बदल - शिल्पा केळकर

बदल
शिल्पा केळकर

कोरी बुश, देश चालवण्याचा हक्क हा परंपरेनं चालत आलेल्या काही मर्यादित लोकांचा नसून ती लायकी असणाऱ्या जनसामान्यांचाही आहे, हे सिद्ध करून दाखवण्यासाठी लढणारी धडाडीची स्त्री. तिने मागच्या आठवड्यात मिसूरी राज्यातल्या एका काँग्रेशनल भागातली डेमोक्रॅटिक काँग्रेसवूमनसाठीची जागा प्रायमरी निवडणुकीत जिंकली. ही घटना घडली मिसूरी राज्यात, जे मी राहते त्या अरिझोनापासून बरेच लांब आहे. मात्र या घटनेचे पडसाद माझ्या घरात उमटले. इतकेच नाही, तर मला माझ्या मुलीचा, अनुकाचा, अतिशय अभिमान वाटावा अशी ही घटना ठरली.

अनुका उपाध्ये
अनुका उपाध्ये

खरं तर मागच्या वर्षी जेंव्हा माझ्या मुलीनं जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धोरण-नीती असे विषय तिच्या पुढच्या शिक्षणासाठी निवडले त्या वेळी मी थोडी नाराज झाले होते. त्याचं काय कारण असावं बरं, याचा मी विचार करू लागले. मी ज्या वातावरणात वाढले त्याचा हा परिणाम असावा का? आपल्या मुलांनी पुढे काय शिकावं याचा निर्णय २५-३० वर्षांपूर्वी कायमच आणि आताही बरेचदा पालकच घेतात, हे चित्र भारतात दिसते. शिवाय कुठलीही जास्त न चोखाळलेली वाट धरायला तर आपणच धजावतच नाही. हमखास नोकरी मिळणारी करिअर आणि आपल्या सोईचे रस्तेच पत्करलेले आपण पाहात आलो आहोत. आपल्या मुलीने तसेच काहीसे करावे असे कुठेतरी खोलवर मला वाटत होते का?

की त्यासोबतच मी मूळची इथली नसलेली, आणि स्थलांतरित होऊन इथे रुजलेली नागरीक आहे ह्याच्याशी त्याचा संबंध असावा? इथे जसजशी रुळू लागले तसतसे लक्षात येऊ लागले की, कुठल्याही बाहेरच्या देशातून येऊन, इथले नागरिकत्व घेतलेले लोक स्थानिक राजकारणापासून चार हात लांबच असतात. असं का असावं बरं? एक तर इथली पद्धत कशी चालते याबद्दलची अनभिज्ञता हे एक कारण असावे. पण ते समजून घेतले तरीही "हे काम आपलं नव्हे, दुसरं कोणीतरी हे करेल आणि सर्वकाही ठीक चालेल," अशी एक त्रयस्थपणाची भावना असते, हेही मला जाणवले होते. मात्र ते फक्त मलाच नाही तर माझ्या मुलीच्याही लक्षात आले आहे, हे मला चारपाच वर्षांपूर्वी कळले.

शनिवार-रविवारी नेहमीप्रमाणे पॉटलक डिनर पार्टी करून आम्ही घरी येत होतो. सर्वसामान्यपणे असे सगळे एकत्र भेटले की मुलं एका खोलीत टीव्ही पाहात आणि सगळे आईबाबा भारतातले - इथले राजकारण, सिनेमे, क्रिकेट याविषयी गप्पा मारत दिवाणखान्यात असे चित्र असते. गाडीतून परतीच्या वाटेवर असताना माझ्या मुलीनं माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती केली -

तुम्ही सगळे इथले नागरिक आहात, तरीही इथल्या राजकारणात सक्रिय भाग घेणे, आपल्याला हव्या असलेल्या उमेदवाराला मदत करणे, त्याच्यासाठी निधी उभा करणे अशा गोष्टी तुम्ही का करत नाही?

तुम्ही त्या बाबतीत काहीच करत नाही पण सगळे जेंव्हा इथल्या किंवा भारतातल्या राजकीय/सामाजिक परिस्थितीला नावं ठेवता/नीट चालत नाही म्हणता तेंव्हा तुम्ही नक्की कुणाला दोष देत आहात, असे तुम्हाला वाटते?

आपणच जर उदासीन राहिलो तर गोष्टी कशा बदलतील, आणि सुधारणा कशी होईल?

तिच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर माझ्यापाशी नव्हतं.

मात्र तिच्या या प्रश्नांनी नकळत माझ्यात काही मूलभूत बदल घडवले गेल्या काही वर्षात, जे माझ्या लक्षातही आले नाहीत. मी इथली निवडणूक पद्धत कशी चालते, स्थानिक निवडणुकांमधले उमेदवार कोण असतात, इथली इलेक्टोरल सिस्टिम म्हणजे काय हे हळूहळू नीट समजावून घेतले. तिचे या विषयावरचे निबंध आवडीने वाचले. सेमिनार्सची प्रॅक्टिस तिच्याकडून न कंटाळता करून घेतली. तिच्याबरोबर या विषयावरच्या डॉक्युमेंटरीज आवडीने बघितल्या आणि एकत्र हसलो/रडलो.

अनुकानं बऱ्याच लहानपणी डेमोक्रॅटिक पक्षाच्या ऑफिसमध्ये व्हॉलंटिअर म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर अरिझोनाच्या गव्हर्नरसाठी उभ्या असलेल्या उमेदवाराच्या निवडणुकीसाठी तिने काम केले. त्या टीममध्ये ती वयाने सगळ्यात लहान होती. निधी उभा करण्याच्या एका कार्यक्रमात गव्हर्नरच्या जागेसाठी उभ्या असलेल्या उमेदवाराने अनुकाचे आवर्जून नाव घेतले. तो हेही म्हणला की आपल्या देशाच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल मला आशा वाटत राहील जोवर अनुकासारखी वयाने लहान असलेली मुले अशी पुढे येत राहतील.

गेले दोन महिने अनुकाने कोरी बुशच्या निवडणुकीसाठी काम केलं. कोरी बुश ही एक मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेली आणि अतिशय हालात काही दिवस काढून आयुष्याने दिलेले प्रत्येक स्वरूपाचे दान स्वीकारत आलेली बाई आहे. तिच्या आयुष्याची कहाणी ऐकताना आपल्या सरळमार्गी आयुष्याची किंमत कळते.

कुठल्याच प्रकारचे मोठे देणगीदार तिच्या पाठीशी नसतानादेखील ती या निवडणुकीत जिद्दीने उभी राहिली. मतदान अगदी तोंडावर आलेले असताना शेवटचे काही दिवस अनुकाने तिच्यासाठी बरंच काम केलं. बरीच आकडेवारी काढून तिने कुणाला फोन करावेत जेणेकरून तिला डोनेशन मिळेल आणि एक तरी जाहिरात टीव्हीवर लावता येईल यासाठी मदत केली. मी तिच्या रूममध्ये जाई तर ती कोरी बुशबरोबर व्हिडीओ कॉलवर असे. आता पुढे काय करायचे यावर त्यांची चर्चा सुरू असे. मी त्यांचं बोलणं आश्चर्यचकित होऊन ऐकलं. निवडणुकीसाठी उभं रहाणं आणि ती जिंकणं हे काही ऐरागैऱ्याचं काम नव्हे हे नक्कीच!!

कोरी बुश
कोरी बुश

आता तिची नोव्हेंबरमधल्या निवडणुकीतली उमेदवारी पक्की झाली. आणि ती नक्कीच काँग्रेसवूमन होण्याच्या मार्गावर आहे.

जगात तर राहूच दे, पण कुठलाही बदल करणं, घडवून आणणं किती अवघड असतं! साधं रोजच्या जगण्यातदेखील आपापल्या रुळलेल्या मार्गावरून जराही इकडचं तिकडे झालेलं आपल्याला खपत नाही आणि मानवतही नाही. बदल करणं आपल्या जरी जमलं तरी ते इतकं क्षुल्लक असेल असं वाटतं, त्यामुळे त्यासाठी कष्ट घेणेही आपण टाळतो. पण जे काही होईल ते होईल आणि ते कितीही लहान मोठे आहे याकडे दुर्लक्ष करून किंवा त्याची अपेक्षा न ठेवता आपण गोष्टी करत राहाव्यात खरे तर. जगातल्या किंवा कुठल्याच लहानमोठ्या समस्या डिनर पार्टीमध्ये नुसत्या चर्चा करून सुटत नाहीत; तर त्यासाठी जमेल तितका आपला खारीचा वाटा प्रत्येकाने उचलावा हेच तर अनुका मला ते सगळे प्रश्न विचारून सांगू इच्छित होती!

“We but mirror the world. All the tendencies present in the outer world are to be found in the world of our body. If we could change ourselves, the tendencies in the world would also change. As a man changes his own nature, so does the attitude of the world change towards him. This is the divine mystery supreme. A wonderful thing it is and the source of our happiness. We need not wait to see what others do.” – Mahatma Gandhi.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

तुम्ही सगळे इथले नागरिक आहात, तरीही इथल्या राजकारणात सक्रिय भाग घेणे, आपल्याला हव्या असलेल्या उमेदवाराला मदत करणे, त्याच्यासाठी निधी उभा करणे अशा गोष्टी तुम्ही का करत नाही?
तुम्ही त्या बाबतीत काहीच करत नाही पण सगळे जेंव्हा इथल्या किंवा भारतातल्या राजकीय/सामाजिक परिस्थितीला नावं ठेवता/नीट चालत नाही म्हणता तेंव्हा तुम्ही नक्की कुणाला दोष देत आहात, असे तुम्हाला वाटते?
आपणच जर उदासीन राहिलो तर गोष्टी कशा बदलतील, आणि सुधारणा कशी होईल?

+१

मुलीच्या विचारांत एवढी स्पष्टता आहे आणि तुम्ही तिला त्यासाठी प्रोत्साहन देता ह्याबद्दल दोघींचं कौतुक वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चांगला लेख. कोरी बुशबद्दल बरंच कौतुक ऐकलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. तरुण पिढी खूप सजग आहे. They definately take up a cause, take up a firm stand. अनुकाचे कौतुक आहेच पण तिला योग्य रीतीने वाढवल्याबद्दल आपलेही अभिनंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फार सुंदर आणि अतिशय मार्मिक. लोकांना साध्या गोष्टींच्या बाबतीत त्रागा करताना पाहतो परंतु खरे तर त्यावरचे उपाय अगदी साधे असूनही दुसरा कुणीतरी करेल या कल्पनेने केवळ तक्रार करत राहणे हेच सोपे मानले जाते. शिवाजी जन्मास यावा परंतु शेजाऱ्याच्या घरी!
अनुकाला मी छान ओळखतो, तिच्याशी ती लहान असताना गप्पा मारल्या होत्या आणि मनातल्या मनात खजील झालो होतो कि अशी प्रगल्भता आपल्याकडे कशी नव्हती या वयात?अनुकाने प्रवाहपतित न होता हा मार्ग निवडला याबद्दल तिच्या आई वडिलांचे अभिनंदन. नवीन पिढीकडून बरेच काही शिकता येते!
या वयात श्रीमती बुशशी इतक्या जवळून संवाद साधता येतोय यात तिचे कौतुक आहेच परंतु तिच्या लहान वयाकडे न पाहता तिच्यातल्या गुणांकडे पाहणाऱ्या बुश बाईंचे देखील आहे. आणि त्याहून जास्त अशी व्यवस्था (सिस्टिम) असलेल्या अमेरिका या देशाचे सुद्धा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी सरसकटीकरण करता येणार नाही पण अमेरिकेत गेलेले बहुसंख्य सुशिक्षित भारतीय लोक, हे तिथल्या सामान्य जनतेपेक्षा जास्त हुशार असतात. जर त्यांनी तिथल्या राजकारणात ॲक्टिव्ह भाग घेतला तर तिथे बरेच बदल होऊ शकतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

kamala harris

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.