त्याचे असे झाले (भाग ३)

माणसाने बेडकाच्या मेजवानीची स्वप्ने बघितली तर ताटात झुरळसुद्धा येत नाही. त्यामुळे कलिंगडाच्या वाळलेल्या बियांचेच स्वप्न पाहावे, म्हणजे जे ताटात येईल ते गोड भासते अशी एक चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल. तत्प्रमाणे मी 'दीड तासाची झोप' अशा कलिंगडाच्या वाळलेल्या मूठभर बियांचे स्वप्न पाहिले. त्यातल्या बऱ्याचशा बिया मिळाल्या. काही हुकल्या. पण त्या खवट निघाल्या असत्या असे स्वतःचे समाधान करून घेतले.
त्याचे असे झाले, दीड तासापैकी सव्वा तास बिनघोर (खरे तर 'सघोर') झोप पदरात पडली. आणि बाहेरच्या खोलीतून काही भयाकारी आवाज सुरू झाले. डुकरांची संगीतस्पर्धा चालू असावी किंवा चार घोडे मिळून एका गाढवाचा बळी देत असावेत. अर्धोन्मीलित नेत्रांनी चालण्याचा प्रयोग पुन्हा फसला आणि नडग्या परत हुळहुळ्या झाल्या. अखेर त्या आवाजाचा स्रोत सापडला. काल रात्री सोफ्यावर शवासन करणाऱ्या बाळाचा भ्रमणध्वनी. तो भयाकारी आवाज त्याच्या घंटीचा होता. अर्थात मी ते यंत्र शोधून काढेपर्यंत तो आवाज बंद झाला होता.
आपली झोपमोड करणारे दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनी आपले हात त्यांच्यापर्यंत अखेर पोचताच बोलती बंद का करतात? तारवटलेल्या डोळ्यांनी मी त्या भ्रमणध्वनीकडे बघितले. जरी त्याची बोलती बंद झाली नसती तरी मी काय करणार होतो? मुळात भ्रमणध्वनींच्या बाबतीत मी बराचसा मठ्ठ आहे. मला 'काळे (गुंजेसम) फळ' अथवा 'सफरचंद' हा भ्रमणध्वनी देण्याचा आमच्या आस्थापनेचा विचार मी गेले चार महिने खोडून काढत होतो. अंक-उच्च बंद करूनही इ-पत्रे माझ्यापर्यंत पोचत राहिली असती तर माझे जगणेच हराम झाले असते हे एक कारण. पण तेवढेच महत्त्वाचे दुसरे कारण म्हणजे तो वापरायचा कसा हे शिकण्याची तीव्र (भीतीपोटी जन्माला आलेली) अनिच्छा.
हा भ्रमणध्वनी त्याच्या आवाजाइतकाच भयाकारी होता. त्याचा आकार एखाद्या कंपास बॉक्स इतका पण चपटा होता. अख्खा टचस्क्रीन काळ्या आरशासारखा दिसत होता. असा हा चित्तचक्षुचमत्कारिक प्रकार हातात घेऊन मी समाधी लावली. अर्थातच त्यामुळे इंद्राचे सिंहासन दोलायमान होऊ लागले असावे, कारण त्याने परत तो भयाकारी आवाज सुरू केला.
आता मात्र माझे डोळे खाडकन उघडले. आपले अज्ञान लाज काढते ती चारचौघात. एकटे असतो तेव्हा आपण सर्वज्ञ असतो. त्यामुळे मी बिनधास्त त्या स्क्रीनवरून बोटाने एक मुक्तरेषा रेखाटली. आवाज बंद झाला आणि एक स्त्री-आवाज प्रकटला, "काल रातच्याला आंगटी हितंच इसरून ग्येलात की मालक...आता कवा येता न्ह्यायाला, आज रातच्याला?". म्हणजे बाळाच्या रात्रीच्या कार्यक्रमाला 'रम' पुरेशी नसून त्यात 'रमणी'ही होती तर. मी बघतच राहिलो (भ्रमणध्वनीकडे). "आता का वाचा बसली आं? काल रातच्याला तर..." असो. त्या आवाजाच्या मालकिणीची भाषा शुद्ध नव्हती, पण भावना भलतीच शुद्ध, अगदी पहिल्या धारेची, होती. आणि शब्दांची निवड तर फारच रोखठोक होती. आत एक, बाहेर एक असे न करता तिने आतले सगळेच बाहेर आणून मांडले. माझ्या कानाला झिणझिण्या आल्या. मालूला (माझ्या) "मी प्रेमतो तुला" असे इंग्रजीत म्हणायचे झाले तरी इकडेतिकडे बघून, कोणी ऐकण्याच्या टप्प्यात नाही ना याची खात्री करणारे आम्ही पेद्रू. भ्रमणध्वनीवरून चाललेला हा प्रौढशिक्षणाचा पाठ पचविणे शक्यच नव्हते.
