#localtales १ -

आत्ता एफ.एम वर, तनहाईऽऽऽ हे 'दिल चाहता है' मधले गाणं लागलं आणि मला मात्र माझी लोकल ट्रेन आठवली. आता मला खात्री आहे कि हे वाचून १०० पैकी ९९ लोक तरी म्हणतील अरे कोणते गाणे ऐकून काय आठवतंय हि, पण खरंच सांगते कसं असतं ना..जब दिल टूट जाता है आणि आता पुन्हा कोणी आपल्याला आवडणारच नाही अशा विमनस्क अवस्थेत हे गाणे अनेक वेळा मी ऐकत असे आणि ते पण ट्रेन मधे. पुढे जाऊन एक काय अनेक जण आवडले पण त्या वेळी वाटायचं की, संपले सगळं. ते वय वेडंच होतं आणि तो काळही.

बारावी नंतर फार्मसीला प्रवेश घेतला आणि ख्ररा लोकल प्रवास चालु झाला.
त्यात तीन पूर, एखाद् दोन दंगली, तीन दहशतवादी हल्ले आणि अगणित वेळा गाड्यांचे गोंधळ आणि सगळ्यांबरोबर वाटेला आलेले किस्से, आठवणी आणि थरकाप उडवणारे दिवस म्हणजे #localtales

त्याचं झालं असं की मला खरं तर जायचं होतं मेडीकल ला, पण प्रवेश मिळाला फार्मसीला (आता वाटतं बरं झालं), पण त्यामुळे पहीलं सेमिस्टर मी अक्षरश: टिवल्याबावल्या करत घालवलं. मनासारखं झालं नाही की देवदास व्हायची सवय जुनी तशी.

तर या टिवल्याबावल्या काळात माझी जानी दोस्त होती मानखुर्दची सायबो कोळीण....एक नंबर बै!
तिचं खरं नाव वेगळं होतं पण सगळ्यांना सायबा म्हणायची म्हणून ती सायबो. दारुड्या नवर्याला आणि दारूड्या आईबापाला रोज ५० रूपये द्यायची. सुस्ताड पडून राहतात म्हणायची. तीन मुलं वाढवली. मला भटाची पोर आणि मच्छी खात नाही म्हणून काळ्या ( तिच्या भाषेत कार्र्या) वाटाण्याची झक्कास उसळ घेऊन यायची. माशाची टोपली लोकल मधे घुसवत, बोंबलतच यायची. आख्खा मानखुर्द स्टेशन ओळखायचा तिला. मी तिच्या बाजूला फतकल मारून बसायचे. तिनी एक गोष्ट बिंबवली, स्साला कुनाचा शबद नाय ऐकून घ्याचा. मस्त कोल्यांच्या लग्नात पहील्या धारेची लावून नाचायची रात्रभर. कोण मला काय म्हणेल याची पर्वाच नाही..आणि मी, माझ्या मते सुज्ञपणे (माझ्या आईच्या मते अगोचरपणे) हा गुण बरोब्बर उचलंलाय..दोन द्यायच्या दोन घ्यायच्या, जे बोलायचं ते तोंडावर, मागे वगैरे जमत नाही. मुलगा सरकारी नोकरीत लागला म्हणून आम्हाला ५० जणांना वडापावची पार्टी दिली. आता नाही विकत मच्छी. नातवंड सांभाळते. तिचं नेहमीचं वाक्य, दुनिया गेली झालम मधे..झालम म्हणजे काय ते तिलाच माहीत. पण बै लाख नंबरी.

सायबो नंतर दुसरं टोक म्हणजे सप्रे (नाव बदललंय). ख़स्ता हा एकच शब्द तिला बघून सुचतो. नवरा, मुलं, सासरचे, माहेरचे, कोण कोण आजूबाजूचे, आपलं कुणीही यावे टपली मारून जावे म्हणजे सप्रे. पै-पै चा हिशोब द्यायची नवर्याला. मान खाली घालून ट्रेन मधे भाजी निवडत काय काय सांगायची. रक्त उसळायचं माझं तर, तिला इतकं बोलायचे, समजवायचे पण नाहीच. पांढरपेशा, मध्यमवर्गीय, सुशिक्षीत घरात बाईची किती कुंचबणा होऊ शकते त्याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे सप्रे. बाईचा जन्म - बाईचा जन्म म्हणून कुढायची. माझ्या काकूच्या वयाची होती. कधीकधी तिच्या दुबळेपणाचा इतका राग यायचा की मी ३/४ दिवस बोलायचे नाही तिच्याशी. त्यावर नुसती बघत राहायची शेवटी मलाच वाईट वाटून मी तिला ५ रूपयाचं कुरकुरे देऊन बोलायला लागायचे. 'कुरकुरे खाऊया का गं?' अजून आठवतोय तिचा आवाज..

ओहो, आता येऊया सर लोबो याच्याकडे. हा इसम काही लेडीज डब्यांना कधीकधी जाळी असते आणि पलीकडे पुरूषांचा डबा. तर या जाळीतून हा माणूस बायकांना बघायचा. B grade सिनेमांची गाणी म्हणायचा. याला ८.१३ दादर फास्ट च्या बायकांनी डब्यातून खाली उतरवून बडवला होता. कोणी त्याला राखी बांधली होती. तो दिसला की बायका ट्रेन सोडायच्या. हा सर लोबो नंतर एकदम गोरेगावच्या कोणत्यातरी फादर कडे जाऊन बदललाच. त्या बाबाची पुस्तकं वाटायला लागला. त्याचं हे रूप खरं तर भेसूर वाटायचं काहीतरी हरवल्यासारखं. सर लोबो ला मी तो तिरक्या नजरेने बायकांकडे बघत, 'छत पे सोया था बेहनोई' हे गाणं म्हणत असलेलाच लक्षात ठेवीन.

आता या भागातलं शेवटचं character बाबू समोसेवाला. ही व्यक्ती अतिशय वाईट चवीचे समोसे स्टेशनवर विकायची. ते शिळे असायचे. समोसे दोनदा तळले की आठ दिवस काही होत नाही..इति बाबू.
मी तरीही त्याचे समोसे किमान ७-८ वेळा खाल्लेत. मला ते फुकट मिळायचे त्या बदल्यात मी कॉलेजमधे बाबूचे समोसे बेस्ट असतात असे सांगायचे. मी second year ला असताना त्याचे लग्न झाले आणि बाबू वाईट समोशांबरोबर उत्तम चटणी आणि ढोकळा विकायला लागला. बायको मस्त मिळाली. येडा बनाके पेढा खानेका म्हणणारा बाबू ना नात्याची ना गोत्याची अशा तीन मुलांना सांभाळायचा (सांभाळतो). मोठ्या मुलीला नर्स करणार म्हणायचा. समोशाची गाडी टाकायची होती त्याला. लेक्चर बंक करून महीन्यातून एकदा तरी या बाबूशी गप्पा हा कार्यक्रम असायचा. बाबू आता हॉटेलमधे वेटर आहे, बायको पोळी भाजीचे डबे करते आणि मला खात्री आहे बाबू नक्की मोठा होणार. बाबू उत्तम गाणी म्हणतो. चढ़ता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा..हे त्याचं आवडतं गाणं असलं भारी म्हणायचा. मी स्टेशनवरच्या खांबाला तिरकं टेकून हे गाणं चमचा आणि कागदाची नळी यावर वाजवायला शिकले होते त्याच्याकडून. आता नाही जमणार. सभ्य समाजाच्या मुर्दाड साच्यात फिट्ट बसलेय मी आता...

मजा म्हणजे यातली ८०% लोकं माझी मित्र आहेत हे घरी माहीतंच नसायचं. घरच्यांना घाम फुटला असता यातली काही लोक कोण आहेत कळले असते तर त्यावर पुढच्या भागात. असो पुढच्या भागात एकदम धमाल म्हणजे सुस्साट लोकं घेऊन येते लवकरच.अरे कै च्या कै किस्से आहेत आणि जुन्या मित्र-मैत्रिणींना फोन करून त्यांना कोणते आठवत असतील तर ते पण शोधते..तोपर्यंत हा भाग कसा वाटला सांगा आणि तुम्हाला पण अशी भन्नाट माणसं भेटली असतील, दिसली असतील तर जरूर लिहा. वाट बघते.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

फार्र छोटं लिहिलंय, पण मस्त आहे.
मुंबै लोकलप्रवास ही कितीही भयप्रद बाब असली तरी ते मुंबैचं महत्त्वाचं अंग आहे. खरं तर मुंबै लोकल्स वर आतापावेतो पुस्तकं लिहून व्हायला हवी होती.
पिंडात ब्रह्मांड दिसतं तशी लोकल ट्रेनमधे मुंबै दिसते.

सहप्रवासी, भिकारी, फेरीवाले, उगाच लोंबकळणारे, भांडाभांडी करून सीट मिळवणारे, सीट मिळवायला स्ट्रॅटेजी वापरणारे, कोपऱ्यात उभं रहाण्यातच धन्यता मानणारे, फेरीवाल्यांच्या वस्तू हातात घेऊन टाईमपास करणारे, भजन म्हणणारे, भजनाला टाळ्यावाजवणारे, भजन ऐकणारे, पत्ते खेळणारे, पत्ते खेळताना खेटून उभं राहून बघणारे, शेअरमार्केटवाले, हापिसातले, बेकार लोक, एफेम रेडिओ कानी घेऊन ऐकणारे - असे अजून १०० प्रकार.
साधारण मुंबैकर पुरूष असलात तर असल्या कॅटेगरी दिसतीलच. (बायकांच्या डब्यातले अजून काय नमुने असतात?)
----
लक्षात राहील असे लोकलमधे भेटलेले लोक - हा सॉलिड विषय आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तसा मोठा विषय आहे हा. सुरुवात लेडिज डब्यातली भांडणांपासून करता येईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोकरीनिमित्त लोकलने फारसं जावं लागलं नाही त्यामुळे गम्मत हुकलीच. इतर वेळी जाण्याची वेळ आल्यास काही किस्से आठवतात. आता म्हाताऱ्या वयस्कर वगैरे बायांनी( नोकरीवाल्या नाही ) एक नवीन शक्कल शोधली आहे घाइघाईत पुरुषांच्या डब्यात चढतात, आत जातात. हटकून बसायला जागा कुणीतरी उठून करून देतातच. हे लाड बायकांच्याच डब्यात होत नाहीत.

लेख मजेदार पण एकच मोठा लिहून टाका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाप रे पुरुषांच्या डब्यात खरच चढतात बायका? हॉरिबल वाटतय मला तरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Everybody has a story /रुमाल/

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

लेख आवडला. अस्वलराव म्हणाले तसं, निवांत सविस्तर लिहा. वाचायला आवडेल.

दुनिया गेली झालम मधे..झालम म्हणजे काय ते तिलाच माहीत.

जहन्नम कदाचित?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटतं झा... मध्ये

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

होय जहन्नुम. दुनिया म्हणजे आपल्याला डाउन सिंड्रोम आणणारे शेजारी. जन्नतमध्ये जाऊन कसं चालेल? ( तिकडे कोण ढकलेल त्यांना?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लिहिलंय! आणखी येउद्या!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

छान

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिही गं आणखी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्यक्तिचित्रण आवडेश, थोडक्यात तश्याच मला भेटलेल्या व्यक्ती उभ्या राहिल्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लिहिलंय. आवडलं. अजून येऊ द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लिहिलय! आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !