Skip to main content

कोण बरं ही परी? कोन्मरी

तशी मलाही आवडते आवरासावरी.
पण पसारा असलेलं घर,
एखाद्या निवांत रविवारी,
मनापासून आवरुन देणारी,
ही हसरी, सुंदर परी!
आहे बरी लहानखुरी,
पण जगाला भुलवणारी,
कोण बरं ही परी?- "कोन्मरी"

ती मला अलिकडेच भेटली...कुणीतरी तिचा टी-शर्ट्ची घडी घालण्याचा मिनिटभराचा व्हिडीयो फ़ेस्बुकावर टाकला होता. सहज पाहिला आणि सोडून दिला. असे बरेच व्हिडीयो येत असतात. त्यातले सगळेच काही आपण मनावर घेत नाही. पुन्हा काही दिवसांनी तिच्यावरचा लेख वाचला. मग वाटले ही बाई वेगळीच आहे! ह्या जपानी बाईचे नाव- "मारी कोन्डो" आणि वय अवघे ३२! तिचा लोकांची घरे आणि ऑफ़िसे आवरुन देण्याचा व्यवसाय आहे. तिच्या पद्धतीचे नाव "कोन्मरी" (कोन्डोमधलं ’कोन’ अन नावातलं मारी)! कोन्मरी ही केवळ आवरासावरीची पद्धत नसून एक नवीनच जीवनशैली आहे. ती म्हणते की एकदा ह्या शैलीचा स्वीकार केला की माणसे पुन्हा गचाळपणाकडे जातच नाहीत. तिच्या चार पुस्तकांच्या दहा लाखांहून अधिक प्रती खपलेल्या आहेत. मुख्य म्हणजे भोगवादी अमेरिकेतील कित्येकांना तिने आपल्या अत्यल्पवादी जीवनपद्धतीची दीक्षा यशस्वीरित्या दिलेली आहे.

माझ्या घरात आवरासावरीला सुरुवात कुठून करावी हा प्रश्न कठीण होता. माझा अंतर्वस्त्रांचा ड्रॉवर उपसला. गच्च भरलेला! नेहमी वर काय दिसेल ते उचलायचे आणि अंघोळीला जायचे. कपडे धुवून आले की घड्या ड्रॉवरमध्ये खुपसायच्या आणि कसाबसा ड्रॉवर आत सरकवायचा असा शिरस्ता. सटीसामाशी कपाट आणि हा ड्रॉवर आवरला जातो. पण एक-दोन आठवड्यात पुन: येरे माझ्या मागल्या! गडबडीच्या वेळेला कुडता मिळाला तर सलवार गायब. दोन्ही मिळाले, तर ओढणी पसार असली परिस्थिती. बऱ्याचदा सगळ्यात खालची साडी काढतांना सगळ्या साड्यांचा ढीग कोसळायचा, तो तसाच कोंबून मी वरचेवर असलेला सलवार-कुडता घालून बाहेर पडायचे. यू-ट्युब वर विडीयो बघत प्रथम माझे कपडे, स्वयंपाक खोली, शेकडो पुस्तके आणि कॅसेट्स कोन्मरी पद्धतीने आवरायला घेतल्या. जवळ जवळ २०० कॅसेट्स आणि डबल कॅसेट्सचा बूम्बॉक्स ह्या गोष्टी नुसत्या पडीक होत्या. त्या प्रथम मोडीत काढल्या. अभ्यासाची जुनी पुस्तके सेवाभावी संस्थांना दिली. मारीचे "स्पार्क ऑफ़ जॉय" पुस्तक ’किंडल’वर घेतले. (आणखी एका पुस्तकाचा पसारा वाढू नये म्ह्णून किंडलवर!) कोन्मरीने मलाही वेड लावले आणि माझी "साफसफाई मॅरेथॉन" सुरु झाली. मारी म्हणते की रोज हळूहळू आवरत बसू नका. कारण तुम्ही एक खोली आवराल आणि दुसरी आवरायला लागेपर्यंत पहिली मध्ये पुन्हा पसारा वाढेल. एकदम तीन-चार दिवसांत घर असं आवरा की पुन्हा पसारा होणारच नाही. आणि उरलेले आयुष्य मजेत जाईल! कोन्मरी खटाटोपातील माझे काही अनुभव इथे देत आहे.

गहन प्रश्न : कुठल्या वस्तू ठेवायच्या आणि कुठल्या फेकायच्या?

काही तज्ञ म्हणतात की दोन वर्षे वापरली नाही की वस्तू फेकून द्यायची. कधीकधी वाटते की ही कोणाला बरे उपयोगी होईल? मग अशी गरजू व्यक्ती शोधेपर्यंत ती वस्तू तशीच धूळ खात पडून राहते. भेटवस्तू म्हणून आलेल्या कितीतरी वस्तूंचा काही एक उपयोग नसतो. बऱ्याचदा वस्तू फेकली की लगेचच काही कारणाने ती हवी असते. काही वस्तूंचा उपयोग नसला तरी केवळ "पैसे पडलेत" ह्या कारणास्तव आपण त्या ठेवून देतो. कोन्मरी पद्धत ही तर्कावर आधारीत नाही. कारण मूलत: भावनिक विचार (emotional thinking) करणारा माणूस तर्कसंगत विचार (rational thinking) करायला लागला तर पसारा आवरला जाणार नाही. कारण प्रत्येक वस्तू आपण का घेतली व कशी जरुरीची आहे ह्याचे कारण शोधत बसतो. मारी म्हणते की प्रत्येक वस्तू हातात घेऊन स्वत:ला विचारा-"ही वस्तू मला सुख देतेय का?" त्या वस्तूची भविष्यातील उपयुक्तता, कुणी दिली, का दिली, देऊन टाकली तर काय होईल इ. प्रश्न विचारायचे नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय फेकतोय ते शक्यतो आपल्या आईला सांगायचे नाही. कारण एकदा भावूक मानसिकता आली की वस्तू जमत जातात. आणि आवरणे राहते बाजूला. गेली कित्येक वर्षे मी कपडे दान करत होते पण तरीही कपाटातील पसारा तसाच असायचा. कोन्मरीमुळे माझा दृष्टीकोनच बदलला. कुणीतरी कधीतरी दिलेल्या नको असलेल्या साड्या, न आवडणारे ड्रेसेस, कधीतरी पुन्हा होतील अशा वेड्या आशेने ठेवून दिलेली ब्लाऊजेस अशा कितीतरी कपड्यांना बाहेरची हवा दाखवली. बरेच कपडे मोलकरीण खुशीने घेऊन गेली. जे तिला नको होते ते शेजारी-पाजारी देणार म्हणाली. आता उरलेले कपडे मला सुख देतील असे आहेत.

मारीची घड्या घालण्याची पद्धत
सर्वसामान्यपणे आपण कपड्याच्या घड्या घालून एकावर एक ठेवतो. त्यामुळे, सर्वात खालच्या कपड्यावर दाब पडतो. आणि तो कपडा काढतांना वरचे सर्व कपडे पडण्याची दाट शक्यता असते. शिवाय वरचे कपडे पटकन दिसतात आणि घातले जातात. तर खाली असलेले कपडे तसेच पडून राहतात. त्यांच्या कडा मळकट होतात व कपडे जुने वाटू लागतात. मारी टी-शर्ट, पॅन्ट्स, स्कर्टच्या घड्या अशा काही खुबीने घालते की त्या उभ्या लावता येतात. मी साड्या व ब्लाउज तिच्या पद्धतीने पुठ्याच्या बॉक्समध्ये बसवल्या. उभ्या लावल्यामुळे कपडे पटकन दिसतात व पटकन काढता येतात. मारीची घडी घालण्याची पद्धत हेच एक ध्यान असते. मनापासून कपडे लावतांना आपण आपोआपच आहेत त्या कपड्यांची नीट काळजी घ्यायला शिकतो. पूर्वी धुतलेले कपडे दोरीवरुन काढून घड्या घालणे मला अजिबात आवडत नसे. आता तेच काम मी आवडीने करते! बरेच कपडे कमी करुनही एका स्तरावर मावले नाहीत पण तरीही सलवारी, लेगिन्ग्ज रोल केल्याने चटकन सापडतात. आता पुढची पायरी म्हणजे बॉक्सेस वापरुन कप्पे तयार करणे. मारी काटकसरी आहे. ती पुठ्ठयाचे बॉक्स, जुने डब्बे, बाटल्या ह्यांचा पुनर्वापर करायला शिकवते. बुटांच्या बॉक्समध्ये मोजे कसे ठेवायचे ती पद्धत छान आहे.


स्वयंपाकखोलीची कोन्मरी

स्टीलची भांडी, प्लास्टीकचे डबे, काचेच्या बरण्या, क्रोकरी, विजेची उपकरणी, सत्राशे साठ मसाले, धान्ये. आवरण्यासाठी ही सर्वांत कठीण खोली पण धीर करुन एक दिवशी आवरायला घेतली. सर्वांत आधी "सुख न देणाऱ्या" भांड्यांना मोडीत काढले. मग "बेस्ट बिफोर" तारखा पाहून मसाले वगैरे फेकायला सुरुवात केली. त्यांत एक मसाला चक्क ८ वर्षांपूर्वीचा होता! ऒट्यावर तुपाच्या तीन रिकाम्या झालेल्या बाटल्यांना तूप चिकटलेले होते. एका बाटलीत जरासा जाम होता. दुसरीत जुनाट लोणच्याचा खार होता. प्लास्टीकचे दहा-बारा टेक-अवे/बिस्कीटांचे डबे बाजूला काढले. पूर्वी तेल तापले की मी गच्च भरलेल्या ड्रॉवरमध्ये झारा शोधण्यात वेळ घालवत असे. त्यात पापड नाहीतर पुरी काळी व्हायची. आता एका झटक्यात झारा मिळतो. ट्रॉलीमध्ये पूर्वी चमचे अडकत. आता मी जुने चौकोनी डबे व त्यांची झाकणे वापरुन कप्पे तयार केले व त्यामध्ये चमचे, सोलाणे,कॅन-ओपनर ह्या वस्तू ठेवल्या. लाकडी व रबरी उलथणी एका कप्प्यात आणि स्टीलची दुसऱ्यात ठेवली. ह्या वर्गीकरणाचे ट्रेनिंग नवऱ्याला व मोलकरणीला दिले! टेफ़्लॉन निघालेली भांडी व तवे मोडीत काढले. त्याजागी फक्त जरुर तेवढीच भांडी ठेवली. सगळे कप्पे चकाचक पुसले. अशा स्वयंपाकखोलीत स्वयंपाक करायला नवी उत्साह आला.

प्रपंच करावा नेटका

काही लोक म्हणतील आम्हांला पसाराच आवडतो! किंवा आपल्यासाठी घर की घरासाठी आपण? पण मारीचे निरीक्षण असे सांगते की घराच्या सजावटीतील बदल मानसिकता व आयुष्यामध्येच बदल घडत असतो. घर आवरतांना आणि आवडीच्या वस्तू नीट ठेवतांना आपण आपल्याकडे पहायला लागतो. मारीच्या एका गिऱ्हाईक स्त्रीच्या लक्षात आले की तिला नक्की काय हवं आहे आणि काय नको आहे. त्या नंतर तिने घटस्फोट घेतला व सुखाने एकटी राहू लागली. तर दुसरी एक स्त्री म्हणते की घर आवरतांना ती व तिचा नवरा खूप जवळ आले आणि त्यांचे एकमेकांशी चांगले पटू लागले. म्हणजे दोघींचेही भलेच झाले असे म्हणायला हरकत नाही. माझा अनुभव असा की पूर्वी मला घरकामात वेळ वाया जातो असे वाटे. आता बऱ्याच अनावश्यक वस्तू कमी केल्याने मोकळे वाटते व कामाचे ओझे वाटत नाही. कामानंतर वस्तू जागच्या जागी चटकन जातात. कोन्मरी ही नुसती पद्धत नव्हे तर ते एक जीवनाचे तत्वज्ञान आहे. त्यामध्ये अर्थशास्त्र, विज्ञान, मानसशास्त्र, कला व कार्याभ्यास (ergonomics) इ. अनेक विषय सामावलेले आहेत. याशिवाय, कामे करता करता तुमचे अवधान पूर्णपणे त्या कामावर असल्याने साहजिकच उत्पादकता आणि सृजनशीलता वाढते. नकारात्मक विचार कमी होतात व दृष्टीकोनच बदलतो.

सुखी माणसाचा सदरा हवा आहे? तुमच्याकडेच आहे तो. कोन्मरी पद्धतीने आवरा - नक्की सापडेल!

गौरी दाभोळ‌क‌र‌

संदर्भ:
http://tidyingup.com/
The Life-Changing Magic of Tidying Up: The Japanese Art of Decluttering and Organizing लेखिका- मारी कोन्डो
निव‌ड‌क फोटो -https://photos.google.com/album/AF1QipOz2I55NLLpJS4mO7UrrEonlTnE9pfThAz…

Node read time
5 minutes

ललित लेखनाचा प्रकार

5 minutes

विवेकसिन्धु Wed, 05/07/2017 - 01:26

Konmari ही उत्तमच प्रणाली आहे। मला वाटते की ती छोट्या अथवा singleton कुटुंबात यशस्वी होऊ शकते।
अनुभव असा कीं भारतीय मनोवृत्ती बघताना, हे यश कुटुंब सदस्य संख्येच्या व्यस्त प्रमाणांत सिद्ध होते। -:))

आदूबाळ Wed, 05/07/2017 - 11:25

मारी म्हणते की प्रत्येक वस्तू हातात घेऊन स्वत:ला विचारा-"ही वस्तू मला सुख देतेय का?" त्या वस्तूची भविष्यातील उपयुक्तता, कुणी दिली, का दिली, देऊन टाकली तर काय होईल इ. प्रश्न विचारायचे नाहीत.

हे चुकीचं आहे. कोणत्याही साठवणुकीतला 'भावना' हा घटक गेला तर घरच काय, काहीपण फार्मा कारखान्याच्या शॉपफ्लोरसारखं चकमकीत दिसेल.

त्यातल्यात्यात शास्त्रीय उपाय म्हणजे "utility-emotion scale" वापरायची. म्हणजे एका अक्षावर उपयुक्तता आणि दुसऱ्या अक्षावर भावना. दोन्हीला कमी स्कोर असणाऱ्या गोष्टी सरळ टाकून द्यायच्या.

१४टॅन Wed, 05/07/2017 - 14:26

In reply to by आदूबाळ

त्यातल्यात्यात शास्त्रीय उपाय म्हणजे "utility-emotion scale" वापरायची. म्हणजे एका अक्षावर उपयुक्तता आणि दुसऱ्या अक्षावर भावना.

ज‌ब‌री!

मारवा Tue, 15/01/2019 - 08:21

In reply to by आदूबाळ

१-त्यातल्यात्यात शास्त्रीय उपाय म्हणजे "utility-emotion scale" वापरायची. म्हणजे एका अक्षावर उपयुक्तता आणि दुसऱ्या अक्षावर भावना. दोन्हीला कमी स्कोर असणाऱ्या गोष्टी सरळ टाकून द्यायच्या.
२-स्कोर १ ते १० ठेवायचा नंतर त्याचा मॅक्स मिनी ठरवायचा उदा. टमरेल मध्ये युटीलीटी ९ आहे पण भावना ४ च आहेत असे असु शकेल. तर किती मिनीमम युटीलीटी व्हॅल्यु पर्यंत वा किती मॅक्सीमम पर्यंत वस्तु घरमे रखने लायक है की नै ते ठरवायच्
३-यात लोकशाही मुल्यांचा विकास ही करुन घेता येइल कुटुंब बैठक घेऊन मग सदस्यांनी मते टाकुन ठरवायचे की टीव्ही फेकायचा की पुस्तकं की टमरेल्
४-पण असे ही असु शकते की एक कुटुंब पुर्वग्रहदुषीत वा वस्तुंच्या अतीसानिध्याने निर्णय काळवंडला जाऊ शकतो तर शेजाऱ्यांची ही मदत घ्यावी उदा. आमची साउंड सिस्टीम फेकु की नये इ.
५-एक रजीस्टर मेंटेन करावे त्यात महीनेवारी कोणत्या किती वस्तु फेकल्या याची नीट सविस्तर तारीखवार यादी ठेवावी व फेकतांना किती इमोशन युटीलीटी गुणांच्या आधारे त्यांच फेकण ठेवण झालेलं होत हे लिहाव. व नंतर कुटुंब सदस्यांनी एक वही वाचना चा सोहळा ठेवावा त्यात किती आनंद मिळाला वा गमावला यावर एक चर्चासत्र ठेवावं त्याने झालेल्या चुका सुधारता येतील जिथे बरोबर ठरलो त्याचा आनंद एकमेकांना समजावुन देता येइल. व सर्वात महत्वाचे म्हणजे यामुळे कुटुंबातील सौदार्ह का काय ते वाढेल्
६- याला अजुन विस्तारीत करता येइल कोणता सदस्य आनंद देतो कोणता ताप देतो मग मत टाकुन एखादा सदस्य फेकता येइल्

१४टॅन Wed, 05/07/2017 - 14:32

मारीची घड्या घालण्याची पद्धत

हे त्या ५ मिनिट्स क्राफ्ट वाल्या व्हिडीओज म‌ध्ये पाहिल‌ं होतं. प‌ण, साधार‌ण घ‌रांत क‌मी क्षेत्र‌फ‌ळाव‌र जास्त व‌स्तू राह‌तील अश्या त‌रतुदी अस‌तात. (म्ह‌ण‌जे, खोक्यांपेक्षा क‌पाटं आदी) क‌मी जागा असेल त‌र एकाव‌र एक व‌स्तू आप‌सूक ठेव‌ल्या जातात, किंब‌हुना ठेवाव्याच लाग‌तात.*

सर्वसामान्यपणे आपण कपड्याच्या घड्या घालून एकावर एक ठेवतो.

त्यामुळे ही ग‌र‌ज आहे, स‌व‌य त्यातून निष्प‌न्न झालेली आहे.

*मी आणि इत‌र ग‌णिती लोकांनी च‌र्चा क‌रुन, आलेख‌गिलेख व‌गैरे स‌ग‌ळं क‌रुन हा निष्क‌र्ष काढ‌लेला आहे.

गवि Wed, 05/07/2017 - 15:39

हे किंवा यासम खूळ कॉर्पोरेट कंपनीत मागे आलं होतं. ५s या नावाने.

अनेकजण त्यापायी आत्महत्येपर्यंत पोहोचले होते मोठमोठ्या कंपन्यांमधे...

'न'वी बाजू Wed, 05/07/2017 - 17:38

अनेकजण त्यापायी आत्महत्येपर्यंत पोहोचले होते मोठमोठ्या कंपन्यांमधे...

का म्हणे?

गवि Wed, 05/07/2017 - 17:59

In reply to by 'न'वी बाजू

आता सगळं सांगणं आलं.

इन नवी बाजुओंको भी कोई उद्योग नही हं प्रश्न विचारने के अलावा.

मेरे तो नाक में नौ आगये.

चिमणराव Wed, 05/07/2017 - 18:56

"what is kaizen" search करा. कंपन्यांतून हे एक खूळ आलेलं॥
काइझनमध्ये हे साफसफाइ खूळचा एक चाप्टर आहे.

विवेकसिन्धु Wed, 05/07/2017 - 19:06

"... क‌मी जागा असेल त‌र एकाव‌र एक व‌स्तू आप‌सूक ठेव‌ल्या जातात, किंब‌हुना ठेवाव्याच लाग‌तात."
तुलनात्मक दृष्ट्या आपली घरे जपानी लोकांच्या घरांपेक्षा मोठीच असतात, त्यामुळे वरील मुद्दा पटण्यासारखा नाही।
आपणा सर्वांना जमविलेल्या वस्तूंपासुन अलिप्त होता येत नाही, ही खरी अडचण आहे।

१४टॅन Thu, 06/07/2017 - 09:45

In reply to by विवेकसिन्धु

तुलनात्मक दृष्ट्या आपली घरे जपानी लोकांच्या घरांपेक्षा मोठीच असतात

ख‌रंय. त‌रीही. आप‌ल्या डोक्यात कुठेत‌री ती ऐस‌पैस, मोक‌ळ्या घ‌राची संक‌ल्प‌ना खोल‌व‌र रुज‌लेली अस‌ते. त्यामुळे उप‌ल‌ब्ध जागा आप‌ण श‌क्य‌ तितकी मोक‌ळी क‌शी राहिल, ह्या अट्टाहासात अस‌लेल्या जागेत एकाव‌र एक गोष्टी ठेव‌तो हेच ख‌रं म्ह‌णावं लागेल. आणि, त‌रीही; इत‌का पुस्त‌की विचार इथे य‌थोचित नाही. ज‌पानी 'स‌रास‌री' घ‌रं आणि मुंबैत‌ली स‌रास‌री घ‌रं ह्यांची तुल‌ना इथे निर‌र्थ‌क आहे, कार‌ण तिच्या व्हिडीओज म‌ध्ये ते 'अतिकोंब‌लेलं' ज‌पानी स्टुडिओ अपार्ट‌मेंट न‌सून चांग‌ला किंग्ज साईझ बेड, त्याच्या दोन्ही बाजूंना व्य‌व‌स्थित जागा वगैरे दिस‌त‌ं. मुंब‌ईत असं घ‌र किती लोकांक‌डे आहे हा संशोध‌नाचाच विष‌य आहे ज‌रा.

आपणा सर्वांना जमविलेल्या वस्तूंपासुन अलिप्त होता येत नाही

१००% स‌ह‌म‌त.

मनीषा Fri, 14/07/2017 - 11:58

मी गच्च भरलेल्या ड्रॉवरमध्ये झारा शोधण्यात वेळ घालवत असे. त्यात पापड नाहीतर पुरी काळी व्हायची.

असं का ब‌र‌ं व्हाव‌ं? पुरी किंवा पाप‌ड‌ त‌ळाय‌ला सुरुवात‌ क‌र‌ण्याआधी लाग‌णारे साहित्य‌ हाताशी ठेव‌ले की झाले.

नीट‌नेट‌के आणि आटोप‌शीर‌ घ‌र‌ अस‌णे ख‌र‌च‌ फाय‌देशीर‌ अस‌ते. मी नेह‌मी प्र‌य‌त्न‌ं क‌र‌ते की ज‌रूरीच्याच‌ व‌स्तु विक‌त‌ घ्याय‌च्या. ख‌राब‌, वाप‌रात‌ न‌स‌लेल्या टाकून‌ द्याय‌च्या. प‌ण‌ द‌र‌वेळी इत‌क‌ं काटेकोर‌ वाग‌णे ज‌म‌त‌च‌ असे नाही.

अस्वल Fri, 14/07/2017 - 12:27

हे ब‌हुतेक पिढी ब‌द‌लली की श‌क्य‌ होत असाव‌ं
म्ह‌ण‌जे आधी घ‌रात‌ "काहीच‌ टाकून द्याय‌च‌ं नाही. क‌धीच‌" असा प्रोटोकॉल‌ होता.
तो न‌ंत‌र‌ ब‌द‌लून‌ "काही गोष्टी टाकून द्याय‌लाच‌ लाग‌तील‌" असा झाला.
स‌ध्या तो " बऱ्याच‌ गोष्टी टाकून‌ दिल्या नाहीत‌ त‌र‌ घरात‌ जागाच‌ उर‌णार‌ नाही" प‌र्यंत‌ पोच‌ला आहे.

जुन्या ज‌मान्यात‌ली भांडी, भेट‌व‌स्तू म्ह‌णून मिळालेले (ग‌ण‌प‌तीच्या मूर्ती, ग्रीटींग कार्ड्स‌, घ‌ड्याळ‌ं- छोटी मोठी गिमिकी, ग‌ंज‌लेल्या पिना, क‌ंग‌वे, ड‌ब्ब्या) हे त‌र‌ स‌ग‌ळ‌ं अस‌त‌ंच‌

प‌ण न‌व्या ब‌ऱ्याच‌ गोष्टी घ‌रात‌ उगाच‌ प‌डून‌ अस‌तात‍- वापरातून‌ बाद‌ झालेले कॅमेरे, टेप‌रेकॉर्ड‌र‌स‌, फोन‌चे स‌त‌राशे साठ‌ चार्ज‌र्स‌ (असू दे, उप‌योगी प‌डेल‌ क‌धीत‌री. नोट‌ क‌धीत‌री मिलॉर्ड), वाय‌रींंच‌ं ज‌ंजाळ‌, पेन‌ ड्राईव्ह्स‌, जुन्या सीडी, गेम्स‌ - असा स‌गळा सेमी इलेक्ट्रोनिक‌ क‌च‌रा एखाद्या क‌प्प्यांत‌ धूळ‌ खात‌ प‌डून अस‌तो.
प‌ण त्यात‌ व‌र्ष्हातून‌ एक‌दा लाग‌णारे दिवाळीत‌ल‌ं लाय‌टिंग‌ही अस‌ल्याने तो कच‌रा न‌ंत‌र‌ काढू ह्या क‌ल‌माखाली पुन्हा आत‌ ढ‌क‌ल‌ला जातो.

ब‌र‌ं, भांडीकुंडी थेरोटिक‌ली त‌री वाप‌र‌ली जाऊ श‌क‌तात‌. उदा. पाटा व‌र‌व‌ंटा.
प‌ण‌ हे इलेक्टॉनिक‌ क‌च‌रे ब‌हुतेक‌वेळा मेलेले अस‌तात‌ - त‌रीही अस्स‌ल‌ भार‌तीय‌ प‌र‌ंप‌रेला जागून ते घ‌रात‌ राह‌तात‌च‌.

बिटकॉइनजी बाळा Fri, 14/07/2017 - 13:28

ही जापनीज कोन्मारी आणि मिनिमलीझम एकाच पारड्यातले आहेत. मिनिमिलिझम हा अत्यंत महागडा प्रकार पोस्ट-ट्रूथ उच्चभ्रूपणा जपण्यासाठी लोक्प्रिय होऊ घातलेला पोस्ट-पोस्ट-ट्रूथ फेंगशुईपणा आहे. :|

इच्छुकांनी ग्रॅंड डिजाईन चा हा एपिसोड पाहावा.

प्रकाश घाटपांडे Tue, 15/01/2019 - 11:59

गौरी लेख छान आहे. लेखामुळे डोक्यात आवरण्याचा किडा निर्माण होतो. पण मनातल्या द्वंद्वामुळे परत ये रे माझ्या मागल्या सारखी अवस्था होते. वस्तुशी तुमचे भावनिक नात तयार झाला असत व त्याच उपयुक्तता मूल्य संपल्यावर टाकून देताना आपण स्वार्थी व क्रुर वाटायला लागतो. आपणही कधीतरी कंडम होणार आहोतच मग त्यावेळी स्वत:ला टाकून देताना काय वाटेल असाही विचार मनात येतो. भूतकाळाच किती ओझ बाळगायच? साचत साचत जाउन ते ओझ जर वर्तमानकाळ खराब करायला लागल्यावर ते ओझ सोडून द्याव असही वाटत. एक पाय भूतकाळात व एक वर्तमानात राहिल्यावर पुढे जाताना चमत्कारिक अस्वस्था होते. अगदी भ्रमिष्ट झाल्यासारख होत. भूतकाळात किती अडकून पडायच हा प्रश्न आपला आपल्यालाच सोडावा लागणार आहे

सामो Wed, 30/01/2019 - 02:47

In reply to by प्रकाश घाटपांडे

वस्तूशी भावनिक नातं :( ये बात कुछ हजम नही हुई.
भरपूर पैसे त्या हौसेने घेतलेल्या वस्तूच्या बोडक्यावर ओतलयाने, ते अक्कलखातीचे पैसे आठवत ती वस्तू जपणं मात्र खूप होतं.
हौसेला मोल नसत??? खरच?. शॉपिंग आणि वस्तू जमवण्याची हौस खूप महाग पडते.

भांबड Tue, 15/01/2019 - 13:08

एकीकडे broken is beautiful आणि दुसरीकडे minimulasation. थोडक्यात ऐकावे कुणाचे?

सामो Wed, 16/01/2019 - 22:42

कल्पना छान वाटली. आमच्या गावात विकायचा पर्याय आहे. ऑनलाईन गराज (गॅरेज) सेल. आतापावेतो बऱ्याच वस्तू विकल्या आहेत.

प्रकाश घाटपांडे Thu, 17/01/2019 - 10:00

In reply to by सामो

पण काही वस्तु अशाही असू शकतात की तुमच्या त्या गराज सेल मधे विकल्या काय फुकट बी जाणार नाहीत त्याच काय करणार?

सामो Thu, 17/01/2019 - 20:54

In reply to by प्रकाश घाटपांडे

होय करेक्ट बऱ्याच आहेत. त्यांची (लहान) वस्तूंची वासलात नीट लावता येतेय पण मोठ्या वस्तू (फर्निचर) ला पैसे पडतात :(
असं होतं कुठुन या गोष्टिंचा मोह केला.

सामो Wed, 30/01/2019 - 02:33

कालच कोन्मरीचे काही भाग पाहीले. इतके यश मिळवते आहे, कौतुक आहे त्या स्त्रीचे. तिने 'आवराआवरीचे शास्त्र' लोकांना पटवून देत छान पैसेही छापलेत अन प्रसिद्धीही मिळवली आहे. घराशी (ॲक्च्युअल वास्तूशी) मनातल्या मनात बोला. कपड्यांना टाकून देण्याआधी धन्यवाद द्या वगैरे. मजा आहे एकंदर.