मी भ्रमणध्वनी अलगद खुर्चीच्या उशीवर ठेवला आणि पाय न वाजवता स्वैपाकघरात गेलो. झोपेचे बरे काम झाले होते, त्यामुळे जरा उल्हसित वाटत होते. अजून कॉफी केली, पलंगाखालून माझ्या भ्रमणध्वनीची सुटका केली आणि गरम कॉफी ढोसत प्रकल्प सल्लागाराबरोबर काय चर्चा करायची आहे याची उजळणी केली. बाहेर त्या रमणीने 'माझी कैफियत'चा प्रयोग संपवला.
प्रकल्प सल्लागाराबरोबरची बैठक बरोबर नऊला सुरू झाली आणि दोन मिनिटांत संपली. कारण माझी त्याच्याबरोबर बैठक आहे हे त्याला कळवण्याची तसदी कुणीच घेतलेली नसल्याने तो दुसऱ्या एका बैठकीत गर्क होता असे तो म्हणाला. आणि ती बैठक झाल्यावर त्याला दुसरी महत्त्वाची कामे होती. आणि आज शुक्रवार. त्यामुळे पुढची बैठक आता पुढच्या आठवड्यातच शक्य होती. ती वेळ उभयपक्षी पक्की केली.
आणी माझ्या लक्षात आले की 'घरून काम' करायचे असले तरी काही प्रस्ताव संपादित करण्यावाचून आज मला खरे तर काही काम नव्हते. आणि ते प्रस्तावही असे ताबडतोब करायला हवेत असे नव्हते. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करायला लागल्यापासून मी एक शिकलो होतो - आग लागल्याखेरीज विहीर खणायची नाही, अन्यथा कुणाला तुमची किंमत कळत नाही.
थोडक्यात, अनेक युगांनी मी आज अपक्ष आमदारांसारखा स्वतंत्र आणि विनापाश होतो. मालूही नसल्याने तात्पुरता ब्रह्मचारीही. मी जरा बाहेर फेरफटका मारून यायचे ठरवले. मी राहतो तो भाग, त्यातील रस्ते, त्यावरील दुकाने, त्यातील माणसे, त्यांचे कपडे हे सगळे निरपेक्ष वृत्तीने मी याआधी कधी पाहिल्याचे मला आठवत नव्हते. ही चूक ताबडतोब सुधारायच्या मार्गाला मी लागलो.
भ्रमणध्वनी (माझा) खिशात टाकला. बाळाचाही घेतला. येताना वरच्या मजल्यावर चक्कर मारून बाळाचे गलबत नीट नांगरून पडले आहे ना हे बघावे असा बेत केला. (मालू (२) ही व्यक्ती 'दिसते कशी आननी' हेही बघण्याचा हेतू होता. खोटे का बोला?) दरवाज्याची किल्ली खिशात आहे याची त्रिवार खात्री केली आणि बाहेर पडलो.
जग एवढे निवांत चालू असते हे मला माहीत नव्हते. मला सतत कुठल्या ना कुठल्या 'मृत्यू-रेषे'च्या तणावाखाली जगण्याची इतकी सवय झाली होती की हे नवीन जग न्याहाळत मी 'मर्फी' (रेडिओ) च्या बालकासारखा निरागसपणे हिंडू लागलो.
असे सुंदर गुलाबी चित्र उभे राहत असले की कुठूनतरी त्याला एक डांबरगोळा येऊन चिकटलाच पाहिजे असा काहीतरी नियम असावा. तत्प्रमाणे दीपक चिकटे नावाचा डांबरगोळा मला चिकटला.
हा भ̱.गृ. 'झेड इन्फ़ोट्रेनर्स' नावाची एक प्रशिक्षण संस्था चालवत होता. 'जे न देखे रवी ते देखे कवी' हे स्वतःला उद्देशून लिहिण्यात आले असावे असा त्याचा दाट समज होता. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण असो, "ओह, सुंदर, ते आहे आमचे वैशिष्ट्य" असे इंग्रजीत वदत हा प्राणी हिंडत असे. आणि तेही आडनाव सार्थ केलेच पाहिजे अशा इरेला पडून. एकदा वैतागून मी त्याला 'बिंदू जाळे ८.०' या विषयावर प्रशिक्षण पाहिजे असल्याचे अत्यंत गंभीर मुद्रेने वदलो. त्याचा संवाद बदलला नाही. एवढी सणसणीत थाप ऐकून माझीच वाचा बसली. 'लघुमृदू'चा संस्थापक 'बाळू कुंपणे' जर समोर असता तर त्याचीही बसली असती.
गेले काही आठवडे हा भ. गृ. माझ्या मागे लागला होता की "माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नव्यानेच येणारे तरुण-तरुणी या क्षेत्राबद्दल खूपच अनभिज्ञ असतात, त्यांना आस्थापनेच्या दृष्टीने कमावण्यायोग्य (billable) करण्यासाठी एक अत्यंत योग्य, 'या सम हा' असा एक प्रशिक्षण कार्यक्रम 'झेड आय' (स्वतःच्या आस्थापनेचा उल्लेख तो असा करी) ने आखला आहे आणि तो आम्ही आमच्याकडे येणाऱ्या 'ताज्या' (freshers) ना अत्यंत उपयुक्त ठरेल त्यामुळे आम्ही तो ताबडतोब राबवावा". यातला पहिला भाग मला अगदी मान्य होता. कुर्नूल, काकीनाडा, किंवा हिस्सार, गुडगांव अशा ठिकाणांहून थेट आमच्या आस्थापनेत संगणकासमोर स्थानापन्न झालेले अनेक नमुने होते. त्यांच्याकडून काम करवून घेण्यापेक्षा ज्ञानेश्वरांचा जन्म घेऊन रेड्याकडून वेद वदवून घेणे सोपे पडेल. पण या लोकांना 'झेड आय'चे प्रशिक्षण दिल्यास 'आधीच मर्कट, तशातचि...' अशी त्यांची अवस्था होईल अशी मला भीती नव्हे खात्री होती. कारण 'झेड आय'च्या प्रशिक्षकांनाच प्रशिक्षणाची नितांत गरज होती. पण दीपकबुवांनी थेट नवीनासुराचा वशिला आणला होता, आणि नवीनासुर दर वेळेला "हेय पुरू, बघ जर तू शकलास करू काही" असे आंग्लभाषेत पुटपुटत त्याला माझ्यासमोर ढकलत असे.
आज तर मी त्याला अगदी समोरासमोर सापडलो. जे 'साधे, तणावरहित जीवन' पाहून मी खुषावलो होतो त्या हिरवळीत हा साप निघाला. माझ्यासमोरच त्याची लांबलचक चारचाकी उभी करत, "नमस्कार, आज इकडे कुठे?" असा सरळ मराठीत तो मला भिडला. निवांत टिवल्याबावल्या करत चालताना अचानक भूमिका बदलून माझा 'प्रकल्प व्यवस्थापका'चा मुखवटा मी चिकटवू लागलो. पण यावेळेला माझी लागणारी समाधी भंगल्याचे पाहून इंद्राला बहुतेक वाईट वाटले. कारण झपाझप, एकामागून एक, तीन घटना घडल्या.
माझ्या खिशातला तो बाळाचा भ्रमणध्वनी परत भयाकारी किचाटू लागला. त्या आवाजाने दीपकबुवाही टाणकन (चारचाकीच्या) छतापर्यंत उडाले. पण छताला आतून मुलायम अस्तर असल्याने त्या ऊर्ध्वगमनाचा काही उपयोग झाला नाही. दुसरे म्हणजे समोरून बाळ झुलत येताना दिसले. मी घाईघाईत तो भ्रमणध्वनी बाळाच्या हातात कोंबला.आणि तिसरे म्हणजे, एक प्रकल्प व्यवस्थापक लोकांचे भ्रमणध्वनी खिशात घेऊन हिंडतो आणि ते वाजू लागल्यावर त्यांना देतो, ही काय नवी सेवा (आणी त्याचे प्रशिक्षण सुरू करता येईल का) असा प्रश्न चेहऱ्यावर उमटवून दीपकबुवा भ्रमणध्वनीच्या हस्तांतराकडे पाहत असतानाच माझा भ्रमणध्वनी वाजला. मी विजयी मुद्रेने हातानेच एक संदिग्ध खूण केली जिचा अर्थ 'आता फुटा' असा लावता आला असता (किंबहुना दीपकबुवांनी तो तसा लावावा अशी माझी इच्छा होती) आणि माझ्या भ्रमणध्वनीवर बोलायला सुरुवात केली.
भ्रमणध्वनीवरून 'पत-पत्त्या'चे विपणन करणाऱ्या एका सुंदरीचा आवाज उमटला. नेहमी लोकांची हाडुतहुडूत ऐकून घ्यायची सवय असल्याने तिने मला तोंड खुपसायची (संभाषणामध्ये) संधी न देता आपली अतिवेगवान गाडी सोडली. मी तिचा तो साडेपंधरा सेकंदांचा (त्याहून जास्त वेळ बोलले तर लोक संभाषण बंद करतात असे कुणीतरी संशोधन केले आहे असे म्हणतात) पढवलेला संवाद मन लावून ऐकला. त्यादरम्यान माझा हात आतून काहीतरी उमळून येत असल्यासारखा हालवला ('नंतर... नंतर') आणि दीपकबुवांपासून दूर चालू लागलो. हे सर्व साडेपंधरा सेकंदांत बसवताना थोडी ओढाताण झाली, पण जमले.
त्या सुंदरीचे पस्तीस सेकंद संपल्यावर मी "धन्यवाद, मी करेन संपर्क तुमच्याशी नंतर" असा नेहमीचा संवाद न वदता अजून प्रश्न विचारून तिची संभाषणगाडी चालू ठेवली (दीपकबुवा वाढत्या अंतरावरूनसुद्धा माझ्याकडे आशेने टुकत होता). त्या बिचारीला नोकरीला लागल्यापासून असा अनुभव पहिल्यांदाच आल्याचे जाणवत होते. त्यामुळे पहिल्यांदाच प्रेमात पडल्यासारखी ती मुग्ध होऊ लागली. शेवटी तिच्या प्रतिनिधीला प्रत्यक्ष भेटल्यास अधिक चांगली माहिती मिळेल या संवादापर्यंत गाडी आली. तोवर दीपकबुवा क्षितिजापार झाले होते, त्यामुळे मीसुद्धा फार पाल्हाळ न लावता माझ्या कार्यालयाचा पत्ता दिला. हे 'प्रतिनिधी' म्हणजे व्यवस्थापनातली कुठलीतरी निरर्थक पदवी मिळवलेले अर्धवटराव असतात, तरीही दीपकबुवांचे 'झेड आय'चे प्रशिक्षण कसे "निर्विवादपणे शिंपी-कृत साठी तुमच्या" ही चर्पटपंजरी ऐकण्यापेक्षा त्या प्रतिनिधीला झेलणे केव्हाही सहनीय झाले असते.
हुश्श करून मी समोर पाहिले. वाहवा, काय दृश्य होते! एका बाजूला एक औषधांचे दुकान, आणि दुसऱ्या बाजूला एक खाजगी कर्जवितरण संस्था यांच्या बेचक्यांत 'सुमीत वाईन्स' दिमाखात उभे होते. वा! कर्ज घ्या, दारू प्या, जास्ती झाली तर झिंटॅक तयार!
पण हे दृश्य अधिक मनोहारी झाले होते ते वेगळ्याच कारणाने. बाळ आपले भ्रमणध्वनीवरील संभाषण संपवून सुमीत वाईन्सच्या चार पायऱ्या पादाक्रांत करण्याची मनीषा बाळगून पहिल्या पायरीवर 'लाजते, पुढे फिरते, सरते' करीत डुलत होते. मलापण काय झाले कोण जाणे, चटकन पुढे होऊन मी बाळाला आधार दिला.
बाळाला त्याचीच गरज होती. माझ्या शरीराचा रेटण्यासाठी उपयोग करून बाळाने चारापैकी दोन पायऱ्या एका उड्डाणात सर केल्या. आणि क्षणभर स्थिरावून गुरुत्त्वाकर्षणाची सनातन शक्ती मान्य केली आणि पिकले फळ पडावे तसे बुदकन माझ्या चरणी विराजमान झाले. मी खाली वाकून त्याला उठवले.
"डोक्यात जाते साएब" मी बुचकळ्यांत पडलो. पडलेल्या माणसाला (?) उठवणाऱ्याचे आभार या शब्दात मानले जातात हे मला नवीन होते. "ही राणी..." आणि यानंतर बाळाने एक सणसणीत शब्दसमूह उच्चारला. शरीरशास्त्राचा सखोल व्यासंग दर्शवणारा तो शब्दसमूह ऐकून मीच लाजलो. तरीही काही प्रकाश पडेना.
माझा कोरा चेहरा पाहून बाळाला शब्द फुटेनात. अखेर त्याने आपल्या एका हातातल्या भ्रमणध्वनीला दुसऱ्या हाताच्या तर्जनीने भोके पाडल्यासारखे हातवारे केले.
अच्छा, तर त्या सकाळच्या 'आंगटी'वाल्या रमणीचे नाव राणी तर. विवाहबाह्य संबंधांविषयी माझा अभ्यास शून्य (शप्पत) असल्याने अशा प्रसंगी सहानुभूती दाखवतात का, आणि असल्यास कोणत्या शब्दात याचा मला काहीच अंदाज नव्हता. मी माझा 'आधाराच्या खांबा'चा अभिनय चालू ठेवला.
पण एकदा कोसळल्यावर बाळाच्या मेंदूतील तोल सावरणारा विभाग कामाला लागला असावा. झपाट्याने चारही पायऱ्या पार करत बाळाने दुकानाचे फळकूट धरून उभे राहण्यात (आणी 'एक मॅक्डाल क्वाट्टर' अशी आज्ञा करण्यात) यश मिळवले. मी अचंबित होऊन पाहत असतानाच ती 'क्वाट्टर' बाळासमोर आली. त्याच्या बदल्यात दुकानदाराला काही धन द्यावे लागते याची बाळाला जाणीव होती. पण खिशातले पाकीट काढून त्यातील योग्य तेवढे धन मोजण्याचे गणित सध्या त्याच्या कुवतीबाहेरचे होते. बाळाने अख्खे पाकीटच त्या फळकुटावर विराजमान केले
आपणा सर्वांचे पूर्वज वानर. त्यातील सुताराने मारलेली पाचर उपटून स्वतःची शेपूट (आणी काही इतर भाग) चेमटून घेणाऱ्या वानराची गोष्ट आठवते? तो वानर हाच खात्रीने माझा पूर्वज. अन्यथा माझे शेजारधर्माचे माप मी काल रात्रीच ओसंडून वाहीपर्यंत भरले असताना आत्ता मध्ये पडण्याची काय गरज होती?
पण पडलो. दुकानाच्या पायऱ्या चढलो, पाकिटातून योग्य संपत्तीचे वितरण केले, पाकीट बाळाच्या खिशात सरकवले, 'क्वाट्टर' ताब्यात घेतली आणि बाळाला त्या पायऱ्या सहीसलामत उतरवून घराकडे 'चल चल बाळा' करीत चालवायला सुरुवात केली. आणि हे सगळे करताना गप्प राहीन तर मी त्या वानराचा खरा वंशज कसा ठरेन?
"सुधाकरराव, कशाला पिता इतकी?"
"वोव्हरँग साएब, आता येक क्वाट्टर मारली की झन्नाट झॉप येती. संद्याकाळी उटलं का येकदम हुश्शार".
"पण त्यापेक्षा तुम्ही घरी जाऊन काळी कॉफी का घेत नाही? आणि थंड पाण्याने अंघोळ का करत नाही?" त्याच्या नजरेसमोर मीच ती अख्खी क्वाट्टर मारल्यासारखा आश्चर्यचकित चेहरा करून बाळ माझ्याकडे पाहू लागले. पण मी प्रयत्न सोडले नाहीत. अखेर, घरी जाईपर्यंत तरी ती बाटली मी सांभाळावी असा प्रस्ताव मी मान्य करून घेतला. एका हातात ती क्वाट्टर आणी दुसऱ्या खांद्यावर बाळाचे ओझे अशी मिरवणूक निघाली. काही वेळाने मला जरा शुद्ध आली आणि मी ती क्वाट्टर हळूच माझ्या विजारीच्या खिशात सरकवली.
एक छोटीशी पण भपकेबाज चारचाकी काचकन माझ्या समोर उभी राहिली आणि एक कर्णभेदी शिट्टी आसमंतात घुमली.
"जियो मेरे लाल, सकाली सकाली क्वार्टर जेबमदी, लगीन च्यांगला चाललाय ना?" गाडीची काच खाली झाली आणि आतून एक पुरुषी वाटणारा स्त्रीचा आवाज अख्ख्या शहराशी संवाद साधण्याचा विडा उचलून उमटला.
बरखा बजाज!

त्याचे असे झाले (भाग १)
त्याचे असे झाले (भाग २)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet