पुल - शंका आणि (कु)शंका इ.
भाग १ वर बरीच चर्चा झाली आहे. त्यात अनेकांनी मांडलेले अनेक मुद्दे वाचनीय आहेत.
पुढेमागे माहितीपर प्रतिसादही इथे कलेक्ट करण्याचा विचार आहे.
पुल वाचताना आलेल्या काही शंका. काही ढोबळ तर काही खुसपटं काढल्यागत- पण प्रामाणिक शंका आहेत.
उत्तरं मिळाल्यास आभारी राहीन.
१. हसवणूक मधल्या "आमचा धंदा एक विलापिका (१९६१) ह्या लेखात टीकाकारांची खिल्ली उडवताना पुढील मजकूर आहे-
ह्या गंभीर मंडळींचा एकूण आव मात्र, “मनात आणीन, तर पन्नास विनोदी लेख लिहीन; पण जाऊ दे, विनोदी लेखक जगतोय एकटाच! जगू दे त्याला”. असा असतो.नुसता आव चालेल. पण एखादा असला लेखक जेव्हा विनोदी म्हणून काही तरी लिहायला जातो, तेव्हा त्या लीळा काय वर्णाव्या ? – “ अंगे भिजली जलधारांनी” अशा युवतींना अलिंगन द्यायला गेलेला एखादा चारुदत्त केळ्याच्या सालीवरून निसटून पडाव, हातातली छत्री उलटी व्हावी, आणि भिजल्या रस्त्याचे चुंबन घेताना पाठीवरचा बुशकोट वर जाऊन आतल्या बनियची फाटकी भोके दिसावी, म्हणजे जे काही होईल, ते होते.
मग ही माणसे टीकाकार होतात. अशात ललितवाड्मय आणि लग्न दोन्ही न जमलेली जर एखादी विदुषी असली, तर फारच बिकट अवस्था! अशी एखादी विदुषी विनोदी लेखक किंवा लेख पाहिला रे पाहिला, कि त्याला खोली नाही, खोली नाही, असा आक्रोश करते.
ठळक मजकूर कुणाला उद्देशून लिहिला आहे? मला हे दुर्गा भागवतांबद्दल लिहिलंय असं वाटलेलं.
काहीही असो, हा फारच below the belt वार केल्यागत फ़टकारा आहे. पुलंचा विनोद सहसा इतका बोचरा नसतो.
शिवाय "लग्न न झालेली" हा प्रकार मला झेपला नाही. ह्यात मला स्त्रीवाद वगैरे मुळीच आणायचा नाहीये. तो प्रश्नच नाही. साधा औचित्याचा प्रश्न आहे. अत्र्यांकडून हे अपेक्षितच असल्याने तिथे काही प्रॉब्लेम नसावा. पण पुलंच्या क्यारेक्टरला हे जरा विसंगत वाटलं म्हणून इतका कीस.
२.
एक माणूस म्हणून पुलंचं कलेवरील प्रेम विख्यात आहे. अमेरिकेत गेल्यावर बर्कले विद्यापीठात एका आठवड्यात दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची यादी पाहून ते हळहळतात - आपल्या इथे हे कधी होईल? कविता हा आपला आवडता प्रकार आहे असं त्यांनी म्हटलंय. अशा रसिक माणसाने टिपिकल मध्यमवर्गीय पुरूषाचं पात्र लेखांमधून ताकदीने मांडलं त्यात पुलंचे स्वत:चे विचार असावेत आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व डोकावत असावं हे पटत नाही. त्यांनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांचे विचार बुरसटलेले, कूपमंडूक आणि अतिशय कोरडेठाण (साहित्यसंगीतकलाविहीन: साक्षात पशू पुच्छविषाणहीन:) होते. तेव्हा हा विरोधाभास जर लक्षात घेतला तर पुलंच्या विनोदी साहित्यातून त्यांचं जीवनविषयक तत्वद्न्यान तंतोतंत प्रतीत होतं हे चूक.
.
तेव्हा "तुझे आहे तुजपाशी"तलं काकाजींचं तत्वद्न्यान पुलंचं स्वत:चं जीवनभाष्य आहे- हे मत मला पटत नाही. काकाजी हे आचार्यांचं दुसरं टोक आहे. आचार्य गांधीवादी नाहीत, केवळ हेकटपणे स्वत:च्या दुराग्रही स्वभावाला अनुसरून चालणारे एक त्रासिक गृहस्थ आहेत. त्यांचे कठोर नियम, अतिकठोर बंधनं हे सगळं सन्याशाचं न पेलणारं वस्त्र पांघरल्याने येणारी कर्मकांडं आहेत. it is a show, pretense. जनता ह्याला पूज्य मानते. आत्मक्लेशांना सन्मान आहे.
त्याउलट काकाजी बिनधास्त खुलेआम जगतात. पण त्या प्रामाणिक स्पष्टतेला मात्र हीन दर्जाचं मानलं जातं. ही पात्रं आपल्याला दोन टोकं दाखवतात आणि प्रश्न विचारतात की बाबा असं काय केलंय काकाजींनी की त्याला "पाप" म्हणावं? पुलंचा स्वत:चा दृष्टीकोन काकाजींकडे झुकणारा असेलही पण त्या रचलेल्या पात्राला पुलंचे स्वत:चे विचार म्हणणं हे अतिसुलभीकरण आहे.
.
पुलंच्या वैचारिक लिखाणातूनच त्यांच्या वैयक्तिक विचारसरणीचा अंदाज करावा आणि मग त्यावर टीका करणे रास्त आहे. दुर्दैवाने (काही लोक इथे सुदैवाने असं म्हणतील!) त्यांनी वैचारिक लेख फार लिहिले नाहीत. दिवाळी अंकांतील त्यांच्या लेखांचं संकलन करून "एक शून्य मी" प्रकाशित झालं २००१ साली. त्यात पार १९६० पासून १९९२ पऱ्यंतचे लेख आहेत. ह्यावर केलेली टिप्पणी टीकेस पात्र आहे.
पुलंची भाषणेसुद्धा ह्याच न्यायाने त्यांचे सामाजिक वगैरे विचार कसे होते वगैरे टीकेला पात्र आहेत. अशी पुलंवर टीका केलेली मला तरी ठाउक नाही.
(टीका म्हणजे त्रुटी/दोष नव्हेत. "critique" ह्या शब्दाचं मी ढोबळ भाषांतर केलंय. ह्याहून चांगला शब्द सुचवावा!)
.
.
३.
"असा मी असामी" किंवा "हसवणूक" मधल्या काही लेखांतून जे म.म.व गृह्स्थाचं चित्र उभं करतात त्यात म.म.व व्यक्तिमत्त्वाचा मर्यादित परीघ आणि कूपमंडूक वृत्तीवर बऱ्याच ठिकाणी कोपरखळ्या मारल्या आहेत. असा मी असामीच्या प्रस्तावनेतच पुलंनी पुस्तकाचा नायकाबद्दल म्हटलंय की -
ह्या काल्पनिक आत्मचित्राचा नायक माझ्या मनात अनेक वर्षे घर करून बसला आहे. निरनिराळ्या लेखांतून तो डोकावतो. त्याला मी इथे ह्या पुस्तकात पकडून ठेवला तरी माझ्या मनातले घर सोडायला तो तयार नाही. ह्या अफाट मुंबई शहरातल्या ज्या मध्यमवर्गीय समाजात मी वाढलो त्यातलाच हा एक! कुठल्यातरी हपिसासाठी जगायचे आणि पेन्शनीसाठी किंवा प्राविडंट फंडाकडे डोळे लावून दिवसादिवसाने म्हातारे होत जायचे याहून मोठी महत्त्वाकांक्षा त्याला परवडलीच नाही.
.
पण प्रेक्षकांना/वाचकांना पुल कळलेच नाहीत का?
उदा. मी आणि माझा शत्रूपक्ष ह्या लेखात एका जागी म्हटलं आहे -
जिथे जायचे, तिथे जावे, पहावे. काय खायचे असेल ते खावे, न यावे. खरेदी कशाला? लक्ष्मी रोड पुणे आणि रानडे रोड मुंबई अठ्ठावीस ह्या प्रांतात जगातले काय मिळत नाही?
तसं पाहिले, तर पुणे आणि मुंबई यांपलीकडे जगात पाहण्यासारखे आहे तरी काय?
प्रस्तुत स्वगत हे मध्यमवर्गीय पुणेकर मराठी माणसाचं जगाविषयीचं आकलन आहे. तरीही अलूरकरांच्या अभिवाचनात ह्या वाक्यानंतर प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात.
तेव्हा
अ) प्रेक्षकांना इथला उपहास कळला नाही, आणि शब्दश: अर्थालाच टाळ्या पडल्या
ब) त्यांना उपहास कळला आणि टाळ्या त्यासाठी पडल्या
ह्या शक्यता. अ) ची शक्यता जास्त आहे,
आता प्रेक्षकांना हे कळलं नाही, ते इतर जागी तरी कळलं असेल का? की लोकं पुलंच्या मध्यमवर्गीय माणसाच्या भूमिकेतून मांडलेल्या तोटक्या आकलनालाच "वा! मला म्हणायचंय तेच पुल म्हणताहेत" समजून लोकांनी लेखनाची प्रशंसा केली?
हे थोडं ता वरून ताकभात होतंय , पण कुणी ह्यात भर घातली/उलट विदा दिला तर आभारी राहीन.
.
.
३.
आणखी एक म्हणजे पुलंची लोकप्रियता- हिचे दोन ठळक टप्पे असावेत.
१ - खुद्द पुलंचे वाचक आणि प्रेक्षक. ह्या लोकांनी पुलंची पुस्तकं वाचली, त्यांचे परफॉर्मन्स स्वत: पाहिले. त्यांना पुल स्वत: अनुभवता आले. जे काही बरं वाईट होतं ते त्यांनी पुलंच्या सादरीकरणातून स्वत:च अनुभवलं.
२. - पुलंच्या कॅसेट्स ऐकणारे आणि त्यामुळे त्यांची पुस्तकं माहिती असणारे- बऱ्याच नव्या लोकांनी आधी पुलंच्या कॅसेट्स ऐकल्या, त्यातला विनोद त्यांना अतिशय आवडला आणि मग त्यांनी इतर पुस्तकांकडे मोर्चा वळवला. वल्ली/हसवणूक/गोळाबेरीज/अपूर्वाई ही पुस्तकं कॅसेट्स नंतर जास्त लोकप्रिय झाली का? ते पाहिलं पाहिजे.
पण कॅसेट्स ऐकणाऱ्यांना पुलंचे स्ट्राँग प्वाईंट्स अनुभवता आले, त्यानंतर पुस्तकं वाचली तर कदाचित पुस्तकातले लेख "सामान्य" वाटू शकतात.
अभिवाचनातली गंमत पुस्तकात नाही असं मत होऊ शकतं-
उदा. "असा मी असामी" तल्या कापडखरेदी प्रकरणात धोंडोपंत जेव्हा "आठवले शहाडे आणि कंपनी"त जातात तेव्हा पुस्तकात
पण ते मात्र म्हणाले "गोवींदा, डबल घोडा घे"
मग तो गोंवीदा रेशमी कापडाचं ठाण घेऊन आला. "अस्सल डबल घोडा आहे" ते म्हणाले.
असा मजकूर आहे तिथे पुल (मी ऐकलेल्या) अभिवाचनात थोड बदल करून अजून खुमारी वाढवतात, आणि ऐकताना अजून मजा येते.
youtube दुवा
ते म्हणाले [ म्हाताऱ्या कापणाऱ्या सुरात] " गजानन, डबल घोडा काढ"
[पुलंचा आवाज] मग तो [ म्हाताऱ्या कापणाऱ्या सुरात] गजानन [पुलंचा आवाज सुरू,,] आतून एक रेशमी कापडाचं ठाण घेऊन आला.
नारायणमधला आज्जी-नातवाचा संवाद, संपूर्ण पेस्तनकाका, रावसाहेबांचा कानडी हेल, बिगरी ते मॅट्रिकमधले गोळेमास्तर आणि कवितेची चाल अशी अनेक उदाहरणं आहेत. ऑडिओप्रमाणेच जर पुलंच्या अभिनयाचे/ एकपात्री प्रयोगांचे उच्च दर्जाचे व्हिडिओ जर उपलब्ध असते तर काय बहार आली असती?
पुलंच्या कॅसेट्स ऐकून त्यांचे फॅन झालेले लोकं माझ्यामते जास्त आहेत - स्वत:ला "खेळीया" म्हणवून घेणाऱ्या पुलंना हे निश्चितच आवडलं असतं.
तेव्हा पुलंचे अधिकतर फॅन्स आज परफॉर्मर पुलंचे असून लेखक पुलंचे नाहीत- असा माझा कयास आहे.
४.
पुलंनीच अनेक ठिकाणी लिहून ठेवलंय की टीकाकारांच्या टीकेचं त्यांना काही वाटत नाही, सामान्य वाचकाने त्यांना दिलेली दाद किंवा अभिप्राय त्यांना जास्त मोलाचा वाटतो.
पुलंनी लोकांना रूचेल असं गुडीगुडी लिहिलं, त्यांनी सदैव नॉस्टाल्जिक लिहिलं आणि हे जाणीवपूर्वक केलं हा आरोप जर असेल तर तो तपासायला पाहिजे.
ह्याला "playing to the gallery" किंवा "सुलभीकरण" म्हणणं कार्यकारणभावाच्या उलट वाटतं.
चिकित्सा नकोशी वाटणारं, गुण गाईन आवडी म्हणून चांगलं ते लिहावं, वाईट ते लिहून मुद्दम पुढे आणू नये अशी पुलंची भूमिका होती, हे त्यांनीही लिहिलंच आहे.
लोकांना सोप्पं, पचायला हलकं आणि विनोदाची भरपूर पखरण असलेलं लिखाण आवडलं, त्यांनी पुलंना डोक्यावर घेतलं.
पण पुलंनी लोकानुनय करण्यासाठी काही ठराविक स्ट्रॅटेजी वापरली असावी, मुळात असलं काही करायला लागावं - हे हास्यास्पद आहे. कारण् उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून पुस्तकांची भरताड घालण्याची त्यांना गरज नव्हती, आपल्या अनेकानेक स्किल्सचा वापर करून त्यांनी खोऱ्याने पैसा कमावलाच असता.
.
.
काय वाट्टेल ते होईल मधलं झ्या वानो हे क्यारेक्टर हे पुन्हा एक happy go lucky असं पात्र. आता हे पुस्तक भाषांतरीत असल्याने त्यात पुलंचे स्वत:चे विचार डोकावत नाहीत हे नक्की. पण जॉर्जिया (रशियन, अमेरिकेतलं ते हे नव्हे)मधल्या कुण्या जॉर्ज पापाश्विलीची कहाणी पुल अशी काही खुलवतात की ज्याचं नाव ते.
ह्या पुस्तकाबद्दल लोक चर्चा का करत नाहीत? कदाचित हे पुलंचं पुस्तक फार कुणी वाचलंच नसेल. माझी ऑल टाईम अपुरी ख्वाहिश म्हणजे ह्या पुस्तकाचं पुलंनी केलेलं अभिवाचन. इतकं ताकदीचं भाषांतर केलंय पुलंनी.
पुलंची ह्या पुस्तकाची प्रस्तावना पहा - मग ह्या पुस्तकाचं भाषांतर त्यांनी का केलं ते कळणं अवघड नाही.
जॉर्जियातून अमेरिकेत पोटापाण्यासाठी भटकत आलेल्या एका माणसाची ही कहाणी आहे. "नेवो नेते जड तनुस ह्या दूर देशात दैव, राहे चित्ती प्रिय मम तरी जन्मभूमी सदैव"
अशी ह्या माणुसकीने ओथंबलेल्या जॉर्जी आयव्हॉनीचची भावना आहे.
हसतखेळत, खातपीत, माणुसकीचे साधे नियम पाळत, अवघ्यांचा संसार सुखाचा व्हावा अशी इच्छा बाळगणारा हा माणूस आपल्यासारख्या सामान्यांचे बोल बोलतो. दुर्दैवाने आजच्या जगातील असामान्यांना हे सामान्यांचे बोल कळत नाहीत.
.......
कारण हा जॉर्जी, जॉर्जियातला असला तरी "भेदाभेद भ्रम अमंगळ" ही मराठी वैष्णवांचीच भाषा बोलतो! एवढंच काय, शेवटी आपल्या वैदिक प्रार्थनेतले "सह नाववतु, सह नौ भुनक्तु" फक्त आपल्या भाषेत म्हणतो. सर्वांनी एकत्र बसून आनंदाने जेवावे, खावे प्यावे, आनंदात रहावे, क्षुद्र भेदाभेद विसरावेत अशा प्रार्थनेवरच हे पुस्तक संपते. हा जॉर्जी मला आपला वाटला.
आता ह्या सगळ्याचं तात्पर्य काय? तर ह्या शंकाकुशंका काढण्याच्या निमित्ताने पुन्हा पुलंची पुस्तकं वाचली. काय वाट्टेल ते होईल*(हे मात्र एकदा वाचाच.)मधला झ्या वानो पुन्हा भेटला. ऐसीवरच्या अनेकांशी खरडफळ्यावरून चर्चा झाली, काही नवी माहिती मिळाली. सुनीताबाईंबद्दलही बरंच काही कळलं. नव्या वाचनाची बेगमी झाली.
आपल्या आवडत्या लेखकाबद्दल काही नवं समजत जाणं हे एक सॉलिड प्रकरण आहे.
प्रतिक्रिया
नॉटटॉल!
नॉटटॉल! प्रस्तुत परिच्छेदाचा आगापिछा पाहिल्यास या निष्कर्षाप्रत मुळीच येता येत नाही. ममवपैकीच जे थोडेफार लकी (अॅज इन ज्यांना संधी मिळते किंवा जमवता येते असे) लोक चाकोरीबाहेरली (पक्षी: सदाशिव-नारायण-शनवार किंवा फार्फार्तर मुंबई किंवा अतीच झाले तर लोणावळा-खंडाळा, माथेरान, महाबळेश्वर किंवा पांचगणी या टिपिकल ममव परिघाच्या खूपच बाहेरची) टूरिष्टी स्थळे पाहायला म्हणून जातात, नि मग गेलेच आहेत तर केवळ प्रथा म्हणून काय वाटेल त्याचे फोटो तरी घेतात (ज्यात अर्ध्या वेळेला आपण नेमके कशाचे फोटो घेत आहोत हे त्यांचे त्यांना कळत नसते आणि/किंवा नंतर सांगता येत नाही म्हणून काय वाटेल ते ठोकून घेतात) नाहीतर/आणि काय वाटेल ते जंक सूव्हेनीर पुन्हा केवळ प्रथा म्हणून विकत घेतात, आणि मग परत आल्यावर दिसेल त्या बकऱ्याला पकडून ते फोटो नाहीतर ती अटरली यूसलेस सूव्हेनिरे दाखवून पिडत बसतात, या टिपिकल बेटरदॅनदाउ अपवर्डमोबाइलवॉनाबी ममवटूरिष्टी टेण्डन्सीची ती प्रामाणिक खिल्ली आहे, असे मला वाटते. (हसवणूक हा बहुधा पु.लं.चा तुम्ही ज्याला टियर-वन म्हणाल अशातला संग्रह असावा. (मला क्रोनॉलॉजी नक्की ठाऊक नाही. योगायोगाने पु.लं.चा मी वाचलेला तो पहिलावहिला संग्रह; हौएवर, दॅट डझ नॉट प्रूव एनिथिंग व्हॉटसोएवर.) तेव्हा पु.ल. बहुधा प्रस्थापित झाले नसावेत म्हणा किंवा काही म्हणा, या संग्रहात थोडा प्रामाणिकपणा, थोडा फ्रेशनेस जाणवतो. प्रामाणिकपणा अॅज़ इन लेखक एकदा प्रस्थापित झाला की आय कॅन राइट एनीथिंग अँड गेट अवे विथ इट या भावनेची झाक कितीही नाही म्हटले तरी अभावितपणे त्याच्या लेखनात डोकावू लागते, ती हसवणूकमध्ये जाणवत नाही. आणि फ्रेशनेस अशा अर्थाने की नॉट परहॅप्स (चूभूद्याघ्या) हॅविंग बीन एस्टॅब्लिश्ड अॅट दॅट पॉइंट, पु.ल. कुड अफोर्ड टू बी पु.ल. द इंडिव्हिज्युअल, अॅज़ इन, हिज़ ओन सेल्फ, अँड नॉट अ स्टीरियोटैप ऑफ पु.ल., द एस्टॅब्लिश्ड ऑर्थर. (तुम्ही मागे जो असह्य रिपीटिशनचा मुद्दा उपस्थित केला होतात, त्याच्याशी याची सांगड घालता येईल कदाचित. हसवणूकमध्ये रिपीटिशन आढळलेच, तर अगदी माफक प्रमाणात आढळते. आणि ते असह्य म्हणण्याइतके होत नाही. दामलेमास्तर बिगरी ते मॅट्रिकबाहेर फक्त एकदाच पाळीव प्राण्यांत आत्यंतिक ओझरते डोकावतात, पण तितकेच.) हसवणूक अॅज़ अ कलेक्शन म्हणून मला फार आवडते. सेम थिंग अबौट तुझे आहे तुजपाशी. फॉर सम रीझन, या दोन पुस्तकांत मला त्यांनी कशाचा आव आणलेला वाटत नाही. अर्थात, मला क्रोनॉलॉजीची कल्पना नसल्याकारणाने, माझे एस्टॅब्लिशमेंटसंबंधीचे अॅनालिसिस पूर्णपणे ऑफ द मार्क असू शकेल, इन विच केस, चूभूद्याघ्या.)
तर सांगण्याचा मतलब, आगापीछा. शत्रुपक्षातच इतरत्र, घर बांधून ते दाखवून काव आणणाऱ्यांविषयी पु.लं.चा नॅरेटर म्हणतो (शब्द स्मृतीतून उद्धृत असल्याकारणाने नेमके नाहीत; चूभूद्याघ्या.), की कोणी घर बांधत असला, नव्हे, अगदी ताजमहाल बांधत असला, तरी मला त्याबद्दल हेवा, असूया, मत्सर वगैरे काहीही वाटत नाही. (ताजमहाल हे घर नसून थडगे आहे, या तपशिलाकडे इथे दुर्लक्ष करू. यात काही अल्टीरियर मोटिव न शोधता केवळ ताजमहाल म्हणजे एक सुंदर इमारत, एक आर्किटेक्चर मार्वेल किंवा असेच काहीतरी इतक्याच मर्यादित अर्थाने या विधानास फेस व्हॅल्यूवर घेण्यास हरकत नसावी.) फक्त, जोपर्यंत मला ते कोणी अंतर्बाह्य दाखवत नाही तोपर्यंत. किंवा, (पुन्हा, नेमके शब्द नाहीत, पण) जर आपले घर त्यात कायकाय सोयी किंवा गमतीगमती केल्या आहेत ते न दाखवता (किंवा सिमेंट मिळवायला किती त्रास पडला वगैरे तपशिलांत न शिरता; चूभूद्याघ्या.) दाखवणारा एखादा घरमालक भेटला, तर त्याचा मी भर लकडीपुलावर जाहीर मुका घ्यायला तयार आहे. (मालकीण असेल, तर हिच्याकडून तिची जाहीर ओटी भरीन.) तर ऑड्यन्सला त्यात रस आहे की नाही, त्याची अजिबात पर्वा न करता आपल्याच कोठल्यातरी मुद्द्यावरून तासनतास दुसऱ्याला पिडण्याच्या टेंडन्सीची ही प्रामाणिक खिल्ली आहे. तेच तत्त्व काश्मीरला किंवा असेच कोठेतरी जाऊन रँडम फोटो काढून नाहीतर रँडम खरेदी करून ते फोटो नाहीतर ती खरेदी येणाऱ्याजाणाऱ्याला दाखवून पिडण्याच्या वृत्तीला एक्सटेंड करता यावे.
आणि ती खरेदी. अशी माणसे सूव्हेनीर म्हणून खरेदी तरी काय करतात? तर टोटली यूसलेस आणि इर्रेलेवंट गोष्टी. कुकरी. ('माझ्या एका मित्राने दिल्लीहून येताना स्वस्त मिळाली म्हणून गुरख्याकडे असते तसली कुकरी आणली होती. माझा हा मित्र पोष्टमनलासुद्धा पाहून चळाचळा कापतो, तो त्या कुकरीचा काय उपयोग करणार होता ते एक पशुपतेश्वरच जाणे.') किंवा अक्रोड फोडण्याचा अडकित्ता. ('मग सौ. तो अक्रोड फोडण्याचा काश्मिरी अडकित्ता घेऊन आल्या. घरात अक्रोड नसल्यामुळे - नसायचेच! - त्यात जायफळ फोडून दाखविण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. ज्या घरात पुढल्या चाळीस पिढ्या अक्रोडाची खरेदी होण्याची शक्यता नाही, अशा घरातली ही मनुष्ये अक्रोड फोडण्याचे काय ते मुळात आणतातच कशासाठी, कळत नाही.')
थोडक्यात,
यामागे संदर्भ हा आहे.
आणि,
हे मी, 'लेको, जगात वाटेल त्या टोकाला जाऊन येता, आणि काय वाटेल तो जंक कर्तव्य म्हणून उचलून आणता, पण तुम्हाला प्रत्यक्षात उपयोगी पडू शकतील अशा वस्तूंपैकी तुमच्या आसपास काय मिळत नाही?' असे वाचतो.
माझ्या लेखी याचा रोख टिपिकल पुणेरी ममवच्या जगाच्या आकलनाकडे नसून, त्यातून 'लेको, काश्मीरला नाहीतर आणखी कुठेकुठे जाता, आणि आल्यावर उगाच आपले म्हणायचे असते म्हणून ओहोहो, काश्मीरची फुले म्हणजे काय ब्यूटिफुल असतात, असले छापातले कौतुक ऐकवता, त्यातले प्रत्यक्षात काहीही अॅप्रीशिएट झाले नसले, काही ओ की ठो कळले नसले तरी. आणि फोटो तरी काढता ते नक्की कुठले, ते नंतर तुमचे तुम्हालाच नक्की सांगता येत नाही. मग त्याची निश्चिती करण्यासाठी इथेच नाही का तुम्ही घसरून पडला होता, किंवा इथेच नाही का तू घोड्यावर बसली होतीस, मग ते घोडे एकदम खाली बसले ते, असले काहीबाही आणि ऐकणाराला किंवा एकंदरीतच इर्रेलेवंट असे संदर्भ देता. तुम्हाला खरोखर जे कळते नि अॅप्रीशिएट होते ते तुमच्या आजूबाजूच्या परिघापुरते मर्यादित आहे; त्याच्या बाहेर गेलात जरी तरी झापडे लावून जाता' असा काहीसा टीकेचा सूर मला जाणवतो.
थोडक्यात, It is all about the pretentious bore, and not about the ignorant attitude of his/her victim.
अर्थात, हे माझे आकलन. असो.
न.बा,
न.बा,
हसवणूक हा माझाही फार आवडता संग्रह आहे. (काही अप-काही डाऊन हा फारफार अंडररेटेड लेख आहे त्यात. त्यात ४ ओळीत पुल गावच्या स्टेशनचं जब्री वर्णन करून जातात.)
पुणेरी ममत्त्वाचे मला सर्वस्वी अनभिद्न्य पैलू उलगडल्याबद्दल थँक्स! पण माझा समज थोडा वेगळा आहे (जो बहुधा सर्वांचा असावा)
.
.
हे मला निवेदकाचं (म्हणजे त्यातल्या मीचं) प्रामाणिक मत वाटतं. हा माणूस असा मी असामीतल्या धोंडोपंतांचाच जुळा भाऊ आहे. नाटक सिनेमा त्याला आवडत नाही. साहित्य म्हणजे फार तर
पेपर वाचणे. अशा वेळी काय काश्मीर वगैरे सांगता लेको? आमचा भागही चांगलाच आहे. कारण तुम्ही म्हटलाय तसा काँप्लेक्स वगैरे विचार करून तो टीका करेल असं वाटत नाही. त्याच्या( पक्षी निवेदकाच्या) मते त्याचं रोजचं जगणं आणि डबकं हेच सर्वस्व आहे. त्यापलीकडे काही चांगलं असू शकतं हा विचारच त्याच्या डोक्यात येत नाही.
समोर बसलेला शत्रूपक्ष बोर आहे ह्यात संशय नाही, निवेदक त्यावर कावलेलाच आहे, पण निवेदक
"तुम्हाला खरोखर जे कळते नि अॅप्रीशिएट होते ते तुमच्या आजूबाजूच्या परिघापुरते मर्यादित आहे; त्याच्या बाहेर गेलात जरी तरी झापडे लावून जाता'" -- इतपत विचार करू शकेल असं वाटत नाही.
.
ते काही असेल, पण लोक टाळ्या का वाजवतात ह्या वाक्यानंतर? आणि तेही कडाडून वगैरे. मला तरी वाटतं की पुणे-मुंबैची स्तुती(!) ऐकून लोकांची टाळी पडते की बघा शेवटी मुंबैपुण्याचंच कौतुक केलं पुलंनी. क्या बात है .. असं.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
मलाही तो टाळ्यांचा उल्लेख
मलाही तो टाळ्यांचा उल्लेख खटकला.. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की सर्वसामान्य माणसांना पुलं कळलेच नाहीत?
पुलं नी पुण्याचं कौतुक केलं म्हणून टाळ्या वाजवायच्या म्हटलं तर मग जेव्हा पुलं मुंबईकर पुणेकर आणि नागपूरकर मधून शालजोडीतले घालत असतात तेव्हा प्रेक्षकांनी काय करायला पाहिजे?
त्या वाक्यात बोलता बोलता पुलं इथल्या मध्यमवर्गीयांच्या दुखऱ्या नसेवर पटकन बोट ठेवतात, आणि तितकेच नव्हे, तर आपले समाधान करून घेण्यासाठी कोल्ह्याला द्राक्ष आंबट या न्यायाने जो एक अभिमान जोपासत असतात त्यावर पण सहज बोलून जातात.. गुंतागुंतीच्या अनेक भावनांवर एकदम बोट ठेवणारे वाक्य असल्यामुळे कदाचित प्रेक्षक टाळ्या वाजवत असतील.
बाकी हे वाक्य context सोडून सांगितलं तर ते तितके अपील होणार नाही.. किंबहुना पुलंच्या विनोदी लिखाणाचा तो एक महत्वाचा भाग होता.. आधी जबरदस्त वातावरणनिर्मिती आणि मग एकाच टोला.. मी तर वाचताना पण खूप वेळेस असा पॉट धरून हसलो आहे.
असे साहित्य मी प्रथम पुलंच्या लेखनात पाहिले, अजूनही इतके सहज पंच मारणारे खूप कमी सिद्धहस्त लेखक मिळतात.
अजून एक गोष्ट त्यांच्या तत्वज्ञानाबद्दल..
नोस्टॉजिया वगैरे सोडून द्या, पण मला व्यक्तिशः पुलंचे लिखाण कायम विरोधाभासवर बोट ठेवणारेच वाटते. असा मी असामी घ्या, हसवणूक घ्या किंवा अजून काहीही घ्या, त्यातच कायमच एक बोचरी टीका आहे. आणि ती मुख्यत्वे समाजाच्या स्टेटस को वृत्तीवर आहे, पुलं म्हणजे उत्साहाचा झराच होता, आणि त्या मुळे अश्या स्टेटस को वृत्तीचा त्यांना राग येत नसेल तर नवल. त्यांनी त्यांचा विनोद नेहमीच या लोकांना समोर ठेवून लिहिलाय, नेहमीच त्यांच्यावर , त्यांच्यातल्या विरोधाभासावर टीका केली आहे. त्यांनी मार्ग निवडला तो नर्म विनोदाचा होता म्हणून ती टीका पटकन कळत नसावी, पण एकदा टी जहरी टीका उमगायला लागली की पुलं नव्याने कळत जातात.
नाही, सर्वसामान्य माणसाला पुल
नाही, मी पाहिलेल्या रेकॉर्डिंगच्या वेळी उपस्थित लोकांना पुलंची ही ओळ कळले नाही - ही एक शक्यता आहे. इथे पुलंचं अभिवाचन बघता येईल.
तुम्ही म्हणता तसंही असेल- की मुंबै/पुण्याला शालजोडीतली ठेवलीये + पंच आलाय म्हणून लोक हसताहेत. कारण अभिवाचनात पुल इथे एक पॉज घेऊन मग हे वाक्य म्हणतात.
(असो- कदाचित फारच कीसपाडू वाटेल हे)
==================
भूतकाळातील आस्वल्य.
नाही, मी पाहिलेल्या
नाही, मी पाहिलेल्या रेकॉर्डिंगच्या वेळी उपस्थित लोकांना पुलंची ही ओळ कळले नाही - ही एक शक्यता आहे.
असा आत्मविश्वास हवा . पुल ना काय म्हणायचे आहे ते तुम्हाला समजले , पण प्रेक्षकांना अजिबात समजले नाही आणि ते चुकीच्या कारणामुळे हसत असत.............. हे तर अगदीच भारी आहे
आत्मविश्वासाचं ट्रेनिंग आम्ही
आत्मविश्वासाचं ट्रेनिंग आम्ही नवज्योतसिंग सिद्धू आणि कर्नल ज्यूलिअस नागेंद्रनाथ विल्फ्रेड सिंग ह्या गुरूमाऊलींकडून घेतल्याने प्रश्नच येत नाही.
---
मला प्रामाणिकपणे असं वाटलं की त्या रेकॉर्डिंगात चुकीच्या जागी टाळ्या पडल्या आहेत. का- ते अलूरकरांचा टाळ्या असा फलक देणारा मनुष्य असलाच तर तो आणि तेव्हाचे प्रेक्षक ह्यांनाच माहिती असावं.
तुमचा आयडी मस्तय, मराठीत लिहा की
==================
भूतकाळातील आस्वल्य.
कर्नल ज्यूलिअस नागेंद्रनाथ
बदाम, बदाम.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
कज्यूनविसिं ! (अवांतर)
कर्नल ज्यूलिअस नागेंद्रनाथ विल्फ्रेड सिंग
..... अरे आप दोनो भी !! इसी बात पे एक पान हो जाए!
एक बा..रीक खुसपट - नाव जरी नागेंद्र असलं तरी अशोककुमार म्हणताना ते नगेन्द्र म्हणतो (अर्थात कज्यूनविसिंचा कारोबार पाहता 'नगांसाठीचा देव' इस अर्थ से वह बहुत जँचता भी हैं|).
आणि डेव्हिड अब्राहम.. '३ आसान
आणि डेव्हिड अब्राहम.. '३ आसान चालों में' वगैरे...कज्युनविसिंचा अच्छा दोस्त...
हे "डेविड अब्राहम " आपल्या
हे "डेविड अब्राहम " आपल्या "डेविड अब्राहम चेउलकरां"वरून घेतलं असेल बहुतेक.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
कोणी रे उचकावलं अस्वलाला लेख
कोणी रे उचकावलं अस्वलाला लेख पाडायला?
मी नाही त्यातला, आणिक एक टाकला.
गम्मत सोडा पण एकूणच पुलं एक आठवण नबांच्या चपराकछाप प्रतिसादासह झक्कास झालं आहे. देवदिवाळी अंकातला लेख.
खूप सुंदर.
का व कसे -"सामान्य वाचकाने त्यांना दिलेली दाद किंवा अभिप्राय त्यांना जास्त मोलाचा वाटतो." थोडक्यात खपतं ते लिहिलं आणि विकलं. त्यांना भेटलेल्या माणसांचे स्वभाव विशेष घेऊन पात्रं उभी केली असावीत.
सहा महिन्यांपुर्वी कुडाळ स्टेशनात एक स्थानिक भेटला आणि नवीन मुंबईत कसे जायचे मालवणीत विचारत होता. त्याच्यशी तोडक्या मोडक्या भाषेतच बोललो. अर्ध्या तासानंतर म्हणाला "पनवेलला मेव्हणा न्यायला येणार आहे." अरे मग अर्धा तास काय उगाच घालवलास? गाडी लेट होती, मालवणीचे धडे झाले पण साम्पल अजुनही आहेत॥ तर पुलंसारख्या सिद्धहस्त लेखकाने त्याचे भांडवल केले नसेल का?
>>आचार्य गांधीवादी नाहीत,
>>आचार्य गांधीवादी नाहीत, केवळ हेकटपणे स्वत:च्या दुराग्रही स्वभावाला अनुसरून चालणारे एक त्रासिक गृहस्थ आहेत. त्यांचे कठोर नियम, अतिकठोर बंधनं हे सगळं सन्याशाचं न पेलणारं वस्त्र पांघरल्याने येणारी कर्मकांडं आहेत. it is a show, pretense. जनता ह्याला पूज्य मानते. आत्मक्लेशांना सन्मान आहे.
त्याचवेळी आचार्यांना स्वत:ला त्यातलं फोलपण कळलं आहे असंही पुलं नाटकातून दाखवतात. क्लायमॅक्सच्या प्रसंगातलं आचार्यांचं स्वगत ते अगदी स्पष्ट करतं. "प्रवाहात पोहता पोहता हात थकले म्हणून किनाऱ्याकडे यायला लागलो तर लोकांनी काठावरून मला परत प्रवाहात ढकललं. आचार्य तुम्ही आमच्यासाठी जगलं पाहिजे" किंवा "परवा एका घरातली माऊली नवऱ्याला म्हणत होती - त्यांना म्हणावं हातसडीचे तांदूळ हवे असतील तर बरोबर घेऊन येत जा. अशा शेकडो माउल्यांचे शाप घेत मी जगतो आहे" वगैरे.
तर पुलं त्या आचार्य प्रकाराची नुसती खिल्ली उडवत नाहीत तर आचार्य हा देखील एक स्वत:च्याच प्रतिमेत अडकलेला (किंवा लोकांनी अडकवलेला) केविलवाणा जीव आहे असंही दाखवतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नेवो नेते जड तनुस ह्या दूर देशात दैव
मागच्या धाग्यावर मी केलेली अत्र्यांशी तुलना पाहा. त्यांच्याइतके खालच्या पातळीवर पुलं गेले नाहीत, पण जाता जाता राहिले की काय, असं इथे वाटतं.
प्रेम असलं म्हणजे समज असतेच असं नाही. उदा. कुमार गंधर्वांविषयी भरभरून लिहिणारे पुलं वसंतराव देशपांड्यांसारख्या सूर धड स्थिरही न ठेवू शकणाऱ्या गायकाबद्दलही भरभरून लिहितात हे बघून मी आडवाच झालो होतो.
हरकत नाही. आता तुमच्याच लिखाणातून -
इथलं तुमचं अधोरेखित गृहितकच गडबडीचं आहे. कारण -
आता परदेशातून मायदेशी आल्यावर वरण-भात खाल्ला तेव्हा ब्रह्मानंद होणाऱ्या माणसाला हे आवडलं तरीही त्याच्यात तुम्हाला त्या माणसाची जीवनदृष्टी दिसत नाही?
ह्यात तुम्हाला 'तुझे आहे...'ची आठवण होत नाही?
पुलंना हा आपला का वाटला असावा? त्यात पुलंचे स्वत:चे विचार डोकावत नाहीत हे नक्की? खरंच?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
वसंतराव
ह्याबद्दल जरा अधिक सांगा!!!
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
प्रस्तावनेतलं मत १००% पुलंचं
प्रस्तावनेतलं मत १००% पुलंचं आहे. वाद नाही. ते त्यांचं "जीवनविषयक भाष्य" म्हणता आलं नाही तरी ते पुल या माणसाचं मत आहे. बरोबर.
.
पण् "झ्या वानो"चं किंवा "काकाजी"चं मत हे त्या पात्राचं आहे.
"तुझे आहे" मधल्या काकाजींच्या रूपाने पुल आपलं स्वत:चं मत मांडतात हे मला फार सपाट वाटतं. काकाजींचं पात्र रामूभैय्या दातेंवर थोडंफार आधारित आहे असं ऐकीवात आहे- मग त्याचं काय?
आता काकाजी किती टक्के पुलंची मतं मांडतात आणि किती टक्के ते निव्वळ नाटकी पात्र आहे ह्याचा खुलासा करणारे लोक आपल्यात नाहीत.
(अर्थात पुलंनीच असं कुठे लिहिलं की काकाजी म्हणजे मीच, तर माझं आकलन पूर्णत: चिंबलं आहे हे मी कबूल करीन)
असो!
---------------------
१ मधला कमरेखालचा वार मला अपवाद वाटला. तुम्हाला त्यांचे असे इतर फटकारे माहिती आहेत का? कृपया सांगा.
-----------------
२- पुलंची कलाविषयक समज मर्यादित होती हे सहज शक्य आहे. कुणाची नसते? तुम्हाला इथे कला म्हणजे नाटक/गायन/लेखन म्हणायचं आहे अशी माझी अटकळ आहे. त्याबद्दलचे पुरावे दिल्यास आभारी!
.
वर लिहायचं राहिलं, पण उरलंसुरलं मधली न-नाट्याची टीका हा प्रकारही मला तितका कळला नाही, अपील झाला नाही. "दे दे" असं म्हणून नट त्या नटीला दारू पाजतो असं काहीतरी खिल्लीवजा लिहिलंय त्यात.
आणि ती टीका कुणावर आहे हेही माहिती नाही. पण "उरलंसुरलं" हे अतिशय सार्थ नाव असलेला तो संग्रह आहे. त्याला पुलंचं सर्वोत्तम लिखाण मानता येणार नाही.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
प्रेम असलं म्हणजे समज असतेच
हॅहॅहॅ
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अडचण
हा काहीसा पोथीनिष्ठपणा झाला आणि तोदेखील काहीसा कालबाह्य झालेला. उदा. तुम्हाला 'माल' वाटणारी मुलगी तुमच्या आईसारखी दिसते का, आणि दिसत असली तर त्यातून तुमच्याविषयी काहीबाही सांगता येतं का, ह्यावर उहापोह झाल्यालाही आता बराच काळ लोटला आहे. थोडक्यात सांगायचं तर तुमची आवडनिवड, तुमची कलानिर्मिती वगैरे गोष्टींवर कळत-नकळत तुमच्या स्वभावाचा, तुमच्या जीवनदृष्टीचा आणि तुमच्या अंतर्मनात जे असतं त्याचा प्रभाव पडतो, ह्याविषयी २०१८मध्ये वाद घालण्यात फारसा अर्थ नाही. साहित्यिकाच्या लिखाणातून दिसणारे त्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू ह्यावर पाश्चात्त्य जगात खंडच्या खंड निघतात. त्यात मतभेद असू शकतात, पण कोणत्याही पात्राचं मत त्या पात्राचंच असतं; लेखकाच्या मतांशी त्याचा काहीही संबंध असू शकतच नाही, म्हणजे असं काही नसतंच, हे म्हणायला आता जागा नाही.
पुलंच्या बाबत सांगायचं तर त्यांना ओळखणारे आणि अगदी त्यांचे निकटचे अनेक लोक त्यांच्याविषयी जे सांगतात त्यात आणि इथे पुलंना जे आपलं वाटतं त्यात विलक्षण सुसंगती आहे. ती त्यांच्या इतर साहित्याशी आणि आयुष्याशीही ताडून पाहता येते. त्यामुळे केवळ नाटकातलं एक पात्र म्हणून बोळवण करणं मला उलट विसंगत वाटतं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पुलंच्या* लेखनात दहा विभिन्न
पुलंच्या* लेखनात दहा विभिन्न प्रकृतीची पात्रं असतील तर त्या प्रत्येक पात्रांचं जे म्हणणं असतं ते पुलंचं स्वत:चं मत असेल?
* पुल किंवा कोणीही साहित्यिक....
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अर्थातच नाही
अर्थातच नाही. कारण एका पात्राला मोठं करण्यासाठी इतर पात्रं त्याच्या विरोधातही योजली जाऊ शकतात, किंवा त्याचे भाट म्हणूनही योजली जाऊ शकतात. लेखकाला कोण आपलंसं वाटतंय हे पाहावं लागेल. शिवाय, अशा इतर कोणत्या सुसंगत गोष्टी त्यामागे सांगता येतात, हेदेखील पाहावं लागेल. जसं इथे -
वगैरे
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
दुर्गा भागवत ..
नाही वाटत तसंं
एक तर तुम्हीच लिहीलं आहे की पुल असे बोचरे विनोद करीत नसत.
आणि त्यांनी म्हणलं आहे, की त्यांच्या व्यक्तीरेखा जरी काल्पनिक नसल्या, तरी कुणा एकाचे वर्णन पण नसतात. अनेक व्यक्तीमत्वं आणि अनुभव यांच्या सरमिसळीतून त्या घडत असत.
२) तुझे आहे तुजपाशी मधील आचार्यांचं पात्रं मला फार केविलवाणं वाटतं. स्वत:च्या वागण्या बोलण्यातली विसंगती त्यांना जाणवत नाही.
ते सुरवातीला सर्वांना स्वावलंबनाचे धडे शिकवितात. आणि लगेच म्हणतात, "गीता माझ्या आंघोळीचं पाणी काढलय का? आणि माझा पंचा कुठाय? दे बघू.. "
तेच एकदा म्हणतात, " माझ्या सात्विक आहाराची व्यवस्था करण्याकरता मला किती माऊल्यांचे शिव्याशाप घ्यावे लागले असतील याची गणतीच नाही"
आणि मग म्हणतात, "... पण मला असच वागायला हवं. दूसरा पर्याय नाही."
म्हणजे " कळतय पण वळत नाही " अशी अवस्था
पण लेखक, कवी इ. च्या लिखाणाचा आणि त्यांच्या वास्तविक जीवनाचा कितपत संबध असतो?
अगदी शून्य नसेल, पण १००% पण नसेल.
*********
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना |
ऐसे मनमौजीको मुश्कील हैं समझाना | है ना?
म्हणजे?
म्हणजे आपण चिकित्सेचं वावडं असणारे काकाजी आहोत, मात्र आपण थोडी चिकित्सा केली पाहिजे, थोडं पोफळे गुरुजी बनलं पाहिजे असं वाटतं. मात्र 'कळतंय पण वळत नाही' अशी अवस्था? (म्हणजे आजच्या काळात पुरोगाम्यांना चवीचवीनं नावं ठेवत त्यांचं महत्त्व अधोरेखित करणारे भक्तगण का रे बाऊ?)
वास्तविक जीवन निराळं; त्यात अनेकदा, इतर अनेकांसाठी प्रेमाखातर, व्यवहार म्हणून तडजोडी कराव्याही लागतात. मात्र म्हणून ठरावीक गोष्टी आपल्याशा वाटणं कमी होत नाही. व्यक्तिपूजेवर, आशीर्वाद-कर्मविपाक वगैरेंवर अजिबात विश्वास नसणारी माणसं अनेकदा घरातल्या आजी-आजोबांना बरं वाटावं म्हणून त्यांच्या पाया पडतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पोफळे गुरूजी होणे हा तितकासा
पोफळे गुरूजी होणे हा तितकासा चांगला पर्याय नाही. ते चिकित्सा वगैरे करतच नाहीत. कारण ज्या कशाची चिकित्सा करायची ते आधी समजून घेणे आवश्यक असते. आचार्यांचे तत्त्वद्न्यान म्हणजे, "मी जे सांगतो तेच आणि तेव्हढेच ऐका. आणि तसच वागा". त्यांच्या अशा स्वभावाने ते एकाकी होतात.
या उलट काकाजी ... त्यांची वृत्ती म्हणजे, "जो जसा आहे,त्याचा तसाच स्वीकार करा. दूसऱ्या कुणी आपल्यासाठी बदलायची अपेक्षा करू नका". त्यांच्या अशा वागण्याने घरातल्या नोकर चाकरांपासून साऱ्यांनाच त्यांच्याबद्दल आदर आणि आपुलकी आहे. असे वागणे सगळ्यांना जमेलच असे नाही.
आचार्य आणि काकाजी ही दोन टोकाची व्यक्तीमत्वं आहेत.
(भक्तगणांना नावे ठेवणारे पुरोगामीही थोडेफार आचार्यांच्याच गटातील आहे असं मला वाटतं. कारण ते भक्तांची मते तुच्छ लेखतात. त्यांना असे वाटते, त्यांच्याप्रमाणे विचार न करणारे, त्यांच्यापेक्षा वेगळी मते असणारे ते मंदबुद्धी इ. त्यामुळे कुणी कोणाला नावे ठेवावीत हा प्रश्नच आहे. )
वास्तविक जीवन निराळ..**
** हे वाक्य तुम्ही लिहाल असं वाटलं नव्हतं
काकाजी हेच तर म्हणतायत. थोडेफार इतरांच्या कलाने घेतले तर बिघडत काहीच नाही. इतरांच्या आनंदाखातर (प्रत्येकानेच)थोडीफार तड्जोड केली तर लगेच तुमची मूल्ये, विचार हे भ्रष्ट होत नाहीत. उलट सर्वसमावेषक अशी जीवनप्रणाली निर्माण होते.
*********
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना |
ऐसे मनमौजीको मुश्कील हैं समझाना | है ना?
फायनली काय ठरलं? पुलं भारी का
फायनली काय ठरलं? पुलं भारी का फाल्तु?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
ठरणं हे ओवररेटेड आहे इ.इ.
ठरणं हे ओवररेटेड आहे इ.इ. रिप्लाय येणार बघा आता
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ढेरे तुम्ही मला विचारताय का?
ढेरे तुम्ही मला विचारताय का?
चेक करतोय!
==================
भूतकाळातील आस्वल्य.
हो! सांगा निष्कर्ष काय निघाला
हो! सांगा निष्कर्ष काय निघाला ते. म्हणजे माझं मत बदलता येईल त्याप्रमाणे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कशाला गरीबाची खेचताय ढेरे
कशाला गरीबाची खेचताय ढेरे
माझ्यासाठी तरी पुल एक विनोदी लेखक आणि पर्फॉर्मर म्हणून नेहेमीच ग्रेट होते आणि रहातील.
आयुष्याची काही वर्षं ज्यांचं लिखाण वाचून मी खळखळून हसलो .. तो माणूस ग्रेट नाही तर काय? उत्तम विनोद करणं हे खायाचं काम नोहे.
त्यांचं लिखाण अभिजात साहित्य आहे की नाही, ते टिकून राहील की नाही वगैरे वायले मुद्दे आहेत.
----
आचारी, नर्तक किंवा खेळाडू म्हणून पुल सुमार होते असं म्हणायला पुष्कळ जागा आहे.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
आचारी, नर्तक किंवा खेळाडू
सहमत आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
"की" नव्हे "आणि"
( ) भारीच
( ) फाल्तूच
(v) भारी आणि फाल्तु
"तुम गुस्से में और भी सुंदर लगते हो"शी समांतर पण त्याहून पुष्कळ गहन "तुम से प्यार है इसी लिए तो तुम पे गुस्सा है" -- हा ड्वायलाक प्रचलित होण्यालायक आहे. (माझ्या प्रत्यक्ष ओळखीच्या एका जोडप्यात हे वाक्य वापरून एका व्यक्तीने तणावपूर्ण प्रसंग सकारात्मक केल्याचे मी बघितलेले आहे. युक्तिवादाचे हे तंत्र अधिक प्रसिद्ध असायला हवे, असे राहूनराहून वाटते.)
ते तंत्र पुरेसे वापरले की
ते तंत्र पुरेसे वापरले की ब्याकफायर होते असा ॲनेक्डोटल एविडन्स आहे
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तर हात राखून वापरायला पाहिजे म्हणजे
तर हात राखून वापरायला पाहिजे म्हणजे
>>फायनली काय ठरलं? >>
>>फायनली काय ठरलं? >>
असं करणे हेतू नाही. आपापल्या मताने ऐसीकरांनी समीक्षा करणे एवढंच.
या लेखासाठी अस्वलाला १०
पु. ल. व्यक्ती कि वल्ली
हा सिनेमा खूप पैसे खर्च करून पहिला (का? का? का?) पु.लं वरच्या भक्तीमुळे.
पु.ल. आवडणाऱ्या बहुतांश लोकांनी (माझ्यासकट) पुलंची सगळी पुस्तकं अथ: पासून इतिपर्यंत वाचलेलीच नसतात, किंवा, मत देण्यासाठी ती तशी वाचायलाच हवीत असा निकष नसावा, याचं कारणच, माझ्यामते, पुलंच्या विनोदाची जातकुळी "casual ए" मध्ये मोडते. (त्यांचं लेखन "उगाच आपलं" म्हणून सोडून द्यावं, ह्या अर्थी नाही, तर त्यांनी स्वतः कधी "माझं लिखाण सिरियसली घ्या" असा आव आणला नव्हता, असं वाटतं)
"सहज फुलू द्यावे फुल,
सहज दरवाळावा सुवास
अधिक काही मिळवण्याचा
करू नये अट्टहास.
देठ, पाकळ्या, पराग, सुवास
फुल इतकीच देते ग्वाही
अलग अलग करू जाता
हाती काहीच उरत नाही"
- शांताबाई (स्मरणातून)
तर सिनेमाबद्दल सांगायचे इतकेच, की "आहे मनोहर तरी"च जर दाखवायचं होतं, तर सिनेमा पुलंवर न काढता सुनीताबाईंवर का नाही काढला? किती मस्त विषय होता तो! "आपण एक अर्थपूर्ण, विशिष्ट ध्येयानं प्रेरित असलेलं आयुष्य जगतो आहे" हे भान त्यांच्या लेखनात जाणवलं, पण ती ध्येय मागे पडली, आणि एका यशस्वी लेखकाच्या पत्नीची भूमिका शेवटी वरचढ ठरली. तरीही, त्या अतिशय "सजग" पणे जगल्या (Consciously) , असं त्यांच्या ह्या परखड आत्मचरित्रावरून कळतं.
याउलट, पुलं माणूस म्हणून सर्वांचे श्रद्धास्थान आहेत, लेखक म्हणून कालबाह्य होऊनही मग तो जिव्हाळा लेखकामागच्या माणसाबद्दल आहे, तरीही त्यांच्या आंतरिक आयुष्याबद्दल कुठेच वाचनात काही आलं नाही, आणि सिनेमाने ती रिकामी जागाच माझ्यासाठी अधोरेखित केली. त्यांनी विनोदी साचा-पलीकडे जाऊन आत्मचरित्र लिहिलं असतं, तर त्यात काय असतं?