थेरप्युटिक नेचर वॉक

आम्ही कॉलेजात होतो तेव्हाची गोष्ट. रविवारची सकाळ होती. मी पोहे खात न्यूझीलंडची कोणतीतरी वनडे मॅच बघत होतो एवढ्यात मह्या घरी आला.

"गॅव्हिन लार्सन सोड भेंजो, हे बघ काय," असं म्हणत तो बाजूला बसला आणि क्लासच्या बॅगेतनं बरीच चकाचक पॅम्प्लेट्स काढून त्यानी टीपॉयवर ठेवली. "माझ्या क्लासमधला समीर सुट्टीत इंग्लंडला गेला होता. तिकडे हॉटेलात रिसेप्शनला टुरिस्ट पॅम्प्लेट ठेवली होती ती सगळी उचलून आणली साल्यानी. मी म्हटलं मला दे. झेरॉक्स काढून उद्या परत द्यायच्या बोलीवर दिली."

"आता तू काय लोणचं घालणार त्यांचं?" मी पोह्यांचा बकाणा भरत बोललो.

"कधी लामांबरोबर चालण्याबद्दल ऐकलंयस का?" मह्या कधीपण ट्रॅक बदलतो तेव्हा कन्फ्यूज करतो.

"लामा म्हणजे ते तिबेटवाले ना? त्यांच्याबरोबर चालायचं म्हणजे काय? गिर्यारोहण?" मी विचारलं.

"ते नाही रे भेंजो. डबल एल वाले. उंटासारखे प्राणी असतात पण तेवढे उंच नाही - दक्षिण अमेरिकेतले," हे सांगतासांगता मह्यानी एक पॅम्प्लेट शोधून मला दिलं. तर इंग्लंडमधे त्या लामा प्राण्यांचे खाजगी पार्क आहेत. त्यांची लोकर काढून स्वेटर वगैरे करतात. पण साईड बिझनेस म्हणून टुरिस्ट लोकांना लामाबरोबर तासभर चालायची संधी देतात - काहीतरी तीसचाळीस पाउंड घेऊन. असं पार्कमधे लामाबरोबर चालून शांत वाटतं म्हणे.

"बरं मग?"

"सांगतो," मह्या सोफ्यावर मांडी घालून बसला आणि बोलू लागला.

मग पुढचे काही दिवस सेटिंग करून, दिवाळीची सुट्टी सुरू व्हायच्या जस्ट आधी आम्ही पॅम्प्लेट्स वाटली. "थेरप्युटिक नेचर वॉक" म्हणून. सगळी माहिती दिली होती आणि विहंगम वगैरे देखाव्याचा फोटोही टाकला होता.

चार दिवसांनी पहिलं बुकिंग आलं. आमच्या वर्गातला तुषार, त्याची मोठी बहीण अनघा आणि त्यांचे आईबाबा. शाळेत असताना अनघाताई मॉनिटर वगैरे असायची, आणि मह्या आणि मी दुसरीत असताना आम्हाला मारामारी केल्याबद्दल तिनं शाळेच्या कॉरिडॉरमधे अंगठे धरून उभं केलं होतं. सांगायची गोष्ट म्हणजे तेव्हापासून आम्ही दोघेही तिला थोडं घाबरतो - अगदी अजूनसुद्धा.

तर पुढच्या रविवारी सकाळी आम्ही सगळे स्टेशनला भेटलो आणि ट्रेननी वांगणीला गेलो. तिथे मह्याच्या काकांचं शेत आहे. तर दोन रिक्षा करून शेतात पोचलो आणि "थेरप्युटिक नेचर वॉक" सुरू केला. मह्याच्या काकांकडे लामा वगैरे नव्हता. मह्याच्या चुलतभावानी निवडलेली एक शांत म्हैस आणि दोन शेळ्या यांना घेऊन आम्ही चालायला निघालो. चुलतभावानी ऐन वेळी टांग दिल्यामुळे टूरचा गाईड मह्या होता. तुषारच्या बाबांनी म्हशीचं दावण धरलं होतं, आणि तुषारनी आणि अनघाताईनी एकेक शेळी पकडली होती.

मह्यानी आधी सांगितलेल्या नियमांप्रमाणे कोणी बोलायचं नव्हतं. निसर्गसौंदर्य बघत मनन-चिंतन करत शांत चालायचं होतं. म्हणून आम्ही सगळे तसे चालले होतो. शेताजवळची पायवाट वळणं घेत चालली होती आणि आम्हीसुद्धा तसेच संथपणे चाललो होतो. शेळ्या मधेच काहीतरी पानंफुलं खायला थांबत होत्या तसे आम्हीही थांबत होतो. म्हैस मात्र कुठेही न थांबता पुढेपुढे चालली होती. मग थोड्या वेळाने म्हैस, तुषारचे बाबा आणि मह्या बरेच पुढे गेले आणि दोन शेळ्या, अनघाताई, तुषार, त्याची आई आणि मी मागे राहिलो. सगळं शांत छान चाललं होतं.

एवढ्यात कुठून कोण जाणे एक भलाथोरला धनगरी कुत्रा आला आणि भुंकत आमच्यावर धावून आला. आधी तर मला तो शेळ्यांना खायला आलेला लांडगा वाटला होता, पण मग त्याच्या गळ्यातला पट्टा दिसला. मी त्याच्यावर ओरडलो तर माझ्या दिशेनी धावत आला. मी एक दगड उचलून जनरल फेकला तर तो अजूनच उखडला. तरी बरं दगड त्याला लागलापण नव्हता. तुषारनी शेळीचा दोर सोडला आणि तोपण दगड उचलून मला मदत करू लागला. तुषारची आई किंचाळत होती, आणि अनघाताई कुत्रा, तुषार, आणि मी तिघांकडे नापसंतीने पाहत आपल्या शेळीचा दोर घट्ट धरून उभी होती.

एवढ्यात हा गोंधळ ऐकून मह्या परत फिरून आमच्याकडे यायचा प्रयत्न करत होता. म्हशीला मात्र यात काहीच इंटरेस्ट नव्हता आणि ती परत फिरायला ढीम तयार नव्हती. तुषारच्या बाबांनी तिला परत फिरवायला एक रट्टा मारला तर ती शांत म्हैस दाव्याला हिसका देऊन पळाली. मग तुषारचे बाबा आणि मह्या धावत आमच्याकडे आले.

ही एक्स्ट्रा कुमक बघून कुत्रा बिचकला आणि जरा लांब राहून भुंकू लागला. या गोंधळात तुषारची शेळीसुद्धा कुठेतरी पळून गेली होती. पण जास्त विचार न करता आम्ही सगळ्या माणसांना पटकन काकांच्या फार्महाउसवर नेलं. तो प्रवास फारसा शांततापूर्ण नव्हता. तुषारचे आईबाबा आम्हाला ओरडत होते, तुषार मोठयाने न हसायचा प्रयत्न करत होता, आणि अनघाताई आपल्या शेळीला खेचत तरातरा चालली होती.

फार्महाऊसवर पोचल्यावर मह्याच्या काकीने चहा-नाश्ता दिला तेव्हा सगळे जरा शांत झाले. मग मह्या आणि त्याचा चुलतभाऊ पळून गेलेल्या म्हशीला आणि शेळीला शोधायला गेले. मला जाम ऑकवर्ड होत होतं, पण सुदैवाने अजून ओरडा बसला नाही. मग थोड्या वेळाने मह्या परतला आणि आम्ही सगळे परत घरी आलो.

ऑलरेडी दिलेले पैसे तुषारच्या बाबांनी परत मागितले नाहीत. झालेल्या गोंधळाबद्दलही त्यांच्या फॅमिलीने बाहेर कुठे सांगितलंही नाही. पोरांनी बिझनेसचा जेन्युईन प्रयत्न केला असं त्यांना वाटलं असेल. पण आम्ही "थेरप्युटिक नेचर वॉक"ची अजून बुकिंग्स घेतली नाहीत.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

मला आवडलं मार्केटिंग.
असल्या लेखांसाठीच ऐसीवर येतो.
मलाही एका कुत्ऱ्याने आणि एक महिन्याच्या वासराने नेचर वॉक रस्त्यावरून फरफरटत नेले आहे त्याची आठवण झाली. मालकांची करमणूक झाली.

माडावर चढायचे वर्कशॉप मह्या घेतो का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हैस हा प्राणी तसा नुसता पाहायलासुद्धा थेरप्युटिक आहे.

मात्र, आत्यंतिक मूडी आणि मनस्वी. त्यामुळे, त्याला धरून चालत जाणे तसे ट्रिकीच. कधी उधळेल, नेम नाही.

लामाचेसुद्धा तसेच. म्हणजे, एरवी प्रेमळ, गोग्गोड वगैरे असेलही, परंतु त्याला कशावरूनही तुमचा राग आला, तर सरळ तोंडावर थुंकतो. आणि, थुंकतो म्हणजे, त्या दिवशी त्याने जे काही खाऊन अर्धवट पचवून ठेवलेले असेल, ते सगळे तुमचे थोबाड रंगवते. (म्हणजे, असे ऐकलेले आहे.)

(बादवे, इंग्रजीत 'लामा' वगैरे ठीक आहे, परंतु स्पॅनिशात त्याचा उच्चार 'ल्यामा' किंवा 'य्यामा' असा व्हावा.)

(बाकी, तीसचाळीस पौण्ड म्हणजे अंमळ जास्तच होतात, नाही?)

पण तुमचा मह्या एकंदरीत गुणग्राहक म्हटला पाहिजे. बोले तो, चांगले कल्पनाबीज दिसले, की लगेच प्रयोग करून बघतो. (मग भले तो प्रयोग फसला, तरी बेहतर.) आंत्रप्रूनरशिप म्हणजे तरी दुसरे काय असते?

(शिवाय, लामाऐवजी म्हैस बोले तो ग्लोकलायझेशन म्हणता यावे काय?)

एकंदरीत, भारी डोके आहे. (पण तुमच्या त्या अनघाताई-छाप लोकांना हे कधी सुधरायचे नाही.)

(बादवे, अनघाताई यांच्याहून काही वर्षांनी मोठी तर मग यांच्या वर्गाला मॉनिटर कशी?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ल्यामा / य्यामा हा उच्चार माहीत नव्हता; पण ते बरेच झाले. नाहीतर गिर्यारोहण वगैरे लाईन सुचली नसती. Smile

आमच्या शाळेत हा एक प्रकार होता - चौथीची मुलं-मुली पहिली ते तिसरीच्या वर्गाचे (वर्ग सुरू होण्यापूर्वी आणि मधल्या सुट्टीत) मॉनिटर असायचे. त्यांना जवळपास सुल्तानासारख्या पॉवर होत्या. मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका आणि वर्गशिक्षिका यांच्याखालोखाल सर्वात जास्त खौफ असे तो अशा मोठ्या मॉनिटरचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ल्यामा / य्यामा हा उच्चार माहीत नव्हता; पण ते बरेच झाले. नाहीतर गिर्यारोहण वगैरे लाईन सुचली नसती. Smile

पॉइंट आहे! Smile

आमच्या शाळेत हा एक प्रकार होता - चौथीची मुलं-मुली पहिली ते तिसरीच्या वर्गाचे (वर्ग सुरू होण्यापूर्वी आणि मधल्या सुट्टीत) मॉनिटर असायचे.

आश्चर्य आहे. चौथीपर्यंत ज्या (मुलांच्या) शाळेत मी गेलो, तेथे तिसरीचौथीच्या वर्गातल्या मुलांनी काही विशेष शिक्षापात्र गैरवर्तन केले, तर त्यांना शिक्षा म्हणून पहिलीदुसरीच्या वर्गात बसायला पाठवले जायचे. एकंदरीत प्रकार मुलांमध्ये अत्यंत ह्युमिलिएटिंग म्हणून समजला जायचा. त्यामुळे, आमच्याकडल्या चौथीच्या एकाही मुलाने पहिली ते तिसरीच्या वर्गाचे मॉनिटरपद स्वखुशीने स्वीकारले नसते.

(एक तर ही तरी शिक्षा असायची, नाहीतर... आमच्या (मुलांच्या!) शाळेच्या मालमत्तेत एकच ठेवणीतला फ्रॉक होता. शिक्षाग्राही मुलास तो घालून शाळेच्या सर्व वर्गांतून फिरवून आणले जायचे. विकृत प्रकार होता. परंतु चालायचेच.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>>>म्हैस हा प्राणी तसा नुसता पाहायलासुद्धा थेरप्युटिक आहे. मात्र, आत्यंतिक मूडी आणि मनस्वी. >>>> ROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0