आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग २)

भाग १

सधन ब्राह्मण जमीनदार कुटुंबातील एकुलता एक मुलगा परदेशी शिक्षणासाठी जातो. त्याचे नाव जगन्नाथ. तिथे एका भारतीय वंशाच्या आंग्ल युवतीबरोबर लग्न न करता राहतो. मद्यपान आणि मांसाशन करतो. क्रांतीच्या गप्पा मारतो. पण तो सगळ्यांशी जुळवून घेत खोटे खोटे जगतो असे त्याला कायम जाणवत असते. ई एम फॉर्स्टर या नोबेल पारितोषिकविजेत्या लेखकाच्या विचारांचा तो अभ्यास करत असतो. पण वर्गकलह आणि दांभिकपणा या फॉर्स्टरच्या लेखनविषयाबाबत तो स्वतःची म्हणता येतील अशी स्वतंत्र मतेदेखील तयार करू शकत नसतो. त्या मागचे कारण म्हणजे आपण आयुष्याला सर्वांगाने जाणत नाही, केवळ पुस्तकांतून ओळखतो, हेच असावे असे त्याला वाटते.

केवळ हमरस्त्याने जाणाऱ्याला जंगलातल्या आडवाटा, चोरवाटा माहीत नसतात त्यामुळे त्याला सगळे जंगल समजत नाही’ याची त्याला जाणीव झालेली असते. एके दिवशी त्याची प्रेयसीदेखील त्याच्या स्वभावातील खोट्या मनमिळावूपणाबद्दल त्याला सांगते, आणि आपल्या व्यक्तिमत्वाला टोकदारपणा नाही हे त्याचे दुःख अजूनंच तीव्र होते. शेवटी स्वतःच्या स्वभावातील दुबळेपणा मोडून काढण्यासाठी आणि जीवनाला समग्रपणे भिडण्यासाठी भारतात आपल्या जन्मगावी परत येतो.

त्याच्या गावाचे नाव भारतीपूर. आईचे शीर ज्याने धडावेगळे केले तो परशू तुंगा नदीच्या पाण्यात धुवून परशुराम जिथे आपले पापक्षालन करतो त्या तीर्थहळ्ळीजवळ अनंतमूर्तींनी भारतीपूर वसवले आहे. परशुरामानेच गावात मंजुनाथाच्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केलेली आहे असा विश्वास असतो. या मंदिराला जगन्नाथाचे पूर्वज विश्वस्त होते. मंजुनाथाच्या देवळातील अख्ख्या गावाला ऐकू जाईल अशी घंटा त्यांनीच दिलेली असते. त्याशिवाय, जगन्नाथाच्या लहानपणी तो मृत्युशय्येवर असताना, मंजुनाथाला सोन्याचा किरीट देण्याचा नवस बोलून त्याच्या आईने त्याचे प्राण वाचवलेले असतात. आणि मग तो नवस फेडलेला देखील असतो.

गावात असते जगन्नाथची पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रचंड मोठी केळीची आणि पोफळीची बाग. त्याच्या बागेत असतात काम करणारे असंख्य शूद्र आणि त्यापैकी एका शूद्राची नजरेत भरणारी,अंगचटीला येणारी धीट मुलगी, कावेरी. प्रचंड मोठ्या घरात असते त्याची सकेशी विधवा काकू, चिक्की. इस्टेटीवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेला बेरकी कारकून, शानभोग शास्त्री.

त्याशिवाय गावात असतात; सदैव चुलीच्या धुराने भरलेल्या घरात राहणारे, वैतागलेली बायको, लग्न न झालेली कमवती मुलगी आणि बेरोजगार मुलगा असा संसार ओढत खादी भांडार चालवणारे ध्येयवादी आणि गांधीवादी कुटुंब मार्गदर्शक, श्रीपतीराय. विधवा असूनही गरोदर राहिलेल्या बहिणीला दारात ठेवून घेणारे आणि दोन लग्ने करून असंख्य मुलांना जन्म देऊन देवावर भरोसा ठेवून स्वस्थ असणारे, पायावर चक्र असल्यासारखे भारतभर भ्रमंती करणारे त्याचे धार्मिक मार्गदर्शक, सुबराय अडिग. गावाबाहेर स्वतःच्या विश्वात रमणारे, केवळ रेडिओ वापरून जगाशी संपर्क टिकवून ठेवलेले आणि विधवा विवाह करून वाळीत पडलेले समाजसुधारक, राघव पुराणिक.

मंदिरात असतात मंजुनाथाचे सोने चोरून घरासाठी वापरणारे पुजारी सीतारामय्या , बायको असूनही स्त्रीसुखाला वंचित राहिलेला आणि येता जात वडिलांचा मार खाणारा त्यांचा तोतरा मुलगा गणेश. याशिवाय सीतारामय्यांच्या अधिकारावर डोळा असलेला त्यांचाच भाऊबंद नागराज जोईस आणि मंदिराचे नवीन विश्वस्त प्रभू या व्यक्ती भारतीपुरच्या कथेला आकार देतात.

शूद्र गावाच्या वेशीबाहेर रहात असतात. डोक्यावरून मैला वाहून नेण्याची पद्धत अजून गावात प्रचलित असते. त्यामुळे शिवाशीव आणि अस्पृश्यता भारतीपुरात सगळेजण पाळतात. आणि ब्राह्मण जर शूद्रवस्तीत आला तर वस्ती नष्ट होईल म्हणून ब्राह्मणांनी शूद्रवस्तीत येऊ नये असा नियम करून, शूद्रांना अस्पृश्य करणाऱ्या ब्राह्मणांना आपल्या बाजूने तेही अस्पृश्य करून टाकतात. जुन्या काळी रस्त्यातून बाजूला होणारे आणि अंग चोरून उभे राहणारे शूद्र आता अंगणात येत असले तरी नजरेला नजर देत नाहीत आणि पडवीतही येत नाहीत. त्यामुळे त्यांना मंदिरप्रवेश निषिद्ध हे तर ओघाने आलेच. जिल्ह्याचा पोलीस प्रमुख शूद्र असला तरी गावातील शूद्रांची अवस्था दरिद्रीच असते. शूद्रांच्या अंगावर लंगोटाशिवाय वस्त्र नसते. स्वतः पोलीस प्रमुख आपले शूद्र संस्कार पूर्णपणे झुगारून देऊ शकलेला नसतो. ब्राह्मण कारकुनावर रोज ऑर्डर सोडून तो स्वतःचे समाधान करून घेत असतो, पण जगन्नाथ त्याला भेटायला गेल्यावर मात्र त्याला ब्राह्मण कारकुनाकडची कॉफी मिळेल याची व्यवस्था करतो. आंबेडकर, नेहरू आणि गांधीजी यांचे फोटो लावलेल्या त्या आधुनिक सरकारच्या कार्यालयात जातीभेदाची प्राचीन संस्कृती सर्वत्र वावरत असते.

भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet