कळ

तिच्या हसऱ्या फोटोवर एक नजर फिरवली. सगळे प्राण बोटाच्या अग्राशी आणून डिलीटचा ऑप्शन वापरला. मोबाईल बंद केला. एक भला मोठ्ठा दगड मनाच्या दाराशी ठेवला आणि कौशिकदा उठले.
Backstage वाले आपापल्या कामात मग्न होते. खिळे, फळकुट, हातोडे, गिरमीट, हा कपडा, तो स्टूल, तो आरसा, ही पिशवी कुठे अडकवायची.... एक ना दोन! शुभारंभाच्या प्रयोगाची तारीख जवळ येत होती. तयारी जोरात चालू होती. कौशिकदा या नाटकाचे दिग्दर्शक. सगळी हयात ‘नाटक’ या एकाच विषयात गेलेली. आपण केलेली नाटकं संख्येत मोजण्यात त्यांना फारशी रुची नव्हती. सतत नाविन्याचा ध्यास. प्रयोग करीत रहायचे. चित्रपटांचा मोह कटाक्षाने टाळला, आणि टिव्ही सिरीयल या प्रकाराला जवळही फिरकू दिले नाही. रंगमंचावर अव्यभिचारी निष्ठा.

आज मात्र त्यांचे मन सैरभैर झाले होते. तसा त्यांचा स्वतःच्या मनावर ताबा मोठा. एखाद्या कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे आपल्याच एका मनाचे गुपित दुसऱ्या मनाला माहित न होऊ देता, काम करीत. सतत अभ्यास आणि चिंतन चाले.

...
या सगळ्यात ती त्यांना भेटली. एखादे साधेभोळे हळवे फूल दिसावे आणि त्याकडे पहात रहावे. तिचे एक प्रसन्न हसू, आणि त्यांचा दिवस सोन्यासारखा होई. जिकडे तिकडे हर्षोल्हास. तिचा आठव म्हणजे चैतन्याचा आठव. सरून गेल्या तरुणाईची आठवण. हसरा चेहरा, प्रेमळ नजर आणि जीवाचा पैल गाठेल अशी तिची गुणगुण. जीव लावणारी. जीव घेणारी. एकदाच प्रत्यक्ष भेटली होती. फुटभर अंतरावरून तिला पाहिले होते. तेवढेच. नंतर भेटत राहिली, ते तिच्या शब्दांतून. तिचे शब्द म्हणजे त्यांचा प्राण झाले. हळूहळू तिचे शब्द म्हणजेच ती. त्यांच्या लेखी तिला दुसरे अस्तित्व नसल्यासारखे झाले. गुंतून गेले.

नरमादीचा खेळ म्हणजे ऊन्हापावसाचा खेळ. त्यांनी कमी पाहिले नव्हते, कि कमी भोगले नव्हते. पण आयुष्यातील एक वळण असे आले, कि हे नको आता. म्हणजे तेच ऊन, तोच पाऊस अन तोच श्रावण. त्यांच्या मनाने पुढची पायरी गाठली.

......
पण हळूहळू लक्षात आले, ही म्हणजे ऊनपाऊस नाही. जीव कधी जडला कळले नाही. असा जडला, कि त्यांना स्वतःला भय वाटू लागले. अलीकडे ते स्वतःला विचारीत, ‘तिच्या सहज अल्लडपणावर आपला जीव कुरवंडी झाला.तिच्या पोक्त विचारांवर आपला विचार ताल धरू लागला. ती आत्ता काय म्हणेल, मग काय म्हणेल, कशी हसेल, अशी रुसेल, मग छोट्या मुलीसारखी गळ्यात पडेल, मग जाणत्या अभिसारीकेसारखी मिठी मारेल, मग गुदमरून जाईन इतके प्रेम करेल, मग बायको सारखी हक्काने भांडेल, मग मायेने डोक्यावर हात फिरवेल..... सगळे सगळे आपल्या दोघांच्या मनाचे खेळ. पण.... पण याला अंत नाही. याला मेळ नाही. खऱ्या जगात या सगळ्याला जागा नाही.... आणि या सगळ्या आनंदाला कवेत घ्यावे इतके माझे जग हळूवार राहिले नाही, ना ही तितकी उमेद राहिलीय. मग का हे प्रेम, ही मैत्री मी पुढे न्यावी? मी जाणता आहे, मी नको का थांबायला? मीच बोलणे बंद केले कि विषय हळूहळू संपून जाईल. सगळीकडून ऑफलाईन झालो कि, दोर तुटू लागतील. तिचे बांधून ठेवणारे शब्द सैल होत जातील. ती तरी किती दिवस त्रास करून घेईल? दिवस सरतील, विसरेल न विसरेल माहित नाही, पण ओढ कमी होईल. आच संपेल. एकमेकांत गुंतलेले जीव मोकळे होतील.... जे कधी सत्यात येणारच नाही, ते संपवलेले बरे. तिचा मनस्वीपणा कधी कधी माझा घात करतो. नकोच नको....’ नुसता विचार करूनही त्यांना धाप लागल्या सारखे झाले.

बरेच दिवस विचार करूनही त्यांचा तिच्यातला जीव सुटत नव्हता. कसा सुटणार?
तिने, ‘माहितीय का आज काय झालं ते?’ असं म्हणायचा अवकाश, कि झालं मग, धबधबा सुरु. कोण थोपवणार या निर्व्याज आनंदाला!

ते रिकाम्या स्टेजवरच्या खुर्चीत बसून या सगळ्या गोष्टीं परत स्वतःलाच सांगत होते. स्वतः मध्ये कि तिच्यामध्ये पार हरवून गेले होते. तितक्यात समीर घाईघाईने स्क्रिप्ट घेऊन आला. हा नाटकाचा रुबाबदार हिरो.
त्याची चाहूल लागताच, ते तंद्रीतून जागे होत म्हणाले, ‘ झालं का सगळं?’
‘दादा....’ त्याला कसं सांगावं तेच कळत नव्हतं.
‘काय झालं?’
‘सगळं झालंय खरं ! पण तुम्ही इतक्यांदा सांगूनही......’ स्क्रिप्टमधल्या एका ओळीवर बोट ठेवत म्हणाला, ‘ या ओळी मी हमखास विसरतोच. काय लोच्या होतोय तेच कळत नाहीये!’

कौशिकदांना हा प्रॉब्लेम माहित होता. बऱ्याचदा सांगूनही झाले होते. अशा प्रसंगी चिडून उपयोग नसतो. अनुभवातून कमावलेल्या आत्मविश्वासाने ते म्हणाले, ‘समीर, अरे तसं सोप्पंय. जे विसरतोय असं वाटतं ना, ते आधी लक्षात ठेवायचं. झालं!’

समीरला पटल्यासारखे वाटले. तो स्टेजच्या मध्यभागी उभा राहून सराव करू लागला. जीव ओतून संवाद म्हणत होता.
कौशिकदा त्याच्याकडे एकटक पहात होते. त्यांच्याही नकळत त्यांचा हात मोबाईलकडे गेला. ते चटकन भानावर आले. स्वत:शीच म्हणाले,
‘आपण या पोराला किती पटकन सांगितले – जे विसरतो असं वाटतं, ते आधी लक्षात ठेवायचं..... पण जे विसरायचंच आहे, ते विसरण्यासाठी काय करायचं?’

समोरचा प्रेक्षागृह त्यांना अवाढव्य वाटू लागला. हरेक रिकाम्या खुर्चीवर तिचा तोच हसरा चेहरा दिसू लागला. त्यांनी थकून डोळे मिटून घेतले.
‘मुली, इतका जीव लावू नकोस....’ त्यांच्या अंत:करणातून बारीक कळ उठली.

@शिवकन्या शशी.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet