जंगल आणि तो (कथा)

पुन्हा एकदा आलेली खोकल्याची उबळ त्याने महत्प्रयासाने दाबली. पण अजून एकदा ती उबळ उफाळून आल्यावर त्याने दबक्या आवाजात त्या खोकल्याला वाट करून दिली. त्या खोकल्याचा आवाज रात्रीच्या त्या भयानक वातावरणात घुमल्यावर, एखादी अघोरी शक्ति पाहून एखादे घुबड चित्कारले आहे,असा भास होत होता. तोंडावरचा हात त्याने बाजूला केला. बिड्या ओढून ओढून छातीचा पिंजरा झालेला होता. जुना पंखा सुरू केला की जशी घरघर होते, तशी घरघर त्या छातीच्या पिंजर्‍यातून सारखी बाहेर यायची. अधून मधून खोकल्याची उबळ उफाळून वर यायची. एरव्ही तो मनसोक्तपणे खोकलला असता. पण या वेळची परिस्थिती वेगळी होती. या अशा काळ्याकभिन्न परिसरात तो एकटाच चालत होता. सोबतीला या काळोखाशिवाय चिटपाखरूही नव्हते. त्याला त्याच्या श्वासाची घरघर पण भितीदायक वाटत होती. मग खोकल्याची उबळ तर खूप मोठी होती. त्या आवाजाने आपण इथे आहोत याची कोणाला चाहूल लागली तर, कोणाच्यातरी शिकारीचे भक्ष्य होऊ. अशी जाणीव त्याला कुठेतरी होत असावी.

पायाखालची वाट परिचयाची असली तरी. अशा या अभद्र रात्री या वाटेवरून जाण्याची पहिलीच वेळ होती. दिवसा कितीतरी वेळा तो या वाटेने गेला होता. दिवसा जाणवणार प्रसन्नपणा, रात्री तेवढाच भयानक आणि  कापरी वाटत होता. पण आता इलाज नव्हता. पुढे सरकणे भागच होते. तो बरेच अंतर पुढे आला होता. मागे जाण्यातही काही अर्थ नव्हता. एक एक पाऊल पुढे टाकत तो अंतर कमी करू लागला.

तो देवा पाटील. वय साधारणतः साठच्या आसपास असेल. आज बायकोच्या आग्रहाला बळी पडून, तो लेकीकडे साडी चोळी घेऊन आला होता. लेक जवळच्या गावातच दिलेली होती. वाटेतल हे जंगल ओलांडल की लेकीच सासर होत.

सकाळी सकाळी तो लेकीच्या दारात होता. साडी चोळी लेकीला दिली. बापाला पाहून लेक सुखावून गेली. जावई आणि त्याने दुपारचे जेवण केले. सकाळ पासुन पायपीट केल्यामुळे त्याने तिथेच बाजेवर अंग टाकले. मस्त झोप लागली. संध्याकाळी पाचच्या सुमारास जाग आली. तो गडबडीत उठला. त्याला आजच गावाकडे माघारी जायचे होते. डोक्यावर पटका बांधत तो लेकीला म्हणाला, " निघतो मी गावाकडे." लेकीने खूप आग्रह केला. रात्रीच जंगलातून जाऊ नका. जंगल चांगल नाही. ती काळजीच्या स्वरात म्हणाली. " गुरढोर रानात बांधलेले आहेत. त्यांना चारा पाणी द्यावा लागतो. राहून नाही चालणार." लेकीचा आग्रह मोडून तो गावाकडे निघाला. निघता निघता अंधार दाटून आला होता. भराभर पाय उचलून आपण तासा दोन तासात गावात पोहोचू असा त्याचा अंदाज होता. पण पाऊस नेमका पडून गेल्यामुळे वाटेत चिखल झाला होता. त्यामुळे भराभर पाय टाकण जड जात होत.
   अर्धा रस्ता पार केला तेव्हा, रात्री नऊचा सुमार झाला होता. त्याला आता एकटेपणाची जाणीव होऊ लागली. कोणीतरी सोबत पाहिजे होत अस मन म्हणत होत. लेकीचा आग्रह उगाच मोडला. आता त्याला त्याचा पश्चाताप होऊ लागला. खोकल्याची उबळ पुन्हा एकदा उफाळून आली. तोंडावर जोरात हात दाबून त्याने बारीक आवाजात खोकल्याला वाट करून दिली. बिडी पिण्याची तल्लफ झाली पण; बिडी पेटल्याचा उजेड होईल आणि कोणाच्यातरी नजरेत आपण पडू, या विचाराने त्याने बिडीचा विचार सोडून दिला.  चिखलात पाय पडल्यावर चपलांचा चपक् चपक् आवाज अंधारात भितीदायक वाटत होता. त्याला आता कोणत्याही आवाजाची भीती वाटू लागली. थोडासा आवाज झाला तरी, त्या आवाजाच्या दिशेने त्याचे कान टवकारू लागले. हळूहळू भीती त्याच्या अंगात शिरू लागली.
    तो ज्या जंगलातून जात होता. त्या बद्दल आसपासच्या गावातील लोकांच्या मनात अनेक शंका-कुशंका होत्या. कोणाचही मत त्या जंगलबदल चांगल नव्हत. अनेक अघोरी कथा त्या जंगलातून बाहेर पडून गावकर्‍यांपर्यंत आलेल्या होत्या. त्या कथा त्याच्यापर्यंतही आलेल्या होत्या. त्यामुळे त्याच्या भितीत अजून भर पडली होती.
  वाटात दिसणार्‍या उंच झाडांचा आकार त्याला, त्याच्या मनात उठणाऱ्या भितीदायक तरंगाप्रमाणे भासू लागला. मनात येणार्‍या वेड्या वाकड्या आकृत्या त्या झाडात त्याला दिसू लागल्या. मनातले भास झाडात प्रकट होऊ लागले. झाडांच्या पानांची सळसळ बारीक हुंकारा सारखी ऐकू येऊ लागली. चिखलात टाकलेला पाय पुन्हा वर येईल की तसाच रुतून बसेल, असा प्रश्न मनात डोकावू लागला. आसपासच सगळच वातावरण त्याच्या विरोधी झाल्यासारख दिसू लागल. मनात येणारे विचार वातावरणात दिसू लागले.

त्याला थोडसा पुढ काहीतरी हलताना दिसल. स्पष्ट दिसत नसल तरी काहीतरी आकृती हालचाल करत आहे याची जाणीव त्याला झाली. भीती सरसरून मेंदूपर्यंत गेली. क्षण दोन क्षण तो जागेवर थांबला.  जाग्यावर तसाच उभा राहून, पुढचा अंदाज घेऊ लागला. त्याने पुढे लक्ष देऊन काही ऐकू येते का याची चाहूल घेतली. पुढे काही अंतरावर कोणीतरी चिखलातून पाय बाहेर काढत आहे असा काहीसा आवाज कानावर आला. पुन्हा थोड्यावेळाने चिखलात पाय टाकल्याचा आवाज आला. त्याला त्या आवाजाने हुरूप आला. पुढे कोणीतरी चालत आहे ही जाणीव सुखावणारी होती. कोणीतरी सोबत आहे या विचाराने तो झपाझप पावले टाकून पुढे सरकू लागला. पण चपला चिखलातून वर घेताना त्याची दमछाक होऊ लागली. चालण्या वेग येत नव्हता. त्याने चपला काढून हातात घेतल्या आणि पटापटा पुढे चालू लागला. आता तो त्या आकृतीच्या बराच जवळ आला. त्याला आता ती आकृती काहीशी स्पष्ट दिसू लागली. पुढे सफेद कपडे घातलेला एक पंचवीस सव्वीस वर्षाचा मुलगा चालत होता. त्याने चपला हातात घेतल्या होत्या. आणि खालचा चिखल तुडवत मोठ्या जिकरीने तो पुढे जात होता. त्याला पाहून हा सुखावून गेला. एकदाची कोणाची तरी सोबत मिळाली होती. मघाची वाटणारी भीती एकदम कमी झाली होती. डोक्यावरचे मनाचे ओझे एकदम खाली ठेवल्या सारख झाल.

तो त्यांच्या मधले अंतर पार करून त्या मुलाजवळ पोहोचला. अंगावर सफेद सदरा, खाली खाकी रंगाची वर गुडघ्यापर्यंत दुमडलेली पँट आणि हातात चपला घेऊन, तोल सांभाळून तो चालत होता. त्याला देवा पाटलाची चाहूल लागली असूनही त्याने त्याच्याकडे साधे वळूनही बघितले नाही. तो आपला चपला हातात घेऊन, शांतपणे चिखल तुडवीत चालत होता. देवा पाटील त्याच्या अगदी निकट गेला तरी त्याची शांतता भंग पावली नाही. तो आपल्या चालण्यात मग्न होता. त्याला त्याच्या या शांततेच नवल वाटल. कोणीतरी सोबत भेटल म्हणून; आपण किती सुखावून गेलो होतो. पण याला आपण आलो याच काहीच सोयरसुतक नाही. साध मागू वळून पण त्याने पाहील नाही.
" अय पोरा कुठ निघाला हायस?" देवा पाटलाने त्याची शांतता भंग करत विचारल. त्याला वाटल आता तरी हा काही बोलल. पण त्याच्या विचारण्याचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. तो आपल्या नादातच पुढे चालत होता. साध माग वळून पण त्याने पाहील नाही. अशा गडद अंधारात त्याच अस मौन त्याला विचित्र वाटू लागल. चकवा लागावा अस तो एकाच रेषेत आणि धुंदीत चालत होता. आजुबाजूला कोणी आहे, कोणीतरी काही विचारत आहे. याची त्याला फिकीरच नव्हती. त्याची ती शांतता त्याला जीवघेणी वाटू लागली. सोबत भेटल्याचा आनंद कमी होऊ लागला. उलट हे प्रकरण काहीतरी वेगळं दिसत आहे अस राहून राहून मनांत जाणवत होत. त्याची पावल धीमी झाली. काय कराव काहीच कळेना. मन द्विधेत अडकले. त्याने मनाचा पक्का निर्धार करून त्याला पुन्हा एकदा आवाज दिला.
" ये पोरा नाव काय तुझ? अस गप गप का चालत हायेस? एवढा सोबत मिळालो हाय, तरी तोंडातून ब्र पण काढत नाहीस, का मुका बहिरा हायस?"
एवढ लांबलचक वाक्य बोलूनही काही परिणाम झाला नाही तेव्हा;देवा पाटील वैतागला. भीतीची जागा आता रागाने घेतली. तो झपझप पाऊले टाकून, त्या पोराच्या अगदी समोर जाऊन थांबला. दोन्ही हात लांब फैलावुन त्याची वाटच अडवून धरली. त्या सरशी तो मुलगा जागीच थांबला. क्षणभर दोघांची नजरानजर झाली. आणि पाटलाचे फैलावलेले हात आपोआप खाली आले, तोंड भीतीने  वासावे तसे मोठे झाले,नजरेत भीतीची सणक चमकून गेली. पाटील आपोआप वाटेतून बाजूला सरकला आणि त्याला वाट मोकळी करून दिली. आणि आधी जसा शांतपणे चालत होता तसाच आपल्या धुंदीत तो मुलगा चालू लागला.

आता भीती आणि कुतुहलाने देवा पाटलाचा चेहरा काळवंडून गेला. त्याच्या नजरेतला थंडावा त्याला बरच काही सांगून गेला. त्या नजरेत कुठलेच भाव नव्हते. डोळे आणि नजर कोरी होती. जिवंतपनाचे एकही लक्षण त्या नजरेत आढळले नाही. त्यात अशी जादू होती की, त्याला अडविण्यासाठी वर गेलेले हात आपोआप खाली आले होते. तो उद्विग्न मनस्थितीत अडकला. एवढ्या घनदाट अंधारात हाच नमुना आपल्याला का मिळाला? इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्तिथी झाली. त्याच्या सोबत चालाव तर त्याची ती थंड नजर आणि सोबत नाही चालाव तर हा घनघोर अंधार. मनाचा काहीच कौल लागेना. मनाची नुसती चरफडत होऊ लागली. मुठी आवळून तो तळहातावर आदळू लागला. त्या पोराचा संताप येऊ लागला. हा अशा परिस्थिती एवढा थंड कसा वागू शकतो. एवढा निर्विकार चेहरा घेऊन असा भयकारी परिसरात कसा चालू शकतो? त्याच्या डोळ्यात एवढ डोकावून पाहील तरी साधी पापणी पण लवू नये म्हणजे काय? एवढा कोरा चेहरा कोण ठेऊ शकतो? अशे अनेक प्रश्न अशा वेळीही त्याला पडून गेले. तो या अपमानाने व्यथित झाला. तडक झपाझप पाऊले उचलून तो त्याच्या मागेमागे चालू लागला. चालत चालत पुन्हा त्याच्या जवळ पोहोचला. पुन्हा त्याची ती चाल त्याला दिसू लागली.

एव्हाना ते दोघे किती वेळ चालत होते, किती अंतर कापले हे कळायला काही मार्ग नव्हता. पण ते एवढा वेळ चालत होते की, काही वेळातच उजेडुन येणार होते. जंगलाची वेस संपणार होती. देवा पाटील आता चेकाळून उठला होता. त्याचा अहंम दुखावला गेला होता. हा कुठला पंचविश सव्वीस वर्षाचा मुलगा मला टाळत होता. तो तणतण करत पुन्हा त्याला बोलू लागला. पण या वेळेस बोलताना मात्र त्याचा आवाज धारदार आणि क्रोधित होता.
" ये पोरा तुला येड लागल का रं? मघापासून तुझे नखरे पाहतो हाय, नुसता घुम्या गत चालत हाय. काही विचारल तर नुसता थंडपनाने बघत हायस. तुला काही माणुसकी हाय का नाही? का अस खुळ्यागत वागत हायस. एवढ्या रात्री अशा या परिसरात भीती वाटत का नाही तुला. भीती वाटली पाहिजे. त्याशिवाय तुला माणसाची किम्मत कळून येणार नाही." देवा पाटील  बोलत सुटला. पण त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तो त्याच्याच चालीत होता. पाटील आता त्याच्या पुढे आला. त्याच्यावर डोळे वटारून त्याला भीती दाखवू लागला. तोंडातून चित्र विचित्र आवाज काढून त्याला जेरीस आणू लागला. दात ओठ खात त्याला शिव्या देऊ लागला. घुबडासारखे चित्कार तोंडातून काढू लागला. आता त्याला त्याच्या चेहर्‍यावर भीती पहायची होती. भीतीने थरथर कापताना त्याला बघायच होत. तो त्यासाठी काहीही करणार होता. तो एकदा घाबरला की त्याचा विजय होणार होता. देवा पाटलाचा विजय होणार होता. फक्त एकदाच त्याच्या चेहर्‍यावर त्याला भीती पहायची होती. मग पुढची बाजी त्याचीच होती. पुढचे राज्य त्याचेच होते.
    एव्हाना तांबड फुटायची वेळ झाली होती. काही क्षणातच पहाट होणार होती. जंगलाची वेशही संपत आली होती. गावाची वेश जवळ आली होती. आता देवा पाटील इरेला पेटला होता. त्याने त्या पोराचे दोन्ही खांदे हातात धरून ते जोरात हलवले. त्याच्या डोळ्यात जरबेच्या धाकाने पाहिले. आणि क्षणात ते घडले. देवा पाटलाला एक जोरात धक्का मारत तो मुलगा सुसाट गावाच्या वेशीकडे धावत सुटला.

त्याला धावताना पाहून देवा पाटील चेकाळून उठला. तो मुलगा प्रचंड भीतीने पळून गेला आहे, याची जाणीव त्याला झाली. देवा पाटील क्रोधाने लालबुंद झाला. हातातली शिकार असी निसटून जाताना पाहून तो संतापाने बेभान झाला. तो पोरगा वाचला होता. तो मुलगा धावत जंगलाच्या वेशीबाहेर आला. आता तो सुरक्षित होता. आता भीती पाठीमागे उरली होती. खाली गुडघ्यावर हात ठेऊन त्याने मोठा श्वास घेतला. धावताना मोठी धाप लागली होती. आणि त्याने मागे वळून बघितले.
     पाठीमागे देवा पाटील त्याच्याकडे क्रोधाने बघत होता. आता त्याची नजर बदलली होती. नजरेत अमानवी असे प्रतिबिंब चमकत होते. नजरेतील खुनशी भाव एवढ्या लांबून पण स्पष्टपणे दिसत होते. " साल्या तू वाचलास" अशी हीनकस भावना चेहर्‍यावरून सहज टिपता आली असती. त्याच्या नजरेत जास्त वेळ पाहील तर पुन्हा काही अनर्थ व्हायचा, त्या अगोदर त्याने घराची वाट धरली आणि जंगलाची कथा त्याच्या मनात तरळून गेली.

देवा पाटील शेजारच्या गावातील एक शेतकरी. जंगलाच्या पलीकडील गावात त्याची लेक दिलेली होती. असाच एकदा तो लेकीला साडी चोळी घेऊन गेला. गावात परत येताना कोणीतरी निर्दयपणे त्याचा खून केला होता. खून कोणी केला, का केला हे कधीही कळाल नाही. पण एक मात्र झाल. जंगलातून जाताना जंगलात देवा पाटील दिसू लागला. गावातील रघुनाथ पाटलाचा बळी देवा पाटलानेच घेतला. आधी तो  प्रेमाने बोलायचा आणि नंतर भीती दाखवायचा, जो भिला त्याचा त्याने बळी घेतला.
  त्याने देवा पाटलाला ओळखल होत. त्याला त्याच मरण दिसत होत. पण अतिशय निर्धाराने त्याने स्वतःच्या भितीवर नियंत्रण ठेवल होत. चेहरा निर्विकार ठेवला होता. आणि त्यामुळेच तो देवा पाटलाच्या तावडीतून सहीसलामत वाचला होता.... आता तो स्वतंत्र होता... मोठा सुस्कारा सोडून त्याने घराची वाट धरली..

**समाप्त.

अभिप्राय कळवा.

           -वैभव देशमुख.
            मो. नं. 9657902283

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet