माध्यमथकवा, माध्यमलकवा

सत्तरीच्या दशकाच्या उत्तरार्धातला किंवा ऐंशीच्या दशकाच्या पूर्वार्धातला काळ होता. एक आटपाट नगर होते. त्यात एक मध्यमवर्गीय घर होते. त्यांचा एक जवळचा नातेवाईक विलायतेत होता. तो दर चार-पाच वर्षांनी भारतात सुट्टीवर येत असे. त्याच्या येण्याचा आनंद वेगळाच असे. विलायतेबद्दल अपार कुतुहल असे. त्याच्या बारीकसारीक गोष्टींचे खूप कौतुक वाटे. तो परत गेल्यावर सुनेसुने वाटे. आमचा संपर्क बराच असायचा त्यावेळच्या मानाने. ‘आंतरदेशीय’ पत्र लिहीत होतो. मजकूर बराच संपादित करून आणि वर जास्तीत-जास्त मावावा म्हणून छोटे अक्षर काढून. तरीही पानांवरील जागा पुरत नसे, तेंव्हा घडी घालायच्या जागांवरही आत लिहीत असे. पत्र पोहोचावयास तीनेक आठवडे जात. आणि त्याने सवडीने एअरमेलने उत्तर लिहिल्यावर ते यायला आणखी दोन-तीन आठवडे, असा आजच्या भाषेत दोनेक महिन्यांचा ‘लीड टाइम’ लागत असे.

त्याच्या आईवडिलांशी बोलायला तो सठीसहामाशी एखादा ट्रंक कॉल लावत असे. तेंव्हा भलत्याच ‘कूल’ विलायती उच्चारातल्या इंग्रजीत बोलणारी ऑपरेटर ‘ते आहेत का’ असे आधी विचारून मग आहेत म्हणल्यास कॉल ‘जोडून’ देत असे. तो मोजकेच बोलायचा आणि फोन ठेवायचा. सर्वांशी बोलणे त्याला परवडायचे नाही. आम्ही त्याला फोन करणे विरळाच - जवळचे नातेवाईक वारले वगैरे तरच. ते कॉल्स तर आणखीनच थोड्या वेळाचे आणि नंतर फोन बिल आल्यावर डोळे पांढरे करणारे! मिनिटाला त्यावेळचे शंभरेक रुपये पडायचे. कधीकधी अर्जंट, किंवा अपवादात्मक परिस्थितीत लाइटनिंग, कॉल लावावा लागायचा, त्याचे तर दुप्पट - तिप्पटसुद्धा. देशांतर्गत ट्रंक कॉल्स थोडे स्वस्त असत, पण एकूण तीच कथा. आणि अर्थात हे सारे ज्यांच्या घरी फोन होता त्या थोड्यांचे अनुभव. इतरांना शेजारीपाजारी किंवा पोस्ट ऑफिसात जावे लागे!

पुढे ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात STD आणि ISD च्या सोयी आल्या. पब्लिक फोन बूथ्स वरून सुरुवात होऊन नव्वदीच्या दशकात त्या पसरल्या आणि हळूहळू घरोघर पोहोचल्या. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरदेशीय संपर्क सोपा झाला, पण तरीही तो खूप महागच होता. त्यामुळे सविस्तर बोलण्याची सोय नव्हती आणि त्यासाठी पत्र लिहिण्याला पर्याय नव्हता. पण पत्रांचे अप्रूप खूपच होते आणि जिव्हाळ्याच्या गोष्टींबरोबरच वैचारिक देवाणघेवाणही छान होत होती. हाताने लिहिल्यामुळे आणि जागेची मर्यादा असल्यामुळे मजकूर जास्त विचार आणि संपादन करून लिहिला जाई. त्यामुळे आपोआपच संभाषणाचा दर्जा आणि आशयघनता एकूणात चांगली असे. अर्थात विस्तारभयामुळे कधी तुटकताही येत असेल आणि त्याचे तोटेही होत असणार. पण ‘रीडिंग बिट्वीन द लाइन्स’ ची मजाही असे. आपल्या प्रिय व्यक्तीचे हस्ताक्षर पाहून एक वेगळाच आनंद मिळे आणि एकूणात पत्रव्यवहार हा अस्सल (authentic) पर्याय वाटे.

