त्याचे असे झाले (भाग २)

दोन तासांनी मी उठलोच.
हे थोडेसे लाक्षणिक अर्थाने घ्यावे. डोळेमिटल्या अवस्थेत दिवा न लावता आपल्या घरात तीन फुटांच्याहून कमी उंचीच्या कायकाय गोष्टी आहेत त्याचा स्वतःच्या पायाची नडगी वापरून शोध घेणे म्हणजे 'उठणे' म्हणायचे असेल तर हरकत नाही.
शेवटी तीन छोटी स्टुले (त्यातले एक दोनदा), एक खुर्ची (या गोष्टी झोपायच्या खोलीत हव्यातच का?) आणि एक पलंगाखाली ठेवलेला पेला (तो मीच ठेवला होता) इतक्या गोष्टी 'शोधून' झाल्यावर अखेर डोळे उघडले. मग पुढची नैमित्तिक कृत्ये फारसा घोळ न घालता पार पाडली.
झोपेखालोखाल माझे 'नखरे' (मालूच्या - "माझ्या" मालूच्या - भाषेत) असतात ते खाण्याबद्दल. म्हणजे आवडीनिवडी नव्हेत, तर खाण्याच्या वेळा आणि खाण्याच्या पदार्थांचे वस्तुमान याबद्दल. वेळच्या वेळी आणि पुरेसे खाणे एवढीच माझी (मला माफक वाटणारी) अपेक्षा असते. आणि कालच्या आम्लेट-पावाच्या नादात मी एवढ्या सकाळी, नव्हे पहाटे, काय खावे याचा विचारही केलेला नव्हता.
डवे धुंडाळा....नेहमीप्रमाणे साखरेच्या डब्याने उडी मारली. भारतीय क्रिकेट संघातल्या कुठल्याही पूर्णवेळ खेळाडूला न शोभणाऱ्या चपळपणे मी तो पकडला, पण त्या नादात प्रतीक्षिप्त क्रियेने वर गेलेल्या माझ्या उजव्या पायाच्या नडगीने स्वैपाकघरातले टेबल 'शोधले'. अभावितपणे माझ्या तोंडून एक शब्द बाहेर पडला, जो मी गेल्या वर्षीच्या सुटीत मालवण दौऱ्यात ऐकला होता.
आणी बाळ उठले, "कोनाय? मालू...?". आता मी फसणार नव्हतो. अत्यंत शांत चित्ताने मी एका हाताने साखरेचा डबा आणि दुसऱ्या हाताने नडगी धरली आणि दुसरा शब्द खणखणीतपणे उच्चारून ती मालवणी म्हण पूर्ण केली. बाळावर त्याचा अंगाई म्हटल्यासारखा परिणाम झाला आणि बाळ परत झोपले.
वेळ भराभर चालला होता. मला फक्त पावाचे चार तुकडे आणि फरसाणाचा एक पुडा एवढेच सापडले. अखेर पटापट ते पोटात ढकलले आणि दूरध्वनीबैठकीची तयारी सुरू केली. अंक-उच्च उघडला. भ्रमणध्वनी त्याच्या विसाव्याच्या जागेतून बाहेर काढला. त्यावरती नवीनासुराचा संदेश अपेक्षेप्रमाणे होताच, "प्रयत्नलो बोलवायला तुला. तू नव्हतास उपलब्ध. संपर्क ताबडतोब". आता हलक्या आवाजात का होईना, पण मला खिंकाळण्याचा मोह आवरला नाही. थांब रे राजा, करतोच तुला 'ताबडतोब' संपर्क. रात्री दिन दिन दिवाळी करून झोपलेल्या व्यक्तीला सकाळी सहा ते नऊ ही वेळ अगदी गाढ साखरझोपेची असते हे मला ठाऊक होते (लग्नाआधी मी काही अगदीच 'हा' नव्हतो). त्यामुळे पेगीबाईची वासलात लावली की मग या राक्षसाला हलवावा असे ठरवून मी काळी कॉफी करायच्या मागे लागलो. चांगली चार कप करून नियंत्रित तपमानाच्या बाटलीत भरून ठेवली आणि बैठक जमवायच्या मागे लागलो.
कुठे बसावे याचा विचार आत्तापर्यंत केला नव्हता. नेहमी मी बाहेरच्या खोलीत बसतो, पण आज तिथे घोरासुराचे आख्यान चालू होते. दुसऱ्या झोपण्याच्या खोलीत मालूने बरेच सामान कोंबून ठेवले होते, जे साफ करणे हा माझा किनिवि: किल्ली-निर्णय-विभाग (KRA: Key Result Area) असल्याचे तिने नुकतेच जाहीर केले होते. त्या सामानात अत्यंत प्रामाणिक विचाराने खरेदी केलेली व्यायामासाठीची दुचाकी आणि घरातल्या घरात चालण्यासाठी असलेले यंत्र होते. त्यामुळे ते सगळे बाजूला करण्यातच दोन तास गेले असते. झोपण्याच्या खोलीत टेबलसदृश काहीही नव्हते, मालूचे रंगरंगोटीचे टेबल सोडून, जे आधीच ओतप्रोत भरले होते. शेवटी स्वैपाकघरातल्या टेबलावर दुकान मांडले.
आता कशीबशी पंधरा मिनिटे उरली होती. त्यात दाढी-आंघोळ उडवावी की आंतरजालीय बैठकीत वापरले जाणारे चित्रण-प्रक्षेपण यंत्र खराब आहे असे सांगून मोकळे व्हावे? तसेच करावे आणि त्या चौदा मिनिटात एक कप कॉफी निवांतपणे पोटात ढकलावी असा विचार करून तो अमलात आणला.
ठरल्या वेळी पेगीबाईंचा हसरा (न हसायला काय झाले? बसली असेल दाबून नाश्ता हाणून) चेहरा माझ्यासमोरच्या पडद्यावर उमटला. प्रथम मी माझ्या बाजूचे चित्रण-प्रक्षेपण यंत्र खराब असल्याचे वृत्त देऊन टाकले. थाप मारायचीच असेल तर ती लौकरात लौकर मारावी असे माझे एक तत्त्व आहे. जसजसा वेळ जातो तसतसा माझा घाबरटपणा उफाळून येतो. आज तरी ही थाप पचली असे वाटले. वाटले म्हणजे, त्यावर पेगीने "खरेच?" असे म्हणून ओठांचा चंबू केला (जो मोहक दिसत होता; खोटे का बोला?) आणी "बघायला पाहिजे" असे काहीतरी पुटपुटली.
बैठक सुरू झाली. ही 'अखेरची' बैठक म्हणजे एक आवईच होती हे माझ्या सुरुवातीलाच लक्षात आले. त्यामुळे एक हात सोडून (आणी कधी कधी दोन्ही हात सोडून) दुचाकी चालवणाऱ्याच्या सफाईने मी मध्येच इकडेतिकडे बघणे, ध्वनीक्षेपकापासून तोंड बाजूला नेऊन जांभई हाणणे, कानाला लावलेले जंजाळ बाजूला करून अंक-उच्चामध्ये अंतर्भूत असलेल्या ध्वनीक्षेपकात बोलणे, ध्वनीक्षेपकावर हात ठेवून कॉफीचा मोठा घोट घेणे असे प्रकार सुरू केले.
ते अंगाशी आले. मी उगाचच माझ्या ध्वनीक्षेपकाची ध्वनीशोषणपातळी वाढवली आणि सकाळी खाल्लेल्या फरसाणाने आपले काम केले. एक डरडरीत ढेकर, जी दडपण्याआधीच ऑस्ट्रेलियापर्यंत पोचली. पेगी टाणकन उडाल्याचे समोर दिसले. "माफी. काही समस्या आत यंत्राच्या" असे म्हणून मी वेळ साजरी केली, ध्वनीशोषणपातळी मुकाट कमी केली आणि पेंगायला सुरुवात केली.
पण हे तिला दिव्यचक्षूंनी दिसले की काय कोण जाणे. अचानक "काय आहे तुझा विचार यावर" असा प्रश्न अंगावर आला. "चांगला प्रश्न. पण मला वाटते मी द्यावे माझे मत नंतर मला मिळाल्यावर जास्ती माहिती" मी इंग्रजीत वदलो. मग हातावर छडी खाल्लेल्या खोड्याळ विद्यार्थ्यासारखा सावरून बसलो. दोन तासाच्या त्या कंटाळायात्रेत एवढेच कळले की आता 'बिंदू-जाळ्या'ऐवजी दुसरे तंत्रज्ञान वापरावे असा एक मतप्रवाह तिकडे वाहू लागला होता. तो कितपत शक्य आहे याचा अहवाल देणे मला शक्य होईल काय? या प्रश्नावर मी अत्यंत उत्साहात होकार दिला. कारण ते दुसरे तंत्रज्ञान मला संपूर्ण अगम्य होते आणि नवीनासुराचे ते वैशिष्ट्य मानले जात होते. अजून एक मुद्दा... हा हा हा
हळू हळू मला पेंग येऊ लागली. आणि बाळ उठल्याचे त्याने मालूच्या आवडत्या (नव्हे, अत्यंत आवडत्या; एकदा योगेशच्या सिगरेटच्या राखेचा एक कण त्या फुलदाणीवर लागलेला दिसला आणि घरात धूम्रपानबंदी जाहीर झाली. तशी मालू त्याबाबतीत निमित्तालाच टेकली होती म्हणा) फुलदाणीचे विभाजन करून जाहीर केले.
डोळ्यात रेंगणारी पेंग खाडकन उतरली. तो आवाज इतका भयावह होता, की दुसऱ्या बाजूने पेगी "आहेस तू ठीक? काय झाले? स्फोट किंवा काहीतरी?" असे प्रश्न फेकू लागली. तसे काही नसून मी हातीपायी धडधाकट आहे अशी कशीबशी (कशीबशी नाहीतर काय? माझा शेजारी दारू ढोसून माझ्या घरात रात्रीपासून पडला आहे, तेही माझी बायको घरात नसताना हे काय तिला सांगणार होतो? तिला भलतीच शंका आली असती) तिची समजूत घालण्यात पाच मिनिटे गेली. अखेर निरवानिरवीची भाषा करताना पेगीने माझ्या अंक-उच्चावरची चित्रण-प्रक्षेपण यंत्रणा बंद असल्याचा विषय पुन्हा काढला. "मी बोलेन नवीनशी, आपण करू काहीतरी लौकरच" असे जाहीर केले. समारोपाचे छोटेसे भाषण केल्यावर माझ्या लक्षात मी केलेला घोळ आला.
पेगीचे कार्यालय जरी ऑस्ट्रेलियात असले तरी तिचा उद्योग हा अमेरिकेत नोंद झालेला एक अत्यंत मोठा समूह होता. आणि माझा अंक-उच्च हा त्या तिच्याच उद्योगाने निर्मित केलेला होता. तो वापरून आम्ही या प्रकल्पावर काम करणे अपेक्षित होते, कारण त्यात काही विशेष सुविधा होत्या, ज्या एरवी उपलब्ध नसतात. पण पाण्यात टाकलेल्या ओंडक्याला सुरुवातीला घाबरलेले बेडूक जसे त्यावर नंतर उड्या मारू लागले तसे आम्ही त्या अंक-उच्चाला मोजणे सोडून दिले होते. असो, नवीनासुरासमोर थोडे नमते घ्यावे लागणार....
त्यावरून लक्षात आले, सकाळचे सहा वाजून गेले होते. आता बाहेर बाळाची ख्यालीखुशाली बघावी, त्याला वरच्या मजल्यावर ढकलावे आणि थोडी डुलकी मारावी असा विचार करून मी बाहेर आलो.
बाळ सोफ्यावर 'मी डोलकर डोलकर' करत बसले होते. रात्री मनसोक्त दारूकाम झाल्यावर दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावरून ओसंडणारा पश्चात्ताप निथळत होता.
सुधाकररावांनी माझ्याकडे अत्यंत अनोळखी चेहऱ्याने पाहिले. "इकडे कुठे?" हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर मी लख्ख वाचला, जो शब्दात पकडायला त्यांना अजून पंधरा मिनिटे लागली असती. मी थोडक्यात पण शक्य तेवढ्या रोख-ठोक शब्दात गेल्या काही तासांचा इतिहास कथन केला. सुधाकररावांनी या दरम्यान तोंडातून बरेच सूर काढले, जसे पेटीच्या चारपाच पट्ट्या एकदम दाबल्यावर होते तसे. अखेर त्यांना हवा तो सूर सापडला.
"स्वारी बरं का.. न्हाई म्हनजे तुमाला फारच तर्रास दिला... आता एकच उप्कार करा... अजून एक अर्दा तास बसूं द्या हितं... काय है, रातच्याला जरा काम जहालं तर दुसऱ्या दिशी सक्काळी येक तासभर जरा मला सावरायला येळ लागतो... म्हंजी तसा मी उटलो व्हतो तुमी त्या बाईसंगट बोलत व्हतात तवा (कानावरचे जंजाळ बाजूला करून अंक-उच्चातील अंतर्गत यंत्रणा वापरल्याचे दुष्परिणाम)".
अरे वा, वेळाचे गणितही पाठ होते तर. शेवटी त्यांना एक कप काळी कॉफी देऊन मी आंघोळीला पळालो.
उन्हाळ्याचे दिवस असले तरी फवारा सकाळी साडेसहाच्या तुलनेने फारच थंड होता. त्या पाण्याचा हबका अंगावर बसताच अभावितपणे माझ्या तोंडून गाणे सुरू झाले.
