Skip to main content

.

.

समीक्षेचा विषय निवडा

श्रावण मोडक Sun, 05/02/2012 - 10:43

'सत्य' मिथ्याच असते. :)
लेखन भराभर वाचत गेलो. क्रमशः पाहून बरंही वाटलं, थोडा हिरमोडही झालाच.

राजेश घासकडवी Mon, 06/02/2012 - 07:57

पुन्हा पुन्हा वाचावं असं. सत्य आणि आपल्या विशिष्ट चष्म्यातून गाळून आलेलं त्याचं आकलन (परसेप्शन) यांची छान मांडणी केली आहे. वेगवेगळ्या चष्म्यांचे, काचांचे गुणधर्म सांगणारं. काचांचे रंग, त्यांचे बाक, त्यांमध्ये असणाऱ्या ऍबरेशन्स, त्यांची पारदर्शकता, त्यांवर चढणारी धूळ.... सगळ्या गोष्टींचा सांगोपांग आढावा घेणारं.

या चष्म्यांपलिकडे काही एका झगझगीत गोळ्याप्रमाणे अंतिम सत्य आहे का, जे उघड्या डोळ्यांनी पाहून त्यात विलीन होण्याचं ध्येय ठेवावं (जीएंच्या अनेक पात्रांप्रमाणे)? किंवा मर्ढेकरांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे, 'स्थिर वाटोळ्या तेजाचा क्षण' आहे का? ती दगडी भिवई कधी चळणार आहे का? का कुठचा ना कुठचा चष्मा बाळगणं हेच आपल्या प्राक्तनी आहे?

नगरीनिरंजन Mon, 06/02/2012 - 08:40

मुद्देसूद तर आहेच शिवाय दिलेली उदाहरणेही अत्यंत समर्पक आहेत.
सत्याचा शोध हा माणसाचा आदिमकाळापासूनचा ध्यास आहे. तो कधी पूर्ण होणार की राघा म्हणतात तसे कुठचा ना कुठचा चष्मा बाळगणं हेच आपल्या प्राक्तनी आहे?
पुढच्या भागाची वाट पाहत आहे.
(तारे दिले आहेत)

ऋषिकेश Mon, 06/02/2012 - 09:10

अहा! नजाकतीने केलेले सशक्त लेखन!
पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटावे असे!
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे हेच माझ्यापुरते सध्या सत्य आहे :)

ऋता Mon, 06/02/2012 - 14:22

लेखाचा विषय आवडला. सन्दर्भ फारच छान दिले आहेत. जि. एं च्या लेखनाच्या धाग्याबद्द्ल आभार.
लेखाचे शिर्‍षक विशेष आवडले नाही. लेख थोडा लांबीला कमी चालला असता.

पण एकूण छान आहे. अभिनंदन.

बिपिन कार्यकर्ते Wed, 08/02/2012 - 17:33

गेल्या काही काळात वाचलेल्यापैकी अतिशय उत्तम आणि श्रेष्ठ दर्जाचे लेखन. एखाद्या तत्त्ववेत्याच्या थाटात पण अतिशय सोपेपणाने मांडलेले. क्लिष्टता नाहीच. शब्दांचा फापटपसाराही नाही. उदाहरणे चपखल. निवांत वाचाण्यासाठी धागा इतके दिवस बाजूला ठेवल्याचे सार्थक झाले.

क्रमशः आहे पण आता 'राशोमोन' वगैरे बद्दल येते आहे का काय या जाणिवेने तो क्रमशः सुखावूनही गेला. पुढील भाग नियमितपणे यावेत (लवकर लवकर असं मुद्दाम म्हणत नाहिये).

सत्य हे खूपसं व्यक्तिसापेक्ष आहे किंवा कुमारांचं जे उदाहरण दिलेलं आहे किंवा जीएंच्या विदुषकाची वाक्यं दिली आहेत... त्या अनुषंगाने पुढे विचार करू जाता... सत्य प्रस्थापित करायची एकच एक पद्धती असू शकते का? एखादी घटना / विचार हा त्या पद्धतीच्या कसोटीवर न उतरणारा असेल तर ते असत्य ठरते का? ठरावे का? मूळात अशी एकच एक पद्धती असू शकते का? असावी का?

लेखमाला पुढे कशी जाते आहे हे अजून नीटसे कळत नाहीये. पण याही मुद्द्यांवर काही भाष्य आल्यास वाचायला आवडेल.

नंदन Thu, 09/02/2012 - 15:40

फार दिवसांनी जालावर विचार करायला भाग पाडेल, असा लेख वाचायला मिळाला. मुद्देसूदपणे केलेली मांडणी आणि समर्पक उदाहरणं ह्यामुळे अतिशय वाचनीय झाला आहे.

आपण खरंच सत्यान्वेषी असतो की सत्य नावाचे काहीतरी आपल्याकडे असायला हवे किंवा आहे या विचाराने भावनिकदृष्ट्या आश्वस्त होतो म्हणून आपण त्याबाबत आग्रह धरतो?

बरेचदा अमूक एक गोष्ट सत्य असावी असे आपल्याला वाटते तिला आपण सत्य मानून चालतो.

’सत्य हे कालातीत’ असते हे गृहितक, ते ही भ्रष्ट स्वरूपात - म्हणजे ’कालातीत ते सत्य’ या व्यत्यासाच्या स्वरुपात - वापरले जाते.

एखादी घटना घडून गेल्यानंतर त्या घटनेला साक्ष असलेली व्यक्ती त्याबद्दल सांगते तेव्हा तिचे निवेदन यथातथ्य असू शकते किंवा जाणीवपूर्वक सांगितलेले असत्यही. पण या दोन्ही शक्यतांपलिकडे भासमय सत्याची, खंडश: सत्याची तसेच अंशात्मक सत्याचीही शक्यता असू शकते.

प्रत्यक्ष निवेदन हे आपण प्रत्यक्षात जे पाहिलं त्या पेक्षा आपण जे पाहिलं असं आपल्याला वाटतं त्याबद्दल सांगू शकतं.

इतर शब्दांच्या संगतीचा आधार घेऊन आपला मेंदू काही रिकाम्या जागा भरून काढतो नि ही दुरूस्ती आपल्या दृष्टीने सत्याचा भाग होऊन जाते. ही व्यक्तीच्या आकलनशक्तीची एक मर्यादा आहे.

दंडवत!

किंचित अवांतर - कोलबेरच्या ट्रुथिनेस ह्या शब्दाची आठवण झाली.

मंदार Fri, 10/02/2012 - 22:25

In reply to by नंदन

सलाम आणि दंडवत!

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 11/02/2012 - 05:05

शांतपणे वाचण्यासाठी थांबले होते.

पुढच्या भागाची वाट पहात आहे. (एका लेखाची लांबी किंचित कमी करून, अधिक भाग टाकल्यास मलाही वाचताना, विचार करताना थोडं सोयीचं वाटलं असतं.)

धनंजय Sat, 11/02/2012 - 21:07

प्रस्तावना चांगली आहे. राशोमोन चित्रपट मला फार आवडतो.
जिथे आत्मसन्मान आणि भावना-हेतू पारखण्याचा गुंता होतो, तेव्हा "चक्षुर्वै साक्षी" हे प्रमाण मानण्यात अतिशय घोटाळा होतो. अशा गुंत्यात गुंतलेल्या व्यक्तींची चक्षुर्वै आठवण प्रामाणिकपणे वेगवेगळी असते. हे सर्व तर मला पटतेच.
(चित्रपटात एका गुन्ह्याचा प्राचीन काळातला खटला दाखवलेला आहे. झालेल्या घटनांबाबत गुंतलेले लोक अतिशय वेगवेगळी आख्याने देतात. पण चित्रपटाचा शेवट लक्षणीय आहे. लोकांची सत्ये वेगवेगळी म्हणून सर्वच काही निरर्थक-सापेक्ष होत नाही. कित्येक महत्त्वाच्या प्रसंगी कुठली क्रिया करावी, हा निर्णय सापेक्ष नसून सुस्पष्ट असतो, असे दाखवले आहे.)

जीएंच्या कथांचे संदर्भ देऊन केलेली चर्चा ओघवती आणि वाचनीय आहे.

- - -

परंतु लेखातील सुरुवातीचा "भंडारा" दाखला वेगळा मुद्दा आहे. नव्हे त्यातही (कमीतकमी) चार वेगवेगळ्या मुद्द्यांची सरमिसळ झाली आहे. (मला वाटते, की विचारप्रयोगांत तरी अशी सरमिसळ टाळावी.)
१. "क्वालिया" : हा काळा नि तो पिवळा असे सर्वांना ते सारखेच दिसतात काय, ...
२. संवेदनांची भेदक्षमता (perceptual discrimination) वेगवेगळे असणे : मी आंधळा... शहाणा देवमाणूस आहे. त्याचे डोळे निराळेच आहेत. त्याला शंभर रंग दिसतात.
३. सारांश/एकगठ्ठा संकल्पनांबाबत मतभेद : शहाणा देवमाणूस आहे. त्याचे डोळे निराळेच आहेत. त्याला शंभर रंग दिसतात.
वेगवेगळ्या तपशिलवार फरकांना एकगठ्ठा करायचे की नाही, यात मतभेद असतात. काही लोकांना दोन गोष्टींमधला भेद "त्या दोन असमान आहेत" असे म्हणण्यालायक वाटतो. पण तरी प्रत्येक संवेदनेला वेगळे म्हणत नाही. बहुतेक लोक अगणित संकल्पना मानत नाहीत, काही सारांश/एकगठ्ठा करतातच. यात हा शाहाणा देवमाणूससुद्धा १००च रंगांची नावे ठरवतो.
मला खुद्द बाजूबाजूला कापडाचे तागे ठेवले, तर शंभराहून वेगळेवेगळे रंग दिसतात. तरी मी स्वतः शंभरापेक्षा खूपच कमी रंगांची नावे वापरतो. "हा पिवळा त्या पिवळ्यापेक्षा वेगळा आहे." असे मला जाणवते. पण त्या दोघांना "पिवळा" शब्दात मी एकगठ्ठा करतो. इतकेच काय, मला कळणार्‍या वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या संकल्पनांत एकगठ्ठा करतो. मंदाग्नीवर तेलात तळलेल्या कांद्याचा रंग काय? इंग्रजीमध्ये मी "brown" म्हणतो ("pink" म्हणत नाही). मराठीमध्ये मी "गुलाबी" म्हणतो (मातकट/कॉफीकलर म्हणत नाही). मात्र एखाद्या फुलाचा रंग मराठीत "गुलाबी" आणि इंग्रजीत "pink" म्हणून सांगतो. आणि कॉफीपूड मराठीत "कॉफीकलर" आणि इंग्रजीत "brown" म्हणून सांगतो.
४. पूर्वानुभव समान असण्याचा समाजातील व्यवहार्य समज : (हा मुद्दा थेट कथेत नाही, पण तो दुर्लक्षिल्यामुळेच कथेत वैचित्र्य निर्माण झाले आहे). रामाणाचा बहुधा असा अनुभव आहे, आपण ज्या परिस्थितीत "पिवळा" हा शब्द वापरतो, आपली भाषा बोलणारेसुद्धा "पिवळा" हाच शब्द वापरतात. समोरचा माणूस याच भाषा-समाजातला आहे, आणि त्यालाही आपल्यासारखाच अनुभव आलेला आहे, असे गृहीतक कित्येकदा व्यवहार्य असते. आणि कधीकधी चुकते. पण "आपण एका भाषासमाजाचे नाही, किंवा उपसमाजाचे नाही" हे समजले, तर मग गोष्ट "सत्य म्हणजे काय?" अशी गहन राहात नाही. मला पूर्वी "चिंतामणी" नावाचा रंग असतो, हे माहीत नव्हते. पहिल्यांदा कोणी चिंतामणी रंगाबाबत बोलू लागल्यावर माझा रामण्णासारखाच गोंधळ झाला. आम्ही दोघे मराठीभाषकच असलो, तरी "चिंतामणी" या ध्वनीचा संदर्भ काय, याबाबत आमचे पूर्वानुभव वेगवेगळे होते. हे समजताच सर्व ठीक झाले. आणि हा प्रसंग पुढच्या आयुष्याकरिता माझ्या पूर्वानुभवात नोंदवला गेला. जर रामण्णाला पुढेही असे अनुभव आले, तर तो खूणगाठ बांधून ठेवेल. (मी "चिंतामणी" शब्दाबाबत खूणगाठ बांधली तशी.) "काळा" आणि "पिवळा" या ध्वनींचा संकेत वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळा असतो. ध्वनी नानार्थक आहे.

