अखेर नियती नमली

अवंतिकाबाई बळवंतराव देशपांड्यांच्या चैतन्यचं आज लग्नं होतं. चैतन्य हा अवन्तिकाबाईंचा दुसरा
मुलगा. दोन मुलं नि माहेरवाशीण म्हणवून घ्यायला एक मुलगी, असं आदर्श कुटुंब होतं त्यांचं. देवानी
त्यांना सारं काही भरभरून दिलं होतं. त्या सगळ्या वैभवाचा त्या चवीचवीनं उपभोग घेत होत्या. कशा-
-कशाची म्हणून उणीव नव्हती त्यांच्या संसारात.

अवंतिकाबाई एका प्रथितयश व्यावसायिकाची पत्नी होत्या. एक कल्पक इंजिनिअर म्हणून त्यांच्या यजमानांचा नावलौकिक होता. शहरातल्या सर्वोत्तम भागात त्यांचा मोठाथोरला बंगला होता. बंगल्याभोवती सुंदर बागबगीचा होता. अवन्तिकाबाईंना सगळ्याची हौस होती, बागेचीही बरीच माहिती होती. माळ्य़ाकडून त्या सगळं हवं तसं करून घेत असत. त्यांची फुललेली बाग हा त्यांच्या अभिमानाचा विषय होता. तसा बऱ्याच गोष्टींचा अभिमान (थोडा गर्वच म्हणानात) त्यांना होता. अगदी आपल्याला दोन मुलं आणि एकुलती एक मुलगी आहे याचा सुद्धा.

त्यांचा शब्द झेलायला घरात भरपूर नोकर चाकर तर होते. त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्यांचे क्वार्टर्सही
शेजारालाच होते. तिथे त्यांच्या कृपाछत्राखाली राहणारे साधेसुधे लोकही आनंदानी त्यांचा शब्द झेलायला सदैव तयार असत. कारण त्यांना आपल्या मालक मालकीणीबद्दल आदर नि जिव्हाळा होता. अवन्तिकाबाईंनी काही म्हणायचाच अवकाश की पेंडश्यांची कुसुम, काळ्यांची शशिकला नि आणखीही कोणी कोणी त्यांच्याकडे
आपणहून हजर व्हायच्या, नि अवंतिकाबाईंची कामं अलगद होऊन जायची. ह्यात कोणतीही जुलूम जबरदस्ती
नव्हती; हा सारा खुषीचाच मामला होता, कारण अवंतिकाबाई व बळवंतराव यांच्याबद्दल लोकांच्या मनात प्रेमयुक्त आदर होता.

आज त्यांच्या सुखी आणि संपन्न संसारावर सोनेरी कळस चढणार होता. मोठ्या मुलाचं, मकरंदचं लग्नं होऊन दोन वर्षं झाली होती. मधुराणी, त्यांची पहिली वाहिली सून, आज प्रत्येक गोष्टीत जातीनी लक्षं घालीत होती. जबाबदारीनी प्रत्येक गोष्टं नीट होतेय की नाही ते बघत होती. मधुराणी एका नामवंत डॉक्टरांची, डॉ. परांजप्यांची मुलगी. अवंतिकाबाईंना ती त्यांच्या एका मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नात दिसली; आणि त्यांच्या मनावर तिची जबरदस्त मोहिनी पडली. यजमानांना सांगून त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलासाठी मकरंदसाठी तिला रीतसर मागणीच घातली.

डॉ परांजपे हे स्वत:ही एक कुशल डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. समाजात त्यांना भरपूर प्रतिष्ठा होती. तरीही त्यांच्या मुलीला - मधुराला कारखानदार देशपांड्यांच्याकडून मागणी आली, या गोष्टीनी अख्खं घरंच हरखून गेलं होतं. तरीही डॉक्टरांनी मधुराला “तिची संमती आहे का?” असं विचारलं. तिनं नाही म्हणावं असं उणं दुणं त्या स्थळात काही नव्हतंच मुळी. नाही म्हणायला मकरंद नुसता B A होता. पण त्याला कुठे नोकरी मिळवायला जायचं होतं. तो आत्ताच वडिलांबरोबर कारखान्यात जात होता; नि कारखान्यातल्या सर्वांनीच त्याला छोटे मालक म्हणून मान्यताही दिली होती. बघता बघता परांजप्यांची मधुरा मकरन्दची मधुराणी झालीही. पहिली वाहिली सून, शिवाय अवंतिकाबाईंच्या खास पसंतीची, म्हणून तिच्या सासऱ्यांनी, बलवन्तरावांनी भर मांडवात मकरन्दला सांगितलं की तिच्या नावात फक्तं ‘णी’ वाढव; नि मकरन्दनीही वडिलांच्या शब्दाचा मान राखत, मोठ्या खुषीनी आपल्या नव्या नवेल्या गृहस्वामिनीचं नांव मधुराणी ठेवून तिला राज्ञीपद प्राप्त करून दिलं होतं. मधुराणीच्या नावातच माधुर्य होतं असं नाही तर तिच्या वागण्या बोलण्यातही माधुर्य होतं. कंपनीच्या आवारातल्या लोकांना तर मधुराणी एक आदर्श सून वाटायची.

अवंतिकाबाईंची मुलगी - सुखदानी मात्रं शिक्षणात गती दाखवत MBA केलं होतं. गावातल्याच एका प्रतिष्ठित
व्यावसायिकाची ती पत्नी होती. तिचे पती श्री विवेक करंदीकर , यांच्या कपड्याच्या ३-४ गिरण्या गावातच होत्या. त्यांच्या कंपन्यांमध्ये जवळजवळ २ ते २.५ हजार माणसं काम करीत असत. एकूण करंदीकरांचं खटलंचं मोठं होतं. सुखदा तिच्या संसारात आणि कंपनीच्या कामात अगदी रमून गेली होती. तिचे सासरे तिला कौतुकानी “ दुहिते - सुखदे “ अशा जोड-नांवानीच हाक मारीत असत. कारण सुखदाचं वागणंच तसं आंखीव - रेखीव असायचं. कुणालाही न दुखावता कसं वागायचं हे सुखादाकडून शिकावं असं तिच्या सासूबाई सुद्धा म्हणायच्या. अशी ही दोन्ही घराण्यांच्या नांवलौकिकात भर घालणारी सुखदा तर अवंतिकाबाईंचा मानबिंदू होती.

अशा या सुखादेच्या धाकट्या भावाचं, चैतन्यचं आज लग्नं होतं. पैठणी नेसलेली, दागदागिन्यांनी मढलेली,सुखदा करवली म्हणून साऱ्या मांडवभर आल्यागेल्यांची वास्तपुस्त करीत सगळ्यांची दखल घेत होती. आजचा विवाह अत्यंत थाटामाटानी साजरा होत होता. अशा या वैभवसंपन्न घरात आज अवंतिकाबाईंच्या दुसऱ्या सुनेचं - पौर्णिमेचं आगमन झालं नि जणु सोनिया सुगंधु आला. आज अवंतिकाबाईंच्या जबाबदाऱ्यांची पूतर्ता झाली होती.

घर तसं खानदानीच! घरात दोन दोन सुना नांदत असूनही नाखुषीचा - नाराजीचा सूर कधी घराबाहेर गेला नाही; हे अवन्तिकाबाईंच्या सांसारिक यशाचं गमक मानता येईल. बघता बघता मकरंदला दोन मुलं झाली. अमोल आणि अजय यांच्या बाललीलांमध्ये अवंतिकाबाई अगदी रमून गेल्या. संसार प्रवाह रुंदावत पण खळखळत वाहत होता. “ मज काय कमी या संसारी “असं सुरेल गीत गात अवंतिकाबाई जीवनाचं भरजरी वस्त्र विणीत होत्या. पण या भरजरी वस्त्राची जर मात्रं जरा जास्तीच बोचणारी होती.

अवंतिकाबाई तशा वागायला बोलायला चांगल्या होत्या. स्वत:चा आब राखून वागायचं कसब त्यांच्याकडे होतं. पण स्वत:बरोबर लोकांचाही आब राखणं गरजेचं असतं याची फारशी जाणीव त्यांच्यापाशी नव्हती ; आणि तशी जाणीव निर्माण होण्याची कपर्दिकही शक्यता नव्हती. कारण या त्यांच्या वैभावयुक्त साम्राज्यावर त्यांची अनियंत्रित सत्ता होती. त्यांना विरोध करणारं नव्हतंच कोणी! बळवंतराव त्यांच्या व्यवसायात आकंठ बुडालेले . दोन्ही मुलं आज्ञाधारक या सदरात मोडणारी; आणि सासर - माहेरी कौतुकात न्हात असलेली मुलगी; या सगळ्यात विरोध हा शब्द म्हणजे सुद्धा विरोधाभासच. भोवतालचा सारा लवाजमा त्यांच्याच कृपाछत्राखाली नांदणारा; शिवाय त्यांच्या सुखदु:खाची -अडल्यानडल्याची जाण अवंतिकाबाई ठेवीत असतच. मग त्यांना विरोध करायला उरलं तरी कोण? आणि आपण केव्हढ्या उच्च स्थानावर आहोत याची पुरेपूर जाणीव अवन्तिकाबाईंना होतीच.

सुनांचे सणावर, लेकीची आणि मोठ्या सुनेची बाळंतपणं, नातवंडांचं, आगमन, त्यांची बारशी, वाढदिवस या धामधुमीत ७ / ८ वर्षं कशी निघून गेली ते कुणाला कळलं सुद्धा नाही. नियती येऊ घातलेल्या वादळाचे इशारे देत होती; पण त्याकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला होता!

खरं तर कंपनीचं व्यवस्थापन आता बळवंतरावांकडून हळूहळू मुलांच्या हातात जायला हवं होतं. काहीतरी चुकत होतं खरं! मकरंद आणि चैतन्य दोघंही व्यवस्थापन कौशल्यात तितकेसे निपुण नव्हते, हे आता जाणवायला लागलं होतं. त्याकरता काय करायला हवं, ते उमजत नव्हतं. कामगार वर्गाचं मन सांभाळून त्यांच्याकडून योग्यं रीतींनी काम करून घेण्याचं कसब दोघांजवळही नव्हतं. नि वयामुळे पूर्वीसारखा बळवंतरावांचा “ एकछत्री ” कारभारही चालू शकत नव्हता. मुलांच्या मदतीची बळवंतरावांना गरजच होती. पण मुलांना मात्र आता बळवंतरावांचा हस्तक्षेप नको होता.

खेदाची गोष्ट म्हणजे मुलांना आपली अडचण होते आहे ही गोष्टं बळवंतरावांच्या कधीच लक्षात आली होती. पण मुलाचं व्यवस्थापन कौशल्यं त्यांच्या कसोटीला उतरत नव्हतं; त्यामुळे सगळे व्यवहार मुलांच्या हाती सोपवायला त्यांचं मन तयार होत नव्हतं. आपण आता निवृत्ती स्वीकारायला हवी ही गोष्टं मनाला पटली तरी व्यवहारात: ते
निवृत्ती स्वीकारु शकत नव्हते. तसं करण्याने होणारा भविष्यातला विनाश त्यांच्या डोळ्यांना आताच दिसत होता. पण त्यावर इलाज काय ते त्यांना उमजत नव्हतं.

बरं हे अवघड जागचं दुखणं! सांगणार तरी कोणाला? त्यांनी मुलांशी बोलायचं प्रयत्न केला; पण मुलांना त्यांचे विचार मागासलेले वाटले. मुलं सर्व व्यवहार हाती घ्यायला अगदी आसुसलेली होती. शिवाय कोणाचा सल्ला घेऊ म्हटलं, तर ते मुलांच्या कानापर्यंत जाणारच होतं. बळवंतराव वाईट रीतीने कोंडीत सापडले होते. त्यांच्या मनावरचा ताण दिवसेंदिवस वाढतच चालला होता. त्यातच घरातही काहीतरी बिनसतंय, खदखदतंय याची चाहूल त्यांना लागली होती. खरंतर आपल्या दोन्हीही सुना समजुतदार आहेत, असं त्यांचं मत होतं. आता ८ / १० वर्षांनंतर त्यांनाही बऱ्यापैकी स्वातंत्र्य द्यायला हवं असंही त्याचं मत होतं. पण अवंतिकाबाई तसं करणार नाहीत याची त्यांना खात्रीच होती. त्यांनी एकदा अवन्तिकाबाईंशी बोलायचं प्रयत्न केला, पण ती बोलणी भलतीकडेच गेली, त्या बोलण्याचा काहीच उपयोग झाला नाही.

त्यांच्या धाकट्या चैतन्यचं लग्नं होऊन १० वर्षं झाली तरी अजून त्याच्याकडून नातवंडाचं आगमन झालं नव्हतं. अवन्तिकाबाईंच्या मनातून पौर्णिमा पूर्णपणे उतरली होती. चैतन्यचं दुसरं लग्नं करून द्यावं असले रानटी विचार त्यांच्या मनात घोंघावत होते. ही गोष्टं सुद्धा त्यांनी बळवंतरावांच्या कानावर घातली होती. पण बलवंतरावांना ती मान्य नव्हती. त्यामुळे अवन्तिकाबाईंचा नाईलाज झाला होता.

पौर्णिमेची संपूर्ण तपासणी डॉ परांजप्यांच्या दवाखान्यात केली होती; तिच्यात कुठलाही दोष नव्हता. पौर्णिमेच्या वडिलांनी आता चैतन्यचीही तपासणी करून घ्यावी असं हळूच सुचवलं होतं; पण त्याला अवन्तिकाबाईंची तयारी नव्हती. “ पुरुषांच्यात का कुठे दोष असतो? “ असं त्यांचं ठाम मत होतं; आणि चैतन्यच्या अंगात आईविरुद्ध जाण्याची धमक नव्हती. त्यामुळे कितीही पटत असलं तरी तो दवाखान्यात जाऊन स्वत:ची तपासणी करून घेऊ शकत नव्हता. आईचा राग त्याला माहीत होता; त्यामुळे तो याबाबतीत आईशी बोलायला धजत नव्हता. त्यामुळेच त्या एकमेकांवर अतिशय प्रेम करणाऱ्या जोडप्यामध्ये आता दुरावा निर्माण झाला होता.

इथंच खरंतर कुरबुरीला सुरवात झाली होती. तपासणी करून पुढचा काहीतरी मार्ग काढावा असं पौर्णिमेला वाटत होतं. चैतन्यमध्ये दोष आहे असं निघालं असतं तरी सरळ मनानी ते सत्य स्वीकारण्याची पौर्णिमेच्या मनाची तयारी होती. आधुनिक वैद्यकीय उपचार करायची किंवा मूल दत्तक घेण्याची तिच्य मनाची तयारी होती. कारण ही गोष्ट देवदत्त आहे, असा दोष आपल्यातही निघू शकला असता हे तिला माहीत होतं. पण तिच्या या व्यावहारिक विचारांना अवंतिकाबाईंच्यालेखी काहीच किंमत नव्हती. घरातला मोकळेपणा नाहीसा झाला होता.

बळवंतरावांच्या नजरेला पौर्णिमेची होणारी कुचंबणा दिसत होती. पण त्यावरचा इलाज त्यांच्या हातात नव्हता. दोन्ही बाजूंचे ताणतणाव बळवंतरावांना सहन झाले नाहीत. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला; आणि त्यांना हृदयविकाराचा पहिला झटका आला. अवन्तिकाबाईंच्या अनभिषिक्त साम्राज्याला पहिला तडा गेला; आणि जणु नियती आणि अवंतिकाबाई यांच्यात हारजीतीचा खेळच सुरु झाला. नियतीनी त्यांना धक्क्यावर धक्के दिले पण अवंतिकाबाई , नमल्या नाहीत.

आता मकरंद आणि चैतन्य नियमितपणे कंपनीत जाऊ लागले. पण तिथल्या घडी बसलेल्या व्यवस्थापनाशी जुळवून घेणं त्यांना जमेना. आतापर्यंत बळवंतराव स्वत: हजर असल्यामुळे हे विरोध झाकले जात होते; ते आता राजरोस उघड होऊ लागले. कंपनीतली अशांतता कळत नकळत वाढत होती. स्वत:च्या आत्मसन्मानाच्या विळख्यात अडकलेले मकरंद आणि चैतन्य , प्रस्थापित व्यवस्थापनाला जुमानीतनासे झाले -- आणि कंपनीत कधीही बोलल्या न गेलेली संपाची भाषा बोलली जाऊ लागली. गोष्टी इतक्या हाताबाहेर गेल्या की कामगारांच्या मनातला बळवंतरावांबद्दलचा प्रेमादर ही संपाची भाषा थांबवू शकला नाही.

या सगळ्या गदारोळामागचं कारण व उपाय समजण्याची कूवत मधुराणीमध्ये होती. ती ही दुरून दुरून का होईना पण बळवंतराव कारखान्याचं व्यवस्थापन कसं करतात ते चौकस नजरेनी टिपत होती. त्यामुळे कंपनीत
अशांतता माजून त्याचा उत्पादनावर परिणाम होतो आहे असं कानावर आलं, तेव्हां तिने “ मीही रोज कंपनीत येते आपण सर्वजण मिळून या आपत्तीला तोंड देऊया, “ असं सुचावताच मोठ्ठा स्फोट झाला.

“आमच्या पुरुषांनी अजून बांगड्या भरल्या नाहीत हातात; तुमची काय अक्कल आहे ती स्वत:पुरतीच मर्यादित ठेवा; ती कारखान्यात किंवा घरात चालविण्याची गरज नाहीये. माझी मुलं कारखाना चालवायला नि मी स्वत: घर चालवायला अगदी समर्थ आहोत.” असं अवन्तिकाबाईंनी सुनांना अगदी ठणकावून सांगितलं; नि तो विषय तिथेच संपला. मर्यादेत वागणाऱ्या सुना मनात असुनही पुढे काही बोलल्या नाहीत. पण यातून आपण काही शिकायला हवं आहे, असं अवंतिकाबाईंना वाटलं नाही. काळ कुठे चालला आहे, याच त्यांना भानच नव्हतं. नियती त्यांना काही सांगू पाहत होती, पण ते समजून त्यावर विचार करायची गरज अवंतिकाबाईंना नव्हतीच.

इकडून तिकडून, चार वेळा जेंव्हा पौर्णिमेच्या कानावर चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाची गोष्टं आली, नि आपलं अस्तित्व हाच त्यातला अडथळा आहे, हे ही तिने ऐकलं; तेंव्हा तिनी चैतन्यला “या बाबतीत तुझं काय मत आहे?” असं सरळच विचारलं. आईबाबांच्या सांगण्याप्रमाणे वागतांना स्वत: स्वतंत्रपणे विचार करायचा असतो, आपली स्वत:ची काहीतरी ठाम मतं असायला हवीत, याची जाणीवच त्याला नव्हती. आपल्या संसारातले निर्णय आपण स्वत: घ्यायला हवेत हे त्याच्या गावीही नव्हतं. त्यामुळे त्यांनी काहीतरी गुळमुळीत उत्तर दिलं. परिणामत: पौर्णिमा माहेरी निघून गेली; पुढच्या पंधरा दिवसात तिची घटस्फोटाची नोटीसही आली. कारण ह्या पंधरा दिवसात चैतन्यने तिला भेटण्याचा काहीसुद्धा प्रयत्न् केला नाही.

अवंतिकाबाईंना तर सुंठीवाचून खोकला गेला असंच वाटलं. त्यामुळे त्यांनी तिची दखलच घेतली नाही. आईने काही सांगितल्याशिवाय चैतन्य काहीच करत नसे. त्याला पौर्णिमेला भेटायची, घरी परत बोलावण्याची फार इच्छा होत होती; कारण पौर्णिमेत काही दोष नाहीय हे़ त्याला पटत होतं. दोष असला तर तो आपल्यातच असणार, पण आपलं न्यून उघडं पडू नये म्हणून केवळ आपली आई आपली टेस्ट करायला विरोध करते; हे त्याला चांगलंच समजत होतं; आणि आता आपण बोललो नाही तर आपला संसार मोडल्यात जमा आहे हे ही त्याला कळत होतं. पण हे आईला कसं पटवून द्यायचं, असा प्रश्न त्याला पडला होता. आईच्या दडपणानी तो मनातले विचार बोलू शकला नाही; आणि शेवटी त्याला जी भीती वाटत होती तेच घडलं. गोष्टी घटस्फोटापर्यंत येऊन ठेपल्या. दोन्ही बाजूंना एकत्र येणं नकोच होतं, त्यामुळे दोन्हीही पक्ष अटीतटीनी केस चालवत होते. पौर्णिमा तर झाल्या प्रकारानी विटली होती; आणि आईच्या मनाविरूध्द पौर्णिमेला परत घरी आणण्याची ताकद चैतन्यजवळ नव्हती. थोड्याच दिवसात घटस्फोट झालाही. चैतन्य अगदी निराश होऊन गेला. त्याचं पौर्णिमेवर फार प्रेम होतं. नाही म्हटलं तरी दहा वर्षांचा सहवास. पौर्णिमा होतीही तशीच. अगदी पौर्णिमेच्या चांदण्यासारखी शीतल तरीही सुंदर.

चिरेबंदी इमारतीचा एक चिरा निखळला होता पण अवंतिकाबाईंनी हे काही आपल्यामुळे घडलं असं मनाला लावून घेतलं नाही. आज घटस्फोट झाला की उद्या चैतन्यचं लग्नं होईल असं त्यांना वाटायचं. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. चैतन्य एकटा पडला. ही अवंतिकाबाईंसाठी नियतीनी दिलेली दुसरी धोक्याची घंटा होती; पण त्यानी त्यांच्या आत्मासन्मानाला कुठलाही धक्का पोहोचला नाही. स्वत:च्या “ मी “ पणाच्या धुंदीत त्या खूषच होत्या. हा त्यांना पौर्णिमेचा पराभव वाटला होता. वर्षभरात पौर्णिमेचं दुसरं लग्नं झालं सुद्धा. हा आपलाच पराभव आहे हे त्यांच्या गावीही नव्हता. मनानी दुबळा असलेला चैतन्य आणखीनच खचला.

घटस्फोट आणि कंपनीतला संप दोन्हींची वेळ एकच आली. कारखान्यात संप झालाच. उत्पादन बंद पडलं. दोन्ही भावांनी आपापल्यापरीनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण त्या असंतोषावर नियंत्रण मिळवणं त्यांना शक्यं झालं नाही. परिणाम व्हायचा तोच झाला, कारखाना बंद पडला. यावेळीही हे सगळं का घडतं आहे, याचा वस्तुनिष्ठ विचार न करता, अवन्तिकाबाईंनी वेगळाच सूर लावला. त्या म्हणायला लागल्या की मधुराणी घरात आली आणि त्यांनतर सगळं वाईटच घडायला सुरवात झाली.

लग्नानंतर १० / १२ वर्षांनी मधुराणीच्या पायगुणाची चर्चा सुरु केली त्यांनी. दुसऱ्यांना अशी दूषणं देऊन स्वत:चं अपयश लपवताही येत नाही आणि ते नाहीसंही होत नाही, हे लक्षात येउन सुद्धा, मकरंद मधुराणीला यातून वाचवू शकला नाही. घरात सतत तीच चर्चा चालायची. ते ऐकून ऐकून मधुराणी सैरभैर झाली. मकरंदमध्ये आपल्याला वाचवण्याचं बळ नाही हे ती जाणून होती. मग बघणार तरी कोणाकडे! बळवंतराव तर असहाय होऊन पडले होते. कोणी त्यांचा अपमान करत नव्हतं; पण कोणी त्यांना काही विचारतही नव्हतं. अधु होऊन बिछान्याला खिळलेले बळवंतराव आढ्याकडे नजर लाऊन बसलेले असत. मधुराणीला सगळ्यांबद्दलच प्रेम होतं; आपण अजूनही या परिस्थितीवर मात करून, सगळं मार्गी लाऊ शकू असा आत्मविश्वास तिला होता. पण घरातल्या माणसांना विनाशच हवा होता. तिनीही आपल्या माहेरचा रस्ता धरला. रीतसर घटस्फोट घेतला. तिला तिच्या मुलांचा ताबा न देण्यातच अवंतिकाबाईंनी स्वत:ची जीत मानली.

“या सगळ्या अवनतीला कळत नकळत आपणच जबाबदार आहोत, आपलंच काहीतरी घोर चुकलं आहे, आई म्हणून - कुटुंबप्रमुख म्हणून आपण कुठेतरी कमी पडतो आहोत,” असले विचार त्यांच्या मनात कधी आलेच नाहीत. सगळ्या चुकांचा भार नशिबावर आणि सुनांच्या पायगुणावर टाकून त्यांनी स्वत:ला कमलदलाप्रमाणे सगळ्यातून अलिप्त ठेवलं. स्वत:चं मोठेपण त्यांनी स्वत:जवळ तरी टिकवून ठेवलं होतं. मग जग काही का म्हणेना!

सुना तर निघून गेल्या!

आता दोन अपयशी मुलं, दोन आईविना पोरकी नातवंड, अंथरुणाला खिळलेले बळवंतराव आणि या साऱ्यांना आत्मविश्वासानी सांभाळणाऱ्या अवंतिकाबाई असा नवाच संसार सुरु झाला. मकरंद आणि चैतन्य आईच्याच पठडीत वाढलेले. ते आपलं अपयश मानायला अजिबात तयार नव्हते. सगळा दोष इतरांना आणि नशिबाला देऊन ते दोघंही निर्विकारपणे घरात स्वस्थ बसले होते. पण मन कुठे स्वस्थ बसू देतं! झाल्या प्रकारांनी मनोमन ते ही हबकून गेले होते. मनाची कुतरओढ चालूच होती. कुठेतरी आपल्या बायकांची आठवण मन पोखरून टाकत होती; आणि हे मान्य तर करायचंच नव्हतं. या कुतरओढीपासून वाचायला दारूसारखा उपाय उपलब्ध होताच की! नि पैसाही होता हवी तितकी प्यायला. दिवसरात्र दारू जवळ करून, ते दोघंही आपलं कसं काही चुकलं नाही याची चर्चा करीत बसत. आई होतीच जवळ आपल्या बछड्यांची पाठ थोपटायला. कारखाना बंद पडला या अपयशानी निराश झालेल्या मकरंद आणि चैतन्य दोघांनीही २ / ४ वर्षात मृत्यूला आपलंसं केलं.

मधली एक पिढीच गारद झाली. दोन शाळकरी मुलं, असून नसून सारखेच असलेले बलवन्तराव आणि स्वत: अवंतिकाबाई, असा संसाराचा नवाच सारीपाट अवंतिकाबाईंनी मांडला. त्या नातवंडांचं करण्यात रंगून गेल्या.
मुलांना वाढवतांना झालेल्या चुका नकळत टाळत अवंतिकाबाई नातवंड घडवत होत्या. जीवनव्यापी संकटांना तोंड देत देत त्या आपला संसार टुकीनी करीत होत्या. हळू हळू बळवंतराव सुद्धा काळाच्या पडद्याआड गेले. पण त्या कधीच डगमगल्या नाहीत. हरल्या नाहीत. त्या कधी डोळ्यातून टिपं गाळत बसल्या नाहीत. न त्यांना कधी कोणाकडून दूषणं ऐकून घ्यावी लागली. या सगळ्या गदारोळात आपलं काही चुकलंय असं त्यांना कधीही वाटलं
नाही. सगळा दोष नियतीला देत त्या आत्मविश्वासानी परिस्थितीशी झगडत होत्या. ऊलट इतक्या म्हाताऱ्या वयात त्या नातवंडांचं चांगलं करताहेत, नि नातवंड चांगली शिकताहेत, याचं समाजात कौतुकच होत होतं.

या साऱ्या दुष्टचक्रात त्यांच्या मुलीनी मात्रं त्यांची साथ सोडली नाही. स्वत:चा संसार नि व्याप सांभाळीत तिने आईची पाठराखण केली. नातवंड शिकली नि नोकरीलाही लागली. त्यांनी त्यांच्या पसंतीनी लग्नंही केली. अनिशा आणि अमला या दोन नातसुनांना सांभाळत अवंतिकाबाई घरातलं सगळं करत / करवून घेत होत्या. काळ पुढे धावतच होता. नातवांचं कर्तुत्व बघून अवंतिकाबाई सुखावत होत्या.

होता होता, अनिशाला - मोठया नातसुनेला वीसनख्यांच्या आजाराची बाधा झाली. पणतु \ पणती येणार या कल्पनेनी अवंतिकाबाई हरखून गेल्या. अमलाला - धाकट्या सुनेला हाताशी घेऊन त्या अनिशाचे हवे \ नकोचे लाड पुरवायला लागल्या. सुगरण तर त्या होत्याच. अनिशाला त्यांच्याकडून खाण्यापिण्याचे लाड करून घ्यायचा संकोच वाटायचा. पण अवंतिकाबाई मागे हटल्या नाहीत. त्यांनी तिची इतकी छान बडदास्त ठेवली होती,
की एकदा अनिशाची आई म्हणाली सुध्दा त्यांना, की, “ माझ्याच्यानी सुध्दा तिची इतकी काळजी घेणं जमलं नसतं हो! आमचे नव्हते हो कोणी इतके लाड केले!”

अवंतिकाबाई नुसतं हसल्या. त्यांना म्हणाल्या तुम्हीही या चार दिवस इकडे राह्यला, आपण दोघी मिळून तिची हौस पुरवू या. विहीणबाईंना कोण अप्रूप वाटलं लेकीच्या आजेसासूचं. तिसऱ्या महिन्यात चोरचोळी झाली; सातव्यात त्यांनी मोठ्या दणक्यात तिचं डोहाळेजेवण केलं, नि मग तिला माहेरी पाठवलं. जातांना तिची कशी नि किती काळजी घ्यायची हे दोघींनाही पढवायला त्या विसरल्या नाहीत. अनिशाच्या आईला तर त्यांचं कौतुकच वाटलं.

नऊ महिने सरले आणि अवंतिकाबाईंची पणजीपदावर बढती झाली. पणतु झाला म्हणून हत्तीवरून साखर वाटायचीच बाकी ठेवली होती अवंतिकाबाईंनी बाळाचं बारसं ठरलं. आजीचा वाढदिवस दोन्ही नातवांच्या लक्षात होताच. यंदाच त्यांच्या वयाची शताब्दी पूर्ण होणार होती. बाळाच्या बारशाच्या दिवशीच त्यांच्या शताब्दीपूर्तीचा
सोहळा साजरा करायचं नातू - नातसुनांनी ठरवलं. फक्त या बेताचा पत्ता त्यांनी आजीला लागू दिला नाही. त्याबरोबर सोन्याची फुलं उधळायचा कार्यक्रमही होताच. नातवांनी आजीला छानशी साडी घेतली. पणत्वाचं नाव ठेवण्याचा मान अनिशानी आपणाहूनच पणजीबाईंना दिला. अवंतिकाबाईंनी बाळाचं नाव सुचवलं दीपंकर. अनिशानी बाळाचं नाव ठेवलं. आत्यानी झोका दूर लोटला. मग दीपंकरला पणजीबाईंच्या मांडीवर देण्यात आलं. व्याह्यांनी सोन्याची फुलं पणजीच्या डोक्यावर उधळली. त्यापाठोपाठ पांच सुवासिनींनी शंभर ज्योती
लावलेल्या तबकांनी त्यांना ओवाळलं. आता त्यांना नमस्कार करण्याकरिता जमलेल्या लोकांमध्ये अहमहमिका
लागली त्यांना नमस्कार करण्याची .

वयाची शतकपूर्ती झाली. तरीही त्या ताठ होत्या. घरातलं थोडंफार कामदेखील त्या करत. नातसुनांच्या माहेरी मात्र अवंतिकाबाईंचं फारच कौतुक होतं. सुनांशी ताठरपणे वागलेल्या अवंतिकाबाई नातसुनांना अगदी लाडानी वागवत होत्या. कदाचित सुना आणि त्या स्वत:, यांच्या वयातील अंतराचा हा परिणाम असावा.

नातवंड आणि नातसुना यांनी मिळून अवंतिकाबाईंच्या “ नाबाद शतकपुर्तीच्या ” कार्यक्रमाची धमाल उडवून दिली. अवंतिकाबाईंना अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. स्वत:च्या सुना सांभाळता आल्या नसल्या, तरी नातसुनांना हाताशी वागवत अवन्तिकाबाईंनी पाच सात वर्ष तरी संसार सांभाळलाच. एके दिवशी फार आजरीवगैरे न पडता त्यांनी मोठ्या नातवाच्या मांडीवर डोकं ठेवून या जगाचा निरोप घेतला. समाजानीही त्याच्या कर्तुत्वाची पावती दिली. मला वाटलं, -
‘नियतीनी त्यांना नमाविण्याचे आटोकाट प्रयत्न केले; पण शेवटी अवंतिकाबाईंनीच नियतीला नमवलं!’

अरुंधती बापट

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet