ते विश्वच निराळ

परग्रहावरची सृष्टी, पृथ्वीचा नाश ,अंतराळाची सफर हे सर्व हॉलीवूडचे अनेक वर्षांपासूनचे अतिशय आवडते विषय. आजवर अनेक प्रसिद्ध दिग्दर्शकांनी या विषयावर चित्रपट बनवलेले आहेत. अनेक प्रचंड गाजलेलेदेखील आहेत.काही सपशेल आपटलेत. पण हाच विषय घेऊन २०१४ साली प्रदर्शित झालेला ख्रिस्तोफर नोलनचा इंटरस्टेलर हा चित्रपट भन्नाट असाच म्हणावा लागेल. यापुर्वी नोलनने द डार्क नाईट आणि इन्सेप्शन सारखे जबरदस्त चित्रपट दिग्दर्शित केले आहेत आणि यावेळीदेखील अफाट कल्पनाशक्ती आणि भौतिकशास्त्र यांचा योग्य तो मेळ घालून अत्यंत विचारपूर्वक हा चित्रपट बनवण्यात आलाय. तो बनवताना नोलनने कीप थोर्न सारख्या शास्त्रज्ञांची मदतदेखील घेतली आहे. वरवरून पाहताना थोडा डोक्यावरून जाणारा आणि कंटाळवाणा वाटला तरी एकदा त्याच्यातील गंमत कळल्यावर तो डोक्यातून जाता जात नाही.पहिल्यांदा बघितल्यावर आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात अणि जशी जशी त्यांची उत्तरे मिळत जातात तसे नवे प्रश्न पुन्हा तयार होत जातात हीच या चित्रपटाची गंमत आहे. दिग्दर्शकाने या बाबतीत प्रेक्षकांना पूर्ण विचारस्वातंत्र्य दिलेले आहे अणि प्रत्येकाच्या वैयक्तिक कल्पनाशक्तिलादेखिल इथे पूर्ण वाव आहे.

