काळाचा चतुरस्र टप्पा - विवेक मोहन राजापुरे

कविता

काळाचा चतुरस्र टप्पा

- विवेक मोहन राजापुरे (सामोरा)

जख्ख महानगराच्या वळचणीला बसून
कोणता लिहू महाशब्द :
जो ठरेल शाश्वत मरणोत्तर?
काडीमोलच झालंय जिथे मरण
आणि माणूस काडीमात्र.

काळ तर असतो
कानाशी गुणगुणणाऱ्या डासाइतका साक्षात्
आणि जिवंत.
जातं आरपार ज्याचं अग्र
सर्वगामी सुखयातनातून.
एकेक क्षण चिरडूनही.
निष्पन्न येत नाही करता स्वास्थ्य...
एकतानता.

ठेवावे लागतात सर्व अवयव सिद्ध
राजरोस. सहन करत
अशाश्वताचं लिव्हर् डॅमेज, हार्टट्रबल, मेंटल् अॅटॅक्...
चकवता येत नाही
जर्जर निरक्षराचा तसूभर आवाज.

मरणोत्तराला इथे नसतो वारस
वा गर्भवतीचं प्रेम
अन्यायही नष्ट होत जातो जिथे
सेकंदासेकंदाला...
खिंडार पाडणाऱ्या वेगाने
मरणाला देत टांग.
काळाचा ओलांडताना चतुरस्त्र टप्पा
कोणत्या महाशब्दांची हत्त्या
घडवू स्वतःला?

field_vote: 
0
No votes yet