हिंदू संस्कृतीचे अभ्यासपूर्ण विश्लेषण

काही वर्षापूर्वी प्रसिद्ध साहित्यिक व्ही एस नायपॉल यांनी भारताच्या विदारक स्थितीला ‘प्राणांतिक जखम झालेली संस्कृती’ (wounded civilization) असा उल्लेख केला होता. परंतु Culture Can Kill या इंग्रजी पुस्तकाचे लेखक, एस सुबोध यांच्या मते या संस्कृतीवरील जखम कधीच बरी न होणारी आणि शेवटपर्यंत क्लेशदायक ठरणारी आहे. या मरणासन्न जखमी अवस्थेवर वेळीच तातडीचे उपाय न केल्यास मृत होण्याची शक्यता जास्त आहे. खरे तर ही स्मशानयात्रा किती खर्चिक असणार आहे, याचाच आता विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अशा प्रकारची विधानं अनेकांना दुखी करतील वा वाचताना रागही येईल. महासत्ता होण्याचे (2020 साली की 2025, की 2030...) स्वप्न पाहणाऱ्या या देशाबद्दल असे काही तरी बाष्कळ, थिल्लर वा तिखट उल्लेख करणाऱ्यांना काय शिक्षा होईल याची कल्पनासुद्धा करवत नाही. परंतु पुस्तकाच्या पहिल्या पानापसून शेवटच्या पानावरील टीकाटिप्पणीपर्यंत वाचत गेल्यास लेखकाच्या म्हणण्यात मतितार्थ आहे, असे वाटू लागेल.

या पुस्तकाचे लेखक, एस सुबोध येथे भारत वा भारतीय संस्कृतींना सूचित करणारे धर्म, श्रद्धा, परंपरा वा धर्मग्रंथ इत्यादीमधील घोडचुकांना दूषण देत नाहीत. त्यांचे लक्ष्य आपल्या समाजाला घडविणाऱ्या संस्कृतीबद्दल आहे. व हीच संस्कृती आपल्या सामाजिक व्यवहारांना नियंत्रित करत असल्यामुळे ती समजून घेणे गरजेचे आहे. कुमार केतकर यांनी प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे सुबोध हे मूलगामी बंडखोर विचारवंत आहेत. आपल्या देशाच्या गेल्या 40-50 वर्षापासूनच्या वाटचालीविषयी ते चिंतित आहेत. त्यांना आपल्या एकसंध देशातील धार्मिक विघटन अस्वस्थ करत आहे. हिंदू बुद्धिवंतामधील धार्मिक व सांस्कृतिक दुराग्रह, धर्मनिरपेक्षतेवर निष्ठा असलेल्या या लेखकाला अपराध्यांच्या कठड्यात उभे करत आहे. त्यांच्या मते या बुद्धीवंतांची संकुचित दृष्टी व मनाचा कोतेपणा भारतीय गतवैभवाला विकृत स्वरूप देत आहे. डॉ. अनिल काणे यांनी या पुस्तकाविषयी लिहिताना केवळ ‘आपण हिंदू’ यांनाच फक्त या गोष्टी लागू होत नसून कुठल्याही धर्माच्या अनुयायांना तितक्याच प्रमाणात लागू होतात असे म्हटले आहे. धर्म कुठलाही असो, त्यात अंधश्रद्धांची विपुलता व मूर्तीपूजा अटळ असतात. मग ती मूर्ती, क्रूस, काबा, मझर, चर्च, मशीद, विहार वा सिनेगॉग यापैकी कुठलाही असला तरी त्याला अपवाद नाही.

हे पुस्तक मी का लिहिले? या लेखकाच्या विवेचनात लेखक मला यातून कुठलाही फायदा नाही वा मला कुठल्याही सिद्धांताचे, तत्वाचे समर्थन करायचे नाही असे स्पष्टीकरण देतात. फक्त शंभर कोटीच्यावर जनसंख्या असलेल्या या अवाढव्य समाजात एखादा आशेचा किरण दाखवण्यासाठी बौद्धिक श्रम घेणे वा धोका पत्करणे यात गैर नाही, असे त्यांना वाटते.

आपल्या समाजाला खाईत लोटणाऱ्या संस्कृतीच्या संबंधातील सर्व बाबीबद्दल अभ्यासपूर्वक टीका-टिप्पणी लेखकांनी केली आहे. संस्कृतीला आकार देणाऱ्या आपल्या रूढी, परंपरा, मानत असलेली जीवन मूल्ये, विचार करण्याची, वाद-विवाद करण्याची पद्धत, त्यातून व्यक्त होणारी मानसिकता इत्यादीबद्दल विचार करून ते काही निष्कर्ष मांडण्याचे प्रयत्न करत आहेत. यातील गुणदोषामुळे आपण या स्थितीला पोहोचलेलो आहोत असे त्यांचे स्पष्ट मत आहे. आपल्या संस्कृतीच्या अधोगतीला प्रामुख्याने आपल्या समाजात मूळ धरून बसलेला दैववाद, आत्मसंतुष्टता, सारासार विचार न करण्याची वृत्ती, अंधानुकरण, पारमार्थिक सुखाची ओढ, अध्यात्माविषयी नको तितकी उत्सुकता, श्रद्धा-अंधश्रद्धाचा सुळसुळाट, दारिद्र्यांचे समर्थन, वैचारिकतेविषयी तात्सार, उत्स्फूर्तता, अविवेकी वर्तणूक, तथाकथित सन्यस्तवृत्ती इत्यादी बाबी कारणीभूत ठरत आहेत असे लेखकाला वाटते. लेखक केवळ ही लांबलचक यादी देत नसून या प्रत्येक गुणविशेषाबद्दल मूलभूत विचार करण्याचे आवाहन वाचकांना देत आहेत. केवळ मत न देता पुराव्यानिशी सिद्ध करण्याचे प्रयत्न ते करत आहेत. मत कितीही अनुकंपायुक्त असले तरी युक्तीवाद करण्यास ते तोकडे पडते, याची कल्पना त्यांना आहे.

एखाद्या निष्णात शल्यविशारदाप्रमाणे आपल्या समाजाला लागलेल्या या अधोगतीच्या रोगाचे निदान करण्यासाठी लेखक फार खोलात जावून व त्यातील प्रत्येक बारीक सारीक बाबींचा अभ्यास करत या रोगावर नेमके काय उपचार करायला हवे याची कल्पना ते देत आहेत. माध्यमातून होत असलेले उदात्तीकरण, तथाकथित हिंदू बुद्धीवंत करत असलेला बुद्धीभेद व शासनसंस्थाकडून होत असलेले लांगूलचालन इत्यादीमधून व्यक्त होत असलेली आपल्या संस्कृतीची प्रतिमा बाजूला ठेवल्यास आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे, याचे चित्रण लेखक येथे करत आहेत. खेड्याच्या बाहेर असलेल्या ओबड धोबड दगडाला शेंदूर फासून शीतलादेवी, संतोषी माता वा मरीआई म्हणून पूजल्या जात असलेल्या मानसिकतेचे उदात्तीकरण होताना लेखकाना कसेनुसे वाटते. गंमत म्हणजे या गोष्टींचे समर्थन करणारे नेहमीच आम्ही अंधश्रद्ध नाही असे छातीठोकपणे सांगत असतात याचे लेखकाला सखेदाश्चर्य वाटते. म्हणून ते चिडचिड व्यक्त करतात. भूतकाळातील स्मृतीरंजन, रूढी-परंपरांचे तंतोतंत पालन, यातच समाधान मानणाऱ्या या समाजातील सामान्यांचे (व शिक्षितांचेसुद्धा!) भवितव्य उज्वल नाही. शिक्षित वर्गाला या मृतप्राय घोड्याला चाबकाचे फटके देणे पसंत नाही. लेखकालासुद्धा फटके देवू नये असे वाटत असले तरी या मृत घोड्याच्या शवाचे विच्छेदन करून त्यातून काही शिकण्यासारखे आहे का याचाही विचार झाला पाहिजे असे वाटते. या विच्छेदनातून आपल्या रोग निदानात काय चूक झाली, आपल्या देशाचे कशामुळे वाटोळे झाले, इत्यादींची नक्कीच कल्पना येईल. परकीय आक्रमणातून उद्भवलेली गुलामगिरीसदृश मानसिकता, अंधानुकरण, मेंढरासारखे वर्तन, कशावरही चटकन विश्वास ठेवण्याची उत्सुकता इत्यादींचे विश्लेषण करणे शक्य होईल.

21व्या शतकातसुद्धा आपला समाज अजूनही अपमानवी (subhuman) पातळीवरच आहे याचे लेखकाला वाईट वाटते. शहरी भागात राहणारा समाज आपण मागासलेले आहोत हेच मुळी कबूल करायला तयार नाही. ज्याला काही माहित नाही, त्याला माहिती करून घेण्याची इच्छाच नसल्यास आपल्या माहितीचा काडी इतकाही उपयोग होणार नाही. त्यांना कूपमंडूकवृत्तीतून बाहेर कसे काढणार? शहामृगासारखे वाळूत डोके खुपसून घेतलेल्यांच्या पुढे डोके फोडून घेऊनही उपयोग होणार नाही. कुठलेही पुरावे त्याना खोटेच वाटतील. सर्व आकडेवारीत चलाखी वाटत राहील.

एक मात्र खरे की या समस्यांना उत्तरं आहेत याची पूर्ण कल्पना त्यांना आहे. फक्त समस्या आहेत हे जाहीरपणे सांगण्यात कुचराई केली जाते. आपल्याला या समस्यांना सामोरे जाण्यासाठी धैर्य हवे आहे. परंतु त्याचीच कमतरता जाणवत आहे. आपण स्वतःला खाली पाडून पाहू शकत नाही. त्यामुळे स्वाभिमानाला धक्का बसू शकतो. म्हणून ही कूपमंडूकवृत्ती जोपासली जात आहे. विचारी माणूस भारताच्या समस्याबद्दल नक्कीच अवगत असेल. परंतु जाणून बुजून अलीकडील व पुरातनकाळातील मिथकांच्यातच रहायचे असे ठरवलेले असल्यास सत्य सांगणाऱ्यालाच मूर्खात काढत आहेत.

लेखक इतिहासातील दाखले देत पुराणमतवाद्यांच्या स्वप्नरंजनाचे भंग करत आहेत. गंमत म्हणजे काही अपवादात्मक गतवैभवांची उदाहरणं सोडल्यास अभिमान वाटावे असे तेथे काहीच नाही. आपला इतिहास म्हणजे आपल्या सरळपणाचा फायदा घेणाऱ्यांची कथा नाही. हजारो वर्षे आपल्याला लाथा-बुक्क्यानी बुकलून, मारझोड करून आपले सर्व हिसकावून घेत, प्रसंगी जिवे मारणाऱ्यांची शौर्यकथा आहे. किती वेळा दिल्लीवर आक्रमण झाले? किती देवळांची लूटमार झाली? किती संपत्ती देशाबाहेर गेली? याची मोजदादच नाही. आपण युद्ध हरलो, आपला प्रदेश बळकावला गेला, आपल्याला गुलामासारखे वागवले, आपल्या आत्माभिमानाला धक्का दिला, या सगळ्या नामोहरम करणाऱ्या गोष्टींचे दाखले समोर असताना कुठल्या तोंडाने आपल्या गतवैभवाचे गुणगान करायचे, हा प्रश्न लेखकासमोर आहे. हे हार-जीत मनाचे खेळ आहेत, असे समजून आपण आपले समाधान करून घेत असतो. आपले तथाकथित विचारवंत आणि त्यांच्या विधानांचे उदात्तीकरण करणारे मतलबी राजकीय नेते इतिहास, मिथके व पुराण यात फरकच करत नाहीत. त्यांची सरमिसळ करण्यातच ते धन्य मानतात. भूतकाळ आपल्या भविष्याला अंधुक बनवतो, वर्तमानाला वाकुले दाखवतो आणि भविष्याविषयी गोँधळ निर्माण करतो. त्यामुळे आपण आपल्या समोरील समस्यांचे नीटपणे आकलनच करू शकत नाही.

कुठल्याही कंपनीच्या समभागांची विक्री-खरेदी करत असताना बारीक अक्षरात मागील ताळेबंद भविष्यात तसेच असेल याची खात्री देता येत नाही असा धोक्याचा इशारा दिलेला असतो. तशाच प्रकारे इतिहासातील पराक्रमाचे दाखले भविष्यातील उज्वलतेची खात्री देत नाहीत, याची आठवण लेखक करून देत आहेत. परंतु आपण भारतीय, एकमेकावर दोषारोप करण्यात प्रख्यात आहोत. आम्हाला उत्तर माहित आहे, परंतु आमचे हात टेकले आहेत, आम्ही काही करू शकत नाही, हाच पवित्रा नेहमीच आपला असतो. समस्यांना सामोरे जाण्यापेक्षा, उणीवावर मात करण्यापेक्षा, जबाबदारी उचलण्यापेक्षा आपण हात बांधून बघत बसतो. इतर सगळ्यावर आरोप-प्रत्यारोप करत सुटतो. आणि त्यातही आपण नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करत असतो. हे असेच होणार होते, आपला उपाय नव्हता, लढाईची तयारी पूर्ण झाली नव्हती, हे कलियुग आहे म्हणून असे घडले.... असे काही तरी सांगत वेळ मारून नेण्यात आपण हुशार आहोत. राजकारण, सत्ताकारण, दुबळे नेतृत्व, भ्रष्टाचार, अशिक्षितपणा, प्रचंड लोकसंख्या इत्यादींच्यावर दोष ढकलून मोकळे. अशा प्रकारच्या लंगड्या सबबीबद्दल लेखक चांगलाच समाचार घेत आहेत. सामान्यांची दिशाभूल कशाप्रकारे केली जाते याचे सविस्तरपणे उल्लेख करतात. हा दोषारोपाचा खेळ पुरातन काळापासून चाललेला असून यात बहुतेक सगळे सामील झालेले होताना दिसतात. आपल्या समाजाच्या आजारपणाची लक्षणं शोधण्याचा प्रयत्न लेखकानी येथे केला आहे.

आजारपणाची कारणं शोधत असताना आपण कुठे व केव्हा चुकलो याचा आढावा लेखक घेत आहेत. लेखकाच्या मते आपली संस्कृती प्रामुख्याने धर्माशी निगडित असून धार्मिक अनुभवापासून त्याला वेगळे करता येत नाही. त्यामुळे आपल्या सर्व समस्या धर्म, अध्यात्म आणि या दोन्ही गोष्टीतील आपली भावनात्मक गुंतवणूक यांच्यातून निर्माण झालेले आहेत. आपण नेहमीच मिथकं व चमत्कारसदृश गोष्टीवर चटकन विश्वास ठेवत असतो. कार्यकारणभाव तपासण्याइतके कष्टही आपण कधी घेत नाही.

आपल्या समाजाचे इतर काही प्रगत समाजाशी तुलना केल्यास त्या समाजाने धर्म, रूढी, परंपरा इत्यादींना केव्हाच टाकून पुढे गेले आहेत हे लक्षात येईल. त्या समाजापासून आपण कधीच काहीही शिकलो नाही. युरोपमधील प्रबोधन काळात साहित्यिक, विचारवंत, वैज्ञानिक, तत्वज्ञ भर घालत असताना आपला समाज मात्र कवी, संत-महंत इत्यादींच्या कच्छपि लागलेला होता. मूलभूत विचार वा संशोधन करणाऱ्यांची वानवा होती. धार्मिक परंपरांना आव्हान देणाऱ्यांचा अगदीच क्षीण आवाज होता. धर्म, अध्यात्म यांना विरोध करणारे, त्यांच्यावर टीकेची झोड उठविणारे अगदी मूठभर व देशभर विखुरलेले होते. धर्म नेहमीच आधुनिकतेच्या विरोधात बदल टाळणारा असतो व परंपरांना चिकटलेला असतो. पाचशे वर्षापूर्वीच आपण तंत्रज्ञान, सर्जनशीलता, उत्पादकता, नाविन्यता इत्यादीवर फुली मारूनच पुढे आलो आहोत. आपण केवळ ऐहिक सुखांनाच त्याज्य समजत होतो असे नसून विकास संस्कृती, नवीन कल्पना, मानवी विकास यांनासुद्धा पूर्णपणे विसरलेलो आहोत. धूम्रपान व कर्क रोग यांच्यातील घनिष्ठ संबंध शोधणाऱ्या संशोधकाप्रमाणे लेखक आपल्या अधोगतीची मूळ कारणं शोधत आहेत. त्यासाठी अमेरिकन समाजाशी आपल्या समाजाची तुलना करत आहेत. अमेरिकन समाजात नाविन्यता हे केवळ छंद वा आवड वा ध्यास नसून ती एक जीवन पद्धती आहे. आपल्या अस्तित्वासाठी, मिळालेल्या नौकरीत वा पत्करलेल्या व्यवसायातील भरभरभराटीसाठी किंवा उद्योग व्यवस्था टिकविण्यासाठी नाविन्यतेला पर्याय नाही अशीच मनोधारणा आहे. या तुलनेत भारतीय समाजातील उणीवा अधोरेखित होत आहेत. खाजगीत बोलताना अमेरिकन माणूस म्हणजे फक्त ऐहिक गोष्टींच्या मागे धावणारी, प्रत्येक ठिकाणी स्वतःचा स्वार्थ बघणारी, नीती मूल्यांची चाड नसलेली आणि भारतीय म्हणजे कुटुंब प्रेमी, मानवी मूल्यांची कदर करणारी, निस्वार्थी, परोपकारी, संवेदनशील अशी विधानं करत असतात. परंतु लेखकाला असे काही असेल असे वाटत नाही. अमेरिकन समाजाकडूनही भरपूर काही शिकण्यासारखे आहे. त्या समाजातील गतीशीलता चटकन डोळ्यात भरते. त्या तुलनेने आपला समाज सुस्त, निद्रिस्त असलेला वाटतो. भरीस भर म्हणून स्त्रियांबद्दल दुस्वास, शिक्षणाबद्दल अनास्था व जातीभेदाला प्राधान्य ही कारणंसुद्धा आहेत.

हे निष्कर्ष ढोबळ स्वरूपाचे नसून त्यांच्या मागील तर्कशुद्धता व पुरावे यांची मांडणी लेखकानी केली आहे. काही मूठभर उच्चवर्णीयानी इतर बहुजनांना जातीभेदांचे स्तोम माजवून वेठीस धरल्यामुळे समाजातील विषमता दूर होणे अशक्यप्राय ठरत आहे. त्यामुळे राज्यव्यवस्था बिघडत आहे. समाजाची अधोगतीकडे वाटचाल होत आहे. आपल्यातील हतबलतेची कारणं शोधताना आपल्यातील ऐक्याचा अभाव, नैसर्गिक स्रोतांची कमतरता, श्रद्धा-अंधश्रद्धायुक्त जीवनशैली आणि पारमार्थिकतेकडे झुकणारी मानसिकता इत्यादी असून या गोष्टी आपल्याला विकासाच्या शेवटच्या पायरीवर ठेवत आहेत.

गेल्या 500 वर्षातील आपण लढलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या युद्धातील पराजयाची कारणं शोधताना लेखक आपल्याकडे Killer Instinct हा गुणविशेष नव्हता याची आठवण करून देत आहेत. दैववाद, अनाठायी विश्वास, अलिप्तता, आध्यात्मिक स्वैर कल्पना इत्यादीमुळे आपण पराजित होत होतो असे लेखकाला वाटते. युद्धात जिंकण्याचे लक्ष्य असण्याऐवजी आपले लक्ष्य पारमार्थिक मोक्ष असल्यामुळे शत्रूंनाच आपल्याला मारून टाकण्याची याचना करत होतो. आपले पारमार्थिकतेविषयीचे प्रेम आणि परमेश्वराच्या कर्तृमकर्तुत्वावरील असीम श्रद्धा आपल्या दुस्थितीला कारणीभूत आहेत, या लेखकाच्या निष्कर्षांना आपल्याला सहमती दाखवावे लागेल.

आपली प्रत्येक कृती, आपल्या रूढी-परंपराविषयीचे प्रेम, आपली मानसिकता, आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन इत्यादीतून आपल्याला आपल्या संस्कृतीची कल्पना येवू शकते. परंतु यातील प्रत्येक गोष्टीवर आपल्यातील आध्यात्मिकतेची गडद छाया पसरलेली असते. कुठल्याही माहितीविषयी प्रश्न विचारण्याऐवजी वा चिकित्सा करण्याऐवजी ती माहिती आध्यात्मिकतेत कसे बसवता येईल वा त्याला धार्मिकतेचा मुलामा कसे चढवता येईल यासाठी धडपड करत असतो. त्यासाठी नवीन व्याख्या शोधत असतो. गंमत म्हणजे श्रद्धेला बळकटी देणारी माहिती असल्यास श्रद्धा बळकट होत जाते. व त्यांच्या विरोधात असली तरी ती जास्त बळकटच होते. धार्मिक श्रद्धा या नेहमीच आपल्यातील मानसिकतेवरून ठरवल्या जात असतात. त्यात कार्यकारणभाव वा काही विवेकी विचार कधीच नसतो. तरीसुद्धा कट्टर धार्मिक मूर्तीपूजा, जिहाद, गुलामगिरी, चित्रहिंसा, क्रौर्य, मिथकं इत्यादी सर्व रूढी परंपरावर तर्कशुद्धतेचा मुलामा चढवत असतात. त्यांच्या या प्रयत्नामुळे धर्म व ईश्वर आपल्या सर्व नैतिक मूल्यांचे, जीवन व्यवहारांचे नियंत्रण करू लागतात.

मुळात नैतिकता, नीतीमूल्ये व धर्म याबद्दल गोँधळाची स्थिती आहे. लेखकांच्या मते माणसाला जास्त कळत नव्हते तेव्हा विज्ञान, तर्क, नीती, साहित्य, कला इत्यादी सर्व प्रकारांना धर्माशी जोडले गेले. मानवी आयुष्याला आकार देणाऱ्या सर्वांतर्यामी परमेश्वराची चिकित्सा करणे त्याच्या अस्तित्वाबद्दल संशय घेणे, निषिद्ध मानले जात होते. जे काही आहे ते परमेश्वराचेच व परमेश्वरामुळेच. त्यामुळे कुठेही संशयाला जागा नव्हती. प्रत्येकाच्या मनामनात तो असतो व तोच प्रेरणा देत असतो याबद्दल कुणाचेही दुमत नव्हते. तो अस्तित्वात नाही, याचा पुरावाच कुणाकडेही नव्हता. त्यामुळे नैतिक मूल्ये ठरवणारासुद्धा परमेश्वरच होता. प्राचीन काळातील समाज व्यवस्थेने प्रेम, करुणा, अहिंसा, सहानुभूती, कुटुंब व्यवस्था, बंधुभाव इत्यादीसाठीसुद्धा परमेश्वर या संकल्पनेचा वापर केला होता. आपल्या अस्तित्वासाठी व आपल्या कल्याणासाठी नैतिक मूल्यांची गरज होती व त्यासाठी परमेश्वर ही संकल्पना राबवली गेली. आणि हेच आपल्या आजारपणाचे मूळ कारण आहे, असे लेखकाला वाटते. नैतिक मूल्यांसाठी धर्म वा परमेश्वराची गरज नाही, हे नंतर हळू हळू कळू लागले.

आजारपणाच्या या सर्व लक्षणावरून लेखकानी यांच्या निदानाची यादीच केली आहे. त्याच्या मते
• स्त्रियांच्या अंगभूत क्षमतेकडे दुर्लक्ष
• जाती व्यवस्था व वर्णीय अहंकार
• शिक्षणाविषयी हेळसांड
• बालकांच्या योग्य पालन पोषणात संस्कृतीचा वाढता दबाव
• पारमार्थिकता व श्रद्धा यांच्या अतिरेकामुळे सर्जनशीलता, नाविन्यता व विवेकी विचारांची पीछेहाट
• चमत्कारसदृश पुराणकथावरील विश्वास
• पावित्र्य व श्रेष्ठत्वाच्या अहंकारातून इतर जगाशी संपर्काचा अभाव
इत्यादी गोष्टी कारणीभूत ठरत आहेत.

याचबरोबर आणखी काही गोष्टी आपल्या मागासलेपणाला जबाबदार आहेतः
• संपत्ती वाईट असते यावर विश्वास
• दारिद्र्याचे उदात्तीकरण
• दैहिक श्रमाला तुच्छ लेखणे
• पाप पुण्यांच्या अतिरेकी कल्पना
• कर्मफळावर विश्वास
• गुरुविण मुक्ती नाही यासाठी बुवा-बाबावर श्रद्धा
इत्यादी गोष्टींचा समावेश लेखक करत आहेत.
बुवा-बाबावरील श्रद्धा आपल्यातील स्वतंत्र विचारांना, सर्जनशीलतेला व ऐहिक सुखाचा उपभोग घेण्याला मारक ठरतात. पुनर्जन्म व कर्म फलावरील विश्वास दैववादाकडे नेणारा ठरतो. त्यामुळे मानवी प्रयत्नांना खीळ बसते.

जेव्हा ज्ञानसाधनांची – अक्षर ओळख, लेखन-वाचन, मुद्रण साधनं, शाळा, संगणक – इंटरनेट, इ.इ. – कमतरता होती तेव्हा शब्द प्रामाण्य व व्यक्ति प्रमाण्यावर विश्वास असणे स्वाभाविक व नैसर्गिक होते. त्यामुळे त्याकाळी ऋषी-मुनी व मौखिक ज्ञानावरच भिस्त होती. समाजात ज्ञानसाधनं नसल्यामुळे ज्ञानाची परंपरा नव्हती. नम्रपणाने ऐकून घेणे व समजून घेणे यावरच भर दिला जात होता. अक्षर ओळखीनंतर वाळू व दगड, नंतर पाटी व पानं यांचा वापर करण्यात आला. मग कागदाचा शोध लागला. या शोधानंतर वाचन व वाचलेल्या गोष्टी आहे तसे म्हणून दाखवणे वा आठवणीत ठेवणे व तेच पुन्ह पुन्हा सांगणे यालाच बुद्धीमत्ता, शहाणपण असे मान्य करण्यात आले. त्यात ना चिकित्सा, ना खोलात जाऊन विचार. त्या काळात आपण फक्त देवळे बांधत सुटलो, देवाची आरास करत सुटलो व धर्मव्यवहारांना अग्रक्रम देत गेलो. आजसुद्धा शाळांच्या पेक्षा मंदिरांची संख्या जास्त असावी. मंदिरांना पैशाची चणचण कधीच भासत नाही. शाळा, दवाखाना व रस्ते बांधणी यांना मात्र पैशाचा तुटवडा असतो. आपली बुद्धी व शहाणपण अशा अनुत्पादक कामासाठी खर्ची घातले जातात. त्यातून हा समाज ऐहिकदृष्ट्या कधीच सक्षम झाला नाही. गरीबी पाचवीला पुजत होती. गरीबी आपल्या तारुण्याला मारक ठरत होती. व अध्यात्म आपल्या वृद्धत्वाला जीवघेणी ठरत होती. अध्यात्माचा खुला बाजार, त्याचे पंचतारांकित व्यवस्थापन, आश्रमातील प्रवचन, सत्संगसारखे कार्यक्रम, दैववादाला पूरक ठरत होते. चाणाक्ष बुवा-बाबा यांच्यावर कब्जा करून समाजाला पंगू करत आहेत. यातून श्रमाला नगण्य ठरवण्याची वृत्ती बळावत आहे. चुकांना संरक्षण मिळत आहे. नवीन काहीही स्वीकार न करण्याची मनोवृत्ती वाढत आहे. नवीन विचारांना विरोध करण्याकडे आपला कल वाढत आहे. आपले सर्व सामाजिक व्यवहार आपले कुटुंब, नातलग, जवळचे मित्र या मर्यादेतच होत आहेत. बाहेरच्यांना येथे प्रवेश नाही. आपली दृष्टी एखाद्या बोगद्यातून गेल्यासारखी आहे. पुढचे काही दिसत नाही आणि मागे वळता येत नाही. या सर्व गोष्टीवरून लेखकाला धर्माचे जोखड फेकून दिल्याशिवाय गत्यंतर नाही असे तीव्रतेने वाटत आहे. कुठल्याही धार्मिक हिंदूशी औपचारिकपणे दोन चार शब्द बोलण्याचा तुम्ही प्रयत्न केल्यास तो एखाद्या तत्वज्ञाप्रमाणे परंपरा, संस्कृती व धर्म याबद्दल तासन तास बोलू लागतो. त्यामुळे त्याचा हा धर्माभिमान अज्ञान, द्विधा मनस्थिती व वास्तव यांच्याकडे पाठ फिरवण्यास भाग पाडत आहे.

या धार्मिक समाजाद्दल काही विधान करत असताना धर्म म्हणजे नेमके काय – पंथ की प्रभावी व्यक्तिमत्वावरील श्रद्धा वा cult . या सगळ्या प्रकारांची गोळाबेरीज प्रचलित हिदू धर्मात असल्यामुळे नेमके काय घडत आहे हे कळेनासे झाले आहे. कर्मसिद्धांत हा हिदू धर्माचा गाभा आहे. व हाच गाभा आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे हा समाज परमेश्वर, आत्मा, पुनर्जन्म इत्यादी संकल्पना निरर्थक असूनही त्यांना कवटाळून बसलेला आहे. धार्मिक भ्रम हे छिन्नमनस्कतेचे (schizophrenic) लक्षण आहे. तो एक आजार आहे. त्यात साक्षात्कार वगैरे काही नाही आणि मनोविकार व साक्षात्कार यात फरक करता येत नाही.

आपल्या धार्मिक ग्रंथाविषयी टीका करताना लेखकानी कवितेच्या स्वरूपात असलेले हे ग्रंथ कवी कल्पनेतून सुचलेले आहेत व आपण मात्र त्यांनाच आध्यात्मिक सत्य म्हणून कवटाळून आहोत, असा उल्लेख केला आहे. धर्म या शब्दार्थाच्या अनेक छटा आहेत. त्यामुळे प्रत्येक जण स्वतःला अपेक्षित असलेला अर्थ काढून वापरत असतो. श्रद्धा व रूढी यावरून हिंदू धर्म आकार घेत असतो. भगवद्गीतेसारख्या धर्मग्रंथात तर परस्पर विरोधी, चुकाच्या व संदिग्ध अशी अनेक विधानं आहेत.

याचबरोबर हा समाज कायमचाच बुद्धीमत्तेचा तिटकारा करत आलेला आहे. कारण धर्माचे वर्चस्व असलेल्या समाजाला बुद्धीमत्ता, विचार, चिकित्सा, विवेक अडथळे आहेत अशी भीती वाटत असते. त्यांच्या विरोधातील चिकित्सा वा विश्लेषण म्हणजे फार मोठे पाप केल्यासारखे त्यांना वाटते. करुणा व सहानुभूती दाखवणारे मख्ख असले तरी त्यांना चालतात. धार्मिकांचा दांभिकपणा शिगेला पोचलेला असतो. काही वेळा आमचा चमत्कारावर विश्वास नाही असे म्हणायचे व त्याच वेळी फलजोतिष. छद्म विज्ञान, जडीबूटी इत्यादींची भलावण करायची हा दुटप्पीपणा नेहमीच आढळतो. कित्येक वेळा हिंदू धर्म ग्रंथातील आधुनिक वैज्ञानिक शब्द आल्यावर त्यांचे मन उचंबळून जाते. खरे पाहत आधुनिक विज्ञानाला अभिप्रेत असलेला अर्थ व धर्मग्रंथातील शब्दांचा अर्थ यात दूरान्वयानेसुद्धा काही संबंध नसतो. तरी सुद्धा आपल्या पूर्वजाना प्रगत विज्ञान माहित होते असा डांगोरा पिटला जात असतो. हिंदू धर्मातील चाणाक्ष बुवा बाबा अमेरिकेत जाऊन तासन तास अशा विषयावर प्रवचन देत असतात. अन् ऐकणारेही थक्क होतात.

या समाजातील समाजसुधारक, प्रगत विचार करणारे विचारवंत व शिक्षणतज्ञ इत्यादींच्या अथक प्रयत्नामुळे हा समाज आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे हे मान्य असले तरी ही वाटचाल मुंगीच्या पावलानी होत आहे, असे लेखकाला वाटते. बदल फारच कमी व तेवढे होण्यासाठी दीर्घ काळ. काही वेळा हा बदल स्थानिक पातळीवर, तोही वरवरचा आणि अगदीच बळे बळे केलेला. आपल्या शरीरावरील कपडे अत्याधुनिक फॅशनचे वाटत असले तरी मनामनामध्ये हिंदू संस्कृतीच कोरलेली दिसेल. आधुनिकतेकडे घोडदौड हवी आहे. आपली मानसिकता, आपल्या निष्ठा आणि आपली जीवनमूल्ये आधुनिकतेशी सुसंगत हवीत.

एक मात्र खरे की आपण स्वतः विवेकवादी असल्याशिवाय केवळ आधुनिकता आपल्याला विवेकवादी बनवू शकत नाही. इतर समाजांशी तुलना केल्यास आपण शिक्षित व ते बुद्धीवंत; आपण अनुकरणशील व ते सर्जनशील, आपण पारमार्थिक व ते ऐहिक असे आढळते. धर्मांच्या श्रृंखल्यातून बाहेर पडल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही हे मात्र निश्चित. सार्वजनिक जीवनात धर्माचा मागमूसही नको. पवित्र मंदिर-स्थळ-वेळ-समाधी, यात्रा-जत्रा-उत्सव-मेळा, धर्म ग्रंथ-पुराण-वेद, गंगाजल, गोमूत्र, (गोरक्षा..) इत्यादीपासून मुक्त होण्याची गरज आहे. पुराण कथांचे उदात्तीकरण पूर्णपणे थांबायला हवे. धर्मग्रंथावरील चर्चेला पूर्णविराम द्यायला हवे. स्मृतींरंजनातून बाहेर पडायला हवे. फुग्यासारखे फुगवून ठेवलेल्या आपल्या आशा-आकांक्षांना जमीनीवर आणायला हवे. धर्माचे आधिपत्य झुगारून विवेकाची कास धरायला हवी. आपण आता परदेशी आक्रमणांना, आपल्या जनुकांना व आपल्या मागील पिढ्यांच्या चुकांना दोष देणे थांबायला हवे. आपल्या स्थितीला आपणच जबाबदार आहोत ही जाणीव जोपासायला हवी.

आपण या परंपरांच्या जोखडातून बाहेर पडणार आहोत की नाही हा प्रश्न आपल्यासमोर असून लेखकाचे हे अरण्यरुदन ठरी नये अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत. मी एकटा काय करू शकतो या विधानाला काही अर्थ नाही. कारण परिवर्तन, प्रबोधन वा क्रांती इत्यादींचा इतिहास आठवल्यास ते एखाद्या व्यक्तीच्या प्रेरणेतून सुरुवात झाल्या हे लक्षात येईल. ही ठिणगी तुम्हा-आमच्यामुळेसुद्धा पडू शकेल व वणवा पेटू शकेल. काही जणांनी तरी या दिशेने विचार करू लागल्यास हे पुस्तक लिहिल्याचे सार्थक होईल असे लेखकांना वाटते. फ्रांझ काफ्का या लेखकाने म्हटल्याप्रमाणे आपल्या मनातील गोठलेल्या समुद्राला पहिला घाव टाकणाऱ्या कुऱ्हाडीसारखे पुस्तक असतात. सुबोध यांचे हे पुस्तक या कुऱ्हाडीसारखे आहे असे पुस्तक वाचून संपवत असताना आपण नक्कीच म्हणू शकतो. लेखक येथे कुठल्याही सिद्धांताचा पाठपुरावा करत नाहीत वा नवीन सिद्धाताची मांडणी करत नाहीत. आपल्या परिस्थितीची पूर्ण कल्पना देत आपण काय होतो व आपल्याला काय व्हायला हवे याची कल्पना देत असल्यामुळे पुस्तकाचा आशय चिंतनीय झाला आहे.

कल्चर कॅन किल,
एस सुबोध
लोक वाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई
मूल्यः 100 रु, पृ.सः 236

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)