वरील माध्यमांतून होणारा संवाद हा महाग, संथ, मुख्यतः दोन व्यक्तीं मधे मर्यादित, पण दर्जेदार होता असे मला वाटते.

नव्वदीच्या उत्तरार्धात ई-मेल आणि मोबाइल चा चंचुप्रवेश झाला, पण घरोघरी इंटरनेट पोचायला आणखी दहाएक वर्षे लागली. तोपर्यंत इंटरनेट कॅफे / बूथ किंवा ऑफिसेस मधून ई-मेल कराव्या लागत. दरम्यान इंटरनेटच्या माध्यमातून सत्वर संभाषणाच्या (आवाजी आणि टंकलिखित) सोयी आल्या. Orkut ने सुरुवात होऊन मग फेसबुक आले आणि तो एक मैलाचा दगड ठरला. मग Skype, FaceTime आणि WhatsApp, Twitter, Instagram, snapchat वगैरे. पुन्हा हे सर्व मोबाइल फोनवर करता येऊ लागले आणि पाहतापाहता तोच दळणवळणाचा राजमार्ग झाला. The rest is history म्हणण्याचा मोह होतो, पण ही फक्त सुरुवात असेल असेही वाटते. Virtual / Immersive Reality, आणि holography सारख्या तंत्रज्ञानामुळे सगळ्या संवेदना (स्पर्श, रूप, रस, गंध इत्यादि) भासमान स्वरूपात अनुभवता येऊ लागतील. पण प्रत्यक्ष भेटीसाठी मात्र प्रवासाला पर्याय नसेल. (Teleportation - Star Trek मधल्या “Beam me up, Scotty” सारखे, किंवा स्थलकालातील ‘wormholes’ चा प्रवासासाठी वापर करणे इत्यादि कल्पना मात्र कल्पनाच राहतील असे मला वाटते. असो.)

या नव्या माध्यमांतून घडणारा संवाद हा अत्यंत स्वस्त, वेगवान, एकाच वेळी अनेक (किंबहुना असंख्य) लोकांमधे होऊ शकणारा झाला. पण त्याचा दर्जा जुन्या माध्यमांतून होणार्या संवादाच्या तुलनेत कितपत आहे असा प्रश्न मला पडतो. यासंबंधीची माझी काही निरीक्षणे:

१. पूर्वी संवाद हे मुख्यतः ‘साधन’ होते आणि विचार/भावनांची देवाणघेवाण हे ‘साध्य’ होते.
२. पूर्वीची माध्यमे महाग, संथ, कमी सोयीची आणि ‘एकावेळी-एकास-एक’ या स्वरूपाची असल्यामुळे संवादाचे एकूण ‘घनफळ’ फारच मर्यादित होते. पण संवादाचे ‘संपादन’ कळत-नकळत खूप होत असे, त्यामुळे त्याची ‘घनता’ कितीतरी जास्त असे. अर्थात घनता हे दर्जाचे मोजमाप नाही, पण संक्षिप्तता (थोडक्यात पण स्पष्ट असणे) हे आहे आणि त्यासाठी घनता अनिवार्य आहे असे मला वाटते.
३. बहुतेक लोकांना बहुतेक वेळी महत्वाचे सांगण्यासारखे बहुधा नसते. बुध्दिमान/विवेकी किंवा सर्जनशील/ रसाळ सांगण्यासारखे त्याहूनच कमी. मात्र तसे असल्यास, ते सांगण्यासाठी पूर्वीची माध्यमे जास्त अनुकूल होती असे मला वाटते.
४. ‘जगणे’ आणि ते ‘शेअर करणे’ या दोन गोष्टींसाठी लागणाऱ्या वेळाचे गुणोत्तर पूर्वी जास्त होते. ते कमीकमी होत गेले आहे आणि आजकाल काहीजणांसाठी (विषेशतः जनरेशन झेड् मधील) ‘व्यक्त होणे’ हेच ‘साध्य’ आहे की काय अशी शंका येते. संवाद अतिस्वस्त, अतिजलद, एकाच वेळी अनेक व्यक्तींशी आणि सहज करता येत असल्यामुळे बऱ्याच वेळा मनातील वरवरचे व तरल (superficial and fluid) विचार आणि भावना त्यांच्यावर पुरेसे संस्कार न करता ‘कच्चा माल’ स्वरूपातच शेअर केले जातात. तो वाचणारे/पाहणारे कधीकधी त्याचा साधकबाधक विचार न करता तो आणखी पाचपन्नास जणांशी शेअर करतात. त्यामुळे संवादाचे घनफळ बेसुमार वाढून अस्सलपणा आणि दर्जा मात्र घसरत चालला आहे की काय असे वाटते. एखाद्या दृष्याचा किंवा दृक्-श्राव्य प्रसंगाचा निखळ आणि खोलवर अनुभव घेण्याला, त्याचा तत्क्षणी मोबाइलवर फोटो अथवा व्हिडिओ काढून तो शेअर करणे हे मारक ठरू शकते. माझा एक मित्र म्हणत होता की त्याला रोज तीनेकशे ईमेल्स येतात आणि तो चाळीस active WhatsApp groups वर आहे. सतत वाजणारा फोन, SMS आणि Facebook वगैरे वेगळेच. मी मनातल्यामनात त्याला दंडवत घातला - पठ्ठा ‘प्रत्यक्ष जगतो’ कधी, कोण जाणे!
५. बहिर्मुख लोक हे अंतर्मुख लोकांपेक्षा संवादरूपे साहजिकच जास्त व्यक्त होतात. बहिर्मुख लोकांच्या संवादासाठी समाजमाध्यमे जास्त अनुकूल आहेत आणि त्यात गुणितश्रेणीने होणाऱ्या वाढीमुळे मनुष्यजातीच्या एकूण संवादसंचितातील अंतर्मुख लोकांचा टक्का घसरत चालला आहे. हे चिंताजनक आहे.
६. नवी माध्यमे, वापरणाऱ्यांसाठी फुकट असली तरी ती चालवण्यास पुष्कळ खर्च येतो आणि तो जाहिराती, पेड न्यूज इत्यादि मार्गांनी वसूल केला जातो. त्यामुळे माध्यमांच्या मालकांना फायद्याच्या ठरणाऱ्या गोष्टींचा संवाद/माहितीच्या घनफळातला टक्का वाढतो. शिवाय लोकांच्या समाजमाध्यमांवरील वावराचा संगणक आल्गोरिदम् द्वारा सखोल अभ्यास करून, त्यांच्या अंतरंगाबद्दल यथार्थ कयास बांधून त्यांचा (गैर)वापर करणे झपाट्याने वाढत आहे. संवादाचे असे बाजारीकरण धोकादायक आहे.
७. विविध कारणांनी समाजातील विवेकशीलता / वैचारिक सहिष्णुता जगभर कमी होताना दिसते आहे. गोबेल्ससदृश प्रचारासाठी समाजमाध्यमे फार सोयीची ठरतात. घातक, खोटे किंवा शुध्द मूर्खपणाचे विचार शून्य किंमतीत, प्रकाशाच्या वेगाने सर्वत्र पसरणे हा प्रकार भीतीदायक आहे.
८. संवाद / माहितीचे घनफळ (स्फोटक गतीने वाढणारे) आणि माणसाची ग्रहणक्षमता (आजही जवळपास प्रागैतिहासिक काळात होती तेवढीच, किंवा फारतर डार्विनीय गतीने वाढणारी) यांचे गुणोत्तर, गणितीय अनंताकडे निघाले आहे. यातून लोक जमेल तसा मार्ग काढत आहेत, पण बराक ओबामांनी नुकतेच म्हटल्याप्रमाणे त्याची परिणती स्वत:भोवती एक बुडबुडा तयार करून, आपले पूर्वग्रह जोपासणारी माहिती ग्रहण करणे आणि समविचारी लोकांशीच संवाद साधणे यांत होत आहे. आणि संवादात व माहिती ग्रहण करण्यात जाणारा वाढता वेळ / ऊर्जा निर्माण करताकरता, प्रत्यक्ष जगण्यासाठी आणि विधायक कृती करण्याठी उपलब्ध असलेला वेळ / ऊर्जा कमी होताना दिसते आहे. यातून एकीकडे प्रचंड शक्यता, मात्र दुसरीकडे एक प्रकारची बधीरता, अशी परिस्थिती निर्माण होत आहे की काय?

मला तरी हा माध्यमथकवा किंवा/आणि माध्यमलकवा असा नवा रोग वाटतो आणि काही प्रमाणात तो मलाही झाल्याचे जाणवते...

समाजमाध्यमांचे काही फायदे निर्विवाद आहेतच. त्यांचे एकूण फायदेतोटे, त्यांचे फायदे वाढवण्यासाठी आणि तोटे कमी करण्यासाठी काय करता येईल हा स्वतंत्र विषय आहे - त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी. घड्याळाचे काटे मागे फिरवणे शक्यही नाही आणि योग्यही नाही. तेंव्हा माध्यमथकव्या/लकव्यातून साजेसा मार्ग काढावाच लागेल. आणि शक्यता कमी वाटते, पण कोण जाणे, तो कदाचित समाजमाध्यमांवरील विचारमंथनातूनच सापडेल!

एक शक्यता : माझा आणखी एक मित्र गेली पंचवीस वर्षे विलायतेत राहतो. पण त्याने मोबाइल फोन घेतलेला नाही. तो कोणत्याही मोठ्या समाजमाध्यमांवर नाही. काही मोजक्याच मित्रांशी तो ईमेल, फोन अथवा स्काइपादि दृक्श्राव्य माध्यमावर संवाद साधतो, आणि एखाद्या दर्जेदार ब्लॉगवर सठीसहामाशी अतिशय वाचनीयरित्या व्यक्त होतो. पण तो प्रचंड वाचन, सुयोग्य लेखन आणि मनन/चिंतन करतो आणि त्याचा व्यवसाय / जीवनपध्दत यांच्याशी सुसंगत कृती दर्जेदारपणे आणि अतीव बांधिलकीने करतो.

उपसंहार : लेखाच्या सुरुवातीस उल्लेखिलेल्या नातेवाईकाशी संपर्क गेल्या काही वर्षात अतिशय वाढला. यथावकाश मीही विलायतेत स्थायीक झालो. पण आमच्यातील जवळीक वाढली नाही, तर आपापल्या बुडबुड्यांत गेल्यामुळे कमीच झाली. त्याबद्दल दोन्हीकडे खंत आहे. कालाय-माध्यमाय तस्मै नम: ....

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

छान लिहिलय. आवडलं. बरचसं पटलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सहमत.
माध्यम दुरुपयोग, भारतात चांगल्यापैकी रुजलेला आहे.स्वतः न अनुभवलेले, आयुर्वेदिक, आजीच्या बटव्यातले वा ऐकीव वैद्यकीय उपचार,दुसर्‍यांना सहज पाठवले जातात. पेड माध्यमांनी मुद्दामहून पसरवण्यासाठीच तयार केलेले, राजकीय विचार, स्वतःचे डोके न वापरता पुढे ढकलले जातात. उपदेशपांडे तर मुबलक आहेत. आणि उपदेश हा फक्त दुसर्‍यांसाठीच असतो. समोरच्याची आंतरजाल जोडणी किती क्षमतेची आहे, त्याला मोठ्ठाल्ले व्हिडिओ बघण्यास वेळ आहे की नाही, याचा विचार न करता, सगळे मेसेजेस सरसकट पुढे ढकलले जातात. त्यामुळे ज्यांना संगणक वापरायची भीति वाटत असते वा तो शिकून घ्यायची इच्छा नसते असे, अर्धवट लोक, तासंतास आपल्या मोबाईलमधे डोके घालून बसलेले दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्वांटिटी आणि क्वालिटी हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात हा विचार पटत नाही . अनेकदा ते बरोबरही जातात . दोन्हीच्या चांगलेपणाची आणि वाईटपणाची कारणे वेगळी असतात .
लेख उत्तम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

जेव्हा क्वालिटी ही पोस्ट फॅक्टो चेक होते; वस्तू बनल्यावर त्याची क्वालिटी तपासली जाते तेव्हा क्वालिटी आणि क्वांटिटी व्यस्त प्रमाणात असतात. क्वालिटी अ‍ॅशुरन्सच्या सिस्टिम्स निर्माण करून त्यांच्यावर अंमल केला की क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही वाढू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आपण संवादाच्या संदर्भात बोलतो आहोत, वस्तू किंवा सेवा यांच्या संदर्भात नव्हे. संवादाचा दर्जा आणि घनता यांचा आलेख साधारणत: ‘लॅफर कर्व्ह’ च्या आकाराचा असतो. खूप कमी घनता किंवा खूप जास्त अशा दोन्ही टोकांना तो कमी होतो. एका पर्याप्त घनतेला तो उच्चतम होतो असा माझा अनुभव आहे. घनता जेंव्हा यापेक्षा कमी होत जाते (त्याच आशयासाठी ज्यास्त घनफळ) तेंव्हा दर्जा हा ‘लॉ अॉफ डिमिनिशिंग रिटर्न्स’ ला अनुसरून कमी होत जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

खूप छान लेख .... आवडला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

लेख आवडला.

माझा आणखी एक मित्र गेली पंचवीस वर्षे विलायतेत राहतो. पण त्याने मोबाइल फोन घेतलेला नाही >>>

मी भारतात असतो. मी अजूनही स्मार्ट फोन घेतलेला नाही. त्याबद्दल कोणताही न्यूनगंड नाही ! अर्थिक व्यवहार डेस्कटॉप वरून करतो. काही अडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विज्ञान धावत येतं, ज्ञान चालत येतं पण, शहाणपण मात्र मागंच रेंगाळतं!

<<<विज्ञान धावत येतं, ज्ञान चालत येतं पण, शहाणपण मात्र मागंच रेंगाळतं>>>

किती सुंदर वाक्य! विंदा करंदीकरांच्या 'त्याला इलाज नाही' या अप्रतिम कवितेतली एक अोळ या निमित्ताने आठवली: विज्ञान ज्ञान देई, निर्मी नवीन किमया; निर्मी न प्रेम शांती, त्याला इलाज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

नाग्या, तुमचे खाते बघा. निरोप आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विज्ञान धावत येतं, ज्ञान चालत येतं पण, शहाणपण मात्र मागंच रेंगाळतं!

जुने दिवस लै चांगले टैप लेख वाटला.

माझा एक मित्र म्हणत होता की त्याला रोज तीनेकशे ईमेल्स येतात आणि तो चाळीस active WhatsApp groups वर आहे. सतत वाजणारा फोन, SMS आणि Facebook वगैरे वेगळेच. मी मनातल्यामनात त्याला दंडवत घातला - पठ्ठा ‘प्रत्यक्ष जगतो’ कधी, कोण जाणे!

प्रत्यक्ष जगणे म्हणजे नक्की काय करणे ब्वॉ? माझा एक मित्र रोज एका पुस्तकाचा फडशा पाडतो. प्रचंड वाचन, सुयोग्य लेखन आणि मनन/चिंतन करतो. तो प्रत्यक्ष कधी जगतो कोण जाणे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वत:भोवती एक बुडबुडा तयार करून, आपले पूर्वग्रह जोपासणारी माहिती ग्रहण करणे आणि समविचारी लोकांशीच संवाद साधणे यांत होत आहे.

हे प्रकार आंतरजालपूर्व जगात घडत नसत का?

माझे वडील माफक प्रमाणात का होईना, संघिष्ट होते. नातेवाईक वगळता, आमच्या घरी येणाऱ्या लोकांमध्ये एक गट होता तो त्यांच्या सहकर्मचाऱ्यांचा; कॉलेजात शिकवणारे इतर शिक्षक किंवा परीक्षा, विद्यापीठाची कामं यांच्याशी संबंधित लोक. दुसरा एक मोठा गट होता तो संघातल्या ओळखीच्या लोकांचा. यांतही दोन गट सहज करता येतील; एक संघात एके काळी जायचे आणि आता आपापल्या कर्तबगारीमुळे संघात जायला वेळ नसलेले (पण संघाप्रती आपुलकी बाळगून असलेले) आणि दुसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे तेव्हाही संघात नियमितपणे जाणारे.

आमच्या घरी मोठ्या प्रमाणावर कम्युनिस्ट, रामदासी (माझे आजोबा रामदासी होते) किंवा आंबेडकरवादी लोक येत नसत. अपवाद म्हणूनही नाही. नातेवाईकांमध्येही मोठ्या प्रमाणात संघिष्ट लोक आहेत.

या सांगोवांगीच्या गोष्टी आहेत हे खरंच. पण आंबेडकरवाद्यांच्या घरी मोठ्या प्रमाणात ब्रिगेडी किंवा रामदासी लोक येत असतील, असंही वाटत नाही. आपापल्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विचारांच्या बाहेरच्या लोकांमध्ये उठबस असणारे लोक मोठ्या प्रमाणावर असण्याचे प्रकार जुन्या जमान्यातही होते, हे फार पटत नाही. आता, आंतरजालामुळे हे दिसून येतंय; आणि त्यामुळे क्रॉस सेक्शनल अभिसरण वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपण कोणत्या घरात जन्मतो हा अपघात असतो आणि एक पॅकेज डीलही. त्यामुळे तुलना करण्यात अर्थ नाही, पण माझे आईवडील ‘मधुकर’ वृत्तीचे होते. इंग्रजी साहित्य आणि तत्वज्ञानाचे प्राध्यापक. निरनिराळ्या क्षेत्रातील लोकांशी त्यांचा संपर्क असे. त्यामुळे गांधीवादी, समाजवादी, साम्यवादी, आंबेडकरवादी, ज्ञानप्रबोधिनीवाले, संगीतातले दर्दी, विविध भाषिक, भारतीय, परदेशी, लेखक, कवी, शास्त्रज्ञ, पत्रकार इ.इ. सर्व तर्हेचे लोक अनुभवायला मिळाले. त्यांच्यातले हिरिरीचे वादविवादही! लहान असताना घरी (वेगवेगळया वेळी) गो. पु देशपांडे, ग. प्र. प्रधान आणि पु. ल. देशपांडे ही आलेले आठवतात. जवळच्या नातेवाईक मुलीने (कथित) दलित जातीच्या साम्यवादी मुलाशी विवाह अणि छान संसार केला होता. रोदॉं च्या शिल्पांचे प्रदर्शन मुंबईला लागलेले बघायला घेऊन गेले होते (माझ्या मनाविरुध्द!). विविध तर्हेची पुस्तके तर अमर्याद वाचायला मिळाली. मराठी आणि इंग्रजीतली, वाट्टेल त्या विषयांवरची. संगीताच्या तबकड्या घरी असंख्य होत्या - हिंदुस्तानी आणि पाश्चात्य अभिजात संगीताच्या सुद्धा. पुन्हा ‘यातले तुला काय हवे ते घे’ असा सूर असे. आणि अशी आणखीही घरे मी लहान असताना पाहिलेली आहेत. तशी मला तरी आजकाल दिसत नाहीत. तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे सर्व सांगोवांगीचेच (anecdotal) आहे, पण समाजमाध्यमपूर्व आणि समाजमाध्यमोत्तर काळातले असे काही फरक मला खूप जाणवतात....असो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

>> अशी आणखीही घरे मी लहान असताना पाहिलेली आहेत. तशी मला तरी आजकाल दिसत नाहीत. तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे सर्व सांगोवांगीचेच (anecdotal) आहे, पण समाजमाध्यमपूर्व आणि समाजमाध्यमोत्तर काळातले असे काही फरक मला खूप जाणवतात.... <<

इथे काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेत यायला हवेत.
तुम्ही ज्या घरात जन्मलात त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी सहज मिळाल्या हे मान्यच. प्रदर्शनं, पुस्तकं, संगीत वगैरे गोष्टींचा विचार केला, तर तेव्हापेक्षा आज ह्या सर्व गोष्टी अधिक सहज उपलब्ध आहेत, हे मात्र लक्षात घ्यावंच लागेल. त्यासाठी आज विशिष्ट घरात जन्मण्याची फारशी गरज नाही किंवा ती कमी झाली आहे.

अर्थात, तुमच्यात ती चोखंदळ निवड मात्र विकसित व्हायला हवी. नीट पाहिलं तर असंही लक्षात येतं की अशा घरात वाढलेल्या अनेकांच्या बाबतीत ते खरं नाही. तुम्ही म्हणता तशा घरात वाढलेल्या कित्येक लोकांच्या बाबतीतला माझा प्रत्यक्ष अनुभव असा आहे, की केवळ सांगोवांगीच्या जोरावर ती आवड उत्पन्न झाल्याचा आभास असतो; आणि जर वरचा पापुद्रा किंचित खरवडला तर तो उघडा पडतो. उदा. विशिष्ट वर्तुळांत 'कोसला' आवडते, तर विशिष्ट वर्तुळांत तेंडुलकर, किंवा कोलटकर किंवा इतर काही. थोडी खोलात चर्चा केली, तर लक्षात येतं की फारसं काही न कळता ह्या गोष्टींना चांगलं म्हणण्याची ही (एक प्रकारची प्रवाहपतित) परिस्थिती आहे. थोडक्यात, ज्याप्रमाणे संघातल्या आईवडिलांचा परिसर बाजूला सारून स्वतःची रुची स्वतःच विकसित करावी लागते, तसंच हा परिसरही बाजूला सारून ते करावं लागतंच.

१ - अर्थात, ज्यांचा रोजचा जगण्याचा संघर्षच तीव्र आहे त्या वर्गातून जर तुम्ही आलात तर तुम्हाला तेव्हाही आणि आजही खूप कष्ट करावे लागतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझ्या घराचं माफक वर्णन मी वर केलेलं आहेच. वडील माफक प्रमाणात संघिष्ट होते, पण आई नव्हती. 'संघात गेलास तर स्वतंत्र विचार करायला शिकणार नाहीस', असं तिनं माझ्या मोठ्या भावाला सांगितलं होतं. (या वाक्याच अर्थ समजायला आणखी बरीच वर्षं जावी लागली, हे निराळं.) पण तिला जो माफक रिकामा वेळ मिळत असे, त्यात तिला 'मधुकर वृत्ती' जोपासण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. घरात असलेलं गोळवलकरांचं चरित्र किंवा दासबोध, ज्ञानेश्वरी सोडून इतर काय वाचावं याबद्दल चर्चा तिच्या कानावर पडत असत का नाही, माहीत नाही. (मोजके अपवाद वगळता) माझ्या कानांवर पडायला मला आंतरजाल शोधावं लागलं. आजच, दुसऱ्या धाग्यावर मला हाना आरण्ड्टचं दुसरं पुस्तक वाचण्याचा सल्ला मला मिळाला; मुळात हाना आरण्ड्टबद्दल समजलं तेही जालामुळेच. ही शक्यता माझ्या काहीश्या संघिष्ट (आणि चित्रपट बघणं वाईट असं समजणाऱ्या मध्यमवर्गीय) घरात फार नव्हती. बहुतांश नातेवाईक आणि शेजारीपाजारी आयटीवाले आणि/किंवा टेक्नोगीक असल्यामुळे आजही शक्यता नाहीच. त्यासाठी मला आंतरजालच धुंडाळावं लागतं.

आंतरजालावर पोकळ रँटी आणि उगाच मारामाऱ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असतात; याबद्दल मला अजिबात शंका नाही. पण ते कुपोषण मर्यादित ठेवून, जेवणासाठी पोषक आणि सर्वसमावेशक आहार घेण्याची शक्यताही जालावर आहे. अनेकांना कुपोषणाचीच भुरळ पडते हे खरं असेल, आहेच, पण सर्वसमावेशक पोषणाची शक्यता जालाआधी माझ्यासारख्या बहुतेकांच्या आयुष्यात नसावी. सर्वसमावेशक पोषणाचा टक्का कमीच असला तरीही बघायच्या चित्रपटांची आणि वाचायच्या लेखनाची यादी सतत वाढतीच असते.

माझ्या घरात आणि शेजारी राहणारे, माझ्यासोबत काम करणारे किंवा माझ्याच पबमध्ये येऊन दारू पिणारे लोक वैचारिकदृष्ट्या मर्यादित असले तरीही माझ्यावर ती मर्यादा लादली जात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थोडी खोलात चर्चा केली, तर लक्षात येतं की फारसं काही न कळता ह्या गोष्टींना चांगलं म्हणण्याची ही (एक प्रकारची प्रवाहपतित) परिस्थिती आहे.

अगदी! मुळात दीर्घ चिन्तन, कुठल्याही गोष्टीवर न करता फक्त 'एलिअनेट' न व्हायच्या भीतीने, अतिशय रिझनेबल (वाटणारे) लोक्स ही नसती वाहवा करताना आढळतात. जी गोष्ट अभिजात साहित्याची तीच शास्त्रीय सन्गीताची. मुळात साहित्य भरपूर वाचायला मिळाल्याने, 'तसं आपणही लिहायला जायच्या' प्रयत्नांमुळे त्यांतली जी खोली कळते, त्यामुळे अभिजात गोष्टींना दाद मिळायला हवी. मी लहानपणापासून शास्त्रीय ऐकतो. गेली पाच वर्षं शिकतोय. मला अजूनही लोक 'वाहवा!' कुठे म्हणतात किंवा एकदम समाधिस्थ होऊन माना 'कुठे' हलवतात हे कळलेलं नाही.

आईवडिलांचा परिसर बाजूला सारून

हे बर्‍यापैकी युवावस्थेत(किंवा त्याहूनही नंतर) जमतं, कारण वरील लोकांमध्ये 'बाबा वाक्यं प्रमाणं' पण अती असतात. स्वत:च्या rationale वर विश्वास ठेवून काहीही करायला बराच वेळ जावा लागतो. मीही ह्या सगळ्या अवस्थांतून गेलोय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

चिंता व १४टॅन यांचे प्रतिसाद आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

बहुतेक लोकांना बहुतेक वेळी महत्वाचे सांगण्यासारखे बहुधा नसते. बुध्दिमान/विवेकी किंवा सर्जनशील/ रसाळ सांगण्यासारखे त्याहूनच कमी. मात्र तसे असल्यास, ते सांगण्यासाठी पूर्वीची माध्यमे जास्त अनुकूल होती असे मला वाटते. >>>>> +१०००

लेखक- वाचक संवादासाठी पत्र( वा इ-मेल) हे उत्तम माध्यम आहे. अगदी 'आतड्यातून' व्यक्त होता येते.
वैचारिक अथवा निवांत दूरसंवादासाठी लँडलाईन फोन खरेच चांगला वाटतो. मोबाइल्ने केव्हाही कुणालाही फोन करणे हे त्याच्या वेळेवरील आक्रमण असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विज्ञान धावत येतं, ज्ञान चालत येतं पण, शहाणपण मात्र मागंच रेंगाळतं!

जुने दिवस लै चांगले टैप लेख वाटला.

अतिशहाणांनी हे म्हटलेलं आहे त्याला दुजोरा. त्यापलिकडे मला हे धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती यासारखंही वाटलं.

लेखाचा गोषवारा असा 'व्यक्त होण्याची माध्यमं वाढली, त्यात अगदी बिनखर्चाने व्यक्त होता येतं त्यामुळे या अभिव्यक्तीचं घनफळ वाढलेलं आहे हे खरं असलं तरीही कुठेतरी या अभिव्यक्तीचा किंवा संवादाचा दर्जा खालावलेला आहे.'

मला हे अजिबात पटत नाही. माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं तर सुमारे साताठ वर्षांपूर्वी माझे मित्र संपले होते. एकेकाळी जवळचे, पण नंतर लांब गेले, संवाद तुटला आणि नातं संपलं या कॅटेगरीत सगळे पडलेले होते. एरवी काहीतरी कार्यक्रमांना अधूनमधून भेटणारे लोक, मित्र म्हणण्यापेक्षा निव्वळ ओळखीचे (अॅक्वेंटन्सेस) होते. पण संस्थळांवर लिहायला लागलो आणि तिथे मोठ्या प्रमाणावर समधर्मी लोक मिळाले. हजारो मैलांवरून दररोज काही ना काही स्वरूपात संवाद होऊ शकला. त्यांपैकी अर्थातच काही जण खूप जवळचे झाले. काहींशी मी आज दर दिवसाआड फोन करून दीडदोन तास गप्पा मारतो. कधीकधी या गप्पा तीनचार तासही रंगतात. नव्वदीच्या दशकातल्या फोनच्या दरांनी हे परवडणं शक्य नाही. तीन तास बसून गप्पा हाणणं आणि दहा मिनिटांसाठी कॉल करणं यातल्या कुठच्या संवादाचा दर्जा चांगला असेल हे तुम्हीच विचार करून सांगा.

बाकी फेसबुकावर आणि संस्थळांवर होणारे वाद बऱ्यापैकी अर्थहीन ठरू शकतात याबद्दल सहमत. पण या ग्रुपी संवादांपलिकडे मोठ्या प्रमाणावर समधर्मी व्यक्तींमध्ये भरपूर संवाद फुलतो आहे. ग्रुपी संवाद हे हिमनगाचं टोक आहे, ते दिसतं. व्यक्तीगत बहरलेली नाती या हिमनगाचा लपलेला भाग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्लडी शहरी लोकांना काय कळणार जुन्या काळाचं महत्त्व! शष्प माहिती नसले तरी जुना काळच भारी म्हणायचे, काय समजलेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं