सुभाषितोपदेश

तो काळ असा होता की प्रश्नांचा नुसता पूर, आणि मी उपायांना कंटाळत आलो होतो. Because nothing was fruitful! Nothing was coming by my way! आणि माझी हालत पाहून घरून-मित्रांकडून सल्ल्यांचा पाऊस! आई त्यादिवशी चक्क इच्छा नसताना एका महाराजांकडे घेऊन आली. “What is this आई?! इथे कशाला घेऊन आली आहेस मला ? म्हटल ना , आजच्या जगात गुरू-बिरू-मार्गदर्शन वगैरे मला पटत नाही !” “थोड थांबशील का? धीर धर !” “तू आणि बाबांनी कष्टाने Engineer बनविल! ते काय असे दुसऱ्यांच्या मताप्रमाणे चालायला ?! करेन ना प्रयत्न, थोड एकट सोडलं असतस तरी सगळ सुरळीत झालच असत. कसले गुरू आणि कसले काय ? तुझ्या आग्रहास्तव इथ माझ येण अखेरचं!” तेव्हढ्यात पांढऱ्या दाढीचा, पण आनंदी, प्रसन्न मुद्रा असलेला एक मनुष्य त्याच्या नेहमीच्या आसन असलेल्या बाकावर येउन बसला. स्वच्छ शुभ्र वस्त्र त्याने परिधान केलेलं होत. बाकावरच साहित्य म्हणजे पुस्तके, कागदी चिटोरे आणि काही पेन. आईने आधी कल्पना दिल्याप्रमाणे हे महाराज प्रश्नांची उत्तरे श्लोकांत द्यायचे आणि ते देता देता काही मंत्र लिहून द्यायचे. मनात आल, काहीतरी ‘हटके’ करावच लागतं market मध्ये टिकायचं असेल तर ! म्हणून ह्यांनी ही अशी शैली वापरली असावी. “महाराज! माझ्या मुलाच्या .. “ आईस तिथेच हाताचा पंजा दाखवून थांबवून महाराज म्हणाले, “प्रश्नातच उत्तर ! आणि उत्तरात नवीन प्रश्न. स्वतःत शोध घेतला की कसल्या तक्रारी ? आणि कसलं काय ?” त्या माणसाचा असा drama पाहून माझाही ‘राग’ अनावर होत होता. “माझी छोटीशी विनंती म्हणून माझ्या मुलाला मार्गदर्शन करा!” — आई म्हणाली. बऱ्याच वेळापासून माझ्यातला धगधगत असलेला ज्वालामुखी अखेर फुटला आणि मी आईकडे उद्वेगाने पाहत मनोमन म्हटले, ‘आपल्या घरचे, वैयक्तिक, कौटुंबिक गोष्टी परक्याला कशाला सांगायचे?!’ जरा चिडूनच बोलता झालो- “ओ महाराज ! तुम्ही काय ते उपवास/गंडा-दोरे वगैरे माहिती पटकन द्या.. कुठल कवच म्हणू ते ही सांगून मोकळ करा.. “ आईला पटकन आवरण्यासाठी खाणा-खुणा केल्या. महाराजांनी किंचित प्रसन्न मुद्रेने स्मित हास्य दर्शवले. डोळे मिटून काहीतरी मंत्र म्हणाले -
“क्रोधो मूलमनर्थानां क्रोधः संसारबन्धनम् |
धर्मक्षयकरः क्रोधस्तस्मात्क्रोधं विवर्जयेत् ||”
“म्हणू का हे तुमच्या मागून?” — मी तिरस्कारी सुरातच.. “अहो! गोत्र वगैरे तर तुम्ही विचारलेच नाही !” “अरे! तुझ्या जिभेला काही हाड ?!” — आई “आई, असे खूप पाहिलेत आजपर्यंत! तुझ्या हट्टापाइ इथ आलोय. बघूया तुझे महाराज माझ्या प्रत्येक प्रश्नाच उत्तर देऊ शकतात का नाही ते ! काय महाराज ? विचारु?” — मी म्हणालो “मी माझ्या कुवतीनुसार तर नक्कीच प्रयत्न करेन पण तु समजून घेशीलच असे नाही! महाराज जरा हसतच म्हणाले. “आता बघुया माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्याजवळ आहेत का ते ! १. काळज्या संपवू शकाल माझ्या ? loan, हप्ते, नोकरीमध्ये काळजी ! कधीपर्यंत होईल सगळ नीट ? महाराजांनी डोळे मिटले. उच्चारले -
“चिन्ता चिता समानाऽस्ति बिन्दुमात्रविशेषतः | सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता ||”
आणि कागदी चिटोऱ्यावर शब्द लिहू लागले. “वाह! काय उत्तर आहे ! तुमच्या ह्या व्यवसायात उत्तरे सुचली नाहीत की असाच वेळ मारून नेता वाटत तुम्ही!” — मी म्हणालो २. मी, माझे सहकारी सगळे आमच्या बॉसच्या गैरव्यवहारास वैतागलो आहोत! मीच काय, Unit मध्ये कुणीही काय ‘हु-की-चू’ करू शकत नाही. काही करायचं म्हटलं की नोकरीवरच गदा ! कामाच्या अति-व्यापामुळे संतापून आम्हा सहकार्यांतही कुणाचे-कुणाशी निट जमत नाही! काम आवडीचे असले तरी मनाप्रमाणे वातावरण नसल्याने काम करण्याची इच्छा होत नाही. समजू शकता तुम्ही ही समस्या ?! करू शकता समाधान ?! महाराज शांतपणे ऐकून पुन्हा श्लोक म्हणू लागले आणि तसेच लिहू लागले -
“परस्परविरोधे तु वयं पञ्च च ते शतम् | परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतम् || “
बघितलस आई ? बोलता आल नाही की हे असे लोक श्लोकांच पठण करून विषयांतर करतात. काय महाराज ? बरोबर ना ?! internetच्या काळात कुठे घेऊन येतेस मला! मोठ्या समस्या सोडाच हो! छोट्या समस्या पहा, घरमालकाला १ दिवस rent द्यायला उशीर झाला ! की त्याची कटकट .. २ दिवस कामाला जाताना थोडा उशीर झाला की कंपनीत लोकांची कटकट. अरे रोज उशीर होतो काय ? कधीतरी होतो ! आता अश्या गोष्टींमुळ irritation होत. करू शकता उपाय ? उत्तर आल -
“आदानस्य प्रदानस्य कर्तव्यस्य च कर्मणः |
क्षिप्रमक्रियमाणस्य कालः पिबति तद्रसम् ||”
बर हे सगळ जाऊ द्या हो ! अंगठी नाही सुचवली ? त्यात खडा कोणता घालू हे ही नाही सुचवलेत आपण ! गळ्यात काही घालायला देणार का मंतरलेले ?!
“हस्तस्य भूषणं दानं सत्यं कण्ठस्य भूषणम् |
श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणैः किं प्रयोजनम् ||”
चल आई! महाराजांचा श्लोकांचा stock संपत आला असेल! आपल्यामुळे संकट नको त्यांच्यावर. आईने गडबडीने ते श्लोक मागितले, जणू माझ्या हाती पडताच मी त्या कागदी चिटोऱ्या तिथल्या तिथे मुठीत आवळून dustbin मध्ये टाकूनच देईन असे तिला वाटले असावे. महाराजांनी कमालीची संतुष्टी दाखवून ते लगेच देऊनही टाकले. “पैसे किती झाले?” नुसतेच हसून महाराजांनी नामस्मरण करत करत डोळे बंद केले. आणि ध्यानस्थ जाहले. “चला .. दुरूनच नमस्कार !” मी लागलीच निघालो त्यानंतर अनेक दिवस गेले. पण माझ्या प्रश्नांचा गुंता काही सुटत नव्हता! त्या श्लोकांकडे मी लक्षच देत नाही पाहून आई मात्र उगाच म्हणत राहायची. जेणेकरून मी त्या श्लोकांना seriously घ्यायला चालू करेन. एक दिवस म्हटल, काय अर्थ असणारे त्या श्लोकांचा असून असून? देवांची स्तुती, मला ऐश्वर्य लाभो, संपत्ती लाभो, आयुष्य लाभो अश्या याचना दुसर काय ?! कामावरून घरी आल्यावर FB वर एका मित्राला ping केल, जो संस्कृतचा शिक्षक-अभ्यासक होता. त्याला म्हटलं, मला ह्या श्लोकांचा अर्थ सांग. दुसऱ्या दिवशी त्याने मला श्लोकांचे अर्थ पाठवले आणि “Thank you so much” असे पाठवले, मी म्हटलं, का रे बाबा अस काय केल मी ? तो उत्तरला- “तू दिलेले श्लोक सुभाषिते आहेत. अनेकदा वाचलेले असे विचार! पण रोजच्या व्यापामुळे विसर पडलेली काही तत्त्वे नव्याने मनी बांधली गेली !” मला जरा आश्चर्य वाटले. मी त्याचा अर्थ वाचावयास प्रारंभ केला. पहिल्या श्लोकाचा अर्थ होता -
“संताप हे संकटांचे कारण आहे. राग हे संसाराच्या [जन्ममरणाच्या] बंधनाचे मूळ आहे. संतापामुळे धर्माची हानी होते [संताप झाल्यामुळे शाप दिला तर सगळं तप वाया जाते शिवाय त्यापायी परमेशाच्या भक्तीत व्यत्यय येतो] म्हणून रागावणं संपूर्णपणे सोडून द्यावं.”
एकंदर मी त्यावेळेस रागात होतो आणि त्यास अनुसरून महाराजांनी ‘राग करू नको’ अश्या आशयाच सुभाषित म्हटलेल! अर्थात ! त्यावेळी ‘निरर्थक’ अस ते काहीच म्हटले नव्हते ?! महाराजांना मी जे जे प्रश्न विचारले त्या अनुषंगाने मी सुभाषितांचा मतितार्थ लावीत गेलो. पहिला प्रश्न होता, “काळज्या संपवू शकाल माझ्या ? loan, हप्ते, नोकरीमध्ये काळजी ! कधीपर्यंत होईल सगळ नीट ?” त्यावर त्यांनी म्हटलेल्या सुभाषिताचा अर्थ होता-
“चिन्ता आणि चिता सारखी आहे फरक फक्त अनुस्वाराचा. चिन्ता [काळजी] जिवंत माणसाला जाळते तर चिता जीव निघून गेल्यावर [मृताला] जाळत.”
तात्पर्य? ‘चिंता करणे व्यर्थ’! Keyboard ला चिकटलेल्या माझ्या हातांस घाम फुटला. मनात एक अपराधीपणाचा भाव येउन गेला. मला माझ्याच त्या दिवशीच्या वागण्याचा राग आला. पण महाराजांचा पहिला सल्ला ‘राग कमी करण्याबाबत’ असल्याने मी रागावर मात करण्याचे ठरवले. माझ्या कामानिमित्त मी विचारलेला दुसरा प्रश्न माझ्या बॉसच्या गैरव्यवहाराबाबत होता. त्याचे उत्तर होते -
“एकमेकात भांडण झाल्यास, आपण [पांडव] पाच आणि ते कौरव शंभर आहेत. पण दुसऱ्या [शत्रूशी] युद्ध असताना आपण एकशे पाच [पांडव अधिक कौरव] आहोत.”
थोडा विचार करून interpret करायच म्हटल- तर आम्हा सहकार्यांमधली भांडणे मिटवून, एकीने त्या बॉसला विरोध करण्याचा सल्ला महाराजांनी दिला होता. तिसरा प्रश्न तर प्रश्न नव्हताच मुळी ! माझ्याच चुकांवर अहंकार जडल्यागत मी माझ्या punctual नसण्याचे, कर्तव्यतत्पर नसण्याचे उदाहरण त्यांच्यासमोर उपस्थित करीत होतो. keyboard वरचा हात मी मानेमागे नेला आणि स्वतःच्याच डोक्याला एक छोटीशी टपली मारली. पण त्याचेही उत्तर देऊन महाराजांनी मला लाजवले! त्या उत्तरासाठी त्यांच्या सुभाषिताचा अर्थ होता -
“देणं, घेणं ,कर्तव्य या गोष्टी लगेच न केल्या तर त्यातील गोडी काळ खाऊन टाकतो.”
मला इतरांच्या माझ्यावरील रोषाचे कारण कळून चुकले. Problem कोणतही नव्हता! होता तर माझ्यातच. बाकीच्यांच्या चुका काढण्याचा अधिकारच कुणी दिला मला ? जोपर्यंत मीच ठार चुकीचा आहे ! सगळ्या चुका सुधरवण्याचे आणि महाराजांसाठी काहीतरी करण्याचे मनोमन ठरवले. अंगठी वगैरेच्या प्रश्नावर त्या सत्पुरुषाचे उत्तर होते -
दान [करणे] हा हाताचा अलंकार आहे. खरे [बोलणे] हा गळ्याचा अलंकार आहे. शास्त्रांचा [अभ्यास करणे] हा कानाचा अलंकार आहे. [दुसऱ्या] अलंकाराची जरूरच काय?
आणि अश्या माणसाला मी “पैसे किती?” विचारले? त्याच्या सज्जनतेचे, महत्तेचे ‘मुल्य’ विचारून अवमुल्यन केले नाहीतर काय ? निस्वार्थ भावनेने केवळ कर्म करणाऱ्या त्या महान मनुष्याचा मी अवमान करून आलो होतो. मनोमन ठरवून त्यांनी दिलेले सल्ले प्रत्यक्षात अंमलात आणूनच, यशस्वी होऊन त्या महापुरुषास भेटावयास जाईन, आभार मानावयास जाईन असे ठरवले. आणि बघता बघता सगळे प्रश्न सुटत गेले! आणि नवे प्रश्न पडत गेले ! अगदी त्या सत्पुरुषाने म्हटल्याप्रमाणेच ! मला मराठीतूनही हेच सल्ले देता आले असते. त्याकाळी मी अशांत होतो हा माझाच मूर्खपणा! पण सुभाषिते सांगून मला उत्तरे देण्याचे व अवमान पत्करण्याचे काय कारण ? काहीतरी भेटवस्तू घ्यायची म्हणून मी ‘शाल’ घेऊन महाराजांच्या निवासस्थळी भेटावयास गेलो. पाहतो तर तिथे कोणीही नव्हते. नुसतं बाकड ! आणि त्या बाकावर एक कागदाचा चिटोरा व पेन होता.

त्यावर लिहिले होते-
ज्ञानतृष्णा गुरौ निष्ठा सदाध्ययनदक्षता | एकाग्रता महत्त्वेच्छा विद्यार्थिगुणपञ्चकम् || ज्ञानं प्रधानं न तु कर्महीनं कर्मप्रधानं न तु बुद्धिहीनम् |
तस्माद्द्वयोरेव भवेत्सुसिद्धिर्न ह्येकपक्षो विहगः प्रयाति ||

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आव‌ड‌ले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुभाषिते ठीक‌ आहेत .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||