भाग 2: The Tiny Seed

पहिला भाग: Pancakes, pancakes! इथे पहा.

आम्ही जमिनीचा तुकडा भाड्याने घ्यायचा ठरवला तर खरं, पण सुखासुखी कोण शेती करायला घेणार? अशा विचारात गाफील राहिल्यामुळे पहिल्या वर्षी तर मला प्लॉट मिळालाच नाही! पण तिथेच पहिला धडा मात्र मिळाला, की आपल्यापेक्षाही कितीतरी वेडी लोकं आधीपासूनच ह्या 'शेतकी उद्योगात' शिरलेली आहेत.

ह्या वेडाची सुरुवात डोरिस ड्यूक पासून झाली, कारण ती केवळ नावाचीच ड्यूक नव्हती, तर खरोखर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला न्यू जर्सीत जन्मलेली, घरंदाज कोट्याधीश 'जेम्स ड्यूक' ची एकमेव वारस होती. वडिलांनी तंबाखू-कारखान्यातून मिळवलेली अमाप संपत्ती तिने उत्तम राज्यकर्ती प्रमाणे कला, संस्कृती आणि निसर्गाच्या संगोपनार्थ दान केली. पूर्वी जिथे ड्यूक मंडळींचा 'वाडा' होता, त्या परिसरातील सगळी जमीन तिच्या मृत्यूनंतर 'ड्यूक फार्म्स' च्या नावाने जनतेला खुली केली गेली, आणि तिथेच न्यू जर्सीतली जैविक विविधता (biodiversity), प्राणिजीवनाचे संगोपन करणारे अनेक उपक्रम तिच्या संस्थेतर्फे राबवले जातात, त्यापैकी एक म्हणजेच हा 'नैसर्गिक, सामाजिक बागकाम प्रकल्प' (Duke Farms Organic Community Garden).

लोकांना नैसर्गिक शेतीच्या पद्धती कळाव्या म्हणून अगदी माफक दरात प्लॉट भाड्याने देऊन, तिथे ऑरगॅनिक बागकामप्रेमी लोकांचा मेळावा तयार व्हावा, अशी ह्या उपक्रमाची रचना आहे. स्वस्त आणि मस्त कुठल्याही गोष्टीपुढे रांगा लागणारच, तशा त्या इथेही लागल्या तर नवल नव्हतंच, पण ह्यावेळी मी चंग बांधलाच होता. नरकचतुर्दशीला भल्या पहाटे अंघोळ करून देवळात जायचो, तसे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, आदल्या रात्री पार्टीचे जागरण घडूनही सुद्धा, मी मन घट्ट करून उठलेच, आणि खरोखर पोराच्या शाळेसाठी ऍडमिशनच्या रांगेत लागावे (जे अमेरिकेत मला कधी करावे लागले नव्हते), तशी मी ह्या शेताच्या ऑनलाईन रांगेत लागले. काहीजण दरवर्षी प्लॉट रिन्यू करतात, तर अशा 'जुन्या जाणत्या' सभासदांना आधी प्लॉट खुले केले जातात, आणि उरलेले काहीच फक्त नवीन लोकांसाठी उरतात, त्यामुळे ह्या सकाळच्या साधनेचं फळ मिळालं, तेव्हा मी हाती लागेल तो प्लॉट घेऊन टाकला! खरंतर सगळ्यात छोट्या आकाराचा घ्यायचा होता, पण मिळाला नाही.

ही तर केवळ सुरुवात होती. मी नवऱ्याला तेव्हाच सांगून टाकलं, की बाबा रे, इथे अमेरिकेत इतरत्र दिसतो, तसा 'ग्राहक देवो भव' दिसत नाही. हा शेतीचा वसा एकदा घेतला, की सहा महिने तरी टाकता येणार नाही. तुमच्या प्लॉटची निगा राखण्याचे, तिथून तण उपटण्याचे काम तुमचे. प्लॉट दुर्लक्षित दिसला, तर सभासदत्व रद्द. बाजारात मिळणारे रासायनिक खत, किंवा किडे मारण्याचे औषध वापरले, तर रद्द. वर्षातून ४ तास श्रमदान केले नाही, तर रद्द. नवीन बागकामींना एक 'ऑरगॅनिक बागकामाचा' कोर्स घेणे पण आवश्यक होते. शिवाय 'स्वागत-परिचय (orientation) कार्यक्रमातही 'उपस्थिती अनिवार्य' होती!!! मला जमणार नव्हते, म्हणून आयोजकांना इमेल केली, तर 'प्लिज प्लिज जमवा', कारण अनुपस्थित सभासदांचे प्लॉट रद्द केले जातात, अशी प्रेमळ धमकावणी मिळाली, मग नवऱ्याला एक दिवस ऑफिसमधून लवकर ये, असं पाचारण केलं, आणि होता होता प्रवेशाचे सगळे सोपस्कार तर पार पडले.

माहिती सत्रात तण वाढू नये म्हणून रसायनापेक्षा प्रतिबंधावर भर, किंवा उभारलेल्या 'चौकटीत' बाग लावणे (Squarefoot Gardening) वर भर होता. कीड लागल्यास, जैविक औषधांची नावं सांगितली. तसेच, ऑरगॅनिक खताची नावं, वगैरे टिप्पणी काढायला मला तासभर लक्ष देऊन ऐकावे लागले.

भारतामध्ये जुगाड करून असेल त्यात भागवण्याची आपली सवय, तर इथे अमेरिकेत नालीसाठी घोडा घेण्याची पद्धत! एखाद्या सामाजिक, विना-नफा कामाचंही आयोजन इतकं उत्तम होतं की त्यात अथपासून इतीपर्यंतचा विचार केलेला होता. नवशिक्या बागकामींना मदत म्हणून 'Mentor' शी गाठ घालून दिली. शेताचे भाग करून ६-६ च्या गटांमध्ये प्लॉटचा 'शेजार' तयार केला, आणि शेजाऱ्यांची ओळखीचा कार्यक्रम झाला. शिवाय, आपल्या शेतातलं पीक अति झालं, वापरता येत नसेल, तर ते 'Food Bank' मध्ये दान करायचीही सोय होती.

उन्हाळ्याचे जेमतेम चार महिने शेतीला मिळतात, पण मुलांच्या सुट्ट्यांमध्ये लोक फिरायला जातात. तेव्हा शेजारी एकमेकांच्या बागेला पाणी घालू शकतात. 'बिया' च नव्हे, तर मदतीची, अवजारांची पण देवाणघेवाण होते... पण त्याही पेक्षा, बागेत राबून तण उपटतांना, गप्पांची भरपूर देवाणघेवाण होते! सुदैवाने आमचे शेजारी खूपच अनुभवी, पण मदतीलाही पुढे होते. "बागेत काय चूक-बरोबर, असा विचार करून घाबरू नका!" त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं. "अनुभवानेच शहाणपण येईल... हे लेट्यूस जमले नाही, तर ते पालक लावून बघा!" ओळख जुनी झाल्यावर खरंतर 'पाककृतींची', नाहीतर डब्याची देवाणघेवाण पण करूया, असे वायदे झाले, पण माझ्या मनात आता धाकधूक व्हायला लागली.

आजवर (कुंडी-साईज संस्कृतीच्या नावाने, अमेरिकेतल्या पहिल्या वर्षी, हौशीने) घरात लावलेली तुळस :), कधी एकदम हुक्की येऊन स्प्रिंगच्या सुरुवातीला आणलेली सूर्यफूलं वगैरे ;), पाण्यात उगवणारा बेसिल (basil), इतकंच काय, तर भेट मिळालेला लकी बाम्बूसुद्धा आमच्या हातून मेलेलाच आहे, त्यामुळे आपण कुंडीत झाडं मारून दमलो, तर शेतात आणखी झाडं मारूया! असले अघोरी पाप तर करत नाही ना, असा विचार करून माझी मलाच कीव यायला लागली. खरं बागकाम आपल्याला कितपत जमतंय, हे अजून माहितीच नव्हतं. अगदी एरीक कार्लच्या 'Tiny Seed' सारखी आमची सुरुवात जमेल का?,होईल का? असं मागे पुढे पाहतच झाली. सुरुवात छोटी होती, पण बी प्रमाणे तीत कुठल्या कुठल्या अनुभवांच्या शक्यता दडल्या होत्या? पहा पुढील भागात.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्त..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

मजेदारच आहे.
एक बीच्या शंभर बिया नक्कीच कराल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अपार्टमेंटात राहत असताना, सामुदायिक शेतीमध्ये आपणही सहभागी व्हावं, असं मलाही वाटत असे. पण त्यासाठी फार कष्ट केले नाहीत. आता स्वतःचं घर असण्याबद्दल मला एकाच गोष्टीचं सुख वाटतं. माळीकाम करता येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.