करोना: काही नोंदी आणि निरीक्षणे (भाग ४)

Rain and a leaf

ऑगस्ट निम्मा संपलाय, ताळेबंदीचे पाच महिने पूर्ण होत आलेत. मी कालपासून माझ्या केर लादी भांडी करणाऱ्या मदतनीस बाईला बोलावलं आहे, कामातून खूपच दिलासा मिळाला आहे. ती फक्त मास्क लावून येते, आल्यावर हातपाय धुते. बाकी काही नाही करत वेगळं.
मी आधी लिहिलंच आहे की ताळेबंदीच्या काळातच मला नवीन नोकरी मिळाली आणि मी घरूनच काम करते आहे. ऑफिसला कधी जाता येईल याची खूप उत्सुकता आहे, ऑफिस घरापासून जवळ आहे तसं परंतु सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू झाल्याखेरीज ऑफिस नियमित सुरू करता येणार नाही. काल अचानक ऑफिसला जायची संधी मिळाली आणि मी मार्चनंतर पहिल्यांदा मुलुंडच्या बाहेर पडले. वेगळे कपडे घालण्याचा आनंद, नेहमीचे ८-१० चेहरे सोडून नवीन माणसं भेटण्याची संधी आणि अर्थात आपलं ऑफिस कसं आहे नक्की ते पाहण्याची संधी यामुळे मी अतिशय खुश झाले. रस्त्यात बऱ्यापैकी वर्दळ होती. त्यामुळे जरा स्थिरस्थावर होतंय की काय जीवन असं वाटायला लागलं होतं.
पण आज सकाळी आलेल्या दोन बातम्यांमुळे तळापासून ढवळून निघालं सगळं. दोन मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या एकापाठोपाठ एक. तसं तर ३१ जुलै रोजीही एक मित्र गेल्याचं कळलं होतं पण तेव्हा मी हे कोणालाच बोलले नाही, फेसबुकवरही काही चर्चा केली नाही जणू मी ना बोलल्याने ते घडलेलं बदलणार होतं. काल रात्री आमच्या कॉमन मित्राशी बोलताना तपशील कळले आणि अस्वस्थता आली खूपच. आजच्या बातम्या ऐकून अस्वस्थता वाढत गेली. त्यात गेला आठवडाभर मुंबईत विचित्र वातावरण आहे, श्रावणाचा मागमूसही नाही. सूर्यदर्शन अनेक दिवसात झालेलं नाही. पाऊस तरी पडत असतो किंवा अंधारलेलं तरी असतं. रोज संध्याकाळचं चालणंही झालेलं नाहीये मनासारखं.
गेल्या काही दिवसांत अनेक जण गेल्याचं कानावर आलं. त्यातले प्रत्यक्ष ओळखीतले कमी होते. पण रुग्णांची संख्या वाढतेय, या आजाराचे अनेक प्रकार आहेत, औषधांबद्दलची संदिग्धता, रुग्णालयात दाखल झाल्यास होणारा प्रचंड खर्च, वगैरे बातम्या रुतून बसतात. खूप जण बरे झालेत, लस येऊ घातलीय, सरकारी रुग्णालय वा covid care centres मध्ये चांगली सोय आहे, जेवण चांगलं मिळतं, तिथे योग व्यायाम आदी करून घेतलं जातं, या सकारात्मक बातम्या विरून जातायत वरच्या वर.
सतत सकारात्मक राहायलाही ताण येतोय की काय असं वाटतंय आता. मुलंही आता कंटाळलीत. अभ्यास करायला काही मोटिवेशन उरलेलं नाही त्यांना. ऑनलाईन क्लास सगळ्यांचे सुरू नाही झालेले. त्याविषयीच्या पोस्ट वाचूनही वाईट वाटतंय. ठाण्यासारख्या शहरातल्या ज्ञानसाधना कॉलेजातल्या मैत्रिणीचे अनुभव वाचून लक्षात येतंय की या मोठ्या शहरांमध्येही नाहीरे वर्ग प्रचंड आहे. अनेक मुलांकडे ऑनलाईन अभ्यासासाठी साधने नाहीत. गावाकडच्या गोष्टी फारच दूर राहिल्या. चंद्रपूर, सोलापूर, औरंगाबादसारख्या ठिकाणच्या प्राध्यापक मैत्रिणीही अशाच कहाण्या सांगतायत. ११वीला प्रवेश घेताना सगळ्या कमी फी ज्या विषयांना लागेल ते निवडा असं सांगणारे पालक, ७५० रुपये वर्ष फी देखील भरण्याची क्षमता नसणारे पालक, पूर्ण कुटुंबात मिळून केवळ एक फोन असलेली घरं...
काळ तर मोठा कठीण आला, या वाक्यातल्या कठीण शब्दाची धार जणू बोथट झाली आहे गेल्या काही दिवसांत! सतत हीच धास्ती - उद्याचं कठीण आजच्या कठीणपेक्षा किती वेगळं असणार आहे? किती तीव्र असणार आहे? झेपणार आहे ना?
हे लिहीलं दुपारी, पण पोस्ट नाही केलं, जरा थांबले. कारण ते फार नकारात्मक वाटत होतं. आणि तासाभरात पंडित जसराजांची बातमी आली. पण त्यांचं वय खूप होतं त्यामुळे त्याचा धक्का नाही बसला. आणि मग मूड ठीक करायला सरळ आवडत्या पुस्तकांवर लिहायला घेतलं. आता जरा नॉर्मल वाटतंय.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मुळात ज्ञानसाधना सुरू करण्याचं मुख्य कारण हे होतं की कमी मार्क मिळणाऱ्या मुलांसाठीही कॉलेज असावं. तिथे नाही-रे वर्ग मोठ्या प्रमाणावर असणं अपेक्षितच. ह्या काळात त्या मुलांच्या शिक्षणासाठी कोण, किती पुरे पडणार ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला हे निरीक्षण अतिशय महत्वाचे वाटत आहे.
बऱ्याच लोकांची अशा सारखी मनस्थिती झाल्याचे दिसत आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऑफिसात प्रत्यक्ष जाणे या गोष्टीत गेल्या दोन महिन्यांत सर्वांना एक सेफ थ्रिल वाटत होतं. काहीजण रेग्युलर तर काही जण आडदिवशी ऑफिसात जाऊन सर्वत्र अपडेट करताना दिसायचे. आता रेग्युलर जाणार्या लोकांपैकी एकेक जण पॉझिटीव्ह निघत चालला आहे. खरंच उलट सुलट मनस्थिती होईल असे सिग्नल आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुंबईत आमचे ऑफिस आणि कारखाना एकाच ठिकाणी आहेत. कारखाना अंशत: चालू आहे, ऑफिस बंद. तरीपण कंपनीच्या एकुण पॉझिटीव्ह लोकांपैकी निम्म्याहून अधिक घरून काम करणारे आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0