ऑसम पियानो वर थ्रीसम : अर्थात किती किती सांगू तुला आणि कसं कसं सांगू तुला अर्थात काय लिहू न कसं लिहू ?

गेले सात दिवस पहाटे पाचच्या सुमारास उगवणारा सूर्य एकाच तीव्र स्वरात तळपत रात्री जवळजवळ नऊ वाजेपर्यंत निरभ्र आकाशात त्याचं रॉक संगीत लावून ठेवतो आहे. मे महिन्यात पूर्व युरोपातल्या एकदा देशात अशी घटना घडते आहे , वसंतातच कड्डक उन्हाळा सुरु झालाय म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग चा जिताजागता पुरावाच आहे हा ! मे महिन्याच्या सुरुवातीला , म्हणजे वसंताच्या सुरुवातीला छान फुललेले हिरवे हिरवे गार गालिचे आता सुकू लागले आहेत , काळपट तपकिरी पडू लागले आहेत. झाडं आणि फुलं नाही म्हणायला अजून फुललेली आहेत पण पावसाचा शिडकावा झाला नाही तर तीही लवकरच सुकून जातील.

सर्वसाधारणपणे मे महिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे वसंतागमनामुळे तयार झालेलं उत्फुल्ल वातावरण , अनेक फुलांचा वाऱ्यावर सुटणारा घमघमाट' त्यातही 'लिपा' हे झाड भरघोस फुलतं, मार्केटात जिकडे तिकडे दिसणाऱ्या लालचुटुक स्ट्रॉबेरी आणि एकूणच फळांची बऱ्यापैकी रेलचेल दिसू लागते वगैरे वगैरे !!! मे महिना आला की स्थानिक थिएटरवाल्यांना त्यांचा सीझन संपायचे वेध लागतात आणि याउलट संगीताचा सीझन जोरात ओपन होतो. जूनच्या महिन्यात एथनो पोर्ट असा एक प्रतिष्ठित संगीत महोत्सव असतो; त्यात जगभरातले 'एथनो' संगीतकार ऐकता येतात , काही उत्तम पोलिश बँड ही ऐकायला मिळतात. तसंच मे मध्ये एकामागोमाग एक क्लासिकल संगीताच्या मैफली सुरु होऊ लागतात. कुठे जाऊ अन कुठे नको असं होतं. त्यात "म्यूजिकल कोवर्किंग" असा एक नवीन प्रकार सुरु झाला आहे; त्याची भर - पण गेल्याच आठवड्यातली त्यांची एक अत्यंत लाऊड आणि भयाण कन्सर्ट ऐकल्यामुळे पुन्हा तिथे जाण्यापूर्वी दहादा विचार करावा लागेल. सोमवारी संध्याकाळी आमच्या विद्यापीठाच्या इंग्लिश विभागानं एक कन्सर्ट आयोजित केली होती. या कन्सर्टचं वैशिष्ट्य म्हणजे एका पियानोवर एकाच वेळी दोन कलाकार वाजवणार होते; अर्थात काही सोलो पण होते. यातले एक म्हणजे स्टॅन गुरुजी , एका अमेरिकन संगीत विद्यापीठातले नावाजलेले प्रोफेसरसाहेब ( पण हे नुसतेच पुस्तकी प्रोफेश्वर नाहीत हां !) , आणि दुसऱ्या बाईंचं नाव विसरलो सॅन्ड्रा की क्लाउडिया ?? सर्वात महत्वाचं म्हणजे ही कन्सर्ट आमच्या "आऊला / Aula " मध्ये होती. आऊला म्हणजे एक "आयला" प्रकरण आहे! विसाव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे ७ मे १९१९ ( पुन्हा आहे ना मे चा महिना !!) रोजी या हॉल चं उदघाटन झालं. निओरेनेसां या वास्तुशास्त्रशैली मध्ये बांधलेल्या या हॉल मध्ये बाराशे लोक सहज बसू शकतात, आजूबाजूला दोन गॅलऱ्या आहेत. अत्यंत उंच छत आणि विशाल दरवाजे असलेल्या या पांढऱ्याशुभ्र हॉल मध्ये पाऊल टाकताच संगीतसमाधी लावण्यासाठीच्या स्पेशल गुहेत आल्यासारखं वाटतं. स्टेजवर मागे ऑर्गनच्या भव्य चमकदार पाईपची रचना असलेला हा हॉल एकोस्टिकदृष्ट्या अत्युत्कृष्ट आहे. कुठल्याही सीटवर सुस्पष्ट ऐकू येतं. या हॉलमध्ये मी अनेक कन्सर्ट ऐकल्या आहेत, त्या अप्रतिम रंगतात आणि 'इब्रटा' इफेक्ट, अर्थात "इन्स्टंट ब्रह्मानंदी टाळी" इफेक्ट ची खास हमी! सोमवारच्या या जवळजवळ दीड तासाच्या कन्सर्ट मध्ये पुष्कळ जॅझ; त्यातही एकोणिसाव्या शतकातल्या रचना ऐकायला मिळाल्या. प्रोफेसर साहेब स्टॅन गुरुजी हे आफ्रो-अमेरिकन असून एकदम उत्फुल्ल ऑफ लाईफ, दिलखुलास आणि मिश्किल होते, आणि पियानोवादन तर फारच अप्रतिम होतं. त्यांच्यासोबत असलेल्या सडपातळशा सॅन्ड्रा की क्लाउडिया बाई टिपिकल अमेरिकन होत्या आणि जेवढ्यास तेवढंच बोलून प्रेक्षकांचा वेळ घेत नव्हत्या, पियानो वर मात्र त्यांची बोटं झकास फिरत होती. सोमवारी बाहेर दिवसभर सूर्या बँड चं जे रॉक संगीत सुरु होतं त्याच्या पार्श्वभूमीवर या थंडगार हॉलमध्ये जाताच राहत मिल गयी. इंग्लिश विभागाच्या प्रमुख बाईंनी पाहुण्यांची ओळख इंग्लिश-पोलिश अशा दोन्ही भाषांमध्ये करून दिली आणि कन्सर्ट सुरु झाली.

