फिलाडेल्फिया मधील नाटकांचा रस्ता

मी गेल्या महिन्यात कार्यालयीन कामानिमित्त अमेरिकेतील पूर्व भागात असेलल्या ऐतिहासिक अशा फिलाडेल्फिया(Philadelphia) शहरी काही दिवस गेलो होतो. पूर्वीही एकदा २०१४ मध्ये गेलो होतो. त्यावेळच्या अनुभवांबद्दल लिहायचे राहून गेले आहे, एक नाममात्र अपवाद सोडून, आईस हॉकीचा सामना, ज्याबद्दल पूर्वी लिहिले आहे. ह्या वेळेसही मला फिलाडेल्फियामध्ये भटकंती करायला बऱ्यापैकी सवड मिळाली. त्याबद्दल सविस्तर लिहीनच नंतर, पण येथे मी अनुभवलेल्या नाट्यसंस्कृती बद्दल लिहिणार आहे.

फिलाडेल्फियामधील ब्रॉड स्ट्रीट(Broad Street) नावाच्या रस्त्यावर, आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या रस्त्यांवर अनेक नाट्यगृहे आहेत. त्यातील बरीचशी १००-२०० वर्षे जुनी आहेत. तसा हा सर्व भागच ऐतिहासिक आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळेस, तसेच स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळी ह्या शहरात बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत आणि त्याची साक्ष देणारी अनेक इमारती, स्थळे, आता संग्रहालयांच्या रुपाने ठिकठिकाणी आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर मी फिलाडेल्फिया शहरात पोहोचलो. एक-दोन दिवसांपूर्वीच बर्फवृष्टी होवून गेली होती(snow-fall ला बर्फवृष्टी हा शब्द कसातरी वाटतो, पण इलाज नाही). दुसऱ्या दिवशी शनिवार होता, सुटीचा वार होता, त्यामुळे मी हॉटेलबाहेर येवून ह्या रस्त्यांवरून भटकायला म्हणून बाहेर पडलो. हवा अतिशय थंड, बोचरी. कोवळे उन मधेच येई, परत गायब होई. हातात (म्हणजे खिश्यात असलेल्या हातात!) मोबाईलवर नकाशा होताच, तसेच हॉटेल मध्ये फिलाडेल्फिया शहराच्या पर्यटनस्थळांची माहिती देणारी पुस्तिका होतीच. ब्रॉड स्ट्रीट आणि त्याला आडवे छेदून जाणारे वॉलनट स्ट्रीट, चेस्टनट स्ट्रीट, मार्केट स्ट्रीट, आणि बरेच असे रस्ते होते. हे सगळे रस्ते पूर्वेकडे डेलावेअर नदीला जाऊन भिडतात. मी उभा आडवा तो भाग पालथा घातला. वाटेत फॉरेस्ट थिएटर, पर्ल थिएटर, विल्मा थिएटर, Academy of Music, Merriam Theater आणि इतर बरीच नाट्यगृहे होती. Merriam Theater मध्ये Shen Yun सारखा चीनच्या राजघराण्यावर आधारित प्रसिद्ध संगीत-नृत्य असलेल्या भव्यदिव्य असा कार्यक्रम होता.

तर अश्या ह्या भागात, त्यातील सर्वात जुने असे वॉलनट स्ट्रीट थिएटर नावाचे वॉलनट रस्त्यावर असलेले नाट्यगृह हे अमेरिकेतील सर्वात जुने, आणि चालू स्थितीतील नाट्यगृह आहे. हे नाट्यगृह अमेरिकेतील National Historic Landmark Building आहे. माझे फिलाडेल्फिया मधील वास्तव्य याच रस्त्यावर होते आणि ते अगदी हाकेच्या अंतरावर होते. अतिशय उत्सुकतेने मी तेथे गेलो. द गिफ्ट नावाचे नाटक काही दिवसातच तेथे येणार होते. त्याचा हिवाळा संपल्यानंतरचा पहिला प्रयोग होणार होता. त्याचे तिकीट ३० डॉलर देऊन मी काढले. नाट्यगृह काही भव्यदिव्य नव्हते. येवू घातलेल्या नाटकांचे पोस्टर्स लावले गेले होते. बाहेर एक छोटासा फलक लावला होता, त्यावे हे नाट्यगृह सर्वात जुने असल्याचे नमूद केले होते. नाट्यगृहाच्या दाराशी रस्त्यावर पूर्वी झालेल्या नाटकांची नावे असलेल्या विटा होत्या, ज्यात Wizard of Oz सारख्या नाटकाचे नाव होते.

द गिफ्ट नाटकाचा प्रयोग मी भारतात परतण्याच्या दोन दिवस आधी होता. माझी उत्सुकता ताणली गेली होती. नाटक मंगळवारी संध्याकाळी होते. परत मी थंडीत कुडकुडत चालत तेथे गेलो. तेथे गेल्यावर समजले की त्या इमारतीत तीन रंगमंच आहेत. एक मोठे आहे ज्याला ते Main Stage असे म्हणतात. दुसरे जे तिसऱ्या मजल्यावर होते, ते स्टुडीओ रंगमंच होते(Independence Studio on 3). अजून एक रंगमंच पाचव्या मजल्यावर होते. Main Stage वर प्रसिद्ध नाटके, संगीत नाटके, संगीताचे कार्यक्रम इत्यादी होतात. ५००-६०० प्रेक्षक बसतील एवढी मोठी जागा होती. स्टुडीओ रंगमंचाची प्रेक्षक क्षमता साधारण १०० होती. द गिफ्ट नाटक तेथे होते. तिकिटावर आसन संख्या नव्हती. तेथे गेल्यावर नाटकाची माहिती देणारी पुस्तिका देण्यात आली ज्याला ते playbill म्हणतात. हा प्रकार मला आवडला. नाट्यगृहाच्या दारात काही कर्मचारी उभे होते. त्यांच्याशी मी गप्पा सुरु केल्या. ओघात असे समजले की वॉलनट स्ट्रीट थिएटर मध्ये नाट्यप्रशिक्षण वर्ग देखील चालतात. इंग्रजी एल आकारात आसनव्यवस्था होती. नाटकाचे नेपथ्य सुरेख होते. अगदी आपल्याकडे जसे प्रायोगिक रंगभूमीवर सारखी नाटके होतात, किंवा intimate theater सारखा सगळा माहौल होता.

The Gift नाटकात दोनच पात्रे होती. नाटकाचे लेखन Will Stutts यांनी केले आहे. आणि दोनच पात्रे निभावली आहेत Warren Kelley आणि Susan Riley Stevens या दोघांनी. आणि हे दोघेही रंगभूमीवरील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ कलाकार आहेत. वॉरेन यांनी To Kill Mocking a Bird सारख्या नाटकातून कामे केली आहेत, तर सुसान यांनी A Streetcar Named Desire मधून काम केले आहे. हे नाटक म्हणजे दोन लेखक मित्रांमधील संवाद आहे, जो घडतो १९५९ मध्ये आलाबामा मधील घराच्या पोर्चमध्ये. इंग्रजी साहित्यात Truman Capote and Harper Lee दोघेही गतकाळातील प्रसिद्ध लेखक आहेत, आणि एकमेकांचे स्नेहीदेखील होते. Harper Lee यांच्या To Kill Mocking a Bird यांच्या प्रसिद्ध कादंबरी लेखनामध्ये Truman Capote यांचा वाटा असावा असा जो प्रवाद आहे, ह्यावर हे नाटक आधारित आहे. साधारण ९० मिनिटे लांबी असलेले हे नाटक मस्त वाटले, संवाद, सहज अभिनय, एकमेकातील द्वंद ह्यामुळे ते खिळवून ठेवते.

न्यूयॉर्क मधील ब्रॉडवे रस्ता नाटकांसाठी तसेच संगीत नाटक(Opera) कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. तेथेही गेलो होतो. मला Broadway वर जमले नाही, पण Off-Broadway वर एक नाटक पाहायला जमले. त्याबद्दल नंतर कधीतरी. मराठीतील प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांनी लोकसत्ता मध्ये न्यूयॉर्क मधील ब्रॉडवे वर पाहिलेल्या नाटकांवरती एक लेखमाला काही वर्षांपूर्वी लिहिली होती, त्याचे पुस्तकही झाले होते, त्याची सतत आठवण होत होती.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

Wow nice! Thanks for sharing here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0