चित्रप्रवेशाच्या पायवाटा आणि राजमार्ग - अरुण खोपकर

Mughal Miniature - frame within frame

चित्रप्रवेशाच्या पायवाटा आणि राजमार्ग - एक mise en abîme

काल संध्याकाळी अशोक कुमार दास या प्रसिद्ध कलाइतिहासकारांच्या सचित्र आणि सोदाहरण व्याख्यानाला गेलो होतो. त्यांच्या विद्वत्तेच्या ख्यातीमुळे आणि त्यांच्या संग्रहातील चित्रपारदर्शिकांच्या समृद्धतेमुळे प्रेक्षकांकरता जास्तीच्या खुर्च्यांची व्यवस्था करायला लागली होती. काही जण मागच्या भिंतीला टेकून तर काही बाजूच्या भिंतींना रेलूनही व्याख्यान ऐकायला एका पायावर तयार होते.

वक्त्याच्या आवाजाला वयोमानानुसार कापरेपणा आला होता. त्यांच्या इंग्रजी शब्दोच्चारांतून त्यांच्या मातृभाषेच्या दाट सावल्या जाणवत होत्या. पण वयोवृद्ध उस्तादाने आपला बाज सुरात जमवून पहिला स्पर्श करताच होणाऱ्या कंपनांनंतर बाकी कशाचे भान रहात नाही तसेच त्यांनी आपल्या विषयाला हात घालताच झाले. नजराच खुलल्या.

त्यांच्या व्याख्यानाचा विषय त्यांच्याच शब्दात सांगायचा तर होता Frame within Frame. मुगल मिनीएचर शैलीतल्या चित्रात दिसणाऱ्या वास्तूंच्या भिंतींवर दिसणारी चित्रे याविषयी चाळीसाहून अधिक वर्षांच्या संशोधनाच्या प्रवासाचा त्यांनी आढावा घेतला. ज्या चित्रांविषयी ते बोलत होते त्यांना 'मिनीएचर' असे म्हटले जाते हे खरे. पण केवळ त्यांच्या कागदाचा लहानसा हातात मावणारा आकार लक्षात घेऊन मिनीएचर असे म्हटले जात असले, तरी हा शब्द केवळ त्या चित्रांच्या पदार्थवैज्ञानिक गुणाचे वर्णन करतो. कलावंताच्या दृष्टीचे नव्हे. तिचे वर्णन करायचे झाले तर ह्या चित्रांना 'सूक्ष्मावलोकन चित्रे' असे म्हटले पाहिजे. साधारणत: १० ते १२ इंच उंचीच्या आणि ७ ते ८ इंच रुंदींच्या ह्या चित्रांत एक संपूर्ण कालखंड मावतो. त्यांत लढाया येतात, महाकाव्ये येतात, किल्ले आणि प्रासाद येतात, प्रेमी युगुले येतात, निसर्गाचे सूक्ष्म अवलोकन येते. एवढेच काय तर रागमालिका चित्रांत संगीतही येते. राग रागिणी येतात.

प्रा. दास यांच्या व्याख्यानात त्यांनी राज्यसमारंभासारख्या घटनांची चित्रे दाखवली. पण ती दाखवतानाच मुख्य कथनकेंद्राच्या इतस्ततः पसरलेल्या राजप्रासादाच्या किंवा दरबाराच्या भिंतींवर रंगवलेल्या चित्रांच्या तपशीलाकडे त्यांनी प्रेक्षकाचे लक्ष वेधून घेतले. तपशील विस्तृत करणाऱ्या लेन्सेसचा वापर करून सराईत नसलेल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या तपशीलाच्या अधिकाधिक सूक्ष्मदृष्टी चित्रपारदर्शक मालिकांनी त्यांनी भिंतीवरच्या चित्रांत दडलेली अनेक जगेच दाखवली. त्यात येशू होता. येशूची माता होती. त्याचे अनुयायी होते. मुगल बादशहांचे पूर्वज होते. वनस्पती आणि पशुजगतातल्या सौंदर्याचे उत्तमोत्तम नमुने होते.

एकाद्या पुराणवास्तूसंशोधकाने एकेका स्तरातून एका संस्कृतीचे न दिसणारे थर दृष्टीसमोर आणावे तसा हा चमत्कार होता. त्यांच्या हातातल्या प्रकाशदर्शकाने ते बदलणाऱ्या चित्रपारदर्शिकांवर जसा प्रकाशझोत फिरवीत होते तसतसे चित्रप्रवेशाचे कितीतरी मार्ग दृष्टीला मोकळे मिळत नव्हते.

आपण चित्रात प्रवेश करतो तो मुख्यतः चित्रविषयाच्या राजमार्गाने. पण या राजमार्गाखेरीच चित्रप्रवेशाच्या अनेक पायवाटा / दृष्टीवाटा असतात. त्या शोधाव्या लागतात. पायपीट करावी लागते म्हणा किंवा दृष्टीपीट करावी लागते म्हणा. पण भुंग्यासारख्या भिरभिरणाऱ्या डोळ्यांना यथेच्छ रसपान करता येते. प्रा. दासांच्या जराशा कंपित हातातल्या प्रकाशदर्शकाने अशा अपारंपरिक वाटांचा कायमचा लळा लावला. धन्यवाद.

- अरुण खोपकर

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

मुगल चित्रकला भारतात आल्यावर खुलली, वाव मिळाला. चित्र विषय कंदाहार, इराण अफगाणिस्तानमध्ये नव्हते का? होते ना. पण जिवंत वस्तुंचे चित्रण त्यांच्या धर्मात त्याज्य. इथे ते बाटले. तिकडचे चित्रकार इथे जयपूर,कोटा,हैदराबादमध्ये राजांच्या पदरी राहिले. महालांच्या भिंतींवर रंगवू लागले. वाळवंट सोडून इथला निसर्ग, रुतू (rutu)भावले. लढाया रंगवल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण जिवंत वस्तुंचे चित्रण त्यांच्या धर्मात त्याज्य.

पर्शियन मिनिएचर फार प्रगत झालेल‌ं होतं. ‌इतकंच नव्हे, तर इस्लामी काळातही तिथे मानवाकृतींचं चित्रण वर्ज्य नव्हतं. अगदी तिमुरिद शैलीतही (म्हणजे त्या 'कु'प्रसिद्ध तैमूरलंगाच्या काळात) प्रेॅषिताची चित्रं आढळतात. आपल्याकडच्या चित्रकारांना सुरुवातीला तिथल्या चित्रकारांकडून प्रशिक्षण दिलं गेलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इराणमधला त्यांचा अगोदरचा धर्म इस्लामनंतरही काही वर्ष तग धरून होता. ज्या इराणच्या शहाला औरंगजेब घाबरायचा तो मात्र पक्का इस्लामी झालेला. मग ते कलाकार इकडे आले असतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्या इराणच्या शहाला औरंगजेब घाबरायचा तो मात्र पक्का इस्लामी झालेला. मग ते कलाकार इकडे आले असतील.

ते कलाकार पळून भारतात आले नव्हते. भारतातल्या चित्रकारांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना इथे आणलं गेलं. उदा. इथे दिलेलं अब्द-अल समदचं चरित्र पाहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वर डकवलेल्या चित्रासंबंधी दोन ओळी खरडायला हरकत नव्हत्या. अन्यथा त्या चित्राचे तसे प्रयोजनमूल्य शून्यच पकडावे का !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0