कर्तव्यपूर्ती

कंपनीच्या एकाच ऑफीसमध्ये दामले, जाधव, जगताप व मेश्राम हे चार जण काम करत होते. त्यांच्या बॉसचे नाव होते कारखानीस. कामाचे वाटप करणे, इतरांकडून व सहकाऱ्यांकडून झालेल्या कामाचा अहवाल तयार करणे, कामाचा पाठपुरावा करणे, आणि यानंतर नेमके काय करायचे याचा निर्णय घेणे याची पूर्ण जबाबदारी कारखानीस यांच्यावर होती. कारखानीस व त्यांच्या चार सहकाऱ्यांची टीम कार्यक्षम होती. कुठल्याही तक्रारीला येथे जागा नव्हती.

कारखानीस यांना त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त अमेरिकेला जायचे होते. कामावर परत रुजू होण्यासाठी कमीत कमी सहा महिने लागणार असा अंदाज होता. कारखानीस यांच्या मते या आधुनिक तंत्रज्ञानयुगात अमेरिकेत बसूनही इथल्या कामावर देखरेख ठेवता येईल. त्यामुळे त्यानी कंपनीला त्यांच्या गैरहाजरीमध्ये substitute ची गरज नाही असे कळविले. कंपनीलाही तेच हवे होते. त्याप्रमाणे कारखानीस यांनी त्यांच्या चारी सहकाऱ्यांना बोलवून या सर्व गोष्टींची कल्पना दिली. प्रत्येकाला त्या त्या दिवसाच्या कामाचा अहवाल फोन, मोबाइल, SMS वा email द्वारा (WhatsApp अजून उपलब्ध नव्हते) कळवण्यास सांगितले. आणि कारखानीस अमेरिकेला निघून गेले.

पहिला आठवडा तसा बऱ्यापैकी गेला. कारखानीस यांना चारी सहकारी काय करत आहेत याची कल्पना त्यांनी पाठवत असलेल्या मेसेजवरून कळू लागली. कामाचे नियोजन करून प्रत्येकाला यानंतर काय करायचे याचे प्रतिमेसेज कारखानीस पाठवत होते. त्यामुळे कारखानीस यांच्या गैरहजेरीतही काम होऊ शकते याची खात्री पटू लागली. परंतु पुढच्या आठवड्यात त्यातील नियमिततेला धक्का बसला.
दामले यांचा मोबाइल बिघडला. त्यामुळे संपर्क तुटला.
जाधव यांना SMS करताना अडचणी येत होत्या. पाठवलेल्या SMS मध्ये बारीक सारीक गोष्टींचा उल्लेख टाळत असल्यामुळे कारखानीस यांना कामाच्या अद्यावत स्थितीची कल्पना येत नव्हती.
जगताप यांचा internet connection तुटला होता. त्यांना फोनवर बोलणे जमत नसल्यामुळे त्यांचा कामाचा अहवाल अगदीच तुटपुंज्या स्वरूपात कारखानीस यांना मिळाला.
जेव्हा जेव्हा मेश्राम कारखानीसाशी फोनवरून संपर्क साधण्याचे प्रयत्न करायचे तेव्हा तेव्हा call drop होत होते किंवा कारखानिसाशी संपर्क तुटत होता.
शेवटी काय तर कारखानीस यांचे remote control managementचे मनसुबे धुळीस मिळाले.
** ** **
दुष्काळ, दहशतीचे वातावरण, रस्त्यावरील वाढते अपघात, शेतकऱ्यांची आत्महत्या, धार्मिक हिंसाचार इत्यादीसारख्या गंभीर घटना भोवताली घडत असताना एका ऑफीसमधील एवढ्या क्षुल्लक समस्येबाबत चर्चा करावी हे काही योग्य नाही असेच अनेक वाचकांना वाटण्याची शक्यता आहे. परंतु वर उल्लेख केलेले उदाहरण नैतिकदृष्ट्या काही गोष्टी सुचवण्याचा प्रयत्न करत आहे, हे पटकन लक्षात येत नाही. वरवरून क्षुल्लक वाटत असली तरी नैतिकतेचे महत्व बाजूला सारता येत नाही.

आपल्यावर असलेली जबाबदारी पूर्ण झाली असे आपण कधी म्हणू शकतो? हे फक्त केवळ कारखानीस यांच्याशी संपर्क साधण्याच्या संदर्भात नसून लोकव्यवहारातील – घरातल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापासून अण्वस्त्राचा साठा वाढवण्यापर्यंतच्या – प्रत्येक निर्णयप्रक्रियेत नैतिकता डोकावत असते. आजच्या धकाधकीच्या युगात कुठलेही काम सांघिकरित्या करावे लागते. व टीमचा एक सदस्य म्हणून जबाबदारी झटकता येत नाही. जेव्हा आपण केलेल्या कामाचे योग्य व अपेक्षित परिणाम झालेले आहेत व त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता फारच कमी आहे हे लक्षात आल्यानंतरच आपण आपले कार्य पूर्ण केले आहे असे म्हणू शकतो. परंतु अनेक वेळा परिणामाची कल्पनाच येत नाही. पाट्या टाकल्यासारखे काम करत राहणे एवढेच आपल्या हातात असते. कारखानीस यांचे सहकारी त्यंच्याशी संपर्क साधण्याचा आटोकाट प्रयत्न अगदी मनापासून करत होते. परंतु त्यात काही (तांत्रिक) अडचणी आल्या. त्यात त्यांचा काय दोष असे म्हणण्यास येथे नक्कीच वाव आहे. त्यामुळे या चौघांचे चुकले असे म्हणता येणार नाही. अशा प्रसंगी एखाद्याकडून एखादी गोष्ट अपूर्ण राहिली वा अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत तर आपण त्याला/तिला जबाबदार धरत नाही. कारण त्यानी त्यासंबंधी प्रयत्न केले होते, असे समजून त्याला दोषमुक्त करतो व पर्यायी निर्णय घेत असतो.

खरे पाहता कारखानीस यांचे चौघे सहकारी पुरेसे प्रयत्न केले आहेत असे वाटत असले तरी कामाचा अहवाल कारखानीस यांच्यापर्यंत पोचवणे हाच मूळ उद्देश असताना ते उद्दिष्ट पूर्ण झाले नाही ही वस्तुस्थिती आहे. कदाचित तांत्रिक अडचणी पुढे करून हे चौघे जबाबदारमुक्त होतीलही. कदाचित आपण त्या चौघांवर कर्तव्यच्युतीचा आरोपही करू शकतो. येथे कारखानीस यांना रोजच्या कामाचा अहवाल पोचायला हवा व हा अहवाल कसा पाठवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यासाठी नेमके काय करायला हवे हा विचार टीम म्हणून करायला हवा होता. पर्यायी व्यवस्था करायला हवी होती. कारखानीस यानी emergency उपाय ठरवायला हवे होते. या गोष्टी न करता तंत्रज्ञानातील त्रुटीवर चूक ढकलणे नैतिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही.

कामाचे नियोजन करून त्यातील खाचखळगे समजून उमजून कार्य करणे हे महत्वाचे असते. युद्धजन्य परिस्थितीत एखाद्या प्रदेशावर अण्वस्त्रांचा मारा करू नये असे ठरलेले असल्यास त्यासंबंधीची पूर्ण काळजी घेणे निर्णय प्रक्रियेतील प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य ठरेल. त्यातील एखाद्याच्या चुकीमुळे त्या प्रदेशाची राखरांगोळी होण्याची शक्यता असते. व ती चूक सुधारण्याची संधी कधीच मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही जे काही करत आहात त्याचे अंतिम परिणाम समजून घेऊनच व ती जबाबदारी पूर्णपणे उचलून कर्तव्य करणे गरजेचे आहे. बँकेत काम करणारे ज्या प्रकारे ग्राहकांना या खुर्चीपासून त्या खुर्चीकडे, तेथून आणखी तिसऱ्या खुर्चीकडे असे संगीत खुर्चीचा खेळ खेळवताना वा संगणक down म्हणून हात वर करताना चीड येते. याविषयी त्यांना छेडण्याचा प्रयत्न केल्यास वरच्या (हजर नसलेल्या) अधिकाऱ्याकडे बोट दाखवून नामानिराळे राहण्यात धन्यता मानतात. अशा प्रकारचा (कटु) अनुभव प्रत्येक ठिकाणी – सार्वजनिक वा खाजगी – येथे नक्कीच येत असतात व आपण हताश होऊन हे सर्व सहन करत असतो. जर या साखळीतील प्रत्येक जण जबाबदारीने वागण्याचे ठरवल्यास कर्तव्यपूर्तीचे समाधानही मिळेल व व्यवस्थेला शिस्तही लागेल.

जरी कारखानीस यांच्या सहकाऱ्यांचे वर्तन या क्षणी तरी क्षुल्लक वाटत असले तरी अशा प्रकारचा बेजबाबदारपणा दूरगामी परिणाम करू शकतात हे विसरता येत नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

उदाहरण समजले नाही,बाकी ठीक.
सहा महिने सोडायला मालक काय मूर्ख आहे? तो म्हणेल सोड नोकरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0