दुसरे काही करण्याजोगे नव्हते म्हणून मी गात राहिलो, "तू छुपी है कहां... मै तडपता यहां..". तसा माझा आवाज अगदीच वाईट नाही. झोपलेल्याला उठवायला वाईट, कारण उठल्याउठल्या असे काही ऐकणे हृदयविकाराच्या व्यक्तींना धोकादायक ठरू शकते हे हे मालूचे मत 'खडूस' या सदरात पडते.
या नादात बाहेर वाजणारी दूरध्वनीची घंटा मला कशी ऐकू येणार? आणि त्यानंतर वाजलेली भ्रमणध्वनीचीदेखील? त्या दोन्ही घंटा अग्निशामक दलाच्या घंटेहूनही जास्त संकटसूचक होत्या हे त्यावेळी कसे कळणार?
आंघोळ उरकून बाहेर आलो. सुधाकरराव आता अर्ध-जागृतासनात बसले होते. "दोन फोन... एक बाईंचा... एक बाबाचा" त्यांनी वाक्य जुळवले. मी पटकन भ्रमणध्वनी तपासला. नवीनासुराचा फोन. म्हणजे तो काल रात्री शुद्धीत होता. अन्यथा एवढ्या सकाळी त्याचा फोन येणे शक्य नव्हते. आणि ही बाई कोण? मालू असावी. आपल्या घरी साडेसहाला केलेला फोन नवऱ्याऐवजी दुसरा राठ आणि अशुद्ध बोलणारा पुरुष उचलतो हे गणित बायका कशा सोडवतील हे कळले असते तर मी सर्वज्ञानी नसतो झालो?
मी सर्वज्ञानी नसल्याने तिला फोन करण्याची घाई न करता सावकाश सुधाकररावांचे गलबत वरच्या मजल्यावर नेऊन लावले, नवीनासुराशी बोलणे केले, अंक-उच्च ठीक आहे, सकाळची समस्या छोटीशी होती आणि ती माझीच चूक होती हे खाली मान घालून मान्य केले (पण भ्रमणध्वनी 'संपर्ककक्षेच्या बाहेर' असण्याची समस्या आमच्या गृहसंकुलात नेहमी भेडसावते हे मात्र ठासून सांगितले), मला आठवला तसा सकाळच्या बैठकीचा वृत्तांत दिला, 'दुसऱ्या तंत्रज्ञानाबद्दल' माहिती गोळा करण्याचे काम मी त्याच्या वतीने स्वीकारले आहे (आणी ती माहिती एक दिवसात द्यायची आहे असेही ठोकून दिले; एक दिवस तरी बुडाला चटका लागल्यासारखे काम कर लेका), शेवटी "माणसे महत्त्वाची नसतात, संस्था महत्त्वाची असते" हे त्याचेच लाडके तत्त्वज्ञान त्याच्या तोंडावर फेकून संवाद बंद केला.
इ-पत्रे बघावीत, मालूला फोन करावा की अजून एक कप कॉफी प्यावी असा विचार करत असतानाच परत दूरध्वनीची घंटा वाजली.
तो दूरध्वनी घ्यायला गेलो आणि सगळे जागरण नेमके त्या क्षणीच अगदी अगदी अंगावर आले. कडाडून जांभई देतच मी दूरध्वनी उचलला. जांभई पूर्ण होण्याची वाट का पाहिली नाही? प्राक्तन बरे हे, प्राक्तन.
"हॅलो, मी बोलत्येय....... मी, (इथे माझी जांभई संपली) तुझी बायको.... लग्न झालंय तुझं... आठवतं का?" अत्यंत हळू, समजावणीचा स्वर. तुम्हाला जर पाच वर्षांच्या कोणाला रेषीय बीजगणीत (linear algebra) शिकवायची वेळ आली तर तुमचा काय स्वर आणि बोलण्याचा वेग असेल तसा अगदी. फक्त त्यात 'आंबटपणा' चेपून भरलेला.
पहिल्यापहिल्यांदा हा स्वर ऐकला की माझे डोकेच फिरायचे. मग हळूहळू माझ्या लक्षात आले की अनेक मार हे तोंड दाबूनच खायचे असतात. जसे, माहिती तंत्रज्ञानात काम करतो यावरून मिळणारे खवचट टोमणे - समाजात अनैतिकता बोकाळली आहे? त्या 'आयटी'वाल्यांच्या मुळे. जागांचे भाव वाढले आहेत? त्या 'आयटी'वाल्यांच्या मुळे. रस्त्यावर वाहतूक वाढली आहे? त्या 'आयटी'वाल्यांच्या मुळे. हे जसे स्थितप्रज्ञासारखे पचवावे लागते तसेच आपले लग्न झाले आहे ही गोष्टही.
"अगं मालू, मी तुला..."
"फोन करणारच होतो असेच ना? ते कळलेच. माझा आवाज ऐकल्याऐकल्या जी जांभई आली ना, त्यावरूनच कळले किती 'ओढ' लागलेली बायकोची ती." (जांभई आधीच आली होती हे सिद्ध करणे अवघड होतेच. आणि ते 'सिद्ध' करूनही फरक पडला नसता हे लग्न झालेले जाणतातच.) "काय झालं का कामाच्या बायकांशी बोलून?"
कुठल्या बायका? हा विचार मनात उभा रहातो न रहातो तोच...
"आणी किती ढोसलीस काल रात्री? एरवी माझ्या डॅडींनी विचारलं की 'बिअर घेणार का' तर किती नखरे... मला कामच आहे, सकाळी उठायचंच आहे... एक बिअर घेतली की काय झिंगून पडतं की काय कोणी? आणि जणू काही रोजच लौकर उठतोस... एक दिवस उठायचं आणि वर्षभर सांगायचं"
सकाळी आंघोळ करताना थंड पाण्याचा झोत अंगावर पडल्यावर जी अवस्था झाली होती त्याची पुनरावृत्ती झाली. त्या वेळेला मला गळा तरी काढता आला होता, इथे तेही शक्य नव्हते. वाढणारा रक्तदाब काबूत ठेवण्याचा निकराचा प्रयत्न करीत मी म्हटले, "मी रोज लौकर उठतो असे मी म्हणत नाहीय..."
"विषय बदलू नकोस! (इथे कंसात काही लिहायची गरज आहे का?) काल रात्री किती ढोसलीस ते सांग. आणि कुणाला घेऊन आला होतास बरोबर? मद्यगृहात सापडला वाटते नमुना. कायपण बरळत होता. पण तो होता म्हणून मला तुझ्या लीला तरी कळल्या. ऑस्ट्रेलियातला ग्राहक म्हणे. ग्राहक की ग्राहकीण?" 'ग्राहक' या शब्दाचे स्त्रीरूप 'ग्राहकीण' होत नसावे असे वाटले, पण उगाच परत "विषय बदलू नकोस" हा संवाद आला असता.
"बोल ना, (म्हणजे मी इथे बोलणे अपेक्षित होते तर) आता का दातखीळ बसली? मला सगळं कळलं म्हणून? कोण ही मेगी? भारतीय वाटते, 'तू छुपी है कहां' काय?" आणि मालूने साग्रसंगीत गळा काढला.
डोळे बांधून मला कुणी मंगोलियातल्या छोट्यात छोट्या खेड्यात जरी सोडले तरी मी त्या परिस्थितीतून मार्ग काढू शकेन. पण इथे मला 'मी कोण' असले मुलभूत प्रश्न पडू लागले. च्यायला या सुधाकराच्या. नुसत्या पाण्यावर ठेवला पाहिजे पंधरा रात्री भोसडीच्याला. काय काय सांगितलन त्यानं? काल बहुतेक 'भेजा फ्राय'वाल्या विनय पाठकच्या शिकवणीला जाऊन आला असावा. इथे मालू सारिकाला शिकवणी देण्याच्या तयारीत होती.
"मालू, मालू, एक मिनिट, एक मिनिट...."
"का, ती मेगी का फेगी दुसऱ्या फोनवर आहे वाटतं?" गळा काढलेला असताना एवढे अख्खे नऊ शब्द विखार काठोकाठ भरून फेकणे आणि श्वासही न दवडता परत सूर धरणे...अतर्क्य तरीही खरे.
"मालुडी.ऽऽ... (आता हे मी तिला कध्धीकध्धी तिसऱ्या कुणाच्याही समोर म्हणत नाही, त्यामुळे या संबोधनात थोडासा दम टिकून आहे. ही गोष्ट सांगण्याच्या नादात तुम्हाला सांगून बसलोय खरा, पण आता हे तिला सांगू नका. नाहीतर मला अशा गोष्टी लिहितच घटस्फोटित जीवन जगावे लागेल)...बेबी, ऐक ना पुरूचं"
सूर जरा मवाळ पडू लागला. पण मला अचानक रंगमंचावर नवख्या नटाचं होतं ते झालं - पुढे काय बोलावे हे उमगेना. मग कोंडलेली मांजर जशी जीव खाऊन उडी घेते, शेंडी तुटो वा पारंबी या तयारीने, तसे मी पहिली उडी त्या (हरामखोर) सुधाकररावावर मारली.
"मालुडी, तुला माहीत आहे का तुझ्याशी सकाळी फोनवर कोण बोललं? अग, आपल्या वरच्या मजल्यावर रहाणारे ते बोंबलवाडकर आहेत ना... तेच ते सुका बोंबील भाजून मालूला त्रास देणारे (हे कृत्य खरे तर दुसऱ्याच इमारतीतल्या परबांचे, पण जीव वाचवायला खोटं बोललं तर ते अडचणीत सापडलेल्या नवऱ्यांना माफ असतं)"
हा संवाद अगदीच मर्मस्थानी भिडला. भाजलेल्या बोंबलाचा वास हा तो खाणाऱ्यांनाही अवघड जाणारा प्रकार. मग संपूर्ण शाकाहारी मालूला तर त्या वासाच्या आठवणीनेही उलट्या सुरू होत यात नवल ते काय? सूर एकदम शांत. ८००-१२०० वरून माझा रक्तदाब हळूहळू ८०-१२० वर येण्याचे चिन्हे येऊ लागल्याचे जाणवू लागले. पण आता बोलत रहाणे गरजेचे होते, नाहीतर ही संमोहनावस्था विस्कटली असती.
मी त्या (हलकट) सुधाकररावाने कसा दंगा केला, त्याला पोलिस आमच्या इमारतीखालून कसे पकडून नेत होते, (मी तिथे काय करत होतो? मालूने विचारले नाही, तुमचे काय जाते?) मी माणुसकी आणि ओळख दाखवल्यामुळे माझ्याकडे बघून, माझ्या शब्दाखातर ("तुमच्यासारक्या जंटलमन मान्साकडे बगून सोडतो ह्याला, चल नीग रे बेवड्या" या संवादासकट, आणि त्या बेवड्याच्या पृष्ठभागावर झालेल्या लत्ताप्रहारासकट) कसा त्याला सोडला, या सहकारी गृहरचना संस्थेत कसे आपल्या ओळखीचे कोणी नाहीत (आम्ही तिथे साडेतीनच महिन्यांपूर्वी रहायला आलो होतो), मी चांगला वागून कसे मालूला गरज पडली तर हाक मारायला शेजारी असावेत याची तजवीज करून ठेवत होतो, ... जिवाच्या आकांताने मी किल्ला लढवत होतो. मुरारबाजी, तानाजी, बाजीप्रभू या मंडळींनी मला सल्लागार म्हणून ठेवायला हरकत नव्हती.
ती मेगी का फेगी (प्रत्यक्षातली पेगी) इथे घोडा अडला. तोपर्यंत प्रेक्षावर्ग कच्चा फणस सोलून त्याची भाजी आणि खोबरे खवून त्याचे दूध काढून 'अवियल' एकदम एकावेळेला करून देईल इतका मऊ पडला होता. आता मागे फिरण्यात अर्थ नव्हता. मी घोड्याची एकदम घोडी करून टाकली (खरेतर उलटे).
"आणी मालू, तुला माहीत आहे ती पेगी कोण ते?"
वातावरणात जरा तणाव आल्याचे जाणवले, पण पूर्वीच्या तणावाच्या मानाने हा म्हणजे हिरवी मिरची वाटून घातलेल्या आल्या-कांद्याच्या रसापुढे शहाळ्याचे पाणी.
मी घाईघाईत बोलणे चालू ठेवले.
"अगं वेडाबाई, ती पेगी नव्हे, तो पेगा. (जरा तोल सुटल्यासारखा वाटला, पण आता रेटून नेण्यावाचून गत्यंतर नव्हते) अगं आमच्या ऑस्ट्रेलियातल्या ग्राहकाचं नाव आहे 'पेगासस' (हे नाव मला त्यावेळी कुठून सुचले हे नाही सांगता येणार. पण 'पेग' याच अक्षरांनी सुरू होणारे दुसरे पुरुषी वाटणारे नाव मात्र सुचले नाही हे खरे.
बाकी पुरुषाचे नाव पेगासस ठेवतात की नाही कोण जाणे), पेगासस स्मिथ (आडनाव तरी खरे सांगावे). त्याच्याबरोबर बैठक होती. आणि या डुकरामुळे (लाडात असली की मालूला असल्या शिव्या खुदुखुदु हसायला प्रवृत्त करतात) मला ती बैठक स्वैपाकघरात बसून करावी लागली" सुधाकररावाना वापरलेल्या संबोधनाने खुसुखुसु सुरू झाले होते. थोडक्यात, कड्याच्या टोकापर्यंत मारामारी करून मी चित्रपट-नायकाप्रमाणे सहीसलामत परतलो होतो.
हुश्श. जरा खोल श्वास घेतला आणि पाचवा गियर टाकला. "आज काय बेत आहे मालविका म्याडमचा?"
आत्तापर्यंत सांगितले नाही (आतापर्यंतच्या भिरभिऱ्यातून वेळ होईल तर ना), मालविका वास्तुरचनाकार (architect) आहे. लोकांची घरे, बागा, पोहणतळी आदी गोष्टींची रचना करून देणे हे काम ती जमेल तेव्हा (म्हणजे ग्राहकांना तिच्यापर्यंत यायला जमेल तेव्हा) करीत असे. तिचे स्वतःचे असे कार्यालय होते, ज्यातला संतोष नावाचा तिचा 'पुरुष शुक्रवार' तिला मालविका म्याडम म्हणत असे. त्याच्या जिभेचे वळण बदलण्याचे अनेक प्रयत्न करून झाले होते. त्याला एका शब्दोच्चारवर्गातसुद्धा घालून झाले. तिथे लेकाचा 'शेड्यूल'च्या ऐवजी 'स्केड्यूल' म्हणायलाही शिकला. पण मालविका 'म्याडम'च राहिली. त्यावरून नेहमीच मी मालूची थट्टा करत असे.
"बेत कसला बाबा... (अगदी अगदी नेहमीचा स्वर. कामगिरी फत्ते! हुर्यो) आज एक ग्राहक आहे, त्याच्याबरोबर त्याच्या शेतीघराकडे जायचंय. त्याला तिथे दोन तळी करायचीयत, एक त्याच्याकरता आणि एक माशांकरता. (झकास कल्पना. आणि ती दोन्ही एकमेकांना जोडली तर मज्जाच. पोटासाठी एरवी कायकाय करतो माणूस. इथे मात्र पोट भरायला आणि कमी करायला एकच उपाय - तळ्यात उतरणे. माझा कल्पनाविलास). असले खडूस असतात हे ग्राहक म्हणजे, तुला काय सांगू". इथे मी गप्प राहिलो. वास्तविक तिच्या एखाद-दोन 'खडूस' ग्राहकांना मी भेटलो होतो. आम्हाला भेटणाऱ्या 'चांगल्या, आस्थापनेच्या दृष्टीने अत्यंत मूल्यवान' ग्राहकांच्या मानाने तिचे 'खडूस' ग्राहक ही त्यांच्या पायाचे तीर्थ घ्यावी अशी देवमाणसे होती. पण हे बोलून आत्ताच जमवलेला तह का मोडा? तरीही, काहीतरी बोलायला हवे.
"हो ना, उगाच काहीच्या काही तरी बरळत असतात. काम पूर्ण होत आले की बदल सुचवतात. यांना काय वाटतं, की पैसे मोजून काहीही करायला लोक मिळतात?" (प्रिय मालूच्या ग्राहकांनो, मला क्षमा करा. हे जरी सकृतदर्शनी तुमच्या दिशेने असले तरी मी खरे तर माझ्या ग्राहकांविषयी बोलतोय) मी अत्यंत तळमळीने दुजोरा दिला. तळमळ पोचली. "जाऊ दे, चालायचंच... सकाळी काय खाल्लं राजाने? ('राजा' हेही संबोधन तिसऱ्या कुणासमोर... आलं ना लक्षात? तर हे आपल्यातुपल्यात ठेवा एवढेच) मी येऊन पोहे करून देऊ का?"
"अगं नको, नको, तुला लौकर बाहेर जायचंय ना? मी भरपूर खाल्लंय, अगदी ढेकर येईस्तोवर (पेगीला विचार). मला बऱ्याच इ-पत्रांना उत्तरे द्यायचीत अजून. आणि नवीन पेटलाय, काही वृत्तांत त्याला आत्ताच्या आत्ता हवेत म्हणून".
कुठल्याही नोकरी करणाऱ्या (विशेषतः माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात) बायकोला आपल्या नवऱ्याचा साहेब छळवादी आहे यावर पक्का विश्वास असतो. अर्थात याचे खरे कारण त्या साहेबाच्या नावावर बऱ्याच पावत्या फाडलेल्या असतात. मित्रांबरोबर रात्री दोनपर्यंत बियर ढोसली की, "साहेबाने अमेरिकेच्या ग्राहकाबरोबरच्या दूरध्वनीबैठकीसाठी थांबवून घेतले, त्यामुळे तू तीनदा केलेला भ्रमणध्वनीसुद्धा मला घेता आला नाही (एकदा स्वच्छतागृहात गेलो होतो, एकदा नवीन बियर उघडत होतो आणि एकदा सिगरेट पेटवत होतो; पण खरे का बोला?). आणि नंतर अजून चर्चा करायची आहे म्हणून बळजबरीने 'डिनर'ला घेऊन गेला आणि बिअर पाजली" वगैरे.
अशी पावत्यांची सोय करणारे साहेबलोक आणि ग्राहक नसते तर माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खरेच एवढी गर्दी झाली असती का हा एक चर्चेचा विषय आहे. कुठल्यातरी वृत्तपत्रात वाचकांच्या पत्रव्यवहारात पुडी सोडून दिली पाहिजे. त्यात काहीतरी करून 'उच्चवर्णीय, बहुजनसमाज, अल्पसंख्यांक' हे शब्द घुसवता आले तर छान पेटेल होळी. मग शिमगा करायला अनेक जण येतीलच पुढे.
असो. तर नवीनासुराचा बागुलबुवा दाखवून मालूला तर टाळले. आता त्या टाळण्याचे कारण सांगतो. तुम्हाला अजून आठवत असेल, तर मालूच्या दूरध्वनी संभाषणाची सुरुवात आणि माझ्या जांभईचा शेवट यात पाचेक सेकंद फरक होता. त्यामुळे तर आगीत तेल पडले होते. तीच झोप अजूनही आपला अंमल गाजवायला आतुर होती.
मधल्या हातघाईच्या लढाईत ती जरा बाजूला झाली, पण खडुळलेला डोह शांत झाल्यावर तिने परत डोके वर काढले आणि मला आडवे करण्याचा चंग बांधला. आत्ताशी सव्वासात वाजत होते. आज मला 'घरून काम करण्याची' नवीनासुराने दिलेली परवानगीही तुम्हाला आठवत असेल. आणि माझे पुढचे काम हे नेहमीच्या वेळेवर येणाऱ्या (आणि जाणाऱ्या; केवळ नशीबवान) अशा एका प्रकल्प सल्लागाराबरोबर बैठक हे होते.
थोडक्यात अजून दीडेक तास चांगले आडवे होऊन झोपायला काहीच हरकत नव्हती. आणि मालूला तिच्या 'खडूस' ग्राहकाबरोबर साडेआठला निघायचे होते. म्हणजे ती आत्ता इथे आली (तिच्या सद्यस्थानापासून माझ्या सद्यस्थानापर्यंत प्रवासाला लागणारा संपूर्ण वेळ पंचवीस मिनिटे; दोन्ही घरांत १३७० मीटरचे अंतर होते आठवते ना? तर प्रवासाला यायला दहा मिनिटे आणि रंगरंगोटीला पंधरा मिनिटे), मग नुकत्याच झालेल्या तहामुळे सकाळच्या 'पेगासस'बरोबरच्या बैठकीच्या खऱ्याखोट्या (खऱ्या कुठल्या, खोट्याच सगळ्या; म्हणजे परत कल्पनाशक्तीला ताण) गोष्टी, म्हणजे अजून अर्धा तास. छे, छे!
झोप अनावर झाली की अशी एक अवस्था येते की झोपाळू माणूस सर्वसंगपरित्याग केलेला निर्मोही आत्मा होतो. मग तो बायको मोजत नाही की बहीण. मी अखेर त्या अवस्थेला पोचलो होतो. त्यामुळे नवीनासुराच्या नावावर पावती फाडली.
ही पावती सहज फाडता आली याचे अजून एक कारण - मालूच्या मनात असलेला पंजाब्यांविषयीचा कमालीचा अविश्वास. मालूचा भाऊ एका पंजाबी तरुणीच्या प्रेमात पागल झाला आणि अख्रेर लग्न करून बसला. अशा प्रसंगी कुठल्याही स्त्रीच्या ज्या भावना असतात त्याच मालूच्या होत्या - तिच्या भावाला त्याच्या लायकीपेक्षा खूपच 'खालची' मुलगी मिळाली.
एकटा असल्याने खरे बोलतो, मला असे अजिबात वाटत नव्हते. एकतर नचिकेत (मालूचा भाऊ) कमालीचा मेंगळट. मिल्कीने (तिचे कागदावरचे नाव काहीतरी जसविंदर कौर की काहीसे होते) त्याच्यात काय बघितले असा प्रश्न खरेतर विचारायला हवा. पण असो. मिल्कीबद्दल फार सहानुभूती दाखवण्यात अर्थ नाही. तुमच्यापैकी कुणी चहाडी केली तर मी फुकट दानाला जाईन.
थोडक्यात, अख्खी नव्वद मिनिटे मला निद्रादेवीच्या कुशीत घालवायला मिळणार होती. मी मालूला दुपारी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आश्वासन दिले आणि ते संभाषण संपवले. मग दूरध्वनीच्या घंटिकेचा आवाज दाबून टाकला, भ्रमणध्वनी परत पलंगाखाली लोटला.
आणि ढाराढोरी घुर्घुरायते...

त्याचे असे झाले (भाग १)
त्याचे असे झाले (भाग ३)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet