रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल! - भाग १

Burey Din

१९ डिसेंबरला ऑगस्ट क्रांती मैदानात मी गेलो आणि कृतकृत्य झालो. स्वत:ला बाजूला ठेवून आपण देशासाठी काहीतरी करत आहोत आणि आपल्यासारखं वाटणारे अनेक लोक आपल्याबरोबर एकत्र जमले आहेत; ही भावना एका आयुष्यात दोनदा अनुभवायला मिळणे, हे दुर्मीळ भाग्य त्या दिवशी मला आणि माझ्यासारख्या इतरांना लाभलं. मोठ्या संख्येने लोक जमले पण त्यांना कुणी एक नेता नव्हता. ते देत होते त्या घोषणा कुठल्या राजकीय पक्षाच्या नव्हत्या. त्या कुण्या व्यावसायिक लेखकाने लिहून दिलेल्याही नव्हत्या. संपूर्णपणे अंत:प्रेरणेने लोक घोषणा देत आहेत आणि त्या आवाजाचे प्रतिध्वनी आपल्या आत उमटत आहेत, असं मला झालं. १९७७ नंतर दुसऱ्यांदा झालं. या उपकारांबद्दल मोदीजी आणि अमित शहा यांचा मी आभारी आहे.

१९७७ला चाळीस वर्षं उलटून गेली. चाळीस वर्षांत दोन पिढ्या बदलल्या. आताच्या घोषणा कितीतरी जास्त ‘स्मार्ट’ होत्या. ‘तरुण’ होत्या. कारण घोषणा देणारे तरुण होते. मुलगे होते, मुली होत्या. वातावरण चैतन्यमय होतं. भाषणं झाली, पण एकही वक्ता नामांकित, आपल्या वक्तृत्वाने श्रोत्यांवर मोहिनी टाकणारा नव्हता. तरीही सगळ्या वक्त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत होता. याचं कारण वक्त्यांमध्ये किंवा त्यांच्या भाषणांतल्या शब्दांमध्ये नव्हतं. वक्ता आणि समोरचा जनसमुदाय यांच्या हृदयात एकच भावना जोमदारपणे उसळण्यात ते कारण होतं.

देशप्रेम ही प्रदर्शन करण्यासारखी गोष्ट नव्हे; उलट, उठसूट देशप्रेमाचं प्रदर्शन करणाऱ्याची भावना संशयास्पद मानली पाहिजे. ‘मी लाच खात नाही,’ असं कुणी म्हणण्यात काही तथ्य आहे का? किंवा ‘मी बायकोला मारहाण करत नाही,’ असं एखाद्या नवऱ्याने म्हणून दाखवणे, हे लाजिरवाणं नाही का? तसंच. या गोष्टी गृहीत धरायच्या असतात. या गोष्टी करणारा पापी, गुन्हेगार असतो; न करणारा पुण्यवान, समाजोद्धारक नसतो. मी जेव्हा प्लास्टिकचा कचरा करत नाही, मी जेव्हा वाहतुकीचे नियम पाळतो, मी जेव्हा कामचुकारपणा न करता ज्यासाठी पगार मिळतो, ते काम इमानेइतबारे करतो, मी जेव्हा माल विकताना पक्की रिसीट देतो; तेव्हा तेव्हा मी देशाविषयीची कर्तव्यभावनाच व्यक्त करत असतो. मग मी राष्ट्रध्वजाला छाती पुढे काढून वंदन करत स्वत:चा फोटो नाही काढून घेतला तरी मी देशप्रेमीच असतो. आणि मी जेव्हा यातलं काही करण्यास चुकतो, तेव्हा तेव्हा मी माझ्या देशाप्रती असलेल्या कर्तव्याला चुकत असतो. मग मी कितीही उच्च रवात राष्ट्रगीत म्हणत असलो तरी.

देश, देशाचं भलं हा विषय कधीतरीच असा ऐरणीवर येतो. आणि आला की वय, लिंग, धर्म, भाषा कसल्या कसल्या भेदांना ओलांडून जनमनाचा ताबा घेतो. कधीतरी अशी वेळ येते की देशप्रेम ‘दाखवावं’ लागतं. कारण देश म्हणजे सगळ्या बाजूंनी कुंपण घातलेली जमीन मुळीच नव्हे. ‘देश’ म्हणजे देशातली माणसं. म्हणून तिथे जमलेल्यांच्या हाती देशाविषयीचं प्रेम व्यक्त करणारे फलक होते. संसदेने पास केलेले कायदे देशाच्या मूलभूत ओळखीवर घाला घालणारे असले तर त्यांना विरोध करणं हे प्रत्येक सुजाण नागरिकाचं कर्तव्य बनतं. कुणी म्हणतात, संसद ही लोकांनी रीतसर निवडून दिलेल्या प्रतिनिधींची बनलेली आहे; तेव्हा तिच्या ठरावांना विरोध करणं चुकीचं आहे. एक उदाहरण पाहू. २०१४ मध्ये रालोआचं सरकार केंद्रात राज्यावर आलं आणि त्यांनी एक वटहुकूम काढला. कोणता, आठवतंय? कोणाचीही जमीन शासन ‘राष्ट्रहितासाठी’ काढून घेऊ शकतं आणि नंतर ती जमीन कोणालाही देण्याचा शासनाला अधिकार असेल आणि त्या अधिकाराला किंवा जमिनीसाठी दिलेल्या भरपाईला कोणीही आव्हान देऊ शकणार नाही, अशा आशयाचा तो वटहुकूम होता. त्याचं विधेयक लोकसभेत मंजूरही झालं; पण राज्यसभेत त्याला कडाडून विरोध झाला आणि त्याचं कायद्यात रूपांतर होऊ शकलं नाही. लोकसभा ही लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची असते, राज्यसभा नसते. म्हणजे लोकप्रतिनिधींना हवा असलेला कायदा निर्माण होऊ शकला नाही. बरोबर? तसंच काहीसं यावेळी झालं. या वेळी दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत असल्याने कायदा तर निर्माण झाला; पण तो देशहिताच्या विरोधी आहे, असं ज्याला वाटतं, त्याने विरोध व्यक्त करायलाच हवा. असा विरोध यापूर्वी व्यक्त झाला आहे. या वेळी तर विरोध नोंदवणे फारच महत्त्वाचं होतं.

(भाग २)

field_vote: 
0
No votes yet

देशप्रेम ही प्रदर्शन करण्यासारखी गोष्ट नव्हे; उलट, उठसूट देशप्रेमाचं प्रदर्शन करणाऱ्याची भावना संशयास्पद मानली पाहिजे.

हे फारच आवडलं. संपूर्ण परिच्छेदच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+1

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लेख आवडला. खूप लोकांच्या मनात याच भावना असतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0