Skip to main content

"अंततः" (सुनीत)

आकर्षणात जातो काठावरी जळाच्या
भुलतो बघून लीला मंत्रावल्या तळाच्या
हलके तुषार, पाणी खर्जात गीत गाते
प्रतिबिंब हालताना लाटांत स्वैर न्हाते

भिंती खड्या सभोती फसवी कराल माया
आतूर नित्य घासा की कैद अप्सरा या
अपुल्याच बोलण्याचा भासे निनाद परका
घसरून लाल माती लावी जिवास चरका

सत्यापल्याड दृष्टी पाहून मोहलेली
जाणीव जीवनाची श्वासांत कोंडलेली
"नाही अजून आली ती वेळ अंतिमा रे!"
भानावरी स्वतःला आणून मी पुकारे

अतृप्त गूढ पाणी काळा थरार वाहे
येणार शेवटी हा.. विहिरीस ज्ञात आहे

-- अमेय

राजेश घासकडवी Sun, 27/12/2015 - 23:59

कविता आवडली. सुनीतासारख्या काव्यप्रकाराचं आजकाल फारच कमी दर्शन होतं. जवळपास नाहीच.

त्या काळविहिरीचं सुप्त आकर्षण चांगलं चित्रित केलेलं आहे.

राही Mon, 28/12/2015 - 08:17

कराल काळाची गूढ ओढ छान दाखवली आहे.
पण तो 'घासा' शब्द तितकासा जुळणारा वाटत नाही.

ऋषिकेश Tue, 29/12/2015 - 11:18

वा! कविता आवडली
पण सुनीतामध्ये शेवटाच्या दोन ओळीत मोठा टर्न अपेक्षित असतो. इथे त्या आधीच्या कडव्यातच कल्पनेची चाहुल लागली आहे, त्यामुळे शेवटाचा पंच तितका 'जोरसे' बसत नाही

निवांत पोपट Tue, 29/12/2015 - 12:06

छान कविता अमेयबाबू.. फक्त,
"हलके तुषार, पाणी खर्जात गीत गाते
प्रतिबिंब हालताना लाटांत स्वैर न्हाते"
ह्या ओळी निष्कारण वाटल्या कवितेत.. कवितेतल्या बाकीच्या मूड शी त्यांचा काहीच संबंध नाही..