step 1

साधारणपणे 21व्या शतकाच्या उत्तरार्धात पृथ्वी हळूहळू विनाशाकडे निघालेली आहे. सतत येणारी धुळीची वादळे ,बदलत्या हवामानामुळे होणारा पिकांचा नाश आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यामुळे पुढील काही पिढ्यांमधे संपूर्ण मानवजातच नष्ट होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कूपर हा एके काळचा अमेरिकन वैमानिक आता शेती करत आहे.जगाची अन्नाची गरज भागवण्यासाठी कूपरसारख्या अनेकजणांना आपापले क्षेत्र सोडून केवळ शेती करण्यास भाग पाडल जातय. वेळ अणि पैश्याचा अपव्यय नको म्हणून नासासारख्या अवकाश संशोधन संस्थेवरदेखील बंदी आणली गेलेली आहे. या अशा वातावरणात कूपर आपली मुलगी मर्फ,मुलगा टॉम अणि सासरा डोनाल्ड यांच्यासमवेत राहत आहे.एक दिवस अचानक कूपरला मर्फच्या खोलीत अपघाताने एका जागेचे निर्देशक (co-ordinates) मिळतात. सांकेतिक स्वरुपात(binary) असलेल्या या निर्देशकांचा शोध घेत अनपेक्षितपणे कूपर गुप्तरीत्या कार्यरत असलेल्या नासामध्ये जाऊन पोहोचतो. तिथे त्याची भेट संशोधक डॉ. ब्रॅन्ड यांच्याशी होते. आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कूपरला अनेक धक्कादायक गोष्टी कळत जातात.गेली अनेक वर्षे नासा ही पृथ्वीला पर्यायी अशा ग्रहाचा शोध घेत आहे आणि याचे कारण म्हणजे पृथ्वीवर अजुन जास्तीत जास्त एक पिढी कशीबशी जगू शकेल अशी परिस्थिती आहे हे सत्य कूपरला समजते. पण त्याचबरोबर शनी ग्रहाशेजारी एक वॉर्महोल (एका आकाशगंगेमधून दुसऱ्या आकाशगंगेकडे काही क्षणात जाता यावे म्हणून तयार केले गेलेले विवर)तयार झाल्याचेदेखील त्याला कळते. मानवजातीचे भविष्य सुरक्षित राहावे म्हणून दुसऱ्या सृष्टिवरील प्रगत प्रजातितील लोकांनी (यांचा उल्लेख सतत They म्हणून येतो.प्रत्यक्षात they म्हणजे नक्की कोण हे शेवटच्या काही क्षणांत कळत) हे वॉर्महोल तयार केले असावे असा अंदाज सर्वजण बांधतात. याच वॉर्महोलच्या सहाय्याने दुसऱ्या आकाशगंगेतील काही ग्रहांवर जाऊन कोणत्या ग्रहावर मनुष्यप्रजातीला राहण्यालायक वातावरण आहे हे शोधण्याची जबाबदारी डॉ. ब्रॅण्ड कूपरकडे सोपवतात. त्यातसुद्धा दोन पर्याय असतात.पहिला पर्याय(plan A) म्हणजे सर्व मानवजातीला तिथे घेऊन जाणे आणि ते शक्य नसेल तर दूसरा पर्याय(plan Dirol म्हणजे पॉप्युलेशन बॉम्बच्या सहाय्याने कृत्रिमरित्या गर्भाशये त्या ग्रहांवर नेऊन (पृथ्वीवरील करोडो लोकांना असेच वाऱ्यावर सोडून) तिथे संपूर्ण नवीन वस्ती निर्माण करणे.आणि प्रतिसृष्टी निर्माण करणे. नैतिकदृष्टया कूपरला दुसरा पर्याय पटत नाही. पण पहिला पर्याय अमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले गुरुत्वाकर्षणाचे समीकरण डॉ. ब्रॅण्ड यांना अजूनही सुटलेले नसते. त्यामुळे कूपर हव्या त्या ग्रहाचा शोध लावेपर्यंत ते समीकरण सोडवून सर्व मानवजातीला वाचवण्याचे आश्वासन डॉ. ब्रॅण्ड कूपरला देतात आणि ठरल्याप्रमाणे कूपर हा डॉ. ब्रॅण्ड यांची मुलगी अमिलिया आणि आणखी दोन सहकारी(रोमिली अणि डॉयल) यांच्यासोबत प्रवासाला निघतो. तो परत येण्याची काहीच शाश्वती नसल्यामुळे मर्फ कूपरला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते पण तिचा विरोध झुगारुन तो निघुन जातो.

त्यानंतर सुरु होतो तो अखंड प्रवास. एका पूर्ण नवख्या आकाशगंगेमधून. एका ग्रहावरुन दुसऱ्या ग्रहाकडे आणि तिथे पदरी पडलेली निराशा विसरून पुन्हा नव्या आशेने तिथून वेगळ्या ग्रहाकडे. ध्यास एकच. मानवप्रजातीला वाचवण्यासाठी दुसरी सृष्टी शोधण्याचा. अनेक वर्षे चाललेल्या या प्रवासात कूपर आणि त्याच्या साथीदारांच्या वाटयाला सतत निराशा येते पण हार मानून चालणार नसतं. ही सफर अशीच सुरु राहते. पृथ्वीला वाचवण्याचे स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नदेखील अखंड सुरू राहतात. पण याचा शेवट कुठे होतो, मानवजात नष्ट होते का, ब्रॅण्ड यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या समीकरणाचे काय होते, प्लॅन A आणि प्लॅन B यापैकी कोणता अमलात आणण्यात यश येते, कूपरच्या मुलांचे पुढे काय होते, they म्हणजे नक्की कोण आणि त्यांचा मानवाशी काय संबंध हे समजण्यासाठी इंटरस्टेलर एकदातरी पाहावाच. तो पहिल्यानंतर अनेक गोष्टी कळल्या नाहीत किंवा सिनेमा इतक्या गुंतागुंतीचा बनवण्याची काय गरज ही भावना सर्वप्रथम मनात येते खरी. पण तरीदेखील आपण काहीतरी जबरदस्त पाहिलय आणि जे काही पाहिलय ते नक्की आहे तरी काय हे पूर्णपणे समजून घेतलच पाहिजे या विचाराने आपण अक्षरशः झपाटून जातो.जसेजसे त्यातील कंगोरे उलगडत जातात तसं तसं आपल्याला कळत जातं की दिग्दर्शकाने प्रत्येक गोष्टीचा किती बारकाव्याने विचार केलाय. प्रत्येक वाक्य , प्रसंग, संवाद किती विचारपूर्वक लिहिला गेलाय आणि कल्पनाशक्तीला विज्ञानाच्या कोंदणात किती सुरेखरित्या बसवण्यात आलय. मग नकळतच ख्रिस्तोफर नोलनला दाद दिली जाते. इन्सेप्शनप्रमाणेच यावेळीदेखील एक पूर्ण वेगळ विश्व आपल्यासमोर निर्माण करण्यात तो यशस्वी झाला आहेच पण काही प्रश्न अनुत्तरित ठेऊन आणि त्या गोष्टींचा निर्णय प्रेक्षकांवर सोडून या चित्रपटाचा त्यांना लगेच विसर पडणार नाही आणि काही दिवस ते याचाच विचार करत राहतील याची पुरेपूर काळजी त्याने घेतली आहे. आणि हेच त्याचे मोठे यश म्हणावे लागेल.

चित्रपटात ज्या अनेक खगोलशास्त्रीय आणि भौतिकशास्त्रीय गोष्टी मांडण्यात आल्यात त्यांचे सखोल विश्लेषण वैज्ञानिक किप थोर्न यांनी त्यांच्या 'द सायन्स ऑफ़ इंटरस्टेलर' या पुस्तकात केलेले आहे. त्यापैकी काही खाली दिलेल्या आहेत.

वॉर्महोल :- एका आकाशगंगेमधून दुसऱ्या आकाशगंगेत जाणे हे जवळजवळ अशक्य आहे. याचे कारण म्हणजे तिथे जाईपर्यंत लाखो वर्षेदेखील कमी पडतील इतके प्रचंड अंतर. पण वॉर्महोल ही समस्या दूर करते. हे एक असे विवर आहे ज्याच्यातून आपण दुसऱ्या आकाशगंगेत काही मिनिटांत पोहोचू शकतो.या चित्रपटात वॉर्महोलच्या आधारे हा प्रवास दाखवला आहे.मात्र ही संकल्पना अजुन कागदावरच आहे आणि प्रत्यक्षात अमलात आणणे सध्यातरी शक्य नाही. याचे कारण म्हणजे वॉर्महोल नैसर्गिकरित्या बनत नाही. ते बनवावे लागते आणि मानवाकडे अजुन ते बनवण्याचे तंत्रज्ञान नाही. चित्रपटात मात्र "त्यांच्या" कडून (they) ते बनवल गेलय.

step1

गार्गेंच्वा :- हे दुसऱ्या आकाशगंगेतील एक अतिभव्य कृष्णविवर आहे ज्याच्याभोवती फिरणाऱ्या काही ग्रहांवर जीवसृष्टीसाठी पोषक वातावरण असेल अशी कूपर आणि त्याच्या टीमला आशा आहे. डॉ. ब्रॅण्ड यांना अनेक वर्षांपासून अडलेले समीकरण सोडवण्यासाठी आवश्यक असणारी माहिती प्रत्यक्ष गार्गेंच्वामध्ये प्रवेश केल्यास आपल्याला मिळू शकेल असा कूपरला विश्वास आहे पण आजवर कोणीही तिथे गेले नसल्यामुळे आत काय असेल याबद्दल सर्वच अनभिज्ञ आहेत आणि तिथे जाणे जोखमीचेदेखील आहे.(हा झाला कथेचा भाग पण प्रत्यक्षात कोणत्याही कृष्णविवरामध्ये मानवाचा प्रवेश होणे जवळजवळ अशक्य आहे. आणि झालाच तरी काही क्षणांतच प्रचंड गुरुत्वीय बलामुळे माणूस चहुबाजंनी खेचला जाऊन विचित्र आकाराचा बनून जाईल ज्याला spaghettification म्हणतात)

step1

वेळ आणि गुरुत्वाकर्षण :- एखाद्या ग्रहावरील गुरुत्वाकर्षण जितके जास्त तितकी तिथे वेळ सावकाशरीत्या पुढे सरकते. त्यामुळे पृथ्वीपेक्षा अनेक पटींनी जास्त गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव असलेल्या अशा एखाद्या ग्रहावरील एक तास म्हणजे पृथ्वीवरची 10 वर्षे असू शकतात. म्हणजेच समजा त्या ग्रहावर एखादा 25 वर्षाचा माणूस गेला आणि तिथे 10 तास राहिला तर तोपर्यंत पृथ्वीवर 100 वर्षे उलटून गेलेली असतील आणि त्याचे पृथ्वीवरील वय असेल 125. पण तरी तो दिसताना तरुणच दिसेल.

गुरुत्वाकर्षण समीकरण :- पृथ्वीवरील लोकांना संभाव्य नाशापासून रोखण्यासाठी त्यांना दुसऱ्या राहण्यायोग्य अशा ग्रहावर नेणे जरुरी आहे. पण इतक्या साऱ्या लोकांना तिथे घेऊन जाण्यासाठी आवश्यक असलेले स्पेस स्टेशन कसे बांधायचे हा मोठा प्रश्न असून त्यासाठी गुरुत्वकर्षणाशी संबंधित काही समीकरणांची उकल होणे आवश्यक आहे. आणि गेली अनेक वर्षे डॉ.ब्रॅण्ड अविरत ते सोडवण्याचा प्रयत्न करतायत.

अर्थात या सर्व गोष्टी चित्रपटाला केंद्रस्थानी ठेऊन पुस्तकात मांडण्यात आल्यामुळे त्याचं विश्लेषणदेखील त्याचप्रकारे केल गेलय. आणि यातील अनेक गोष्टी प्रत्यक्षात येणे हे सध्याच्या वैज्ञानिक कक्षा पाहता अशक्यच आहे. पण मुळात कथा ही भविष्यकाळातच घडत असल्याने त्यावेळी या सर्व गोष्टी माणसाने विकसित केल्या असतील असे मानण्यास वाव राहतो.

सायन्स फिक्शन आणि त्यातून परग्रहाशी संबंधीत म्हणजे चित्रविचित्र चेहरा आणि आवाज असलेले परग्रहवासी, त्यांनी पृथ्वीवर केलेले हल्ले , किंवा आपण त्यांच्या ग्रहावर जाऊन केलेले हल्ले, वरुन आपोआप पडणारे आगीचे गोळे आणि जमिनीवर पडणारे खड्डे, मोठमोठी राक्षसासारखी यंत्रे आणि यानं, अशाच काही संकल्पना आपल्या मनात येतात.पण इंटरस्टेलर पाहताना सुरुवातीच्या काही मिनिटांतच आपल्या सर्व पूर्वग्रहांना तडा जातो आणि हे वेगळच रसायन आहे याची खात्री पटते. इथे आपल्याला दिसणारा पृथ्वीचा नाश धड़की भरवणारा नाही पण उगाचच भविष्यकाळाबद्दल अनामिक भीती निर्माण करणारा आहे. सध्याचे ग्लोबल वार्मिंग, पाणीटंचाई, प्रदूषण हे उद्या पृथ्वीवर अशाच काहीशा परिस्थितीला कारणीभूत ठरतील का असा विचार एकदातरी मनात आल्यावाचून राहत नाही. परतीची कोणतीही शाश्वती नसताना निव्वळ आशेच्या बळावर एका संपूर्ण वेगळया विश्वाच्या शोधात निघालेल्या कूपर आणि त्याच्या साथीदारांच्या मनातील हुरहूर आपल्यालादेखील नकळत जाणवतेच. इंटरस्टेलरच्या या अखंड प्रवासात भव्यतेसोबतच एक वेगळेच सतत सोबत करणारे गूढ़ वातावरण आहे. अनेक प्रसंगांमध्ये जाणवणारी नीरव शांतता मनाला विचलित करणारी आहे. त्याचबरोबर विविध ग्रहांवरील कूपरचा प्रवास हा खरोखर अदभुत् आणि उत्कण्ठावर्धक आहे. या प्रवासात अनेक रहस्य आहेत. आणि समोर येणारे प्रत्येक रहस्य हे सर्वार्थाने वेगळे आहे. कधी भ्रमनिरास करणारे तर कधी नवी प्रेरणा देणारे.आणि या सर्वाला सुरेख पार्श्वसंगीताची जोड़देखील आहे. यात धांगड़धिंगा नाही, हाणामारी नाही अतिरंजित प्रसंग नाहीत.आहे तो फक्त प्रवास.अनेक आव्हानांनी भरलेला, अपयश देणारा आणि अपयशाचे दुःख करण्याइतका वेळदेखील न देता यशाच्या दिशेने वाटचाल करण्यास भाग पाडणारा. बळ देणारा. प्रवास
चित्रपट वैज्ञानिकदृष्टया जितका परिणामकारक आहे तितकाच तो भावनिकदृष्टया संवेदनशील आहे. मर्फ आणि कूपर यांच्यातील बाप-मुलीचे हळुवार नाते तसेच अमिलिया आणि कूपर यांच्यातील निखळ आणि घट्ट मैत्री दर्शवणारे अनेक प्रसंग अतिशय सुरेख आहेत. आणि यांच्यामुळे चित्रपट भावनिकदृष्टया एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचतो. जवळजवळ तीन तास चालणारा हा सिनेमा थोडासा लांबलाय असे काहींचे मत आहे.यात तसे तथ्य असले तरी दिग्दर्शकाच्या मनात चित्रपटात नेमकं काय सांगायचय याविषयी कोणताही संभ्रम नसल्यामुळे आणि तो बनवण्यामागील हेतू स्पष्ट असल्यामुळे रसिकांसाठी चित्रपटाची लांबी हा फार मोठा अडसर ठरत नाही.

अस्सल विज्ञानपटप्रेमी प्रेक्षकांसाठी खरोखर पर्वणी असलेला इंटरस्टेलर कधीच निराश करत नाही. यात दाखवलेल्या आणि आजवर केवळ पुस्तकांत सिद्ध झालेल्या अनेक गोष्टी खरोखर अमलांत येणे शक्य आहे काय ? किंवा पृथ्वी भविष्यात खरोखरच नष्ट होण्यासारखी परिस्थिती उदभवेल काय ? जर झाली तर या पुस्तकी सिद्धांतांचा प्रत्यक्षात काहीतरी उपयोग होईल काय? या खूप दूरच्या गोष्टी आहेत आणि याचे उत्तर कदाचित येणारा काळच देऊ शकेल पण चित्रपटाच्या शेवटी मात्र अनपेक्षितपणे जेव्हा सर्व समस्यांचे निराकरण होते तेंव्हा का कोण जाणे पण आपल्या सृष्टीला मरण नाही या भावनेने आपण असेच हुरळून जातो आणि चित्रपट संपल्यानंतरदेखील एका वेगळ्याच विश्वात तरंगत राहतो आणि त्यातून बाहेर कधी येतो? कोण जाणे. कदाचित याचे उत्तरपण काळच देऊ शकेल. नाही का?

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

चित्रपटाचा रोचक परिचय.
अधिक परिच्छेद व काही व्याख्यांचे शब्द 'बोल्ड' करणे वगैरे संस्करण केले (आवश्यक वाटल्यास चित्रेही डकवली) तर लेखन अधिक वाचनीय होईल

शुभेच्छा आणि ऐसीवर स्वागत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद.परिच्छेद वाढवलेले आहेत. पण बोल्ड करताना काही तांत्रिक प्रोब्लेम येत आहे. चित्रे टाकायचा प्रयत्न नक्की करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपादन करून काही शब्द बोल्ड करून दाखवले आहेत. त्याच प्द्धतीने इतरही हवे ते करता येतील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इंटरस्टेलर मला फारसा आवडला (किंवा समजला) नव्हता. पण नोलानचे इतर चित्रपट विशेषतः बॅटमॅन मालिका खूप आवडतात. तुमचा लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंटरस्टेलरमधील भौतिकशास्त्राबद्दल किप थोर्न आणि नोलनची चर्चा इथे सापडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

वॉर्महोल नाही. वर्महोल. चित्रपट अचाट असूनही तद्दन पॉप्युलिस्ट आहे. वैताग आला. तो कूपरचे काम करणारा नमुना कोण आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0