समाजवाचक विधानांच्या शोधात

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत एका अँब्युलन्सला लोकांनी वाट करून दिली याचा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपवर कुणीतरी फॉरवर्ड केला होता. त्याचं कौतुक केलं होतं. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वेळीही अँब्युलन्सला लोकांनी वाट करून दिली याचं कौतुक वाचनात आलं. आम्ही मूळचेच नतद्र्ष्ट असल्याने यात कौतुक करण्यासारखं काय आहे असा प्रश्न आम्हाला पडला. अँब्युलन्सला वाट करून देणं तर अपेक्षितच आहे. याचं कौतुक होणार असेल तर लाल सिग्नलला जे उभे असतात त्यांचाही सत्कार करावा किंवा आजवर एकही बलात्कार न केलेल्या पुरुषांचा सत्कार करावा असं सुचवावंसं वाटलं. तरीही आम्ही प्रयत्न करून पाहिला. पण बराच प्रयत्न केला तरी कौतुक करावं असं वाटेना. खोटं कौतुक कसं करणार? आपण काही कुठल्या पक्षाचे अधिकृत वा अनधिकृत फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप प्रवक्ते नाही. मोठाच प्रश्न होता. अगदी खरं सांगायचं तर काहीही न लिहिता 'मूर्ख आहात' एवढंच लिहावं असं आधी वाटलं होतं. पण बोटं उचलेनात. आम्ही अभिराम दीक्षितांचं स्मरण केलं. तरीही बोलायची हिंमत होईना. आणि मग आम्हाला अपार खिन्नता आली.

तुकारामांनी 'बुडती हे जन देखवे ना डोळा' असं म्हटलं आहे. तुकारामबुवा मोठा माणूस. आपण बच्चे. पण एक गोष्ट आहे. तुकारामाला नव्हतं एवढं एक्सपोजर आपल्याला आहे. आपल्याकडे काय नाही? तुकाराम तर आहेच, पण गूगल आहे, विकिपीडिया आहे, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, पुण्यात राहतो त्यामुळे कुठल्याही दिशेला हाकेच्या अंतरावर विद्वानांची घरं आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करू शकतो. गावाकडे लोक शेती करतात तशी पुण्यात चर्चा आणि समीक्षा करतात. म्हणजे ते येतंच करता इथे. त्याकरता इथे राहिलं की झालं. सांस्कृतिक-सामाजिक सगळंच एक्स्पोजर भरपूर. देशोदेशींचे चित्रपट आपण घरबसल्या पाहू शकतो. (ते किकअ‍ॅस बंद केलं तेवढं एक वाईट झालं!) नाटक तर मराठी माणसाचा जीव की प्राण! आणि पुण्यात तर तो सहावा प्राण! त्यामुळे आपण त्याविषयी कधीही समजून घेऊ शकतो. सुदर्शनला प्रायोगिक नाटक बघून व्यावसायिक नाटकांवर टीका करू शकतो आणि बालगंधर्वला व्यावसायिक नाटक बघून ब्रेकमध्ये वडे खाताना प्रायोगिक नाटकांच्या मर्यादेवर बोलू शकतो.

पण प्रॉब्लेम हा आहे की एवढं एक्सपोजर आहे आपल्याला, तरी आपण धाडकन काही बोलू शकत नाही. अभिराम दीक्षित पुरोगाम्यांना 'भिकारXX' म्हणू शकतात ठामपणे तसा ठामपणा आपल्यात कधी येणार? (आपल्याला साधा शब्ददेखील पूर्ण लिहायला जमत नाही! आपण मराठीच आहोत ना?) आणि आपण विधानं कधी करणार? धडाधड विधानं करता येणे ही काळाची गरज आहे. (पान-पान लेख खरडतोस त्यापेक्षा मोदीभक्त किंवा मोदीद्वेषी लोकांची वॉल नियमित बघ आणि शीक काहीतरी. चमकशील.' असं बायको सांगत असते नेहमी.) सारखं आपलं समजून घ्यायचं म्हणजे काय? टोपी उडवायची खुमखुमी आली तरी आपण ती दाबून धरतो. वातावरण बिघडेल म्हणून. (आपल्याकडे लक्ष देणारे लोक ते किती? तरीही वातावरण बिघडेल ही आपली भीती. स्वतःबद्दलचे असे गैरसमजदेखील पुण्यातच फोफावतात!) बरं आपण जे खरडतो ते काही लोक वाचतात, काहींना आवडतं, काही टीका करतात - काही स्पष्टपणे समोर करतात, तर काही सिक्रेट ग्रुपवर करतात. बात खतम! काय घंटा फरक पडणार आहे त्याच्यामुळे? त्यामुळे लिहिलं काय, न लिहिलं काय - सारखंच!

परवा एकदा अर्णब गोस्वामीचा शो पाहायचा योग आला आणि आमच्या मनाचा बांधच फुटला. आपला गुरू होण्याच्या योग्यतेचा माणूस सापडल्याचा आनंद झाला आम्हाला. रवीशकुमारसारख्या फालतू माणसांनी पत्रकारितेची वाट लावलेली असताना अर्णब गोस्वामी एकदम समोर तारणहार म्हणून दिसू लागला. पत्रकारितेत असं शांत आणि धीरगंभीर व्यक्तिमत्व सापडणं दुर्मिळ! वैचारिक मतभेद व्यक्त करावेत तर असे, बोलावं तर असं, बोलू न द्यावं तर असं, फैलावर घ्यावं तर असं! असा अभ्यासू आणि विचारवंत आणि पत्रकार आज आपल्या टीव्हीवर आहे याचं आम्हाला अतीव समाधान वाटलं.

पण आजूबाजूला एवढी प्रेरणास्थानं दिसत असतानाही आम्हाला विधानं करायचं धैर्य काही होईना. विधानं सोडा, साधं 'यात संघाचा हात आहे' किंवा 'याच्यामागे शरद पवार आहेत' किंवा 'फाळणीला गांधीच जबाबदार होते' अशी जागतिक मान्यताप्राप्त विधानंही करता येईनात. 'नेहरूंनी देशाची वाट लावली' हे विधानही आता घासून गुळगुळीत झालं आहे. त्यामुळे तेही नाही. गांधींना किंवा नेहरूंना एकेकट्याला घेऊन बुकलण्यातही मजा उरलेली नाही. नरेंद्र मोदींबाबत विधान ते काय करणार? त्यांच्यावर इतकी विधानं झाली आहेत की कुणालाही - अगदी संघालाही हेवा वाटावा. समाजवाद तसाही नामशेष होणारच आहे. मग मरणपंथाला लागलेल्याला का मारा? मागे एकदा परममित्र मंदार काळेंबरोबर इडली उडवताना त्यांनी सद्य समाजवादातील मर्यादा स्टॅटिस्टिकली प्रूव्ह करून दाखवल्या होत्या. (त्यापूर्वी एकदा त्यांनी भांडवलशाहीच्या मर्यादाही अशाच प्रूव्ह करून दाखवल्या होत्या. त्यावेळी आमच्या पुढ्यात डोसे होते.) त्यामुळे हे विषय आम्ही आता कट केले आहेत. साम्यवादाबाबत अभिराम दीक्षितांनी इतकं लिहिलं आहे की ते वाचून कार्ल मार्क्ससुद्धा पश्चात्तापदग्ध होईल आणि 'कॅपिटल'च्या उरलेल्या प्रती जाळून अमेरिकन नागरिकत्वासाठी आणि वॉलमार्टमध्ये नोकरीसाठी अर्ज करेल. त्यामुळे तोही मुद्दा कट!

विधान करावं असं काही उरलेलंच नाही आपल्याकडे असं आमच्या लक्षात येऊ लागलं. स्त्रीवाद अपुरा आहे असं म्हणून बघावं असं वाटलं. मनात म्हणून बघितलं, पण का कुणास ठाऊक, जरा टेंशन आलं. मग विधान रद्द केलं. देशीवादाबद्दल बोलावं का? विषय चांगला होता. बराच काळ पुरेल असा होता. पण मग एकदम आठवलं - मिलिंद बोकीलांनी देशीवादाला 'नॉन-इश्यू' म्हणून एका पानात निकालात काढलं होतं (वाचा - 'साहित्य, भाषा आणि समाज ' - मौज प्रकाशन) आणि खरं सांगायचं तर ते आम्हाला पटलंही होतं. (आमचं हे असं आहे. सगळ्यांच्याच म्हणण्यात काहीतरी तथ्य आहे असं म्हणत राहिलास तर कसं होणार तुझं असं बायको म्हणते त्यात तथ्य आहे.) त्यामुळे त्यावरही काही बोलता येईना.

मग एक विचार चमकला. दोन-तीन महिन्यापूर्वी एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज (अर्थातच फॉरवर्डेड) आला होता. अखंड हिंदुस्थानाचं मनोहर चित्र रंगवत, नथुराम गोडसेंचं स्वप्न पूर्ण करायला आपण कंबर कसली पाहिजे असं म्हणत पुढे 'महात्मा गांधींना त्यांनी केलेल्याचं फळ मिळालं' असं म्हटलं होतं. ते वाचून आम्ही सद्गदित झालो होतो. गांधीहत्येमुळे आपण उगीच अस्वस्थ होत होतो. गांधींना त्यांच्या दुष्कृत्यांचं फळ मिळालं ही एवढी साधी कारणमीमांसा आपल्याला कळू नये? गोविंद तळवलकरांपासून सदानंद मोऱ्यांपर्यंत आणि य. दि. फडक्यांपासून शेषराव मोऱ्यांपर्यंत सगळे लेखक वेळीच रद्दीत का घातले नाहीस असं म्हणत आमचं मन आक्रंदू लागलं आणि गहन निराशा आली. पण आम्ही मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे कंबर कसली (म्हणजे फोन हातात घेतला), निराशा झटकली आणि पंधरा मिनिटांच्या दीर्घ चिंतनातून नरेंद्र दाभोळकरांबाबतचं एक विधान तयार केलं - 'धर्माची चिकित्सा करताना तारतम्य सुटून मर्यादाभंगाचा प्रमाद घडल्याने दाभोळकरांचा दुर्दैवी अंत झाला!' सध्या एवढं एक विधान जमलंय. आता पुढच्या विधानाच्या शोधात आहोत!

(संपादकीय टिप्पणी - हा लेख उत्पल यांच्या फेसबुक पोस्टचं लेखकाच्या संमतीने संपादकांनी केलेलं सादरीकरण आहे. लेखकाला यावरच्या चर्चेत भाग घ्यायला पुरेसा वेळ मिळेलच असं नाही.)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चिंतनातून नरेंद्र दाभोळकरांबाबतचं एक विधान तयार केलं - 'धर्माची चिकित्सा करताना तारतम्य सुटून मर्यादाभंगाचा प्रमाद घडल्याने दाभोळकरांचा दुर्दैवी अंत झाला!'

अशा आशयाचे विधान म्हणजे त्यांनी जरा अति केल असे म्हणतात. एका अर्थाने कठोर धर्मचिकित्सा ही श्रध्दाळू मनाला त्याच्या अस्तित्वावर प्रहार वाट्तो.मग हे समाजमन अस्तित्वाच्या लढाईसाठि असे हल्ले करतो.दाभोलकर हे देव धर्म बुडवायला निघाले आहेत असा समज हे समाजमन करुन घेते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

लेखाचा आशय लक्षात आला की "shooting from hip" म्हणजे विचार न करता उचलली जीभ लावली टाळ्याला लोक जास्त असतत. अर्थात घटनेचा विविधांगाने विचार करुन मत मांडणारे लोक फार कमी असातत. पण हे देखील खरेच आहे की कोणत्याच विषयाचा संपूर्ण, बयजवार अभ्यास आणि त्यात नैपुण्य कोणालाच शक्य नसते. पण म्हणुन एक कोणतीतरी (किती का लंगडी) बाजू घेऊन चर्चा सुरुच करु नये ही अपेक्षा बरोबर वाटत नाही. सदर धाग्याच्या लेखकाची तशी अपेक्षा आहे असे मला जाणवले/वाटले.
___

पुण्यात राहतो त्यामुळे कुठल्याही दिशेला हाकेच्या अंतरावर विद्वानांची घरं आहेत.

फुटले!
.

आणि बालगंधर्वला व्यावसायिक नाटक बघून ब्रेकमध्ये वडे खाताना प्रायोगिक नाटकांच्या मर्यादेवर बोलू शकतो.

हाहाहा
.

'धर्माची चिकित्सा करताना तारतम्य सुटून मर्यादाभंगाचा प्रमाद घडल्याने दाभोळकरांचा दुर्दैवी अंत झाला!' सध्या एवढं एक विधान जमलंय. आता पुढच्या विधानाच्या शोधात आहोत!

विधान खासच जमलय पण. कोणी चिकीत्सा केली, कोणाचे तारतम्य सोडले, कोणाचा मर्यादाभंग झाला हे गुलदस्त्यातच आहे. हवा तसा "नरो वा कुंजरोवा" अर्थ काढण्यास प्रत्येक जण मोकळा आहे. सॉलिड जमलय.
.
टंग इन चीक कॉमेडी छान जमलेली आहे. लेख आवडला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वेळीही अँब्युलन्सला लोकांनी वाट करून दिली याचं कौतुक वाचनात आलं.

या बातमीवरुन, नवीन समाजविधान करता आलं असतं.
एक रुग्ण मरु नये(आपल्यामुळे) याचा एवढा कळवळा येतो तर पिढ्यानपिढ्या आपल्याच ज्ञातिबांधवांमुळे जे मागे राहिले आहेत, त्यांचा कसा कळवळा येत नाही ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक रुग्ण मरु नये(आपल्यामुळे) याचा एवढा कळवळा येतो तर पिढ्यानपिढ्या आपल्याच ज्ञातिबांधवांमुळे जे मागे राहिले आहेत, त्यांचा कसा कळवळा येत नाही ?

ते थोडसं सामिषाहारी लोकांसारखे आहे. खाताना खंत वाटत नाही पण समोर मारलेले पहावत नाही.
कोणतीही हानी प्रत्यक्ष पोचते आहे हे कळले की जीव तळमळतो पेक्षा "आपल्या डोक्यावरती ते पाप नको" असे वाटते पण इनडायरेक्टली जर हानी पोचत असेल तर मनाला(conscience) टोचणी लागत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शीर्षक वाचून मी प्रतिसाद तयारच ठेवला होता, 'लिहितोस काय मुजरा कर', 'चर्चा तर होणारच', 'कुठे नेऊन ठेवलंय ऐसी आमचं', अशी समाजवाचक विधानं तयारच होती. पण लेख वाचून अतीव निराशा झाली. एवढी निराशा झाली की किरण लिमयेंच्या ब्लॉगवरचा ताजा लेख??? आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुलंची ष्टाईल भासली जराशी.
बाकी, सध्याचा हॉट विषय मराठा मोर्चा आहे की बोलायला. बोला बिनधास्त !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अच्छा .. फेसबुकी आणि व्हॉट्सपी फॉरवर्डींचा उगम हा असा असतो तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

फारच आवडला.
सुपर्ब शैली

रवीशकुमारसारख्या फालतू माणसांनी पत्रकारितेची वाट लावलेली असताना अर्णब गोस्वामी एकदम समोर तारणहार म्हणून दिसू लागला. पत्रकारितेत असं शांत आणि धीरगंभीर व्यक्तिमत्व सापडणं दुर्मिळ! वैचारिक मतभेद व्यक्त करावेत तर असे, बोलावं तर असं, बोलू न द्यावं तर असं, फैलावर घ्यावं तर असं! असा अभ्यासू आणि विचारवंत आणि पत्रकार आज आपल्या टीव्हीवर आहे याचं आम्हाला अतीव समाधान वाटलं.

यावर प्रचंड मनमुराद हसलो.
रवीश कुमार चा फॅन
मारवा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असले लेख लिहिता ? जावा की तिकडं पाकीस्तानात ! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0