बग

फोन वाजला. उचलला. पलीकडे बॉस होता.
"अरे अमुक अमुक जरा अर्जंट सुट्टीवर गेलाय. तमुक तमुक ठिकाणी जाऊन त्याचं अर्धं राहिलेलं असं असं काम कर ना जरा"

मी उठलो. बॉसला मनात दोन शिव्या घातल्या. कपडे बदलून गाडी काढली आणि सांगितलेल्या पत्त्याकडे जाऊ लागलो.
पोचलो तेंव्हा रात्रीचे ९ वाजले होते. मी एका मोठ्या सोसायटीसमोर उभा होतो. एक आळसावलेला रखवालदार जीर्ण खुर्चीवर बसून जागं राहण्याचा आटोकाट नाही तरी मनापासून प्रयत्न करत होता. आत छोटी पोरं सायकली चालवत होती. काही वेळापूर्वी बचाबचा खाल्लेले आणि ढेऱ्या सुटलेले लोक स्वत:ला दिलासा देण्यासाठी शतपावली करत होते. एक दोन तरुण पोरी जर्कीन घालून फोनवर बोलत बाकड्यांवर बसलेल्या होत्या. पलीकडे घसरगुंड्या आणि झोपाळ्यांवर आया आणि पोरांची गर्दी होती. वगैरे.

मुंडेन.

गाडीतून उतरून मी सूट आणि टाय व्यवस्थित केला आणि या सगळ्याकडे जमेल तितकं लक्ष न देता पटापट चालत लिफ्टकडे निघालो. लिफ्टच्या कॉरीडॉरमध्ये एक दिवा फ्लिकर होत होता. झटकन मान वर करून मी त्याच्याकडे पाहिलं. वायरिंगमधला प्रॉब्लेम. सहज सोडवता आला असता, पण ते माझं काम नव्हतं. थोडंसं हसत मी लिफ्ट बोलावण्याचं बटन दाबलं. १५व्या मजल्यावरून लिफ्ट हळूहळू खाली येऊ लागली. खरं तर मला जायचं होतं तिथे म्हणजे आठव्या मजल्यावर मी सहज उडतही जाऊ शकलो असतो, पण तशी पॉलिसी नव्हती. हातातली ब्रीफकेस मी खाली जमिनीवर ठेवली आणि दोन्ही हात वर करून एक जोरदार आळस दिला.

माझ्याजवळची स्पेशल किल्ली काढून मी आठव्या मजल्यावरच्या त्या घराचा दरवाजा ढकलला तेव्हा सव्वानऊ झाले होते. आतमध्ये काहीतरी मेजर राडा असणार याची अपेक्षा होतीच पण दार उघडल्यावर समोर जे दिसलं त्याने नाही म्हणलं तरी थोडं आश्चर्य वाटलंच. दारापासून थोडंसं आत लगेच जमिनीवर एक ट्रेकिंगला वापरतात तसा एक मोठा खिळा ठोकलेला होता. तो जवळजवळ अर्धा स्लॅबमध्ये घुसलेला होता. आजूबाजूची फारशी तडे जाऊन फुटली होती. खिळ्याला एक दोरखंड बांधलेला होता आणि त्याचं दुसरं टोक थेट समोरच्या टेरेसच्या कठड्यावरून खाली गेलेलं होतं. पुढे काहीतरी वजनदार लटकवलेलं होतं हे त्या दोरखंडाच्या टेन्शनवरून लक्षात येत होतं. ते काय असेल ते ओळखणं फार अवघड नव्हतं.

"वाचवा! प्लीज....इथे इथे..." कोणीतरी ओरडत होतं. दोरीच्या पलीकडच्या टोकावरून. हॉलमधला टीव्ही चालूच होता. सोफा रिकामा. समोर टीपॉयवर पिझ्झाचं कार्टन होतं. आत एक अर्धा खाल्लेला पिझ्झाचा तुकडा होता. शेजारी टीव्हीचा रिमोट. सॉसचे पाऊच खाली पडले होते. ओरिगानोचे रॅपर आणि ते सॉसचे सॅशे मी दार उघडल्यामुळे मागून वारा येऊन गॅलरीकडे उडाले. शांतपणे चालत मी टीपॉयजवळ गेलो. रिमोट उचलून टीव्ही बंद केला. त्या माणसाचं ओरडणं आता जरा जोरातच वाटू लागलं.
गॅलरीत जाऊन खाली डोकावलो. दोरखंडाचं दुसरं टोक त्या माणसाच्या घोट्याला बांधलेलं होतं. गाठ व्यवस्थित नव्हती. हळूहळू सुटत होती. थोडाथोडा करून तो खाली घसरत होता. त्याच्या बरोब्बर खाली जमिनीवर पोरं झोपाळे खेळत होती. काही वेळाने तो त्याच्या अंगावर पडणार होता. स्वतः मेलाच असता, वर एक दोघांना घेऊन गेला असता.

झकास.

खरं तर त्या मजल्याच्या अगदी बरोब्बर खालीच मुलांच्या खेळण्याची जागा का होती ते मला समजलं नाही. थोडी पुढे हवी होती. उद्या कोणी गॅलरीतून काहीही भिरकावलं तरी ते तिथेच पडलं असतं. मी पटकन एक नोटपॅड काढून हा मुद्दा लिहून घेतला. या माणसाचं ओरडणं अगोदर बंद करायला हवं होतं. आत्ता कोणी काही बोलत नव्हतं पण हे रात्रभर चालू राहिलं असतं तर नक्की कोणीतरी तक्रार केली असती. मी पटकन बॅगमधून एक ट्रँक्विलायजर गन काढली आणि एक बाण त्या माणसाच्या पोटात मारला. पाचेक सेकंदात तो बेशुद्ध झाला. ओरडणं थांबल्यामुळे मलाही जरा शांत वाटू लागलं.

माणूस तसा अंगापिंडाने मजबूत होता. १००एक किलो तरी असेल. त्याला वर खेचून घेणं मला एकट्याला शक्य नव्हतं. बाहेरून कोणाला बोलावणं पॉलिसीमध्ये बसत नव्हतं. ऑफीसमधूनही कोणी आत्ता या वेळी मदतीला येणं अवघडंच होतं. थोडक्यात माझा सहकारी उद्या सुट्टीवरून परत येईपर्यंत हा मनुष्य असाच व्यवस्थित लटकत राहील याची काळजी मला घेणं भाग होतं.

हं!

मी पटकन परिस्थितीचा आढावा घेतला. त्याच्या वजनाने तो दोरखंड गॅलरीच्या कठड्यावर काचेला जाऊन जरा फाटू लागला होता. ब्रीफकेस मधून एक फाईल(कागदाची नाही, वर्कशॉप मधली) काढून मी गॅलरीच्या कठड्याचा एक भाग थोडासा गुळगुळीत केला आणि मग तो दोरखंड थोडासा सरकवून तिथे आणून ठेवला. दाराजवळचा खिळा सिमेंटमध्ये ठोकला होता. सहज बाहेर निघाला नसता, तरी त्याला मी ब्राऊन सेलोटेपचे २-३ वेढे दिले आणि सेलोटेप जवळच्या जमिनीला आणि भिंतींना चिकटवली. इथलं काम तर आता झालेलं होतं.

बाहेर येऊन मी लिफ्ट बोलावली. खाली जाऊन गाडीमधून एक शिडी घेऊन आलो आणि तडक सातवा मजला गाठला आणि लटकणाऱ्या माणसाच्या घराच्या बरोबर खालचा जो फ्लॅट होता त्याची बेल वाजवली. एका बाईने दार उघडलं. तिला माझं आयकार्ड दाखवून मी आत गेलो. आत तिचा नवरा बनयन घालून एक पाय वर घेऊन खुर्चीत बसला होता. ऐसपैस. टीव्हीवर बातम्या चालू होत्या. बाईच्या हाताला साबण होता. ती आत भांडी घासत असावी. तिने साबणाच्याच हाताने कपाळावरची एक बट सरकवली, मग गाऊनला हात पुसले आणि माझं आयकार्ड नीट लक्ष देऊन पाहिलं.

"कोणे गं?" काखा खाजवत तिचा नवरा आतमधून ओरडला. ती थोडी लाजल्यासारखी झाली आणि कार्ड मला घेऊन पटकन नवऱ्याजवळ गेली. मागून हळूहळू चालत मीही गेलो. आता नवरा उभा राहिला होता आणि त्रासिक तोंड करून माझं कार्ड पाहत होता. बाई काहीच न कळून उगीच हँग होऊन तिथे उभी होती.
"झाली का भांडी?" नवऱ्याने तिच्याकडे न पाहताच विचारलं. लगबगीने ती आत निघून गेली. मी ती जाईपर्यंत तिची पाठमोरी आकृती पाहत राहिलो.
"बोला! काय काम?" नवऱ्याने टीव्हीचा आवाज थोडा कमी करत विचारलं.
"तुमची गॅलरी ५ मिनिटं हवी होती" मी किचनकडे पाहतच उत्तर दिलं. आता ती दिसत नव्हती. पण नळ आणि भांड्याचा आवाज मात्र येत होता. एक हुंदकाही ऐकू आल्यासारखा वाटला. मी कान टरकावले.
"गॅलरी इथे आहे. आत नाही!" नवरा तिरकस बोलला. त्याला माझं लक्ष कुठे आहे हे समजलं असावं. बॅगमधली बंदूक काढून याच्या डोक्यात एक गोळी घालावी आणि आतमधल्या बाईला मुक्त करावं असा एक बंडखोर विचार डोक्यात येऊन गेला. किती वय असेल तिचं? ३०? ३२?
मी मान जोरजोरात हलवून विचार झटकले. वाहावत जाऊन चालणार नव्हतं. आपला काय संबंध आहे असाही तिच्याशी? मी टाय सरळ केला आणि गॅलरीकडे निघालो.

"तुम्ही गॅलरी वापरताय तोवर घरातलं काही बंद नाही पडणार ना?"
"नाही"
"नाही, पडलं तरी चालेल. फक्त टीव्ही चालू असूद्या" जणूकाही घरात तो एकटाच होता.
"नाही. गॅलरी आयसोलेटेड असते. तिचा आणि घरातल्या इतर गोष्टींचा काही संबंध नाही" मी त्याला समजावलं. लोक असे बावळट प्रश्न नेहमीच विचारतात. अशा वेळी त्यांच्यावर चिडून चालत नाही. पॉलिसी....

गॅलरीत गेलो. शिडी लावली. चढलो. लटकणाऱ्या माणसाच्या पोटाजवळ माझं तोंड आलं. खिशातून तीच ब्राऊन सेलोटेप काढली आणि दोरखंड जिथे त्याच्या घोट्याला बांधला होता तिथे ८-१० वेळा गुंडाळली. आता गाठ सुटण्याचा धोका नव्हता. मग त्याला मी हलकासा धक्का देत बिल्डीन्गच्या भिंतीवर टेकवलं आणि त्याची मांडी आणि भिंत सेलोटेपने चिकटवून टाकली. सेफ साईड म्हणून.
खाली उतरलो, शिडी मिटली आणि काखेत घेऊन दरवाजाकडे जाऊ लागलो. नवरा टीव्हीत मग्न होता. काही न बोलता बाहेर निघालो. किचनकडे एकही कटाक्ष न टाकता.
जिन्याने वर जाऊन वरच्या मजल्याला कुलूप घातलं. पुन्हा खाली जाऊन गाडीत बसलो तेंव्हा सव्वादहा वाजले होते.

काचा बंद जाऊन बॉसला कॉल लावला.
"एक वर्कअराउंड दिलाय करून सर. बाकीचं उद्या सकाळी होईलच"
"काय केलंस?"
"सध्या सेलोटेप वापरून जखडलाय"
"ग्रॅव्हिटी ऑफ करून वर का खेचलं नाही त्याला?"
"सर ते आत्ता शक्य नव्हतं. सर्व लोक घरातच होते. खाली पोरं झोपाळे खेळत होती. ग्रॅव्हीटी बंद केली असती तर हवेत उडाली असती. खाली आणायला परत त्रास!"
"कारणं द्या तुम्ही फक्त. चल ठीके"
"सर....."
"हं?"
"परत दुसऱ्याच्या कोडमधले बग काढायला मला सांगू नका. हे इफ-एल्स डीबगिंग मला आवडत नाही"
"....."
"....."
फोन कट.
एक उसासा टाकून मी गाडी चालू केली आणि क्लच सोडत पहिला गिअर टाकला.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ग्रेट स्टॅापबगर!!
( याचा काहितरी वेगळाच होत असल्यास ज्याने शोधला तो दुरुस्त करेल उद्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे कथा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Thanks!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कथा सायफाय जॉनरमधली दिसते. आवडली. छन रंगवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...यात साय कितपत आहे, याबद्दल साशंक आहे.

याला सायफाय म्हटले, तर ती ज्यूल्स व्हर्न, एच.जी वेल्स वगैरे मंडळी, झालेच तर आर्थर सी. क्लार्क आणि 'फ्लॉवर्स फॉर आल्जर्नन'चा लेखक, आपापल्या थडग्यांत गरागरा फिरू लागतील आणि जयंत नारळीकर जीव देतील नि त्यांच्या अस्थी विसर्जन करायच्या कलशात थडाथडा उडू लागतील.

या रेटने उद्या 'स्टार वार्स'ला सायफाय म्हणाल!

फायचा प्रयत्न म्हणून वाईट नाही, परंतु यात साय यायला दूधही तितके सकस पाहिजे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सायंस फिक्षन आहे असा माझा स्वत:चाही दावा नाही.

मुळात एका प्रोग्रामर त्याच्या रोजच्या कंटाळवाण्या कामाला वैतागून ते काम ग्लॅमराईज करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो, हे मनात ठेऊन ही कथा रचली होती.

या कथेचा मेजर सर्व भाग हा प्रोटॅगोनिस्ट फॅंटसाईज करत आहे. खरं तर तो कुठल्याही सोसायटीमध्ये गेला नसून, कॉम्यूटरवर बसूनच एका प्रोग्राममधले बग्ज काढतो आहे. ते लक्षात यावं यासाठी थोडेसे क्लूज सटली पेरले आहेत, आणि शेवटी बॉससोबतच्या संभाषणात हे क्लीअर केलेलं आहे.

मी या प्रकाराला फ्लॅश फिक्शन म्हणतो. याला अशा कोणत्या एका जॉन्र मध्ये बसवणं अवघडच आहे!
धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमची रुपकं काय जास्तीच जालीम आहेत मग... काहीही कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

खरं तर नाही.

कदाचित तुम्हाला प्रोग्रामिंगचा अनुभव नसावा. इफ-एल्स डीबगींग ही फार करमणूककारक असते. आम्ही ती रोज पाहतो.

नव्या माणसाला हे असं एकदम झेपणं अवघड आहे हे मान्य, पण a coder can't miss these रुपकs!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला, मी विचारणारच होते ह्या कथेचा अर्थ काय आहे ते. काहीच कळले नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Thanks!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मज्जा आली वाचायला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Thank you!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोष्ट आवडली. शेवटच्या वाक्यावरुन साय-फाय वाटली नाही.
एक उसासा टाकून मी गाडी चालू केली आणि क्लच सोडत पहिला गिअर टाकला.
पण तरीही नीट अर्थ कळला नव्हता, तो प्रतिक्रियांवरुन कळला.
प्रोग्रॅमर्सच्या मनांत बोर झाल्यावर हे असलं पण चालतं, हे नवीन कळलं.
काही वाक्यं रोचक वाटली.
ढेऱ्या सुटलेले लोक स्वत:ला दिलासा देण्यासाठी शतपावली करत होते. हे त्यातलंच एक !
लटकवलेला माणूस बग न वाटता बगर वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त.. आवडली..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडेश... आत्ताच डिप्लॉयमेंट संपवून बसलेय,
लटकणाऱ्या माणसाला दोरी कापून खाली आपटू द्यावं , सपासप वार करून विव्हळत सोडावं, ज्याचं अर्धं काम करतोय त्याला पण बाजूला लटकवावा..
असले काही तरी खुनशी विचार येतात...

अवांतर :- नॉन प्रोग्रामर्स नी, प्रोग्रामर्सना बाजूला बसवून कथा वाचावी असं डिस्क्लेमर टाका त्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

अवांतर :- नॉन प्रोग्रामर्स नी, प्रोग्रामर्सना बाजूला बसवून कथा वाचावी असं डिस्क्लेमर टाका त्यात.

असे नका हो म्हणू! अहो मी स्वत: प्रोग्रामर आहे हो गेली सत्तावीस-अठ्ठावीस वर्षे - आणि मलाही क्लू नव्हता लागला. असे म्हटलात तर जिवाला प्रचंड यातना होतात हो!

- (थेरडा प्रोग्रामर) 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि मलाही क्लू नव्हता लागला

तुम्ही मग दुसऱ्यांची खरकटी साफ केली नव्हती वाटतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

मी स्वत: प्रोग्रामर आहे हो गेली सत्तावीस-अठ्ठावीस वर्षे

तुम्ही मग दुसऱ्यांची खरकटी साफ केली नव्हती वाटतं

यांनीच खरकटी केली असतील. कॉमेंट्स ऐवजी तळटीपा लिहून शॉट लावला असेल कित्येकांच्या डोक्याला. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

कॉमेंट्सऐवजी तळटीपा लिहिण्याची कल्पना वाईट नाही. प्रोग्राममध्ये तळटीपा कशा लिहायच्या, त्याचा सिंटॅक्स कळला, की लगेच इंप्लिमेंट करतो. शुभस्य शीघ्रम् - कसें?

इंटेरिम वर्कअराउंड म्हणून कॉमेंट्समध्ये तळटीपा चालतील काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही मग दुसऱ्यांची खरकटी साफ केली नव्हती वाटतं

केलीत ना!

आणि अजूनही करतो क्वचित्प्रसंगी. (करावीच लागतात. न करून सांगतो कोणाला!) खास करून, औटसोर्स / अॉफशोअरवाल्या प्रोग्रामरांनी केलेली घाण उपसणे अतितापदायक असते, असे निरीक्षण आहे. (दोष सर्वस्वी त्या प्रोग्रामरांचा म्हणता येणार नाही, परंतु तरीही.) तरी बरे, पूर्वी अॉफशोअर डेव्हलपमेंट फक्त भारतातच व्हायचे, आजकाल जगभरातल्या चित्रविचित्र देशांतून होते, इतकाच काय तो फरक. बांगलादेश काय, व्हिएटनाम काय, रोमेनिया काय नि काय न् काय. भारताहूनही स्वस्त प्रोग्रामर (एके काळी आम्हीही त्यातलेच होतो म्हणा. फक्त, हल्ली चीप औटसोर्सी असतात, आम्ही चीप इंपोर्ट होतो, इतकेच.) जगभरात पैशाला पासरी आहेत - नि औटपुट क्वालिटी तितकीच बेकार असते - हाच काय तो निष्कर्ष. ऑफशोअरिंग कितीही स्वस्त असले, तरी क्वालिटी सफ़र्स - अँड सफ़र्स मिज़रेबली - याचा अनुभव इतक्यांदा घेऊनसुद्धा इथल्या कंपन्यांना अक्कल कशी येत नाही, कळत नाही. पण ते असो.

तर सांगण्याचा मतलब, दुसऱ्यांची घाण आम्हीही उपसली आहे, आणि अजूनही उपसतो क्वचित्प्रसंगी. परंतु तरीही, (१) हे असले नाही सुचले कधी, आणि (२) क्लू लागला नाही.

इत्यलम्|
..........

पुन्हा, क्वालिटी सफर्स मिज़रेबली यात दोष सर्वस्वी शंभर टक्के त्या प्रोग्रामरांचा आहे, असे निदान मी तरी म्हणणार नाही. इट इज़ द प्रोसेस विच इज़ इनहेरेंटली फ्लॉड. शिवाय, मोले घातले रडाया म्हटल्यावर नाही आसू नाही माया हे व्हायचेच. त्यापेक्षा त्याच प्रोग्रामरास दीर्घकाळाकरिता किंवा कायमस्वरूपी इथे आणून थेट इथल्या स्थानिक मॅनेजमेंटखाली त्याच्याकडून काम करवून घेतल्यास ओव्हर द यर्स - खरे तर इन अ व्हेरी शॉर्ट पीरियड ऑफ टाईम - तो इथले कल्चर, वर्क कल्चर, एक्सपेक्टेशन्स, थॉट प्रोसेसिज़, रिक्वायरमेंट्स वगैरेंना एक्सपोज़ होऊन शिकेल, त्यांच्याशी वाक़िफ़ होईल आणि त्याच्या औटपुटचा दर्जाही आपोआप सुधारेल. पण तसे केल्यास इथले पब्लिक बोंबलते. औटसोर्स केले तरीही बोंबलतेच म्हणा. पण त्याहीपेक्षा, इथे प्रोग्रामर आणण्याऐवजी तिथून त्याच्याकडून काम करवून घेतल्यास त्याला पैसे कमी द्यावे लागतात - क्वालिटी बी डॅम्ड - आणि शिवाय प्रोग्रामर हवे तसे अदलाबदली करता येतात, लावता किंवा काढता येतात - यूज़ अँड थ्रो! असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0