करोना साक्षात्कार

परवा, म्हणजे शुक्रवार दि. १९ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या लोकप्रभामध्ये माझा लेख छापून आला आहे. नाव आहे, ‘कोरोनाने हलवून बळकट केला देवाचा खुंटा’. हल्ली घरी पेपर येत नाही, तर पेपरवाल्याला ‘लोकप्रभा टाक,’ म्हणून कसं सांगणार? मग काल तो अंक आणायला नाक्यावरच्या पेपर स्टॉलवर गेलो. लोकप्रभा नाही मिळाला; पण लोकसत्ता घेऊन आलो. पुष्कळ दिवसांनी कागदावर पेपर वाचायची संधी साधली.

दोन गोष्टींचा साक्षात्कार झाला! एक, पेपर समोर दिसत रहातो. त्यातली अक्षरं, त्यामुळे शब्द आणि त्यामुळे काहीतरी विधानं मनात आपोआप घुसत रहातात. विचारांना चाळवतात. आणि मग वाचण्याची टोचणी लागते. ती टोचणी दडपायची की तिला प्रतिसाद देत पेपर वाचायचा, हे आपल्यावर अवलंबून. पण इ-पेपर किंवा नेटवर बातम्या वाचणं अगदी वेगळं. त्या अशा डोळ्यांवाटे मनात घुसून कटकट करत नाहीत. त्या वाचण्यासाठी बातम्यांबाबत ‘लगन’, बांधिलकी हवी. ती असेल तर वाचलं जाणारच.

टीव्ही अजिबात खोटा. कुठल्या बातम्या आपल्यापुढे मांडायच्या, हे कोणीतरी निवडणार आणि आपण त्याच्या निवडीवर विसंबणार, ही गोष्टच खोटी. आणि सगळं समोर ठेवून निवड आपल्यावर सोपवणारा चॅनेल कोणता? फार तर एनडीटीव्ही. पण तिथेही स्थानिक, देशी आणि विदेशी बातम्यांमध्ये चाळणी लागत असतेच.

थोड्याफार फरकाने हे पुस्तकं आणि नियतकालिकं यांच्या बाबतीतही खरं आहे. वाचन या क्रियेशी फार वरवर बांधिलकी असणाऱ्या मराठी वाचकांच्या बाबतीत तरी नक्कीच खरं आहे. त्यामुळे कोविडपश्चात काळात पुस्तकांचं, नियतकालिकांचं, दिवाळी अंकांचं काय होणार, हा एक मराठी संस्कृतीसाठी निर्वाणीचा म्हणावा असा गहन प्रश्न आहे. मराठी वाचकाला समोर न दिसणाऱ्या मजकुराकडे कसं आकर्षित करायचं, याची काहीतरी जबरी आयडिया काढावी लागेल. नाहीतर माझा लेख जसा कोणी न वाचण्याची आणि एक प्रकारे वाया जाण्याची शक्यता आहे, तसं इतर लेखकांचं होईल. ते कोणाला आवडेल?

‘‘आम्ही लोकप्रभा नेटवर जाऊन वाचतोच!’’ असं सांगणारे भेटले आणि माझं खोटं ठरलं, तर फार आनंद होईल!

दुसरा साक्षात्कार

अडीच महिन्यांपूर्वी लॉकडाउन झाला आणि आमच्याकडे पेपर यायचा बंद झाला. पहिले काही दिवस ज्याप्रमाणे सकाळी चहा पिताना टीव्ही लावून भारत, अमेरिका, ब्रिटन, वगैरे देशांमधली कोरोनाखबर उत्साहाने बघत होतो, त्याचप्रमाणे लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस यांचे पीडीएफही वाचत होतो. पण दोन्हींचा उत्साह लवकरच संपला. सोडून दिलं. बातम्या नकोत आणि लेख, संपादकीय, वगैरे ग्यानही नको.

अडीच महिन्यांनी काल पेपर घेऊन आलो आणि सुखाने वाचला. कागदावरचं वाचल्याचा (म्हातारा?) आनंद मनसोक्त उपभोगला. आणि काय प्रकारचं वाचणं हुकलं असेल, हे कळलं. एका दिवशी इतकं असणं योगायोग नसावा. दर शनिवारी (आणि रविवारी) असं असण्याची शक्यता आहे.

काय ते?

Alice by John Tenniel

एक, जयप्रकाश सावंतचं लिखाण नेहमीच उत्तम माहिती देणारं आणि रंजक असतं. या अंकात त्याने ‘ॲलिस इन वंडरलँड’मधली चित्रं आणि त्या पुस्तकाची भाषांतरं याविषयी लिहिलं आहे. इंग्रजी भाषेतल्या माझ्या आवडत्या पहिल्या तीन पुस्तकांमध्ये जी पंधरावीस पुस्तकं येतात, त्यात हे आहे. दर वेळी वाचताना काहीतरी नवीन सापडतं. दर वेळी शरीर हलकं होऊन तरंगतं आहे, असं सुख मिळतं. माझ्याकडे तीन कॉप्या होत्या. वेगवेगळी चित्रं असलेल्या. एका कॉपीत खुद्द लेखक चार्ल्स डॉजसन ऊर्फ लुई कॅरॉल यानेच काढलेली चित्रं होती. यात भाषेच्या इतक्या गंमती आहेत की याचं भाषांतर कसं करणार, हा प्रश्न मला पडला. जयप्रकाश सांगतो की मराठी भाषांतरं अनेक झालीत! नारायण वामन टिळक ते मित्र प्रणव सखदेव यांनी केलीत. वाटेत भाषांतराचा वासही येऊ न देणारे, निरागसतेचा ग्रेट सेन्स असणारे भा रा भागवत. चित्र काढणाऱ्यांच्यात चक्क द ग गोडसे. च्यायला. ॲलिसवर माझ्याप्रमाणे बरेच भापलेत की. आय ॲम इन गुड कंपनी!

लुई कॅरॉल हा गणिती होता. ॲलिस वाचताना मला जाणवलं की यातली कल्पनाशक्ती गणिती आहे. म्हणजे काय, हे मला तेव्हा सांगता आलं नसतं आणि आताही येणार नाही. पण मनाशी कुठेतरी खूणगाठ मारली की कधीतरी यातलं ‘गणित’ शोधायचं. बघू.

नागड्या ॲलिसचा एक विडंबनरूपी चक्क चावट लघुचित्रपट बघायला मिळाला नेटवर. त्याचं नावगाव काहीच लक्षात नाही. पण प्रेमाने बघितला. डबल सुख!

पुढे. दोन, कुबेरांचा शनिवारचा, संपादकीयाच्या खालचा लेख: ‘त्यात काय सांगायचं?

डॉक्युमेंटेशन या विषयाला आपण इतकं कमी महत्त्व का देतो, समजत नाही. आमच्या एस्सेसीच्या वर्गाचं गेटटुगेदर होतं तेव्हा काही डॉक्टरांचं संभाषण माझ्या कानावर पडलं. तोवर सगळे सीनीयर झालेले. अनेक वर्षांची प्रॅक्टिस अनुभवात मुरवलेले. त्यांच्या बोलण्यात मुद्दा असा होता, की पाठ्यपुस्तकात जे दिलं आहे, त्यापेक्षा वेगळी लक्षणं आढळतात. त्याचप्रमाणे पुस्तकातल्या डोसांपेक्षा वेगळे डोस जास्त चांगलं काम करतात. मला सुचलं, मेडिकलची बहुतेक पाठ्यपुस्तकं युरोप-अमेरिकेतली. तिथल्या डॉक्टरांनी त्यांच्यासमोर आलेल्या रुग्णांच्या आणि रोगांच्या अनुभवावरून लिहिलेली. भारतात माणसं वेगळी, हवामान वेगळं, आहाराच्या सवयी वेगळ्या. तेव्हा लक्षणं आणि उपचार यांच्यात अंतर निघालं तर नवल नाही. मी दोन वर्षं अभय बंग यांच्या ‘सर्च’ या संस्थेत होतो. अभय बंग यांच्याइतका वैज्ञानिक बुद्धीचा माणूस तोवर मी पाहिलेला नव्हता. तिथल्या ओपीडीत येणाऱ्यांकडून नियमित मिळणाऱ्या माहितीवरून, गावोगाव हिंडून सर्च पद्धतशीरपणे, म्हणजे विशिष्ट रोख ठेवून माहिती गोळा करत असे. त्याच्या काटेकोर विश्लेषणातून यथावकाश रिसर्च पेपर तयार होत असे. मी मित्रांना म्हणालो, तुमचे अनुभव तुम्ही डॉक्युमेंट का करत नाही? भारतीय वैद्यकालाच नाही, तर एकूण वैद्यकशास्त्राला ते योगदान ठरेल.

नाही, कोणीही रस दाखवला नाही. (याला खूप वर्षं झाली. परिस्थिती बदलली असेल तर कृपया सांगावं. आनंदाने मत बदलीन.)

तिसरं. ‘तिचं निरुद्देश भटकणं’ – प्रज्ञा शिदोरे. मी तसा देशभर बऱ्यापैकी फिरलो आहे. आणि मला ‘प्रेक्षणीय स्थळं’ बघत फिरायला मुळीच आवडत नाही. तिथले बाजार पहावेत, कुणी भेटलं तर गप्पा माराव्यात. जमलं तर कुणाच्या घरी जावं. हे पाहिलं, ते पाहिलं आणि जिकडे तिकडे सेल्फ्या काढल्या की झालं? हॅ! शहर ही वस्तू मला पसंत असण्याचं हे एक कारण आहे: ऐन गर्दीत तुम्ही एकटे! अनॉनिमिटीसारखी मजेदार गोष्ट नाही! रात्रीबेरात्री फिरण्यासारखं तर दुसरं सुख नाही. वेगळं दिसतं जग. जंगलात चंद्रप्रकाश सगळ्याला भुताटकीची फूस देतो आणि शहरात रस्ते अनोळखी होतात. बायकांना हे सुख घेता येत नाही, याचं फार दु:ख व्हायचं मला. याचबद्दल आहे हा लेख. वाचाच.

तर खाली उतरून लोकसत्ता पेपर आणला नसता, तर हे मिळालं नसतं. मरो तो कोरोना!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet