IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ८)
एक दिग्दर्शक. पिकलेला; पण न वाकलेला. शरीरभर हे ना ते दुखत असलेला; पण ‘जेव्हा माझं काहीतरी एकच दुखत असतं तेव्हा मी नास्तिक असतो,’ अशा वृत्तीचा. हा दिग्दर्शक म्हणजे लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक. आपल्या एका पात्राला न्याय दिला नाही म्हणून एका नटावर रागावून बसलेला. बत्तीस वर्षांनी त्याला भेटायला येतो, हे सांगायला की ‘आता त्या चित्रपटात तू बरा अभिनय केला आहेस!’
नट या प्राण्याचं कलामाध्यम अर्थात त्याचं शरीर. हासुद्धा दिग्दर्शकाबरोबर वय वाढलेला; पण शारीरिक लवचिकता शाबूत ठेवलेला. अफू ओढणारा पण नवीन काहीतरी रंगमंचावर करायला मिळतंय म्हटल्याबरोबर शरीर चपळच असण्यासाठी तात्काळ अफू सोडून देणारा. दिग्दर्शकाची सेक्रेटरी-कम-मैत्रीण. त्याला डॉक्टरकडे नेणारी, औषधं देणारी, त्याच्या प्रकृतीची शक्य तेवढी काळजी घेणारी. आणि त्या दिग्दर्शकाचं लहानपण. त्याची आई. त्याचं घर. त्याचं चित्र काढणारा रंगारी.
या सगळ्याची ही गुंफण. गोष्टच. कालानुक्रमाने सांगण्याऐवजी आणि रम्य स्मरण म्हणून धूसर दिसणारं, सुंदर रंगातलं लहानपण दाखवण्याऐवजी मोठेपणच्या घटनांच्या साखळीतच गुंफलेले लहानपणचे एकेक प्रसंग दाखवत जाणारी.
आणि रंग! गडद पण भडक नव्हेत असे रंग. गडदपणामुळे उठून दिसणारे आणि डोळ्यात भरणारे पण उधळलेले नव्हेत असे रंग. कधी वस्तूत, कधी पार्श्वभूमीवर, कधी कपड्यांमध्ये. पात्रांबद्दल न सांगता एकूण चित्रपटाचा मूड व्यक्त करत जाणारे. आल्मादोवार हा एक मोठा दिग्दर्शक मानला जातो. ‘पेन अँड ग्लोरी’ ही त्याची सर्वोत्तम कलाकृती नाही; उलट आल्मादोवार वयपरत्वे कसा मऊ पडत गेला आहे, हे दर्शवणारी कृती आहे,' असं त्याचे चाहते म्हणतात. तरी एका चित्रपट सादरीकरणात किती स्तर आणता येतात, याचं प्रात्यक्षिक अल्मादोवार इथे देतो.
अँटोनिओ बांदेरास या माणसाला कधीही ‘अभिनेता’ म्हणावंसं वाटलं नव्हतं. ‘द मास्क ऑफ झोरो’, ‘डेस्परॅडो’ यांसारख्या हिरोगिरी करणार्या चित्रपटांमधून झालेल्या ओळखीचा आणि अभिनयाचा संबंध तसा पातळच. ‘फिलाडेल्फिया’मधली त्याची भूमिका लक्षात ठेवण्याचं कारण नंतरच्या या चित्रपटांनी पुसून टाकलेलं. इथे थक्क करून टाकतो. तो दिग्दर्शक दिसतो, थकलेला दिग्दर्शक दिसतो, मनस्वी मनुष्य दिसतो, सहृदय दिसतो, लहानपणचे ठसे सोबत बाळगणारा दिसतो. तो लहान असतानाच्या त्याच्या आईच्या भूमिकेत चक्क पेनेलोपी क्रूज! पण या बाईच्या अभिनयक्षमतेविषयी शंका नव्हती. अप्रतिम सुंदर, सेक्सी कधी दिसायचं आणि एक गरीब, गांजलेली आई कधी दाखवायची, हे तिला कळतं.
बघा. आणि उच्च प्रतीचा कलास्वाद घ्या.
---***---
१९५१ सालची हंगेरी. दुसरं महायुद्ध संपून ‘पार्टी’चं राज्य सुरू आहे. शहरातल्या एका इमारतीतल्या एका घराचं दार ठोठावलं जातं आणि दोन साध्या कपड्यातले गुप्त पोलीस आत शिरतात. चौकशी सुरू होते आणि घरातल्या कोणालाही बाहेर पडणं अशक्य होतं. बाहेरच्या कोणाशी फोनवरही बोलणं अशक्य होतं. बाहेरच्या जगाशी संपर्कच संपतो. ‘हे दोन पहारेकरी कधी ना कधी झोपतील,’ ही आशा संपते, जेव्हा रात्री त्यांना मोकळं करून पहाऱ्याची रात्रपाळी करायला दुसरे दोघे येतात.
घरातल्या कोणाला बाहेर जाता येत नसलं, तरी ‘हे घर जगापासून तोडण्यात आलं आहे,’ अशी नोटीस प्रसृत झालेली नसते. त्यामुळे नवे लोक आत येत रहातात आणि तेसुद्धा अडकून बसतात.
कॅप्टिव म्हणजे बंदिवान. एका घरात - बंगल्यात नव्हे, तर शहरी इमारतीतल्या एका मोठ्याशा ब्लॉकमध्ये - बंद झालेल्या कुटुंबाची आणि त्यांच्याबरोबर अडकण्याची पाळी आलेल्या इतरांची ही कहाणी. नवरा, बायको, त्यांची दोन मुलं, त्यांच्या एका खोलीत रहाणारी भाडेकरू, सरकारी ऑफिसात काम करणारी एक बहीण, इमारतीचा केअरटेकर, आणखीही कोण कोण. पहारा देणारे एका वेळी दोघे. एक फोटो दाखवून ‘याला ओळखता का?’ विचारून सगळ्यांकडून नकार मिळवल्यावर स्वस्थपणे कसलीतरी वाट पहाणारे. त्यांना हवं त्याचा अंदाज घेऊन त्याचा खराखोटा सुगावा देऊ पहाणार्यांना मार खावा लागतो. पुढे काय होणार, याच्या तणावाखाली बाहेरून येऊन अडकलेले जास्त असतात; कुटुंबातले नवरा-बायको कमी. जणू त्यांना पुढचं माहीत असतं, किंवा जे होणार, त्याला तोंड देण्याची त्यांची मानसिक तयारी असते. दोन लहान मुलांना शाळेत न जावं लागण्याचा आनंद असला, तरी त्यांची आई त्यांना ‘होमवर्क’ देतच रहाते.
असा चित्रपट लांबला की कंटाळा येण्याची दाट शक्यता असते. तो न येण्यासाठी पात्रांमध्ये वैविध्य दाखवणे, लहान मुलांची निरागसता वापरणे, लहान मूल किंवा एखादी आकर्षक तरुणी आणि पहारा देणार्यांपैकी कुणी तरुण वा मोठा यांच्यातलं सफल-असफल प्रकरण, गंभीर रोगाने पीडित असलेल्याला औषध मिळण्यात अडचण येणे, वगैरे क्लृप्त्या वापरण्याची रीत आहे. इथे त्यातलं काही नाही, असं नाही. उदाहरणार्थ, अंगावर पिणारं बाळ असलेली एक तरुण आई बाळापासून तुटण्याच्या विचाराने वेडीपिशी होते. एक बाळ एका ‘पहारेकर्या’शी संवाद करू बघतं. पण यात कुठेही कृत्रिमता जाणवत नाही. संगीतही ताण सदा ठळक करत बसून नकोसं होत नाही. कंटाळा येत नाही.
यापेक्षा मोठं वैशिष्ट्य असं की या लोकांना कोंडून घालणारे सरळ सरळ दुष्ट, खलनायक दिसत नाहीत. त्यांच्या चांगल्या वागणुकीचा संशय वाटून वाढीव तणावनिर्मिती होत नाही. उलट बाजूने त्यांच्यातला कुणीतरी दयेने प्रेरित होऊन या लोकांची सुटका करणार, अशी आशाही निर्माण होत नाही. कोणाचं वागणं शूरवीर होत नाही. थोडक्यात, कम्युनिस्ट राजवटीत सर्वसामान्य लोकांचं मोकळं जगणं कसं पूर्णपणे शासनाधीन होतं आणि ती शासनचौकट कशी पोलादी होती, हेच स्पष्ट होत रहातं. तिथल्या जगातली जीवनावश्यक गोष्टींची टंचाई, सरकारी ऑफिसातल्या अधिकार्यांना असलेल्या निरंकुश निर्णयाधिकारामुळे ते कसे आपोआप जुलमी आणि अरेरावी होऊन गेले, हे समजतं. शहाणा, विचार करणारा या व्यवस्थेला सामील होऊ शकत नव्हताच; पार्टीचा प्रामाणिक सदस्य असलेला, स्वत:चं काम निष्ठेने करणारा, स्वत:ला या अधिकारांच्या उतरंडीत ‘वरचा’ मानणारा या सगळ्यांचा कसा हळू हळू भ्रमनिरास होत जातो, हेसुद्धा कळतं.
इतकं असूनही या अन्यायी व्यवस्थेच्या प्रतिनिधींना खलनायक म्हणता येत नाही! एकूण, ती व्यवस्था किती माणुसकीविरोधी होती, जवळच्या नात्यांत दुरावा आणणारी होती, याचं अनुभवाधिष्ठित, प्रत्ययकारी दर्शन होत जातं. बंद घराबाहेरच्या लोकांच्या प्रतिक्रियांमधून ‘तसल्या' जगातल्या समाजमूल्यांची झलकही समोर येते.
हा तोल सांभाळणं कठीण आहे. यात तणावाचा अतिरेक नाही, हिंसेचा नाही, मानसिक तणावामुळे बेताल होण्याचा नाही. एका बंद जागेत सारी गोष्ट घडत असताना सदा भिंती समोर येत असल्या तरी कॅमेरा कोंडलेपणावर अतिरेकी भर देत नाही. सदा चेहऱ्याच्या निकट येऊन भावनिक आंदोलनांवरदेखील भर देत नाही! हा चित्रपट म्हणजे त्या काळातल्या त्या देशांमधल्या जीवनाचं प्रतीकात्मक दर्शन आहे! चित्रपट संपतो तेव्हा काहीही नाट्यपूर्ण घडत नाही. तरी आपल्याला उभं राहून टाळ्या वाजवाव्याशा वाटतात!
(भाग ९)