सुपरहिरोंचा शोले!

"इन्फिनिटी वॉर" च्या सकाळी साडेआठच्या शोला सुद्धा फुल्ल गर्दी, शिट्ट्या, टाळ्या, हास्याचे कारंजे! पूर्ण चित्रपटभर मिस्कील विनोदी डायलॉगची सुखद पेरणी! एकेका सुपरहिरोच्या एंट्रीला टाळ्या आणि शिट्ट्या! यात भारंभार सुपरहिरो आहेत. एकामागून एक येतच राहतात. इतके की काहींचे नाव पण आपल्याला माहिती नाहीत. मी शेवटी मोजणे सोडून दिले.

मार्व्हल अवेंजर्स 3 (इन्फिनिटी वॉर) मध्ये थेनॉस पूर्ण चित्रपटभर भाव खाऊन जातो आणि संगळ्या डझनभर सुपर हिरोंना शब्दशः पुरून उरतो. हा सुपर व्हिलन थेनॉस बराच हल्क सारखा दिसतो, कलर मात्र जांभळा! पण बिचारा हल्क मात्र स्वतःला "मोठा हिरवा राक्षसी अवतार" मध्ये रूपांतरित करण्यात शेवटपर्यंत अपयशी ठरतो. उलट तो स्वतःच "हल्क बस्टर" शिल्ड मध्ये लपून युद्ध करतो.

विश्वनिर्मितीच्या वेळेस निर्माण झालेले सहा इन्फिनिटी स्टोन सम्पूर्ण ब्रह्मांडभर शोधून त्यांना हातात एकत्र घातल्याने पूर्ण ब्रह्मांड थेनॉसच्या ताब्यात येणार असते.

"वेळ, आत्मा, स्मृती, अवकाश, वास्तविकता, शक्ती" ते तो मिळवतो का? हे चित्रपटात बघायला हवे.

यात "अवतार" चित्रपटासारखे मैदानावर आणि हवेत युद्ध आहे पण जास्त वेळ नाही. "इन्फिनिटी वॉर" या नावाला भुलून यात मैदानावरचे युद्ध शेवटी खूप वेळ असेल या भ्रमात राहून चित्रपट पहायला गेलात तर निराशा होईल. फक्त "व्हिजनच्या" कपाळावरचा इन्फिनिटी स्टोन थेनॉसच्या हाती न लागू देण्यासाठी ते युद्ध लढले जाते. पण वेगवेगळ्या ठिकाणी काही ठराविक सुपरहिरो एकत्र येऊन थेनॉसच्या मिशनला हाणून पडण्याचे काम करत असतात आणि ते एखाद्या युद्धापेक्षा कमी नाही. किंबहुना तेच खरे वॉर आहे!

काही सुपरहिरो जसे की "आयर्न मॅनच्या कृपेने नवा इलेक्ट्रॉनिक पोशाख आणि कोळ्या सारखे सात आठ पाय लाभलेला स्पायडरमॅन", स्वतः आयर्न मॅन आणि डॉक्टर स्ट्रेंज वगैरे मंडळी तर हिंमत करून पृथ्वीबाहेर जाऊन थेनॉसला त्याच्याकडे जाऊन प्रत्यक्ष भिडतात. पण थेनॉसच्या मानलेल्या मुलीच्या (गमोरा) प्रियकराच्या एका चुकीने तो हातचा आलेला निसटतो.

यात गार्डीयन्स ऑफ गॅलेक्सिची मंडळी पण आहेत. ती अवेंजर्सला मदत करतात. त्यातील कुत्र्यासारखा दिसणारा भयंकर विनोदी प्राणी मजा आणतो. यात थॉर आणि कॅप्टन अमेरिका थोडे ढेपाळलेले आहेत. दोघांचे हक्काचे हत्यारं त्यांच्याजवळ नाहीत. थॉरला हतोड्या ऐवजी कुऱ्हाड मिळते (अगदी शेवटी). मला अतिशय प्रिय अशी अभिनेत्री "स्कारलेट जॉन्सन"ला ब्लॅक विडोच्या भूमिकेत खूप कमी वाव आहे आणि तिच्या बिचारीच्या वाट्याला एकही लक्षात राहण्यासारखा डायलॉग आलेला नाही.

चित्रपटाचा शेवट धक्कादायक आहे. अपूर्ण आहे. पुढे काय होईल ते अवेंजर्स 4 मध्ये दिसेल. शेवटी येणारी नावे (credits) संपेपर्यंत वाट पहा कारण त्यानंतर आणखी एक प्रसंग आहे ज्यात पहिल्यांदा निक फ्युरी दिसतो. पोस्ट क्रेडिट सिन!

या चित्रपटाला सुपरहिरोंचा शोले म्हणता येईल. यातला थेनॉस हा गब्बर इतकाच डेडली आहे! पण तो "कितने आदमी थे" असे विचारत फिरत नाही तर "कितने इन्फिनिटी स्टोन बाकी है?" असे विचारतो. चित्रपट बघायला जातांना मार्व्हल कॉमिक्स चे वाचन थोडे तरी केलेले असले पाहिले किंवा कमीत कमी मार्व्हलचे या आधीचे दहा पैकी थोडे तरी चित्रपट पाहिले असले पाहिजेत.

- निमिष सोनार, 29 एप्रिल, 2018, रविवार

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)