गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणी - २

भाग एक

पुस्तकातले काही तपशील इथे उघड होतील. ज्यांना पुस्तक वाचायचं असेल त्यांनी कृपया हे असलं काही वाचू नये!

"गतकाळच्या पृथ्वीच्या आठवणीं"मधे तीन भागांचा समावेश होतो. क्रमाने थोडंफार कथानक आणि त्यातले मला रोचक वाटलेले फाटे इथे टाकतो आहे.

भाग पहिला - द थ्री बॉडी प्रॉब्लेम अर्थात त्रिगोलप्रश्न.
---------------------------------------------------------------------------
सुरूवात होते ती लाल क्रांतीपासून. "revolution eats its own" चा अर्थ उमगतो. ह्या कठीण काळाचा मुशीसारखा वापर करून चीनी राज्यकर्त्यांनी वर्तमानकाळातल्या चीनी ड्रॅगनची उभारणी केलीये. ह्या चीनची शास्त्रीय प्रगती वाखाणण्याजोगी आहे. अर्थात यात काहीच अतिशयोक्ती नाही. खगोलयांत्रिकी ते मूलभूत भौतिकशास्त्रात चीन जोरदार मुसंडी मारतोय. चंद्राच्या दुसऱ्या बाजूवर उतरवलेलं यान असो किंवा फिशन निर्माण करणारा भलाथोरला टोकामाक, इथे मागे नानावटींनी दिलेला प्रतिसूर्य असो.
.
पण अशावेळी एका नॅनोटेक्नोलॉजिस्टला विचित्र अनुभव येतात. आणि तो ह्याचा शोध घ्यायला लागतो तेव्हा त्याला अधिकाधिक धक्कादायक गुपितं कळत जातात.
सर्वात महत्त्वाचं गुपित म्हणजे - पृथ्वीखेरीज इतरत्रही जीवसृष्टी आहे आणि त्यांनी मानवाशी संपर्क केलेला आहे.
.
फाटा-
एलिअन्स/परग्रहवासी/extraterrestrial/ UFO ह्या विषयावर शेकडोंनी चित्रपट निघाले असतील. विद्न्यानकथांचा सुवर्णकाळ असं ज्याला म्हटलं जातं (१९३०-१९६०) त्या काळात परग्रहवासीयांवर कित्येक कथा लिहिल्या गेल्या. बहुतेक परग्रहवासी एक तर माणसांसारखेच होते किंवा मानवप्राणी संकर तरी.
.
खुद्द ॲसिमोवने निरनिराळ्या पुस्तकांत वेगवेगळे परग्रहवासी चितारले आहेत. पण हार्ड सायन्स फिक्शनचा विचार केला तर "the gods themselves" हे एक उत्कृष्ट पुस्तक म्हणता येईल. पुस्तक मूळापासून वाचण्यासारखं आहे. मला इथे महत्त्वाचा वाटणारा मुद्दा म्हणजे - ॲसिमोव ह्या पुस्तकात परग्रह आणि तिथलं जीवन ह्याचा शास्त्रीय विचार करून मग तसे एलिअन्स निर्माण करतो. हे एलिअन्स आपल्याला नीट उमगत नाहीत, त्यांची छबी डोळ्यापुढे उभी करायला वाचकाला परीश्रम करावे लागतात.
असे एलिअन्स विरळा.
.
दुसरा मुद्दा म्हणजे भीतीदायक एलिअन्सचा. एलिअन्स म्हटलं की जे भीतीदायक चित्र उभं रहातं, ते बहुतेक रिड्ली स्कॉटच्या १९७९च्या "एलिअन" चित्रपटाने उभं केलेलं असतं.
मी मी म्हणणारे दिग्दर्शक ह्या एलिअनसाच्यातून बाहेर येऊ शकले नाहीयेत. तेव्हा परग्रहवासी म्हटलं तर ते एक तर माणसांसारखे असतात किंवा क्रूर, अवाढव्य कीटकांसारखे दिसणारे तरी असतात.

"त्रिगोलप्रश्न" परग्रहवासीयांच्या रूपाकडे संपूर्ण दुर्लक्ष करतो, आणि ह्या सगळ्या प्रकाराकडे डोकं असलेल्या लोकांप्रमाणे बघतो.
त्रिगोलप्रश्न सुरूवातीपासून सुरूवात करतो.
.
संपर्क झाला म्हणजे काय?
संपर्काचे काय परीणाम होऊ शकतात?
पृथ्वीला ह्यामुळे काही धोका संभवू शकतो का? आणि हा धोका कशाप्रकारचा असू शकतो?

