मूकपट आणि आजचं संगीत:

गेला आठवडा मस्तच बिझी गेला. रविवारी तारनोव्सक्ये गूरं (गूर-याचा अर्थ पोलिश मध्ये डोंगर. संस्कृत गिरी शी अगदीच साधर्म्य असलेला हा शब्द आहे ) या शहरात एक फेस्टिव्हल होता. जुन्या मूकपटांना लाईव्ह संगीत देण्याचा उद्योग करणारे काही ग्रुप पोलंड मध्ये आहेत. आमचा ग्रुप ही त्यातलाच एक. मी , मालविना पाशेक , प्योत्र मेलेख , बोरिस स्लोविकोवस्की असे आम्ही अर्थात "बेदेबेदे आणि पुरंदरे" ग्रुप चे सदस्य गेली काही वर्षे ( दुर्दैवाने फार नियमित नाही) जुन्या मूकपटांना लाईव्ह संगीत देण्याचा उद्योग करतो आहोत. तर या अशा एकमेव म्हणता येईल अशा फेस्टिव्हल च्या तिसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात आमची वर्णी लागली. आम्ही चार फिल्म्स निवडल्या होत्या. ( Au Secour, The haunted House, Journey to the Mars and Entr'Acte (1924). हा सर्व एकूण तासाभराचा प्रोग्रॅम होता, यात कुठेही ब्रेक नव्हता. या आधीचे दोन दिवस पोलंड च्या विविध भागातून आलेल्या ग्रुप्स ने परफॉर्मन्स केले होते पण ते आम्ही पहिले नव्हते. आता आमचा परफॉर्मन्स झाल्यावर जे दोन परफॉर्मन्स होणार होते ते पाहण्याची संधी होती. शेवटी दोन फिल्म्स होत्या आणि दोन्ही मध्ये सोलो वादक होते. पहिली फिल्म होती जर्मन- Triumph des Willens. १९३५ साली न्यूरनबर्ग मध्ये चित्रित झालेली , हिटलर च्या अध्यक्षतेखाली महा-महा प्रचंड अशी जी नाझी काँग्रेस झाली त्याचं थेट प्रक्षेपण ही डॉक्युमेंटरी करते. जर्मन भाषेशी गेली अनेक वर्षे सलगी असली, तरी युद्धाबद्दल मला फारच कमी माहिती आहे , किंवा अनेकदा वाचूनही मी ती विसरतोच. युद्धाबद्दलच्या गोष्टी मला फारशा आकर्षित करत नाहीत. अर्थात पूर्व जर्मनी चे काही लेखक , युद्धाच्या संदर्भातल्या त्यांच्या काही कथा , काही कविता आवडत्या आहेत. तर या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच अशी भव्य आणि थेट डॉक्युमेंटरी पहिली. ती अंगावर आलीच कारण यात हिटलर , त्याचे अनेक अधिकारी यांचे अनेक क्लोजअप आहेत, लाखो लोक , त्यात आबालवृद्ध असे सर्वच आले, हिटलर च्या स्वागतात आणि त्याचं भाषण ऐकण्यात पागल झाले आहेत याचं स्पष्ट चित्रण दिसतं. पहिलीच फ्रेम सुरु होते तेव्हा हिटलर चं विमान ढगांतून चाललं आहे , आणि नंतर ढगांचे विक्राळ ब्लॅक अँड व्हाइट आकार दिसतात, मग हिटलर विमानातून उतरतो आणि पुढच्या काँग्रेस पर्यंतचं सर्व चित्रण यात आहे. घटना पाहून मी घाबरलो , किळस आली हे सर्व आहेच , याला दुसरा ही धागा आहेच , तो म्हणजे याचं लाईव्ह संगीत फारच एकसुरी होतं. काल परवाच तूनळी वर मूळ डॉक्युमेंटरी पहिली , तिचं मूळ संगीत ऐकलं. अर्थातच जुनं संगीत हे क्लासिकल आहेच आणि जिथे भाषणं आहेत तिथे अर्थातच संगीत नाही , उलट ती भाषणं सुस्पष्ट ऐकू येतात. काँग्रेस मेळाव्याची भव्य घटना पाहून मला धक्का वगैरे बसला होता तो ओसरल्यावर मात्र मी अचंबित झालो. अचंबित होण्याचं कारण असं की त्या काळात इतकी डिटेल आणि इतकी अप्रतिम एडिटिंग असलेली ही फिल्म बनवायला या लोकांनी किती कष्ट घेतले असतील , कशा प्रकारे विचार केला असेल , किती कॅमेरे लावले असतील , अशा हजारो गोष्टी डोक्यात घोळू लागल्या. ( कदाचित तुम्ही याच्या तांत्रिक भागावर तुम्ही काही प्रकाश टाकू शकाल ). आता या लाईव्ह संगीतबद्दल थोडं : एक तर आता इलेक्ट्रॉनिक संगीत आल्याने पुष्कळ गोष्टी सोप्या झाल्या आहेत , म्हणजे लुपींग करून तुम्हाला कितीही ट्रॅक कितीही वेळ वाजवता येऊ शकतात. आणि इथेच माणूस मार खाऊ शकतो. या संगीतकाराने फारच एकसुरी आणि अति आवाजी संगीत देऊन आम्हाला कानावर हात ठेवायला भाग पाडलं. परंतु जुन्या मूकपटांना नवीन संगीत देताना , दुसऱ्याचं संगीत ऐकताना एक फार मोठी गोष्ट लक्षात येते ती म्हणजे जुन्या चित्रांना आजचं संगीत हे नवीन इंटरप्रिटेशन देऊ शकतं. या डॉक्युमेंटरी ला कायम एक भयाण सूर मागे लावून ठेऊन, त्याला दोन ढोलांची ( ड्रम्स ) साथ देऊन आणि इतर काही तालवाद्यांची जुजबी साथ देऊन आणि मूळ डॉक्युमेंटरी मधील क्लासिक संगीत बाजूला काढून आजचा संगीतकार या घटनेची भयाणता फार उत्तम रीतीने अधोरेखित करीत होता.
चित्रे जुनी आणि संगीत नवे याने त्या चित्रांकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाऊ शकते, त्या चित्रांचे नवे नवे अर्थ उलगडण्याची, कधी किमान त्याकडे इंगित करण्याची एक फार मोठी शक्यता नवीन संगीत देऊ शकते.
यानंतर चा चित्रपट होता द विंड /The Wind. ही तर आणखीनच जुनी , म्हणजे १९२८ सालची फिल्म डोरोथी स्कारबोरो या लेखिकेच्या याच नावाच्या कादंबरी वर आधारित आहे.लॅटी नावाच्या एका तरुण स्त्रीची,तिला फसवणाऱ्या पुरुषांची, व्हर्जिनिया सोडून रँच वर राहायला आलेल्या या स्त्रीच्या जीवनात तिथल्या वातावरणातला भरार वारा जो काही तुफान उडवून देतो त्याची ही अत्यंत ड्रॅमॅटिक , शेवटपर्यंत उत्कंठा ताणून धरणारी अप्रतिम कहाणी. याला संगीत दिलं होतं मेक्सिको हून आलेल्या एका अप्रतिम व्हायोलिन वादकाने. त्याने देखील सोलो वादन केलं होतं, साथीला इलेक्ट्रॉनिक संगीत होतंच आणि आधीच्या मनुष्यापेक्षा याचं संगीत फारच कल्पनाशील आणि पूरक होतं, फक्त पुन्हा इलेक्ट्रॉनिक संगीताच्या लुपींग मुळे काही ठिकाणी एकसुरी पणा आला , किंवा त्याच्या अनेक शक्यता पडताळून पाहण्याची संधी त्याने हुकवली, तरीही त्याचा परफॉर्मन्स आम्हा सर्वाना खूपच आवडला.

इथे चित्रपट रसिक पुष्कळ आहेत , तर त्यांच्यापैकी कुणाला हे चित्रपट पाहायचे असतील तर जरूर पाहावेत आणि त्याच्या संगीता बद्दल ही विचार करावा.इथे जुन्या मूकपटांना संगीत देण्याचा उद्योग कुणी करत असेल तर त्यांच्याशी बोलायला देखील आवडेलच.
( ऑक्टोबर/नोव्हेंबर २०१७ )

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

रिफेनश्टालचा 'ट्रायम्फ ऑफ द विल' एक जबरदस्त प्रचारपट आहे. त्याचं वरवरचं स्वरूप जरी माहितीपटाचं असलं तरीही अल्बर्ट स्पीअरनं रचलेले भव्य सेट, चित्रीकरण अधिकाधिक प्रभावी कोनांतून व्हावं ह्याचा केलेला विचार आणि तालीम करकरून घडवलेली दृश्यं अशा अनेक कारणांमुळे 'केवळ वास्तवाचं चित्रण' ह्या लोकांच्या मनातल्या माहितीपटाविषयीच्या सर्वसाधाारण संकल्पनेपेक्षा तो खूप पुढे जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||