कोव्हिड आला रे अंगणी - राजेंद्र कार्लेकर

कोव्हिड आला रे अंगणी

Rajendra Karlekar, Mumbai

१७ ऑगस्टला COVID-19करता रिपोर्ट काढला आणि वाटू लागलं की आपला नंबर लागणार. मी आणि बायको एकाच बोटीतील प्रवासी. दोघांनाही ताप होता आणि बायकोला वास येत नव्हता. घरात दोघंच असल्याने होम क्वारंटाईन होण्याची शक्यता होती. जरा बरं वाटलं. पाच महिन्यांनी ब्रेक मिळणार होता. आम्ही दोघेही बँकर असल्याने ऑफिस चालू होतंच गेले ५ महिने.

१८ला सकाळी नऊ वाजताच फोन आला. अत्यंत गोड आवाजात माझ्या नावाची चौकशी झाली. मी कोणतीही स्कीम नकोय असं सांगायचा स्टार्ट घ्यायच्या आधी माझी विकेट गेली होती. ‘मी बृहन्मुंबई महानगरपालिकेतून बोलते आहे, तुम्ही जो कोव्हिड रिपोर्ट काढला होता तो पॉझिटीव्ह आला आहे,’ अशी सुखद वार्ता तिने मला दिली. लगे हाथ, ‘ऋता कोण आहेत’ अशी चौकशी करून अत्यंत गोड शब्दात त्यांचा पण रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे, अशी बातमी दिली. मी आलेलं टेन्शन न दाखवता होम क्वारंटाईन मिळेल का विचारायचा प्रयत्न केला, त्याला वाटाण्याच्या अक्षता लावून फोन बंद झाला. मी ताबडतोब डॉ. दांडेकरांच्या दवाखान्यात जाऊन त्यांना बातमी सांगितली व ४ दिवसांचे औषध आणले दोघांचेही. बिल्डिंगमध्ये आलो तो माझ्या पाठोपाठ BMCचे ३ स्टाफ हजर झाले. त्यांनी आमच्या मजल्यावरच्या इतर बिऱ्हाडातील सर्वांचे रॅपिड चेकिंग केले, सर्वांचे मोबाईल लिहून घेतले व आमचे घर पाहून होम क्वारंटाईनचा निर्णय दिला व तसा फॉर्म भरून घेतला. डॉक्टर विजया यांनी सौजन्याने त्यांचा वैयक्तिक नंबरही दिला. इतकी जलद कार्यवाही आम्हाला अपेक्षित नव्हती.

BMCचं मनातल्या मनात कौतुक करत मी १४ दिवस काय करायचे असे ठरवत होतो. तोपर्यंत परत फोन वाजला. परत BMCमधूनच फोन होता. आमचं रेजिस्ट्रेशन होम क्वारंटाईन या प्रोग्राममध्ये झालेलं आहे, अशी माहिती देऊन पुढच्या काही दिवसात काय काय काळजी घ्यायला हवी, भांडी व कपडे साफ करताना, जेवताना काय काळजी घ्या हेही सांगितले. आम्हाला कोणते गंभीर आजार, मधुमेह किंवा रक्तदाब इ. नाही ना याची चौकशी केली. आमच्या वॉर्डचा इमरजन्सी क्रमांक आणि टोलफ्री नंबर देऊन फोन ठेवला गेला. थोड्या वेळाने आणखीन एक फोन येऊन आम्ही BMCमधून बोलतोय, एका तासात तुमचं घर सॅनिटाईझ करायला माणसं येतील, असं सांगून फोन ठेवला गेला. आणि खरंच तासाभरात माणसं येऊन घर सॅनिटाईझ करून गेली. दुसऱ्या दिवसापासून रोज सकाळी ऑटोमेटेड कॉल येऊ लागला की आपण कसे आहात, ताप असेल तर १ दाबा किंवा आणखी काही त्रास असेल तर २ दाबा किंवा ऑपरेटरकरता थांबा. त्याचबरोबर आम्ही योग्य ती काळजी घेतोय की नाही, याकरता दिवसातून एकदा फोन येतच होता. हा संपूर्ण अनुभव मला नवीन होता आणि सुखद होता.

BMCबद्दल एक जनरल मत आपण बनवलेलं असतं की ‘साले काही काम करत नाहीत किंवा काम करायला नको या लोकांना.’ या विचाराला अवघ्या ७/८ तासात मुळापासून धक्का बसला होता. सतत आणि सातत्याने ५ महिने काम केल्यानंतरसुद्धा कुठेही आवाजात त्रागा, कटकट, एक अदृश्य राग असं काहीही दिसत नव्हतं. या गोष्टीबद्दल BMC स्टाफ आणि त्यांच्या कामाच्या सिस्टिमबद्दल कौतुक करावे तितके कमी आणि या त्यांच्या कामाबद्दल मला अतीव आदर आहे आणि मी त्यांचा आभारी राहीन.

१८ ते २१ ऑगस्ट हे ३ दिवस घरातच होतो. कधी मी कधी बायको असे आळीपाळीने नाश्ता स्वयंपाक करत होतो. बायकोची तब्येत माझ्यापेक्षा जर लवकर सुधारत होती मला मात्र जे खाईन ते तिखट लागत होते. पण कोरोनामध्ये हे होणारच हे माहिती असल्याने पॅनिक स्टेज नव्हती. खरी काळजी दुसरीच वाटत होती. २० ऑगस्टपासून माझा जुना मित्र ऍलर्जीक ब्राँकायटीस चालू झाला होता. बोलता येत नव्हतं. जोरात धावपळ केली किंवा अचानक हालचाल केली किंवा काही काही मानसिक वरखाली झालं तर खोकला सुरू होत होता. (मानसिक वरखाली होण्याकरता गणपती हे मोठ्ठं कारण होतं. घरातला गणपती मी पाहूही शकणार नाही हा मानसिक धक्का खूप मोठा होता) अचानक हे आणखीन वाढलं तर? या भीतीने काय करावं हे सुचत नव्हतं. शेवटी BMC डॉक्टर विजया खरात यांना फोन केला आणि इमरजन्सी नंबरवर पण फोन करून परिस्थिती सांगितली. डॉ. विजयांनी १५ मिनिटात ‘तुम्हाला नेस्को कोव्हिड सेंटरला हलवूया,’ असं कळवलं. आम्ही विचार करायला अर्धा तास मागून घेतला व प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊ या का, असा विचार केला. मोठी बहीण व BMCमधील मैत्रीण मेधा वैद्य यांचा सल्ला घेतला. अर्ध्या तासात नेस्को सेन्टरला ठीक सोय आहे, अशीही माहिती मिळाली. मग आत्तापर्यंत BMCकडून चांगला अनुभव आलाय, पुढेही नीट होईल असा विचार करून डॉ. विजया यांना ओके सांगितलं. त्यांनी २ तासात अँबुलन्स येईल असं सांगितलं. बायकोने बॅग भरायला घेतली. जरुरीपुरते कपडे, खोकल्यावरची आयुर्वेदिक औषधे, गरम पाण्याची बाटली, काही थोडे पैसे, कोव्हिडचा रिपोर्ट, आधार कार्ड असं सगळं भरलं. सेंटरचे नियम काहीच माहिती नसल्याने काय लागेल, काय वापरता येईल, काय परत आणता येईल, असं सगळं चक्र डोक्यात चालू होतं.

दुपारी दोनच्या सुमाराला अँबुलन्स आली. मी बॅग उचलून घराबाहेर पडलो. अजून दोन कोव्हिड रुग्ण अँबुलन्समध्ये होते. नेस्को कोव्हिड सेन्टरला आलो. असं वाटलं की मी जेम्स बॉण्ड आहे आणि डॉ. नोच्या अड्ड्यावर आलोय. सगळे PPE किट घातलेले. आमची अँबुलन्स पण निर्जंतुक करून घेतली. माझ्या नावाचा कागद घेऊन दोन दरवाजे ओलांडून आत आलो. आतही PPE किटचं राज्य. सगळे डॉक्टर्स हिंदी चित्रपटातल्या खलनायकासारखे काचेच्या कपाटात. आणि आम्ही बाहेर लाईन लावून. माझं नाव रजिस्टर करून मी डॉक्टरची लाईन पकडली. नंबर आल्यावर त्यांनी सर्व चौकशी इंटरकॉम फोनवरून केली. मला परत जेलमध्ये असल्याचा फील. इंग्लिश चित्रपटात कसा वकील आणि कैदी बोलतात तसं. माझी केस हिस्टरी घेतल्यावर BP, ऑक्सिजन लेव्हल आणि ताप हे सगळं बघून मला वॉर्ड क्र. १ असं सांगितलं आणि मी माझी बॅग घेऊन त्या दिशेने निघालो. वॉर्डमध्ये माझे स्वागत चेतन नावाच्या PPE किटवाल्याने केले आणि तुमचा बेडचा चॉईस काय असं विचारलं? त्याही परिस्थितीमध्ये मला हसू आले आणि मी छान वारा आणि लाईटवाली जागा मागितली. त्याप्रमाणे बेड क्र ५३ माझ्या वाट्याला आला. डोक्याशी पंखा, दोन इलेक्ट्रिसिटी पॉईंट असलेला बोर्ड बेडपाशी होता. मोबाइल चार्जिंग आणि वाफारा घ्यायची सोय झाली होती. अर्थात ही सोय सर्वच बेडना होती. बेडमधलं अंतर सोशल डिस्टन्सिंग पाळून ठेवलेलं होतं. वॉर्डच्या एका टोकाला पाणी गरम करायची किटली ठेवलेली होती. माझ्या मनात BMCबद्दल परत एकदा आदर उफाळून आला. सायन हॉस्पिटल आणि इतर सरकारी हॉस्पिटलची एकूण परिस्थिती याच्याशी काही प्रमाणात परिचय असल्याने कोव्हिड सेन्टरची व्यवस्था खूपच समाधानकारक वाटली.

बेड ताब्यात आल्यावर मात्र एकटेपण घेरून आलं. आपण एकटे आहोत, घरी गणपती आहेत, मी काहीच करू शकत नाहीये, आजारी आहे, ही भावना अंगावर चाल करून आली. घशात आवंढा दाटून आला, डोळेही मनाला न जुमानता भरून आले. थोडा वेळ आडवा पडलो, थकव्याने डुलकीही लागली असावी. जेवण आल्याच्या घोषणेने जाग आली. लायनीत उभा राहून जेवण घेतलं. कालियामधल्या अमिताभसारखं म्हणावसं वाटलं, "हम जहां खडे होते है लाईन वही से शुरू होती हैl" पण सर्व रुग्ण अगदी सिनियर सिटीझनसकट लाईनमध्ये उभे होते, त्यामुळे मुकाट लाईनमधून जेवण घेतलं. खण असलेल्या प्लास्टिक डब्यातून जेवण आणि सोबत एक केळं. हॉस्पिटलमधल्या जेवणाचा याआधीचा अनुभव तितकासा बरा नसल्याने केळं पोटभरीला म्हणून घेऊन ठेवलं कारण माझा खोकला आणि केळं यांची जोडी जमणं जरा कठीणच होतं. कसाबसा थोडासा भात खाल्ला. बाकी अन्न टाकून द्यावं लागलं, या गोष्टीचा मला शेवटपर्यंत त्रास होत राहिला.

या काळात घरी राजश्री (मोठी बहीण), ऋता आणि मेधा (BMCमधली मैत्रीण) यांच्याबरोबर चॅट चालू होते कारण बोलता येत नव्हतं. कॉलेज ग्रूपमध्ये मी नेस्को कोव्हिड सेन्टरला ऍडमिट झाल्याचं कळल्याने काळजीचे मेसेज येत होते. पण कोणाला उत्तर द्यायच्या परिस्थितीत आणि मूडमध्ये नव्हतो. रात्री झोप लागली थोडा वेळ पण कोव्हिड सेन्टरवरचे चालू असणारे लाईट आणि माईकवरून सुरू असलेल्या अगम्य भाषेतील घोषणा, यांच्यामुळे मी रेल्वे स्टेशनवर झोपलोय असं वाटत राहिलं. पहाटे पहाटे झोप लागली आणि सकाळी उशिरा जाग आली त्यामुळे सकाळचा चहा नाष्टा चुकला. मग बरोबर आणलेलं सफरचंद खाल्लं आणि ब्लड चेकिंग, ईसीजी आणि एक्सरेच्या बारीमध्ये उभा राहिलो. रक्त तपासणी आणि ईसीजीचं काम पटकन झालं, मात्र एक्सरेला खूप वेळ गेला आणि पुलंच्या पादत्राणअंगुष्ट योगाप्रमाणे माझा तिसरा नंबर असताना ‘आजची वेळ संपली, उद्या सकाळी साडेदहा वाजता या,’ अशी घोषणा झाली. थोडा रागही आला पण एकूणच रुग्णांची संख्या बघता थोडं मागेपुढे होणारच, अशी स्वतःची समजूत घालत वॉर्डमध्ये आलो. माझ्या वॉर्डमध्ये 120 रुग्णांची सोय होती. प्रत्येकाने स्वतःच विश्व तिथे उभं केलं होतं. बहुतेकांनी बेडच्या सलाईनच्या खांबाचा उपयोग कपडे वाळत घालायला केला होता. तुरळक अपवाद वगळता सर्वजण मोबाईलमध्ये रमलेले होते. गाणी ऐकणे, प्रवचन ऐकणे, कॉल, विडिओ कॉल करणे, यात सर्व खूष होते असं वाटत होतं. काही नवराबायको किंवा कुटुंबातील काही जण तिथे आले होते, ते अधूनमधून एकमेकांना येऊन भेटत होते. अपवाद म्हणून एक रुग्ण जो जिम कॉर्बेट वाचत होता आणि दुसरा ज्याने पत्ते आणून रमीचा किंवा जास्त भिडू गोळा करून मेंढीकोट चालवला होता.
मी मात्र अस्वस्थ होतो. आज विसर्जन होतं. दुपारी मावसबहिणीने विडिओ कॉल केला "दादा, आरती करतोय, तुझी आठवण आली. तुझी आरतीची फर्माईश/सूचना सांग." मला भरून आलं. दर वर्षी मावशीच्या गणपतीसमोर आरती करणारा मी विडिओवरून आरती बघत होतो. रामाची आरती घ्या, असं सांगून मी आरती ऐकू लागलो. एक कडवं ऐकल्यानंतर मात्र बांध फुटला आणि रडू कोसळलं. कॉल बंद करून विषण्ण मनाने बसून राहिलो. संध्याकाळी परत डॉ.च्या बारीत उभा राहिलो. डॉ. प्रतीक (हे नाव नंतर कळलं) समोर बसलो. माझा एकूण अवतार बघून त्याने काही होतं आहे का याची चौकशी केली. मी खोकला आणि कोव्हिड याबरोबर गणपतीला जात येत नाही याची हतबलता आणि एकटेपण असा सगळा पाढा वाचला त्यांच्यापुढे. त्यानेही शांतपणे सर्व ऐकून दिलासा दिला. मलाही त्यामुळे बरं वाटलं. विशेष म्हणजे तो मला डिस्चार्ज मिळायच्या आदल्या दिवशी भेटून गेला. PPE किटमध्ये असल्याने मी त्याला ओळखलं नाहीच पण त्यानेच ओळख दिली आणि गणपती नीट झाले ना? आता बरं आहे ना? इत्यादी चौकशी केली. कोव्हिड सेन्टरच्या डॉक्टरकडून हे खूपच अनपेक्षित व सुखद होतं. डॉक्टरमधल्या या माणसाच्या दर्शनाने मी खरोखरच भारावून गेलो.
२४ ऑगस्टला सकाळी लवकर जाग आली. चहा व पोहे असा नाश्ता होता. कमी भिजवलेले, हळद जास्त असलेले ते पोहे माझ्या घशाखाली उतरले नाहीत. चहा पिऊन मी कालचा अनुभव लक्षात घेता आज जरा लवकरच एक्सरेकरता बारी लावली. साधारण दहावा नंबर असावा पण नंतर लक्षात आले की तुमच्या पाठी मी आहे असं सांगून पब्लिक ब्लड किंवा इसीजीच्या लायनीत उभं होतं. नळाच्या लाईनमध्ये बादली, कळशी ठेवून जातात तसं. बघता बघता माझा १०चा २२/२३वा नंबर झाला. भांडायची ताकद नव्हती. एक्सरे काढून झाला, तिथे मात्र चांगला अनुभव आला. एक्सरे रूममधल्या PPE किटवाल्याने माझा मोबाइल घेऊन एक्सरेचा फोटो काढून दिला व डॉक्टरला दाखवा असं सांगितलं. त्या फोटोचा त्या दिवशी फार उपयोग झाला. एक्सरे डॉक्टरला दाखवून आणि रेग्युलर चेकिंग करून वॉर्डमध्ये परत आलो. एक्सरेचे फोटो राजश्री आणि मेधाला पाठवले. मेधाने डॉ. अतुल लिमये उर्फ अली (ट्रेक ग्रुपमधला मित्र) आणि राजश्रीने डॉ. चेतन चितालिया, माझे आयुर्वेदिक डॉक्टर ज्यांचे औषध मी घेत होतो त्यांना आणि आमची कुटुंब मित्र डॉ. अंजली बापट यांनाही पाठवले. तीनही डॉक्टरांनी एक्सरे ठीक असून थोडं इन्फेक्शन आहे त्याच्याशी कोव्हिडचा संबंध नाही, असे विश्वासाने सांगितले. (एक्सरे बघून हे कसं कळतं हा एक कूट प्रश्न आहे) डॉ. अली आणि डॉ. चितालिया या दोघांनीही ‘सेप्टिलीन’ या गोळ्या चालू करायला सांगितल्या. त्या तिथे कशा मिळणार, हा प्रश्न मेधाने सोडवला. तिने तिचं BMC मधलं नेटवर्क कामाला लावलं आणि संध्याकाळपर्यंत गोळ्या, थोडी फळं, पेपर डिश, पेपर ग्लास, एक सुरी, साखर, मीठ असं सर्व सामान पोचवलं. रात्रीच्या जेवणात वेगळेपण म्हणून कोबी-बटाटा भाजी होती. दोन दिवस छोले, उसळ असं खाण्यापेक्षा ती भाजी मला छान वाटली आणि दीड पोळी आणि थोडा भात मी जेवू शकलो. दिवसभरातल्या घडामोडींनी मानसिक थकवा होता आणि दिलासाही मिळाला होता. त्यामुळे झोपही लागली.

२५ ऑगस्टचा दिवस उजाडला तोच मुळी वेगळा रंग घेऊन. चहा आणि नाष्टा आला. नाष्ट्यात इडली आणि सुकी चटणी (पुडी) होती. बदल म्हणून तो नाष्टा मस्तपैकी खाल्ला आणि निवांतपणे कोव्हिड सेंटरमध्ये फेरी मारली. इथे आल्यानंतर पहिल्यांदाच फेरी मारत होतो. वॉर्ड नं १ ते ८ आणि पेशंट नंबर टाकलेले. लाकडी भिंती उभ्या करून वॉर्ड उभे केलेले. ठिकठिकाणी बेसिन आणि टॉयलेटची सोय केलेली. स्वच्छता वाखाणण्यासारखी होती. मधले काही वॉर्डस रिकामे होते किवा खूपच कमी माणसं असलेली होते. एक वेगळा लेडीज वॉर्ड पण होता. संध्याकाळी वॉर्डमधल्या माईक सिस्टिमवर काही उत्साही मंडळी आणि स्टाफ गाणी म्हणत असत. मला स्टाफ आणि रुग्ण दोघांचाही कौतुक वाटलं. एक PJ आठवला. नरकात काही माणसं DJवर नाचत असतात. यम विचारतो, ही कोण आहेत? यमदूत सांगतो, ‘मुंबईकर आहेत. कुठेही सेट होतात साले.’ तीच अवस्था होती. मी तिथे असताना दोन वाढदिवस साजरे झाले. एकदा आमच्या वॉर्डमध्ये आणि एकदा लेडीज वॉर्डमध्ये. आमच्या वॉर्डमध्ये कोणत्या तरी सिनियर सिटीझनचा होता मग १२ वाजेपर्यंत न थांबता ११ वाजता गाणं लावलं आणि छोटासा केकही कापला असावा. मी अर्धवट झोपेत होतो. २४ तारखेचा वाढदिवस मात्र लेडीज वॉर्डमध्ये होता. वाढदिवसाचं गाणं लावून झालं आणि डायरेक्ट झिंगाट लावलं. मंडळी नाचतही असावीत कारण टाळ्या व जल्लोष ऐकू येत होता.

२६ तारखेला माझी तब्येत बरीच सावरली होती. पण अजूनही जेवण नीट जात नव्हते. मग त्यावर जरा बदल म्हणून मेधाने तिच्या माणसाबरोबर काही वस्तू पाठवल्या. त्या माणसाला तिने खजूर आणि बदामवाला स्लाईस केक नेऊन दे असे सांगितले तर त्या माणसाने खजूर आणि बदामचं एक एक पाकीट आणि दोन पेस्ट्रीज पाठवल्या. मग २६ला रात्री आणि २७ला सकाळी एक एक पेस्ट्री खाल्ली. २७च्या पेस्ट्रीचा जास्त आनंद आला कारण त्या दिवशी माझ्या भाचीचा वाढदिवस असतो व तो मला साजरा करता आला. आता आलेले फोन डिस्कनेक्ट करायची स्टेज जाऊन फोन करता येण्याची स्टेज आली होती.

तब्येत सुधारत असल्याने फोनचा उपयोग आता भरपूर करत होतो. मित्र मंडळी आणि नातेवाईकांच्या मेसेजला सविस्तर उत्तरं आणि शंका निरसन करत होतो. अजूनही खूप वेळ बोलता येत नव्हतं पण परिस्थिती खूपच सुधारली होती. खोकलाही नित्यातून नैमित्तिकात आला होता. डॉक्टरच्या सकाळ संध्याकाळच्या बारीतून आपल्यात सुधारणा होते आहे, हेही जाणवत होतं. डॉक्टर व PPE किटमधल्या नर्स आणि वॉर्डबॉईज यांच्या प्रतिक्रियातूनही हे जाणवत होतं.

कोव्हिड सेंटरला आल्या आल्या आम्हाला एक पाउच देण्यात आला होता त्यात एक मास्क, कंगवा, छोटी तेलाची बाटली, दोन शाम्पू आणि हेअर कंडिशनरचे पाऊच, एक ब्रश व पेस्ट आणि दोन साबण ठेवायच्या डब्या व त्यात कपडे धुवायचा व अंगाला लावायचा साबण असा तो दैनंदिन जरूर पूर्ण करणारा पाऊच खूपच उपयोगी पडला.

या सर्व सुधारणेमुळे अंघोळ करू या असा विचार केला पण अंघोळीच्या एरियामध्ये बायकांचे राज्य पाहून परत आलो. खरं तर पुरुष आणि बायकांचे टायमिंग वेगळे होते पण कोणीच तो नियम पाळताना दिसले नाही. काही लहान मुलंही होती, त्यांना अंघोळी घालायचे काम पण चालू होते. अंघोळीच्या एरियामध्ये जाऊन आल्यावर परत एकदा सेंटर व्यवस्था बघणाऱ्यांबद्दल कौतुक वाटलं. छोटे छोटे (अंघोळ करण्यापुरते) चौकोन / क्युबिकल्स उभे केलेले. त्याला जाडसर प्लास्टिकचा पडदा (दरवाजा नव्हता). आतमध्ये एक शॉवर आणि नळाची सोय आणि गिझर आणि गरम पाण्याची सोय. क्युबिकल्स तयार करताना मारलेल्या स्क्रूचा उपयोग कपडे टांगायला होत होता. एकूण व्यवस्था समाधानकारक होती.

२७ तारखेला अंघोळ केली, माझ्याकडे अंघोळीला मग नसल्याने घरातून नेलेलं भांडं आणि एक लिटरची एक बाटली यांच्या साहाय्याने अंघोळ केली. ट्रेकला जात असल्याने वर उल्लेखित सोयी म्हणजे राजेशाही थाट वाटत होता. त्यातही एक गोष्ट लक्षात आली की मी ज्या बूथमध्ये अंघोळीला जात होतो तिथे गिझरच्या पाइपला नळ नव्हता त्यामुळे तिथे कोणी जात नसे. मग माझा वैयक्तिक बूथ असल्यासारखा त्याच बूथचा वापर अंघोळीकरता केला.

२८ तारखेला डॉक्टरांनी सांगितलं की उद्या तुमचा शेवटचा दिवस औषधोपचाराचा. लगेच डोक्यात किडा वळवळ करू लागला, की मला केव्हा सोडतील. पण विचार केला की डॉक्टरांना उद्याच विचारू. २८ तारीख आराम करण्यात घालवली. आता दोन फुलके आणि अर्धा भात किंवा सगळा भात आणि एक फुलका असा आहार वाढला होता. चहा नाश्ता किंवा जेवण आलं की लगेच आणायचं आणि गरम असतानाच खाल्लं तर दोन घास जास्ती जातात असाही शोध मी स्वतःबद्दल लावला होता.

२९ तारखेला सकाळी सकाळी डॉक्टरांच्या समोर जाऊन बसलो. त्यांनी आज तुमची औषधं संपणार असं सांगितलं. मी मला सोडणार केव्हा हा प्रश्न विचारला. तेव्हा ३ दिवसांनी, ३ दिवस ऑबझर्व करून ठरवू असं सांगितलं. अजून ३ दिवस लागणार असं स्वतःला समजावत बेडवर बसलो. आता कंटाळा यायला लागला होता. मग पूर्ण दिवस पत्ते खेळणाऱ्या मंडळींना सल्ले देण्यात आणि मित्रमंडळींबरोबर आणि घरच्या मंडळींबरोबर फोनवर बोलण्यात व चॅट करण्यात घालवला. संध्याकाळच्या डॉक्टरने तुमच्या डिस्चार्जकरता रिमार्क मारतोय, असं सांगून एक सुखद धक्का दिला.
दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० तारखेला सकाळी लवकर आवरून डॉक्टरसमोर बारी लावली. त्या डॉक्टरणीने (देव भलं करो तिचं) आज तुम्हाला डिस्चार्ज देणार आहोत, असं सांगून तपासणी संपवली. त्या आनंदात सगळा नाश्ता संपवला आणि एक सफरचंद पण खाल्लं. एक साधी गोष्ट किती फरक घडवून आणू शकते! नाष्टा करून कोव्हिड सेंटरला एक चक्कर मारून परत आलो तर माझ्या नावाचा पुकारा चालू होता. पेशंट राजेंद्र नर्स काउंटरला भेटा. मला वाटलं झाले डिस्चार्ज पेपर तयार. तिथे जाऊन पाहतो तर नर्सने एक गोळी हातावर ठेवली आणि म्हणाली ही तुमची गोळी, तुमचं BP वाढलं आहे ना? मी घाबरलोच. अर्ध्या तासापूर्वी डॉक्टरणीने सांगितलं की BP बरोबर आहे. नर्सला परत विचारलं. मग कळलं की ती गोळी कोणत्या तरी दुसऱ्या राजेंद्रची होती. मग मी चौकशी केली. मी बेड क्र ५३चा पेशंट आहे आणि मला घरी सोडणार आहेत, असं डॉक्टर म्हणाल्या आहेत. दोन मिनिटांनी चेक करून तिने, हो, तुम्हाला एकपर्यंत घरी सोडतील, जरा उशीर आहे कारण २२ जणांचा डिस्चार्ज आहे आज, असं सांगितलं. मी अक्षरशः हवेत तरंगत बेडवर येऊन बसलो व शेजारी मंडळींना घरी सोडत आहेत, अशी बातमी दिली. सर्वांनी आनंद व्यक्त केला व काळजी घ्या, अशी विनंती केली. मी बॅग आवरायला घेतली. न वापरलेल्या पेपर डिश व ग्लास तसेच उरलेली फळं, साखर, मीठ आजूबाजूला वाटून टाकली. आणि समान आटोपशीर करून टाकले. १२ वाजता माझ्या नावाची व आणखी ६ नावांची घोषणा झाली. आम्हाला सर्वांना एकत्र करून डिस्चार्ज पेपर दिले सह्या घेतल्या आणि सविस्तर सूचना दिल्या. काय काळजी घ्या, खाणंपिणं काय असावं, औषधं किती व कोणती, जर त्रास झाला तर इमर्जन्सी नंबर व कोव्हिड सेंटरचा नंबरही दिला आणि कोव्हिड सेंटरला फोन करून डायरेक्ट आलात तरी तुम्हाला ऍडमिट करून घेऊ, असं आश्वासनही दिलं.
सर्व नर्सिंग स्टाफ व वॉर्डबॉईज यांचे आभार मानून मी बॅग खांद्याला लावली आणि परत त्या डॉ. नोच्या डबल दरवाज्यातून बाहेर पडलो. दरवाजाबाहेरच्या वॉचमन आणि स्टाफनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले, शुभेच्छा दिल्या व पेपर चेक करून माझ्यासकट सर्व सामानावर सॅनिटाईझ करणारा फवारा मारला. माझे नाव मेन गेटवर इंटरकॉमवरून कळवले व मला जायची परवानगी दिली. मेन गेटवर नाव सांगून मी बाहेर पडलो व समोर रिक्षा उभीच होती त्यात बसून घरचा पत्ता सांगून रिलॅक्स झालो.

या सर्व प्रवासात माझ्या घरची मंडळी ज्यात स्वतः कोरोनाबाधित असून वेळोवेळी फोन मेसेज (ज्यात तिच्या आवाजात काळजी आणि मेसेज मध्ये तिची "मी काहीच करू शकत नाहीये" याची असहाय्यता दिसत होती) करणारी माझी पत्नी, वेळोवेळी धीर देणारी माझी मोठी बहीण, वस्तू माझ्यापर्यंत पोहोचवणारी मेधा वैद्य, कॉलेजमधील सध्या नागपूरला असलेला मित्र मिलिंद जोशी आणि त्याचे कुटुंबीय, डॉ क्षितिज गोखले (कॉलेजमधल्या मित्राचा मुलगा जो BKC कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत आहे) यांचे खूपच साहाय्य मिळाले. सर्वच कुटुंबीय, हितचिंतक, मित्र, ऑफिसमधील सहकारी यांनी वेळोवेळी मेसेज करून व फोन करून माझे मनोधैर्य उंचावले त्यांचा मी आभारी आहे.

सर्वात जास्त आभार मी BMC स्टाफ ज्यात डॉ. विजया खरात यांच्यापासून कोव्हिड सेंटरमधील स्टाफ आहे, त्यांचे मानतो. या सर्वांनी केलेल्या मदतीचा व दाखवलेल्या आपुलकीचा मी बरा होण्यात मोठा वाटा आहे. या सर्व प्रोसेसमध्ये किती पैसे खर्च होतील असा विचार मनात येत असे. हॉस्पिटलबद्दलच्या बिलांच्या आणि खर्चाच्या आकड्यांच्या बातम्याही पहिल्या होत्या पण मी सर्वांना सांगू इच्छितो की दि. २२ ऑगस्ट ते दि. ३० ऑगस्ट या कालावधीत मला फक्त रु. १६५/- खर्च आला जो नेस्को कोव्हिड सेंटर, गोरेगाव ते बोरीवलीतील माझं घर हा रिक्षा खर्च होता.

हा आठ दिवसाचा काळ मला खूप काही देऊन गेला. या आठ दिवसांबद्दल व मला आजारातून सावरायची संधी दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो.

राजेंद्र कार्लेकर

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

छान लिहिलं आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अनुभव कथन आवडले.
धीराने घेतलेत सगळे!
शेवटून दुसरा पॅरा वाचतांना डोळे भरुनच आले. काळजी घ्या अजून ही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0