कीप क्वाएट - चानाद सेगेदी

कीप क्वायेट ही डॉक्युमेंटरी फिल्म आज नेटफ्लिक्सवर पाहिली.

चानाद सेगेदी (Csanad Szegedi) या हंगेरियन युवकाची ही एखाद्या फिल्मी कथेपेक्षा अधिक ट्विस्ट असलेली कथा. ८२ साली जन्मलेला हा हंगेरियन युवक २००६च्या आसपास पूर्ण उजव्या/राष्ट्रीय विचारधारेचा एक प्रमुख सदस्य बनला होता. योबिक (Jobbik) या फार-राइट नॅशनलिस्ट ज्यु द्वेषी म्हणजे ज्याला अगदी क्लासिक निओ-नाझी पार्टी/संघटन म्हणता येईल त्या संघटनेचा अगदी पहिला पहिला शिलेदार. हंगेरियन गार्ड या हिटलरच्या एसएसवर बेतलेल्या दायेमुड, बायेमुड संघटनेचा संस्थापक व प्रथम प्रमुख. हे हंगेरियन गार्डवर पुढे सरकारने बंदी आणली.
योबिकचा उदय झाला तेव्हा हंगेरीत सोशालिस्ट (समाजवादी) पक्षाचे सरकार आले होते. मात्र ते फार यशस्वी होणार नाही हे दिसू लागले होते. फिदेस हा प्रमुख विरोधी पक्ष स्वतःच उजव्या विचारसरणीचा होता व थोडक्यात निवडणुक हारला होता. योबिकने फिदेसच्याही उजव्या बाजूची जागा पटकावून आश्चर्यकारकरित्या पार्लमेंटमध्ये १०%पेक्षा जास्त मते मिळवली.
२०१०पासून हंगेरीत फिदेसची सत्ता आहे आणि तिचा नेता विक्टर ओर्बान पंतप्रधान आहे. अनेकांना फिदेस आवडत नाही पण पर्याय म्हणून योबिक अजूनच कडवे अन माथेफिरु तर सोशालिस्ट देशाला/अर्थव्यवस्थेला गाळात नेतील म्हणून फिदेस बाय डिफॉल्ट चॉइस आहे. सध्या तरी फिदेसला पर्याय नाही
चानाद सेगेदी या पार्श्वभुमीवर एक तरुण नेता म्हणून उदयाला येत होता. २००८मध्ये तो युरोपियन पार्लमेंटमध्ये योबिकच्या तिकिटावर निवडून आला व स्ट्रासबोर्गला पार्लमेंटच्या सेशनला हंगेरियन गार्डचा गणवेश घालून गेला होता.

आता त्यानंतर १-२ वर्षात चानादची आजी (आईची आई) ही ज्यु आहे अशी एक बातमी आली. सुरुवातीला तिचा निषेध झाला. पण ते खरे ठरले. चानादने आजीला विचारले व तिने हे कन्फर्म केले. ही आजी आउश्वित्झ सर्वायवर होती. तिच्या हातावर औश्वित्झचा नंबर गोंदवलेला होता. ती आउश्वित्झमधून परतल्यावर एका ख्रिश्चन कुटुंबाच्या छायेखाली गेली, स्वतःचे ज्यु असणे तिने दाबून टाकले.
चानादला आजी ज्यु असणे हा मोठा धक्का होता. ज्यु धर्मप्रथेनुसार ज्यु बाईची मुले/मुली ही ज्यु असतात आणी त्या न्यायाने चानाददेखील ज्युच होता. वांशिक वर्चस्ववाद हा मध्यवर्ती मुद्दा असणार्‍या योबिकमध्ये त्याचे ज्यु असणे ही शेक्सपिअरची शोकांतिका ठरली. ते काय काय झाले हे डोक्युमध्ये बघाच.

हा चानाद एका राब्बीच्या बरोबर माहिती घेत, त्याच्याबरोबर चर्चा करत आता धर्म-कर्मकांडे पाळणारा कोशर ज्यु बनला आहे. ही डॉक्यु निर्माण करत होते तेव्हा तरी अनेक ज्युंना त्याच्या सच्चाईबद्दल शंका होती/आहे. त्याच्या आत्ताच्या विकीपिडिया एन्ट्रीनुसार चानाद इस्रायेलमध्ये इमिग्रेट व्हायच्या प्रयत्नात आहे असे लिहिलेले दिसते.

दुसर्‍या महायुद्धात हंगेरी ज्युद्वेष्टी होती व त्यांनी जर्मनांना मनापासून मदत केली. आजही विशेषतः पूर्व भागात (मिस्कोल्च, डेब्रेचेन) ज्युद्वेष व रोमाद्वेष ठासून भरलेला आहे. त्याचप्रमाणे अनेक लोक समंजस, लिबरल पण आहेत. एकुणात परिस्थिती सध्या इतरत्र आहे तशीच आहे.

मला सर्वात वाईट वाटले ते हा चानाद जेव्हा त्याला आपल्यात ज्यु रक्त आहे असे समजले तेव्हा तो लंबकाच्या दुसर्‍या टोकाला जाऊन ज्यु झाला. तो कदाचित ज्यु आतंकवादी/झिओनोस्ट होणार नाही. पण त्याचे हे टोकाचे ज्यु होणे मला खटकले. म्हणजे या मनुष्याला कुठल्यातरी समुहाशी जोडले असणे हे अधिक महत्त्वाचे वाटत राहिले.
उद्या तो वेस्ट बँक सेटलमेंटमध्ये अधिकाधिक जमीन बळकावत अरबांना बाहेर काढण्याचे काम इमाने इतबारे करेल कदाचित आणि तो या शोकनाट्याचा दुसरा अंक असेल.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चांगले लिहीले आहे. मी ही फिल्म पाहीन का नाही ते माहीत नाही पण लिहीलेले आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0