काही का असेना : या चारपैकी एकही मुद्दा "सत्य म्हणजे काय" इतका मूलभूत नाही.

रमताराम Tue, 10/04/2012 - 10:07

In reply to by धनंजय

एवढा विस्तृत प्रतिसाद यापूर्वी वाचला नाही याचा खेद होतोय. (नाईल्याने प्रतिसाद देऊन हा लेख वर आल्यामुळे हा प्रतिसाद वाचता आला त्याला धन्यवाद देतो.)

काही का असेना : या चारपैकी एकही मुद्दा "सत्य म्हणजे काय" इतका मूलभूत नाही.
धनंजय, मला वाटतं मुद्दा आणि निकष किंवा साध्य नि साधन यात गल्लत होते आहे. तुम्ही नोंदलेले चारही मुद्दे हे मुद्दे नव्हे तर निकष आहेत(!), शक्यता आहेत एकाच इच्छित स्थळी पोहोचताना घेता येऊ शकणारे चार पर्यायी मार्ग आहेत.

यापैकी कोणतीही एक शक्यता वास्तवात असू शकते नि 'भंडारा काळाच आहे' या दाव्याला सुरूंग लावू शकते हा मुद्दा आहे. "भंडारा कुठल्या रंगाचा आहे?" हा प्रश्न असता नि याचे उत्तर काळा, पिवळा वा गुलाबी आहे का हा शोधाचा मुद्दा असेल तर तुमचा मुद्दा बरोबर आहे . परंतु 'तो काळा आहे', अगदी 'निरपवादपणे काळा आहे' असा रामण्णाचा दावा आहे. त्यामुळे प्रश्न 'तो काळा आहे का?' या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आहे नि त्या प्रश्नाचे सिद्ध होण्याच्या वाटेवर या चार शक्यता आहेत. त्या अधिक जाणणार्‍या तज्ञाने रंगाचे नाव कोणतेही सांगो, ते आमच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे हे आहे की रामण्णाचा दावा निरपवाद रहात नाही, सार्वत्रिक सत्य - जसा त्याचा दावा आहे - रहात नाही. एकदा हे झाले की तो गुलाबी आहे की पिवळा आहे हे तथाकथित सत्य सिद्ध करण्याचा हेतूही नाही.

(टीपः सदर प्रतिसाद धनंजय यांच्या खालील प्रतिसादाला उप-प्रतिसाद आहे. दोन वेळा प्रयत्न करूनही तो स्वतंत्र प्रतिसाद म्हणून पडतो आहे. :( . संपादकांना विनंती आहे की शक्य असल्यास तो उप-प्रतिसाद म्हणून हलवावा.)

Nile Mon, 09/04/2012 - 13:26

सत्य पडताळणीचे सर्वच निकष ओळखीचे म्हणावे असे. काही स्वानुभवाने तर काही इतरांच्यामुळे. सर्वच निकष लक्षात ठेवावे आणि नेहमी वापरावे असे आहेत. मध्यंतरी जेव्हा न्युट्रिनो प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जातो असे जाहीर केले गेले त्यानंतर झालेल्या अनेक शास्त्रज्ञांच्या मुलाखती आणि वादसंवादांत साधारण हाच प्रश्न उभा राहिला. काही का निकष असेना, जोवर सत्य हे बदलू शकतं हे मान्य असेल तोवर ठीक आहे असं मला वाटतं. सत्य मानून चाला पण प्रत्येक पायरीवर, जिथे हे सत्य नसेल अशाने महत्त्वाचा बदल घडू शकेल, तिथे सत्याला पडताळत राहिलं पाहिजे.

लेखाची मांडणी, भाषा आणि मुद्देसुदपणा लाजवाब!