसल्यामुळे कामाच्या ठिकाणीच काय त्या भेटीगाठी होत.

अखेर आम्हीच त्या गावात कोणाकडे जेवायला जाण्याचे बंद केले. आमच्याकडे कोणी त्यासाठी येण्याचा प्रश्न अर्थात नव्हताच. शेवटी ते गाव सुटल्यावरच हा प्रकार थांबला.

एखाद्याची जात तुम्हाला नको असेल तरी तुमच्यापर्यंत पोहोचते ती अशी.

ज्यांना हा प्रकार प्रत्यक्ष सहन करावा लागत असेल व तोही रोज सहन करावा लागत असेल त्यांच्या भावनांची तर मी कल्पनाही करू शकत नाही. वरवर पाहता त्यांच्यामधल्या काहीजणांनी हा प्रकार जगण्याची पद्धत म्हणून स्विकारलेलाही दिसे. पण त्या आत खोलवरच्या जखमेची कळ कधीतरी त्या जखमेची आठवण करून देत असणारच.

त्यांच्या मानाने आमचा हा अनुभव काहीच नाही. पण असेही होऊ शकते हे तुमच्यापर्यंत आणण्याचा हा प्रयत्न.

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

2 minutes

उपाशी बोका Tue, 22/12/2015 - 20:46

अनुभव सांगितलेला आवडला. मी नेहमी मोठ्या शहरात राहिलो, कधी गावात राहिलो नाही त्यामुळे असा अनुभव मला कधी आला नाही. पण डोक्यात १ विचार आला की छोट्या गावात, जिथे एकमेकांवर अवलंबून राहाण्याची गरज आणि शक्यता शहरांपेक्षा जास्त असते, तिथे असे अनुभव जास्त येतात का? (शहरांच्या तुलनेत). मोठया शहरात मिश्र (कॉस्मोपॉलिटन) समाजामुळे असे अनुभव आले नाहीत किंवा जाणवले नाहीत.