बेंजामिन फ्रँकलिनमय फिलाडेल्फिया

मार्च २०१७ महिन्याचा ललित मासिकाच्या अंकात गोविंदराव तळवलकर यांचा एक लेख आला आहे, त्याचे नाव आहे एका वाद्याचा गहिरा इतिहास. तो लेख Anglican Music नावाच्या एका पुस्तकाची माहिती देणारा आहे. ते वाद्य म्हणजे Glass Harmonica आहे, त्या वाद्यात बेंजामिन फ्रँकलिन याने बरीच सुधारणा केली असा उल्लेख आहे. मला नवल वाटले. मी नुकतीच फिलाडेल्फिया शहराला भेट दिली होती. तेथील संग्रहालयात हे वाद्य मी पाहिल्याचे आठवते मला. हा बेंजामिन फ्रँकलिन नावाचा माणूस महा-उपद्व्यापी. फिलाडेल्फिया शहरात ठिकठिकाणी त्याच्या संबंधित स्थळे आहेत. अवघे शहरच बेंजामिन फ्रँकलिनमय आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मी हा लेख लिहायला सुरु केला काही दिवसांपूर्वी. दोनच दिवसांपूर्वी बातमी आली की गोविदराव तळवलकर यांचे निधन झाले, आणि एका (संपादकीय)युगाचा अस्त झाला. त्यांची बरीच पुस्तके(प्रामुख्याने लेख संग्रह) मी वाचली आहेत. त्याबद्दल लिहावसे वाटत होते. आता त्यांच्या निधनाच्या निमित्ताने लिहीन केव्हातरी. तूर्त बेंजामिन फ्रँकलिन.

आधी थोडक्यात बेंजामिन फ्रँकलिन हा कोण आहे हे सांगतो आणि मग मूळ विषयाकडे येतो. १७०६ मध्ये बोस्टन मध्ये जन्म झाला आणि, वयाच्या १७व्या वर्षी तो फिलाडेल्फिया मध्ये आला. त्याने अनेकोनेक उद्योग केले. तो वेगवेगळे शोध लावणारा शास्त्रज्ञ होता, छपाई-तंत्रज्ञ, लेखक, संगीत जाणणारा, बुद्धिबळ खेळणारा, राजकारणी, मुत्सद्दी, व्यावसायिक, पोस्ट-मास्टर, अमेरिकेच्या स्वातंत्र्य-चळवळीत सक्रीय सहभाग त्याने घेतला होता(Declaration of Independence मसुदा बनवणाऱ्या समिती मध्ये तो होता), पेनसिल्व्हेनिया राज्याचा तो अध्यक्ष देखील बनला. त्याने अनेक संस्था स्थापन केल्या-अग्नीशामक दल, तत्वज्ञान मंडळ(American Philosophy Society, जे मी गेलो तेव्हा बंद होते), हॉस्पिटल, महाविद्यालये इत्यादी. त्याला Founding Father of America पैकी एक मानले जाते. अमेरिकेच्या जनमानसावर खूप मोठा परिणाम केला.

बेंजामिन फ्रँकलिन आणि फिलाडेल्फिया हे समीकरण खूप खोलवर आहे. माझ्या ह्या वेळच्या आणि गेल्यावेळच्या(२०१४) मधील फिलाडेल्फियाभेटी दरम्यान पाहिलेल्या वास्तू, संग्रहालये आणि इतर स्थळे, या पैकी कित्येक येनकेन प्रकारे त्याच्याशीच निगडीत आहेत. त्याचे पुतळे तर ठिकठिकाणी दिसत राहतात. रस्त्यापासून सुरुवात करूयात. Benjamin Franklin Parkway नावाचा महामार्ग आहे(Interstate 676) जो पूर्वेकडे न्यूजर्सी राज्यात डेलावेअर नदी वरील Benjamin Franklin Bridge वरून जातो. ह्या पुलाजवळच त्याच्या नावाचा Franklin Square नावाचा चौक आहे, जो फिलाडेल्फिया शहरातील William Penn ने स्थापन केलेल्या काही चौकांपैकी एक आहे.

The Franklin Institute आणि Franklin Museum तर पर्यटकांसाठी प्रसिद्धच आहेत. The Franklin Institute मध्ये त्याचे राष्ट्रीय स्मारक आहे. दर्शनी भागातच त्याचा पूर्णाकृती असा संगमरवरी भव्य पुतळा आहे. The Franklin Institute हे प्रामुख्याने science museum आहे. जे त्याच्या संशोधन वृत्तीलाच समर्पित आहे. याशिवाय तेथे Tuttleman IMAX 3-D theater आहे(तेथे मी पहिला). तेथे नव्यानेच Jurassic World हे नवीन प्रदर्शन सुरु झाले आहे, ज्याला अर्थातच लोकांची अलोट गर्दी होते आहे. The Train Factory नावाचे रेल्वे इंजिनाचे प्रदर्शन मस्त आहे. १९३३ मधील Baldwin Engine तेथे आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत अनेक वस्तू Independence Mall या भागात आहेत. त्यातील एक Independence Hall जेथे Declaration of Independence मसुद्यावर बेंजामिन फ्रँकलिन इतरांबरोबर सही केली. याच भागात Franklin Museum हे अमेरिकेच्या National Park System अंतर्गत National History Landmark आहे. मधील संग्रहालय आहे. त्याचे जीवन, तो कसा होता, त्याने लावलेल्या वेगवेगळया संशोधनाचे प्रात्यक्षिक, आणि अनेक interactive आणि multi-media वापरून हे संग्रहालय अतिशय छान आहे. एक गमतीचे प्रकरण सांगतो. बेंजामिन फ्रँकलिन ह्याला सांध्यांचा त्रास, gout, ज्याला म्हणतात, तो होता. त्याबद्दल एक exhibit तेथे होते. त्याचे खाण्या-पिण्यावर निर्बंध नव्हते, आणि त्याला हा त्रास त्यामुळेच झाला होता, हे त्याला माहिती होते. स्व-निर्बंधांवर त्याने(virtue of temperance) बरेच म्हणून ठेवले आहे, आणि हा त्याच्या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभास होता. त्याने ह्यावर एक गोष्टच लिहिली, तिचे नाव आहे Madame Gout. ह्या संग्रहालयाच्या आवारातच Franklin Court नावाचे प्रदर्शन आहे. हा सगळा भाग त्याच्या राहण्याचे ठिकाण होते. तळघरात त्याच्या वस्तू, त्याचा इमारतीच्या शिल्लक राहिलेले अवशेष, glass harmonica इत्यादी आहेत.

फिलाडेल्फिया शहरात बऱ्याच उंच इमारती आहेत. त्यातील एकावर, One Liberty Place Observation Deck, पर्यटकांना शहर वरून पाहता यावे याची सोय केली आहे. इमारतीच्या ५५व्या मजलावर जावे लागते. तेथे देखील Franklin Museum याचा निळ्या रंगातील geometric head(भूमितीय मस्तक) आहे. अजूनही बऱ्याच वास्तू त्याच्याशी निगडीत आहेत, ज्या मी पाहिलेल्या नाहीत, जसे की पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ, अग्निशामक दल, Franklin Fields, Post Office, इत्यादी. त्यांचे वास्तव्य फिलाडेल्फियामधील मार्केट स्ट्रीट(जो जुना आणि प्रमुख रस्ता आहे) येथे होते, त्यांचे निधन देखील फिलाडेल्फियामधेच १७९० मध्ये झाले. तर असे हे बेंजामिन फ्रँकलिनमय फिलाडेल्फिया शहर. हे सर्व पहिल्या नंतर, त्याच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हावेसे वाटते.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet