नोकरीसाठीची मुलाखत (मराठीत इंटरव्ह्यु) - एक कला

नोकरीसाठीची मुलाखत (मराठीत इंटरव्ह्यु) - एक कला
.

नोकरीसाठीची मुलाखत (मराठीत इंटरव्ह्यु) घेणे ही एक कला आहे.
.
एका प्रकारच्या अनामिक दडपणामुळे आत्मविश्वास असणा-या वाघांचेही कोकरू झालेले असते, तेथे इतरांची काय कथा? पण त्या मुलाला/मुलीला आधी शांत करणे आणि मग प्रश्न विचारायला सुरूवात करणे हे फारच कमी लोकांना जमते.

चार वर्षे काय केले, फक्त मजा केलेली दिसते, आईवडलांच्या पैशाची किंमत नाही, इथपासून बरेच घालूनपाडून बोलून त्याचा उरलासुरला आत्मविश्वासही खच्ची केला जातो. त्याला नोकरीची गरज आहे, तेव्हा हे सारे त्याने मुकाटपणे ऐकून घेतले पाहिजे असा काहीजणांचा समज असतो. हे मी अगदी प्राथमिक पातळीवरील इंटरव्ह्युबद्दल बोलत आहे. मोठ्या अधिकारपदासाठीच्या इंटरव्ह्युमध्ये हा प्रकार जाणूनबुजून केला जातो. तुम्हाला राग किती येतो आणि किती लवकर येतो, आला तर तुम्ही तो कसा व्यक्त करता हे पाहण्याचा त्यात हेतु असतो. अगदी तुमच्या जात-धर्म-रंग यांच्यावरून उलटेसुलटे प्रश्न विचारून तुम्हाला मुद्दाम चिडायला भाग पाडतात.

त्यातही समोरच्या मुलाला काय येते हे तपासण्याऐवजी आपल्याला स्वत:ला काय व किती येते हे दाखवण्याचा इंटरव्ह्युची जागा हा आखाडा आहे असा काहींचा समज असतो.

काही जण मुलांना फॉर्म्युले वगैरे विचारत न बसता त्यातील विविध पॅरामीटर्सचा एकमेकांशी कसा संबंध आहे, ते कळलेले आहे का हे पडताळून पाहतात. त्यावरून एखाद्याला कितपत समजलेले आहे, हे व्यवस्थित तपासून पाहता येते. याउलट काहीजण मात्र फॉर्म्युल्यावरच अडून बसतात.

इंटरव्ह्यु घेणा-यांना मानसशास्त्राची थोडीफार तरी जाणीव असावी लागते. अभियांत्रिकीच्या क्षेत्रात इंटरव्ह्यु घेणारे हेही अभियंते असतात, तेव्हा मानसशास्त्राचे शिक्षण घेतलेले असणे हे जवळजवळ अशक्य असते. तरीही किमान समजुतदारपणा दाखवला तरी हे होऊ शकते.

एका मुलाखतीत मला आलेला एक अविस्मरणीय अनुभव सांगतो.

आधी इंटरव्ह्यु देऊन आलेल्या मित्रांकडून मुलाखतकाराचा मुड आणि साधारण प्रश्न विचारण्याचा रोख कळतो. त्यावरून नंतर जाणा-या मुलांना मनाशी काही आडाखे बांधता येतात. सदर मुलाखतकाराबद्दल कळले, की तो तुमचा आवडता विषय कोणता हे विचारतो आणि मग त्यावरून पीळपीळ पिळतो. नंतर अभ्यासाव्यतिरिक्त कोणता विषय आवडतो हे विचारतो व त्यावरूनही फार पिळतो. तेव्हा एकंदरीत आवडता विषय कोणता हे सांगण्याबद्दल सावधान केले जात होते.

माझी वेळ येईपर्यंत मात्र कदाचित तो मुलाखतकार कंटाळला असावा. त्याने मला कंपनीच्या कामाच्या स्वरूपाबद्दल सांगितले आणि म्हणाला की टेक्निकल गोष्टी विचारून त्याला कंटाळा आला आहे. चलो कुछ अलग करते हैं. चलो, ये स्टडीवडी छोडके तुम्हे क्या पसंद है? एकदम हिंदीवर आला. त्याला म्हटले की मला स्वयंपाकघरात रस आहे. झाले. माझी कल्पना अशी की तो म्हणेल काही वेगळा विषय सांग. पण तसे व्हायचे नव्हते.

पुढचा पूर्ण एक तास तो मला स्वयंपाकामध्ये केमिकल इंजिनीयरिंग कोठे असते यावर प्रश्न विचारत राहिला. सुरूवातीला मी थोडा बेसावध होतो खरा, पण नंतर हे प्रकरण साधे नाही हे लक्षात आले. सुरूवारीला भाकरी/पोळी का फुगते, दूध उतु का जाते येथपासून सुरू झाले. पण पुढे कणिक मळण्यानंतर ती मुरू देण्याने काय फरक पडतो, आमटीची चव का बदलते, ज्वारीच्या पिठाचे पराठे का होत नाहीत, ज्वारीच्या पिठाची विरी जाते म्हणजे नक्की काय होते अशी बरसातच सुरू झाली. प्रेशर कुकरच्या शिट्टीचे तत्व काय असते, या त्यातल्या त्यात सोप्या प्रश्नाचे उत्तर आल्यावर कुकरच्या झाकणावर सेफ्टीचे आणखी काय फिटींग असते, फ्रिजचे दार उघडल्यावर दिवा कसा लागतो आणि केमिकल प्लॅंटमध्ये या गोष्टी कोठे दिसतात हे विचारून त्याने कळस चढवला. प्रश्न विचारून झाल्यावर उत्तर दिले तरीही तो उत्तराचा रोख केमिकल इंजिनीयरिंगमधील विविध प्रिन्सिपल्सकडे इतक्या कौशल्याने नेई, की आपल्याला उत्तर देता आले किंवा आले नाही तरी त्याच्या या कौशल्यालाच दाद द्यावीशी वाटावे. तुम्ही तर केमिकल इंजिनियरिंग शिकलात, पण तुमची प्रत्येकाचीच आई इंजिनियरिंग कॉलेजची पायरी न चढता नकळत का होईना स्वयंपाकघरात केमिकल इंजिनियरिंगच कशी जगत असते हे त्याने अगदी सहज उलगडून दाखवले. हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा त्याने मला याच संबंधात त्याला एक प्रश्न विचारायला सांगितले. याची मात्र मी अजिबात कल्पना केली नव्हती. थोडा विचार करून मी त्याला विचारले की पुरी पाण्यात का तळता येत नाही, त्यासाठी तेलच का लागते? त्यावर त्याने डोळे मिचकावले.

काही इंटरव्ह्यु स्मरणात राहतात ते अशा खरोखर धन्य लोकांमुळे. त्या कंपनीतली नोकरी मी काही कारणांमुळे स्विकारली नाही तरी त्याची ती दिलखुलास पद्धत आज इतक्या वर्षांनंतरही चांगली लक्षात आहे.

बिहेवियरल (वागणुकीसंबंधी) इंटरव्ह्युच्याही आठवणी अशाच धमाल. या नंतर कधीतरी.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)