आमची मे महिन्याची सुट्टी

लहानपणी म्हणजे किशोर वयात वगैरे मला फार काँप्लेक्स आलेला. कसला, तर आमची आधीची पिढी सतत त्यांनी लहानपणी केलेल्या गमतीजमती, दंगा मस्ती, गलका, अश्या सुरेख आठवणी सांगायचे तसं आमच्याकडं पुढच्या पिढीला सांगायला काय वेगळं असणार असंच वाटायचं. म्हणजे काय तशी बोरींगच तर सुट्टी असते वगैरे वाटायचं. पण आता कळतंय आत्ताच्या मुलांना सांगायला पुष्कळ आहे. ते काही सांगायचं नाहीच पण आता मे महीना लागला, जरा जुनंच सगळं आठवायला लागलं.

आमचा मे महीना विशेष निराळा कधी असायचा नाही. मैत्रिणी सुट्टी लागली की गावाला जात, आजोळी, काकाकडे, आत्याकडे, मावशीकडे वगैरे. आमचा तो सगळाच प्रश्न निकालात निघालेला. आमच्या आजोळी काय जायला लागायचं नाही, आज्जीच आमच्याकडं असायची. मावशीकडे जाणं शक्य नसायचं कारण ती नोकरी करायची आणि तिच्याच मुली पाळणाघरात असायच्या, आत्यांचा प्रश्नच नाही त्या कोल्हापूरातच असतात. जगातल्या सर्वात बेस्ट आत्या आमच्या आहेत एकापेक्षा एक सुगरण आणि आमचे लाड करणाऱ्या समस्त भाचेमंडळ आमच्या सर्व आत्यांचं विशेषच लाडकं आहे, खेरीज आमच्या आत्या भारी भारी टीप्स देतात आम्हाला. 'बिग डील', ' लेट इट बी', 'व्हाॅटएव्हर' असा एकदम कूल ॲटीट्यूड ठेवणाऱ्याही आहेत, तर ते असो, मुद्दा तो नाहीचे. तर आमच्या आत्या कोल्हापूरातच असतात आणि परगावी असलेली एक आत्या कधी इकडं येत असे सुट्टीला किवा आम्ही क्वचित जात असू तिकडं. आणि काकांकडे जाण्याचा कायच संबंध नव्हता, आयुष्यभर शिवून घेतल्याप्रमाणे आम्ही एकत्रच असतो सारेच कोल्हापूरात. त्यामुळं सुट्टी म्हणून फार एक्साईट वगैरे व्हायचे नाही मी. हां, सुट्टीत एरवीपेक्षा जास्त धमाल असायची कारण आम्ही सगळीच पोरं एकत्र घरी असायचो. वाट्टेल ते खेळ खेळायचे, अंगणात दगड का माती पासून क्रिकेटपर्यंत आणि तगडानी बॅडमिंटनचं फूल उधळण्याचे खेळ, घरातच आणि घराबाहेर लपंडाव खेळायचो. लपंडावाचेही दोन प्रकार होते. एक साधा लपंडाव आणि दुसरा अंधारातला लपंडाव (इथं कृपा करून वाह्यात विचार आणू नयेत डोक्यात, मनात) म्हणजे काय तर माडीवरच्या तिनही खोल्या, माळा, पॅसेज, पत्रा सगळीकडं अंधार करायचा आणि मग त्यात लपंडाव. आमच्या त्या वरच्या दंग्यानी मावशी आणि काकू लोक हैराण होत असतं, खाली माती पडायची पण खपवून घेत बापडे. डबडा ऐसपैस, भोज्जा वगैरे आमचे मैदानी खेळ होते. तर नवा व्यापार, ल्यूडो, सापशिडी, बुद्धिबळ हे ही खेळ असत. पत्त्यांची तर काय बातच न्यारी होती. आमच्यात नियमच होता फक्त सुट्टीत पत्ते खेळायचे एरवी हात लावायचा नाही. मग भिकार सावकार पासून रमीपर्यंत सारे खेळ लहानपणीच शिकलो आम्ही. सात-आठ, पाच तिन दोन, सिक्रेट जोकर, मेंढी कोट, चॅलेंज, झब्बू, डाॅन्की मन्की, बदाम सात, लॅडीज, तिनशे चार, कॅनवेस्टा कितीतरी खेळ... आमची एक बहीण आहे लईच शौकीन आहे ती पत्त्यांची, नुसती शौकीनच नाही मास्टरपण आहे ती त्यात. एकदा झोपेतून उठल्या उठल्या पत्ते पिसल्याच्या आविर्भावात 'कोण कोण येतंय पत्ते खेळायला?' असं विचारली, आम्ही अजूनी ती आठवण काढून चिडवतो तिला. तर पत्ते आणि कॅरम आमचे बैठे खेळ. फार मज्जा येई. आमच्या सर्वात हुशार शेखरदादानी काहीवेळा नाटुकल्या बसवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही कारटी ऐकायचो नाहीत मग त्यानी नादच सोडला.

जयूदादा मुंबईहून आला की सगळी वरात घेऊन एक सिनेमा. तो कुठलाही सिनेमा असू शकत होता. यात आम्ही छोटा चेतन, बडे मिया छोटे मिया वगैरेही पाहीलेत. दिदी पुण्याहून आली की मज्जा असायची. दिदी सर्वात मोठी आणि चिनू सर्वात लहान दिदीच्या कडेवर वगैरे अशी आम्ही भावंडं बागेत, सिनेमाला वगैरे जाणार. मोठ्याच्या मोठ्या पातेल्यात फोडणीची, आणि अनेकवेळा बिन मसाल्याची मॅगी करून चक्क पंगतीत बसून,ताटल्या चाटून पुसून मॅगी हादडण्याचा कार्यक्रम होत असे.

रिझल्ट लागला की उत्तम मार्क मिळालेल्या मुलीला आणि मुलाला बाबा हिरोचा पेन देत. शेखरदादाला मिळालेला. मलाही मिळालेला. नंतर सायल्यापण मला एक हिरोपेन गिफ्ट आणलेला NCC कॅम्पाहून येताना. फार भारी वाटलेलं तेव्हा.

रिझल्टनंतर पेढे गिडे कार्यक्रम उरकून झाले की माई आत्याकडं आंब्याचा कार्यक्रम असे. ती तर बेस्ट मज्जा होती. आंबे धुवायचे दोघांनी, पुसायचे दोघा तिघांनी, त्याची देठं, चिक एका दोघांनी काढायचे, सोलायचे पिळायचं, कोयी साफ करायच्या. हे कोयी साफ करणं तर मला अजूनही जमत नाही आणि आमच्यातले बाकी लोक पांढरी स्वच्छ करतात कोय. त्यामुळं कोयी साफ करायचं काम मी कधीच केले नाही. सगळ्यांनी बसून जेवायचं आणि एरवी पुरुष लोक वाढायला नसायची आमच्यात पण आमरसाच्या दिवशी मात्र दादा लोक वाढायला असत.

सुट्टीतले दोन प्रकार मला फारच आवडायचे एक म्हणजे सायकल आणि दुसरं पोहायला जाणं. आमच्या घरी कुठल्याच मुलीला सायकल घेतली नाही कधी, कारण विचारल्यावर उत्तरही कधी मिळालं नाही. पण आम्ही अगाऊपणा करायचा तसा केलाच होता. निवृत्ती चौकात भाड्यानी सायकली मिळायच्या. दुपारी लवकर गेलं की टोबू सायकलपण मिळायची. आठ आणे आणि एक रूपया असं भाडं होतं. बहुतेकवेळा टोबू सायकल नसायचीच. पण एकदा आम्हाला मिळाली. आता आम्ही इतकीsssजणं एका तासात कशी विभागणी करणार एका सायकलीची पण आम्ही चालवायचो. नंतर चैतूदादाला सायकल घेतल्यावर गल्लीतून प्रत्येकानी हवा तेवढा वेळ सायकल चालवलीये, त्याच सायकलीच्या चाकात वर म्हंटल ती पत्तेवाली बहीण तिचा पाय अडकून फाटलेला. तो ही गोंधळ होताच.

आणि पोहायला जाणं हा अपरंपार आवडता कार्यक्रम होता. आत्याकडं रहायला जायचो आम्ही तेव्हा म्हणजे कोल्हापूरातच पण तरी तिच्याच घरी मुक्काम कारण तिचं घर रंकाळ्याजवळ आहे. मामांनीच आम्हाला सगळ्यांना पोहायला शिकवलंय, तरबेज केलंय. मी आता म्हणतेय पोहायला आवडतं पण तेव्हा तंतरली होती माझी. माझा तो किस्सा सांगून सगळं घर अजूनी हसतं... त्याचं झालं काय की मामा मला पोहायला घेऊन गेले. पाण्यात आधी पायऱ्यांवरून उतरले त्याची भीती नाही वाटली. नंतर उडी मारायला सांगितल्यावर जी घाबरले ती घाबरलेच. मी मामांना शपथा घालायला लागले, दुसरीतल्या मला वाटायचं शपथेसारखं शस्त्र नाही पण मामांपुढं ते फीकं पडणार हे मला काय माहीत! मी रडून दंगा केला, नाहीच उडी मारणार वगैरे म्हणून गळाच काढला, मामा तुम्हाला आईची शप्पथ आहे , तुमच्या आईची शप्पथ आहे वगैरे दंगा (फुल टू नौटंकी केलेली पण पोपट केलेला मामांनी)... मग आमच्या भाचीनी (दोनच वर्षानी लहाने ती माझ्याहून) उडी मारून दाखवली आणि तिच्याकडून इन्स्पायर वगैरे हून मीही उडी मारली ती मग नीटच पोहायला लागले. तास दोन तास पोहून आत्याकडं गेलं की आत्या ओट्यापुढं पोळ्या करत असायची आणि आम्ही सारीजणं ताटं हातात घेऊन तिच्या मागं लायनीत उभं असायचो. तवापोळी, कणीदार तूप, आत्याची स्पेशल चटणी, आमटी, ती आत्यानीच करावी. आहा! सुख... आणि भाजी, असं सगळं गरम गरम अन्न पोटात गेल्यावर. मामांनी फ्रिजमध्ये आईस्क्रिम करून ठेवलेलं असायचं, दुपारी त्यावर यथेच्छ ताव मारायचा. आमचे मामा आईस्क्रीम लईच बेस्ट करतात. मग संध्याकाळी खाली नाहीतर रंकाळ्यावर टाईमपास. आत्या राहते तो भाग मला चिंटूच्या काॅलनी सारखा वाटतो... तिथं आम्ही उन्ह उतरल्यावर उनाडक्या करत फिरायचो... एकदा तिथं लपंडाव खेळताना मी हरवले होते मुद्दामच, मी कधीच हरवले नव्हते, म्हणजे वेगळीचकडे गेले कुठतरी पण आपल्याला कोण शोधायला येणार नाही हे तेव्हाच समजल्यामुळं माझं मीच स्वतःला शोधून परत आलेले वाट शोधून...आणि मग कधीच हरवायचं नाही असं ठरवूनही हरवत गेले सगळीकडेच. ते असो... तर सुट्टीत चिडवा चिडवी, रूसवे फुगवे असायचे...पण मज्जा असायची... अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करायला लहानपणापासून शिकल्यामुळे सुट्टीही सुसह्य होऊन एन्जाॅय करायला जमत होतं.

उन्हाळ्यात सुटीत त्या लाकडी ड्रममधे केलेलं आईस्क्रिम खायचा योग येत असे. आमरस, वाळवणं याची चैन असे. दुपारी मोठ्या माणसांसारखं आपल्यालाही लोळायला मिळत असे. एकत्र जेवणं, खाणं, थेट्रात जाऊन सिनेमे बघणं, एकत्र बागांमधे जाणं तिथं भरपूर खेळणं, बॅटबाॅल घेऊन जाऊन तिथं क्रिकेट खेळणे, प्लास्टिकची तबकडी घेऊन त्यानं खेळणे, वाळूत खेळणे, हसत सुरु झालेल्या खेळाचा मधेच रागावणे, चिडवणे, भांडणे रडणे, चिडणे आणा परत खिदळणे असा छानपैकी ग्राफ असत असे. मग एखादा ग्रुप फोटो होतच असे. बागेतून निघताना भेळ, पाणीपुरी, असं काहीतरी भारीपैकी चटकमटक खाणं होत असे. मग परत खिदळत काहीसे दमलेले असलो तरी घरी जाऊन परत कायतर टाईमपास करायचाच हा बेत आखत घरी परतत असू. मग रात्रीच्यावेळी परत गप्पा, अंगणात नाहीतर शिवदत्तच्या पायऱ्यांवर बसून उशीरापर्यंत गप्पा मारत बसणं हे भारी असे.
आम्ही भावंडं आजही जमलो की खिदळणं, पत्ते, खादाडी हे होतंच. एकमेकांना आजही चिडवणं, दंगा करणं सुरुच असतंय.

ही सगळी मज्जा परत मिळावी असं वाटतं. मावशी असाव्यात असं वाटतं. या वाटण्याला तसा फार अर्थ नाही पण तरी वाटतंच.

~अवंती

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्त. आमचे सायकलचे दुकान बाबुजमाल. फोटो महावीर गार्डनचे वाटतायत.

- ओंकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0