ओजबिंदु

कविश:"आग आहे लागलेली अंतरींच्या मोहळा
आणि आकाशांत आहे आसवांचा सोहळा
चालल्या आहेत धारा तोंवरी न्हाऊन घे"

कैलाश:"कविश बस कर यार, तुझा हा आसवांचा सोहळा. बघ तू असं जीभेवर कच्चं मांस ठेवून चाखलंय का, बघ!"

कविश:"तू झाडांना आजारी पडतांना पाहिले आहेस का रे कधी, वेड्या; ह्या प्राण्यां-पक्ष्यांच्या जगात परग्रहवासियांसारखी आजारी पडतात रे ही झाडं."

कैलाश:"झालास का परत तू सुरू, तू तर ना हा सुरा काही दिवस तुझ्याकडे ठेव आणि हा; वापर सुद्धा.. चित्र काढून ठेवू नकोस, मांस कापायला वापर, जीव घे मुक्या जनावरांचा; मग बघ कशी कविता उतरते तुझ्याआतून ते!"

कविश:"तुला पणतीवर झेपावत जाणारा पतंग ठावूक असेल ना, पण ह्या सुर्‍यावर जीव देणारा, आणि मरणाला एका क्षणात कवटाळणारा कलाकार माहिती नसेलच तुला; नाहीच माहिती असणार तुला व्हॅन गॉग. जीवन; हे जीवन जगून करणार तरी काय, मरून पहावे बेहत्तर, असे पण करतात इथे. बकर्‍यावर सुरी फिरवतात ना तसेच व्हॅन गॉगने स्वतःच्याच हाताने बंदुकीने स्वतःला चिरडून टाकले होते. असाच जर मी संपलोच तुझ्या दिलेल्या सुर्‍याने तर माझ्या कविता काय खाक राहणार मग?"

कैलाश:"संपव ना, संपव सर्व. तुझं हे आरस्पानी रूप संपव, आणि माझी तगमग सुद्धा. कविश! कविश!"

कविश:"तुला ना आयतं सर्व करून पाहिजे, सर्व काही तुझ्या डोक्याला जराही तिडीक न जाता विरलं पाहिजे, हो ना? काही काही आवाजांना जराही शब्द फुटू शकत नाहीत अगदी तसंच तुझं जीवनही अभ्र दाटल्याविना ओसरायला हवंय ना तुला?"

कैलाश:"हे अभ्र, बिभ्र जाऊ दे. माझ्या एका साध्या सरळ प्रश्नाचं उत्तर दे, तुला का सतत हवा असतो मी, गलिच्छ घाण एक खाटिक मी, ना आगा ना पिछा, ना धड माहिती मी मुस्लिम की हिंदू. सुर्‍यावर एकदा जीव लावून जीव घेतला की माझ्या पोटाची आग विझते. का मागे लागतोस माझ्या? रात्रभर रिक्षेत सोबत बसवून पाचशे रुपये उडवलेस मागे, का? आणि हा; तू ना ह्या डोक्यात विजा चमकवत राहतो, असं काही काही बोलून सतत आणि तुझं ते माझ्या डोळ्यांत निरंतर डोकावत राहणं.. तर माझा काय जीव घेशील का रे अश्याने!!"

The sadness will last forever.

+++++++++++++++++++++++++++++++++

कविश:"The sadness will last forever.
व्हॅन गॉगचे शेवटच्या क्षणाचं वाक्य होतं हे, आणि असंच अगदी उच्चारलं, ते बुद्धाने आपल्या बुद्धस्वरूपात पहिल्यांदा आल्यावर. न विचारता, विनाउद्देश जेव्हा जेव्हा लोकं अशी वाणी उच्चारतात, तेव्हा ते त्यातून त्यांचं जीवनाचं सार व्यक्त करत असतात.
आणि काय रे, का नको तुझी मी आस धरू, तुला खातो की काय मी तुला? जरा दुकानात उभारलेलं हलाल पाहून माझ्या मृत्यूचं आंदण चुकतं करतो आहे. तुझा तर फायदा झालाय ना; माझ्या सोबत राहून 'निरंतर' वगैरे शब्द बोलायला लागला तर आहेस. तुझं नाव नुसतं कैलाश आहे, कैलाश!"

कैलाश:"बस तुझ्यावर ओठातून फुटणारे कैलाश नावसुद्धा किती देखणं आहे कविश!
मात्र मरणाची भाषा यापुढे कधी करायची नाही."

कविश:"नाही, असे ओठांवर बोटं ठेवून माझी धडधड वाढवू नकोस. तुझ्या बोटांच्या राठ त्वचेतून माझ्या ओठांवर थरथर निर्माण होते रे."

कैलाश:"राठ लागत आहेत काय, मग मलमली गुलाबाला निवडूंग टोचत आहे, सोसत नाही का? बघ कसं ते

गोरी करत सिंगार
बाल बाल मोती चमकाये
रोम रोम महकाये
गोरी करत सिंगार"

कविश:"पुरे आता, ओठातून रक्त येईल आता. काळजी नाहीये का तुला माझी. जवळचा माणूस जवळ असेल ना तर आपण त्याची काळजी करणं सोडून देतो, तसं झालंय कैलाश तुझं. माझ्या काळजीने एकीकडे हैराण होणारा तू, असा मी सापडलो तर अगदी हलाल करतोस माझं. तुला सवयच लागली ही.. इथला माहौल असा आहे, आणि का कोण जाणे मला तो हवाही आहे."

कैलाश:"दह्यात कालवून खाणार आहे मी तुला कविश! कविश! हा माहौल, हा गंध इथली हिंसा, रक्ताचा पाट, कुण्या पोटुशी बकरीच्या 'झटका'मध्ये पोटातला बकरु कोथळ्यानिशी निघाणारा.. आणि तुझं आख्खं नागडं गोरं पान शरीर.. हेच...हेच जीवन आहे माझं, माझं मला गवसलेलं तत्त्वज्ञान!

कमी न की तेरे वहशी ने ख़ाक उड़ाने में

जुनूँ का नाम उछलता रहा ज़माने में"

+++++++++++++++++++++++++++++++++

कविश:"फिराक़साहेबांचा शेर, अरे वाह, कैलाश! वहशी आहेस का तू! जंगली आहेस का! तुझ्या दाढीची; सिंहाच्या ह्या आयाळाची, हा गलितगात्र हरिण बघ शिकार करतो आता! एकेका स्पर्शाने रोमारोमांत फुलपाखरे भिरभिरतील आता! मोरांचा पिसारा शरीरभर फुलेल आता! नजरेच्या प्रांगणात लक्षलक्ष तारका उजळपाजळ होतील बघ आता!

काटा रुते कुणाला,
आक्रंदतात कोणी
मज फुल ही रुतावे हा
दैवयोग आहे

सांगू कशी कुणाला कळ
आतल्या जीवाची
चीरदाह वेदनेचा मज शाप
हाच आहे

ही स्नेहवंचना की काहीच
आकळेना
आयुष्य ओघळोनी मी
रिक्तहस्त आहे"

कैलाश:"कविश! कविश!"

कविश:"मळलेल्या, हिंदकळणार्‍या ह्या वाटा नाहीत..
तरी आहे पावलांची चाहूल इथे
कैलाश! तुझा श्वास घेऊन मी जगतो आहे जरा इथे.."

कैलाश:"आज पहाट संपूच नये, वाटतं आहे कविश्वरा! तुझ्या गीर्वाणीत आकंठ बुडून राहावंसं वाटत आहे. त्या दिवशी तू भेटलास मला, ते माझं भाग्यंच! का म्हणून विकत होतास स्वतःला जनावरांच्या बाजारात! तुझ्या सारख्या हिर्‍याची काय किंमत केली जाणार होती. दारूच्या नशेत डोलणार्‍या तिथल्या भेकडांनी तुझा लचका तोडला असता तर.."

कविश:"तू पण मला विकत घ्यायलाच आला होतास ना कैलाश! दारूने तारवटलेल्या तुझ्यापण नजरेतली कामवासना ऊतू जात होती तेव्हा तिथे, वाचली होती मी ती! लगेच आलेल्या लिंगाभोवतीची खाजही खाजवली होती तू, बाकी सर्वांना मागे टाकण्याच्या अहमहमिकेत तू सामील होतासच ना!
जाऊ दे ती रात्र. आजची रात्र तुझ्या उत्तुंगाची साधना करू दे.

वक़्त की क़ैद में ज़िंदगी है मगर
चंद घड़ियाँ यही है जो आज़ाद हैं
इनको खोकर मेरी जान-ए-जाँ
उम्र भर ना तरसते रहो
आज जाने की...

कितना मासूम रंगीन है ये समां
हुस्न और इश्क़ की आज मेराज है
कल की किसको ख़बर जान-ए-जाँ
रोक लो आज की रात को
आज जाने की..."

+++++++++++++++++++++++++++++++++

कविश:"सौंदत्तीच्या डोंगरावर असाच गुलाबी सूर्य उगवला होता, आणि नरभक्षी जत्रेत तू उतरला होतास, तेव्हा तुला पाहून माझा आत्मा तळमळून उठला होता. माझ्यात उरलेलं ओजस मला तुझ्याकडे ओढून नेत होतं, तू होतास तेव्हा तिथे; तुला ठाऊक नाही, ही ठिणगी कशी असते. आरक्त ओलावलेल्या सुर्‍यावर ही शीतलहर थरथरते ती, तिथे वीजही फिकी पडते. मुंबईपासून गोकर्णाच्या किनार्‍यांवर दिवसेंदिवस मरणाला साद घालत पडून होतो, एड्सच्या विळख्यात. मृत्यूचं कुणी आंदण दिलं होतं मला. कळालं की इथे गुप्तपणे कॅनिबल होत असतं, माझं काळीज खाणारं कुणी मला नक्की तिथे भेटेल, असं वाटलं आणि शेवटी तुला पाहिले, तुला बेभानपणे पाहतच राहिलो. तुझ्या शरीराच्या खविस रूपाने मला बैचैन करून टाकले, सारखं ते माझ्यात उतरत जातंय रे; आत तर अगदी शीतगार वाटतंय रे.. मरणयातनांतून जगण्याचे अणूरेणू दिप्तवणारा तू.. ओजबिंदु प्रखर हा जणू!"

कैलाश:"काय! कविश, तुला एड्स आहे. का! का पण! कसं काय! काय रे, जीवंच ना घेतलास की माझा, काय सांगतो आहे, माझा विश्वास कसा बसावा. दिवसा उजाडत्या वेळी तरी खोटं नको बोलूस. 'निष्ठुर काळजा माझ्या!' असं बोलायचा ना तू मला.. त्या पहील्यांदा झालेल्या भेटीतच तू मला तुझं बनवलंस ना रे.. अगदी तुझ्यासारखं का रे? तू आहेस तसा मी आहे ना आता! झालं तर.. कविश ये मिठीत"

कविश:"मी मेलेलो आहे रे आधीच, देह सुटा व्हायचा बाकी आहे आता, तुलाही सोबत नेत आहे. रोज स्वप्नात तू येतोस, तुझा सुरा घेऊन, मला खुपसतोस, या हृदयात आत जाऊन खुपसून जातोस, इथे तिथे आत खोलवर, रक्ताच्या थारोळ्यात जातोस, धडधड त्यामुळेच चालू राहते रे, बालकवी म्हणतात तसं..

'पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे हिरव्या कुरणामधुनी चालली काळ्या डोहाकडे.

झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर'

तू औदुंबर माझा, माझ्या जळांत तू!"

कैलाश:"बस कर बकवास. आता नाही सहन होत ही तुझी शब्दं. एका पांघरूण घेतलेल्या माणसासारखं बोलतोयस, काही सांगता येत नाही का तुला आत काय होतं आहे ते आत्ता.. सांग ना रे जीवलगा.. आपण असेच मरून जाणार का रे.. ही एड्सची सुरी आपल्या मानेवरून परत मागे नाही का हटणार? आता तर कुठे आपण भेटायला लागलो होतो ना रे.. सर्व संपणार का रे?"

कविश:"होय रे, माफ कर मला."

कैलाश:"मग का थांबलो आहोत आपण क्षणाक्षणाला असं हे मरण जगून.. चल जाऊ एकदाचं संपवून. फार सोपं आहे, मी रोज पाहतो, निचेष्ट पडून येतात माझ्यासमोर ही मुकी जनावरं अगदी हवंहवंसं असतं त्यांना‌‌.. मरण हवं आहे असाच भाव डोळ्यांत दिसतो त्यांच्या म्हणून... ये... माझ्याकडे आहे विष.. घेऊ आपण.. चल.. आणि तिथे जाऊ की जिथे काही नाहीये हे सर्व!"

कविश:"नक्की ना राजा! तिथे तू
येशील ना नक्की पुन्हा?"

कैलाश:"तर तर, तुझ्याशिवाय करमतं तरी का मला, नाही ना!"

कविश:"तुझी दाढी जाळून टाकेन हा नाहीतर मी"

कैलाश:"चल जाऊ दे आता, दाढीची काळजी जास्त घ्यावी लागते आता!"

कविश:"गेलाच शेवटी आधी तू, किती येणारे हुंदके आवरत निरोप दिलास तू आधी मला, आणि आता तुझी ही उणीव कशी भरून निघणार रे, विष घेऊनही परत येण्याचे आश्वासन देणारा तुझा चेहरा सारखा डोळ्यांसमोर समोर येतो आहे."

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मला तरी हे भाषांतरीत वाटत आहे, तसं नसेल तर माफ करा.
पण - भाषा अशी कृत्रिम का? दोन्ही पात्रं नाटकी ढंगानं मुद्दाम बोलतायेत असं अभिप्रेत आहे का?
शिवाय - मला नक्की काय सांगायचंय ते कळलं नाही. Sad

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0