भेरू आणि तांबू

एखाद्या लहरी माळ्याने हाताला हेलकावे देत झारीने पाणी घालावे तसा पाऊस शितडून जात होता. आला आला म्हणेस्तोवर तो नाहीसा होई, आणि नाहीसा झाला म्हणून छत्री मिटावी तर परत त्याचा ताशा तडतडू लागे. त्यामुळे बाजारातल्या माणसांची 'पाऊस नसूनही छत्री उघडून फिरणारे' आणि छत्री असूनही पावसात भिजणारे' अशी विभागणी होऊन गेली होती.
सार्वजनिक कचराकुंडी (म्हणजे नगरपरिषदेने अधिकृतरीत्या 'कचराकुंडी' म्हणून जाहीर केलेली जागा; कचराकुंडी कशास म्हणावे याबद्दल गावातल्या लोकांची व्याख्या फारच व्यापक होती) आणि सार्वजनिक मुतारी ('कचराकुंडी' याऐवजी 'मुतारी' शब्द वापरून आधीच्या कंसातील मजकूर पुन्हा वाचावा) यामधील बारक्या बोळातून तांबू निवांतपणे येत होती. तशी तिला घाई कधीच नसे. घाई करून करायचे काय? कोण पेंड-वैरण घेऊन तिची वाट पाहत थोडेच उभे होते? उकिरडेच फुंकायचे तर घाई कशाला?
=====
बाजार आता भरू लागला होता. पावसाच्या तुघलकी कारभाराला कंटाळून विक्रेत्यांनी मुकाट आपापल्या मालावर जाड प्लॅस्टिकचे छत उभारले होते. सुकी मासळी विकणारा उस्मान स्वतःच्याच मालाच्या वासाने हैराण झाला होता. एक ५०१ छाप मंगलोर गणेश बिडी पेटवून त्या धुराच्या वासात म्हावऱ्याचा वास दडपावा की काय या विचारात तो काडीने दात कोरत होता. यात खरेतर विचार करण्यासारखे काही नव्हते. पण मागच्याच रविवारी त्याच्या बिडीच्या ठिणगीने प्लॅस्टिकला रुपयाएवढे भोक पडले म्हणून अब्बाजाननी सकीनासमोर त्याच्या कानफटात हाणली होती. किडमिड्या अब्बाजानचा हात ताडमाड उस्मानच्या कानापर्यंत जेमतेम पोहोचे. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या गालावरची माशी उडवण्यासारखी ती क्रिया होती. पण सकीनासमोर? तिचा विचार मनात येताच उस्मानने तुमानीच्या खिशातून कंगवा काढला आणि केसांचा कोंबडा पुन्हा फुलवून घेतला.
=====
सोमेश्वराच्या देवळाजवळच्या गल्लीतून डकाव डकाव करीत भेरू येत होता. हा मुलुख त्याला आता फार नवीन नसला, तरी 'पाऊस', 'हिरवळ', 'छत्र्या' या गोष्टींचे त्याला अजूनही आपरूक होते. तसेच इथल्या माणसांचाही त्याला अजून हिशोब लागला नव्हता. डोळ्यांना अजिबात त्रास न देणारे मळकट कपडे घालणारे हे लहानखुऱ्या चणीचे लोक त्याला अजूनही परकेच वाटत होती. त्याचा मालक नथूलाल मीणा याच्या जर्दलाल पगडीकडे आणि आरसे जडवलेल्या जाकिटाकडे पाहून भेरू आनंद मानण्याचा प्रामाणिक यत्न करत असे. तिकडे जोधपूरजवळ महिका तिकोडीमध्ये नवऱ्याकडून येणाऱ्या मनिऑर्डरींकडे पाहून बन्सरी करत असे तसाच.
