दोन पुस्तकं.
आम्ही देर आलो असू, पण दुरुस्त आलो आहोत.
मुंबईतल्या मे महिन्याच्या दिवसांत, गरगरत्या पंख्याच्या डायरेक्ट खाली दुपारी नुसतं बसूनही घामाचे ओघळ माझ्या कपाळावरून टपकत असतानाही मी हे पहिलं पुस्तक वाचूनच संपवलं.
म्हणजे मग हे पुस्तक खरंच भारी आहे. त्याच्या विषयी नंतर सविस्तर लिहावं लागेल. पण हे पुस्तक क्र. १ भारी आहे.
================*===============
त्यानंतर मग हे दुसरं पुस्तक हाती आलं, पहिल्या पुस्तकाचा परिणाम म्हणून की काय, मी जरा आधाशीपणेच हातात घेतलं.
तोच गरगरणारा पंखा, तेच घामाचे ओघळ वगैरे. पण शंभर पानांनंतर "च्यायला, कसलं गरम होतंय!" म्हणून मी एक ब्रेक घेतलाच.
कादंबरी असल्यामु़ळे असेल..कदाचित म्हणून मी पुढे वाचत राहिलो. पण त्यातली "मी" काही मला झेपली नाही.
गैरसमज नकोत- तिच्या वाक्यांतल्या शिव्यांमुळे,सिगरेटींमुळे, सो कॉल्ड बिन्धास सेक्सबद्दल असलेल्या विचारांमुळे नाहीच. तिच्या वैचारिक गफल्यांमुळेही नाही.
पण ही जी मी आहे, ती नीट समोर येऊन काही सांगत नव्हती. तुटक, प्रसंगी अर्धसत्य असलेल्या घटनांबद्दल सांगायची. तिच्याच बाजूने ती कशी बरोबर आहे हे मांडायची.
अट्टाहासाने आपली बाजूच दरवेळी बरोबर असूनही आपल्यावर कसा अन्याय झाला, ते इतक्या टोकेरी पद्धतीने तिने मांडलं की मला त्या "मी"बद्दल काहीच वाटेना.
प्रेम, आपुलकी, राग, चीड ह्यातलं काही एक जरी वाटलं असतं तरीही मला चाललं असतं, पण इथे म्ह्णजे भावनांचा अभाव. मग थोडं बोर झालं मला.
.
वाचायला सुरूवात केल्यावर आधी "मीरेची" बाजू खूप इंट्रेष्टींग वाटली. आणि "चहा हवाय. चहा हवाय. चहा हवाय." म्हणणारी शैलीसुद्धा एकदम मोकळीढाकळी.
पण लगेच पुढल्या प्रकरणांतून वाटलं की मीरा हातचं राखून सांगते आहे. तिने वरवर एक आव आणलाय - how I'm not concerned at all -असा.
पण त्यातून तिचं दुखावलेलं मन, अपराधाची भावना डोकावतेच. एवढं सगऴं वाचल्यावर मग माझ्यासमोर उरते फक्त एक कोणीतरी स्त्री जिला नक्की काय हवंय ते माहिती नाहिये, पूर्वायुष्यातल्या नात्यांमधून ती अजून बाहेर आलेलीच नाहिये, आणि आपण आधी काही चुका केल्या असतील ह्यावर तिचा अजिबात विश्वास नाही. मग इतरांवर केलेले आरोप, आणखी आरोप आणि स्वत:बद्दल सहानुभूती : A case of Victim mentality?
आणि अशा कुण्या स्वभावाची स्त्री आपली कहाणी सांगत असेल तर मग तिच्याबद्दल Empathy वाटणं हे मग लेखिकेचं काम आहे. ज्यात एक वाचक म्हणून मी अडकून पडेन असं काहीतरी ह्या सगळ्याच्या जोडीला असलं तरच मला मीरा स्वतःबद्दल काय सांगतेय ते ऐकण्यात रस असू शकतो. नाहीतर मी का वाचू?
शेवटी मग "असेल बाई, तुझंच बरोबर असेल. Enjoy" असं म्हणून मग शेवटी ते पुस्तक बंद केलं मी.
मधे मधे पुस्तक मिटून गरगरत्या पंख्याकडे बघत बराच विचार केला- की हिला नक्की काय सांगायचंय? कसली कहाणी? की फक्त कोणीतरी निर्हेतुक प्रेमाने जवळ करावं एवढा साधा आग्रह आहे तिचा?
काही कळलं नाही. उत्तरं फारशी मिळाली नाहीत. एकूण "कादंबरी" म्हणावी असा जीव नाही ह्या पुस्तकाचा.
मग मी लिखाणाच्या शैलीकडे लक्ष दिलं. ती आवडली मला, पण एका लिमिटपर्यंतच. सुरूवातीला नवर्याला "तू" म्हणून मित्राला "तो" म्हणणारी मीरा एका टप्प्यानंतर मित्राला "तू" आणि नवर्याला "तो" म्हणायला लागते. छान, गिमिक जमलंय.
किंवा मग बिढार/जरिला/झूल छापाची पात्रांची डिस्कशन्स- अचानक एका प्रकरणात येतात, नाती, नवरा, बायको इत्यादीवर घमासान चर्चा. पण तितकंच- अचानक पुन्हा मीरा आपल्या आवडत्या विषयाकडे(च) व़ळते.
तिचा पूर्वश्रमीचा नवरा तिच्या घरी येतो त्या लांबलचक प्रसंगाला पुस्तकात बरंच महत्त्व दिलंय, जमलं नाही.
सग़ळ्यात जमलेली प्रकरणं म्हणजे "ती"ची. त्यात ते तीन धोब्यांचं प्रकरण खूपच उच्च आहे, पण कादंबरीशी एकदम फटकून.
.
तेव्हा हे दुसरं पुस्तक काही जमलं नाही. पुन्हा कधीतरी नक्कीच उघडीन मी, पण आता नेमकं कुठलं पान वाचायचं हे माहितीये मला.
अरे हो, आणि पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखिका म्हणते की ह्यातली "मी" ही लेखिका स्वतः नाहिये. पण एकूण पुस्तकाची रचना एका प्रकटनासारखी आहे. तेव्हा त्यातले "बरेचसे" विचार हे लेखिकेचे असावेत असा सौशय कितीदा आला. आजूबाजूच्या अनेक स्त्रियांच्या स्वभावावरून रचलेलं पात्र जर मीरा असेल, तर त्यातली एक स्त्री म्हणजे स्वतः लेखिकाच असणार नाही?
असो, त्या प्रस्तावनेतला तो भाग मला खोटा वाटला, किंचितशी सारवासारव केल्यासारखा. I hope that's my mistake.
======================*=========================
पुस्तक एक - हंस अकेला : मेघना पेठे
पुस्तक दोन - नातिचरामि : मेघना पेठे
प्रतिक्रिया
दुसरं पुस्तक न हसता वाचलंत?
दुसरं पुस्तक न हसता वाचलंत? कम्माल आहे! मीही वाचू शकणार नाही.
भडास.
फारच फ्रस्ट्रेटिंग पुस्तक होतं हो.
ती भडास बाहेर काढायला म्हणून इथे नोंद करून ठेवली.
पुढेमागे कुणाला तरी उपयोग होईल, कदाचित.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
काहीसं असंच.
'नातिचरामि' मला अजिबात सहन झाली नव्हती. तीस पानांतच सोडून दिली. मग इतर पुस्तकांच्या नादी लागण्याचा प्रश्नच नव्हता. पण तेव्हाचे न-मित्र चिंतातुर जंतू यांनी मोठ्या दिलदारपणे 'हंस अकेला' (उधार) देऊ केलं. म्हणून वाचलं आणि ते आवडलंच.
काही वर्षांपूर्वी त्यांनी केलेलं भाषण यूट्यूबवर पाहिलं आणि एकंदर मेघना पेठेच आवडल्या. (भाषणाचे तीन भाग - एक, दोन, तीन)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सॉरी.
भाषण ऐकायला सुरूवात केलेली - "सध्या इंट्रेस्टिंग पुरूष कमी होत चाल्लेत आणि इंट्रेस्टिंग स्त्रिया वाढतायेत" हे वाक्य ऐकून गोविंदाचा पिक्चर बघितला थोडा वेळ. जरा बरं वाटलं.
काय च्या काय उगाच बोलायचं.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
आठवतं त्यानुसार अर्थ
मला या वाक्याचा लागलेला अर्थ असा -
तरुण वयात बरेच पुरुष इंटरेस्टिंग वाटत होते. मग वय वाढलं, जाणिवा विस्तारल्या, जे पुरुष, ज्या व्यक्ती इंटरेस्टिंग वाटत होत्या, त्या वाटेनाशा झाल्या. लहान वयात ज्यांची बंडखोरी आकळलेली नव्हती, त्या स्त्रियांची कर्तबगारी आता वाढलेल्या वय-आकलनामुळे समजायला लागली; त्यामुळे इंटरेस्टिंग स्त्रिया वाढल्या (असं वाटलं).
गोविंदाचे सिनेमे मलाही आवडतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ह्म्म्म - असेल तसंही पण ते
ह्म्म्म - असेल तसंही पण ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या किंवा माहितीतल्या पुरूषांबद्दल बोलत असतील तर नो प्रोब्लेमो.
चिल.
==================
भूतकाळातील आस्वल्य.