आता इतकी प्रस्तावना झाल्यावर मुद्द्याकडे येतो. मुद्दा असा आहे की मी इथे अनेक नाटकांना , मैफलींना जात असतो आणि या अशा अनेक मैफिलींबद्दल, नाटकांबद्दल पुष्कळ सांगावंसं वाटतं , म्हणजे खरंच -किती किती सांगू तुला - अशी अवस्था होते पण -कसं कसं सांगू तुला - इथे मात्र मी अडून राहतो. म्हणजे , ही कन्सर्ट अप्रतिम होती , मला खूप आवडली , छान वाटलं , मस्त वाटलं असं मोघम सांगून काम उरकता येईलच, पण या मैफलीचा अनुभव मांडायचा तर तो माझ्या भाषिक अभिव्यक्ती क्षेत्रात येत नाही असं वाटतं. म्हणजे एखादी सतारीची , तबल्याची , गाण्याची मैफल ऐकली तर मी लगेच पुढील (प्रकारची ) विधानं करू शकेन आणि त्यात पारंपरिक , आधुनिक, प्रासादिक , रोमँटिक असे अभिव्यक्तीचे विविध पदर दिसू शकतील: ( उदाहरणासाठी मैफल चांगलीच झाली असं समजून लिहितो आहे Wink ) आणि मैफलीच्या वर्णनासाठी काही तयार -रेडिमेड - असे वाक्प्रचार आहेत.

- यमनमधल्या तीव्र मध्यमाची जागा आणि त्याचा सुयोग्य वापर हे या कलाकाराचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल ,
- सतारीचे सूर असे झंकारत होते जणू देवळातील घंटा ; सतारीच्या सुरांवरून आठवलं , की विलायत खान साहेबांच्या सतारीचे वर्णन करताना पु.ल. नी त्याला दिलेली पाणलोटाची उपमा ( बहुधा रावसाहेब मध्ये ) मला लहानपणापासून भुरळ घालत आली आहे.
- तबल्याची समतोल साथ करावी तर अमुकतमुक यांनीच. त्यांच्या साथीमध्ये पेशकार , कायदे आणि लग्ग्या यांचा अप्रतिम वापर , डग्ग्यावरच्या घुमाऱ्यानी वाढवलेलं नाद सौंदर्य ... वगैरे वगैरे
- अमुक तमुक यांच्या तोडी गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले , तोडी रागाने संपूर्ण आसमंत भरून टाकला ....
- अमुक तमुक यांचा/हिचा आवाज मोरपंखाप्रमाणे मुलायम आणि सुरेल आहे ...

हे काही नमुन्यादाखल चे तयार वाक्प्रचार , किंवा वर्णनाचे ठरीव पॅटर्न.

सोमवारच्या मैफलीमध्ये स्टॅन गुरुजींच्या जॅझच्या रचना फार सुरेख होत्या , त्यात त्यांनी एक दोन वेळा बारीक डेमॉन्स्ट्रेशन ही दिलं आणि खासकरून जॅझच्या तालाच्या पॅटर्नबद्दल काही बोलले. मध्ये त्यांनी एक "Come Down Mozes" अशी जुन्या आफ्रिकन गुलामांची गीत वजा प्रार्थना देखील ऐकवली. याचे शब्द कळले नाहीत पण धून अप्रतिम होती आणि खरोखरंच प्रार्थनेसारखी होती. पण पुन्हा एकदा तेच , याचा आस्वाद मी नक्की कसा घेतला याबद्दल "कसं सांगावं" हे मला पक्कं उमगत नाहीये ! यात अर्थातच त्या मूळ गाण्याबद्दल , रचनेबद्दल मलाच फारसं माहित नाही हा मुद्दा आहेच!

ऑसम - हे विशेषण आपल्याकडे , म्हणजे भारतात रुळून आता दशक तरी सहज उलटून गेलं असावं आणि याचा वापर मी दहा वेळा सुद्धा केला नसेल. परन्तु कन्सर्टच्या शेवटच्या रचनेमध्ये या दोन कलाकारांनी इंग्लिश विभागप्रमुख बाईंना स्टेजवर पाचारण करून त्यांनाही सोबत वाजवायला सांगितलं आणि विभागप्रमुख बाईंनी सुद्धा दोन स्वर आलटून पालटून पण तालात वाजवून झकास साथ दिली आणि टाळ्या मिळवल्या. हे पाहत असतानाच - ऑसम पियानोवर थ्रीसम - असं चावटसदृश शीर्षक मनात तयार झालं.

ही कन्सर्ट संपवून मध्ये अर्ध्या तासाचा ब्रेक घेऊन या आऊलाच्या समोरच असलेल्या म्युझिक अकॅडमीच्या हॉलमध्ये जाऊन पुढची पाऊण तासाची चेलोची मैफल ऐकून आलो. याचं एक उपकथानक असं, की मला रोजमर्रा की ज़िन्दगी में कुठेही चित्रकार किंवा संगीतकार भेटतात आणि आमच्यात काही देवाणघेवाण होते , त्यातून कधी काही चांगले आणि पक्के संपर्क ही तयार होतात. दोन एक आठवड्यांपूर्वी बसमध्ये चार पाच तरुण लोक कुठल्याश्या कन्सर्टबद्दल बोलत होते; मी बाजूलाच उभा होतो तर त्यात मीही भाग घेतला आणि एवा नावाच्या मुलीनं तिच्या चेलोच्या डिप्लोमा परीक्षेच्या कन्सर्टचं आमंत्रण लगेच देऊन टाकलं. तर पियानो नंतर चेलो ऐकायचा म्हणजे थोडा वेळ मध्ये ब्रेक हवा होताच , तो मिळाला. सांध्यप्रकाशात शहरातच थोडी चक्कर मारून आलो आणि अकॅडेमीच्या छोटेखानी हॉल मध्ये येऊन दाखल झालो. वातावरण परीक्षेचं होतंच, एका बाजूला परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा समूहच होता, आपापली वाद्ये सांभाळत ते खुर्च्यांवर बसून होते. एका बाजूला त्यांचे मित्र-मैत्रिणी , हितचिंतक वगैरे , आणि पुढे एका लांब टेबलच्या भोवती तीन चार परीक्षक. एवा मंचावर आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर परीक्षेचा तणाव दिसत होता. सुरुवात करायला तिनं थोडा वेळ घेतला आणि मग तीन रचना वाजवल्या. साधारण पाऊण तास हा कार्यक्रम चालला होता. चेलो मी यापूर्वीही काही वेळा ऐकला आहे, पण जास्तकरून साथीचं वाद्य म्हणून किंवा बास साठी! सोलो चेलो ऐकताना मला चेलो बद्दल जे जाणवलं ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो:

बरोक शैलीमध्ये चेलोसाठीच्या खास रचना सापडतात आणि त्यात बाखच्या रचना खूप प्रसिद्ध आहे अत्यंत सुरेल आहेत. त्या ऐकत असताना जाळीदार , नक्षीच्या झरोक्यातून काहीतरी गूढसुंदर चित्रं पाहायला मिळाल्याचा भास किंवा अनुभव होतो. पंधराव्या शतकापासून हे वाद्य प्रचलित आहे. चेलो वाजवणाऱ्या स्त्रियाच मला जास्त माहित आहेत. त्या चेलो वाजवताना सुरेख , आकर्षक दिसतातच परंतु या वाद्यामध्येच काहीतरी स्त्रैण करुणा आहे की काय ठाऊक नाही. वादकांची बोटं जर सफाईदारपणेे फिरत असतील आणि वाद्याला स्वराची आस जर चांगली असेल तर विरहिणीचा आर्त स्वरच ऐकू येतो. चेलो मध्ये मजेदार , साध्या किंवा लाईट ( तथाकथित सुगम ) रचना आहेतच पण या वाद्याचा स्थायी भाव सारंगी प्रमाणे करुण आहे;गडद भीतीच्या छटादेखील चेलोमध्ये प्रामुख्याने दिसू शकतात.

थोडक्यात देशी अनुभवाची देशी अभिव्यक्ती देण्यासाठी देशी भाषेचा वापर आणि त्यातल्या उपमांचा वापर करता येणं हे स्वाभाविक आहे. परंतु 'पर'देशी अनुभवाचं, खासकरून संगीत -नाटक -नृत्य-चित्र -अशा अनुभवाचं , त्याच्या रसास्वादाचं वर्णन करताना , त्याची अभिव्यक्ती करताना मला इथे देशी उपमा , रूपके कमी पडतात असं वाटतं, किंवा जे सांगायचं आहे ते सांगितलं नाही असं वाटतं. गेली अनेक वर्षे अनेक भारतीय (मराठी) लोक परदेशात वावरत/राहत आहेत, अर्थातच प्रत्येकाचं अनुभव क्षेत्र निराळं आहे. तरीही काही अनुभवांचं मराठी मध्ये वर्णन करताना , त्याची अभिव्यक्ती करताना आणखी काहीतरी हवं होतं अशी चुटपुट त्यांना लागते का हे मला जाणून घ्यायचं आहे.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ललित आवडलं. ( मी आणखी काय लिहिणार म्हणा?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साचेबद्ध प्रतिक्रिया नसेल तर उलट जास्त चांगली पोचते. आवडला लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. पाश्चात्य शास्त्रीय संगीताचे रसग्रहण कसे करावे, याचा एक डेमो, पूर्वी एकदा ठाण्याला ऐकला होता. तो खूपच आवडला होता. तुमच्या लेखनातून तुम्ही या विषयातले दर्दी आहात, हे लक्षांत आले. या थोर कलाकारांच्या ऑडियोच्या लिंक्स देता येतील का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

जरूर देईन !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

नमस्कार ,

या काही लिंक्स देतो आहे. तरीही जर संधी मिळाली तर "लाईव्ह"च ऐका. जर फक्त आणि फक्त चेलो ऐकायला मिळालं तर फारच बेश्ट ! मग त्याचा स्थायी भाव कसा आहे हे लगेच दिसून येईल. या लिंक्स मध्ये एक रेडिओ देखील आहे. तो मी अधूनमधून ऐकत असतो.
https://www.youtube.com/watch?v=bVFn7Hvxxos

https://www.youtube.com/watch?v=REu2BcnlD34

https://www.youtube.com/watch?v=MBNyXpL908Y&t=1175s

https://www.classicalradio.com/celloworks

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

मला तर मराठी पिक्चर आवडला तरी त्याचा डिटेल review लिहायला अवघड वाटत. त्यापेक्षा त्यातल्या एखाद्या घटनेचं analysis करायला सोपं जातं. ओव्हरऑल चित्रपटाबद्दल समीक्षक लिहितात तसे लिहिणे अजिबात जमत नाही.

प्रश्न भाषेचा नाहीए.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0