=====
'मे जिनेंद्र जयंतीलाल शाह' असा फलक मस्तकी धारण करणारे ते दुकान अगदीच चिंचोळे होते. दुकानातल्या फळ्यांवर गोळ्या, बिस्किटे, चिक्की, खारे शेंगदाणे असला परोपरीचा माल मांडला होता. इयत्ता सहावीतील कुमार राजेश या घडीला दुकान सांभाळत होता, कारण त्याचे पप्पा (या नावाने जेव्हा राजेशने पहिल्यांदा हाक मारली होती तेव्हा जिनेंद्रशेटच्या चेहऱ्यावर कृतकृत्यतेचे भाव ओथंबले होते) काळुसेसाहेबांबरोबर हायवेलगतच्या जमिनीबद्दल काहीतरी बोलायला गेले होते. ते परत येण्याच्या आत गोलगोळ्या गट्टम कराव्यात की खारी पैसाबिस्कीटे चाबलावीत याबद्दल त्याचा तातडीने विचार चालू होता. असा दरोडा घातल्यावर झाकण परत लावून बरणी पुढच्या बाजूला कलती करून गोळ्या-बिस्किटांची पातळी (पुढच्या बाजूने) नेहमीइतकी दिसेल अशी करून ठेवणे ही जादू त्याला नुकतीच कळली होती.
अशा गहन विचारात गढलेला असतानाच त्याला एक वेगळीच गंमत दिसली. आतापर्यंत पुस्तकातल्या चित्रातच पाहिलेला 'उंट' हा प्राणी चक्क त्याच्या घरासमोरच्या गल्लीतून येत होता. त्याच्या पाठीवर एक लाकडी हौदा होता आणि त्या हौद्यात बसून एक चक्कर मारण्यासाठी पाच रुपये इतका आकार पडेल हे नथूलाल उच्च स्वरात जाहीर करत होता.
स्वतःच्याच (वडिलांच्या) दुकानातून गोळ्याबिस्किटे ढापणे सोपे होते. ही पाच रुपयांची भानगड जरा (नव्हे, चांगलीच) अवघड होती. बोरे घेण्यासाठी एक रुपयादेखील पप्पांच्या हातून सुटत नसे. आता आतमध्ये मम्मीला (तिला अशी हाक मारलेली अजिबात आवडत नसे; पण तिला असे संबोधलेले पप्पांना खूपच आवडत असे) कौल लावण्यावाचून गत्यंतर नव्हते. तो तातडीने आत गेला.
=====
हौसाबाईंचे डोस्के सकाळपासून फिरले होते. त्यांचा मुलगा गणपा फारच बायकोच्या नादाला लागला होता. आता लग्न काय कुणाचे होत नाही? पण एवढे तिच्या मागे मागे कशाला जायला हवे? आज रविवारचा बाजार. पण म्हाताऱ्या आईला मदत करायचे सोडून तो पुण्याला चालता झाला होता. का तर म्हणे बायकोला तुळशीबागेतून कायबाय आणायचे होते. रागारागाने हौसाबाईंनी मेथीच्या पेंड्या पोत्यातून भसाभस उपसल्या आणि खालच्या ताडपत्रीवर त्यांचा ढीग लावायला सुरुवात केली. आजचा बाजार उरकला की उद्याला थेट आळंदीला मावलींच्या दर्शनाला जायचे असा बेत त्यांच्या मनात शिजू लागला.
=====
पराग वाईन्स (येथे देशी दारू मिळेल) च्या शेजारील गल्लीतून विहरताना तांबूला हे आश्चर्य दिसले. तिच्या तीनपट उंचीचा हा प्राणी पाठीवर लाकडी पाळणा वागवत झुलत झुलत येत होता. प्रत्येक पावलागणिक गळ्यातल्या मोठ्या घुंगरांचा खुळ्ळुक खुळ्ळुक आवाज उमटत होता. रवंथ करीत असल्यासारखे त्याचे मुस्कट हलत होते. त्याच्या झोपाळलेल्या डोळ्यांत थोडा आळस आणि थोडी निराशा उमटून जात होती. जणू त्याला काही बोलायचे होते पण अचानक शब्द हरवले होते.
=====
भेरूने आतापर्यंत गायी बघितल्या नव्हत्या असे मुळीच नव्हते. महिका तिकोडीपासून येथपर्यंतचा पल्ला त्याने नथूलालसोबत पायीपायीच काटला होता. आणि टक्क डोळे उघडे ठेवून त्याने वाटेतल्या सगळ्या चित्र-विचित्र गोष्टी निरखून घेतल्या होत्या. पण समोर दिसणारी ही लहानखुऱ्या चणीची गाय त्याला काहीतरी वेगळी वाटली. का कुणास ठाऊक, तिच्याशी दोन गोष्टी कराव्यात अशी एक अवचित इच्छा त्याच्या मनात उमटली.
बोलायसारखे त्याच्याकडे खूप होते. नथूलाल असा परदेशी का भटकतोय, महिका तिकोडीला कसा वर्षातून एकदाच पाऊस पडतो, तिथले लोक कसे डोळे गरगरा फिरतील अशा रंगांचे कपडे (आणि फेटे) घालतात, पाठीवर बसताना लहान मुले कशी भेदरलेल्या अवस्थेत हसायचा प्रयत्न करतात... खूपखूप साठले होते. अनेक प्रश्नही तुंबले होते. इकडे इतकी हिरवळ कशी? भेरूला सलग दहा मिनिटे पळता येईल अशी सपाट जागा इकडे कुठेच का नाही? इथली जमीन इतकी टणक का? भेरू जिथे जिथे जाईल तिथल्या शाळेतले मास्तर भेरूसमोर उभे राहून मुलांना कडाकडा जांभया येईस्तोवर 'वाळवंटातील जहाज' या विषयावर का भाषण करतात?...
=====

तांबूला अचानक उमाळा दाटून आल्यासारखे वाटले. नामदेवची, तिच्या मूळच्या मालकाची, मुलगी पारू जेव्हा तिची पोळी खाजवी तेव्हा तिला असे होई. पण तिथेच तर सगळी चित्तरकथा सुरू झाली होती. पारूच्या लग्नासाठी म्हणून नामदेवने तिला कामशेटच्या बाजारात विकायला काढली होती. नवीन मालक फारच तुसडा होता. तोंडाने बोलण्यापेक्षा चाबूक त्याला फार प्रिय होता. त्याच्याकडे गेल्यावर तांबूचे दूध आटू लागले. मारझोड करून दूध वाढत नाही हे लक्षात आल्यावर त्याने सरळ खाटकाला बोलावणे धाडले. आयुष्यात एकदाच तांबूने सगळी ताकद एकवटली आणि दावे तोडले. वळवणपासून तिने थेट इथपर्यंतचा पल्ला फेसाटल्या तोंडाने काटला. पण नामदेवच्या गोठ्यात जाण्यासाठी ती तिथे पोचते तोच तिला रडारड ऐकू आली. लग्न झाल्यावर तीनच महिन्यांत पारूचा अर्धवट जळलेला मृतदेह नामदेवच्या दारात आला होता. तेव्हापासून तांबूला पिसे लागले होते. देह आहे म्हणून खायचे, झोपायचे, शेण टाकायचे या क्रिया आपोआप होत होत्या. त्यातल्या भावना निचरून गेल्या होत्या.
पण या ताडमाड प्राण्याला पाहून तिला अचानक बोलावेसे वाटू लागले. शाळेमागच्या पडक्या भिंतीच्या आडोशाला उभे राहून रवंथ करता करता आपली कहाणी त्याला ऐकवावी असे तिला वाटून गेले. एवढ्या उंचावरून माणसे वेगळी दिसतात का? तो काय खातो? त्या लाकडी पाळण्याचे वजन खूप आहे का? त्याचा मालक त्याला मारतो का?....
=====
भाऊ पारखींचे सोनाराचे दुकान बाजारपेठेच्या एका बाजूला होते. आजचा बाजाराचा दिवस म्हणजे क्षणभर हलायची फुरसत नसे. विशेषतः जेव्हापासून त्यांनी एक तोळ्याखालचे दागिने (पाच ग्राम, तीन ग्राम, अगदी एक ग्राम सुद्धा) करायला सुरुवात केले होते तेव्हापासून. या किडमिडीत मावळ्यांकडे तोळ्याच्या भाषेत बोलण्याइतका पैका नव्हता, पण हौस तर होती. ती हौस परवडेल एवढ्या पैशात भागवता येते हे कळल्यावर भाऊंचा धंदा चौपट वाढला होता. पुण्यातल्या गणेश पेठेतले दीडखणी दुकान विकून टाकले आणि इथे आलो हे किती योग्य झाले हे वारंवार त्यांच्या मनात येई.
करकचून ब्रेक लावल्याचा आवाज आला म्हणून त्यांनी दचकून वर पाहिले. एक लाल रंगाची मारुती व्हॅन त्यांच्या दारात उभी राहिली. सर्रकन मागचे दरवाजे उघडले. तोंडाला काळी फडकी बांधलेले चारजण हातात तलवारी घेऊन उड्या मारत उतरले. काय होते आहे हे कळेस्तोवर दुकानातले सगळे सोने-चांदी आणि श्रीकांतच्या इंजिनियरिंगचे डोनेशन भरायला तिजोरीत ठेवलेले पैसे गायब झाले. थोडे अनैच्छिक रक्तदानही घडून गेले.
=====
फौजदार साळुंखे तारवटलेल्या डोळ्यांनी चौकीत बसले होते. तो हरामखोर भिम्या हातकडी सोडवून कासुंब्र्याच्या डोंगरात नाहीसा झाल्यापासून एसीपी साहेबांनी साळुंख्यांच्या सात पिढ्या काढल्या होत्या. आज सकाळी आठवी पिढी निघाली होती. त्यात पारखींच्या फोनने तेल ओतले. ट्राफिकला बदली होण्यासाठी लागणारे तीन लाख रुपये जमा होईस्तोवर हे सहन करणे भाग होते.
पण आता करायचे काय? अचानक साळुंख्यांना आठवले की हा बाजार जो भरतो तो अधिकृत नाही. अधिकृत जागा मारुतीमंदिराच्या मागच्या पटांगणावर होती. पण तिथे नगरपरिषदेने काहीही सोयी केलेल्या नसल्याने सगळे गावातच गल्ल्या-बोळांत ठाण मांडत. आज निदान अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी म्हणजे या दरोड्यावरून जरा तरी लक्ष विचलित होईल. लगेच नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याला फोन लावला. त्याला एकदा एसीबीच्या तावडीतून सोडवल्यामुळे त्याने साळुंख्यांचे एक काम करणे लागत होतेच.
=====
बाजार फुटला.
उस्मानचा म्हावऱ्याचा ढीग गोळा करायलाही त्याला फुरसत झाली नाही.
उंटावर बसायला मिळत नाही म्हणून राजेशने गोलगोळ्यांचा तोबरा भरला तोच पप्पा आले आणि घाईघाईत त्यांनी दुकानाचे दार लावून घेतले.
हौसाबाईंचा मेथीच्या पेंड्या पोलिसांनी बुटांनी तुडवल्या.
एक सणसणीत लाठी नथूलालच्या पाठीत बसली.
भेरू आणि तांबूचे बोलणे राहूनच गेले.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (4 votes)

प्रतिक्रिया

अप्रतिम. वाचताना डोळ्यासमोर चित्र उभं रहातं.

सुरुवात मस्त, शेवट सुंदर आणि सात आठ ओळीत उमटलेलं प्रत्येकाचं व्यक्तीचित्रही निव्वळ खास. भेरू आणि तांबूच्या माध्यमातून सागितलेली बाजारातील प्रत्येकाची गोष्ट आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त चौफेर निरीक्षण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलं वाचायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.