क्वारंटाईन सेंटरमधून... (भाग २) - प्रियांका तुपे

क्वारंटाईन सेंटरमधून... (भाग २)
प्रियांका तुपे

काही दिवसांपूर्वी मी क्वारंटाईन सेंटरमधल्या अन्नाच्या नासाडीबद्दल इथे लिहिलं होतं, त्याचं पुढे काय झालं हे शेअर करावंसं वाटलं म्हणून आता हे लिहितेय.

Food Plates

तर मी पोस्ट लिहिली होती, त्याचदिवशी संध्याकाळी सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मी राहत असलेल्या क्वारंटाईन सेंटरमधल्या कर्मचाऱ्यांशी मी बोलले. काही तरी व्यवस्था करावी पण इतकं अन्न वाया जाऊ देऊ नये, असं सांगितलं. आपल्या ग्रुपमध्येच कुणी तरी मला रॉबिनहुड आर्मीची (जे समारंभातलं वगैरे उरलेलं खाण्यायोग्य अन्न घेऊन जाऊन गरजूना देतात) माहिती आणि फोन नंबर दिले होते. तो पर्याय तिथल्या कर्मचाऱ्यांना सुचवावासा वाटला, पण विलगीकरण कक्षातलं जेवण (पाकीटबंद असलं तरी) बाहेर देणं आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही, अशी महत्त्वाची माहिती चिन्मय दामले यांनी दिली.

मग शेवटी दुसऱ्या दिवशी त्या कर्मचाऱ्यांना मी सुचवलं की तुम्ही एखादा माणूस रोज दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी काउंटरजवळ थोडा वेळ उभा ठेवा. किती माणसं आहेत, त्यानुसारच गाडीतून जेवणाची पाकिटं बाहेर काढा. सगळ्यांनी जेवण घेऊन झाल्यानंतर अंदाजाने थोडी पाकिटं एक्स्ट्रा काढून ठेवा. आणि ही सूचना उपयुक्त ठरली असं वाटतं. कारण अन्नाची नासाडी बऱ्यापैकी थांबली. पूर्वी एका जेवणाच्या वेळी किमान पन्नास साठ पाकिटं वाया जाताना दिसायची, तसं नंतर झालं नाही..दुसऱ्याच दिवसापासून सगळ्यांच्या जेवणानंतर आठ- दहा पाकिटं एक्स्ट्रा ठेवलेली दिसायची, टेबलवर. ती तेवढी वाया जायची. पण त्याला इलाज नसावा असं वाटतं, कारण थोडा बफर साठा ठेवणं ही अशा आपत्ती काळातली महत्त्वाची गोष्ट असते, कुणी आयत्यावेळी आलं तर उपाशी रहायला नको, हेही पाहणं महत्त्वाचं आहे. पण दिवसाकाठी शंभर-एकशेवीस अन्नाची पाकिटं वाया जात होती, ते प्रमाण दहा-वीस पाकिटांवर आलं, ही गोष्टही खूप महत्त्वाची वाटते मला. पण यात माझ्या एकटीचं काही श्रेय नाही,कारण दुसऱ्या दिवशी मी पुन्हा कर्मचाऱ्यांशी बोलायला गेले होते, तेव्हा माझ्या व्यतिरिक्त आणखी एक काका त्यांच्याशी अन्नाच्या नासाडीबद्दलच बोलत होते. त्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांनी हा मुद्दा गंभीरपणे घेतला असावा.

दुसरी गोष्ट म्हणजे चिन्मय दामले यांनी सांगितलं होतं की त्यांच्या ग्रुपमध्ये - जो विविध क्वारंटाइन सेंटरसोबत अन्न वाटपाचं काम करतो... तिथे ते या मुद्द्यावर चर्चा करतील... कदाचित त्यांनी ती केली असावी, आणि तिथूनही काही फीडबॅक कदाचित आमच्या क्वारंटाईन सेंटरला दिला गेला असावा. अशा काही कलेक्टीव प्रयत्नांचा परिणाम म्हणून अन्नाची नासाडी लक्षणीय प्रमाणात कमी झाली, याचा आनंद वाटतो.

बाकी माझी तब्येत उत्तम असून मी काही दिवसांपूर्वीच पूर्ण बरी होऊन माझ्या घरीसुद्धा आले. तुम्ही सगळ्यांनी तब्येतीसाठी शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल तुमची आभारी आहे.

पोस्ट खूप लांबली तरी आपलं अन्नग्रहण आणि सफाई कर्मचारी यांच्या संदर्भात काही मुद्दे महत्त्वाचे आहेत.

१. माझी रूममेट दिवसातून चारवेळा हरिपाठ भजनं करायची, पण जेवण झाल्यानंतर आपला रिकामा ट्रे त्यावरचं झाकण नीट लावून नीट कचऱ्याच्या डब्यात टाकावा, हे तिला समजत नव्हतं. तिच्या अतिआस्तिक स्वभावाला जज करण्याचं काहीच कारण नाही. पण मी तिला हे सांगितलं की प्लिज ट्रेवरचं झाकण नीट लावून तो ट्रे कचऱ्याच्या 'डब्यातच' टाकला पाहिजे, जेवताना आपली सलायवा त्यात मिसळली जाते. त्याचे काही अदृश्य कण ट्रेला लागलेले असू शकतात. आपण ट्रे बाहेर ठेवले तर सफाई कर्मचाऱ्यांना ते हाताने उचलून त्यांच्या मोठ्या कचऱ्याच्या डब्यात टाकावे लागतात. आपणच सगळं नीट कचऱ्याच्या डब्यात टाकलं तर ते लोक थेट तो डबा उचलून त्यांच्या मोठ्या कंटेनरमध्ये रिकामा करू शकतात. त्यांना आपल्या ट्रेजला थेट हात लावावा लागत नाही...पण त्या बाईंनी ऐकणारच नाही, असा चंग बांधला होता, त्यामुळे त्या आणि तिथले अनेक जण कचऱ्याचा डबा ही जणू शोभेची वस्तू आहे, असं समजूनच दहा दिवस वागले. तरीही एकाही सफाई कर्मचाऱ्याने याबाबत तक्रार केली नाही की कुणी उद्दामपणे वागलं नाही, हे त्यांचे खरं तर मोठे उपकारच आहेत. अशा लोकांमुळे, डॉक्टर्समुळे, इतर कर्मचाऱ्यांमुळे, विज्ञानामुळे आपण बरे होत आहोत, तेव्हा आपली भूमिका त्यांना मदतीची किंवा त्यांचा त्रास न वाढवण्याची असली पाहिजे...ते सोडून कचरा कुठेही टाकायचा आणि मग देवाचा धावा करायचा, हा दांभिकपणा आहे.

२. दुसरा मुद्दा उपासाचा. सध्या श्रावण सुरू आहे. अनेकांचे अनेक उपास असतात, ठीक, ज्याच्या त्याच्या श्रद्धा-अंधश्रद्धेचा प्रश्न. पण किमान आजारी असल्यावर तरी उपास करू नयेत, भरपूर औषधं असतात, त्याने पोटात गरम पडू शकतं, अशक्तपणा, एसिडिटी वगैरे कशाची पर्वा अनेकींनी केली नाही, उपास ठेवलेच. दर सोमवारी त्यामुळेच सेंटरमध्ये नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी यायची. अशा मोठ्या संसर्गजन्य आजारात सगळी व्यवस्था दिवसरात्र काम करत असते, किमान अशावेळी तरी आपण आपल्या उपासतापासादी विशेष अपेक्षांचा भार त्यांच्यावर टाकू नये. तरी हा एक विचित्र अनुभव आलाच.

३. अनेक जण सेंटरमध्ये लावलेल्या पोस्टर्सवरून दुकानाच्या नंबरवर फोन करून फरसाण, वेफर्स, चकल्या इ.इ. मागवायचे. पुन्हा इथे त्यांना जज करण्याचा प्रश्न नाही, मला स्वतःलाही चमचमीत खायला आवडतं.. शिवाय आजारपणात तोंडाची चव जाते, त्यामुळे एखादवेळी असं खाण्याची इच्छा होऊ शकते, हेही मान्य आहेच. पण दहा दिवस तरी आपण तोंडावर ताबा ठेवला तर काही बिघडत नाही. चांगला आहार, फळं खाणं गरजेचं आहे. आणि इतके जण हे सगळं मागवायचे आणि त्यांच्याशी त्या दुकानातल्या पोऱ्याचा संपर्क यायचा... की मला वाटून गेलं, त्या पोराला नक्कीच संसर्ग होईल.

एकूण काय तर सार्वजनिक व्यवस्थेवर जेव्हा आपण अवलंबुन असतो तेव्हाही आणि नसतो तेव्हाही आपल्याला आणि इतरांना त्रास होऊ नये, यासाठी काही बेसिक नियम पाळावेत'च' असं मला वाटतं. प्रत्येक जण थोडाशा जागरूकतेने वागला तर आपण मनुष्यबळापासून अनेक रिसोर्सेस योग्य रीतीने, अधिक कार्यक्षमतेने वापरू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा महामारीच्या काळात सफाई कर्मचाऱ्यांसारखे जे लोक आधीच हाय रिस्क गटात आहेत, त्यांच्याबद्दल थोडी तरी एम्पथी बाळगून त्यांना सहकार्य केलं पाहिजे.

--
प्रियांका तुपे पत्रकार आहेत.
(सौजन्य : म्रिन)

field_vote: 
0
No votes yet

पण दिवसाकाठी शंभर-एकशेवीस अन्नाची पाकिटं वाया जात होती, ते प्रमाण दहा-वीस पाकिटांवर आलं

उत्तम! फारच छान वाटलं हे वाचून.

बाकी माझी तब्येत उत्तम असून मी काही दिवसांपूर्वीच पूर्ण बरी होऊन माझ्या घरीसुद्धा आले. तुम्ही सगळ्यांनी तब्येतीसाठी शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल तुमची आभारी आहे.

हेच वाक्य रिपीट वाचावे.

पण त्या बाईंनी ऐकणारच नाही, असा चंग बांधला होता, त्यामुळे त्या आणि तिथले अनेक जण कचऱ्याचा डबा ही जणू शोभेची वस्तू आहे, असं समजूनच दहा दिवस वागले.

फकोल इडियट्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि ही सूचना उपयुक्त ठरली असं वाटतं. कारण अन्नाची नासाडी बऱ्यापैकी थांबली. पूर्वी एका जेवणाच्या वेळी किमान पन्नास साठ पाकिटं वाया जाताना दिसायची, तसं नंतर झालं नाही..दुसऱ्याच दिवसापासून सगळ्यांच्या जेवणानंतर आठ- दहा पाकिटं एक्स्ट्रा ठेवलेली दिसायची, टेबलवर. ती तेवढी वाया जायची.

पण दिवसाकाठी शंभर-एकशेवीस अन्नाची पाकिटं वाया जात होती, ते प्रमाण दहा-वीस पाकिटांवर आलं, ही गोष्टही खूप महत्त्वाची वाटते मला.

नाही म्हणजे, अन्नाच्या नासाडीचे प्रमाण जर खरोखरच मोठ्या प्रमाणावर कमी झाले असेल, तर चांगलेच आहे, परंतु...

लाँग टेलपाइप थियरी (का कोण जाणे, परंतु) लक्षात येते.

बोले तो, केंद्रावर गरज नसलेली अन्नाची पाकिटे न उतरवून घेऊन केंद्रात होणारी अन्नाची नासाडी कमी झाली, ते ठीकच. परंतु, त्या उतरवून न घेतलेल्या अन्नाच्या पाकिटांचे पुढे काय होत असावे? ती इतर केंद्रांवर वितरणाकरिता जात असावीत कदाचित? म्हणजे दोन शक्यता उद्भवतात. समजा इतर केंद्रांवरचे कर्मचारी तितके जागरूक नसले (किंवा त्यांना ठणकावून सांगणाऱ्या प्रियंकाताई तुपे-ईक्विव्हॅलंट तिथे नसल्या), तर ही अतिरिक्त पाकिटे गरजेपेक्षा अधिक प्रमाणात इतर केंद्रांवर तरीही उतरविली जातीलच, आणि तेथे त्यांची नासाडी होईलच. म्हणजे, नासाडी केवळ एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्राकडे (आणि प्रियंकाताईंच्या नजरेआड) शिफ्ट झाली, इतकेच.

उलटपक्षी, अगदी बेस्ट केस सिनारियोमध्येसुद्धा, समजा इतरही यच्चयावत केंद्रांमधले तमाम कर्मचारी हे जागरूक आहेत, असे जरी मानले, तरीसुद्धा, त्यात्या केंद्रांमध्ये न उतरविली गेलेली पाकिटे (अधिक प्रियंकाताईवाल्या केंद्रात न उतरविली गेलेली पाकिटे) ही गाडीबरोबर ज्या वितरणव्यवस्थेकडून आली, त्या वितरणव्यवस्थेकडे (सोर्सकडे) परत जातील. तेथून पुढे त्यांचे काय होत असेल? त्यांची विल्हेवाट कशी लावली जात असेल? त्यांचे पुनर्वितरण पुन्हा (करोनाकेंद्रांव्यतिरिक्त) इतर ठिकाणी होऊ शकत असेल का? होऊ शकत असले तरी होत असेल का? होत असले तरी त्याला मागणी किती असेल, नि त्याप्रमाणे त्या पुनर्वितरणाला काही मर्यादा असेल का? आणि, त्या मर्यादेपायी अशी पाकिटे ही एका प्रमाणाबाहेर वितरित न होऊ शकून अंतिमत: त्यांची (प्रियंकाताईवाल्या केंद्रात त्यांच्या नजरेसमक्ष नाही, तरी ॲट सोर्स) नासाडीच होत असेल का?

बरे, या पाकिटांचे पैसे कोणीतरी मोजत असेलच. (हे 'कोणीतरी' म्हणजे अंतिमत: करदाताच, ही बाब तूर्तास बाजूला ठेवली तरीही) कोठल्यातरी सरकारी खात्याच्या करोनानियोजनविषयक बजेटातून हे पैसे येत असतील. समजा ही परत आलेली अतिरिक्त पाकिटे शंभर टक्के इतर ठिकाणी (जसे, लेखात उल्लेखिलेली रॉबिनहूड आर्मी, वगैरे) सत्कारणी लावली, असे जरी मानले, तरीसुद्धा, हा त्या मूळ बजेटचा अपव्यय नव्हे काय? मुळात या (जागरूकपणे उतरविल्या न जाता परत पाठविलेल्या) मोठ्या प्रमाणावरच्या अतिरिक्त पाकीटरूपी फीडबॅकचा आढावा (कोठल्यातरी वरच्या सरकारी पातळीवर) होऊन त्यातून अन्नाच्या पाकिटांच्या ऑर्डरींची संख्या तदनुषंगाने जोवर मुळात कमी होत नाही, तोवर ती अतिरिक्त पाकिटे तरीही निर्माण होऊन वितरणव्यवस्थेत ढकलली जातीलच. (निर्माते काय, त्यांना जोवर ऑर्डरी मिळताहेत - नि त्या ऑर्डरींचे पैसे मिळताहेत - तोवर निर्माण करीत राहातीलच - ते त्यांचे कामच आहे. त्यांना ऑर्डरी कोणी किती प्रमाणात द्याव्या, हे ठरविणे हे त्यांचे काम नव्हे - ते काम संबंधित सरकारी खात्याचे आहे.) आणि दिवसाच्या शेवटी ती वितरणव्यवस्थेकडे परत येऊन त्यांची एक तर नासाडी, किंवा मूळ उद्देशाव्यतिरिक्त इतरत्र डायवर्जन, किंवा दोन्ही, हे होतच राहील. फक्त, हे प्रियंकाताईंच्या नजरेआड झाल्याने त्यांना दिसून येणार नाही, इतकेच.

नाही, यात प्रियंकाताई जो काही खारीचा वाटा उचलताहेत, त्याला कोणत्याही प्रकारे कमी लेखण्याचा उद्देश नाही. तो वाटा महत्त्वाचा आहेच, शिवाय, कोठल्यातरी (स्थानिक का होईना, परंतु) पातळीवर कोणीतरी जागरूकपणे आपल्या आवाक्यातला का होईना, काही प्रयत्न करीत आहे, हेही थोडके नाहीच. आणि, त्यातून अत्यल्प प्रमाणात का होईना, अन्नाची नासाडी कमी होत असेल - किंवा, गेला बाजार कोणी जागरूकपणे त्या नासाडीत निदान आपला तरी हातभार लागणार नाही, एवढे जरी पाहात असेल - तरी ते स्पृहणीयच आहे. मात्र, 'मोठे चित्र' लक्षात घेता, अशा प्रयत्नांतून अन्नाची नासाडी खरोखरच कमी झाली, की ती केवळ इतरत्र ढकलली गेली, याचाही पाठपुरावा कोठेतरी (कदाचित सरकारी पातळीवर) होणे आवश्यक आहे - नासाडी (आपल्या परीने का होईना, परंतु) आपण कमी केली, एवढ्यावरच संतुष्ट होऊन भागणार नाही. अन्यथा हे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. (म्हणजे, प्रयत्न करू नयेत, असे म्हणणे नाही; प्रयत्नांअभावी एवढेसुद्धा होणार नाही. मात्र, त्या प्रयत्नांची इतरत्र नासाडी होऊ नये, इतकेच.)

(अवांतर: 'प्रियांका', की 'प्रियंका'?)

==========

'रॉबिनहूड आर्मी'लासुद्धा सरकारी बजेटातून अन्नपाकिटे द्यायला विरोध नाही. मात्र, तशी ती द्यायचीच असली, तर त्याकरिता स्वतंत्र बजेट असावे. करोनानियोजन बजेटातून, आफ्टरथॉट म्हणून, आता उरलेच आहे तर कशीतरी विल्हेवाट लावायची म्हणून त्यांच्या माथी मारणे हा करोनानियोजनबजेटाचा अपव्यय आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चार पाच मार्मिक एकाचवेळी देण्याची सोय व्यवस्थापकांनी कृपया सुरु करावी. तूर्तास एक दिली नबाशेठ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नासाडी होत आहे हे लक्षात आल्यावर कदाचित कुणी तरी मुख्य केंद्रातले लोक जागेही झाले असतील. ते इतर ठिकाणीही अशी व्यवस्था चालवत असतील ...

प्रियांका, बरी झालीस, हे वाचून बरं वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.