डोनाल्ड अण्णासाहेब रॅम्स्फेल्ड ह्यांंचं सुप्रसिद्ध वाक्य उसनं घ्यायचं झालं तर -

There are known knowns; there are things we know we know. We also know there are known unknowns; that is to say we know there are some things we do not know. But there are also unknown unknowns — the ones we don't know we don't know.

परग्रहवासीयांशी संपर्क हे ह्यातल्या तिसऱ्या गटात मोडतं.

The fears unleashed by contact with a new life form are not understood. . . . But the most likely consequence . . . is absolute terror

मायकेल क्रिक्टनच्या Sphere मधे लिहिलेलं हे वाक्य किती खरं आहे ते त्रिगोलप्रश्न आपल्यापुढे मांडतो.

एक तर परग्रहवासीयांशी संपर्क झाला म्हणजे लगेच ते यानं घेऊन पृथ्वीवर पोचत नसतात. अवकाशातली अंतरं म्हणूनच अत्याधिक महत्त्वाची ठरतात.
दुसरं म्हणजे अमेरिकन चित्रपटांत दाखवल्याप्रमाणे परग्रहवासीयांसाठी वेलकम कमिटी म्हणून पाच लोकं डायरेक्ट पनवेल सुपरफास्ट एसटी पकडून त्यांना भेटायला जात नाहीत. आणि त्यात एक टोकन काळा, एक सेक्सी बाई, एक चुत्या काड्याघालू आणि एक हिरो असे ठोकळे नसतात.
तिसरं म्हणजे अमेरिका हेच जीवन आणि इतर देश म्हणजे मृत्यू हेही खरं नसतं गडे हो.

मग परग्रहवासीयांशी संपर्क झाला तर काय होतं? आणि हा संपर्क एकेरी असावा का दुहेरी?
(त्यांनी दिलेली साद आपण फक्त ऐकायची की आपणही त्यांना साद घालायची? दोहोंत खूप फरक आहे. SETI हे एकेरी सादेचं उदाहरण आहे तर METI हे दुहेरी सादेचं उदाहरण आहे.)

ही फक्त सुरूवात झाली. पुढला मुद्दा म्हणजे परग्रहवासीयांशी कुणी बोलायचं? पृथ्वीवरचे नेहेमी भांडणारे दादा लोक आता परग्रहवासीयांशी वेगवेगळी डील्स करणार की नेहेमी सुस्त असलेला "यूनो" नामक अजगर आता जागृत होऊन पृथ्वीप्रतिनिधी बनणार?

शिवाय परग्रहवासी आहेत असं सिद्ध झाल्यावर त्यांच्याबद्दल अधिक माहिती कशी गोळा करायची? त्यांना "बघता" येईल असं तंत्रद्न्यान आपल्याकडे अस्तित्त्वात आहे काय?
त्यांनी पाठवलेला संदेश आपल्याला संपूर्ण समजलेला आहे का?

अधिक महत्त्वाचं म्हणजे ह्या परग्रहवासीयांकडे पृथ्वीबद्दल काय माहिती आहे? "किती" माहिती आहे? त्यांचं तंत्रद्न्यान आपल्यापेक्षा पुढारलं असलं तर नवे प्रश्न निर्माण होतात.
त्यांची निरीक्षणक्षमता ही आपल्याकल्पनेपलीकडल्या तंत्रद्न्यानावर आधारित असेल तर आणखीच वांधे.
उदा. आपण ज्याला बुध ग्रह समजतो तो एक परग्रहवासीय निरीक्षकगोल असला तर? ही कल्पना हास्यास्पद तोवरच वाटते जोवर आपल्याला परग्रहवासीयांचा संदेश मिळालेला नसतो. ज्याक्षणी पटावर नवा खेळाडू येतो त्याक्षणी हा प्रश्न अशक्यतेच्या कोटीतून शक्याशक्यतेच्या रेषेवर येऊन पोचतो.

ही शक्याशक्यतेची धूसर सीमा हीच सर्वात मोठी भीती आहे.
अक्राळविक्राळ जबड्यातून लाळ गाळणारे भीतीदायक एलियन्स हा फक्त एक बाळबोध बागुलबुवा आहे, पृथ्वीवरच्या माणसांना उबदार पांघरूणात झोपताना अंगाईगीत म्हणून वापरायला कितीही रंजक असला तरी त्याचा सत्याशी काहीही संबंध नाही.
=*=

त्रिगोलप्रश्नातला पुढला भाग आहे तो परग्रहवासीयांबद्दल. वर म्हटल्याप्रमाणे परग्रहवासीयांच्या रूपाकडे फारसं न पहाता त्रिगोलप्रश्न त्यांच्याकडे भिन्नरूपाने बघतो.
"ते" कसे दिसतात ह्याला महत्त्व नाही. "त्यांना" काय हवंय आणि "आपल्याला" ते झेपेल का? हा प्रश्न कळीचा आहे.

स्पॉयलर-
त्रिगोलप्रश्नात परग्रहवासीयांच्या जगाबद्दल पुष्कळ काही आहे. त्यांच्या ग्रहाला एक सोडून ३ सूर्य आहेत. जेव्हा ३ सूर्य एकमेकांभोवती फिरतात तेव्हा त्यांच्या गुरूत्त्वीय कचाट्यात सापडलेल्या ग्रहाला कसा अनुभव येतो?
एकतर त्या ग्रहावर तीन सूर्य दिसतात. पण एका सूर्याचं मार्गाक्रमण ठरवणं जितकं साधं आहे तेवढंच तीन सूर्यांचं मार्गाक्रमण ठरवणंं कर्मकठीण.
आपण पृथ्वीवर दिवस रात्र, उन्हाळा, हिवाळा अनुभवतो ते सर्वस्वी सूर्यावर अवलंबून आहे. पण तीन सूर्य असले की कधी काय होईल ते ठरवायला बरीच आकडेमोड करावी लागते,आणि ती Three-body_problem ह्या नावाने सुप्रसिद्ध आहे.
परग्रहवासियांसाठी हा जीवनमरणाचा प्रश्न आहे. कारण त्यावर त्यांच्या ग्रहाचं भविष्य आणि त्यांचा स्वत:चा वर्तमान अवलंबून आहे.
पृथ्वी आणि त्रिगोलग्रहामधल्या संपर्कानंतर हा त्रिगोलप्रश्न केंद्रस्थानी असणार आहे.

=*=

स्पॉयलर-
तिसरा मुद्दा आहे तो ह्या पुस्तकातला मला सर्वाधिक आवडलेला भाग- The three body problem हा काँप्यूटर गेम.
त्रिगोलग्रहाची ओळख करून देण्यासाठी लेखकाने वापरलेली ही कृल्प्ती(?) जबरदस्त आहे. एखाद्या संपूर्ण अनोळखी अनुभवाचा प्रत्यय घ्यायचा असेल तर व्हर्चुअल रिॲलिटीपेक्षा उत्तम साधन ते काय असू शकेल? तेव्हा व्हर्चुअल रिॲलिटीत निरनिराळे खेळाडू त्रिगोलग्रहाशी सुपरिचित होत जातात. त्यांना त्रिगोलग्रहाच्या वातावरणाची, तीन सूर्यांनी प्रसंगी होरपळणाऱ्या किंवा प्रसंगी हाडं फोडणाऱ्या थंडीची आणि त्रिसूर्यवासीयांच्या जीवनपद्धतीची जाणीव करून देतात.

=*=

त्रिगोलप्रश्नाच्या अंती वाचकाला ह्या परग्रहवासीयांबद्दल पुष्कळ माहिती समजते. त्यांचे हेतू, कार्यकारणभाव, पृथ्वीकडून असणाऱ्या अपेक्षाही कळतात.
पृथ्वीचा ह्यासर्वाकडे बघण्याचा दृष्टीकोन, देशादेशांचे अंतर्गत मतभेद, राजकारण आणि तंत्रद्न्यानावर झालेला परिणाम ह्यांची माहिती मिळते.
कथानकाबाबत हे सगळं असं मोघम सांगण्यामागे उद्देश हा आहे की साधारण लेखकाने मांडलेल्या पटाचा अंदाज यावा. तांत्रिक आणि शास्त्रीय तपशील, व्यक्तिरेखा आणि त्यांचे संबंध, कथेच्या ओघात येणारे निरनिराळे गट आणि त्यांच्यातल्या दुफळ्या - हे सगळं वाचूनच अनुभवायला हवं.

(क्रमश:)

* त्रिगोलप्रश्न हे नाव गो.ना. दातारांच्या कादंबऱ्यांच्या नावावरून सुचलं आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

"ते" कसे दिसतात ह्याला महत्त्व नाही. "त्यांना" काय हवंय आणि "आपल्याला" ते झेपेल का? हा प्रश्न कळीचा आहे.

हा विचारच मस्त आहे. बाह्यरुपात अडकायचे की अंतरंग भेदायचे.
अस्वल खूप passionately (पोटतिडीकीने) लिहीले आहेत. आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला, वाचतो आहे.

तिसरा मुद्दा आहे तो ह्या पुस्तकातला मला सर्वाधिक आवडलेला भाग...

अगदी, अगदी. शेम हिअर!

डोनाल्ड अण्णासाहेब रॅम्स्फेल्ड ह्यांंचं सुप्रसिद्ध वाक्य उसनं घ्यायचं झालं तर -

याबद्दल दंडवत!
सोबतच ट्रम्पतात्यांचं "'What you're seeing... is not what's happening'" (दुवा) हेही कसं फिट्ट बसतं! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सूर्य - पृथ्वी गुरुत्वाकर्षण हे एक आदर्श स्थिती. चंद्रही आला की त्रिपिंडी गुरुत्वाकर्षण होतं हा शब्द वाचला आहे.
-----
पुस्तकातले - कथानकातले नाट्य न देता त्याबद्दल सांगणे अवघड असते. सांगा सर्व. वाचताना विसरून वाचू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा इंट्रो लई आवडला, नक्की वाचणार हे पुस्तक.

एलियन म्हणजे काय आणि संपर्क म्हणजे काय यांची तर्कशुद्ध उकल आवडली. काँटॅक्ट की अशाच काहीशा नावाचा पिच्चर मधे आला होता त्यातही तोच फंडा होता. एलियन दिसायला बऱ्यापैकी वेगळे होते, आणि एक लिंग्विस्ट बाई त्यांच्याशी "बोलायचा" प्रयत्न करते. खूप वेगळा प्रकार. लय आवडला कारण आजवर एलियनही स्ट्रिरिओटाईप्ड होते. तसाच अजूनेक आवडलेला पिच्चर म्हणजे डिस्ट्रिक्ट बी-१२ की अशाच काहीशा नावाचा पिच्चर. एरवीचा एलियनपट म्हणजे बाकी काही असले तरी एलियन आपल्यापेक्षा भारी असतात. इथे मात्र उलट असते. ते लोक इथे येतात, यानात बिघाड झाल्यामुळे तसेच राहू लागतात. निर्वासित गल्लीसारखी एक एलियन गल्ली तयार होते आणि माणसांकडून शिव्या खात तसेच जगतात. हे दोन अपवाद या निमित्ताने आठवले. अजूनही असतील, पाहिले पाहिजे.

हे पुस्तक नक्कीच वाचणार. बाकी काही म्हणा, विज्ञानकथेत जितकी कल्पनाशक्ती स्वैर सोडून अफाट शक्यता निर्माण करता येतात, तितकी स्वैर अभिव्यक्ती कादंबरीच्या इतर कोणत्याही जॉनरात करणे अशक्य वाटते. तीच ती माणसे अन त्यांचे मनोव्यापार- किती उड्या मारणार तेवढ्यातल्या तेवढ्यात? त्यापेक्षा हे खूप कायतरी नवीन आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एलियन दिसायला बऱ्यापैकी वेगळे होते, आणि एक लिंग्विस्ट बाई त्यांच्याशी "बोलायचा" प्रयत्न करते.

तो बहुधा Arrival आहे. मस्तच चित्रपट.

दुसरा एक कार्ल सेगान लिखित "काँटॅक्ट" नामक कादंबरीवर आधारित त्याच नावाचा चित्रपट आहे- तोही संपर्क ह्याच विषयावर आहे आणि तोही अतिशय प्रगल्भ मांडणी करतो.
किंबहुना एलिअन काँटॅक्ट ह्या विषयावरचा सर्वोत्तम चित्रपट - विज्ञान + नाट्यमयता. त्यात ह्या विषयातले थोडे वेगळे पैलू मांडले आहेत.

डिस्ट्रिक्ट १२ नक्कीच वेगळा आहे आणि जबरदस्त अपवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तक परिचय करण्यापेक्षा असे कॅज्युअल चिंतन फारच मजेशीरपणे एकदम आशयगर्भ होऊन जाते. पाल्हाळीक पसरटपणा तर आवडलाच आवडला.

अवांतर: माझे अगदीच छचोर मत असे आहे की वॉलफेसरची लव स्टोरी अति मुराकामू'क आहे.
आणखी अवांतर: 'वैश्विक समाजशास्त्र' अशी एकदमच मोठी भरारी घेऊन कादंबरीत सर्वत्र फक्त चिनी शास्त्रद्न्य/विचारवंत. तोंडी लावयला अमेरिकन, जापनीज आणि जर्मन लोक. हे नेहमी खटकले. पण चिन देशात राहुन लिहीत असल्यामुळे माफ करुन दिले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'वैश्विक समाजशास्त्र' अशी एकदमच मोठी भरारी घेऊन कादंबरीत सर्वत्र फक्त चिनी शास्त्रद्न्य/विचारवंत.

सगळ्या चिन्यांना वाटतं की जगातल्या बुद्धीचा सगळा गड्डा चीनमध्येच उगवलाय. त्यामुळे हे असणारच.

शिवाय - लिऊ सीशिनने या कादंबऱ्या मान्दारिनमध्ये लिहिल्या होत्या हे लक्षात घेतलं पाहिजे. ग्वांग्जो में रहना होगा, तो मान्दारिन भारी कहना होगा.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.