दिवसातून छप्पन वेळा
anant_yaatree
दिवसातून छप्पन वेळा
माझा चेहेरा बदलत असतो
आरश्या पाठचा अचपळ पारा
नसानसातून दौडत जातो
दोन देतो दोन घेतो
चेहेरा तेव्हा निब्बर होतो
टेक्नोमंद ठरतो तेव्हा
थोडा थोडा कोकरू होतो
कोsहं प्रश्न पडतो तेव्हा
मुमुक्षू मी असतो खास
कटिंग सोबत बिडी पिताना
मीच टपोरी टाईमपास
अचाट काही जेव्हा बघतो
अफाट काही जेव्हा ऐकतो
अतर्क्याची हाक ऐकून
अवघा चेहेरा कुतूहल बनतो
जुनी गाणी, जुने छंद,
वार्यासंगे विस्मृत गंध,
दर्वळतात भोवती जेव्हा
चेहेरा कवळा होतो तेव्हा
लोलक तोच, तिरीप नवी
जुनीच कविता, नवा कवी
अनंतरंगी अनवट खेळ
बघायचा, तर हीच वेळ
फार आवडली
कविता फार आवडली.
> जुनीच कविता, नवा कवी
येस. मर्ढेकरांची झाक जाणवतेच.