अंतू बर्वा , हरि तात्या , नारायण आणि लिटरेचर ऍज अ बॅकग्राऊंड म्युजिक -किंवा - साहित्य :एक पार्श्वसंगीत आणि म्हैस वगैरे !

अंतू बर्वा , हरि तात्या , नारायण आणि लिटरेचर ऍज अ बॅकग्राऊंड म्युजिक -किंवा - साहित्य :एक पार्श्वसंगीत आणि म्हैस वगैरे !

कबुली , भूमिका वगैरे वगैरे !
एकतर पुलं जन्मशताब्दी निमित्त इतके लोक काही न काही लिहितच आहेत, अशात आपण लिहावं की नाही ही द्विधा मनस्थिती आहेच; आपल्या लिहिण्यानं काय होणार म्हणा ! दुसरा एक मुद्दा असा, की शालेय/कॉलेजीय वयात जवळजवळ समग्र पुलं वाचले/ऐकले असले तरी त्यानंतर अनेक देशी-परदेशी लेखक, कवी कधी थेट तर कधी सकस अनुवाद रूपात वाचले , नाटके पहिली. पुण्यात राहून पुलंच्या कोट्यांचा , त्यांच्या किश्श्यांचा मारा, ओव्हरडोस ठिकठिकाणी सहन करावा लागला आणि पुलं -भारावलेपणाची फेज फार लवकर संपली. नाटककार , रूपांतरकार म्हणून पुलं मला कधीच पटले किंवा भावले नाहीत ( ती फुलराणी - बापरे बाप !!! भक्ती बर्वे सारखी भारी अभिनेत्री नसती तर हे नाटक कधीही इतकं हिट झालं नसतं). तरीही पुलंच्या बद्दल एक आत्मीयता आहेच , त्यांचं साहित्य , त्यातले सामाजिक संदर्भ वगैरे जुने झाले असले , त्याच्याशी असलेलं माझं -असोसिएशन - जुनं झालेलं असलं तरी ही आत्मीयता मात्र जाता जात नाही. त्यांच्यामुळे ब्रेश्टची ओळख झाली याबद्दल मी कृतज्ञ आहे.आता तर मी गेली कित्येक वर्ष पुण्यापासून दूर एका अतिशयच निराळ्या साहित्यिक - सांस्कृतिक वातावरणात राहतो, त्यात निरनिराळ्या संदर्भात पुलंची बारीकशी आठवण कधीमधी येते. नुकताच फ्रिट्झ राडाट्झ यांचा एक लेख वाचला आणि काही सुचलेलं मांडावंसं वाटलं. यातला मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे साहित्य ऐकण्याचा/ऐकवण्याचा. पुलंचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्यापैकी बहुतेकांनी त्यांना ‘ऐकलं’ आहे. मी स्वतः पुलंना ऐकणं जास्त पसंत करतो. पुलंच काय , पण शंकर पाटील, मिरासदार यांच्या कथा त्यांच्या तोंडून ऐकायला मला खूप आवडत आणि आजही आवडतात. ८० च्या दशकात बालपण गेलेल्या ( त्याआधीच्या काही पिढ्या अर्थात आल्याच !) बहुतेक (होय होय पुणे-मुंबईत राहणाऱ्या ) पिढीचं श्रवणक्षेत्र चांगलं रुंद होतं असं म्हणायला हरकत नसावी. नुसते पुलंच नाहीत , तर शिवाजीराव भोसले, राम नगरकर , शंकर अभ्यंकर, राम शेवाळकर, वपु , गाण्यामध्ये नाट्यगीते गाणारे अनेक दिग्गज, गझलांमध्ये प्रामुख्याने गुलाम अली , मग जगजीत आणि पंकज उधास वगैरे, कमी प्रमाणात का होईना पण मायकेल जॅक्सन सारखे पाश्चात्य गायक असा ऐकण्याचा सामाजिक माहौल होता. तर या लेखात दिलेल्या काही मुद्द्यांच्या चौकटीत हे ऐकणं नक्की काय आहे , त्याचे अनेक पैलू काय आहेत हे समजून घेण्याची , याबद्दल चर्चा करण्याची या निमित्ताने उत्सुकता आहे. कदाचित या निमित्ताने ६० ते ८० च्या दशकात साहित्यिकांना ऐकण्याचा जो एक खास मराठी फिनॉमेना होता त्याचा शोध मला यानिमित्ताने घ्यावासा वाटतो.

बर्लिन मध्ये १९३१ साली फ्रिट्झ राडाट्झ यांचा जन्म झाला आणि २०१५ साली मृत्यू झाला. ते प्रामुख्याने निबंधकार , चरित्रकार आणि अत्यंत स्पष्टवक्ते साहित्य समीक्षक म्हणून ओळखले जातात. गुंटर ग्रास , हेल्मुट श्मिड्ट अशा नावाजलेल्या लेखकांवर देखील त्यांनी परखड टीका केलेली आहे.

अत्यंत उच्च साहित्याला , निबंधांना , समीक्षेला वाहिलेलं रेक्लाम प्रकाशन हे १८२८ साली स्थापन झालं. या प्रकाशनाला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने - Der Reiz der Woerter - अर्थात - शब्दांची जादू - अशा शीर्षकाने एक संग्रह प्रकाशित झाला ( यातील Reizला अर्थातच अनेक अर्थच्छटा आहेत, इथे जादू हा अर्थ उचित वाटतो म्हणून तो निवडला). त्यामध्ये साहित्य , चित्रकला , संगीत , नाट्य , समीक्षा, कथा अशा विविध क्षेत्रातील जाणकारांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. रेक्लाम पुस्तकांचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे याच्या खास स्वस्त आणि मस्त पॉकेट एडिशन फुल्ल पिवळ्या रंगात असतात. तर त्या अर्थाने हे येलो लिटरेचर आहे Wink . राडाट्झ यांच्या लेखाचं मूळ जर्मन शीर्षक आहे - Literatur als Background music. -अर्थात लिटरेचर ऍज अ बॅकग्राऊंड म्युजिक- पार्श्वसंगीतासारखं असणारं साहित्य. मूळ लेख १० पानी आहे, त्यातले काही अंश अनुवादित करून त्या अनुषंगाने चर्चा मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. मूळ लेखात अर्थातच अनेक जर्मन लेखकांचे उल्लेख आहेत.

लिटरेचर ऍज अ बॅकग्राऊंड म्युजिक: ( Literatur als Background music)

एनत्सेन्सबर्गर ते होखहुथ पर्यंतच्या साहित्यिकांच्या -स्व /व्यक्ति पुनर्शोधाच्या या पंथामध्ये ( मुळात कल्ट हे इथे जास्त योग्य वाटतं, परंतु कल्टला थेट मराठी पर्याय नाही ) सध्याच्या ग्राहकांमध्ये ( म्हणजे वाचकांमध्ये ) एका नव्याच कल्टचा उदय झाला आहे : कवीचा ( लेखकाचा) तबकडीवर नोंदवलेला आवाज हा सध्या ‘in’ ( चलनात आला) आहे. मोन, हाईसेनब्युटेल, त्सेलान किंवा बेन, आईश, यांडल, हांडके, कानेटि किंवा बोबरोवस्की यांना जास्तीतजास्त श्रोते मिळताना दिसताहेत.
हे श्रोते नक्की काय ऐकतात ( हा प्रश्न लिहिताना माझ्या मनात आजकालचे टीव्ही रिपोर्टर का येत आहेत बरे ?) : याचं उत्तर आधीच देऊन टाकतो : काहीही नाही. एक प्रकारचा नुसताच मजा मजा घेणारा पलायनवाद आहे हा ! [ इथे एक असा उल्लेख करावासा वाटतो, की जर्मन साहित्य समीक्षेतलं एक दणदणीत व्यक्तित्व म्हणून ज्या मार्सेल रानीच्की यांचं नाव घेतलं जातं त्यांच्याबद्दल सुद्धा - याला साहित्यातलं काही कळत नाही , हा नुसता साहित्याच्या गप्पा मारतो , गप्पा - अशा प्रकारची खरमरीत टीका राडाट्झ यांनी केलेली दिसते. रानीच्की यांचे - Das Literarische Quartett- साहित्यिक चौकडी - या नावाने साहित्यिक गप्पा असलेले टीव्ही एपिसोड आहेत. ते पाहिले/ऐकले, की रानीच्की यांची साहित्यातली आणि साहित्यिकांमधली उठबस काय होती याचा अंदाज येऊ शकतो. याचा अर्थ राडाट्झ हे कदाचित फारच टोकाचे आणि परखड समीक्षक असले पाहिजेत किंवा त्यांना प्रसिद्धीची हौस तरी असली पाहिजे ,असो ! या लेखात काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याकडे हळू हळू वळूयात .]

कृत्रिम किंवा आभासी साहित्यिक आनंदाचा टाइमपासी प्रकार आहे हा. साहित्याशी भिडण्याचा आणि याचा काहीही संबंध नाही.

जे साहित्यिक गद्य ( जे साहित्य ) ऐकण्या/ऐकवण्यासाठी लिहिलं गेलं नाही - उदा : श्रुतिका/नभोनाट्य- त्याचा आस्वाद श्रवणातून घेता येणार नाही. ज्या प्रकारे ही काळी तबकडी शब्द फेकते ते अगदीच असाहित्यिक आहे. साहित्य म्हणजे नुसतीच व्याकरणीय आंघोळ नाही, साहित्याशी भिडण्या साठी सक्रियतेची , सोबत विचार करण्याची , सोबत काम करण्याची गरज असते. ऐकण्या/ऐकवण्यासाठी लिहिलं गेलेलं साहित्य आवाजातून ( आणि इतर ध्वनींमधून ) पोहोचवावं लागतं- तिरस्कार किंवा भीती धमकी किंवा संशय किंवा तुच्छता हे सर्व स्वर , आवाजाचे उतार-चढाव यातून आकार घेतं. “तो आता छान गाईल” या सारख्या वाक्यातील प्रत्येक शब्द ज्याप्रकारे उच्चारला जातो त्यानुसार त्याचा अर्थ आकार घेतो. यात नुसती माहिती असेल किंवा धमकी असेल, चेष्टा असेल , किंवा भविष्यवाणी असेल. अशी वाक्ये -आणखी एक उदाहरण : काहीही होत नाही- तर अशी अनेक वाक्ये अन्वयार्थासाठी प्रामुख्याने त्यांच्या उच्चारांवर अवलंबून असतात.
----------------------------------------------------------------------

वर उल्लेख केलेले बहुतेक लेखक मी मूळ भाषेत वाचले आहेत. त्यातले काही ऐकले देखील आहेत. परंतु मला भावलेला लेखक म्हणजे पीटर बिक्सेल. अमेरिका नाहीचे , दूधवाला, टेबल हे एक टेबल आहे, पृथ्वी गोल आहे यासारख्या थोड्या अनवट वळणाच्या लघु कथा लिहिणारा हा लेखक त्याच्या कथा त्याच्या ‘आवाजाद्वारे ’ समर्पकपणे पोहोचवतो. पीटर हांडके हा तर भरभरून कादंबऱ्या , समीक्षा , ललित , नाटके आणि निबंध लिहिणारा लेखक, परंतु त्याने स्वतःच्या कथा ‘वाचून’ दाखवल्या आहेत असं फारसं दिसत नाही. पुलंनी जे लिहिलं त्यात साहित्य किती होतं यावर वाद होऊ शकेलच ( आणि तसे अनेक झालेले आहेतच) , परंतु त्यांनी स्वतःचं लिखाण ‘आवाजाद्वारे’ फार समर्पकपणे पोहोचवलं यात एकमत व्हायला हरकत नसावी. इथे माझी एक जुनी उत्सुकता नोंदवू इच्छितो. भावगीत गायक , संगीतकार वगैरे लोकांना HMV वाल्यांकडे रेकॉर्डिंगची संधी कशी मिळाली याचे पुष्कळ किस्से वगैरे ऐकलेले, वाचलेले आहेत; परंतु मराठी कथाकथनाच्या रेकॉर्डिंगची सुरुवात नक्की कोणी आणि कशी केली, त्यासाठी कोणी प्रेरणा दिली , आर्थिक, तांत्रिक मदत केली याची काही माहिती उपलब्ध आहे का? मराठी कथाकथनाचे आद्य रेकॉर्डिंग कोणते ? कथाकथनाच्या रेकॉर्डिंगच्या LP ( PL यांची LP !!) निघाल्या होत्या की थेट कॅसेटच ? इथल्या वाचकांना यासंदर्भात काही माहिती असेल तर जरूर द्यावी अशी विनंती करतो ! आणि पुल, वपु शंकर पाटील यांच्या कथाकथनाला मिळणारा प्रतिसाद पाहिल्यावर जुना चिंवि जोशींचा विनोद , अत्र्यांचा विनोद तबकडीवर /कॅसेटवर आणण्याचा प्रयत्न का झाला नाही ? आजही तो होताना दिसत नाही : यामुळे माझ्या मनात आपल्या साहित्याविषयी एक मजेदार टाइमलाईन तयार झाली आहे : जुनं साहित्य ( केशवसुत/अत्रे/गडकरी) काही अपवाद सोडता -त्यातही प्रामुख्याने गीते/कविता - आवाजाद्वारे माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाही. ते ‘वाचावंच’ लागतं. नंतर जरा पुलंच्या नंतरचे साहित्यिक घेतले ( जयवंत दळवींसारखे काही त्यांचे समकालीन देखील) तर त्यांचं साहित्य ( कविता/कादंबरी/लेख असा कुठलाही फॉर्म ) सुद्धा -आवाजी/परफॉर्मन्स -स्वरूपात पोहोचलेलं नाही;म्हणजे नामदेव ढसाळ , चित्रे, नेमाडे यांच्या कविता/कथा वाचलेल्या आहेत, परंतु त्या ‘ऐकलेल्या’ नाहीत. काही ठिकाणी अभिवाचन वगैरे झालं असेलच, परंतु लेखक`-कवी साहित्यिक इव्हेंट सोडल्या तरस्वतःच्या साहित्याचं स्वतः वाचन करीत आहेत असं झाल्याचं दिसत नाही . आता मुद्दा असा येतो, की त्या काळातील हा मोठा समाज (आबालवृद्ध / आठ दहा वर्षाची मुले हरितात्या , म्हैस , ये दिल ये पागल दिल मेरा हे सर्व ऐकत असतच ना ! ) पुल , वपु , शंकर पाटील ऐकून नुसताच (अ)साहित्यिक टाईमपास ( राडाट्झ यांचा मुद्दा ) करीत होता, की हा आपल्या तत्कालीन समाजाचा एक खास USP होता ? मी काहीच आठवड्यांपूर्वी या संदर्भात विभास वर्मा यांच्याशी बोलत होतो. विभासजी मिरांडा कॉलेजमध्ये हिंदी विभागप्रमुख आहेत. आमच्या अगदी छोट्याश्या आमच्या लक्षात आलं , की हिंदी साहित्यिक वर्तुळात त्या काळातील प्रसिद्ध हिंदी साहित्यिकांनी आपल्या कथा ऐकवल्याची उदाहरणे तुरळक आहेत. हिंदी कॅसेट-क्षेत्रामध्ये प्रामुख्याने किस्से , चुटकुले ( सुरेंद्र शर्मा स्पेशल ) आणि अर्थातच भजने यांची जास्त रेलचेल होती. एक मिस्टर बच्चन (प्रामुख्याने मधुशाला) सोडले तर बाकीच्यांनी हिंदी साहित्याला आवाज देण्याचा फारसा प्रयत्न केलेला दिसत नाही. हिंदीमधील अर्थकारण देखील मराठीपेक्षा खूपच निराळं असणार.कमलेश्वर, निर्मल वर्मा यांच्यासारख्या आघाडीच्या आणि लोकप्रिय कथाकारांनी देखील असा ‘ऐकवण्याचा’ प्रयत्न करू नये हे मला आश्चर्यकारक वाटतं. हे आपल्या देशातील आपल्याच शेजारी भाषेत असणारं साहित्य-श्रवण-संस्कृतीचं एक वेगळं चित्र. हिंदी क्षेत्रात मुशायरे ज्या प्रमाणात चालतात, त्या प्रमाणात आपल्याकडे काव्यवाचन आजही चालत नसावं ( अर्थात विंदा-पाडगांवकर-बोरकर या क्लासिकल कवि-त्रयाची इथे आठवण होतेच आणि त्यांचं काव्यवाचनातील योगदान हा एक स्वतंत्र विषय आहे). तर एकूण पाहता हा साहित्य ऐकण्या-ऐकवण्याचा आपल्या तत्कालीन समाजाचा खास USP ( खास वैशिष्ट्य या अर्थाने ) असेल तर त्याच्या बऱ्यावाईट गुणांबद्दल आणि त्याच्या बदलांबद्दल आपण आता पुल जन्मशताब्दीची संधी साधून विस्तृतपणे आणि स्वच्छपणे का बोलू-लिहू नये? ( तसं लिहिलं/बोललं गेलं असेल आणि मला माहित नसेल तर जरूर सांगावं ). मी ज्या देशात गेली दहा वर्षे राहतो तिथे पोलिश साहित्यिकांनी त्यांच्या कथा/कवितांचं जाहीर वाचन करण्याची काही एक ( थोडीशी एलिटिय ) परंपरा आहे, परंतु त्याचं प्रमाण, त्याचा आवाका आणि त्याचं प्रभावक्षेत्र हे कथा/कविता ऐकवण्याच्या मराठी परंपरेच्या जवळपासही जाऊ शकणार नाही कदाचित ( अर्थातच क्राकाउ शहर याला अपवाद असावं असा माझा अंदाज आहे ). इथले लोक वाचतात पुष्कळ परंतु साहित्य ऐकण्याचं प्रमाण नगण्य आहे. याउलट प्रसिद्ध आणि महत्वाच्या साहित्याचं -खासकरून कवितांचं /गीतांचं - सांगीतिक इंटरप्रिटेशन करण्याची मात्र फार सकस परंपरा पोलिश सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आहे असं दिसतं. जर्मन साहित्यामध्ये कथाकथन रेकॉर्डिंगची मराठीला मिळतीजुळती असणारी थोडीतरी परंपरा दिसते, परंतु पुलंच्या सारखा शारीर-वाचिक बोलीमधून एखादा साधा प्रसंग , प्रसंगातली नानाविध पात्रे तंतोतंत उभी करणारा कोणी कलाकार झाल्याचं, किंवा झाला असेल तरी समाजाने त्याला इतका सन्मान , प्रेम दिल्याचं दिसत नाही. या प्रेमामागचं एक साधं कारण म्हणजे पुलंचा निखळ विनोद, त्यांचा खुलेपणा , गुणग्राहकता आणि तत्कालीन समाजाला या गुणांविषयी असलेलं आकर्षण. पुल अप्रतिम परफॉर्मर असले तरी ते ‘व्यावसायिक’ नव्हते, तसेच नाट्य-चित्रपट क्षेत्रातील तत्कालीन अर्थकारण आजच्यापेक्षा निराळं होतं.

तर हा ऐकण्या-ऐकवण्याचा काय मामला आहे नक्की ?साहित्यामध्ये काही साहित्य हे खास ऐकवण्यासाठी असेल तर त्याचे निकष काय आणि ते साहित्य उच्च कोटीत येईल की अजून कुठल्या ? मुद्दाम ऐकण्या-ऐकवण्यासाठी असलेलं आजचं साहित्य कोणतं , ते आज आपण कसे ऐकत आहोत, आपल्याला ते कोण कशा प्रकारे ऐकवतो आहे ? हिंदू सारखी कादंबरी ऐकवता येईल का ? आज ऑडिओबुक किंवा पॉडकास्ट ऐकणारे पुष्कळ लोक आहेत. सभा/भाषणे/जाहीर कथावाचन समूहाबरोबर ऐकण्याच्या तुलनेत हे एक प्रकारचं व्यक्तिगत ऐकणं असेल तर असे श्रोते नक्की कशा प्रकारे ऐकतात ? हे मला जाणून घ्यावंसं वाटतं. की आपण समूहात बसून ऐकत असलो तरीही एकटेच ऐकत असतो? इंटरनेट-पूर्व काळात असलेल्या मनोरंजनाच्या कमी सुविधा , आजच्या तुलनेत हाताशी असणारा पुष्कळ वेळ यातून बोअरडम घालवण्यासाठीच काही लोक हे कथाकथनाचे कार्यक्रम ऐकत असतील का आणि राडाट्झ यांनी वर म्हणल्याप्रमाणे - हा निव्वळ एक असाहित्यिक टाईमपास आहे - हे विधान खरं करीत असतील का ? हिंदू, गवत्या यासारख्या दीर्घ कादंबऱ्या , काही दीर्घ कथा या आवाजातून व्यक्त होण्यासाठी नसाव्यात का?

तर असे अनेक प्रश्न हा मूळ लेख वाचल्यावर पडले. ते तुमच्यासमोर मांडतो आहे. जर यात काही तथ्य वाटलं तर जरूर चर्चा करूया.

नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा !

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

ऐकणे आणि ऐकणेच मुख्य माध्यमाच्या काळात '७२ अगोदर रेडिओवर नभोनाट्य असायचं. यामध्ये रविंद्र पिंगे आणि जयवंत दळवी,शंना. चांगली होती.
पॅाडकास्ट ऐकतो. मराठीत या जुन्या प्रसिद्ध लेखकांचे प्रताधिकार मिळवून ऐकवणे गरजेचे आहे.
वॅाइसओवर कलावंत मेघना एरंडेचे नाव घ्यावं लागेल. रंगनाथ कुलकर्णी यांचे 'मी अत्रे बोलतोय' किंवा लक्ष्मणण देशपांडेचं वऱ्हाड हे ऐकले तरी चालते.
लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे उशीरा कळलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

Hope is for sissies.

काळु-बाळु हे दोघं अत्यंत हजरजबाबी द्वयी म्हणून, मराठी तमाशात प्रसिद्ध होते. एकदा रिक्शातून लांबचा प्रवास करत असताना, त्यांची एक ऑडिओ कॅसेट ऐकून मनसोक्त हंसलो होतो. दुर्दैवाने, नेटवर, या दोघांचे ओरिजिनल रेकॉर्डिंग सापडले नाही. पुलंनी नावाजलेल्या, वस्त्रहरण या नाटकापेक्षा, ते खूपच थोर होतं!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

उच्चार वैविध्याच्या शक्यता हे लिखित मजकुराचे सामर्थ्य; आणि त्या जास्तीत जास्त चांगल्या स्वरूपात आवाजाचे चढउतार, पात्रांनुसार वेगवेगळे आवाज, निवेदकाचा वेगळा आवाज असे वाढलेले ताट श्राव्यरुपात सादर करणे हे आपल्याकडे असलेल्या श्रवणभक्तीच्या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्यासारखे आहे. “वेल रेड” याचे भाषांतर आपल्याकडे बहुश्रुत असेच होते. श्राव्य माध्यमाचा मुख्य तोटा म्हणजे चटकन थोडा आधीचा मजकूर, मुद्दा पुन्हा लक्षात घेण्यासाठी काही ओळी, परिच्छेद पुन्हा पाहण्याचे किंवा रटाळ भाग गाळण्याचे जे स्वतंत्र्य वाचकाला असते, ते तितक्या प्रमाणात श्रोत्याला नसते. त्यासाठी मग रसभंग सहन करावा लागतो. त्यामुळे श्राव्य माध्यम ऐकले सोडून दिले इतपतच गांभीर्याने घेतले जाते. रेडिओच्या बाबतीतही ते होतेच. त्या अर्थाने अशा अ-लिखित माध्यमाची अ-साहित्यिक म्हणून हेटाळणी केली असावी.
दृकश्राव्य माध्यमाची सवय हे वाचनाला मारक असते हेही वास्तव आहे. मेंदू फार श्रम करू इच्छित नाही. दृकश्राव्य माध्यमाची पकडही अधिक असते आणि वाचनाआधी दृकश्राव्य स्वरुपाची सवय लागली तर नवी पिढी वाचत नाही ही ओरड बरीचशी खरी ठरते. मात्र बालांना जर पुस्तके वाचून दाखवायला कोणी नसेल तर पुस्तकाबरोबर त्याचीच श्राव्य आवृत्ती उपलब्ध करून देण्याने फरक पडेल.
गेली कित्येक दशके शालेय स्तरावर सकाळ नाट्यवाचन स्पर्धा होतात. मराठीबरोबरच हिंदी, संस्कृत, इंग्लिश, गुजराथी या भाषांत तसेच पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटांसाठी होतात. त्याने पुण्यात तरी मौखिक वाचनाचे व त्यायोगे भाषेच्या शक्यता समजावून घेण्याचे वातावरण शाळांमधे तयार झाले.
नवीन तंत्रज्ञानाने अशिक्षितही संपर्कावाचून वंचित राहणार नाही आणि अधिकाधिक आज्ञावल्या नुसते बोलून देता येण्याच्या आजच्या काळात श्राव्य माध्यमात अधिकाधिक साहित्य उपलब्ध करून देणे हा साहित्य प्रसाराचा चांगला मार्ग असेल.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“वेल रेड” याचे भाषांतर आपल्याकडे बहुश्रुत असेच होते- एकदम पते की बात है Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

छापलेल्या पुस्तकाच्या खोट्या/बनावट किंवा फोटोकॅापी काढून चोरणे यापेक्षा एमपी३ लगेच कॅापी मारून पसरते /पसरेल आणि निर्मात्याचे नुकसान नक्की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐकताना फास्ट फारवर्ड करत नको असलेला भाग पटापट गाळता येतोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुल यांची शताब्दी असल्याने ने फालतू होते असे सांगणारे लेख येणे स्वाभाविक आहे.

या निमित्ताने फास्टर फेणे या फार काही औट्स्टॅण्डिंग नसलेल्या पात्राच्या लेखकाच्या नावे ऐसीवर विशेषांक वगैरे निघाला होता याची आठवण झाली.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खरं आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता इथे "पुल" फालतू आहेत- असं कुठे लिहिलंय? लेखाचा विषय तरी तो आहे का?
प्रतिक्रिया टेंप्लेट वाटली.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी अगदी ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता मुद्दा असा येतो, की त्या काळातील हा मोठा समाज (आबालवृद्ध / आठ दहा वर्षाची मुले हरितात्या , म्हैस , ये दिल ये पागल दिल मेरा हे सर्व ऐकत असतच ना ! ) पुल , वपु , शंकर पाटील ऐकून नुसताच (अ)साहित्यिक टाईमपास ( राडाट्झ यांचा मुद्दा ) करीत होता, की हा आपल्या तत्कालीन समाजाचा एक खास USP होता ?

मुद्दा मस्त आहे.
असं काही झालं होतं का -
१. कुठल्यातरी कॅसेट कंपनीने (अलूरकर?) पुलंच्या अभिवाचनाच्या कॅसेट्स काढल्या आणि त्या तुफान खपल्या.
२. हे बघून कंपनीला हुरूप आला आणि त्यांनी इतर "विनोदी" लेखकांकडे मोर्चा वळवला.
३. वपु, दमा मिरासदार, शंकर पाटील, राम नगरकर, लक्ष्मणराव देशपांडे इ नावे आठवत आहेत. ह्यांच्या कथाकथनाचे मग "प्रोडक्ट" बनले.
४. शिरीष कणेकरांचे स्टँड अप हा नंतरचा प्रकार वाटतो, पण तोही विनोदीच.

"विनोदी लिखाणाच्या कॅसेट्स केल्या तर त्या यशस्वी ठरतात - असं काही सोपं व्यावसायिक गृहितक ह्यामागे होतं असं दिसतंय.१

सध्याची ष्टँड अपची क्रेझ पाहिली तरी ते सगळं "कॉमेडी"च आहे.

तेव्हा पुल/वपु/शंकर पाटलांच्या कथाकथनाच्या कॅसेट्सना "ऑडिओ बुक्स"पेक्षा "मराठी स्टँड अप" जवळ जाणारा प्रकार म्हणून गणता येईल का?

----------
१ - गंभीर कथाकथनाबद्दल मला कल्पना नाही- फक्त शिवाजीराव भोसल्यांच्या कॅसेट्स ऐकीवात आहेत. इतर काही असल्यास सांगावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यातल्या त्यात पापिलवार गंभीर कथाकथन बहुतेक आप्पासाहेब खोत यांचे ऐकले लहानपणी. महापूर बहुतेक. बाकी त्यांच्या इतर कथा इनोदी होत्या एवढं आठवतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

शिरीष कणेकर हे फारच ओढूनताणून आणि बाष्कळ काहीतरी करत असत. त्यांच्या एका कार्यक्रमात ( बहुतेक क्रिकेट वाला ) मी २० मिनिटांनी झोपून गेलो होतो. पण एकूण भर हा विनोदी मालावर होता हे मात्र तुमचं निरीक्षण बरोबर आहे. गंभीर किंवा वैचारिक म्हणजे राम शेवाळकर आणि शंकर अभ्यंकर ही नावे आठवतात. राम शेवाळकर यांची शैली मला आवडत असे, त्यांच्या सांगण्यात देखील एक प्रकारची नैसर्गिक लय होती. शंकर अभ्यंकर हे जरा गोड गोड आव आणून आश्रमीय आवाजात बोलतात , ते गातात मात्र बरे ! पण या सर्वाचं काही क्रोनोलॉजिकल असं रेकॉर्ड असेल, किंवा बनवलं तर कदाचित त्यातून पडद्यामागच्या काही मजेदार गोष्टी हाताला लागतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed